मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी फजिती !… लेखक – श्री सुहास  टिल्लू ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? मनमंजुषेतून ?

☆ माझी फजिती !… लेखक – श्री सुहास  टिल्लू ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

माझी फजिती !

सन 1969 मधे 1 मे रोजी अस्मादिक विवाहबद्ध झाले. जागतिक कामगार दिनाचा मुहूर्त साधून, जन्मभरासाठी स्वतःला वेठीला धरून ठेवले.मी एक वेठबिगार झालो. एक आझाद पँछी पिंजडेमें बंद हो गया !

आमचे लग्न म्हणजे, पूरब पश्चिम असा प्रकार होते, कारण मी राजस्थानात कोट्याला नोकरी करत होतो. तर ही छत्तीसगड मधील रायपूरची !

‘नेमेची येतो मग पावसाळा ‘… प्रमाणेच नेमेची येणारा चातुर्मास फार लवकर आला. हिला माहेरी घेऊन जाण्यासाठी सासू- सासरे आले होते.

‘अभी अभी तो आयीं हो

अभी अभी जाना है ।’

असे सगळे होते.

मग विरह म्हणजे काय असतो, ते कळले. कारण बाईसाहेब गणपतीपर्यंत नसणार होत्या.  घरच्या गणपती करता म्हणून ही मुंबईला येणार होती. व मीसुद्धा मुंबईला जाणार होतो. तोपर्यंत हा विरह सहन करावा लागणार होता…. ज्यावर्षी नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले, त्याचवर्षी एक व्याकूळ चकोर, चंद्रमेच्या अमृतकणांकरता प्यासा झाला होता !

थोडेसे विषयांतर ! विरहव्यथेचे व लेखणीचे काय साटेलोटे आहे, देवजाणे ! लेखणी हाती घेतली की ती लगेच झरझरा कागदांवर शब्दांचा पाऊस पाडते.

त्या काळात पत्र लिहिणे हा संपर्कात रहाण्याचा एकमेव पर्याय होता. विरहव्यथा इतकी जबरदस्त होती की, बायकोला पत्र लिहायला सुरुवात केली की दहाबारा पाने कधी लिहून संपत ते कळत नसे. एका मोठ्या लिफाफ्यात ते पत्र घालावे लागत असे व वजन जास्त झाल्याने जास्तीची टपाल तिकीटे लावावी लागत. ते पत्र रायपूरला जेव्हा डिलिव्हर होई, तेव्हा ते उघडून पुन्हा बंद केले आहे हे लक्षात येत असे. त्याबाबत फिर्याद केली तेव्हा पोस्ट ऑफिसकडून एक विलक्षण कारण सांगण्यात आले…’ राजस्थानातून अफूची तस्करी करण्यासाठी असे जाडजूड लिफाफे वापरले जातात म्हणून आम्ही ते उघडून पहातो.’   त्या भागात मराठी माणसांची संख्या बरीच जास्त आहे. कुणी मराठी कर्मचारी जर आतला मजकूरही वाचत असेल तर त्याला चंद्रकांत काकोडकरांचे लिखाण वाचण्याचा आनंद मिळाला असेल.

माझे एक चुलत सासरे पोस्टातच नोकरीला होते. त्यांनी ह्याला पुष्टी दिली होती. हे काका मुंबईतच रहात होते. व लग्न झाल्यानंतर त्यांच्याकडे जाण्याचा योग आला नसल्याने, त्यांनी अगदी आग्रहपूर्वक जावयाला व पुतणीला भोजनाचे निमंत्रण दिले होते. चुलत सासूबाई आमच्या चौल अलिबागकडल्या होत्या. त्यामुळे त्यांना जावयाचे जरा जास्त कौतुक होते. त्यांनी जेवणाचा बेत खास ‘अष्टाघरी ‘ केला होता…. जावयास जेवणात ब-याच खोड्या आहेत हे माहीत नसणे स्वाभाविक होते.

भरपूर ओला नारळ वापरून सगळे पदार्थ केले होते. पानगी, खांडवी, व डाळिब्यांची उसळ असा मेनू होता. ह्या डाळिंब्यांना बिरडे असेही म्हणतात. मी आजवरच्या आयुष्यात डाळिंब्या किंवा वाल पानावर घेतले नव्हते. चाखून पहाण्याचा तर प्रश्नच नव्हता ! तर सासूबाईंना शंभर टक्के खात्री होती की, जावयाला त्या डाळिंब्या नक्कीच आवडत असणार !!  खरेतर डाळिंब्या खूपच चविष्ट झाल्या होत्या. किंचित गोडसर, गुळचट व भरपूर ओला नारळ घातला होता. भिडस्तपणामुळे आज मला त्या खाणे भाग होते. ‘ पानावर वाढलेले सगळे संपवलेच पाहिजेत ‘ ही घरची शिस्त असल्याने, मी पहिल्या घासातच वाढलेल्या डाळिंब्या खाऊन टाकल्या व इतर आवडीच्या पदार्थांचा समाचार घेऊ लागलो. आणि तिथेच ब्रह्म घोटाळा झाला होता….. 

…. सासूबाई माझ्या पानावर लक्ष ठेवून होत्या. त्या डाळिंब्यांचा वाडगा घेऊन पुढे सरसावल्या व ” मला खात्री होती की डाळिंब्या तुम्हाला खूप आवडत  असतील,” असे म्हणत त्यांनी संपूर्ण वाडगा माझ्या पानात रिकामा केला. … ‘ पानात काहीही टाकायचे नाही. शेवटी पान चाटून स्वच्छ करायचे ‘ अशा शिस्तीचे पालन करणे आवश्यक होते. काय करणार ! आलिया भोगासी सादर होण्यावाचून गत्यंतरच नव्हते.! आयुष्यात मी डाळिंब्या खायला सुरवात अशा जम्बो क्वांटिटीने केली होती.

मंडळी, नंतरच्या आयुष्यात मात्र जे पदार्थ ह्या ‘ आझाद पंछीने ‘ चाखलेही नव्हते ते, पिंजडेके पंछीला न कटकट करता खाण्याची सवय लावली गेली, हे वेगळे सांगायला नकोच !

ह्या आझाद पंछीला जिने  पिंज-यात बंद केले, ती काय म्हणते पहा !

(तिचे शिक्षण हिंदीत झाल्याने तिची भाषा अशी झाली आहे)…. 

“ शादीके लिये श्रमिक दिन फायनल केला

मैने एक लडका हेरून ठेवला

उडता पंछी पिंजडेमे बंद केला

आयुष्यभरच्या आरामाचा मुहूर्त साधला “ …. 

– इति मंगल टिल्लू

लेखक : श्री सुहास टिल्लू

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “एकसष्ट दिव्यांच्या प्रकाशात !!!” — एका पत्नीचे मनोगत – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? मनमंजुषेतून ?

☆ “एकसष्ट दिव्यांच्या प्रकाशात !!!” — एका पत्नीचे मनोगत – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके 

(काही तरी डाव सुरू आहे हे ओळखायला त्याला वेळ नाही लागला. पण निश्चित डाव काय हे मात्र मी गुलदस्त्यातच ठेवू शकले.) इथून पुढे — 

त्याच्या पुतणीचं अ‍ॅडमिशन इथं पुण्यातच झालं होतं इंजिनियरींगचं. कॉलेजच्या होस्टेलवर राहणं जवळपास निश्चितच झालेलं असताना यानं तिचा बाडबिस्तरा घरात आणून ठेवला. आणि तिच्यासोबत तो ही इंजिनियर झाला…तिस-यांदा..एकदा तो स्वत:,नंतर चिरंजीव आणि आता ही! कारण तिच्या सर्व अभ्यासात हा पूर्णपणे सहभागी झाला होता. गणित विषय पक्का असल्याने आणि शिकवण्याची प्रचंड हौस आणि आवाका असल्याने नोकरीच्या कामांतून हा नेमका वेळ काढायचाच. थोडक्यात एक मुलगी नसल्याचे शल्य याने भाची,पुतणी आणि सून यांच्यामार्फत सुसह्य करून घेतले होते.

आपला वाढदिवस या ही वेळेस नेहमीसारखा साजरा होणार एवढंच त्याला वाटलं. सोन्याची चेन करून घेतली बळेबळेच. कशाला? हा त्याचा सततचा प्रश्न मी न सोडवताच पुढच्या प्रश्नाला सुरुवात करायचे….असू दे रे….हे उत्तर तर जणू कॉपी पेस्ट करून ठेवले होते मनात. सोनं म्हणजे गुंतवणूक असं सांगितलं त्याला.  त्याला शोभेल असा पोशाखही तयार करून घेतला. मुलगा परदेशी…सूनबाईही त्याच्यासोबत…मग कशाला करायचा एवढा थाटमाट? हा त्याचा प्रश्न योग्यच होता. पण मी तो ऑप्शनला टाकला.

मुळात तो एकसष्ट वर्षांचा दिसत नाही…..तो मूळातच उत्तम चालीचा असल्याने वजन नेहमीच आटोक्यात. पण सरकारी खात्याच्या चाकोरीबद्ध कामाच्या पलीकडे जाऊन काम करण्याच्या प्रवृत्तीमुळे समाजात वजन भरपूर. पण हे वजन कुणावरही टाकण्याची त्याच्यावर वेळ येत नाही आणि त्याची इच्छाही नसते. त्यामुळे त्याची एकसष्टी होते आहे, हे अनेकांना आश्चर्याचे होते. शिवाय तो हा सोपस्कार करून घ्यायला तयार झालाच कसा? हाही प्रश्न अनेकांना पडला. मग त्यांना सांगावे लागले..यातलं त्याला काहीही माहित नाही…त्याला थेट कार्यक्रम स्थळी आणणार आहे….मंदिरात जायचंय असं खोटं सांगून!

मी सकाळपासून तयारीत. तर साहेब निवांतपणे त्यांच्या लेखनाच्या,संशोधनाच्या कामांत व्यग्र. दुपारचे जेवणही बेताचेच घेतले. रात्री बाहेरच जेवायचं आहे म्हणून दुपारी कमी जेवावे…हा त्याचा विचार. कार्यक्रमात मला त्याच्याविषयी बोलायचंच होतं…पण काय काय सांगणार? ‘तु योग्य तेच करशील याची मला खात्री आहे’ असं तो लग्नाच्या पहिल्या दिवसापासून मला सांगत आलाय. त्यामुळे मी तसा प्रयत्नही केला. आणि त्यानेही तो गोड मानून घेतला. तु माझ्या या मोठ्या परिवाराचा एक भाग झाली आहेस… या परिवाराची सर्व सुख-दु:खे,अडचणी आता तुझ्याही आहेत’ असं म्हणून त्याने संसार सुरू केला. आपलं एक स्वत:चं घर असावं असं त्यालाही वाटत होतं. पण पगारात भागवा या तत्वावर निष्ठा असल्याने त्याच्या आणि माझ्या पगारात घर नजरेच्या टप्प्यात लवकर आलेच नाही. पण देवाच्या कृपेने डोईवर छप्पर आलं. आणि मग आम्ही ते निगुतीनं सजवलं. एक मुलगा..तो ही बाप से सवाई. वडील एवढे अधिकारी असूनही त्याने कधीही कुठल्या नियमांचा भंग केला नाही…अगदी कुणी पहात नसताना सुद्धा!

संसार सुरू असताना त्याने माझा नवरा,माझ्या आणि त्याच्याही पालकांचा मुलगा, भावाचा आणि बहिणीचा भाऊ, भाच्यांचा मामा, पुतण्यांचा काका, सहका-यांचा मार्गदर्शक, नवोदितांचा प्रशिक्षक, वाचकांचा लेखक, श्रोत्यांचा व्याख्याता, शाळकरी विद्यार्थ्यांचा शिक्षक अशा अनेक भूमिका त्याने लीलया पार पाड्ल्या.

नोकरीत,त्यातून शासकीय नोकरीत अनेक आव्हाने असतातच…व्यवस्था बदलण्याच्या वेळखाऊ कामात वेळ घालवण्यापेक्षा व्यवस्थेत राहून शास्त्रीय, संशोधनाच्या, जनसंपर्काच्या माध्यामातून शक्य ते करीत राहणे त्याने शिकून घेतले होते. त्याच्या कुण्या साहेबांनी दिलेला Love all, Trust a few but do wrong to none  अर्थात प्रेम सर्वांवर करा,त्यातला काहींच्यावर विश्वास ठेवा मात्र वाईट कुणाचंच करू नका! हा कानमंत्र त्याने प्रत्यक्ष आचरणात आणला. त्यामुळे निवृत्तीनंतर आजही त्याला देशभरात लोक बोलावतात आणि तो ही न कंटाळता जातो. अर्थात आता मी ही सोबत जातेच. त्याच्या व्याख्यानांना मिळणारा प्रतिसाद पाहते, तेंव्हा मलाही छान वाटतं!

कार्यक्रमाच्या दिवशी सकाळपासून मी फोन सायलेंटवर ठेवला होता….चोरून बोलायचं कार्यक्रमाची तयारी करणा-या लोकांशी!  चार वाजताच घराबाहेर पडले…म्हटलं जरा मैत्रिणीच्या घरी जाऊन येते…तिच्या घरी पुजेचा कार्यक्रम आहे. मी साडेपाच वाजता तयार रहा…आपण मंदिरात जाऊ आणि मग नंतर जेवायला. मी आलेच..असं म्हणून मी सटकले आणि थेट कार्यालयात गेले. तयारी अंतिम टप्प्यात होती. बोलावलेले सर्वच आलेले होते…तयारीत. घटिका जवळ आली….कार्यालयात शांतता ठेवली होतीच. दिवेही मंद केले होते. फुलांची पायघडी तयार होती. रेडी? मी सर्वांना म्हटले…आणि रिक्षा करून घरी गेले. त्याला नवा ड्रेस, सोन्याची चेन घालायला लावली. ती चेन त्याने लगबगीने शर्टच्या आत घालायचा प्रयत्न सुरू केला. मी म्हटलं ‘असू दे थोडा वेळ! छान दिसतीये! रिक्षा कार्यालयाच्या आत जाऊ लागली तेंव्हा तो चमकला. अगं इथं कुठलं हॉटेल? हे तर कार्यालय दिसतंय! मी त्याला हाताला धरून हॉल मध्ये नेलं. सनईच्या सुरांनी त्याचं स्वागत झालं. त्याच्या गळ्यातली चेन चमकत होती. एवढ्या लोकांना पाहून त्याने ती चेन लगेच शर्टमध्ये लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. दिवे प्रखर लागले आणि त्याची अत्यंत प्रेमची माणसं उठून उभी राहिली…टाळ्यांचा गजर झाला. त्याला कुणाकुणाला भेटावं,काय बोलावं हे सुचेना. बालपणीचे मित्र, शाळा-कॉलेजातले मित्र,खात्यातली जुनी जाणती माणसं…..सर्व अगदी जवळचे नातलग…! फुलपाखराला मधाने शिगोशीग भरलेल्या फुलांच्या मोठ्या बगिच्यात सोडून द्यावं तसं झालं… एखाद्या लहान मुलासारखा भांबावून गेला बिचारा.

त्याला हाताला धरून मी मंचावर घेऊन जाऊ लागले…फुलांच्या पायघड्यांवर पाऊल टाकले तर ती कुस्करून जातील म्हणून तो आधी तयारच होईना…पण मग पायांतल्या चपला काढून अलगद चालत गेला…त्यानं त्याच्या सहवासातल्यांना आतापर्यंत या फुलांसारखंच जपलंय.

मग एकसष्ट दिव्यांनी ओवाळणं,केक कापणं,त्याला गोडाची आवड..त्यातल्या त्यात सातारी कंदी पेढ्यांचं जास्त कौतुक म्हणून मित्रांनी आणलेला पेढे-हार….सर्व सर्व मनासारखं झालं..!

मग मी बोलायला उभी राहिले तर मनात असलेलं सर्वच उंचबळून आलं….जमेल तेव्हढं सांगून टाकलं….आणि इतक्या वर्षांत पहिल्यांदाच त्याला सर्वांदेखत,सार्वजनिकरित्या आय लव यू! म्हटलं! त्याच्या चेहरा त्या कंदी पेढ्यांपेक्षाही गोड दिसत होता यावेळी !

– समाप्त –

— एका पत्नीचे मनोगत

(नुकताच हा सोहळा पाहिला आणि प्रत्यक्ष अनुभवला. एका सुशील माणसाच्या पत्नीच्या भूमिकेत जाऊन लिहिलेला हा लेख. व्यक्तींची नावे,पदे आणि इतर तपशील महत्त्वाचा नाही म्हणून तो लिहिला नाही. कारण प्रेम एकाच वेळेस वैय्यक्तिकही असते आणि वैश्विकही. आपल्या आसपास अशी माणसं असणं हे आपलं आणि समाजाचं सुदैवच की ! एक नातं असं रूपाला येऊ शकतं, बहरू शकतं हे केवळ गोड… )

शब्दांकन व प्रस्तुती : श्री संभाजी बबन गायके.

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “एकसष्ट दिव्यांच्या प्रकाशात !!!” — एका पत्नीचे मनोगत – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? मनमंजुषेतून ?

☆ “एकसष्ट दिव्यांच्या प्रकाशात !!!” — एका पत्नीचे मनोगत – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके 

त्याची एकसष्टी जवळ आलीये आणि मी त्यादिवशी काहीतरी करू शकते, याचा त्याला अंदाज होताच. हल्ली सरप्राईज देण्याची नाहीतरी पद्धतच पडून गेली आहे. परंतू याला काही सरप्राईज द्यायचं म्हणजे महाकठीण. तो सेवानिवृत्त होण्याआधी ठीक होतं. सतत खात्याच्या कामात गर्क. अंगावर सरकारी आणि अधिकाराची वर्दी होती पण त्याचा रुबाब दिसायचा तो प्रशिक्षक म्हणून. त्यामुळे पायाला भिंगरी बांधलेली असायची त्याच्या. मी ही माझ्या नोकरीत असल्याने दोन डोळे शेजारी पण भेट नाही संसारी अशातली गत होती. पण आता मात्र असं नव्हतं. आणि मला त्याला त्याच्या एकसष्टीचं सरप्राईज द्यायचंच होतं. पण हा सतत जेथे जातो तेथे तू माझा सांगातीच्या चालीवर सोबत. कदाचित इतक्या वर्षांची भरपाई करण्याचा त्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असावा.

याची एकसष्टी म्हणजे एक आंतरराष्ट्रीय कट शिजवण्यासारखी भानगड. आंतरराष्ट्रीय यासाठी की चिरंजीव आणि सूनबाई दूर तिकडे परदेशात. घरातल्या एकाला तरी माझ्या मनसुब्याची कल्पना असावी म्हणून आधी सूनबाईला कारस्थानात सहभागी करून घेणे आले. कारण तिच्याकडे सून आणि लेक अशा दुहेरी भूमिका आहेत. आम्हांला मुलगी नाही म्हणून सुनेलाच मुलगी मानायचं याचं खूप आधीपासून ठरलेलं होतंच. आणि इतक्या वर्षांत सूनबाई आमच्या लेकीच्या भुमिकेत अगदी फिट्ट बसल्यात. पण ही लेक आणि आमचा लेक या दोघांनाही त्यांच्या कामामुळे इथे येणे अशक्य होतं. त्यामुळे सर्व नियोजन करण्याची जबाबदारी माझ्याच खांद्यांवर येउन पडली. शहरात कार्यक्रम करण्यातला सर्वांत मोठा टप्पा म्हणजे कार्यालय मिळवणे. शिवाय ते जवळचे,सोईचे आणि परवडणारेही असावे लागते. शिवाय तारीख विशिष्ट असल्याने इतर कार्यक्रमांसारखी कार्यालयाची उपलब्ध तारीख बघून दिवस ठरवणे चालणारे नव्हते. कार्यालय बघायला म्हणून घराबाहेर निघाले तर साहेब सोबत यायला तत्परतेने तयार झाले. काहीतरी कारण सांगून मी एकटीच बाहेर पडले!

याचा मित्रपरिवार अनेक ठिकाणी विखुरलेला. त्यामुळे त्यांचेशी संपर्क साधणे जिकीरीचे होतेच. शिवाय ती मंडळी याच्या सतत संपर्कात असतात. त्या सर्वांना याची जन्मतारीख तोंडपाठ आहे कारण ही तारीखच लक्षात राहिल अशी आहे. पण यातील कोणी फितुर झाला तर गडबड होणार, हे नक्की!

मुळात असा कार्यक्रम करणे हे त्याच्या बुज-या स्वभावात बसेल की नाही,ही मोठीच शंका होती. कारण जबाबदारी आणि रुबाबाचा सरकारी रंगाचा गणवेश असूनही साहेबांनी तो कधी मिरवला नाही कामाव्यतिरिक्त. प्रामाणिकपणा, तत्वनिष्ठा आणि अंगभूत सौजन्यशीलतेच्या हल्ली दुर्गुण भासणा-या गुणांमुळे तो प्रसिद्धीपासून आणि लाभांपासून चार हात दूरच राहिलेला माणूस. तीस पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत फक्त एकदाच प्रमोशन मिळाले त्याला यावरूनच सर्व काही लक्षात यावे खरे तर. पण त्याची त्याला कधी ना खंत ना खेद. लहानपणी म्हणजे तो चौथीला असताना त्याच्या बाबांनी त्याच्याकडून भगवद गीता तोंडपाठ करून घेतलेली होती. पुढे त्यातील काही श्लोकांचं त्याला विस्मरण झाले थोडेसे. मात्र ‘कर्मण्ये वाधिकारस्ते’ तो विसरला नाही. जे काम मिळाले ते जीव ओतून करावे हा एक अर्थ त्याला उमगला होता. त्यामुळे त्याला मानणारा मोठा मित्रपरिवार त्याने जमवून ठेवला होता. त्यामुळे कार्यक्रमाला बोलवायचे तरी कुणाकुणाला असा सवाल उभा राहिला. पाचशे दोनशे दीडशे वरून गाडी सव्वाशेवर स्थिर केली. पाच पंचवीस इकडे तिकडे होतातच.

अगदी मुलीच्या लग्नाची आमंत्रणे करावीत अशी यादी तयार केली लपून छपून. कारण काहींचे संपर्क क्रमांक माझ्यापेक्षा त्यालाच जास्त ठाउक असतात. पण काहीतरी कारण सांगून,त्याच्या फेसबुकमध्ये घुसखोरी करून ते क्रमांक मी मिळवले….त्या सर्वांना कार्यक्रमाला यायचेच होते. पण इतक्या लांबून कार्यक्रमाच्या आधी एक दिवस इथे येणा-या मित्रांनी चुकून इथल्या त्यांच्या कॉमन मित्रांकडे भंडाफोड न केला म्हणजे मिळवली!

जावयाचा कार्यक्रम आणि त्याच्या माहेरच्या म्हणजे माझ्या सासरकडील लोकांना नाही कळवलं तर कसं जमेल? त्यात हा त्यांचा अतिशय लाडका जावई. जावई कम लेक. म्हणजे जावई कमी आणि लेकच जास्त. माझ्या माहेरच्या आणि सासरच्या पैकी एकाला जरी वगळलं तर अवघड झाले असते…भावनिकदृष्ट्या! जितकी सेवा त्याने त्याच्या वडिलांची केली तितकीच काळजी माझ्या घरच्यांचीही घेतली आजवर. अहो, नोकरी मुंबईत आणि घर पुण्यात. त्याच्या वडिलांच्या पायांना रोज तेल लावून मालिश करून द्यायचा याचा शिरस्ता. बाबांची मालिश करून देणं वैद्यकीयदृष्ट्या अत्यावश्यक तर होतेच. एखादा पगारी माणूस नेमून हे काम खरे तर त्याला करून घेता आले असते…. पण मुलाचे कर्तव्य म्हणून तो हे काम न कंटाळता करत असे. त्यामुळे साहेब भल्या पहाटे रेल्वेने मुंबापुरीला प्रयाण करायचे आणि रात्री उशीरा पुण्यात परतायचे…असा क्रम थोडाथोडका नव्हे…कित्येक वर्षे चालला. याला भक्त पुंडलीक म्हणावं की श्रावण बाळ असा प्रश्न पडायचा.

माझ्या नणंदेचे म्हणजे याच्या बहिणीचे यजमान अकाली निवर्तले तेंव्हा याने मला ठामपणे सांगितले…दीदीची आणि तिच्या कुटुंबाची जबाबदारी आता आपली! आणि त्याने ती आजवर निभावली आहे. कार्यक्रमात दीदीच्या पोरींना म्हणजे भाच्यांना आणि भावाच्या मुलींना सहभागी न करून घेउन कसे भागणार? या भाऊरायाच्या सोहळ्याला बहिण आणि मामाश्रीच्या कार्यक्रमाला भाच्या, आणि पुतण्या तर हव्यातच. म्हणून मग सव्वाशेची निमंत्रण यादी दिडशेच्या घरात सहजच गेली. शिवाय गाणे शिकलेल्या भाचीबाई सूत्रसंचालनासाठी सूत्रे हाती घेण्यास उत्सुक होत्याच. त्यामुळे दीप-प्रज्वलन,स्वागत गीत, प्रार्थना,आभारासह सूत्रसंचलन इत्यादीचा प्रश्न परस्पर मिटला. फ्लेक्स,आमंत्रण पत्रिका, फुलांची सजावट,केक, एकसष्ट दिवे,जेवणाचा मेन्यू फोटोग्राफर,फुलांच्या पायघड्या,रंगमंच इत्यादी शेकडो बाबी पटापट फायनल झाल्या….त्याची माझ्यावर नजर होतीच… काही तरी डाव सुरू आहे हे ओळखायला त्याला वेळ नाही लागला. पण निश्चित डाव काय हे मात्र मी गुलदस्त्यातच ठेवू शकले.

– क्रमशः भाग पहिला 

शब्दांकन व प्रस्तुती : श्री संभाजी बबन गायके.

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देव तेथेची जाणावा..!!…सुश्री साधना राजहंस टेंभेकर ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ देव तेथेची जाणावा..!!…सुश्री साधना राजहंस टेंभेकर ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

कुठलीही संवेदनशील व्यक्ती एखाद्या अनोळख्या व्यक्तीचं दुःख बघून हळहळते, मनातून खूप दुःखी होते, बराच वेळ त्याचाच विचार करत राहते, कधीकधी थोडीफार आर्थिक मदत करते आणि शेवटी यापलीकडे आपण काय करू शकतो? असा विचार करून दिनक्रमाला लागते… पण काही लोक जात्याच वेगळे असतात….out of the way जाऊन ते पीडीतांसाठी काम करतात… अशा अनेक गोष्टी आपण वाचतो, अचंबित होतो… पण आता मी सांगणार आहे ती घटना आम्ही अगदी जवळून बघितलेली…. तुम्हा सगळ्यांना share करावीशी वाटली…!!

माझा नवरा आणि त्याच्या तीन मित्रांनी नुकतंच भारताच्या पश्चिम टोकापासून पूर्व टोकापर्यंत ( जवळ जवळ ४००० km) cycling च Expedition पूर्ण केलं त्यात घडलेली ही घटना..!! त्या चौघांना, Young Seniors चे काही सहकारी, गुहाटी ला join झालेत.. त्यात पुण्याचे प्रथितयश Maxillofacial and oral surgeon डॉ. दीपक कुलकर्णी हे सुद्धा होते.. एक दिवस (१३ डिसेंबर २०२२) रोजी ह्या सगळ्यांनी लोहित जिल्ह्यातील सनापुरा  येथील विवेकानंद mission च्या शाळेला भेट दिली.. तिथे डॉ. कुलकर्णींना सर्व मुलींमध्ये एक ९-१० वर्षांची मुलगी (तिचं नाव मुस्कान) जरा वेगळी आणि एकटीच बसलेली आढळली… नीट निरखून बघितले तर त्या मुलीची मान पूर्ण वाकडी असलेली आढळली, आणि मानेची नीट हालचाल पण होत नव्हती, त्यामुळे complex येऊन ती मुलगी कुणात मिसळत नसल्याचं कळलं… डॉ. नी अशा केसेस दुरूस्त झालेल्या बघितल्याने, ते प्रिन्सिपॉलना भेटून म्हणाले, ” यावर शस्त्रक्रिया हा उपाय आहे हे मी खात्रीने सांगू शकतो. तुम्ही तिला  गुहाटी किंवा अरुणाचल प्रदेशात चांगल्या डॉ ना दाखवा..” त्यावर प्रिन्सिपॉल म्हणाल्या ,”आम्ही भरपूर ठिकाणीं दाखवलं पण काही उपयोग झाला नाही..” यावर डॉ. नी ताबडतोब उत्तर दिलं की ,”तुम्ही हिला पुण्याला घेऊन आलात तर मी तिथल्या चांगल्या डॉ. कडून हिच्यावर उपचार करवून घेईन , शिवाय तिच्या जाण्यायेण्याच्या, औषध पाण्याच्या खर्चाची तरतूदही करेन.. तुम्ही हिच्या पालकांशी बोलून घ्या “..!! आणि आपला फोन number देऊन डॉ. पुढे मार्गस्थ झाले..!!

त्यानंतर जानेवारी १० पर्यंत प्रिन्सिपॉल मॅडम डॉक्टरांशी  w app वर संपर्कात होत्या… त्यानंतर ४-५ दिवसात  डॉ.ना मुस्कानच्या काकांचा फोन आला.. त्यात ऑपरेशनच्या यशापयशाबद्दल विचारलं ( हे साहजिकच होतं कारण ते इतका खर्च करून येणार होते) डॉ. नी त्यांना आश्वस्त केलं…!! त्यानंतर पुढील एक महिना काहीच घडले नाही… डॉ. ना वाटले त्या लोकांना खात्री वाटली नसेल म्हणून येणार नाहीत …

पण २२ फेब्रुवारीला प्रिन्सिपॉल मॅडमचा फोन आला की मुस्कान आणि तिचे नातेवाईक लवकरच पुण्याला येत आहेत.. त्याप्रमाणे ७ एप्रिलला फक्त एकटे काका आणि ८ एप्रिलला इतर सगळे (मुस्कान आणि तिचे जवळचे नातेवाईक) पुण्यात येऊन धडकले.. डॉ. ना भेटले… डॉ. नी त्यांना ससूनमधील सगळी procedure समजावून सांगून admit करून घेतले… दरम्यान मुस्कानची, प्रसिद्ध शल्यचिकित्सक,डॉ. पराग सहस्रबुद्धे ( prof and head, plastic surgery department) यांचेकडून तपासणी करून, १२ एप्रिल ही तारीख operation साठी ठरवली… ठरल्याप्रमाणे, कुठलेही complication न येता , op व्यवस्थित पार पडले…!!

मुस्कान चे काका एक दिवस आधी फक्त डॉ. ना जोखायला आले होते.. एका अनोळखी मुलीला out of the way जाऊन हे इतकी मदत का करत आहेत हे त्यांच्या आकलनापलीकडचं होतं… त्यांनी नंतर डॉ.कडे कबूल केलं की, “ आम्ही जरा साशंक होतो , पण मग आम्ही विचार केला की, ” जे लोक इतक्या दूर सायकलवर येतात ते नक्कीच चांगल्या मनाचे असायला हवेत, म्हणून आम्ही केवळ तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून, फक्त आवश्यक तपासण्या करायला म्हणून इतक्या लांब आलो आणि तुम्ही आम्हाला चक्क ऑपरेशन करूनच परत पाठवत आहात…!! “

ऑपरेशन नंतर जाग येताच मुस्कानचा पहिला प्रश्न होता,” माझी मान सरळ झाली का? “…. डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी तरळलं…” इतका लहानसा जीव, जन्मापासून हे वेगळेपण आणि समाजाच्या विचित्र  नजरा झेलतच मोठा झालेला… हा सुखद धक्का तिच्या आयुष्यात किती मोठा बदल घडवून आणणार आहे, याची तिला जाणीव तरी असेल का..??

मुस्कान ला discharge मिळाल्यावर डॉ. नी  Young Senior grp शी तिची भेट घडवून आणली… शेवटी या सगळ्या घटनांना जबाबदार YS grp च होता ना..?? (YS grp मधील cyclists नी सुद्धा contribution करून, खारीचा वाटा म्हणून मुस्कानला काही मदत केली )

अगदी वेळेवर ठरून, डॉक्टर दीपक कुलकर्णी, गुहाटीला या चौघांना join होतात काय, मुस्कानला बघून त्यांचं मन द्रवतं काय, ३००० km चा प्रवास करून एक गरीब कुटुंब केवळ त्यांच्यावर विश्वास ठेवून इथे येतं काय आणि वेगाने सगळया घटना घडून मुस्कान ठीक होते काय…. सगळं स्वप्नवत भासत होतं…!!

मुस्कान लवकरच आपल्या घरी परत जाईल… op successful झाले असले तरी जादूची कांडी फिरवल्या सारखी मान एका मिनिटात सरळ होणार नाही… तिला काही महिने पट्टा आणि physiotherapy करावी लागेल… मात्र हळुहळू मान नॉर्मल position ला येणार हे नक्की !!

एका सहृदय माणसाने, आपल्या संवेदनशील मनाची हाक ऐकून ही जी कृती केली, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्याचा हा प्रयास…!!

डॉक्टर दीपक कुलकर्णी तुम्हाला सलाम. —   संत तुकाराम महाराज यांच्या ,” जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले” या अभंगातील “साधू ” किंवा “देव” अजून वेगळा काय असू शकतो.??

लेखिका : साधना राजहंस टेंभेकर, कोथरूड, पुणे

प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ थंड हवेचं ठिकाण –  पुणं — … लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

 ☆ थंड हवेचं ठिकाण –  पुणं — लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

…. होय मंडळी. एकेकाळी पुणं चक्क थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध होतं. मुंबईचे रहिवासी उन्हाळ्यात हवापालट म्हणून पुण्याला येत असत.  खोटं वाटत असेल तर विद्यापीठात चक्कर टाकून या. उगाच नाही ब्रिटिश गव्हर्नरनं एवढा आलिशान राजवाडा बांधला स्वतःसाठी… उन्हाळ्यात मुंबई इलाख्याचा गव्हर्नर मुक्कामाला पुण्यात असायचा. 

पूर्वीचं सोडा. अगदी आपल्या लहानपणीही वाडे होते. त्यातली थंडगार शहाबादी फरशी…. भर उन्हातून सायकल मारत आलं, की बाहेरच्या नळावर हात-पाय वगैरे धुवून सरळ त्या गारेगार शहाबादी फरशीवर आडवं पसरायचं….. माठातलं वाळामिश्रित थंडगार पाणी…. क्वचित पन्हं…. घराबाहेर असलो, तर कुठेतरी रसवंती गृहात बसून मस्त बर्फ टाकलेला उसाचा रस .. नाहीतर रस्त्याच्या कडेला असलेल्या खोकड्यांमध्ये विक्रीला असलेली “निरा” प्यायची. कुठे हातगाडीवर ताडगोळेही विक्रीला असत. एरवी बेचव, गिळगिळीत वाटणारे ते ताडगोळे उन्हाळ्यात मात्र अमृतासमान वाटायचे….. उरलेल्या निरेपासून “हातभट्टीची” बनवतात अशी एक कथाही प्रचलित होती…. खरं खोटं परमेश्वरालाच माहीत….

पूर्वी पुण्यात रस्त्यावर चिंच, वड, पिंपळ असे डेरेदार वृक्ष होते. “रस्तारुंदी” या गोंडस नावाखाली झाडांची बेसुमार कत्तल केली गेली.  ( आणि पुन्हा वाहतुकीचा बोजवारा उडतोच आहे). 

पूर्वी उन्हाळ्यात पुण्यात पाहुण्यांचं स्वागत कैरीचे पन्हं देऊन व्हायचं.  त्यात मस्त वेलची, मिरपूड घालून चटपटीत चव आणलेली असायची. संध्याकाळी सारसबाग, कमला नेहरू पार्क वगैरे ठिकाणी जाऊन भेळ खायची. हापूस आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात होता. लाकडी पॉटमध्ये हँडल फिरवून फिरवून मॅंगो आईस्क्रीम बनवण्याची मजाच काही वेगळी होती.  ( मला वाटतं ही आइस्क्रीम पॉटस् भाड्याने मिळण्याची सोयही काही  ठिकाणी होती ). सारसबागेबाहेर काडी असलेलं “जम्बो आइस्क्रीम”  मिळायचं. शिवाय माझ्या लहानपणी खाऊ म्हणजे “लॉलीपॉप”.-  काठीला लावलेली गोल गोड चकती चाटत बसणं ही एक 

” मेडिटेशन ” होती…..

तेव्हा पुणं सगळ्याच अर्थांनी शांत होतं. सुंदर होतं. रमणीय होतं. कुठच्याही टेकडीवरून खाली पाहिलं की हिरव्यागार झाडीत लपलेलं पुणं दिसायचं. थंडीत तर पुण्यात चक्क धुकं पडायचं. पण पुण्यातला उन्हाळाही सुंदर होता. शहाबादी फरशीवर आडवं लवंडून रेडिओवर “वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा….” “माळ्याच्या मळ्यामंदी कोण गं उभी….” किंवा “ये रे घना ये रे घना…..” 

यासारखी अवीट गोडीची गाणी ऐकत निद्राधीन व्हायचं…. तेव्हा वाड्यांमधल्या काहीशा अंधारलेल्या स्वयंपाक घरांमधून येणारे वरण, मुगाची खिचडी, कांदेपोहे वगैरे वासही अप्रतिम वाटायचे. 

चहाबाज मस्त ब्रूक बॉण्ड, फॅमिली मिक्स्चर, आसाम वगैरे चहा प्यायचे. जवळच्या साने, सावरकर, खन्ना या डेअरीचं म्हशीचं दाट दूध असायचं. त्याच्या विरजणापासून घरीच भरपूर लोणी तूप बनायचं… 

कॉलेजात गेल्यावर अगदीच “मागासलेले” वाटायला नको म्हणून क्वचित कॅम्पमध्ये “मार्झोरिन” मधे जाऊन सॅन्डविच खा, चॉकलेट कुकीज खा, सहजच “कयानी” मधून “श्रूसबेरी” बिस्किटं घेऊन या,  अशा लीला चालायच्या. पण खरी मजा म्हणजे “संतोष” किंवा “हिंदुस्तान” चे पॅटीस…. रविवारी सकाळी नाश्त्याला चहाबरोबर हे पॅटीस खायचे…. रात्री भूक लागली तर “पॅराडाईज”,. “लकी”, किंवा “नाझ” या ठिकाणी क्रीम रोल खायचे….. मंडळी, हे काही नुसतं खाण्याचं वर्णन नाही…. पुणेकर या थोड्या थोड्या गोष्टींवर समाधानी होते… 

लिहिण्याचा उद्देश एवढाच की आता सुबत्ता आली, गाड्या – परदेशप्रवास, हॉटेलिंग… सगळं काही आहे…. 

पण ते साधं पुणं वेगळंच होतं….

ते ज्यानं अनुभवलं, त्यालाच पुणं खरं “कळलं” ….

बाकीचे नुसतेच “पुण्यात राहिले….”

 

लेखक –  अज्ञात 

प्रस्तुती : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ खूप नको …. इतके बास…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

📖 वाचताना वेचलेले 📖

खूप नको …. इतके बास…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

हातामध्ये पुस्तक आहे,

डोळ्यावरती चष्मा आहे,

जवळ भरपूर वेळ आहे,

इतके मला बास आहे !

 

सोबतीला माझ्या मोबाईल आहे,

बोलायला मला मित्र आहेत,

मित्रही माझे खास आहेत,

इतके मला बास आहे !

 

पायामध्ये त्राण आहेत,

छातीमध्ये श्वास आहे,

देहामध्ये प्राण आहे …

हे काय कमी आहे?

इतके मला बास आहे !

 

डोक्यावरती छत आहे,

कष्टाचे दोन पैसे आहेत,

पोटाला दोन घास आहेत,

मला इतके बास आहे !

 

बागेत माझ्या फूल आहे,

फुलाला छान वास आहे,

त्यात ईश्वराचा वास आहे,

आणि ईश्वराचा मला ध्यास आहे,

इतके मला बास आहे !

 

हे ही हवे, ते ही हवे,

असे मी करत नाही,

कशाचाही हव्यास,

मी फार धरत नाही,

जितके मिळाले आहे मला,

तितके मला बास आहे !!!

 

लेखक : अज्ञात

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जागतिक मातृदिन —” ☆ श्री कचरू चांभारे ☆

श्री कचरू चांभारे

? मनमंजुषेतून ?

☆ “जागतिक मातृदिन —” ☆ श्री कचरू चांभारे ☆

दयादातृत्वाला जिथं सीमा नसते तिथे मातृत्व जन्माला येते….. 

 महिन्याचा दुसरा रविवार जागतिक स्तरावर मातृदिन म्हणून साजरा करण्यात येतो. आईसाठी एक दिवस या संकल्पनेतून अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी १९१४ पासून मातृदिनाची सुरुवात केली.त्यापूर्वी ॲना ही सामाजिक कार्यकर्ती आपल्या आईच्या ऋणाचा उतराई होण्याचा भाग म्हणून मातृदिन साजरा करत होती.पुढे हीच संकल्पना रूजली व जगभर पसरली.

आपल्या देशात ‘आई ‘ या भावनेला भावनिक व सांस्कृतिक असे द्विमितिय महत्व असले तरी प्रत्यक्षात आईपण चौफेर व्यापलेलं आहे.  शारीरिक व मानसिक अशा दोन्ही पातळीवर आईचे महत्व आहेच. निसर्गानं सजीवाला स्व-वंश चालविण्यासाठी व टिकविण्यासाठी मातृत्व ही देणगी दिलेली आहे. इतर सजीवांमध्ये फक्त जीव जन्माला घालणं व प्राथमिक स्वरूपाचं संगोपन करणं इथपर्यंतच मातृत्व मर्यादित आहे. याउलट मानवी समूहात जीवाचा जन्म व जन्माला आलेल्या जीवाचं संगोपन अन् सरतेशेवटपर्यंत संगोपन केलेल्या जीवाची काळजी वाहणं हा मातृत्वाचा तहहयात प्रवास आहे. म्हणून मानवी कुळात आई हे नारीचे शरीर नसून ,ती जन्मदात्रीप्रती आजन्म ऋण भावना आहे. कोणत्याही वयात असताना ,ठेचाळलं वा वेदनेने विव्हळणं आलं की मुखातून फक्त आई नामाचाच जयघोष होतो. कारण ‘ आई गं ‘ चा उच्चार हा वेदनेवरचं सर्वात शेवटचं औषध आहे.

बदलत्या काळात आईच्या पदरात बदल झाला असेल, आईच्या राहणीत बदल झाला असेल, काळजीही थोडी डिजिटल झाली असेल, पण आईचं काळीज आजही तेच परंपरागत मायेचं आहे. माता ही कधीच कुमाता नसते या आचंद्रसूर्य कालीन सुभाषिताला तडा देणा-या माता कधीच उदयाला येणार नाहीत .असं सुभाषितकाराचं स्वप्न होतं, पण अगदीच थोड्याफार मातांनी या सुभाषिताला छेद दिला आहे. अशा कुकर्मी मातांचं प्रमाण सागरातलं पसाभर पाणी  सडलेलं निघावं ,इतकं अल्प आहे.

सिंधुताई सपकाळ, संध्याताई /दत्ता बारगजे, दीपक नागरगोजे ,संतोष गर्जे असे कितीतरी समाजसेवक आहेत ,जे भावनिक मातृत्वाचे धनी आहेत. जन्म दिलेल्या बाळाचे संगोपन करणं हे नैसर्गिक मातृत्व आहे पण बहिष्कृत  व वंचित ,अनाथ बालकांचे मातृत्व निभावणं हे  दैवी भावनेतलं मातृत्व आहे. असं मातृत्व निभावण्याचं धाडस फारच कमी लोकांमध्ये असते. मातृ दिनी अशा नरदेही दैवी मानवांना शतदा वंदन करावे.

मातृत्व म्हणजे निर्मळ व निस्वार्थ माया. दया दातृत्वाचा किनारा नसलेला सागर म्हणजे वात्सल्य सिंधू सागर आई. अपार मायेचे दृश्य स्वरूप म्हणजे आई. लाभाच्या अंशाचा लवलेशही मनी न ठेवता,डोळ्यात वात्सल्य व उरात काळजीच्या लाटा पेलाव्यात ;त्या फक्त आईनेच. आई ही शिल्पकार म्हणून श्रेष्ठ आहेच, पण त्याहीपेक्षा ती उत्कृष्ट व्यवस्थापक व नियंत्रक सुद्धा असते. गर्भारपणात जपलेल्या जीवाशी तिची नाळ कधीच तुटत नाही. आईला आई हेच उपमान आहे. तिच्यासारखी तीच – अन्य नाही कोणी.

माझ्या आयुष्याची जडणघडण होताना आईच्या ममतेने मायाममता ,वात्सल्य ,प्रेम ,सहकार्य देणा-या माझ्या रक्तबंधनातील सर्व आप्तांचा ,आई, चुलती ,आत्या, इतर आप्तगण ,संसार रथाची भागीदार पत्नी,  मुली,समाजसेवी आदर्श कृपाछत्री गण, सुखदुःखातले वाटेकरी मित्र-मैत्रिणी, व्यावसायिक सहकारी, गुरूजन ,विद्यार्थी, सेवाभावी क्लबचा परिवार ,पाहिलेले न पाहिलेले असे  सकल मानवजन या सर्वांप्रती आजच्या या दिवशी मी कृतज्ञता व्यक्त करतो.

आपणा सर्वांस जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 

© श्री कचरू सूर्यभान चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आईचा व्हॉट्सॲप… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

आईचा व्हॉट्सॲप… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

चार दिवस झाले होते, मी आईला फोनच केला नव्हता. हिंमतच होत नव्हती माझी, पण कधीतरी कळवावं लागणारच होतं. कारण त्याआधीच बाबांचा फोन आला, तर ते फारच भयंकर होणार होतं. 

आज कळवू, उद्या कळवू म्हणत म्हणत इतके दिवस गेले, आजचाही दिवस गेला होता. अंथरुणावर पडून मी निद्रादेवीची आराधना करत होतो आणि तेवढ्यात व्हॉट्सॲप मेसेज आल्याची वर्दी देणारं पिंग वाजलं. गेले चार दिवस येणाऱ्या प्रत्येक फोनची रिंग आणि प्रत्येक मेसेजचं पिंग माझ्या काळजाचा ठोका चुकवत होतं – न जाणो बाबांचा फोन / मेसेज असला तर ?

पण आत्ता आईचा मेसेज होता.

“झोपला होतास का रे बाळा ?”— या परिस्थितीतही मी स्वतःशीच  खुदकन हसलो. कॉलेजला जाणाऱ्या – हॉस्टेलला रहाणाऱ्या घोड्याला “बाळा” असं फक्त आईच म्हणू शकते. 

“नाही ग, नुकताच पडत होतो.”

“चार दिवस झाले, फोन नाही तुझा, मेसेजही नाही. सगळं ठीक आहे ना रे ?”

” … “

“वाटलंच मला. काय झालं रे ? कुठं प्रेमाबिमात पडलास की काय ?”

“काहीतरी काय, आई ? तुझं आपलं काहीतरीच.”

“मग काय झालंय ? तू मेसेज टाकतोस का मी डायरेक्ट फोन करू ?”

“नाही, नाही. फोन नको करुस.” 

— सगळं आटोपून बाबाही आता झोपायला येत असतील, किंवा already शेजारी झोपलेही असतील. आई माझ्याशी फोनवर बोलत आहे, म्हटल्यावर तेही बोलायला येणार आणि मग नको तो विषय निघणार …नकोच ते. 

“आई, चार दिवसांपूर्वी पहिल्या सेमीस्टरचा रिझल्ट लागला.”

“हं, हं. आणि मग ?”

“आई, मला एका विषयात KT लागली आहे.”

“KT म्हणजे ?”

“KT म्हणजे मी त्या विषयात पास नाही झालो, आई. मी पुढच्या वर्गात जाईन, पण त्या विषयाची पुन्हा परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण व्हावं लागेल.”

— ‘पास नाही झालो’ हे ऐकल्यावर निशब्द होण्याची पाळी आता आईची होती. एका मोठ्ठ्या pause नंतर आईचा मेसेज आला —– 

“काय झालं रे ? विषय अवघड जातोय का ? शिकवलेलं कळत नाहीये का लक्षात रहात नाहीये ?”

“तसं काहीच नाहीये, आई. उगाच मी काहीतरी खोटंनाटं सांगणार नाही की बहाणेबाजी करणार नाही. थोडा अभ्यास कमी पडला आणि मी ओव्हरकॉन्फिडन्समध्ये गेलो हीच खरी कारणं आहेत. पण तू काळजी नको करुस, बघ पुढच्या परीक्षेत याच विषयात अव्वल गुण आणतो की नाही ते ! अगदी तुझी शप्पथ. पण …”

“तू खरं सांगितलंस ते आवडलं मला. उगाच रूममेटला करोना झाला होता, किंवा तुलाच बरं नव्हतं असली सहज पचून जाईल अशी थाप नाही मारलीस तू. तुझी चूक तुला कळली आहे. ती परत करू नकोस. आणि काळजी घेत जा रे स्वतःची. .. आणि तू ‘पण …’ म्हणून वाक्य अर्धवट सोडलंस ते काय ?”

“आई, मी नक्की छान मार्कस् आणेन पुढच्या वेळी, पण, पण तू बाबांना सांभाळून घे. त्यांना काय सांगायचं, कसं सांगायचं, कधी सांगायचं ? मला तर काही सुचतच नाही बघ.”

आईने कसा लगेच विश्वास ठेवला (आता त्याला सार्थ ठरवण्याची जबाबदारी माझी होती म्हणा). बाबा असते तर केवढं लेक्चर झाडलं असतं – परीक्षेचे गुण भविष्यासाठी कसे महत्त्वाचे आहेत, करिअर – वाढती महागाई – खर्च अशी त्यांची प्रवचनाची गाडी पटापटा पुढे सरकत गेली असती. 

पण एक मात्र होतं बाबांचं, कधी – आम्ही किती खस्ता काढला तुमच्यासाठी, कसं पोटाला चिमटा घेऊन तुम्हाला मोठं केलं – वगैरे कॅसेट नाही वाजवायचे ते. बोलायचे ते माझ्यापायीच्या चिंतेनेच बोलायचे, पण त्रास खूप करून घ्यायचे स्वतःलाच. 

आईचं तसं नव्हतं. ती समजून घ्यायची मला. आता कसं तिला सांगितलं होतं, ती घेईल सांभाळून. मी निर्धास्त झालो होतो….. 

“हां, बाबांना मी सांगते, समजावते. ती काळजी नको करुस तू. पण तू काळजी घेत जा. हे असं चार चार दिवस फोन केल्याशिवाय रहात जाऊ नकोस. चल, झोप आता.”

मी फोन ठेवला, आणि पटकन झोपी गेलो.

— —

“काय हो, झोप येत नाहीये का ? आणि माझ्या फोनशी काय करताय ?” आई बाबांना विचारत होती. 

“अरे तू जागी झालीस वाटतं ? कुठं काय, गजर लावत होतो.” 

— बाबा खोटं बोलले. लेकाचा चार दिवस फोन नाही आला तर केवढी कावरीबावरी झाली होती ती, नाही नाही ते विचार येत होते तिच्या मनात. पण फोन लावायला घाबरत होती. 

बरं, हे महाशय बापाशी स्वतःहून बोलतील तर शपथ. बाप म्हणजे कर्दनकाळ अशीच त्यांची समजूत. 

हे मेसेजचं बरं असतं. कोण टाईप करतंय कळत नाही. 

बाबा स्वतःशीच हसले, लेकाच्या रिझल्टबद्दल उद्या आईची समजूत काढावी लागणार होती, त्याचं प्लॅनिंग करत तेही निद्रादेवीच्या अधीन झाले….. 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दुखावणारी माणसं ! – सुश्री यशश्री भिडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

??

☆  दुखावणारी माणसं ! – सुश्री यशश्री भिडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

काल एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम संपल्यावर बाहेर पडताना थोडा अंधार होता. प्रत्येकजण आपापलं जेवण आटपून बाहेर पडत होता. तेवढ्यात एका व्यक्तीला एका प्रथितयश डॉक्टरांनी हाक मारून म्हटलं “अरे बाहेर अंधार आहे रे, सांभाळून ! बाहेरच्या काळोखासारखा असलेला तुझा चेहरा कुणाला दिसला नाही, तर आपटेल कुणीतरी तुझ्यावर !”

त्या व्यक्तीचा चेहरा एकदम पडला. चारचौघात त्याच्या रंगावरून बोलल्यामुळे मनातून खूप दुखावला गेला असावा ! काय मिळतं अशा कॉमेंट्स करून लोकांना काय माहित!!

एखाद्याच्या व्यंगावर हसणारे लोक पहिले की कीव येते अगदी त्यांची ! बरं, ही माणसे स्वतः अगदी सर्वगुणसंपन्न असतात असंही नाही. पण ते ज्या पद्धतीने दुसऱ्याच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवतात ना ते पाहिलं कि चिडचिड होते अगदी !!

ही अश्या प्रकारची माणसं. समोरच्याच्या मनाचा कधीही विचार करत नाहीत, आणि बोलून झालं की आपण काहीतरी फारच भारी काम केल्यासारखं स्वतःवर खुश होऊन हसत असतात, आणि ज्याला ऐकावं लागतं तो मात्र बिचारा खजील होतोच आणि स्वतःचा आत्मविश्वासही गमावून बसतो.

लहान मुलांना पटकन त्यांच्यातला दोष दाखवण्यात ह्या प्रकारची माणसं अगदी पटाईत असतात. एकदा मी आणि माझी लेक एका ठिकाणी गेले होते. एक ओळखीच्या बाई आपल्या नातीला घेऊन आलेल्या तिथे…. ‘कुठे असतेस, काय करतेस’ अशा जुजबी चौकश्या झाल्यावर माझ्या लेकीकडे बघून म्हणाल्या “अगंबाई, दातांची वेडीवाकडी ठेवण अगदी आईची घेतलेली दिसत्ये !” 

त्या बाई सावळ्या होत्या तशीच त्यांची नातही सावळी दिसत होती. म्हणून मी लगेच म्हटलं “होय, खरंय तुमचं, काही मुलं आईची वाकड्या दातांची ठेवण घेतात आणि काही मुलं थेट आजीचाच रंग घेतात हो !” माझ्या बोलण्याचा रोख कळला त्या बाईंना ! राग येऊन निघून गेल्या तिथून!! बहुतेक परत कुणाला बोलणार नाहीत!!

ह्या वृत्तीची माणसं फक्त दुसऱ्याच्या व्यंगावरच बोट ठेवतात असं नाही, तर त्याची एखादी दुखरी नस माहित असेल तर अगदी आठवणीने तो विषय काढून बोलणारच. माहित असतं बरं का ह्या लोकांना कि, समोरच्या माणसाचा मुलगा काहीही न करता घरी बसलेला आहे, तरी विचारणार, “असतो कुठे हल्ली ? दिसला नाही बरेच दिवसात ! म्हटलं मोठ्ठी नोकरी लागलेली दिसत्ये !” हे ऐकून आधीच काळजीत असलेली ती माउली अजूनच दुःखी होते.

लग्न लवकर न ठरलेल्या, मूल लवकर न होणाऱ्या, परीक्षेत, व्यवसायात सतत अपयश येणाऱ्यांना तर ह्या विशिष्ट प्रकारची माणसं अगदी नको करून सोडतात !

रस्त्यात, समारंभात अगदी भाजी घेताना भेटलो आणि वेळ मिळाला तर तिथेसुद्धा तुम्हाला दुखावल्याशिवाय  ही माणसं सोडत नाहीत !! आणि सगळ्यात जास्त वेळा टोमण्यांचा, चेष्टेचा सामना करावा लागतो तो माझ्यासारख्या जाडजूड माणसांना !!

फिट असावं आणि दिसावं असं कुणाला वाटत नाही? कुणालाही आपण बेगडी, कुरूप दिसावं असं वाटत नसतंच मुळी ! प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. पण शेवटी सगळंच काही आपल्या हातात नसतं ना! 

माझ्यासारख्या जाड व्यक्तींना ऐकवले जाणारे कॉमन डायलॉग कोणते माहित्ये ? “हळू, हळू, खुर्ची मोडेल, बापरे भूकंप झाला कि काय, समोर बघून चाल, तुला काही नाही होणार ती गाडी मोडेल, घसरू नको, रस्त्यात खड्डा पडेल मोठा, जरा कमी जेव किंवा खा एखादी पुरी, काही नाही होणार १०० ग्रॅम वाढून सागराला काय फरक पडेल ?…” इ.इ.

कुणी अति बारीक असेल तर “फु केलं तरी उडशील, नुसती काठी असून काय उपयोग ! ताकद नको ?” इ इ. 

हे सगळं जे बोलत असतात त्यांच्या आरोग्याची खरं तर बोंब असते. फिगर छान असते, पण गुढघे दुखत असतात, मणके दुखत असतात, जराशा कामाने दमायला होत असतं, पण हे सगळं दिसत नसतं. 

दुसऱ्याला मूल होत नाही म्हणून त्यांना बोलणाऱ्यांची मुले जे दिवे लावत असतात, त्याचा प्रकाश त्यांना नंतर दिसणार असतो. परीक्षेत अपयश मिळणाऱ्या मुलांना बोलणाऱ्यांची स्वतः कधी शाळेत सुद्धा विशेष प्राविण्य मिळवलेलं नसतं. पण… बोलायचं… टोचायचं काम ही माणसं मनापासून करत असतात आणि त्यात त्यांना आनंद मिळत असतो हे विशेष !!

माझी चिपळूणची आजी (आईची आई ) नेहमी दासबोधातले दाखले द्यायची. तिचं वाचन आणि अभ्यास प्रचंड होता ह्या विषयावरचा. आमच्या एकदा गप्पा चालू होत्या तेव्हा ती म्हणाली “समर्थानी सांगितलेलं आहे, तसं वागावं म्हणजे काय तर ‘नाठाळाचे माथी हाणू काठी’ स्वतःहून कुणाला व्यंग दाखवून दुखावू नये, पण आपलं व्यंग काढून आपल्याला कुणी दुखावलं तर त्याचं व्यंग दाखवल्याशिवाय त्याला सोडू नये. ज्याचं त्याचं माप त्याच्या पदरात घालायचं. आपलं व्यंग दाखवलं म्हणून दुःखी व्हायचं नाही, उलट समोरच्याची कीव करून त्याला देव सद्बुद्धी देवो म्हणायचं…!

लेखिका : सुश्री यशश्री भिडे

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अवघे ८५ वयमान… ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

??

☆ अवघे ८५ वयमान… ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी

मला अजूनही आठवतोय आईंचा त्या दिवशीचा चेहेरा ! चेहऱ्यावरील प्रसन्नता आणि मनात न मावणारा आनंद !!

आई, म्हणजे माझ्या  सासूबाई, “विद्यावती गजानन जोशी.”आणि सासरे म्हणजेच आप्पा,मला पहायला (वधुपरिक्षा) आमच्या घरी आले होते .जेवढी भीती कुणाही मुलीला वाटेल, त्यापेक्षा कितीतरी अधिक मला वाटत होती. कारण लग्न करण्याचं आमच्या दोघांचं पक्क ठरलं होत. पण जर सासू सासऱ्यांनी नकार दिला तर…? हा विचारच भयंकर होता. पण आईंच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यातली पसंती यामुळं मन थोडं सुखावलं होतं. भीतीचा भार कमी झाला होता.

सासऱ्यांची मात्र नखशिखांत भीती वाटत होती. ते खूप कसून आणि कठोर परीक्षा घेण्याचा नजरेने बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील रेषही हलत नव्हती. उसासा कधी टाकावा,असा जीव टांगणीला लागला होता.

तशात आई सहजपणे बोलून गेल्या, ” पहिली लक्ष्मी पाहिली, तिला नाट नाही लावायचा “. 

त्या माझ्याबद्दलच बोलत होत्या हे कळलं. कारण ह्यांनी माझ्या आधी कुठलीच मुलगी पाहिली नव्हती. सासऱ्यांचं मन कळत नसलं तरी एक मार्ग तर खुला झाला होता. त्यामुळे दुसरा मार्ग खुला होण्याची आशा होती….. तर अशा आई !

साध्या, सरळ, सहज पण ठामपणे आपलं म्हणणं मांडणाऱ्या. नजरेने, शब्दाने, आपली पसंती आणि नापसंतीही दर्शविणाऱ्या.

लग्न ठरल्यानंतर ते होईपर्यंत सहा महिन्यांचा अवधी होता. त्या दरम्यान आईंनी मला पत्रही लिहिलं होतं. अगदी प्रेमानं ओथंबलेलं. लाडू वगैरे खाऊ पण पाठवायच्या माझ्यासाठी. अजून काय हवं?

मी दोन अडीच वर्षांची असताना माझी आई गेली. ती उणीव भरून निघाली आईंच्या रूपाने.

जुन्या काळाप्रमाणे आईंचं आयुष्यही कष्टाचंच होत. रोज सोवळ्यात स्वयंपाक, देवदर्शन, रूढी परंपरा, कर्मकांड सारं नेकीनं करणाऱ्या. माहेरी आमच्या घरी सुधारकी वळण. आईंनी त्यांच्या परीने सासरच्या रीतीभाती मला समजावून सांगितल्या. पण कधी जाच जबरदस्ती नाही केली कशाची.

साऱ्या आयुष्यभर घरादारासाठी, शेजाऱ्या पाजाऱ्यांसाठी, नातेवाईकांसाठी अपार कष्ट केले. पण कधी तक्रार म्हणून नाही. ‘ स्वत:साठी काही हवं ‘ हे तर अगदी जाणीवेपलीकडेच असायचं त्यांच्या. पण सतत करत रहाणं हे मात्र कर्तव्य बुध्दीत घट्ट रोवलेले.

तशा मितभाषी असल्या तरी, प्रसंगी “सौ सुनारकी,एक लोहारकी. ” असं असायचं त्यांचं कधीकधी. बोलता बोलता काही म्हणी सडेतोड वापरायच्या. उदा. पोळी केलेली असताना कोणी भाकरी मागितली तर “.असेल ते नासवा नसेल ते भेटवा “. किंवा खूप कपडे असून कोणी वाईट कपडे घातले तर “ सतरा लुगडे,भागुबाई तुझे ….. उघडे.”

बाहेरच्या कोणासमोर खायला दिलेलं त्यांना अजिबात आवडत नसे. म्हणत, *पदरच खावं, नजरचं नाही.* 

“ दिवस सरला की मागचं मागं टाकून आल्या दिवसाला सामोरे जायचं. ” असं जगण्याचं त्यांचं रोकडं तत्वज्ञान होत. जे बोलायच्या तसंच वागायच्या.

अत्यंत संयमी, कर्तव्यतत्पर निर्धारित जीवन त्या जगल्या. अनेक दुःख झेलली, पचवली, पण मोडून पडल्या नाहीत. कोणाच्याच दुःखावरची खपली न काढता आयुष्यात सामावून जाणं हाच त्यांचा वसा होता.

आप्पांच्या निधनाचं दुःखही त्यांनी खंबीरपणे पचवलं. आपलं दुःख उगाळून इतरांच्या आनंदावर कधी विरजण घातलं नाही. वयाची ८५ वर्ष झाली तरी सहासहा, सातसात तास वाचन करायच्या. रोज गीतेचे अठरा अध्याय वाचायच्या.

८५ वर्षांचं अवघं जीवन असं कष्टातून वेचलं. वयोमानपरत्वे डोळ्यासमोर नसणाऱ्या मुलांच्या, नातवंडांच्या आठवणीने सैरभैर होतं. कातर होतं. तरी पुन्हा स्वत:च स्वत:चं बोट धरून समजावल्यासारखं  गीता वाचनात स्वत:ला मग्न ठेवत.

त्यांचं जीवन म्हणजे आदर्श स्त्री-जीवनाचा  वस्तुपाठच होता.

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print