सुश्री सुलू साबणे जोशी

??

☆ ‘एक असते चिमणी’ – डाॅ.केशव साठ्ये ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

मध्यंतरी सातारला गेलो होतो. हॉटेलची खिडकी सहज उघडली तर समोर २,३ चिमण्या, अगदी दोन फूटांवर. हरखून पहात बसलो. खरं सांगतो, पहिल्यांदा मोर बघितला तेव्हाही एवढा आनंद झाला नव्हता. आता ‘चिमणी’ हा पक्षी पुण्यात पाहायला मिळणे दुर्लभ झालंय. निदान आमच्या कोथरुडमध्ये तरी. 

चिमणी ही आपली लहानपणापासूनची सखी आहे. आम्ही फलटणला राहत होतो, पहिल्या मजल्यावर. तिथे मोठे माळवद (पाऊस कमी होणाऱ्या प्रदेशात माळवदी घरे असतात) होते. असंख्य चिमण्या तुरुतुरु चालत पुढ्यात यायच्या. टाकलेले दाणे, पदार्थ ऐटीत टिपायच्या आणि भुर्र उडून जायच्या. चिमणी हा घरातलाच सदस्य आहे, अशी भावना माझ्यासारख्या लाखोजणांची असेल. किंबहुना चिमणी हा आपल्या जगण्याचा एक भागच झाली होती. तिला वेगळे तरी कसे करणार? 

राखाडी, भुरा रंग, प्रमाणबद्ध शरीर, इवलीशी चोच, टुक टुक पाहणारे डोळे, न घाबरता, बिनधास्त पुढ्यात येऊन बसायच्या. पण हे चित्र गेल्या १०, १५ वर्षांत झपाट्याने बदलले. चिमण्या दिसेनाश्या झाल्या. त्यांची जागा कबुतरांनी, पारव्यांनी घेतली. आजही कुणी खेड्यात, थोड्या दुर्गम भागात गेला आणि त्यांनी चिमणी पाहिली असे सांगितले की, मन त्या रम्य आठवणीने भरुन येते. 

‘या चिमण्यांनो परत फिरा’ सारखे गाणे लागले, किंवा बाळ जेवावे म्हणून एखादी आई ‘हा घास चिऊचा’ असे म्हटलेले ऐकले, की अधिकच गलबलून येते. आपल्या आयुष्यातील अनेक जुन्या गोष्टी स्मरणरंजनाच्या कप्प्यात जाऊन बसल्यात. त्यातच ही पण जाऊन बसली. हे दुःख आपल्या सर्वांचेच आहे आणि त्यात भर म्हणजे आता ती नसण्याचा दिवसही आपण साजरा करायला लागलोय.

त्यामागे हेतू चांगला असला तरी तिचे नसणे अशा दिवसाने अधिक ठसठशीत होते. अर्थात आपण आपली कातडी टणक करुन टाकलीय म्हणा. एक असते चिमणी… एक असतो कावळा… कावळ्याचं घर असतं शेणाचं, चिमणीचं घर मेणाचं. धो-धो पाऊस पडतो, कावळ्याचं शेणाचं घर वाहून जातं.. ही लहानपणी ऐकलेली गोष्ट खोटी ठरली म्हणायची. कारण कावळे बहुसंख्य दिसतात. म्हणजे चिमणीचं घरच वाहून गेले म्हणायचे.. 

आज जागतिक चिमणी दिवस (२० मार्च), त्या निमित्त…

लेखक : डॉ. केशव साठये

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments