श्री कचरू चांभारे

? मनमंजुषेतून ?

☆ “जागतिक मातृदिन —” ☆ श्री कचरू चांभारे ☆

दयादातृत्वाला जिथं सीमा नसते तिथे मातृत्व जन्माला येते….. 

 महिन्याचा दुसरा रविवार जागतिक स्तरावर मातृदिन म्हणून साजरा करण्यात येतो. आईसाठी एक दिवस या संकल्पनेतून अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी १९१४ पासून मातृदिनाची सुरुवात केली.त्यापूर्वी ॲना ही सामाजिक कार्यकर्ती आपल्या आईच्या ऋणाचा उतराई होण्याचा भाग म्हणून मातृदिन साजरा करत होती.पुढे हीच संकल्पना रूजली व जगभर पसरली.

आपल्या देशात ‘आई ‘ या भावनेला भावनिक व सांस्कृतिक असे द्विमितिय महत्व असले तरी प्रत्यक्षात आईपण चौफेर व्यापलेलं आहे.  शारीरिक व मानसिक अशा दोन्ही पातळीवर आईचे महत्व आहेच. निसर्गानं सजीवाला स्व-वंश चालविण्यासाठी व टिकविण्यासाठी मातृत्व ही देणगी दिलेली आहे. इतर सजीवांमध्ये फक्त जीव जन्माला घालणं व प्राथमिक स्वरूपाचं संगोपन करणं इथपर्यंतच मातृत्व मर्यादित आहे. याउलट मानवी समूहात जीवाचा जन्म व जन्माला आलेल्या जीवाचं संगोपन अन् सरतेशेवटपर्यंत संगोपन केलेल्या जीवाची काळजी वाहणं हा मातृत्वाचा तहहयात प्रवास आहे. म्हणून मानवी कुळात आई हे नारीचे शरीर नसून ,ती जन्मदात्रीप्रती आजन्म ऋण भावना आहे. कोणत्याही वयात असताना ,ठेचाळलं वा वेदनेने विव्हळणं आलं की मुखातून फक्त आई नामाचाच जयघोष होतो. कारण ‘ आई गं ‘ चा उच्चार हा वेदनेवरचं सर्वात शेवटचं औषध आहे.

बदलत्या काळात आईच्या पदरात बदल झाला असेल, आईच्या राहणीत बदल झाला असेल, काळजीही थोडी डिजिटल झाली असेल, पण आईचं काळीज आजही तेच परंपरागत मायेचं आहे. माता ही कधीच कुमाता नसते या आचंद्रसूर्य कालीन सुभाषिताला तडा देणा-या माता कधीच उदयाला येणार नाहीत .असं सुभाषितकाराचं स्वप्न होतं, पण अगदीच थोड्याफार मातांनी या सुभाषिताला छेद दिला आहे. अशा कुकर्मी मातांचं प्रमाण सागरातलं पसाभर पाणी  सडलेलं निघावं ,इतकं अल्प आहे.

सिंधुताई सपकाळ, संध्याताई /दत्ता बारगजे, दीपक नागरगोजे ,संतोष गर्जे असे कितीतरी समाजसेवक आहेत ,जे भावनिक मातृत्वाचे धनी आहेत. जन्म दिलेल्या बाळाचे संगोपन करणं हे नैसर्गिक मातृत्व आहे पण बहिष्कृत  व वंचित ,अनाथ बालकांचे मातृत्व निभावणं हे  दैवी भावनेतलं मातृत्व आहे. असं मातृत्व निभावण्याचं धाडस फारच कमी लोकांमध्ये असते. मातृ दिनी अशा नरदेही दैवी मानवांना शतदा वंदन करावे.

मातृत्व म्हणजे निर्मळ व निस्वार्थ माया. दया दातृत्वाचा किनारा नसलेला सागर म्हणजे वात्सल्य सिंधू सागर आई. अपार मायेचे दृश्य स्वरूप म्हणजे आई. लाभाच्या अंशाचा लवलेशही मनी न ठेवता,डोळ्यात वात्सल्य व उरात काळजीच्या लाटा पेलाव्यात ;त्या फक्त आईनेच. आई ही शिल्पकार म्हणून श्रेष्ठ आहेच, पण त्याहीपेक्षा ती उत्कृष्ट व्यवस्थापक व नियंत्रक सुद्धा असते. गर्भारपणात जपलेल्या जीवाशी तिची नाळ कधीच तुटत नाही. आईला आई हेच उपमान आहे. तिच्यासारखी तीच – अन्य नाही कोणी.

माझ्या आयुष्याची जडणघडण होताना आईच्या ममतेने मायाममता ,वात्सल्य ,प्रेम ,सहकार्य देणा-या माझ्या रक्तबंधनातील सर्व आप्तांचा ,आई, चुलती ,आत्या, इतर आप्तगण ,संसार रथाची भागीदार पत्नी,  मुली,समाजसेवी आदर्श कृपाछत्री गण, सुखदुःखातले वाटेकरी मित्र-मैत्रिणी, व्यावसायिक सहकारी, गुरूजन ,विद्यार्थी, सेवाभावी क्लबचा परिवार ,पाहिलेले न पाहिलेले असे  सकल मानवजन या सर्वांप्रती आजच्या या दिवशी मी कृतज्ञता व्यक्त करतो.

आपणा सर्वांस जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 

© श्री कचरू सूर्यभान चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments