मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘एक असते चिमणी’ – डाॅ.केशव साठ्ये ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

??

☆ ‘एक असते चिमणी’ – डाॅ.केशव साठ्ये ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

मध्यंतरी सातारला गेलो होतो. हॉटेलची खिडकी सहज उघडली तर समोर २,३ चिमण्या, अगदी दोन फूटांवर. हरखून पहात बसलो. खरं सांगतो, पहिल्यांदा मोर बघितला तेव्हाही एवढा आनंद झाला नव्हता. आता ‘चिमणी’ हा पक्षी पुण्यात पाहायला मिळणे दुर्लभ झालंय. निदान आमच्या कोथरुडमध्ये तरी. 

चिमणी ही आपली लहानपणापासूनची सखी आहे. आम्ही फलटणला राहत होतो, पहिल्या मजल्यावर. तिथे मोठे माळवद (पाऊस कमी होणाऱ्या प्रदेशात माळवदी घरे असतात) होते. असंख्य चिमण्या तुरुतुरु चालत पुढ्यात यायच्या. टाकलेले दाणे, पदार्थ ऐटीत टिपायच्या आणि भुर्र उडून जायच्या. चिमणी हा घरातलाच सदस्य आहे, अशी भावना माझ्यासारख्या लाखोजणांची असेल. किंबहुना चिमणी हा आपल्या जगण्याचा एक भागच झाली होती. तिला वेगळे तरी कसे करणार? 

राखाडी, भुरा रंग, प्रमाणबद्ध शरीर, इवलीशी चोच, टुक टुक पाहणारे डोळे, न घाबरता, बिनधास्त पुढ्यात येऊन बसायच्या. पण हे चित्र गेल्या १०, १५ वर्षांत झपाट्याने बदलले. चिमण्या दिसेनाश्या झाल्या. त्यांची जागा कबुतरांनी, पारव्यांनी घेतली. आजही कुणी खेड्यात, थोड्या दुर्गम भागात गेला आणि त्यांनी चिमणी पाहिली असे सांगितले की, मन त्या रम्य आठवणीने भरुन येते. 

‘या चिमण्यांनो परत फिरा’ सारखे गाणे लागले, किंवा बाळ जेवावे म्हणून एखादी आई ‘हा घास चिऊचा’ असे म्हटलेले ऐकले, की अधिकच गलबलून येते. आपल्या आयुष्यातील अनेक जुन्या गोष्टी स्मरणरंजनाच्या कप्प्यात जाऊन बसल्यात. त्यातच ही पण जाऊन बसली. हे दुःख आपल्या सर्वांचेच आहे आणि त्यात भर म्हणजे आता ती नसण्याचा दिवसही आपण साजरा करायला लागलोय.

त्यामागे हेतू चांगला असला तरी तिचे नसणे अशा दिवसाने अधिक ठसठशीत होते. अर्थात आपण आपली कातडी टणक करुन टाकलीय म्हणा. एक असते चिमणी… एक असतो कावळा… कावळ्याचं घर असतं शेणाचं, चिमणीचं घर मेणाचं. धो-धो पाऊस पडतो, कावळ्याचं शेणाचं घर वाहून जातं.. ही लहानपणी ऐकलेली गोष्ट खोटी ठरली म्हणायची. कारण कावळे बहुसंख्य दिसतात. म्हणजे चिमणीचं घरच वाहून गेले म्हणायचे.. 

आज जागतिक चिमणी दिवस (२० मार्च), त्या निमित्त…

लेखक : डॉ. केशव साठये

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “शब्दांचे जीवनचक्र…” लेखक – डाॅ. श्रीकांत तारे  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “शब्दांचे जीवनचक्र…” लेखक – डाॅ. श्रीकांत तारे  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

माणसांप्रमाणे शब्दांचेही जीवनचक्र असते. शब्द जन्माला येतात,जगतात व शेवटी मरुन जातात. काही शब्द शतायुषी माणसाप्रमाणे पिढ्‌यान पिढ्‌या सन्मानाने जगतात. काही शब्द अल्पायुषी ठरतात, तर काही शब्द उगाचच श्वास चालला आहे म्हणून जिवंत म्हणवले जातात, एरवी त्या शब्दांकडे सहसा कुणी लक्षही देत नाही.

‘वरवंटा’ हा शब्द असाच काही दिवसांपूर्वी वारला. त्यापूर्वी तो बरेच वर्ष मरणपंथाला लागला होता सुरुवातीला लोक त्याची विचारपूस करायचे. वीज नसल्यामुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे मिक्सर आजारी पडलं की लोक वरवंट्‌याकडे वळायचे. तोही बिचारा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यासारखा जबर दुखण्यातून उठून लोकांना मदत करायचा. ‘वरवंटा’ हा शब्द लोकांना अधून मधून का होईना, आठवायचा. 

महिन्यापूर्वीच, मराठीत एम फिल केलेल्या माझ्या भाचीला मी वरवंटा शब्दाबद्दल विचारल्यावर तिने  ‘पांडोबा भिकाजी धावडे’ अश्या तद्दन अनोळखी नावाच्या माणसाच्या गडचिरोली येथे निधनाची बातमी ऐकून आपण जसा चेहरा करु तसा चेहरा केला तेव्हाच या शब्दाचं आयुष्य संपल्याची जाणीव मला झाली.  

असं कितीतरी शब्दांच्या बाबतीत झालं. ‘आपला खल दिसत नाही आजकाल कुठे?’ असं मी बायकोला विचारलं तर तिनं ‘खल गेला आटाळ्यात आणि खलनायक माझ्यासमोर उभा आहे’ असं शेलक्या शब्दांत उत्तर दिलं. काहीही कमेंट्‌स न करता मी मनातल्या मनांत खल या शब्दाला श्रध्दांजली देऊन टाकली.

कोट हा मराठी शब्द कुठल्यातरी शेवटल्या राजाबरोबर सती गेला असावा. क्ल्ल्यिांभोवतीचे कोट जाऊन तिथे भिंती उभ्या राहिल्या आणि त्या किल्ल्यांचे म्यूझियम झाले. तसेच ‘बाराबंदी’ तुकोबांसह सदेह स्वर्गात गेली, ती पुन्हा परतलीच नाही. बुवांच्या जाण्याबद्दल वादविवाद झडताहेत पण बाराबंदी निश्चितच कायमची स्वर्गवासी झाली याबद्दल मार्क्सवाद्यांपासून ते संघवाल्यांपर्यंत सर्वांचंच एकमत झालेलं दिसून येतं.

‘उमाळा’ या शब्दाची कालपरवाच हत्या झाली असं कळलं. एका, प्रथमच सासरी जाणाऱ्या मुलीनं, टीपं गाळणाऱ्या आपल्या आईला, ‘रडतेस काय असं गांवढळासारखं?’ असं कडक शब्दांत विचारलं, तेव्हाच उमाळयाचं ब्रेन हॅमरेज झालं. टीव्हीवरच्या उसनं रडं आणणाऱ्या मराठी हिंदी मालिका बघून भावनांची धार गेलेल्या माणसांनी हळू हळू उमाळयाचा ऑक्सिजन पुरवठा तोडला आणि त्याला सपशेल मारून टाकलं. खरं तर प्रेमाचा उमाळा जाऊन प्रेमाचं प्रदर्शन आलं तेव्हाच त्याने प्राण सोडायला हवा होता, पण तोही बेटा एका पिढीला साथ  देण्याचे वचन  निभावत असावा. आता राजे, ती पिढीही गेली आणि तो उमाळाही न जाणे कुठल्या अनंतात विलीन झाला. 

माझ्या आजोबांकडे एक जुनी चंची होती. त्यात ते पान, सुपारी वगैरे ठेवायचे. आजोबा जाऊनही आता तीस बत्तीस वर्षे झाली असावीत. माझा आतेभाऊ आठवड्‌यापूर्वी कुठल्याश्या लग्नांत भेटला, तेव्हा मी त्याला, ‘नानांची एक नक्षीदार चंची होती, आठवतंय?’ असं विचारल्यावर त्याने माझ्याकडे, जणू मी त्याला न्यूक्लीयर बॉम्बबद्दल विचारतो आहे अश्या नजरेनं बघितलं. चंची हा शब्दच त्याच्या मेंदूतून पार धुवून निघालेला दिसत होता. कहर म्हणजे लगेचच माझ्या बायकोनं माझा दंड धरला आणि मला बाजूला घेत ‘नानांच्या लफड्‌यांबद्दल असं चार लोकांसमोर काय बोलता?’ म्हणत मला झापलं. मी मनातल्या मनांत लागलीच ‘चंचीच्या दुखःद देहावसनाबद्दल शोक बैठक दिनांक…’ वगैरे शब्दांची जुळवणी करु लागलो. 

असाच एक शब्द काही दिवसांपूर्वी नैसर्गिक मृत्यू पावला. ‘फुलपात्र’  हा तो शब्द. ही वस्तू अजून शिल्लक आहे, पण हा शब्द मेला. हे म्हणजे एखाद्या मेलेल्या प्राण्याला पेंढा भरून दिवाणखान्यात सजवून ठेवल्यासारखं वाटतं. मग तो नुसता ‘प्राणी’ न राहता, ‘पेंढा भरलेला प्राणी ‘ होतो. फुलपात्र या शब्दाचं असंच झालं. याला सुटसुटीत नाव ‘पेला’ किंवा सर्वनाम ‘भांडं’ असं मिळालं. फुलपात्र या नावाच्या अंत्ययात्रेला या दोन्ही शब्दांनी त्याला उत्तराधिकारी म्हणून खांदा दिला असावा. तसंच आपल्या आवडीचा पदार्थ त्याच्या नावासकट नेस्तनाबूत होताना पहाणे हाही एक शोकानुभव असतो.

 मी लहानपणी कल्याणला शिकत असताना छाया थियेटर जवळच्या एका म्हाताऱ्या वाण्याकडून जरदाळू घेऊन खायचा. जरदाळू खाल्ल्यावर त्यातली बी फोडून त्याच्याही आतला गर खाण्यात गंमत वाटायची. नेमानं मी सात आठ वर्ष त्याच्याकडून घेऊन जरदाळू खात होतो. कल्याण सोडल्यानंतर मी तीसेक वर्षाने सहज म्हणून आमची जुनी चाळ बघायला गेलो, तेव्हा सगळंच बदललं होतं. वाण्याचं दुकानही बऱ्यापैकी पॉश  झालेलं होतं, गल्ल्यावर चिरंजीव वाणी बसले असावे. मी त्याच्याकडे जरदाळू मागितला, आणि वाणीपुत्राला घाम फुटला. ‘ऐसा माल हम नही बेचते’ असं जेव्हा तो बोलला, तेव्हा हा शब्दच त्याने ऐकलेला नसल्याचं मला जाणवलं. मी जरा जोर दिल्यावर तो घाबरलाच, तो मला सीबीआय चा माणूस समजला असावा. त्याने मला आंत बसवून मागवलेलं कोल्ड्रींक पीत मी जरदाळू या शब्दाच्या आणि या सर्वांगसुंदर सुकामेव्याच्या आठवणी दोन अश्रू ढाळले. 

ग्रूपमध्ये असंच गप्पा मारीत असता कुणीतरी ‘भारतीय हॉकीचं विंधाणं झालं’ असं म्हटलं आणि मला जुना मित्र भेटल्याचा आनंद झाला. ‘विंधाणं’ हा शब्द गेले कित्येक वर्ष गहाळ झाला होता. उलट सुलट चर्चा चालू असतां अचानक तो मला गवसला. या नकारात्मक शब्दाच्या शोधात मी पणती घेवून फिरत होतो अश्यातला भाग नाही, पण नकारात्मक असला तरी तो एक शब्द होता, टिपिकल मराठी शब्द. वर्षानुवर्षे आपल्याला साथ देणारा, आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचवणारा चपखल शब्द. आणि एखादा शब्द मेल्याचं दुखः त्याच अर्थाच्या दुसऱ्या शब्दाच्या जन्माने भरुन नाही निघत. 

एक शब्द नाहीसा झाल्याने मात्र मी खरंच बेचैन झालो. तो शब्द माझ्या फारश्या जवळचा नव्हता, किंबहुना त्याची माझी भेट माझ्या प्राथमिक शिक्षणानंतर पडलेली मला आठवत नाही, पण तो शब्द वारल्याचं कळलं,आणि आपली संस्कृती बदलत चालली आहे हे मला प्रकर्षाने जाणवलं. तो शब्द म्हणजे ‘औत’. लहानपणापासून तो माझा आवडता शब्द होता. आजकाल त्याचा भाऊ नांगर त्याचे काम पहातो, पण औत म्हटल्यावर जो सुखी समाधानी शेतकरी डोळयासमोर यायचा, तोच शेतकरी नांगर धरल्यावर न जाणे का, केविलवाणा दिसू लागतो. काही काळापासून, द्रॅक्टर नांवचा नवीन शब्द आलाय, पण तो ‘कर्ज’ या शब्दाला आपल्याबरोबर घेऊन आलाय.

कितीतरी शब्द माझ्या डोळ्यादेखत नाहीसे झाले. काही कायमचे गेले तर काही, आयुष्य संपण्याची वाट पहात पडलेले आहेत. फळा आणि खडू या दोघांनी तर बरोबरच जीव दिला. त्यांच्या प्रॉपटीवर बोर्ड आणि चॉक यांनी हक्क मांडल्यावर त्यांना दुसरा इलाजच राहिला नाही. तुळई गेली, रोळी गेली, किरमिजी नावाचा रंग गेला, लिंगोरचा गेला, पाचे गेले, दांडपट्टा गेला, गेलेल्या शब्दांची यादी एखाद्या गावांत वारलेल्या माणसांच्या नांवच्या यादीएवढी लांब असू शकते, याला अंत नाही. यांच्या जागेवर नवनवे शब्द येतातही, पण त्यांना म्हणावी तशी लोकमान्यता मिळत नाही. संगणक हा शब्द गेल्या काही दिवसांपासून स्थापित होण्याचा प्रयत्न करतोय, पण एखाद्या नवरीचे नाव लग्नानंतर बदलले गेले तरी तिला माहेरच्याच नावाने ओळखले जावे, तसं काहीसं संगणक या शब्दाच्या बाबतीत घडलंय.

इंग्रजी शब्द तणांसारखे माजू लागल्यावर आणि त्यांचा मराठीत मुक्त संचार सुरु झाल्यावर तर पुढे पुढे आपण मराठी व्याकरणांतून इंग्रजी बोलत आहोत असा देखावा निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘माझे फोर्टी फाईव्हचे अंकल मॉर्निंग वॉक घेत होते तर त्यांची  हार्टफेलने डेथ  झाली.’  हे वाक्य एका पुण्याच्या मराठी मुलीच्या तोंडून ऐकल्यावर मी जाम गोंधळलो होतो. या वाक्याची नेमकी भाषा कुठली हेच मला कळेना. ‘सांगणाऱ्याला सांगता येते आणि ऐकणाऱ्याला कळते ती खरी भाषा’ अशी भाषेची नवीन व्याख्या जरी मी निर्माण केली, तरी वरील वाक्य निश्चित कुठल्या वर्गात ठेवायचं, हा प्रश्न माझ्याकडून  आजतागायत सुटलेला नाही. 

शब्द माझे सखा आहेत, बंधू आहेत, आई आणि वडील देखील आहे. शब्दांवर मी प्रेम केलं आणि मोबदल्यांत शब्दांनी मला त्यांचे सर्वस्व दिलं. मी शब्दांनी घडलो, वाढलो. त्यांचे मरण उघड्‌या डोळयांनी पहाण्याचे दुखः मी आज सोशित आहे.

लेखक : -प्रा डॉ श्रीकांत तारे

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मी देव पाहिला….” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? मनमंजुषेतून ?

☆ “मी देव पाहिला….” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

एका भयाण रात्री मंदिराच्या पायरीवर लाईटच्या उजेडात एक  साधारण पंधरा वर्षाचा एक मुलगा अभ्यास करताना पाहिला. थंडीचे दिवस होते. कुडकुडत होता पण वाचनात मग्न होता. 

हप्त्यातून दोनदा त्या रस्त्याने मी जात असायचॊ. दिवसा कधी दिसत नसायचा. खूप जिज्ञासा होती त्या मुलाबद्दल जाणण्याची. 

एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो. मनात आलं तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्यासाठी काहीतरी पार्सल घेऊन जाऊ. रात्रीचे साडेबारा वाजले असतील. मी त्या मंदिराकडे आलो, तर तो मुलगा नेहमीप्रमाणे मंदिराच्या पायरीवर अभ्यास करतांना दिसला. 

मी गाडी थांबवली. त्याच्या जवळ गेलो. मला बघून तो गालातल्या गालात हसला. जणू माझी त्याची जुनी ओळख असावी. 

मी म्हणालो, “ बाळ तू रोज इथे बसून का अभ्यास करतोस? “ 

“ सर माझ्या घरात लाईट नाही. माझी आई आजारी असते. दिव्यात रॉकेल घालून अभ्यास  करायला माझी ऐपत नाही.” 

“ बाळ तू मला बघून का गोड हसलास ? “ 

“ सर तुम्ही देव आहात !” 

“ नाही रे! “ 

“ सर तुम्ही माझ्यासाठी देवच आहात. “ 

“ ते जाऊ दे. तू जेवलास का? मी तुझ्यासाठी खाऊचं पार्सल आणलं आहे. “ 

“ सर म्हणूनच मी हसलो. मला माहित होतं. तो  देव कोणत्याही रूपात येईल, पण मला भुकेलेला नाही ठेवणार. मी जेव्हा जेव्हा भुकेलेला असतो, तो काहीना काही मला देतोच. कधी नवसाचे पेढे तर कधी फळ तो मला देऊन जातो. आज मी भुकेलेला होतो पण निश्चिंत होतो. मला माहित होतं….तो काहीतरी कारण करून मला भेटायला येणार आणि तुम्ही आलात. तुम्ही देव आहात ना !” 

मी निःशब्द झालो, नकळत माझ्याकडून पुण्याचं काम घडलं होतं. रोज कर्जाच्या ओझ्याखाली दबताना देवाला कोसत होतो. त्याने आज मला देवाची उपाधी देऊन लाजवलं होतं.

 त्याने तो अर्धवट खाऊ खाल्ला आणि म्हणाला, “ सर तुम्ही इथेच थांबा. मी अर्धं माझ्या आईला देऊन येतो.” 

…. माझे डोळे तरळले. त्याला काही विचारण्याअगोदरच त्याने सारं काही कृतीतून सांगितलं होतं. 

तो पाच मिनिटांनी परत आला. त्याच्या ओंजळीत पारिजातकाची फुलं होती. 

“ सर, माझी आई सांगते, ज्या परमेश्वराने आपल्या पोटाची खळगी भरली त्याच्या चरणी ओंजळभर फुलं तरी वहावीत.” 

…. क्षणभर डोळे बंद केले आणि त्या बंद दारातल्या पाषाणाकडे पाहिलं, तर तेही मला त्या मुलाच्या गोड हसण्यासारखं वाटलं. 

नंतर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन झालं. शाळा, कॉलेज, मंदिर बंद झाले. देवळं ओस पडली. देवळांना कुलूप ठोकली आणि रस्त्यावर  शुकशुकाट झाला.

अशीच एके दिवशी त्या मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या देवळाकडे डोकावलं. रात्रीची वेळ होती.

देवळाच्या पायरीवरील लाईट बंद होती आणि तो मुलगा कुठेच दिसला नाही. वाईट वाटलं मला.  

‘ या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा ? काय खात असेल ? कसा जगत असेल ?’ असे नाना प्रश्न आ वासून उभे राहिले. 

कोरोनाच्या महामारीत असंख्य लोकांनी प्राण गमावले. असाच आमचा एक मित्र पॉझिटिव्ह होऊन दगावला. मी त्याच्या अंत्यसंस्काराला स्मशानात गेलो होतो. अंत्यसत्कार झाले. सर्व आपल्या घरी निघाले. 

निघताना हात पाय धुवावे म्हणून शंकराच्या मंदिराशेजारील नळावर गेलो. पाहतो तर तो मुलगा नळावर स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे  धुऊन त्या स्मशानाच्या भिंतीवर वाळत टाकत होता. 

मला बघून त्याने आवाज दिला, 

“ सर …. “

“अरे तू इथे काय करतोस ? “

“ सर आता मी इथेच राहतो. आम्ही घर बदललं. भाडं भरायला पैसे नव्हते. त्यातच लॉकडाऊनमध्ये शिव मंदिर बंद झालं आणि पायरीवरची लाईटही बंद झाली. मग मला घेऊन आई इथे आली. काही झालं तरी शिक्षण थांबता कामा नये असं तिनं सांगितलं आहे. त्या शिवमंदिराचे दरवाजे बंद झाले, पण ह्या शिव – मंदिराचे दरवाजे कधी बंद होत नाहीत. तिथे जिवंत माणसं यायची आणि इथे मेलेली….. ह्या लाईट खाली माझा अभ्यास चालू असतो….. सर मी हार नाही मानली. आई सांगायची……..‘ ज्याने जन्म दिला तोच भुकेची खळगी भरणार.’ 

“ बरं….. तुझी आई कुठे आहे ? “

“ सर ती कोरोनाच्या आजारात गेली. तीन दिवस ताप खोकला होता. नंतर दम अडकला. मी कुठे गेलो नाही. इथे पडलेल्या तुटक्या, अर्ध जळलेल्या लाकडांनी तिला अग्नी दिला. १४ दिवस इथंच ह्या खोपीत होम क्वाँरनटाईन राहिलो … ‘ सरकारी कायदा मोडू नकोस, तो आपल्या भल्यासाठी असतो,’  असं ती सांगायची. आईच्या अस्थी समोरच्या नदीत विसर्जित केल्या आणि काल इथल्या स्मशानातल्या अग्नी देणाऱ्यांना जेऊ घातलं आणि आईच क्रियाकर्म आटपलं……. सर तरी मी हरलेलो नाही. पण दुःख एव्हढच आहे की मी पास झालेलो पहायला आई ह्या जगात नाही. ती जिथे ज्या जगात असेल तिथे खूप खुश असेल हे माझं यश बघून…   कालच माझा रिजल्ट लागला आणि मी शाळेत पहिला आलोय. आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे शिक्षक करणार आहेत…  पण आता तर खरी अडचण उभी राहिलीय. ऑनलाईन अभ्यास करायला माझ्याजवळ मोबाईल सुद्धा नाही….. असो . सर, तुम्ही का वाईट वाटून घेता ? तुम्हाला मी पास झाल्याचा आनंद नाही झाला ? सर, तुम्ही कुठे जाऊ नका, इथेच थांबा. “ 

.. त्याने छोट्याशा डब्यातून साखर आणली होती. चिमूटभर  माझ्या हातावर ठेवली. 

“ सर तोंड गोड करा. “ 

तो डबा ठेवायला त्या खोपीत गेला तोवर मी माझ्या तोंडावर त्या नळाचं पाणी मारून भानावर आलो.

भरलेले डोळे लपवण्यासाठी तोंड धुतले.

“ सर, मला माहीत होते, देव या जगात आहे आणि तो माझ्या आनंदात माझी पाठ थोपटायला नक्की येणार.”  

… त्याने पुढे काही बोलण्याअगोदरच मी नुकताच घेतलेला माझ्या खिशातला माझा नवा मोबाईल त्या मुलाच्या हातावर टेकवला आणि त्याची पाठ थोपटून निमूटपणे बाय करून स्मशानाबाहेर चालू लागलो. 

आता दर महिन्याला मी त्याचा मोबाईल रिचार्ज करतो……न सांगता. 

खरा देव तर कधीच नाही दिसला पण …. मी त्या मुलाच्या डोळ्यात देव पाहिला. ….

देव पाहिला….

लेखक – अज्ञात 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सुंदरता… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ सुंदरता… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

स्त्रियांना नेहमी असं वाटतं की, 

आपण हे नेसल्यावर सुंदर दिसू, ते घातल्यावर सुंदर दिसू. 

एक जाहिरात आहे, त्यात विनोदकन्या भारती म्हणते, “ मुझे कभी ब्यूटिफुल बनना ही नहीं था, क्यों कि मैं हमेशा से जानती थी की मैं ब्यूटिफुल हूँ. सिर्फ अपनी सुंदरता को मेन्टेन करती हूँ। “ 

फार छान ओळी आहेत या कि, मला नेहमीच माहीत होतं, मी सुंदर आहे.

आपल्यापैकी किती जणींना हे माहीत असतं?

आपल्यातलं सौंदर्य कशात आहे, हेच आपल्याला माहीत नसतं. कारण सौंदर्य म्हणजे काय, हेच आपल्याला कळत नाही. 

आपले सौंदर्याचे आणि प्रेमाचे मापदंड आपण लहान किंवा मोठ्या पडद्यावरच्या तारकांकडे पाहून ठरवत असतो.

जाहिरातीतल्या बाईचा मेकअपने झाकलेला हजार वॅटमध्ये चमकणारा चेहरा म्हणजे आपण सौंदर्य समजतो. पाठ उघडी टाकणारं प्रचंड मोठ्या गळ्याचं ब्लाउज म्हणजे सौंदर्य समजतो.

पण तुम्ही कधी आपल्या बाळाला पाजताना स्वत:चा चेहरा पाहिलाय का? वात्सल्यानं चमकणाऱ्या त्या चेहऱ्याचं सौंदर्य उजळण्यासाठी कधीच हजार वॅटच्या फोकसची गरज लागत नाही. 

दिवसभर घरकाम करून थकल्यावर संध्याकाळी तोंडावर पाणी मारून साध्या टॉवेलने पुसलेला चेहरा पाहिलाय का? त्यावरचे स्वत:च्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्यामुळे येणारे कर्तव्यपूर्तीचे भाव किती सुंदर दिसतात, ते कधी न्याहाळलेत का? 

सकाळी उठून सडा-रांगोळी झाल्यावर स्वत:च काढलेली रेशीमरेषांची रांगोळी पाहिली तर तुम्हाला तुमच्या बोटातली सुंदरता दिसेल. 

स्वच्छ-सुंदर आवरलेलं स्वयंपाकघर तुम्हाला तुमच्या गृहिणीपणाचं सौंदर्य सांगेल.

तुम्ही शिक्षिका असाल तर तुमचं सौंदर्य फळ्यावर नीटपणे लिहिलेल्या अक्षरात आहे. विषयाचं आकलन झाल्यावर दिसणारे मुलांचे आनंदी चेहरे ही तुमची सुंदरता आहे. 

तुम्ही इंटिरिअर डेकोरेटर असाल तर तुम्ही सजावट केलेल्या जागेतून तुमचं सौंदर्य डोकावेल. 

तुम्ही संपादक असाल तर तुम्ही निवडलेले लेख आणि त्यांची सुबक मांडणी तुमचं सौंदर्य आहे. 

तुम्ही विणलेल्या भरघोस गजऱ्यात तुमचं सौंदर्य आहे. तुम्ही काढलेल्या अक्षरात तुमचं सौंदर्य आहे.

सौंदर्य कपड्यात नाही, कामात आहे.

सौंदर्य नटण्यात नाही, विचारात आहे. 

सौंदर्य भपक्यात नाही, साधेपणात आहे.

सौंदर्य बाहेर कशात नाही, मनात आहे.

आपण करत असलेलं प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचं सादरीकरण असतं. आपल्या कृतीतून सौंदर्याची निर्मिती करता आली पाहिजे.

प्रेमाने बोलणं म्हणजे सुंदरता, 

आपलं मत योग्य रीतीनं व्यक्त करता येणं म्हणजे सुंदरता.

नको असलेल्या गोष्टीला ठाम नकार देण्याची हिंमत म्हणजे सुंदरता. 

दुसऱ्याला समजावून घेणं म्हणजे सुंदरता.

आपल्या हाती आलेला प्रत्येक क्षण रसरशीतपणे जगण्यात खरी सुंदरता आहे. 

आपल्या वर्तनातून, विचारातून आपलं सौंदर्य बाहेर येऊ द्या.

मेरी कोमचं सौंदर्य तिच्या ठोशात आहे. इंदिरा गांधींचं सौंदर्य कणखर निर्णयक्षमतेत राहिलं आहे. 

आपण करत असलेल्या कामात कौशल्य प्राप्त झालं की, आत्मविश्वास मिळतो. आत्मविश्वास आला की, आत्मसन्मानाची जाणीव येते. अशी आत्मविश्वासाने जगणारी बाई आपोआप सुंदर दिसते. 

गौरवर्ण, सडपातळ बांधा, काळे-दाट केस या वर्णनातून आता बाहेर पडलं पाहिजे. त्याऐवजी असेल तो वर्ण, दणकट बांधा, सुदृढ मन आणि संतुलित विचार या मापदंडाचा विचार करून पाहूया. 

तुम्ही जशा जन्माला आल्या आहात तशाच सुंदर आहात, 

ही खूणगाठ मनाशी बांधून टाका. 

जशा आहात तशाच अगदी सुंदर आहात, याची खात्री बाळगा. 

आपल्यातील सुंदरता ओळखून स्वत:वर विश्वास ठेवायला शिका. 

म्हणजे आपलं सौंदर्य अजूनच खुलेल. 

लेखक – अज्ञात

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “प्राजक्त…” लेखक – अज्ञात ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “प्राजक्त…” लेखक – अज्ञात ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

झाडावरुन प्राजक्त ओघळतो, 

त्याचा आवाज होत नाही, 

याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही’…

“प्राजक्त” किंवा “पारिजातक” 

किती नाजुक फुलं..!

कळी पूर्ण उमलली की, इतर फुलझाडांप्रमाणे फूल खुडायचीही गरज नसते. डबडबलेल्या डोळ्यांतून अश्रु ओघळावा, तसं देठातुन फूल जमिनीवर ओघळतं.

“सुख वाटावे जनात,

दुःख ठेवावे मनात”

— हे या प्राजक्ताच्या फुलांनी शिकवलं.

एवढसं आयुष्य त्या फुलांचं..!

झाडापासुन दूर होतांनाही गवगवा करीत नाहीत.

छोट्याशा नाजुक आयुष्यात आपल्याला भरभरुन आनंद देतात.

आणि केवळ आपल्यालाच नाही,  तर आपल्या कुंपणात लावलेल्या झाडाची फुलं शेजारच्यांच्या अंगणातही पडतातच की. 

खरंच…! माणसाचं आयुष्यही असंच… एवढसं… क्षणभंगुर प्राजक्तासारखं…!

कधी ओघळून जाईल माहीत नाही.

आज आहे त्यातलं भरभरुन द्यावं हेच खरं…!!                 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘बाई आणि मुलं ’ – सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

??

☆ ‘बाई आणि मुलं ’ – सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

मुलं विसरतात आईला

मुलं विसरतात बाईंना…… 

 

कोणे एके काळी, 

जी त्यांच्यासाठी आणतात फुलं

शिक्षकदिनाच्या दिवशी.. 

आणतात केक 

वाढदिवसाच्या दिवशी…… 

 

लिहितात ‘माझे आवडते शिक्षक’ विषयावरचा निबंध.                                       

डोळ्यांतून ओसंडतो

भक्तिभाव त्यांच्यासाठी…… 

 

करतात वर्णन आईजवळ

त्यांच्या ‘कित्ती कित्ती

सुंदर शिकवण्याचे,

पुस्तकापलीकडची आयुष्यभराची 

शिदोरी दिल्याचे’…… 

 

कधी कधी 

वयस्क असूनही

तशा न दिसण्याचे…… 

 

‘सेंड ऑफ’च्या दिवशी

डिश संपवून जाताना

पाया वगैरे पडतात

कोणी कोणी थांबून

गिफ्ट बिफ्ट देतात…… 

 

मग परीक्षा होतात..

रिझल्ट लागतात..

वर्षे उलटतात..

कॅलेंडरे बदलतात..

लग्ने वगैरे सुद्धा होतात

एखाद-दुस-याची आमंत्रणेही येतात…… 

 

कधी तरी कोणी भेटतं

रस्त्यातच वाकून पाया पडतं

कधी तरी कळतं

अमकी परदेशी गेली

तमका सायंटिस्ट झाला

तमकी डॉक्टर झाली

तमका ॲक्टर झाला….. 

 

बाई थकतात

फोनच्या रिंग्ज 

वाजेनाशा होतात

बाई कुठेतरी नाव वाचतात

मा. अमुक.. सुप्रसिद्ध तमुक..

बाई फोन नंबर शोधतात

मिळाला नाही तर मिळवतात

मेसेज की फोन.. विचार करतात…. 

 

तिकडची रिंग वाजत रहाते

“येईलच फोन त्याचा उलट!”

बाईंना वाटत रहाते

किती जाईल हरखून,

करेल चौकशी भरभरून,

आठवतील वर्गातले सगळे हास्यविनोद

त्यालाही फिरून फिरून!

म्हणेल, “आता भेटायलाच येतो

बायकोला दाखवायला आणतो.”

बेल वाजल्याचे भास होतात

बाई कितीदा तरी फोन बघतात….. 

 

तास, दिवस, वर्षॆ उलटतात

अनेक काळे केस पांढरे होतात…

मग कुठल्याश्या वृत्तपत्राच्या कोप-यात

श्रद्धांजलीच्या रकान्यात

लहानशा चौकोनात

येते छापून – ज्येष्ठ.. प्रसिद्ध वगैरे

यांचे दु:खद निधन झाल्याचे

बाईंचा काळापांढरा फोटो

आणि मागे कोणी नसल्याचे….. 

 

मग घणघणू लागतात फोन हातातले

याचे त्याला, त्याचे याला

कोणाकोणाचे कोणाकोणाला

‘किती छान शिकवायच्या बाई!

किती कडक होत्या बाई

तरी किती हसवायच्या बाई!’

कोणाकोणाला आवंढे येतात

कोणाच्या डोळ्यात अश्रू येतात

कोणीकोणी तर ढसाढसा रडतात…

 

कोणी एक घरी जातो

बाईंच्या फोटोला हार घालतो

उदास तसाच बसून राहतो…. 

 

भिंतीवरच्या फोटोत

आता बाई शांत असतात

त्यांच्या पिंडाला लगेच

कितीतरी कावळे शिवतात…. 

लेखिका :  संजीवनी बोकील

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माझ्या आर्मी लाईफची एक झलक” भाग – 2 – लेखिका – सुश्री संध्या बेडेकर ☆ प्रस्तुती – सुश्री कालिंदी नवाथे ☆

??

☆ “माझ्या आर्मी लाईफची एक झलक” भाग – 2 – लेखिका – सुश्री संध्या बेडेकर ☆ प्रस्तुती – सुश्री कालिंदी नवाथे ☆

(हे सर्व खूप सोप्प नक्कीच नव्हतं, पण दुसरा पर्याय ही नव्हता. बरे असो,याचा प्रभावी परिणाम आता दिसतोय. सर्वांना कुठेही सहज adjust होता येत.) इथून पुढे —

आर्मी म्हणजे एक ‘स्टाइल ‘आहे. एक ‘Standard ‘आहे. ‘Status ‘ आहे. बायकांचा ‘ड्रेसिंग सेन्स’ छान असतो. खूप काही नसतानाही ‘Limited Budget ‘ मधे‌ व्यवस्थित राहणे जमते त्यांना.’clean and organised home ‘ ही विशेषता असते त्यांची. ‘Quality of life is v good.’ वेळेचे महत्व, Etiquette, Manners, Junior-Senior Respect, एक Protocol असतो. तो पाळायचाच असतो. अनुशासन कडक असते.

Lunch \ Dinner Party चे एक ‘स्टेटस’ असते.एक ‘पद्धत’ असते. तेथे मराठीपणा बाजूला ठेवूनच वागावे लागते. बायकांना खूप मान असतो. म्हणजे अगदी ज्युनिअर आॅफिसरच्या बायकोच्या वेलकमसाठी सिनीयर मोस्ट आॅफिसर सुद्धा उभा राहतो. आर्मीत कोणत्याही ‘Official ‘ फंक्शनला Seniority व Rank च्या हिशोबाने यायची वेळ दिली जाते.

आर्मी म्हणजे एक असे ‘Organization’ आहे,जेथे तुमचा ‘Personality Development Program ‘ सतत सहज सुरूच असतो. नवीन जागा, नवीन माणसे, त्या त्या शहराचे कल्चर तुम्हाला अनुभवायला मिळते. वेगवेगळे प्रसंग बघून तुमचे व्यक्तिमत्त्व खुलते, बहरते. विचारांची रेंज वाढते.’ Priorities’ बदलतात. बायकांना बऱ्याच activities मधे भाग घ्यावा लागतो. Ladies club, AWWA म्हणजे ‘Army Wives Welfare Association‘ जेथे आम्ही Unit च्या सर्व बायका एकत्र जमतो. काही तरी नवीन शिकतो, शिकवतो.  

म्हणतात ना,

” जिंदगी खट्टी मीठी होनी चाहिए ।”

आर्मीवाल्यांना फक्त खट्टा मीठाच नाही तर, सर्व प्रकारचे अनेक स्वाद सहज चाखायला मिळतात…आजही किती तरी प्रसंग मनावर कोरले गेले आहेत.

ताई म्हणाली, ”सगळयात कठीण posting / वेळ कोणती होती ग ???”

मी म्हटलं,  “अगं!!! अंदमान,नागालँड, सिक्कीम या थोड्या वेगळ्या postings होत्या. अंदमानला शाळा फक्त नावालाच होती.

मी जो कठीण काळ बघितला, तो म्हणजे ‘कारगिल युद्ध ‘. त्यात यांचा सहभाग होता. ते चार महिने हे नक्की कुठे आहेत ?? हेही माहीत नसायचे. सर्व पत्रांची ‘ ‘scrutiny ‘व्हायची. तेव्हा मोबाईल वगैरे वापरायची परवानगी नसतेच. प्रत्येक आठवड्यात एक ऑफिसर पंचवीस किलोमीटर दूर जाऊन आपल्या घरी फोन करून सर्वांची खुशाली कळवत असे.TV वरील रोजच्या बातम्या ऐकून जीव खालीवर व्हायचा. यावेळेस आपली जबाबदारी जास्त आहे, हेही समजत होतच. मुलींकडे लक्ष ठेवणे, त्यांना सांभाळणे हे महत्त्वाचे काम होते. मुलींनी मात्र खूप साथ दिली. विचलित न होता धैर्याने प्रत्येक जण आपले काम करत होता. या परिस्थितीत माझी responsibility फक्त माझे घरच नाही तर, ‘Unit ‘ च्या इतर families ला सांभाळणे ही पण होती. Unit च्या बायकांना मानसिक आधार देणे. त्यांचे छोटे मोठे प्रश्न सोडविणे, मुलांच्या आजारपणात त्यांची मदत करणे, ही पण जबाबदारी होतीच..

या नोकरीने आयुष्यात सर्व रंग दाखविले. चांगले -वाईट अनुभव, उतार चढाव बघितल्याने आता कोणत्याही परिस्थितीत आम्ही ‘मजेतच’ असतो.

आजही युनिफॉर्म घातलेला कोणी दिसला की आनंद होतो. सख्खा नातेवाईक भेटल्या सारखे वाटते.आमचे ‘ते ‘ दिवस पुन्हा एकदा नजरेसमोरून जातात. ऊर्जा वाढते.

‘Challenges’ प्रत्येकच नोकरीत असतात. काम कोणतेही सोपे नसतेच. प्रत्येक जण आपापल्या परीने सेवा /मदत करतोच. तरीही आर्मीत नोकरी करायची आवड / aptitude असावा लागतो. उगीच ओढून ताणून ही नोकरी करता येत नाही.

 ही नोकरी म्हणजे, 

” It’s different.”

‘Uniform ‘ ची एक ‘Grace’ असते– ‘वजन’ असतं. घालणाऱ्याच्या चेहऱ्यावर जबाबदारी पेलायचा ‘आत्मविश्वास ‘असतो. 

” मैं हुं ना ” चे आश्वासन चेहऱ्यावर दिसते.

अनेक वर्षापूर्वीचा तो दिवस मला आजही आठवतोय, जेव्हा आम्ही भेटलो होतो तेव्हा, 

“I asked him, how much do you earn?? 

 He said, roughly hundred salutes a day. And we got married.” 

मला लग्नात मिळालेला सर्वात मूल्यवान दागिना म्हणजे तो ‘green uniform’ व त्यावर लागलेले ते तीन. *stars* होते. त्यांची किंमत आखणारे किंवा ‘purity’ चेक करणारे मशीन कोणत्याही सोनाराजवळ नाही.

वयानुसार केस पांढरे होत गेले व खांद्यावरील *stars * वाढत गेले.जेवढं नशिबात होतं तेवढं मिळालं. पैशापेक्षा अनुभवाने श्रीमंत झालो आम्ही. एकाच जन्मात किती तरी बघायला मिळालं. अगदी रिटायर्ड व्हायच्या थोडे दिवस आधी ‘लेह लडाख ‘ मधे झालेल्या ‘ढग फूटी’ च्या वेळेस मेडीकल कव्हर द्यायला हे गेले होते.

‘फूल नाही पण फूलाची पाकळी ‘ एवढे आपले योगदान देऊन आम्ही ‘समाधानाने’ व ‘अभिमानाने ‘ रिटायर्ड झालो. 

या जन्मात आर्मी ऑफिसरच्या ‘बायकोची’ भूमिका होती. पुढच्या जन्मातही हीच भूमिका करायला मला नक्की आवडेल. 

आज मन किती तरी जागी फिरून आले. खूपदा डोळे भरून आले. 

माझ्या बहिणींच्या चेहऱ्यावरील मिश्रित भाव मी वाचू शकत होते..

 ” Proud To Be A Wife Of Indian Soldier.”

  ‘ जय हिंद ‘ 

— समाप्त —

– क्रमशः भाग पहिला. 

लेखिका : सुश्री संध्या बेडेकर

प्रस्तुती : सुश्री कालिंदी नवाथे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संवादु- अनुवादु– उमा आणि मी- भाग २ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?मनमंजुषेतून ?

☆ संवादु- अनुवादु– उमा आणि मी- भाग २ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात आपण पाहिले – अनेक पुरस्कार त्यांना मिळत गेले. आता इथून पुढे)

उमाताईंच्या विशेष आवडत्या कादंबर्‍यांमध्ये ‘पर्व’ चा आवर्जून उल्लेख करायला हवा. ‘पर्व’ ही भैरप्पांची कादंबरी. याच्या अनुवादाच्या संदर्भात उमाताईंनी आठवण लिहिलीय, ‘माराठीत व्यासपर्व, युगांत, मृत्युंजय यासारखी चांगली पुस्तके असताना महाभारतावरील कथेचा आणखी एक अनुवाद कशाला करायचा?’, असं त्यांना वाटत होतं, पण विरुपाक्ष त्यांना ही कादंबरी जसजशी वाचून दाखवू लागले, तसतसं त्यांचं मत बदलत गेलं आणि कृष्णावरचा भाग त्यांनी वाचून दाखवल्यावर, त्यांनी या कादंबरीचा अनुवाद करायचा असा निश्चयच केला आणि त्याचा त्यांनी अनुवाद केला. मराठीत तो चांगलाच गाजला. त्याच्या पाच-सहा आवृत्या निघाल्या. पुढे या कादंबरीला १९९९ साली स. ह. मोडक पुरस्कारही मिळाला. मला हे सगळं वाचताना गम्मत वाटली, ती अशासाठी की मलाही सुरूवातीला वाटलं होतं की महाभारतावर मराठीत इतकं लिहिलय आणि आपण वाचलय की त्यावर आता आणखी काय वाचायचं? पण प्रा. अ. रा. तोरो यांच्या आग्रहामुळे मी ती वाचली आणि मला ती इतकी आवडली की पुढे मी अनेक वाचनप्रेमींना ही कादंबरी वाचायला आवर्जून सांगत राहिले. ही कादंबरी वाचल्यावर मला प्रकर्षाने उमाताईंची ओळख करून घ्याविशी वाटली. काय होतं या कादंबरीचं वेगळेपण? या कादंबरीला समाजशास्त्राचा पाया होता. महाभारत काळात समाजातील रीती-रिवाज, प्रथा-परंपरा, विचार-संस्कार यात बदल होऊ लागले होते. या परिवर्तनाच्या काळातील समाजावर यातील कथानकाची मांडणी केली आहे. ‘मन्वंतर’ असा शब्द उमाताईंनी वापरला आहे. स्थीर झालेल्या समाजापेक्षा आशा परिवर्तन कालावर कथानक रचणे अवघड आहे, असे उमाताई म्हणतात. काळामुळे घटना-प्रसंगांवर चढलेली, चमत्कार, शाप-वारदानाची पुटे भैरप्पांनी यात काढून टाकली आहेत. उमाताईंची ही अतिशय आवडती कादंबरी आहे.

उमाताईंनी केवळ अनुवादाचंच काम केलं असं नाही. त्यांनी सभा-संमेलनातून, चर्चा-परिसंवादातून भाग घेतला. व्याख्याने दिली. ड्रॉइंग आणि पेंटिंग विषय घेऊन एम. ए. केलं. भारतीय मंदिर-शिल्पशास्त्रातील द्रविड शैलीची उत्क्रांती विकास आणि तिची कलात्मक वैशिष्ट्ये’ या विषयावर पीएच. डी. केली. त्या निमिताने भरपूर प्रवास केला. प्रवासाचा आणि मंदिराच्या शिल्पसौंदर्याचा आनंद घेतला. त्यांना फोटोग्राफीचाही छंद आहे. जीवनात जमेल तिथून जमेल तितका आनंद त्या घेत राहिल्या.

उमाताईंनी ’केतकर वाहिनी’ ही स्वतंत्र कादंबरी लिहिली. त्यांची मैत्रीण शकुंतला पुंडे यांच्या आईच्या जीवनावर आधारलेली ही कादंबरी. या कादंबरीवर आधारित पुढे आकाशवाणीसाठी ९ भागांची श्राव्य मालिका त्यांनी लिहिली. त्याही पूर्वी ‘वंशवृक्ष’वर आधारित १४ भागांची मालिका त्यांनी लिहिली होती. त्यानंतर ‘ई’ टी.व्ही. साठी कन्नडमधील ‘मूडलमने’ या मालिकेवर आधारित ‘सोनियाचा उंबरा’ ही ४०० भागांची मालिका लिहिली. या निमित्ताने त्यांनी माध्यमांतर करताना करावा लागणारा अनुवाद, त्यातील, तडजोडी, त्या प्रकारच्या अनुवादाची वैशिष्ट्ये या बाबतचे आपले अनुभव आणि चिंतन मांडलं आहे. हे सारे करताना त्यांना खूप परिश्रम करावे लागले असणार, पण आपल्या आवडीचे काम करताना होणार्‍या परिश्रमातूनही आनंद मिळतोच ना!

‘संवादु- अनुवादु’ हे शीर्षक त्यांनी का दिलं असावं बरं? मला प्रश्न पडला. या आत्मकथनातून त्यांनी अनुवादाबाबत वाचकांशी संवाद साधला आहे. असंही म्हणता येईल की कलाकृतीशी ( पुस्तकाशी आणि त्याच्या लेखकाशी) संवाद साधत त्यांनी अनुवाद केला आहे? त्यांना विचारलं, तर त्या म्हणाल्या, ‘मी इतका काही शीर्षकाचा विचार केला नाही. स्वत:शीच संवाद साधत मी अनुवाद केला, म्हणून ‘संवादु- अनुवादु’.

‘संवादु- अनुवादु’च्या निमित्ताने गतजीवनाचा आढावा घेताना त्या या बिंदूवर नक्कीच म्हणत असणार, ‘तृप्त मी… कृतार्थ मी.’ एका सुखी, समाधानी, यशस्वी व्यक्तीचं आयुष्य आपण जवळून बघतो आहोत, असंच वाटतं हे पुस्तक वाचताना. अडचणी, मनाला त्रास देणार्‍या घटना आयुष्यात घडल्या असतीलच, पण त्याचा बाऊ न करता त्या पुढे चालत राहिल्या. पुस्तकाच्या ब्लर्बमध्ये अंजली जोशी लिहितात, ‘या आत्मकथनात तक्रारीचा सूर नाही. ठुसठुसणार्‍या जखमा नाहीत. माझे तेच खरे, असा दुराग्रह नाही. तर शांत नितळ समजुतीने जीवनाला भिडण्याची ताकद त्याच्या पानापानात आहे.’ त्या मागे एकदा फोनवर म्हणाल्या होत्या, ‘ जे आयुष्य वाट्याला आलं, ते पंचामृताचा प्रसाद म्हणून आम्ही स्वीकारलं.’

‘संवादु- अनुवादु’ वाचताना मनात आलं, उमाताईंना फोनवर म्हणावं, ‘तुमची थोडीशी ऊर्जा पाठवून द्या ना माझ्याकडे आणि हो ते समाधानसुद्धा….’ या पुस्तकाच्या निमित्ताने मी उमाताईंना अधून मधून फोन करत होते. त्यातून मध्यंतरीच्या काळात प्रत्यक्ष भेटी न झाल्यामुळे दुरावत गेलेले मैत्रीचे बंध पुन्हा जुळत गेले आहेत. आता मोबाईलसारख्या आधुनिक माध्यमातून हे बंध पुन्हा दृढ होत राहतील. प्रत्यक्ष भेटी होतील, न होतील, पण मैत्री अतूट राहील. मग मीच मला म्हणते, ‘आमेन!’

 – समाप्त – 

©  उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संवादु- अनुवादु– उमा आणि मी- भाग १ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?मनमंजुषेतून ?

☆ संवादु- अनुवादु– उमा आणि मी- भाग १ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

कतंच संवादु- अनुवादु पुस्तक हाती लागलं आणि भराभरा वाचत सुटले. पुस्तक प्रकाशित होऊन ५-६ वर्षे झाली पण माझ्या हातात पडेपर्यंत इतके दिवस गेले. त्याला कारणही माझ्या मर्यादाच होत्या. माझ्या आजारपणामुळे घराबाहेर पडता न येणं, नंतर करोनामुळे ग्रंथालये बंद असणं, तो संपेपर्यंत पुन्हा आजारपण, या सार्‍यातून तावून सुलाखून बाहेर पडेपर्यंत इतका काळ गेला.

सुप्रासिद्ध अनुवादिका उमा कुलकर्णी यांचे हे आत्मकथन. या पुस्तकाबद्दल मला उत्सुकता वाटण्याची दोन कारणे. पहिले म्हणजे त्यांनी अनेक उत्तमोत्तम कन्नड साहित्याचे मराठीत दर्जेदार अनुवाद केले आहेत. या पुस्तकाद्वारे, त्यांनी त्यांच्या अनुवादाची प्रक्रिया, अनुवादाच्या वेळचे अनुभव, त्या मागचे विचार- चिंतन उलगडून दाखवले असणार, याची खात्री होती. दुसरे कारण म्हणजे, उमाताई छुटपुटत्या काळापुरती माझी चुटपुट मैत्रीण होती. ही मैत्री एकमेकींना अगं-तुगं  म्हणण्याइतकी प्रगाढ होऊ शकली नाही, ही चुटपुट मनाला नेहमीच लागून राहिली. अजूनही रहाते. पण या चुटपुटत्या मैत्रिणीचं हे आत्मकथन, म्हणूनही मला या पुस्तकाविषयी कुतुहल होतं. ही चुटपुटती मैत्रीदेखील मी आपणहून तिच्याकडे जाऊन ओळख करून घेतली आणि तिला चिकटले, यातूनच झालेली.

त्याचं असं झालं –

साधारण १९९५ साल असेल. कोल्हापूरला प्रा. अ. रा. तोरो यांची एकदा भेट झाली. ते साहित्याचे उत्तम वाचक. कन्नड साहित्याचे जाणकार. मराठी- कन्नड स्नेहवर्धन चळवळीचे कार्यकर्ते. नुकतीच त्यावेळी मी ‘ डोंगराएवढा’ ही कादंबरी वाचली होती. मला ती खूप आवडली होती. अनुवादही. आणखीही उमाताईंनी केलेले अनुवाद वाचले होते. मग त्यांच्याबद्दल बोलणं झालं. मी म्हंटलं , ‘या लेखिकेची भेट व्हावी, असं अगदी मनापासून वाटतय.’ ते म्हणाले, ‘जरूर जा. तुम्हाला आवडेल त्यांच्याशी गप्पा मारायला!’ मग त्यांनी उमाताईंचा फोन नंबर दिला. त्यानंतर मी पुण्याला गेले, तेव्हा फोन करून उमाताईंकडे गेले. मनात म्हणत होते, ‘मला त्यांच्याशी गप्पा मारायला आवडेल, पण त्यांचं काय? त्या नामवंत लेखिका… ‘ पण आमचं छान जमलं. मनमोकळ्या गप्पा झाल्या आणि मी त्यांना एकदा चिकटले ती चिकटलेच. पुण्यात गेले की त्यांच्याकडे जाऊन गप्पा मारून यायचं हे ‘मस्ट’च झालं माझ्यासाठी. हा प्रत्यक्ष भेटीचा आणि गप्पांचा सिलसिला दोन –चार वर्षासाठीच फक्त टिकला. कारण नंतर माझं पुण्यात जाणं कमी झालं व आमच्या भेटी जवळ जवळ थांबल्याच.  म्हणून मी, ती माझी चुटपुट मैत्रीण म्हणाले. तर तिचं हे आत्मकथन. म्हणून मला विशेष उत्सुकता होती.

अनुवादित साहित्य मला वाचायला आवडतं. वेगळा प्रदेश, वेगळा परिसर, वेगळं लोकजीवन, त्यांची वेगळी विचारसरणी, वेगळी संस्कृती यांची माहिती त्यातून होते आणि एक वेगळाच आनंद मिळतो. उमाताईंची ओळख आणि मैत्री व्हावी, असं मला मनापासून वाटत होतं, त्याचं एक कारण त्या उत्तम अनुवादिका आहेत, हे होतं. वाचता वाचता मीही या क्षेत्रात थोडीशी लुडबूड केली होती. अजूनही करते आहे. मला ज्या कथा – कादंबर्‍या, लेख आवडले, त्यांचा मी अनुवाद केला. केवळ वाचण्यापेक्षा त्या साहित्यकृतीचा अनुवाद केला, तर ती जास्त चांगली समजते आणि त्यातून मिळणारा आनंदही अधीक असतो, असं मला वाटतं. उमाताईंनीही आपल्या पुस्तकात ही गोष्ट आवर्जून नमूद केलीय. ’मुकज्जी’चा अनुवाद त्यांनी ती कादंबरी स्वत:ला नीट कळावी, म्हणून केला होता. त्यातून त्यांना आपण चांगला  अनुवाद करू शकू, हा आत्मविश्वास मिळाला. पुढे त्यांनी कन्नड साहित्यातील अनेक दिग्गज लेखकांच्या निवडक साहित्याचा मराठीत अनुवाद केला आणि त्या नामांकित अनुवादिका झाल्या. अनुवादासाठी उत्तम पुस्तकाची निवड करणं, त्यातील आशय समजावून देणं, अनुवादाच्या परवानगीसाठी पत्रव्यवहार करणं, हा सारा व्याप विरुपाक्षांनी केला. एवढंच नाही, तर त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांची अनुवादाची प्रक्रिया मी ऐकली, तेव्हा तर मी चक्रावूनच गेले. त्या म्हणाल्या, त्यांना कन्नड वाचताच येत नाही. फक्त समजतं. लिपी येत नाही. त्यांच्यासाठी विरुपाक्ष पुस्तकाचं एकेक प्रकरण टेप रेकॉर्डवर वाचतात. नंतर सावकाशपाणे सवडीने ते ऐकत उमाताई त्याचा मराठीत अनुवाद करतात. थोडक्यात काय, तर स्वैपाकाची अशी सगळी सिद्धता विरुपाक्षांनी केल्यावर प्रत्यक्ष रांधण्याचे काम मात्र उमाताई करतात.  संसारा-व्यवहाराप्रमाणे साहित्य क्षेत्रातही त्यांचे सहजीवन चालू आहे. पुढे गप्पा मारता मारता असंही कळलं, विरूपाक्षांनीही मराठीतील निवडक पुस्तकांचे, लेखांचे कन्नडमध्ये अनुवाद केले आहेत. त्यात सावरकरांचे ‘माझी जन्मठेप’, सुनीताबाईंचे ‘आहे मनोहर तरी’, ही पुस्तके आहेत. काही लेखही आहेत. ‘संवादु… ‘ वाचताना कळलं, त्यांची २५ अनुवादीत पुस्तके कन्नडमध्ये प्रकाशित झाली आहेत. उमाताईंची पुस्तके साठीच्या उंबरठ्यावर आहेत.  

उमाताईंनीही आपल्या पुस्तकात, आपण भावानुवाद करत असल्याचे सांगून त्याबद्दलचे विश्लेषण अनेक अनुभव देऊन केले आहे. त्या अनुवादासाठी पुस्तकाची निवड, अनुवादाच्या पुस्तकाचा, आशय, वातावरण, लेखकाची शैली आशा विविध अंगांनी सखोल विचार करतात, हे त्यांनी जागोजागी केलेल्या विवेचनावरून दिसते. सुरुवातीचा काळात पुस्तकाच्या अनुवादाचे, आपण पाच- सहा खर्डे काढल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुढे दोन –तीन खर्ड्यांवर काम भागू लागले. त्यांच्या या परिश्रमतूनच त्यांची पुस्तके अधिकाधिक परिपूर्ण आणि समाधान देणारी झाली आहेत. 

संवादु…. अनुवादु’ वाचता वाचता मी त्यांना एकदा फोनवर म्हंटलं, ‘अनुवादाच्या कार्यामुळे तुम्ही खूप श्रीमंत झालात, नाही का?’ त्या म्हणाल्या, ‘हो. अगदी बरोबर!’ अनुवादामुळे त्यांची शिवराम कारंत, भैरप्पा, पूर्णचंद्र तेजस्वी, अनंतमूर्ती, वैदेही अशा मोठमोठ्या साहित्यिकांशी ओळख झाली. जवळीक जुळली. सहवास लाभला. त्यांच्याशी चर्चा करत स्वत:ला अजमावून पाहता आलं. शिवराम कारंत, भैरप्पा यांच्याविषयी तर त्यांनी अगदी भरभरून लिहिले आहे. अनेक प्रसंग, अनेक अनुभव त्यांनी यात दिले आहेत. एकदा शिवराम कारंत पुणे विद्यापीठात चर्चासत्रासाठी आलेले असताना त्यांच्याकडे उतरायला आले, त्यावेळी त्यांना झालेल्या अपरिमित आनंदाचे वर्णन त्यांनी पुस्तकात केले आहे. ते वाचून मला आठवलं, सांगलीत अनुवादावरच्या एका चर्चासत्रासाठी उमाताई आल्या होत्या , तेव्हा त्या माझ्याकडे उतरल्या होत्या. मी त्यांना फोनवर म्हंटलं, ‘ कारंतांच्या येण्याने तुम्हाला झालेला आनंद आणि तुम्ही माझ्याकडे येण्याने मला झालेला आनंद एकाच जातीचा आहे.’ त्यावेळी फोनवरून ऐकलेलं त्यांचं हसणं, मला प्रत्यक्ष पहाते, असं वाटत राहीलं.

अनुवादामुळे त्यांचे केवळ कन्नड साहित्यिकांशीच स्नेहबंध जुळले, असं नाही तर मराठी साहित्यिकही त्यांचे आत्मीय झाले. डॉ. निशिकांत श्रोत्री, डॉ. द.दी. पुंडे त्यांच्या गुरुस्थानीच होते. पु.ल.देशपांडे, अनिल अवचट, प्रभाकर पाध्ये, कमल देसाई अशी अनेक मंडळी  त्यांच्या अंतर्वर्तुळात होती. त्यांच्याही अनेक हृद्य आठवणी यात आहेत.

कमलताई देसाईंच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सांगलीत एक कार्यक्रम करायचे ठरले. या कार्यक्रमाला उमाताई आल्या होत्या. त्या भेटल्या. पण नुसत्याच भेटल्या. गप्पा झाल्या नाहीत. ‘नवीन काय’ एवढंच विचारणं झालं. उत्तर देणं आणि ऐकणं, त्या भरगच्च कार्यक्रमात होऊ शकलं नाही. घरी येणं वगैरे तर दूरचीच गोष्ट.  कार्यक्रम अतिशय हृद्य झाला.

पुन्हा एकदा डॉ. तारा भावाळकरांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या सांगलीत आल्या होत्या. तेव्हाही असाच, व्याख्याने, चर्चा, परिसंवाद असा भरगच्च आणि संस्मरणीय कार्यक्रम झाला होता. तेव्हाही उमाताई भेटल्या. पण याही वेळी नुसत्याच भेटल्या. गप्पा झाल्याच नाहीतच.  त्यानंतर म. द. हातकणंगलेकरसरांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने व्याख्यान द्यायला उमाताई सांगलीत आल्या होत्या. यावेळी त्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही एका दालनात लावलेले होते. इथेही व्याख्यातीभोवती वाचकांचा गराडा असल्याने आमचं बोलणं नाहीच होऊ शकलं. अशा त्यांच्या चुटपुट लावणार्‍या भेटी होत गेल्या. त्या भेटत राहिल्या पुस्तकातून. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांच्या बातम्यातून.

शिवराम कारंत आणि भैरप्पा म्हणजे त्यांच्या ‘मर्मबंधातली ठेव.’ विविध प्रसंगातील त्यांच्या आठवणी त्यांनी अनेक ठिकाणी पुस्तकात दिल्या आहेत. त्यांच्या जीवनात आलेल्या अनेक व्यक्तींबद्दल त्यांनी अगदी मनापासून लिहिले आहे, अगदी आपल्या कामवाल्यांबद्दलसुद्धा त्यांनी प्रेमाने लिहिले आहे.

उमाताईंच्या अनुवादामध्ये कारंतांचे ‘डोंगराएवढा’, ‘तनामनाच्या भोवर्‍यात’, भैरप्पांचे ‘वंशवृक्ष’, ‘पर्व’, ‘काठ’, ‘तंतू’, पूर्णचंद्र तेजस्वींचे, ‘कार्वालो’,, गूढ माणसं’, ‘चिदंबररहस्य’, गिरीश कार्नाडांचे, ‘नागमंडल’, ‘तलेदंड’ अशी अनेक महत्वाची पुस्तके आहेत. किंबहुना त्यांनी महत्वाच्या वाटणार्‍या पुस्तकांचेच अनुवाद केले आहेत. साहित्य अ‍ॅकॅडमीने अनुवादीत पुस्तकांना पुरस्कार द्यायचे ठरवले आणि पाहिला पुरस्कार उमाताईंना मिळाला. ‘वंशवृक्ष’ या भैरप्पांच्या कन्नड कादंबरीच्या अनुवादासाठी १९८९साली त्यांना तो मिळाला होता. नंतर त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार, पुणे ग्रंथालयाचा ‘वर्धापन पुरस्कार’, महाराष्ट्र फाऊंडेशनचा विशेष पुरस्कार, ‘वरदराज आद्य पुरस्कार ( मराठी व कन्नड समाजातले साहित्यिक- सामाजिक बंधुत्व वाढवण्यास हातभार लावल्याबद्दल ), आपटे वचन मंदिरचा म. बा. जाधव पुरस्कार ( पारखासाठी), स.ह. मोडक पुरस्कार (पर्वसाठी) इ. अनेक पुरस्कार त्यांना मिळत गेले.

क्रमश: – भाग १

©  उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “अथर्वशीर्ष… लंडनमधील मंदिरात…” – लेखिका : सौ.संजीवनी निमोणकर ☆ श्री मोहन निमोणकर  ☆

श्री मोहन निमोणकर 

? मनमंजुषेतून ?

☆ “अथर्वशीर्ष… लंडनमधील मंदिरात…” – लेखिका : सौ.संजीवनी निमोणकर ☆ श्री मोहन निमोणकर ☆

मुलगा-सून व नातू सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास असल्याने त्यांच्याकडे जाण्याचा योग आत्तापर्यंत तीन वेळा आलाय. लंडनच्या दक्षिणेस केंट या काऊंटीत असलेल्या ‘ग्रेव्हज्एंड’ या शहरात ते रहातात. आम्ही जेव्हा त्यांच्याकडे जायचो, तेव्हा वेळात वेळ काढून तिथे जवळपास असणाऱ्या भारतीय मंदिरात आम्ही जात असू. त्यांच्या घराजवळच एक मोठे गुरुव्दारा आहे. एकदा तेथेच आम्हाला एका हिंदू मंदिराबद्दल समजले व आम्ही तेथे जाण्याचे ठरविले.

एका संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आम्ही त्या मंदिरात गेलो होतो. मंदिरात पाऊल ठेवताच खूप प्रसन्न वाटले. राम-सीता, शंकर-पार्वती, गणपती, हनुमान अशा आपल्या देवांच्या अतिशय  सुंदर  संगमरवरी मूर्ती पाहून मन खूपच प्रसन्न झाले. त्या मंदिराच्या जागेच्या मालकीणबाई पंजाबी आहेत व तेथील पुजारी श्री.दुबे हेही मध्यप्रदेशातून आलेले आहेत. त्या दोघांनी आम्हाला मराठी भजनं म्हणण्याचा खूप आग्रह केला. आम्ही त्यांना म्हटले, आज संकष्टी चतुर्थी आहे तर आम्ही गणपतीची आरती म्हणतो. पुजारी श्री.दुबेंना मराठी आरती ‘सुखकर्ता’ माहित होती. ते तर खूप खूष झाले व त्यांनी म्हणायला सांगितली. त्या दोघांनीही आमच्या हातात टाळ दिले व पंजाबी आजी स्वत: मृदुंग वाजवून ठेका देऊ लागल्या. मग आम्ही सुखकर्ता व शेंदूर लाल चढायो ही गुजराथी आरती म्हटली. दोघेही एकदम खूष झाले. दुबेंनी तर त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओही घेतला व आता आम्ही येथील सर्व मराठी माणसांनाही तो पाठवू असे सांगितले. या सर्वाने आम्ही खूपच आश्चर्यचकित व प्रभावितही झालो.

आरत्यांनंतर आजींनी माईक आमची सून सौ.निवेदिताकडे दिला व पुन: मराठी भजन म्हणण्याचा आग्रह केला ! तिने गणपती अथर्वशीर्ष म्हणताच दोघेही खूप खूष… व आजी मृदुंग व दुबेगुरुजी व्हिडिओ काढण्यात दंग! मुलगा व सून दोघांनीही मनापासून गणपती अथर्वशीर्ष म्हटले. मंदिरात आलेल्या हिंदु-पंजाबी भक्तांमध्ये एक इंग्लिश महिलाही होती. ती नियमित दर सोमवारी तिथे येते असे नंतर समजले. त्या इंग्लिश महिलेने अगदी व्यवस्थित मांडी घालून, शांत चित्ताने आणि एकाग्रतेने, मनापासून आपल्या बाप्पाची आरती आणि अथर्वशीर्ष ऐकल्याचा आम्हाला सुखद धक्का तर बसलाच, आणि त्याहीपेक्षा, आपल्या प्रार्थनेमुळे तिथे त्यावेळी निर्माण झालेल्या भक्तिमय प्रसन्न वातावरणात, आपली भाषाही समजत नसलेली ती इंग्लिश महिला इतकी गुंगून गेलेली पाहून, आपल्या संस्कृतीचा आम्हाला खूप अभिमान व गर्वही वाटला

परदेशातही आपली संस्कृती जोपासली जाते आहे, आणि त्यात आपला मुलगा व सून यांचाही वाटा आहे, हे पाहून आम्हाला खरंच खूपच छान वाटले. एक अनामिक अभिमान वाटला. इंग्लंडमधल्या हिंदू देवळात मराठी आरत्या म्हटल्या गेलेल्या पाहून पंजाबी आजी व दुबे गुरुजी यांच्या चेहे-यावरही आम्हाला खूपच समाधान व आनंद दिसून आला. आम्ही दोघेही त्या वातावरणाने अतिशय भारावून गेलो होतो. नकळत मनाने पुण्याच्या घरी पोहोचलो होतो आणि आपण इंग्लंडमध्ये आहोत हेही क्षणभर विसरून गेलो होतो. तिथून परतलो ते पुढच्या  भेटीतही पुन: इथे यायचेच असा  निश्चय करूनच.

लेखिका : सौ.संजीवनी निमोणकर

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print