सुश्री शांभवी मंगेश जोशी

??

☆ अवघे ८५ वयमान… ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी

मला अजूनही आठवतोय आईंचा त्या दिवशीचा चेहेरा ! चेहऱ्यावरील प्रसन्नता आणि मनात न मावणारा आनंद !!

आई, म्हणजे माझ्या  सासूबाई, “विद्यावती गजानन जोशी.”आणि सासरे म्हणजेच आप्पा,मला पहायला (वधुपरिक्षा) आमच्या घरी आले होते .जेवढी भीती कुणाही मुलीला वाटेल, त्यापेक्षा कितीतरी अधिक मला वाटत होती. कारण लग्न करण्याचं आमच्या दोघांचं पक्क ठरलं होत. पण जर सासू सासऱ्यांनी नकार दिला तर…? हा विचारच भयंकर होता. पण आईंच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यातली पसंती यामुळं मन थोडं सुखावलं होतं. भीतीचा भार कमी झाला होता.

सासऱ्यांची मात्र नखशिखांत भीती वाटत होती. ते खूप कसून आणि कठोर परीक्षा घेण्याचा नजरेने बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील रेषही हलत नव्हती. उसासा कधी टाकावा,असा जीव टांगणीला लागला होता.

तशात आई सहजपणे बोलून गेल्या, ” पहिली लक्ष्मी पाहिली, तिला नाट नाही लावायचा “. 

त्या माझ्याबद्दलच बोलत होत्या हे कळलं. कारण ह्यांनी माझ्या आधी कुठलीच मुलगी पाहिली नव्हती. सासऱ्यांचं मन कळत नसलं तरी एक मार्ग तर खुला झाला होता. त्यामुळे दुसरा मार्ग खुला होण्याची आशा होती….. तर अशा आई !

साध्या, सरळ, सहज पण ठामपणे आपलं म्हणणं मांडणाऱ्या. नजरेने, शब्दाने, आपली पसंती आणि नापसंतीही दर्शविणाऱ्या.

लग्न ठरल्यानंतर ते होईपर्यंत सहा महिन्यांचा अवधी होता. त्या दरम्यान आईंनी मला पत्रही लिहिलं होतं. अगदी प्रेमानं ओथंबलेलं. लाडू वगैरे खाऊ पण पाठवायच्या माझ्यासाठी. अजून काय हवं?

मी दोन अडीच वर्षांची असताना माझी आई गेली. ती उणीव भरून निघाली आईंच्या रूपाने.

जुन्या काळाप्रमाणे आईंचं आयुष्यही कष्टाचंच होत. रोज सोवळ्यात स्वयंपाक, देवदर्शन, रूढी परंपरा, कर्मकांड सारं नेकीनं करणाऱ्या. माहेरी आमच्या घरी सुधारकी वळण. आईंनी त्यांच्या परीने सासरच्या रीतीभाती मला समजावून सांगितल्या. पण कधी जाच जबरदस्ती नाही केली कशाची.

साऱ्या आयुष्यभर घरादारासाठी, शेजाऱ्या पाजाऱ्यांसाठी, नातेवाईकांसाठी अपार कष्ट केले. पण कधी तक्रार म्हणून नाही. ‘ स्वत:साठी काही हवं ‘ हे तर अगदी जाणीवेपलीकडेच असायचं त्यांच्या. पण सतत करत रहाणं हे मात्र कर्तव्य बुध्दीत घट्ट रोवलेले.

तशा मितभाषी असल्या तरी, प्रसंगी “सौ सुनारकी,एक लोहारकी. ” असं असायचं त्यांचं कधीकधी. बोलता बोलता काही म्हणी सडेतोड वापरायच्या. उदा. पोळी केलेली असताना कोणी भाकरी मागितली तर “.असेल ते नासवा नसेल ते भेटवा “. किंवा खूप कपडे असून कोणी वाईट कपडे घातले तर “ सतरा लुगडे,भागुबाई तुझे ….. उघडे.”

बाहेरच्या कोणासमोर खायला दिलेलं त्यांना अजिबात आवडत नसे. म्हणत, *पदरच खावं, नजरचं नाही.* 

“ दिवस सरला की मागचं मागं टाकून आल्या दिवसाला सामोरे जायचं. ” असं जगण्याचं त्यांचं रोकडं तत्वज्ञान होत. जे बोलायच्या तसंच वागायच्या.

अत्यंत संयमी, कर्तव्यतत्पर निर्धारित जीवन त्या जगल्या. अनेक दुःख झेलली, पचवली, पण मोडून पडल्या नाहीत. कोणाच्याच दुःखावरची खपली न काढता आयुष्यात सामावून जाणं हाच त्यांचा वसा होता.

आप्पांच्या निधनाचं दुःखही त्यांनी खंबीरपणे पचवलं. आपलं दुःख उगाळून इतरांच्या आनंदावर कधी विरजण घातलं नाही. वयाची ८५ वर्ष झाली तरी सहासहा, सातसात तास वाचन करायच्या. रोज गीतेचे अठरा अध्याय वाचायच्या.

८५ वर्षांचं अवघं जीवन असं कष्टातून वेचलं. वयोमानपरत्वे डोळ्यासमोर नसणाऱ्या मुलांच्या, नातवंडांच्या आठवणीने सैरभैर होतं. कातर होतं. तरी पुन्हा स्वत:च स्वत:चं बोट धरून समजावल्यासारखं  गीता वाचनात स्वत:ला मग्न ठेवत.

त्यांचं जीवन म्हणजे आदर्श स्त्री-जीवनाचा  वस्तुपाठच होता.

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments