मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘सोबत…’ – भाग – 1 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सोबत…’ – भाग – 1 ☆ श्री आनंदहरी 

सारिका मॅडमना अपघात झाल्याचा फोन हॉस्पिटलमधून ऑफिसच्या फोनवर आला आणि ती बातमी एका क्षणात ऑफिसभर झाली. सगळ्यांनाच धक्का बसला. सारे ऑफिस त्यांना भेटायला, बघायला हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा काही वेळापूर्वीच मॅडमना तिथं आणलं होतं. त्यांना वेदना कमी  व्हाव्यात म्हणून पेनकिलर इंजेक्ट करण्यात आलं होतं.अजून तपासणी चालू असल्याचं समजलं. ‘ अपघात कसा झाला ?  किती लागलंय ? ‘ याची चौकशी ऑफिसमधल्या काही जणांनी केली .एकदोन जणं डॉक्टरना भेटून आले होते.मॅडमना स्ट्रेचर वरून एक्स-रे काढण्यासाठी नेत असताना धीर देऊन, ‘ काहीही लागलं सवरलं तर फोन करा आणि महत्वाचं म्हणजे कसलीही काळजी न करता लवकर बऱ्या व्हा.’ असे सांगून, सगळे निघून गेले

मॅडमनी सगळ्यांना पाहिलं पण त्यांच्यात दिगंत नव्हता. त्याही स्थितीत, ‘ दिगंत कसा नाही आला ?’ हा प्रश्न त्यांच्या मनात येऊन गेलाच.एक्स-रे काढून झाल्यावर त्यांना स्ट्रेचरवरूनच रुमकडे नेत असताना मध्येच एका सिस्टरने विचारलं ,

“ घरचं, नातेवाईक कुणी आलंय काय?”

त्या नकारार्थी मान हलवत असतानाच, त्यांच्या कानावर ‘ हो. मी आहे.’ असा आवाज आला. ‘ दिगंतss?’त्यांनी आश्चर्यानं स्वतःशीच पुटपुटत आवाजाच्या रोखाने पाहिलं. दिगंत त्यांच्याकडेच येत होता.त्यानं हसून त्यांच्याकडे पाहिलं. त्या त्याच्याकडे बघतच राहिल्या.

“ ओके. तुम्ही जरा सरांना भेटून या.”

सिस्टरने डॉक्टरांच्या केबिनकडे बोट दाखवत दिगंतला सांगितलं.

दिगंत मॅडमांचा हात हातात घेत,’ काळजी नका करू. मी आहे आता इथं.’ असे त्यांना म्हणून डॉक्टरांच्या केबिनकडे निघून गेला.

मॅडमना झालेला अपघात किती गंभीर आहे ते त्याला डॉक्टरना भेटल्यावरच समजलं आणि त्याला धक्काच बसला. मॅडमना पाहिलं त्यावेळी त्याला तेवढं काही जाणवलं नव्हतं पण वास्तव समोर आलं होतं. सम्पूर्ण परावलंबीत्व तेही वर्ष – दोन वर्षा चा काळ ?  जीवावरचे  पायावर निभावले होते हे खरं … पण असे? मनातून विचार जात नव्हते.

मॅडम महिनाभर हॉस्पिटलमध्ये होत्या. दिगंत चोवीस तास त्यांच्या सोबत होता. तीन दिवसानंतर जेव्हा मॅडमना सारे कळालं तेव्हा त्यांना बसलेल्या धक्क्यातून सावरायला,त्यांना धीर द्यायला तोच होता. त्यासाठीची त्यांची मानसिक तयारी त्यानेच करून घेतली होती.तेवढया काळात चार मेजर ऑपरेशन्स झाली होती.

मॅडमना एकदा वाटलं की घरी कळवावे… पण गेल्या दहा वर्षात धडधाकट असताना ज्यांनी साधं जिवन्त आहे का नाही याची चौकशीही केली नाही त्यांना काय आणि कशासाठी कळवायचं ? साऱ्या कटू आठवणींनी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. दिगंत तिथंच होता.

“ आज अचानक अवेळी पाऊस कसा काय आला बुवा ?”

“  कुठाय ?”

दिगंतच्या प्रश्नानं डोळ्यातलं पाणी पुसता पुसता खिडकीतून बाहेर बघत त्यांनी विचारलं.

“ हा काय इथं ?”

त्याचा रोख लक्षात येऊन मॅडम म्लान हसल्या.

“ तुम्ही ऑफिसला ….”

विचारावं कि नको असं वाटून मॅडमनी प्रश्न अर्ध्यातच सोडला.

“ जाणार ना. डिस्चार्ज होऊन घरी गेल्यावर.”

“ अहो, पण…. “

त्यांना बोलावं असं वाटलं पण तो त्याच्या निर्णयाशी ठाम आहे हे जाणवल्याने त्या काही बोलल्या नाहीत. नाही म्हणलं तरी त्यांना दिगंतचा खूप आधार वाटत होताच. तो नसता तर आपण एकट्या काय करू शकणार होतो ? हा प्रश्न अनेकदा त्यांच्या मनात यायचाच. आणि त्यावेळी दिगंत देवासारखा धावून आलाय असे त्यांना वाटायचं.

तो स्वतःबद्दल काहीच बोलायचं नाही पण इतर विषयांवर खूप बोलायचा, गप्पा मारायचा, इतका कि कधी कधी त्यांना प्रश्न पडायचा , ‘आपण ऑफिसमध्ये पाहतो तोच हा दिगंत आहे की दुसरं कुणी?’ पण त्याच्या असण्याने त्यांचा वेळ छान जायचा.

हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला. खरं म्हणायचं तर तात्पुरता डिस्चार्ज. पुन्हा काही ऑपरेशन्स होणार होती. त्यासाठी यावं लागणार होतं. व्हीलचेअर वरुन गाडीत आणि गाडीतून व्हीलचेअर वरून घरात असा प्रवास करून त्या घरात आल्या. या प्रवासात सोबत दिगंत होता पण पुढे काय? हा प्रश्न मॅडमना मनोमन सतावत होता. घरी आल्यावर दिगंतने त्यांना उचलून बेडवर ठेवलं तेव्हा त्यांना कसंतरीच झालं. दिगंतला ते न बोलताही जाणवलं.

“मॅडम, रिलॅक्स. काहीही विचार न करता आराम करायचा.मी आता दोघांसाठी चहा करतो छानपैकी. मला चांगला चहा करता येतो बरं का? “

तो हसून म्हणाला आणि कुणाला तरी फोन करून चहा करायला किचनमध्ये गेला. त्याने आणलेला चहा मॅडमना काहीसं बसतं करून दिला आणि नंतर शेजारी खुर्ची ओढून चहा पिऊ लागला तेवढ्यात एक पन्नाशीच्या बाई आल्या.

“ आलात? बरे झालं. मॅडम ,या निर्मलाताई. सकाळी सहा पासून संध्याकाळी सहा पर्यंत इथं असतील.दोन्ही वेळचा स्वयंपाक करतील आणि तुमचं स्पंजिंग वगैरे सगळं करतील. आता तुम्ही आराम करा. ताई हे पैसे ठेवा. घरात काय काय आहे ते ठाऊक नाही. काही हवं असेल तर ते आणा. मी आता संध्याकाळी येतो. मॅडम, मी येऊ का ? आता काहीही विचार न करता आराम करा.”

तो सगळी व्यवस्था लावून निघून गेला. मॅडम त्याच्याकडे पाहतच राहिल्या. तो निघून गेला आणि त्यांचं मन दिगंतचाच विचार करत बसले. खूप दिवसापूर्वी ऑफिसमध्ये असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली होती तो प्रसंग त्यांना आठवला.

क्रमशः… 

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ त्या दोघी… लेखिका – सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? जीवनरंग ?

☆ त्या दोघी… लेखिका – सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆

घरचं पटापटा आटपून रेखा कामावर पोहोचली. आज घरी अक्षय्य तृतीयेच्या सणाचा पुरणाचा स्वैपाक होता. शिवाय रोजची कामं होतीच.

कामावरून वेळेवर येऊन आज खरेदीला जायचं होतं. थोरलीचं लग्न पंधरा दिवसांवर येऊन ठेपलं होतं. कपडे, रुखवताची भांडी, सगळ्या सगळ्याची खरेदी अजून राहिली होती. अक्षय्यतृतीयेच्या आजच्या चांगल्या मुहूर्तावर करण्याचं ठरलं होतं.

गावातच राहणारे दीर-जाऊ, शेजारच्या गावातली नणंद खरेदीसाठी येणार होते म्हणून तिला आज जास्तच स्वयंपाक करावा लागला होता.

पहाटे चारलाच उठून तिनं किलोभर पुरण शिजवलं. कटाची आमटी, भात, वांग्याची भाजी, कोशिंबीर, पुरणाच्या पोळ्या नि भजीपापड रांधून ठेवलं नि नऊ वाजताच ती कामावर हजर झाली.

कामावरही आज पुरणाचा स्वयंपाक असणार हे डोक्यात ठेऊन ती लगलगा चालत बंगल्यावर पोहोचली. बंगल्याची झाडपूस तिनं उरकली. मॅडमना स्वयंपाकाचं विचारलं.. आमरस पुरीचा बेत त्यांनी तिला सांगितला तसं तिने मनातून हुश्श केलं..

आमरस, पु-या, कुर्मा, पुलाव नि आंब्याची डाळ असा सुटसुटीत बेत होता. दोन तासांत सगळा स्वयंपाक आवरून तिला घरी जाता येणार होतं.

तिने पु-यांची कणिक मळली.

मोठाले पिकलेले हापूसचे पिवळेधम्म  आंबे पाण्यात टाकले. आता ती भाज्या चिरायला बसली.. एवढ्यात  दारावरची बेल वाजली. ती दार उघडण्यासाठी उठली..

रेखा एकदा बंगल्यावर आली की ही सगळी कामे तिलाच करावी लागत. या घरात कामाला लागून तिला नाही म्हटलं तरी बारा- पंधरा वर्षं झाली होती.

ती कामाला लागली तेंव्हा हे सधन घर पैशांप्रमाणेच माणसांनी भरलेलं होतं. सर, मॅडम, सरांचे आई-वडील आणि दोन मुले असं गोकुळ नांदत होतं. अचानक हार्टऐटॅकने आजोबा वारले. त्यानंतर दोनच वर्षांनी आजी  कॅन्सरचं निमित्त होऊन आजोबांपाठोपाठ निघून गेल्या..

आधी मुलगा नि नंतर मुलगी शिक्षणासाठी परदेशात रवाना झाले.

त्यांची शिक्षणं झाली नि नोकरी पकडून ते दोघे आता तिथेच स्थायिक झाले होते..

रेखाच्या मुलीचं लग्न ठरलं तेंव्हाच नेमकं नेहाचं, म्हणजे मॅडमच्या मुलीचं लग्न ठरलं.. ठरलं म्हणजे तिनेच जमवलं होतं. तिच्याच ऑफिसात तिच्याबरोबर काम करणारा मुलगा होता. परदेशात काम करत असला तरी मुळचा भारतीयच  होता..

चार महिन्यांपूर्वी भारतातच बंगल्यावर साखरपुड्याचा कार्यक्रम धुमधडाक्यात झाला होता..

तेंव्हा पुन्हा एकदा घराचं गोकुळ झालं होतं. सहा महिन्यांनंतर महाबळेश्वरमधे मोठ्या पंचतारांकित हॉटेलात लग्न होणार होतं..

रेखाने दार उघडलं. सर आले होते. हातात लाल रंगाची दागिन्याची नवीकोरी पेटी होती..

रेखा पुन्हा स्वयंपाकघरात येऊन कामाला लागली.

सरांनी मॅडमना हाक मारली.. मॅडम नि सर सोफ्यावर बसले.. “सुंदर झालाय नाही का हो नेकलेस ? अगदी घसघशीत दिसतोय.. नेहाच्या गळ्यात शोभून दिसेल नाही ? आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नाच्या खरेदीचा मुहूर्त झाला ते बरं झालं …”

सर नि मॅडम खुशीत दिसत होते.

रेखा स्वयंपाकघरात असली तरी तिचे कान दिवाणखान्यात होते.. नेकलेस पहायची उत्सुकता तिला स्वस्थ बसू देईना. ती सरांना पाणी द्यायचं निमित्त करून हॉलमधे गेली. सरांना पाण्याचा ग्लास दिला.

“नेहाताईंसाठी नेकलेस का मॅडम ?”

“हो गं, आता लग्नाची तयारी सुरू करायला हवी. आठवड्यापूर्वीच करायला टाकला होता. आजच्या चांगल्या मुहूर्तावर सर घेऊन आले.. अगं बघ ना तू पण.” त्यांनी रेखाला नेकलेस दाखवला..

रेखाचे डोळे दिपले. तिने एवढा घसघशीत, सुरेख दागिना कधीच पाहिला नव्हता.. “किती वजनात बसला ?” 

“पाच तोळ्यांचा आहे.”

नेकलेसचं देखणं रुपडं डोळ्यात साठवत रेखा पुुन्हा स्वयंपाकघरात निघून गेली. फ्लॉवर, बटाटा, कांदे चिरताना तिचे डोळे कधी पाझरू  लागले ते तिलाच कळलं नाही.

लेकीच्या लग्नात तिला एक तोळ्याचा नेकलेस घालायचा, हे तिचं लेक जन्मल्यापासूनचं स्वप्न होतं..

त्याला कारणही तसच होतं.. रेखाचं नि तिच्या जावेचं लग्न एकाच मांडवात झालं होतं. रेखाच्या माहेरची परिस्थिती बेतासबात… कसंतरी तिला उजवून टाकलं होतं. लग्न ठरवताना नवरा मुलगा काय करतो, कसा आहे.. हे न पाहता सासऱ्याची पेन्शन पाहून रेखाला त्या घरात दिलं होतं. फक्त हिरव्या बांगड्यांचा चुडा नि खोटं कानातलं घालून रेखा लग्नाला उभी होती..

जाऊ मात्र बऱ्या परिस्थितीतली..

शाळेत शिक्षक असणाऱ्या दिराशी लग्न लावताना तिला एक तोळ्याचा नेकलेस गळ्यात घालून तिच्या माहेरच्यांनी बोहल्यावर उभं केलं होतं. लग्नाच्या दिवशी नि नंतरही सगळे जावेच्या नेकलेसचं कौतुक करत होते..

रेखा मात्र कानकोंडं होत तो कौतुक सोहळा बघत होती. पण तेंव्हा तिने मनाशी ठरवलं होतं …लेकीला लग्नात तोळ्याचा नेकलेस घालूनच लग्नाला उभं करायचं.. पण गरिबाला ठरवायचा अधिकार नसतो… जे पुढ्यात येईल ते फक्त स्वीकारायचं असतं..

पाठोपाठ झालेल्या तीन मुली, निकम्मा नवरा, मुलींची शिक्षणं, सासऱ्याचं आजारपण, या सगळ्यात दिवसभर कष्ट करूनही एक तोळा सोडा एक ग्रॅम सोनही घेणं तिला जमलं नव्हतं!

लग्न पंधरा दिवसावर आलेलं..

सगळा खर्च सासूच करणार होती.

त्यासाठी रेखाचं सोन्यात गाठवलेलं मंगळसूत्रंही सासूनं गहाण ठेवलेलं होतं. नेकलेसचं रेखाचं स्वप्न स्वप्नच राहिलं होतं. तिच्या सारखीच तिची मुलगीही पार्वतीच्या रुपातच लग्नाला उभी राहणार होती..

आज नेहाचा नेकलेस पाहून तिच्या काळजाला अनंत घरं पडली  होती.. भरल्या डोळ्यांनीच तिने स्वयंपाकघरातल्या देवापुढं हात जोडले.. “देवा, पुढच्या जन्मी मला लुळीपांगळी कर पण गरीब ठेऊ नकोस.. फार नको, पण एक तोळ्याचा नेकलेस माझ्या लेकीला घालता येईल, एवढा तरी पैसा मला दे!”

हॉलमधून कसलातरी आवाज आला म्हणून रेखाने डोळे पुसले..

“अगं आई, तू इतकी कशी मागासलेली गं.. अगं सध्या असले कुणी सोन्याचे दागिने घालतं का गं ..ओल्ड फॅशन्ड? प्लॅटिनम नि डायमंडशिवाय कोणी काही घालत नाही सध्या.. तू नाही ते उद्योग मला न विचारता का करतेस? मी हा नेकलेस आजिबात घालणार नाही.. तुला  पाहिजे तर तू घाल.. आणि परवाच मी तुला सांगितलं नं मी आणि नीरज भरपूर मिळवतोय. माझे दागिने, कपडे आम्हीच घेऊ.. तू आता त्या तुझ्या जुन्या विचारातून बाहेर ये “…

नेहाने फोन कट् केला असावा.. आता फक्त मॅडमच्या हुंदक्यांचा  आवाज ऐकू येत होता.. आमरसाची चव दाखवायला रेखा हॉलमधे गेली तेंव्हा मॅडम डोळे पुसत होत्या नि सर त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत होते.. रेखाला पाहून त्यांनी स्वत:ला सावरलं..

“तुला खरेदीला जायचय नं लग्नाच्या.. पटपट स्वयंपाक आवर नि निघ. जेवण टेबलावर मांडून ठेव. आम्ही नंतर जेऊन घेऊ…” 

मॅडम नि सर खोलीत गेले नि रेखा स्वयंपाकघरात आली.. पुन्हा तिचे डोळे पाझरू लागले.. देवाकडे तोंड करत तिने विचारलं, “देवा, असे खेेळ करायला तुला काय गंमत येते रे ? जिथे उदंड आहे तिथे नकोय आणि जिथे मनापासून हवंय तिथे ते दिसतही नाही… माणसाला सुख मिळूच द्यायचं नाही असा तुझा डाव आहे का? आजवर तुझं खूप केलं. तुझी पूजा, उपवास कधी चुकवला नाही. कधी लबाडी केली नाही. नेकीनं काम केलं, सासुसासऱ्यांची सेवा केली.. पण तू मला काय दिलस?

माझ्यासाठी मी काहीच मागितलं नाही.. पण लेकरासाठीची मागणीही पूर्ण केली नाहीस..

मॅडमचंही तसच.. त्यांनी सगळ्यांचं सगळं केलं नि आज ती नेहा कशी बोलली त्यांना… सणादिवशी आम्हा दोघींच्या डोळ्यात तू आज पाणी आणलस.. आजपासून तुझी माझी कट्टी!”

त्याच तिरिमिरीत तिनं झपाट्यानं काम आवरलं. जेवण टेबलावर ठेवलं. कट्टा स्वच्छ केला. हात धुतले. पदर ठीकठाक केला नि स्वयंपाकघराच्या बाहेर पडली.. एवढ्यात पुन्हा बेल वाजली.

“आता कोण आलं ? पाहुणे असतील तर चहापाणी करायला थांबायला लागणार .”.. ती पुन्हा वैतागलीच… जरा गुश्श्यातच तिने दार  उघडलं.. दारात तिची थोरली लेक उभी होती..

“तू  कशाला आलीस एवढ्या उन्हाचं ? मी येतच होते की… चल पटकन् घरी जाऊन जेवण करूया नि खरेदीला बाहेर पडूया. काका, आत्या आले का ?” रेखाची डेक्कनक्वीन थांबायचं काही नाव घेईना…

“अगं, आम्ही तिला बोलावलय.”

मॅडम नि सर सोफ्यावर बसत बोलले. “आत या दोघी. रेखा, तुम्हा दोघींसाठी आमरस आण दोन वाट्यांमधून.”

“नको बाई, उशीर होईल घरी जायला.. पुन्हा दुकानात जायचंय.”

“काही उशीर होत नाही.. जा पटकन आण.”

रेखाने आमरस आणला. दोघी मायलेकींनी तो संकोचाने संपवला.

“आता निघू आम्ही ?”

“थांब, आतून कुंकवाचा करंडा घेऊन ये.”

रेखाने कुंकवाचा करंडा आणला. मॅडमनी दोघींना कुंकू लावलं. सरांनी मगाचा नवीन लाल बॉक्स मॅडमच्या हातात दिला. त्यांनी त्यातून नेकलेस हळुवारपणे काढून रेखाच्या लेकीच्या गळ्यात घातला.

“ही लग्नाची आमच्याकडून तुला भेट.”

रेखा बधीर झाली होती. तिचे डोळे वाहू लागले होते..

“अहो ताई, हे काय करताय? आधीच तुमचे फार उपकार आहेत आमच्यावर.. नेहाची वह्या, पुस्तकं, दप्तरं, कपडे यांवरच तर माझ्या लेकी वाढल्या. तुमचा पगार होता म्हणून माझा संसार चाललाय. आणि आता हे ओझं कशाला ?”

“अगं ओझं कसलं ? आम्ही तुझ्यासाठी केलं त्यापेक्षा जास्त तू

आमच्यासाठी केलस.. मी नोकरीला जायचे. मुलांचं खाणपिणं, आजी-आजोबांची आजारपणं मी तुझ्या मदतीनेच निभावली.. धाकट्या बहिणीसारखा आधार वाटतो तुझा मला.. ही मावशीकडून भाचीला दिलेली भेट समज…”

रेखा नि तिच्या लेकीने सर नि मॅडमना वाकून नमस्कार केला.. रेखा लेकीला घेऊन स्वयंपाकघरात गेली नि दोघी देवाच्या पाया पडल्या.. “आहेस रे बाबा तू… आता कट्टी संपली बरं का…”

रेखा नि तिच्या लेकीच्या चेहऱ्यावर फुललेले गुलाब पाहून सर नि मॅडमची उदासीनताही कुठल्याकुठे पळून गेली… शिल्लक राहिला तो फक्त अक्षय्य आनंद!

लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले

सोलापूर

प्रस्तुती : मेघ:शाम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गोडवा… लेखिका – सुश्री प्राजक्ता राजदेरकर ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? जीवनरंग ?

☆ गोडवा… लेखिका – सुश्री प्राजक्ता राजदेरकर ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆

“ऐकलं का, रमेशला यायला जरा उशीर लागणार आहे, तो ट्रॅफिकमध्ये अडकलाय, या.. इथे बसून वाट बघू..”

“मी जरा माझ्या फुलवाल्या मैत्रिणींना भेटून येऊ का?”

“या.. आणि सावकाश जा बरं..” असं आजींना सांगत आजोबा शेजारी असणाऱ्या दुकानाबाहेर ठेवलेल्या खुर्चीवर बसायला गेले.. “बसू ना गं ताई मी इथे.. चालेल ना..”

“बसा ना आजोबा, खरंतर आतच बसा, बाहेर ऊन यायला लागलंय.. अन् आता तशी फारशी वर्दळ नाहीये, तुम्ही अगदी सहज बसू शकाल आत.. या बसा..”

गावात देवीच्या मंदिराच्या बाजूलाच मानसीचे बुटीक होते. हे आजी आजोबा प्रत्येक मंगळवारी नेमाने येत असत मंदिरात. त्यांचा ऑटो दुकानासमोर थांबत असे हिच्या.  प्रत्येकवेळी आपसूकच नजर जात असे तिची ऑटोतून सावकाश उतरणाऱ्या आजी आजोबांवर.

साधारण साडेचारच्या दरम्यान येत असत ते प्रत्येक मंगळवारी. म्हणजे गेल्या तीन चार महिन्यापासून तरी त्यांना पाहत आली होती मानसी. आधी आजोबा उतरत, सावकाश हात धरून आजीला उतरवत.. हळुवारपणे चालत दोघेही मंदिरात जात, अर्ध्या पाऊण तासाने परत येत. हा असा सिक्वेन्स कायम होता त्यांचा, प्रत्येकवेळी. 

साधारण पंच्यायशी ते नव्वद दरम्यान वय असेल दोघांचेही. पण दोघेही अगदी काटक.. आजोबा उंच होते आजीपेक्षा.. पांढरा शुभ्र सदरा, धोतर, डोक्यावर काळी टोपी, हातात काठी.. आजोबांकडे बघूनच त्यांच्यातील व्यवस्थितपणाची जाणीव होत असे. 

आजोबांच्या तुलनेत आजी तशा ठेंगण्याच.. छानसं काठपदरी सुती नऊवारी पातळ नेसणाऱ्या, केसांचा सुपारी एवढा अंबाडा घालणाऱ्या.. ठसठशीत कुंकू लावणाऱ्या.. आजोबा अलवारपणे हाताला धरून घेऊन जात आजींना.. मानसीला फार आवडत असे त्यांना बघायला..

मागच्या मंगळवारी आजी आजोबा मंदिरात आले नाहीत ..  मानसीला जरा चुकल्यासारखेच वाटले. खरंतर त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याची वेळ आली नव्हती कधी, आज ती ही संधी सोडणार नव्हती.. फार प्रसन्न वाटायचं तिला त्या दोघांना बघितलं की. “आजोबा, मागच्या मंगळवारी दिसला नाहीत..”

“अगं, जरा बरं वाटत नव्हतं मला.. आता काय हे चालायचंच…  नव्वदी पार झालीये माझी….”

“अरे वा..मस्तच की. पण वाटत नाही बरं.. आणि आजींचं काय वय..”

“ती सत्त्यायशीची.. सत्तर वर्षे सोबत आहोत एकमेकांच्या आम्ही..”

असं सांगतांना अभिमान झळकत होता आजोबांच्या चेहऱ्यावर..

“काय सांगताय, किती गोड.. आणि दर मंगळवारी या मंदिरात येण्याचा नेम आहे वाटतं आजींचा.. मी गेले अनेक महिने तुम्हाला मंगळवारीच बघतेय मंदिरात येताना..”

यावर काहीसं मिश्किल हसत आजोबा म्हणाले, “तिचा नाही गं, माझाच नेम आहे तो.. पण तिच्यासाठी..”

“म्हणजे..?”

“सांगतो.. ती एक गंमतच आहे.. सांगतो थांब..” असं म्हणून आजोबा उठले, दुकानाबाहेर डोकावून बघितलं. आजी अजूनही त्यांच्या फुलवाल्या मैत्रिणींशी गप्पा मारत होत्या, याची खातरजमा करून घेतली त्यांनी….. 

“सुगरण आहे गं ती फार, अजूनही स्वयंपाक करते, लोकांना खाऊ घालण्याची प्रचंड आवड.. तितकीच स्वतः वेगवेगळं खाण्याची आवड.. त्यात गोड म्हणजे तर विक पॉइंट.. गुळाम्बा, साखरांबा, सुधारस, शिकरण.. काही ना काही रोज जेवणात लागतं. कणकेचा शिरा तर असा करते ना…. 

पण काय करणार.. आता या सगळ्यांवर बंधनं आली. मधुमेह झालाय तिला, रक्तातली साखर अचानक खूप वाढली.. सगळं एकदम बंद झालं गं.. जेवण अगदीच कमी झालं तिचं तेंव्हापासून… 

त्या दिवशी शिराच केला होता तिने. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर पट्टकन एक घास तोंडात टाकला.. नेमकं हेच आमच्या नातसुनेनं पाहिलं आणि सगळ्यांसमोर म्हणाली तिला, ‘आजी नका गोड खाऊ, त्रास होईल तुम्हाला..’ 

तीही काळजीपोटी बोलली गं, पण हिला खूप ओशाळाल्यासारखं झालं, एखाद्याला आपली चोरी पकडल्यावर होईल तसं.. खूप खजील झाली गं ती.. आपण गुन्हाच केलाय असं वाटलं तिला.. खरंतर गुन्हा वगैरे नव्हताच तो….मग मी ही शक्कल लढवली, तो धनाशेठ मिठाईवाला.. बालपणीचा मित्र आहे माझा.. आम्ही दर मंगळवारी मंदिरात येतो.. तिथून त्याच्या दुकानात जातो.. मग ती खाते तिच्या आवडीच्या एकदोन मिठाया.. काय समाधान असतं त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर..”

“अहो पण आजोबा.. हे धोकादायक आहे ना त्यांच्यासाठी.. त्यांची खूप शुगर वाढली तर उगाच कॉम्प्लिकेशन्स होतील ना..”

“कळतं गं मला पण हे सगळं.. पण तुला खरं सांगू.. आता आमच्यासारख्याचे काय, सात गेले अन पाच राहिले.. कधीही बोलावणं येऊ शकतं आम्हाला… आम्हा म्हाताऱ्यांना वयाच्या सायंकाळी फक्त दोन गोष्टींची आस असते, एक म्हणजे ‘घरातल्या प्रत्येकाला या वयात सुद्धा आपण तितकेच हवे आहोत’ ही जाणीव अन दुसरं म्हणजे ‘पोटापेक्षाही मनाला तृप्त करणारं अन्न..’ हे दोन्ही असेल तरच पुढचा मार्ग सुकर होतो गं.. 

एवढी सत्तर वर्षे फारच समाधानाने घालवली आहेत आम्ही एकमेकांसोबत.. मला आमची यापुढचीही असली नसली सगळी वर्षं समाधानात जायला हवी आहेत.. ती समाधानी नसेल तर मी तरी सुखात कसा राहू सांग..”

“बरं एक गंमत तर मी तुला सांगितलीच नाही, मी म्हणालो ना हा धनाशेठ दोस्त आहे माझा, तो तिला आवडणाऱ्या मिठाया ते शुगर फ्री का काय असतं ना त्यात बनवतो, काही गुळातही बनवतो.. अर्थात हे आमच्या सौ. च्या लक्षात येत असेलच म्हणा.. हाडाची सुगरण आहे ना ती.. पण तसं काही बोलून दाखवत नाही कधी.. कधीकधी मीच सांगतो त्याला, तिला सगळं खऱ्याखुऱ्या साखरेतलं खाऊ घालायला.. मग त्या दिवशी आम्ही बागेत दोन फेऱ्या जास्ती मारतो..” 

असं बोलताना आजोबा अगदी डोळ्यांच्या कोपऱ्यापर्यंत हसले, तितक्यात ऑटोवाला रमेश आल्याचे लक्षात आले त्यांच्या, दुरून हळूहळू चालत आजीही येत होत्या. 

मानसीचा निरोप घेत ते म्हणाले, “माझं हे सिक्रेट सांगू नकोस हं कोणाला.. म्हणजे मी घरी मुलांना सांगितलंय, धनाशेठला अन बबनला माहित्ये, अन आता तुला.. मला तिच्या चेहऱ्यावरचा गोडवा असाच कायम टिकायला हवाय.. चल निघतो.. भेटू पुढल्या मंगळवारी..”

असं म्हणून आजोबा निघाले, आजींना त्यांनी हाताला धरून ऑटोत बसवलं.. वळताना पुन्हा एकदा मानसीला हात दाखवला. त्यांच्या नात्यातला अन त्या दोघांच्याही चेहऱ्यावरचा गोडवा तिला अगदीच सुखावून गेला…

लेखिका : सुश्री प्राजक्ता राजदेरकर

प्रस्तुती : मेघ:शाम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अशीही एक वटपौर्णिमा – लेखिका : सुश्री चित्रा नानिवडेकर ☆ प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती ☆

? जीवनरंग ❤️

☆ अशीही एक वटपौर्णिमा – सुश्री चित्रा अविनाश नानिवडेकर ☆ प्रस्तुती – सुश्री पार्वती नागमोती ☆

आज तन्वी च्या डोळ्यातून सतत पाणी येत होतं. लग्नानंतर ची पहिलीच वटपौर्णिमा. आठवड्यापासून तिची तयारी चाललीय. आईने दिलेली गर्भरेशमी हिरवी पैठणी, सासूबाईनीं आठवणीने काढून आणलेल्या गोठ पाटल्या, पहिल्या वटपौर्णिमे साठी म्हणून मुद्दाम तिने आणि तनिष ने खरेदी केलेला लफ्फा, झालंच तर नथ वगैरे काढून ठेवली…तिला लहानपणापासून हया सणाचं खूप अप्रूप होतं…छान ताट सजवून घ्यायचं त्यावर स्वतः विणलेला क्रॉशाचा रुमाल घालायचा पाच सवाष्णी बरोबर वडाच्या पारावर जायचं…मनोभावे पूजा करून नाजूक हाताने वडाला दोरा गुंडाळत एकीकडे “जिवाच्या सख्या “कडे पाहायचं…लौकरच मनात धरलेलं स्वप्नं सत्यात येणारं हे धरूनच तिची तयारी चालली होती. सासूबाई आणि तनिष हळूच तिची फिरकी घेत होते परवा पासून

“अगं.. तूझं तबक धुवायचे राहिले…किंवा साडी चा ब्लाउज आणायचा राहिला…आणि हो त्या दिवशी कडक उपास असतो बरं…फक्त शहाळ नि केळं खायचं “

मंद हसून ती त्यांना दाद देत होती. लग्नानंतर येणारी पहिली वटपौर्णिमा मनात रंगवत रात्री तिने तनिष ला न विसरता बजावलं

“फोटो काढण्यात कंजूस पणा करू नकोस उदया. मला स्टेटस ला भरपूर फोटो टाकायचे आहेत.”

… आणि सकाळीच तिला मेट्रन चा फोन आला. हॉस्पिटल मध्ये अपघाताच्या केसेस आल्यात तुझी सुट्टी कॅन्सल. ताबडतोब जॉईन हो. खूप इमर्जन्सी आहे. सासूबाईनीच फोन घेतला त्या आणि तनिष दोघेही म्हणाले..

“जा… तन्वी वटपौर्णिमा परत सुद्धा साजरी करता येईल पण आत्ता हॉस्पिटल मध्ये खरी तुझी गरज आहे. आम्ही समजू शकतो “

डोळ्यातलं पाणी परतवून तिने युनिफॉर्म चढवला. हॉस्पिटल कंपाउंड मध्येच रहात असल्यामुळे पाचव्या मिनिटाला ती इमर्जन्सी वॉर्डात दाखल झाली.

खरंच रोड अपघातात सापडलेली संपूर्ण फॅमिली, ड्रायवर, चिमुकली दोन मुलं. नशिबाने त्यातील एक तरुणी दाराच्या बाहेर फेकली गेली होती म्हणून थोडक्यात खरचटलं आणि पायावर फ्रॅक्चर वर निभावलं.

तन्वी च्या टीम ने भराभर सगळ्यांना ईलाज सुरू केले. डॉक्टर्स ऑर्डर देत होते. आणि सगळ्या त्या प्रमाणे ट्रीटमेंट देत होत्या. त्या तरुणीच्या मिस्टर ना जेंव्हा आय. सी. यू. मध्ये हलवले…तिने तन्वी चा हात घट्ट पकडत डोळ्यातून पाणी काढून म्हटलं.

“सिस्टर…माझ्या साठी तुम्ही आज सावित्रीचं रूप आहात…माझ्या.. माझ्या सत्यवानाला प्लिज प्लिज यमाच्या दारातून बाहेर आणा…मी.. मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन.”

तन्वी च्या अंगावर सर्रकन काटा आला. तिला धीर देत तन्वी म्हणाली “हो.. काळजी नको करुस. आम्ही सगळे प्रयत्न करू. हे बघ माझ्या हातात त्यांचेच ब्लड सॅम्पल आहे.2..3.. बॉटल रक्त लागेल द्यायला. तेंव्हा ते नक्कीच शुद्धीवर येतील. विश्वास ठेव आम्ही सर्व जण शर्थीचे प्रयत्न करू. तू पण देवाला प्रार्थना करत राहा “

अक्षरशः रात्री आठ वाजता त्या तरुणी च्या मिस्टरांनी ट्रीटमेंट ला प्रतिसाद दिला तेंव्हाच तन्वी आय सी यू च्या बाहेर आली.

त्या तरुणीला व्हील चेअर वर घेऊन तन्वी ने तिच्या नवऱ्याच्या बेडजवळ नेलं.नवऱ्याचा हात हातात घेऊन ती तरुणी भरभरून रडत म्हणाली…

“वटसावित्री आज तुमच्या रूपाने फळाला आली  सिस्टर तुम्ही होतात म्हणून. मला समजलं आज स्वतः ची पहिली  पूजा सोडून  इमर्जन्सी मध्ये आलात . पण ड्युटीवर आल्या पासून जरा ही खंत न करता तुम्ही सगळी परिस्थिती शांतपणे हाताळली.मी मनापासून प्रत्येक वर्षी वटसावित्री दिवशी एक सौभाग्य वाण तुमच्यासाठी देणार. आज तुमच्यामुळे माझं सौभाग्य मला सहिसलामत मिळतं आहे.”

तन्वी चे सुद्धा डोळे भरून आले. तिच्या पाठीवर थोपटून तन्वी म्हणाली “अगं…मेडिकल मधले सगळेच ह्यासाठी झटले.. म्हणून ह्या अपघातातले सगळेच वाचले. चल मी निघू? उदया येईनच ड्युटीवर “

व्हरांड्यात तनिष ला बघून तिला आश्चर्य वाटले. “अरे…इकडे कसा काय? मी येतच होते घरी “

“बाईसाहेब…वटपौर्णिमा काय तुम्ही एकट्याने पुजायचा मक्ता घेतलाय? मी पण अशी कर्तव्यदक्ष बायको सातजन्म मिळावी म्हणून उपास करून होतो.”

“म्हणजे? मी नाही समजले “

तेवढ्यात एक म्हातारे आजोबा जवळ येऊन तनिष च्या पाठीवर थोपटत म्हणाले

“बाळा.. किती रे धावपळ केलीस माझ्या मुलाला ब्लड मिळवण्यासाठी, नातवंडाना दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलास. हिला तूझ्या आईने बळजबरी जेवू घातलं…खूप सेवा केलीत. हया परक्या ठिकाणी आम्हाला तुमचा खूप आधार वाटला रे. तुमच्या रूपाने देव भेटला…!”

तन्वी चे डोळे कृतज्ञतेने भरून आले.

अश्या तऱ्हेने तिची वटपौर्णिमा साजरी झाली.

लेखिका – सुश्री चित्रा अविनाश नानिवडेकर

संग्राहिका –  सुश्री पार्वती नागमोती

मो. ९३७१८९८७५९

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पासिंग द पार्सल – लेखिका – सुश्री प्रतिभा तरवडकर ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

?जीवनरंग ?

☆ पासिंग द पार्सल – लेखिका – सुश्री प्रतिभा तरवडकर ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

राजेशने बेलवर ठेवलेला हात काढलाच नाही.बेलचा टिंग टॉंग टिंग टॉंग असा कर्कश्श आवाज घुमतच राहिला.रंजना कणकेने भरलेले हात धुवून येईपर्यंत बेल अधीरपणे वाजतच राहिली.

‘हो हो,आले आले’म्हणत रंजनाने येऊन दार उघडले.राजेश उत्फुल्ल चेहऱ्याने उभा होता.सॅटीनच्या रिबिनचा बो बांधलेले, सुंदर वेष्टनातील एक भलेमोठे खोके त्याच्या पायाजवळ होते.राजेशचे डोळे आनंदाने चमकत होते.’सरप्राईज गिफ्ट?’रंजना कोड्यात पडली.राजेशचा स्वभाव कधीच रोमॅंटिक नव्हता.त्याच्याकडून असं सरप्राईज गिफ्ट वगैरे?रंजनाचा बुचकळ्यात पडलेला चेहरा पाहून राजेशने खुलासा केला,’अगं मागच्या वर्षीचा माझा परफॉर्मन्स बघून ऑफिसने गिफ्ट दिलंय.तसं प्रत्येकालाच गिफ्ट दिलंय पण मला सगळ्यात मोठं मिळालंय.’सांगतांना त्याची छाती आनंदाने फुलली होती.रंजनाच्या डोळ्यात आपल्या नवऱ्याच्या कौतुकाने चांदणं फुललं.राजेश आणि रंजनाने मिळून तो खोका घरात आणला.

‘सान्वी,सुजय बाबांनी काय गंमत आणलीये पहा,’बेलचा आवाज कानावर पडूनही न उठलेले सान्वी आणि सुजय ‘  गंमत’ हा परवलीचा शब्द ऐकून पळत आले.नाहीतरी एव्हढं महत्वाचं काम थोडंच करत होते?आईच्या मोबाईलचा ताबा सान्वीने घेतला होता तर सुजय लॅपटॉप वर कार्सच्या मॉडेल्स मध्ये बुडाला होता.दोघेही पळतच आले.त्या आकर्षक अशा वेष्टनात काय बरं दडलं असेल याबद्दलची सर्वांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती.खोक्याचं वरचं पुठ्ठ्याचं झाकण उघडून सर्वजण आत डोकावले आणि त्यांचे डोळेच विस्फारले.

आत अतिशय सुंदर, नाजूक असा काचेचा डिनर सेट होता.रंजना काळजीपूर्वक एक एक प्लेट काढून खाली ठेवू लागली.उत्कृष्ट दर्जाची पांढरी शुभ्र काच,त्यावर कडेने निळसर फुलांची नाजूक वेलबुट्टी….. सहा मोठ्या प्लेट्स, सहा छोट्या प्लेट्स,छोटे बाऊल्स,मोठे बाऊल्स, सर्व्हिंग बाऊल्स, ट्रे…. प्रत्येक वस्तू काढतांना रंजना अगदी नाजूक हातांनी काढत होती.मध्येच अधीरपणे सुजय एक प्लेट उचलायला गेला तशी रंजनाने त्याच्या हातावर चापट मारली.’उगाच धुसमुसळेपणा करशील आणि प्लेट फोडून ठेवशील.’

‘आई,आज आपण या प्लेटमध्ये जेवायचं का?’

‘गुड आयडिया,आई आपण आज याच प्लेट्स मध्ये जेवू या नं’सान्वी आईला लाडीगोडी लावत म्हणाली.

रंजनाच्या डोळ्यासमोर रात्रीच्या जेवणाचा मेन्यू आला.त्या नाजूक, सुंदर प्लेट्स मध्ये वाढलेली चटणी, कोशिंबीर,शेपूची भाजी, भाकरी आणि बाऊलमध्ये वाढलेली आमटी….. आणि तिने जाहीर केले,’आज नको, काहीतरी स्पेशल मेन्यू केला की या प्लेट्स काढू.’आणि रंजना  सगळ्या काचेच्या वस्तू परत खोक्यात भरु लागली.

‘काय गं आई,’सान्वी हिरमुसली.’बाबांना एव्हढं छान गिफ्ट मिळालंय आणि तू ते वापरत नाहीस’

‘अजिबात नाही.’रंजना आपल्या मतावर ठाम होती.’आपल्या भाजी,आमटीच्या तेल आणि हळदीचे डाग पडून त्या पांढऱ्याशुभ्र प्लेट्स खराब झाल्या तर! शिवाय या प्लेट्स,बाऊल्स आपल्यालाच धुवायला लागणार.तुम्ही तयार आहात का ती क्रोकरी धुवायला?’

त्याबरोबर जादू व्हावी तशी दोन्ही मुलं तिथून अदृश्य झाली.त्यांच्या बाबांनी म्हणजे राजेशने नेहमीप्रमाणे तटस्थ भूमिका घेतली.

डिनर सेटचे खोके कोपऱ्यात पडून राहिले.

‘काय गं,काल राजेश कसलं खोकं घेऊन आला होता?’शेजारच्या अरुणाताईंनी चौकशी केली.

‘त्यांना बेस्ट परफॉर्मन्स साठी ऑफिसकडून काचेचा डिनर सेट मिळाला.’रंजना थंडपणे म्हणाली.’एव्हढी सुंदर,महागडी क्रोकरी कशी वापरणार? धुताना साबणामुळे हातातून प्लेट निसटून फुटली तर? म्हणून तो खोका तसाच ठेवून दिलाय.’

‘बरं केलंस, अजिबात वापरू नकोस!’अरुणाताई गूढपणे म्हणाल्या तशी ‌रंजनाने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले.अरुणाताईंनी तिला त्यांच्या घरात येण्याची खूण केली.

‘ही बघ गंमत,’एक कपाट उघडत अरुणाताई म्हणाल्या.रंजनाचे‌ डोळे विस्फारले.एखाद्या गिफ्ट शॉप मध्ये शिरावे तसे तिला वाटले.लाफिंग बुद्धाच्या अंगठ्या एव्हढ्या मूर्तीपासून ते फूटभर उंचीच्या सोनेरी मूर्ती, काचेच्या छोट्या ट्रे मधील काचेचे कासव,तोंडात नाणं धरलेला बेडूक, फोटो फ्रेम्स, चिनी तोंडवळा असलेल्या गणपती आणि राधाकृष्णाच्या मूर्ती,स्टफ्ड टॉईज…..

‘हे कपाटभर सामान का बरं ठेवलंय?’रंजनाने आश्चर्याने विचारले.

‘गिफ्टस् म्हणून मिळाल्यात’,अरुणाताई नाक वाकडं करत म्हणाल्या.’मला सांग,यातील एक तरी वस्तू उपयोगाची आहे का?या मूर्ती धूळ बसून एका दिवसात खराब होतात.कोण पुसत बसेल रोज रोज?या फोटो फ्रेम्स तर इतक्या आहेत की सगळ्या लावायच्या म्हटल्या तर घराच्या एकूण एक भिंती भरुन जातील.अजून एक कारंजं मिळालं होतं विजेवर चालणारं.म्हणे समृद्धी येते त्याने.इतकं भलंमोठं की एक कोपरा व्यापेल खोलीचा!’

‘मग कुठंय ते?दिसत नाहीये इथं?’

‘अगं पासिंग द पार्सल केलं त्याचं!’अरुणाताई परत गूढपणे हसत म्हणाल्या.

‘म्हणजे?’

‘म्हणजे इधरका माल उधर करायचं.आपण लहानपणी नाही का तो खेळ खेळायचो, जोपर्यंत गाण्याचा आवाज ऐकू येतो तोपर्यंत आपल्या हातातील वस्तू शेजारच्याकडे सरकवायची.’

‘हां, आलं लक्षात.’रंजनाने‌ मान डोलावली.

‘कपाटावर सगळी खोकी सोडवून,सपाट करून ठेवली आहेत.’कपाटाच्या छताकडे निर्देश करीत अरुणाताई म्हणाल्या.’कोणाकडे काही फंक्शन असलं की यातील एक एक वस्तू पुढे करायची.लहान मुलाचा वाढदिवस असला तर स्टफ्ड टॉय, नवीन घर घेतलंय…. फोटो फ्रेम वगैरे.छानपैकी चकचकीत कागदात गुंडाळून,सॅटीनच्या रिबिनीने सजवून द्यायची.पंधरा वीस ‌रुपये खर्च येतो फक्त आणि महत्वाचं म्हणजे घरातील अडगळ कमी होते.’

रंजनाला अरुणाताईंचा सल्ला एकदम पटला.तिनेही तो डिनर सेट कपाटात ठेवून दिला.

तिच्याच गावातील सुनंदावन्संच्या अनिलचे लग्न ठरले.तसं लांबचं नातं असलं तरी गावातच असल्याने बऱ्यापैकी येणं जाणं होतं.सगळ्यांनाच अहेर करायला हवा होता. रंजनाने‌ डोकं लढवून काचेचा तो सुंदर डिनर सेट अहेर म्हणून पुढे केला आणि सुटकेचा निःश्वास टाकला.

हळूहळू तिच्या कडे सुद्धा अरुणाताईंसारख्या निरुपयोगी भेटवस्तू जमा होऊ लागल्या पण त्यांची हुशारीने विल्हेवाट लावण्यात रंजना एक्सपर्ट झाली आणि ‘पासिंग द पार्सलचा खेळ’  ती लीलया खेळू लागली.

रंजनाची सान्वी मोठी झाली.शिक्षण पूर्ण करुन नोकरीला लागली.ऑफिसमधल्याच एका मुलाशी तिचा प्रेमविवाह जुळला.सान्वीला तो सर्वप्रकारे अनुरूप असल्याने नकाराचा प्रश्नच नव्हता.लग्नाचा मुहूर्त काढला,खरेद्या झाल्या.लग्न समीप आले.लग्नाआधी घरी करायचे धार्मिक विधींची गडबड सुरु झाली.बरेच पाहुणे आले होते.रंजना धार्मिक विधी आणि येणाऱ्या पाहुण्यांची उठबस यात पार बुडून गेली.विधींनंतर अहेरांची देवाण घेवाण झाली.पाहुणे आपापल्या घरी गेले.रंजनाला जरा निवांतपणा मिळाला.राजेश,सान्वी,सुजय, रंजना सारेजण उत्सुकतेने एक एक अहेर पाहू लागले.कोणी भरजरी साड्या,शर्ट पँट चं कापड दिलं होतं तर कोणी चांदीच्या छोट्या मोठ्या वस्तू, कोणी काही तर कोणी काही.सारेजण अहेर पहाण्यात पार रंगून गेले होते.

‘हे खोकं अमिताकाकूने दिलं’,सुजयने एक जड खोकं ढकलत आणलं.’बघू बघू,उघड तो खोका,’सारेजण एक्साईट झाले होते.सुजयने कात्रीने त्या खोक्यावरची रिबिन कापली आणि खोकं उघडलं आणि रंजनाचा चेहरा पडला.

तिने सुनंदावन्संना दिलेला काचेचा डिनर सेट फिरत फिरत परत तिच्याकडे आला होता.

‘पासिंग द पार्सल’ चं एक राऊंड पूर्ण झाले होते.

लेखिका – सुश्री प्रतिभा तरबडकर

प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.        

मो. – 9561582372, 8806955070.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पोपट – भाग – 2 – लेखक – श्री रविकिरण संत ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर ☆

? जीवनरंग ❤️

☆  पोपट – भाग – 2 – लेखक – श्री रविकिरण संत ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर 

(मागील भागात आपण पहिले – एवढे बोलून झाल्यावर नितीनने सावकाश डोळे उघडले व तो  आत्याची प्रतिक्रिया पाहू लागला. आपल्या पूर्वजीवना विषयीचे असे अचूक भाष्य ऐकल्यावर आत्याच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. तिने उठून नितीनला  पोटाशी धरले. त्याला सिद्धी प्राप्त झाली आहे याची तिला खात्रीच झाली. आपण गरोदर असताना एकदा आळंदीला गेलो होतो हे तिला आठवले. तिथेच कुणातरी पुण्यात्म्याने आपली कुस धन्य केली असावी असे तिला वाटले. आता इथून पुढे)

हा हा म्हणता ही गोष्ट चाळभर पसरली. मग रोज पाच वाजता शाळेतून आल्यावर नितीन कद नेसून, पोपट आणि भविष्यपत्ते घेवून वेगवेगळ्या घरी जावू लागला. त्याला नितीनशास्त्री ह्या उपाधी पाठोपाठ एक दोन रूपये दिवसाआड मिळू लागले. त्यामुळे आमची चांगलीच चंगळ होवू लागली.

“त्यामानाने माझ्या व्यवसायात मला ना किर्ती मिळाली ना पैसा! ज्यांची पुस्तके मी आणली होती ते राजरोसपणे ती परत घेवून गेले शिवाय जाताना माझेही एखादे पुस्तक घेऊन गेले. माझ्या व्यवसायाला उतरती कळा लागली.”

शेवटी ‘हर अच्छे और बुरे वक्त का अंत निश्चित है,’ या उक्तीनुसार आमच्या सहामाही परीक्षा झाल्या. नितीन तीन विषयात नापास झाला तर मला फुलपास होऊनही ४४ टक्केच मार्क मिळाले. नितीन खूपच घाबरला होता. त्याला भावनीक आधार देण्यासाठी मी आधी त्याच्या घरी गेलो.”

“त्याचा असा दिव्य निकाल पाहिल्यावर नितीनच्या बाबांनी चढ्या आवाजात चौकशी सूरू केली. आत्या काही बोलेना. तो आरडा ओरडा ऐकून दारातून डोकावलेल्या शेजारच्या चोंबड्या काकूंनी, बाबांना नितीनच्या पोपटज्योतिषाची कल्पना दिली आणि पुढे हा मुलगा जयंतरावांसारखा नाव काढेल, त्याला पाठ्यपुस्तकाच्या बेडीत अडकवू नका असेही मानभावीपणे सांगितले.”

झाले! बाबांची नजर क्रूध्द झाली. त्यांनी पहिल्यांदा आत्याला फैलावर घेतले. मग ते, “आता त्या पोपटाची मुंडीच मुरगाळतो” असे रागाने म्हणून त्याला शोधू लागले. पण तोही असा डांबरट की कुठे गायब झाला हे कळलेच नाही. पशू-पक्षांना नैसर्गिकरीत्या संकटाची जाणीव होते म्हणतात! मग या सर्वाची शिक्षा नितीनने एकट्याने भोगली.

बाबांनी अखंड ब्रम्हांडाचे भविष्य छापलेले पत्ते फाडून खिडकीतून बाहेर फेकले. त्यावेळी जरी प्रत्यक्ष धुम्डूम महाराजही दरवाजातून आत आले असते तरी बाबांचा रुद्रावतार पाहून अंग चोरून ते खिडकीच्या गजातून मांजरासारखे पळाले असते!”    

“आता यापुढे कुणाला काही समजावण्यात अर्थ नाही हे उमगुन मी आमच्या चाळीकडे निघालो. चाळीबाहेर शेकोटी पेटलेली होती. तिच्या भोवताली मुले उभी होती. मीही परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी त्यांच्यात जावून उभा राहीलो.”

     ” काय रे? आज एकदम शेकोटी?” मी एकाला सहज विचारले. त्याने खाली बोट दाखवले. तेव्हा मी निरखून पाहिले असता शेकोटीत माझे संपूर्ण वाचनालय, नावाच्या पाटी सकट भस्मसात होताना दिसले. याचा अर्थ मी घरी पोचायच्या आतच माझे ४४ टक्के मार्क्स कुणाच्या तरी फितुरीने तिथे पोचले होते! आणि तिथेच माझ्या व्यावसायीक स्वप्नांची होळी झाली!”

“दादा तुम्ही दोघेही किती उपद्व्यापी होता हो! पुढे त्या पोपटाचे काय झाले?” श्रेयाने खदखदा हसत विचारले.

यापुढे नितीन सांगू लागला, “पुढे वर्षभरात तो पोपट चांगला मोठा झाला. त्याच्या गळ्याभोवती काळी पट्टी उगवली आणि तो नर असल्याचे आम्हाला कळले. आम्ही त्याचे नाव ‘प्रिन्स’ ठेवले.”

“अशी बरीच वर्षे गेली. मी कॉलेजला जावू लागलो. तोपर्यंत प्रिन्स आमच्या कुटुंबाचा हिस्सा झाला होता. त्याच्या पिंजर्‍याचे दार आम्ही कधी बंद केले नाही. तो घरातल्या घरात उडत असे. आईला त्याचा फार लळा लागला होता. माझ्या आईचा स्वभाव बडबड्या. ती स्वयंपाक करताना किचनमधे खिडकीच्या गजावर बसून तो कर्कश्यपणे शिट्या मारत तिच्याशी गप्पा मारत असे.”

” तेव्हा रोज दुपारी पोपटांचा एक थवा आमच्या चाळी समोरच्या वडाच्या झाडावर येवून बसे.त्यातली एक पोपटीण आमच्या खिडकीच्या गजावर बसून ‘प्रिन्स’ला लाडिकपणे शिटी मारून बोलवी. मग हा पठ्ठ्याही तिच्या शेजारी बसून बरच वेळ मिठू मिठू करे.”        ” ती पोपटीण आहे हे तुम्हाला कसे कळले?” श्रेयाने विचारले.

” तिच्या गळ्याला काळी पट्टी नव्हती.” नितीनने सांगितले.

” एकदा त्यांना चोचीत चोच घालून बसलेले आईने पाह्यले आणि हा लवकरच घरात सून आणणार असे तिला वाटू लागले. पण झाले भलतेच, अचानक एक दिवस तो थवा येणे बंद झाले आणि प्रिन्सही नाहीसा झाला!”

त्या गोष्टीचा आईला जबर धक्का बसला. तिची झोप उडाली. तिला जेवण जाई ना. “माझ्या पोराला फूस लावली” असे म्हणत सारखी अश्रू ढाळू लागली. मला तिने “वाट्टेल ते करून प्रिन्सला शोधून आण” अशी गळ घातली.

मग दादाच्या सल्ल्याने मी पेपरात “आमचा प्रिन्स नावाचा पोपट हरवला आहे.” अशी जाहिरात त्याच्या फोटोसकट दिली. त्यात “शोधून देणाऱ्यास योग्य इनाम मिळेल,” असेही लिहीले.

आठ दिवसांनी आम्हाला एक पत्र आले.त्यात “दिलेल्या वर्णनाचा एक पोपट सापडला आहे लवकरात लवकर घेवून जाणे” असा मजकूर होता. खाली सांताक्रूझ LIC ऑफिसचा पत्ता व व्यक्तिचे नाव होते.

आम्हा सर्वांना जणू हर्षवायू झाला. दुसर्‍या दिवशी सकाळी मी आणि दादा त्या LIC ऑफिसात गेलो.ऑफिस खूप मोठे होते. तळमजल्यावरच्या वीस – पंचवीस टेबलांवर बरीच माणसे काम करताना दिसत होती.

आम्ही एका प्यूनला आम्हाला ज्याना भेटायचे होते त्यांचे नाव सांगितले. त्याने,    “अपॉइंटमेंट घेतली आहे का?” असे विचारले. आम्ही त्याला ते पत्र दाखवले. पत्र वाचताच त्याचा चेहेरा बदलला.

“बोंबला आता,” असे काहीसे  पुटपुटत त्याने आम्हाला एका केबीनच्या दाराकडे बोट दाखवले.

केबीनच्या दारावर टक टक करताच,” येस् कम इन” असा चिडका आवाज आला.                

आम्ही घाबरत आत गेलो. आत एक रागीट चेहेर्याचे आणि बाकदार नाकाचे गृहस्थ बसले होते. मी त्यांच्यासमोर ते पत्र ठेवले.

पत्र वाचताच त्यांच्या भुवया वक्र झाल्या. चेहेरा संतापाने लाल झाला. आम्हाला ते ” गेट आऊट फ्राॅम हियर,” असे जोरात ओरडले. काहीच न कळून आम्ही बाहेर पडलो. आतून त्यांचा आरडा ओरडा ऐकू येत होता. आता पुढे काय करावे ते आम्हाला समजेना. बाहेर सर्व स्टाफ खदखदा हसत होता.

त्यातल्या एकाने सांगितले, “हा त्या सर्वांनी मिळून केलेला प्लॅन होता. ते साहेब अतिशय चिडके असून त्यांच्या बाकदार नाकामुळे स्टाफ त्यांचा पोपट असा उल्लेख करतो. आता तुमच काम झालय, मार खायच्या आत इथून पळा!”

“काय काय अनुभव घेतले तुम्ही. नशिब त्यावेळी कानफटीत बसली नाही.” श्रेया हसत म्हणाली.

“अग पण विधात्याने जर तुमच्या गालावर चपराकच लिहून ठेवली असेल तर ती कशी चुकेल?” मी हळूच पिल्लू सोडून दिले.

” म्हणजे ?”

“पुढे नितीनने त्यांच्याच चपराकी सव्याज खाल्ल्या.” मी नितीनकडे बघण्याचे टाळले.          

“कधी?” न उमगुन श्रेयाने विचारले.

“त्यानंतर दहा वर्षांनी जेव्हा कर्मधर्म संयोगाने तेच गृहस्थ त्याचे सासरे झाले, त्यानंतर…” मी वाक्य पूर्ण केले.

 आवाक झालेल्या श्रेयाचा हात अभावितपणे तोंडावर गेला आणि तिला तिचेही नाक बाकदार असल्याची जाणीव झाली!

 – समाप्त –

लेखक – श्री रविकिरण संत

संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पोपट – भाग – 1– लेखक – श्री रविकिरण संत ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर ☆

? जीवनरंग ❤️

☆  पोपट – भाग – 1 – लेखक – श्री रविकिरण संत ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर 

१९९५ साल असावे. तेव्हा लॅण्डलाइन फोनचा जमाना होता. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्हा तिघांना ( मी, बायको, आई ) आत्याने फराळाला बोलावले होते.  दरवर्षी दिवाळीचा एक एक दिवस आम्ही एकमेकांकडे जात असू.

सकाळी आठ वाजता नितीनने दरवाजा उघडताच त्याची साडेतीन वर्षांची गोड मुलगी बब्ली हाॅलमधेच खाली फुलबाज्यांच्या पेट्या, सापाच्या गोळ्या, रंगीत काडेपेट्या वगैरे फटाके मांडून बसलेली दिसली. श्रेया बेलचा आवाज ऐकून लगबगीने बाहेर आली. आत्या किचनमधे देवपूजा करत असावी. कारण देव्हार्यातल्या घंटेचा किणकिणाट ऐकू येत होता.

“काल सकाळी आत्या घरी नव्हती का?” मी श्रेयाला विचारले.

” परवा त्या त्यांच्या नणंदेकडे गिरगावात राहिल्या होत्या, काल संध्याकाळी आल्या.” श्रेयाने सांगितले.

” तरीच!” मी हसत उद्गारलो.

” काय झाले?”

” ते आता नितीन सांगेल.”

मी हसू आवरत म्हणालो, “नितीन, काल सकाळी साडेसातला मी तुला आमचे आजचे येणे कन्फर्म करायला फोन केला. तू बर्‍याच वेळाने फोनवर आलास.”

” काल वसूबारस होती. मी  बब्लीला उटणं लावून आंघोळ घालत होतो. दिवाळीत ही ड्यूटी माझी असते.” नितीनने श्रेयाकडे बघत उत्तर दिले. यावर तिने फक्त मान उडवली.

“नितीनराजा फोन आधी तुझ्या बब्लीनेच उचलला, मी तिला, ‘तू काय करतेस’ हे विचारले, तर तिने ‘कार्टून बघतेय’ असे उत्तर दिले. त्यानंतर माझ्या सांगण्यावरून ती तुमच्यापैकी कुणाला तरी बोलवायला गेली.” आता खर सांग, “तू कुणाच्या बब्लीला उटण लावून आंघोळ घालत होतास?”

नितीनचा चेहेरा पहाण्यासारखा झाला. श्रेया उठून घाईघाईने किचनमधे गेली. आईने न ऐकल्यासारखे केले आणि माझ्या बायकोने मला एक करकचून चिमटा काढला!

” तूला काय करायचय?” बायको पुटपुटली.

” मला फक्त खात्री करायचीय!”  मी साळसूदपणे म्हणालो.

“तुझ्याशी बोलण्यात अर्थ नाही,” असे म्हणून तीही किचनमधे आत्या आणि श्रेयाशी बोलायला निघून गेली.

बाहेर टिव्हीवर कार्टून चालू होते आणि नितीन गप्प राहून ते बघण्यात गुंग आहे असे दाखवत होता. अशीच दहा मिनीटे गेली.

तेवढ्यात आत्या किचनमधून श्रेया आणि बायकोला घेवून बाहेर आली. आम्ही सर्वजण डायनिंग टेबलवर फराळासाठी बसलो. श्रेया खालमानेने सर्वांच्या डिशेश भरू लागली. आई म्हणाली, ” काय रे तूम्ही दोघं आता बब्लीच्या भावंडाचा विचार करताय ?”      

” नाही मामी.” दोघेही ठामपणे एकाच सुरात म्हणाले. नितीनचा हात अभावितपणे पोटावर गेला. मला श्रेयाने मारलेला तो प्रसिद्ध गुद्दा आठवलाआणि हसू आले

” अरे मग निदान बब्लीला खेळायला एखादं कुत्र- मांजर तरी आणा.” आईने सल्ला दिला. 

“काही नको वहिनी, हे दोघे रोज सकाळी नोकरीसाठी बाहेर पडणार. मग मलाच त्याचे सर्व करावे लागणार.” आत्याने नाराजी दर्शवली.

” नितीन त्यापेक्षा तू पूर्वीसारखा पोपट का आणत नाहीस? त्याचे फार काही करावे लागत नाही.” मी अल्टरनेटिव्ह दिला.

“पूर्वी तुमच्याकडे पोपट होता?’

श्रेयाला आश्चर्य वाटले.

“एवढंच नाही तर बालपणी नितीनला चाळीत नीतीनशास्त्री म्हणायचे.”

“आता हे काय नवीन? मला कळलेच पाहिजे.” श्रेया लगेच सरसावून बसली.

“तो बराच मोठा किस्सा आहे.”

पुढच्या आठवड्यात आपण चौघे महाबळेश्वर ट्रिपला जाणार आहोत तिथे आम्ही तो दोघे मिळून सांगू.”

हे ऐकताच नितीनच्या चेहेर्‍यावर त्याचे सिग्नेचर (बनेल) हास्य उमटले आणि मी समाधान पावलो.” 

**** 

त्यापुढच्या आठवड्यात आम्ही चौघेजण आमच्या मुलांना त्यांच्या आज्यांकडे सोपवून तीन दिवसासाठी महाबळेश्वरला आलो. छान थंडी पडली होती. रात्री हाॅटेलच्या आवारात मोठी शेकोटी पेटलेली होती. जेवणे झाल्यावर त्या शेकोटी भोवती आम्ही गप्पा मारत बसलो. श्रेयाने लगेच पोपटाचा विषय काढला.

नितीन सांगू लागला, ” मी प्रायमरी शाळेत असताना आम्हाला हिरव्या रंगाचे आणि लाल चोचीचे पोपटाचे पिल्लू कोणीतरी आणून दिले. ते इतके लहान होते की त्याला उडता देखील येत नव्हते. त्यामुळे त्याच्या पिंजऱ्याचे दार आम्ही उघडेच ठेवत असू. पिलू घरभर फिरे. ते कधी खांद्यावर बसून हातातली हिरवी मिर्ची खाई तर कधी वाटीतली कच्ची डाळ खाई. ते नर आहे की मादी हे न कळल्याने  त्याचे आम्ही तेव्हा नामकरण केले नाही.”

“मी तेव्हा अभ्यासाची एक रंजक पद्धत शोधली होती. शाळेची सर्व पुस्तके मी पिला पुढे पसरून ठेवे. मग चोचीने जे पुस्तक ते पहिल्यांदा पुढे ओढे त्याचाच मी अभ्यास करीत असे. यामुळे माझे कित्येक विषय मागे पडत. मग वर्षाअखेरी ते कव्हर करताना आईचा घाम आणि माझी सालटे निघत.”

नितीन थांब, मी उत्साहाने म्हणालो, “याच्या पाचवीच्या व माझ्या नववीच्या उन्हाळी सुट्टीत आम्ही नाशिकला आजी- आजोबांकडे एकत्र गेलो होतो. तिथे महिनाभर खूप मजा केली. रोज गंगेवर फिरायचो, पोहायचो, सरकार वाड्यातल्या वाचनालयात जायचो.”

“पण इच्छा असुनही आम्हाला अकबर सोडा वाॅटर फॅक्टरीचा काश्मीरी सोडा, भगवंतरावची दुध-जलेबी  आणि पांडे मिठाईवाल्याचे गुलाबजाम रोज खाणे परवडत नसे. याला कारण अपुरा पॉकेटमनी! त्यावेळी मुलांचा पॉकेटमनी ही आमच्या नोकरदार वडिलांसाठी खर्चाची लास्ट प्रायोरिटी असायची. तेव्हा वाटायचे हे जर व्यवसाय करत असते तर अशी वेळ आमच्यावर आली नसती. मला त्यावेळी प्रथमच समाजशास्त्राच्या सरांनी म्हटलेल्या, “मराठी माणूस हा मुळातच व्यवसायाभिमुख नाही” या वाक्यातील कळकळ कळली. मग  नितीनचे बौद्धीक घेत त्याला, “कोणत्याही व्यवसायास वयाची अट नसते, ती फक्त नोकरीसाठी असते,” हे सरांचे वाक्य गंभीरपणे ऐकवले.

मला तिथेच रोखत नितीन पुढे सांगू लागला, “मग असे मन मारून जगण्यापेक्षा काहीतरी व्यवसाय करून पैसे मिळवावे असे आम्ही ठरवले.”

“गंगेवर अनेक ज्योतिषी पोपट घेवून भविष्य सांगायला बसलेले असत. बाया- बापड्या त्यांना हात दाखवून आपल्या भविष्याचा वेध घेत. मी ते कुतुहलाने पहात असे. दोन रूपये घेतल्यावर ते ज्योतिषी पत्त्यांसारखी बरीच पाने पसरत. त्यानंतर पिंजर्‍यातल्या पोपटाला बाहेर सोडत. पोपट रूबाबात त्यातला एक पत्ता चोचीने पुढे ओढे. मग त्या पत्त्याच्या मागच्या बाजूला छापलेले भविष्य वाचून दाखवले जाई.”

” बराच काथ्याकूट केल्यावर दादाने वाचनालयाचा तर मी ज्योतिषाचा व्यवसाय करायचे ठरवले! हे दोन्ही धंदे आमच्या बजेटमधे बसत होते.”

“दादाच्या घरी विकत घेतलेली आणि लोकांची वाचायला आणून परत न दिलेली अशी शंभरहून अधिक पुस्तके होती तर माझ्या घरी वेल ट्रेंड पोपट होता.”

” सर्वप्रथम आम्ही दोघांनी काळ्या रामाच्या मंदिरात जावून, मराठी माणसा सारखे कूपमंडूक वृत्तीने न वागता, गुजराथी समाजाचा आदर्श ठेवून, व्यवसायासाठी जमेल तितकी मदत एकमेकांना करायची अशी शपथ घेतली.”

” मग पुढील दोन आठवडे सरावासाठी दादा वाचनालयात आणि मी ज्योतिष वृंदात जावून बसू लागलो.”

नितीनला थांबवून त्यापुढील गंमत मी सांगू लागलो, “पुस्तकांचे नंबरींग, रेकॉर्ड, जतन, नियोजन तसेच वाचकांचे रजिस्टर, ‘फी’चे हिशोब हे तिथल्या काकांकडून मी नीट शिकून घेतले. तर नितीनने भविष्य कथनातील ग्यानबाची मेख ठरेल अशी ‘चपखल भविष्यवाणी’ शिकून घेतली. अशा रितीने आमचा धंद्याचा क्रॅश कोर्स पुर्ण झाला. परत आल्यावर मी वाचनालय सुरू करायचे ठरवले. नितीनने कुठूनतरी एका नामशेष झालेल्या राजकीय पक्षाच्या कार्यालयाची जीर्ण पाटी शोधून आणली आणि तिच्यावर ‘विद्यार्थी वाचनालय’ असे रंगवले. त्याबदल्यात मीही नितीनला जुन्या बाजारातून एका बाजूला भविष्य छापलेला पत्त्यांचा कॅट आणून दिला. अशा रितीने आमच्या व्यवसायाची सामग्री पूर्ण झाली. मग एक नवीनच अडचण उद्भवली. लोकांकडून आणलेल्या प्रत्येक पुस्तकांवर त्यांच्या नावापुढे ” xxx याजकडून विद्यार्थी वाचनालयास सप्रेम भेट” असा मजकूर लिहूनही काही उपयोग झाला नाही. लबाड वाचक आपल्या पुस्तकांवर मालकी हक्क सांगून व्यवसायात भागीदारी मागू लागले. शेवटी नाईलाजाने सर्व भागधारकांना फी माफ करावी लागली. मग माझ्या पॅसीव्ह स्वभावानुसार फक्त पैसे देणार्‍या गिर्‍हाईकांची वाट बघणेच उरले. पण नितीन ॲक्टीव्ह होता. त्याने जणू व्यवसायाचे व्रत घेतले होते. नाशिकहून आल्यापासून नितीनने वागणे बदलले. तो सकाळी सात वाजता आंघोळ आटपून, त्याला मुंजीत घेतलेला जांभळा कद नेसून, उघड्या अंगाने देवपूजा करू लागला. ओल्या केशरी गंधात धागा बुडवून त्याच्या तीन रेषा जेव्हा तो आपल्या गोर्‍या कपाळावर ओढे तेव्हा साक्षात सोपानदेवच आळंदीहून अवतरलेत असे वाटे. आत्या नितीनच्या ह्या नव्या रूपाने चकित झाली. खूप खोदून विचारल्यावर नितीनने आत्यास त्याला पंचवटीतल्या  धुम्डूम महाराजांनी दीक्षा दिल्याचे सांगितले. आत्याला दीक्षा (आपणहून) घेतात हे माहीत होते पण हा (न मागता) देण्याचा प्रकार नाशकात नव्याने सुरू झाला असावा असे वाटले.

एके दिवशी त्याचे बाबा घरात नसताना नितीनने देवपूजा आटोपल्यावर ज्योतिर्विद्येचा पहिला प्रयोग आत्यावर केला. तिला समोर बसवून, धुपाच्या धुरात डोळे झाकून पाच मिनीटे ध्यान लावले. मग आवाजाच्या एका वेगळ्याच टिपेत त्याच्या रूपाने पंचवटीतील ध्यानस्थ धुम्डूम महाराज बोलू लागले –

” माई, तुझा भूतकाळ मला स्पष्ट दिसतोय… तुझं आयुष्य फार खडतर गेलं … संसारात सूख नाही… कष्टाला फळ नाही… तू सगळ्यांसाठी खूप केलेस… पण कुणाला त्याची जाण नाही… काम झाल्यावर ते मिरवले… तूला खड्यासारखे बाजूला काढले… तुझ्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेतला … तुझ्या सरळ बोलण्याचा तिरका अर्थ काढला … वाईट घटनांचा दोष तुझ्या माथ्यावर लादला … तुझ्या पायात लक्ष्मी आहे … गृहकलहामुळे ती उंबर्‍यापाशी अडली आहे … पण लवकरच इडा-पिडा टळणार आहे… तुझे ग्रह बदलणार आहेत… त्यासाठी येत्या चंद्र नवमीला कडक उपास ठेव… गुळ घालून केलेल्या रव्याच्या खिरीचा नैवेद्य सायंकाळी शनिपारापाशी ठेव…  मगच अन्न ग्रहण कर… ओम शांती… सुखी भव!”

एवढे बोलून झाल्यावर नितीनने सावकाश डोळे उघडले व तो  आत्याची प्रतिक्रिया पाहू लागला. आपल्या पूर्वजीवना विषयीचे असे अचूक भाष्य ऐकल्यावर आत्याच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. तिने उठून नितीनला  पोटाशी धरले. त्याला सिद्धी प्राप्त झाली आहे याची तिला खात्रीच झाली. आपण गरोदर असताना एकदा आळंदीला गेलो होतो हे तिला आठवले. तिथेच कुणातरी पुण्यात्म्याने आपली कुस धन्य केली असावी असे तिला वाटले.  

क्रमश: भाग –१

लेखक – श्री रविकिरण संत

संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पीळ… – भाग -3 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ पीळ… – भाग -3 ☆ श्री दीपक तांबोळी

(मागील भागात आपण पहिले – आता तुही २८ वर्षाचा असशील.मुली बघताबघता आणि लग्न ठरेपर्यंत एक वर्ष तर निघूनच जाईल.मी असं करतो,मुली बघायला सुरुवात करतो” – आता इथून पुढे)

“पण तू पाठवलेली स्थळं बाबांना चालणार नाहीत “

“तेही खरंच आहे.पण तुझ्या बाबांचे नातेवाईकही तुझ्यासाठी स्थळं पाहतील असं वाटत नाही “” बरोबर. बाबांचं त्यांच्याशीही पटत नाही. तूच मुली पहा पण मुलीकडच्यांना सांगून ठेव की ते बाबांना भेटल्यावर तुझ्या ओळखीचा उल्लेखही करणार नाहीत.”

“चालेल.तू काही काळजी करु नकोस. मी करतो सगळं व्यवस्थित.”

” मामा मुलगी अशी खमकी पहा की तिने बाबांना सुतासारखं सरळ केलं पाहिजे “

मामा हसला.  ” बरोबर आहे तुझं.मनात आणलं तर तीच सरळ करु शकते त्यांना.बघतो तसं “त्याने फोन ठेवला.वैभवला हायसं वाटलं.बहिण गेली तरी मामाने भाच्याशी संबंध तोडले नव्हते.

एक दिवस वैभव संध्याकाळी घरी आला पण घरात शांतता पाहून त्याला आश्चर्य वाटलं.यावेळी त्याचे वडील टिव्हीवरच्या बातम्या बघत बसलेले असत.

“बाबा ss”त्याने हाक मारली.पण उत्तर आलं नाही. बुट काढून तो जयंतरावांच्या बेडरुमकडे गेला.पाहतो तर जयंतराव पलंगाखाली अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले होते.

“काय झालं?” त्याने विचारलं “पलंगावरुन पडलात का?”

त्यांनी ओठ हलवले.पण तोंडातून शब्दही बाहेर पडला नाही.

“बोला ना! काय झालं?”

त्यांनी परत ओठ हलवले.पण घशातून आवाज बाहेर आला नाही.

“बरं ठिक आहे. उठा पलंगावर झोपा “

त्यांनी डाव्या हाताने उजव्या पायाकडे इशारा केला.वैभवने उजव्या पायाला हात लावून पाहिला.त्यांचा पायजमा वर करुन पाहिला.तिथेही काही जखम नव्हती.

” काही तर झालेलं नाहिये.बरं ठिक आहे.मी तुम्हांला उचलतो “

त्यांच्या काखेतून दोन्ही हात घालून त्याने त्यांना उचललं पण जयंतराव पायच टेकवत नव्हते.मोठ्या मुश्कीलीने त्याने त्यांना पलंगावर बसवलं.

“झोपा आता “

जयंतरावांनी परत एकदा डाव्या हाताने उजवा पाय आणि हाताकडे इशारा केला.वैभवने त्यांच्या उजव्या पायाकडे पाहिलं.तो निर्जीवपणे लटकत होता.वैभव चमकला. एकदम त्याच्या लक्षात आलं आणि तो मुळापासून हादरला.त्यांना पँरँलिसीसचा अटँक आला होता.त्यात त्यांची वाचा तर गेली होतीच पण उजवा पाय आणि हात कामातून गेले होते.तो बराच वेळ सुन्नावस्थेत बसून राहिला. हजारो विचार त्याच्या डोक्यात दाटून आले.मग त्याच्या लक्षात आलं.असं बसून चालणार नव्हतं.त्यांना ताबडतोब हाँस्पिटलमध्ये अँडमीट करणं गरजेचं होतं.त्याने अँम्ब्युलन्सला फोन लावला.एका चांगल्या हाँस्पिटलमध्ये अँडमीट केलं.त्याचा संशय खरा ठरला होता.तो पँरँलिसीसचाच अटँक होता.

“डाँक्टर ते बरे होतील का यातून?”त्याने चिंतातूर आवाजात डाँक्टरांना विचारलं.

“आपण प्रयत्न करु.पण रिकव्हरीला किती वेळ लागेल आपण सांगू शकत नाही. तुम्हांला आता त्यांची खुप काळजी घ्यावी लागेल.त्यांचं सगळं बेडवरच करावं लागणार आहे.तेव्हा त्यांना स्वच्छ ठेवणं, रोज मालीश करणं,वेळच्या वेळी मेडिसीन देणं या गोष्टी तुम्हांलाच कराव्या लागणार आहेत. “

वैभवने मान डोलावली आणि तो विचारात गढून गेला.थोड्या वेळाने त्याने सगळ्या नातेवाईकांना कळवलं.नातेवाईक येतीलही.दोनचार सहानुभूतीचे शब्द बोलतील पण जयंतरावांच्या सेवेसाठी कुणीही थांबणार नाही हे त्याला माहित होतं.मामा आला तेव्हा तो त्याच्या गळ्यात पडून खुप रडला.

“वैभव एखादा माणूस लावून घे त्यांचं सगळं करायला.म्हणजे तू मोकळा रहाशील. “

” अशी माणसं खुप पैसे मागतात मामा शिवाय मी घरात नसेन.त्याने घरात चोऱ्याबिऱ्या केल्या तर?”

” ती रिस्क तर आहेच पण पर्याय तरी काय आहे?तुला एकट्याला ते करणं कठीण आहे.आणि पैशांची काही काळजी करु नकोस.मी देत जाईन “

“ज्या बाबांनी तुला आयुष्यभर शिव्या दिल्या त्यांच्या सेवेसाठी तू पैसे देणार?”

” मी तुझ्यासाठी करतोय हे सर्व. तुझं आरोग्य आणि मनःस्वास्थ्य बिघडू नये म्हणून “

वैभव गहिवरला.त्याने परत मामाला मिठी मारली.

पंधरा दिवसांनी तब्येतीत काहीही सुधारणा होत नाही हे पाहून जयंतरावांना घरी पाठवण्यात आलं.वैभवने घरात आल्यावर त्यांना पलंगावर झोपवलं.त्यांच्या चेहऱ्याकडे त्याने पाहिलं.तिथे कोणत्याही भावना त्याला दिसल्या नाहीत. त्याच्या मनात विचार आला ‘या माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांवर हुकूमत गाजवण्यात घालवलं.आज हा असा लाचार होऊन पडलाय.बरी जिरली.आता कुणावर हुकूमत गाजवणार?ती घमेंड ,अहंकार यांना कसं कुरवाळणार?खरंच छान झालं.देवाने छान शिक्षा केली.आता तुम्ही सर्वस्वी माझ्यावर अवलंबून रहाणार.आता मीच कसा तुम्हांला नाचवतो बघा.’

त्याने आनंदाने जयंतरावांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ते त्याच्याचकडे पहात होते.मात्र आता त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित होतं.ते वैभवबद्दल वाटणाऱ्या प्रेमाचं स्मित होतं की वैभवची थट्टा करणारं होतं ते वैभवला कळलं नाही. थोड्या वेळाने त्याला कळलं आणि तो हादरुन गेला.त्या स्मितामागचा अर्थ त्याला कळला होता.ते विजयाचं हसू होतं.विकलांग होऊनही जयंतरावांची सरशी झाली होती. लोकलाजेस्तव का होईना वैभवला वडिलांची सेवा करावीच लागणार होती .त्यांची तब्येत अजून बिघडू नये म्हणून त्यांच्या आरोग्याची जास्तच काळजी त्याला घ्यावी लागणार होती.वडिल विकलांग आहेत म्हणून त्याच्याशी कुणी मुलगी लवकर लग्न करणार नव्हती.कदाचित ते जिवंत आहेत तोपर्यंत त्याचं लग्न होणं कठीण होतं किंवा मग रुप,शिक्षण,सामाजिक दर्जा विसरुन,अनेक तडजोडी स्विकारुन वैभवला मुलगी निवडावी लागली असती.म्हणजे बायकोबद्दल ज्या ज्या कल्पना त्याने केल्या होत्या,जी जी स्वप्नं रंगवली होती ती पुर्णत्वाला येणं अशक्यच दिसत होतं.

त्या विचारासरशी वैभवचं डोकं तापू लागलं.वडिलांकडे पहात तो संतापाने ओरडला,

“झालं समाधान?आयुष्यभर माझ्या आईचा छळ केलात,तिच्या माहेरच्यांचा छळ केलात.आता मीच उरलो होतो तर माझाही छळ सुरु केलात ना?मी आता कामंधामं सोडून फक्त तुमच्याकडेच बघत रहायचं का?माझीही काही स्वप्नं आहेत,काही महत्वाकांक्षा आहेत.त्या सगळ्यांवर मी तुमच्यासाठी पाणी सोडायचं का?…..……”

तो संतापाने ओरडत होता.त्यांच्या दुष्ट वागणुकीचा इतिहास उकरुन काढत होता.

जयंतराव बोलू तर शकत नव्हते पण मुलाच्या अशा ओरडण्याने ते घाबरुन गेल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते.जोरजोराने बोलता बोलता एका क्षणी वैभवचा तोल गेला आणि तो किंचाळून म्हणाला,

“असा माझा मानसिक, शारीरिक छळ करण्यापेक्षा तुम्ही मरुन का नाही गेलात?”

ते ऐकून आधीच भेदरुन गेलेले जयंतराव घशातून विचित्र आवाज काढत ढसाढसा रडू लागले.डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.बापाला इतकं केविलवाणं रडतांना वैभव आज पहिल्यांदाच पहात होता.त्याच्यातल्या संतापाची जागा हळूहळू करुणेनं घ्यायला सुरुवात केली.ह्रदयाला पीळ पडू लागला.त्याला लहानपणापासूनचे वडील आठवायला लागले.एकुलता एक मुलगा म्हणून त्याचे लाड करणारे,त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारे,त्याला थोडंही काही लागलं की कासावीस होणारे,सायकलवरुन त्याला शाळेत पोहचवणारे,त्याचा वाढदिवस दणक्यात साजरा करणारे,त्याचा प्रत्येक हट्ट पुरवणारे वडील त्याला आठवू लागले.एकदा त्याचा अपघात होऊन तो पंधरा दिवस हाँस्पिटलमध्ये अँडमीट होता तेव्हा दिवसरात्र ते त्याच्याजवळ बसून होते.बायको आणि मेव्हण्याशी ते वाईट वागत असले तरी वैभवशी ते नेहमीच प्रेमाने वागत आले होते.त्यांच्या तापट स्वभावामुळे वैभव मोठा झाल्यावर दोघा बापलेकांचे थोडेफार खटके उडायचे पण तेव्हा जयंतरावच बऱ्याचवेळा नमतं घ्यायचे.वैभव नागपूरला शिकण्यासाठी निघाला तेव्हा त्याला निरोप देतांना त्यांनी मारलेली मिठी आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी वैभवला आजही आठवत होतं.त्या आठवणींनी वैभव कासावीस झाला.’आज वडिलांची वाईट अवस्था झाली म्हणून आपण त्यांच्यावर संतापतोय,ओरडतोय.समजा त्यांच्याऐवजी आपलीच अशी अवस्था असती तर ते असेच आपल्याशी वाईट वागले असते?नाही.आपल्याला असंच मरुन जा म्हणाले असते? शक्यच नाही.दुसऱ्यांशी ते कसेही वागले तरी बाप म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य चोख पार पाडलं आणि मुलगा म्हणून आपलं कर्तव्य निभावण्याची वेळ आली तर आपण अशी चिडचिड करतोय.त्यांना सरळ मरुन जा असं म्हणतोय ‘ या विचारासरशी वैभवला आपल्या वागण्याची लाज वाटली.त्याला एकदम गहिवरुन आलं आणि दुसऱ्याच क्षणाला त्याने वडिलांना घट्ट मिठी मारली.

“नका रडू बाबा.नका रडू.मी चुकलो.मी असं बोलायला नको होतं.तुम्हाला माझ्याशिवाय आणि मलाही तुमच्याशिवाय या जगात दुसरं कोण आहे?काही काळजी करु नका मी तुमचं सगळं व्यवस्थित करेन “

त्याने त्यांच्याकडे पाहिलं.ते अजूनही केविलवाणे रडत होते.वैभवला एकदम भडभडून आलं.तो रडू लागला तसं जयंतरावांनी डाव्या हाताने त्याला जवळ ओढलं आणि ते त्याच्या डोक्यावरुन,पाठिवरुन प्रेमाने हात फिरवू लागले.

 – समाप्त –

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पीळ… – भाग -2 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ पीळ… – भाग -2 ☆ श्री दीपक तांबोळी

 (मागील भागात आपण पाहिले – सात आठ वर्षांपूर्वी ते श्यामलाबाईंचं हक्क सोड प्रकरण झालं आणि जयंतरावांनी दोघा मायलेकांना संजू मामाकडे जायला मनाई केली. तेव्हापासून संजू मामाशी त्यांचे संबंध तुटले होते. आता इथून पुढे )

 जयंतराव संजूचा रागराग करण्याचं अजून एक कारण होतं. जयंतरावांच्या लग्नाच्या वेळी आणि पुढची दहाबारा वर्षं संजूची परिस्थिती जवळजवळ गरीबीचीच होती. पण पुढे संजूने बांधकाम क्षेत्रात पाऊल टाकलं आणि त्याचं नशीब फळफळलं. गरीब संजू म्हणता म्हणता धनाढ्य शेठ होऊन गेला. सात आठ वर्षांपूर्वी त्याने मोठा बंगला बांधला. घरी दोन दोन चारचाकी आल्या. . गावांतल्या मोठमोठ्या लोकांशी, राजकीय पुढाऱ्यांशी त्याची चांगली घसट वाढली. . जयंतरावांचा एक नातेवाईक संजूच्या घराजवळच रहात होता. त्याच्याकडून त्यांना संजूच्या प्रगतीबद्दल कळायचं आणि मग त्यांचा जास्तच जळफळाट व्हायचा.

तिसऱ्या दिवशी संजू आणि विद्या परत आले. निमंत्रण नसतांना ते आल्याचं पाहून जयंतराव खवळले. वैभवला त्यांनी त्यांच्या खोलीत बोलावून घेतलं.

” वैभव तुझ्या मामा, मावशीला कोणी बोलावलं होतं?”त्यांनी रागाने विचारलं,

“मी बोलावलं होतं. का?”वैभव त्यांच्या नजरेला नजर भिडवत धिटाईने बोलला. जयंतराव क्षणभर चुप झाले. मग उसळून म्हणाले,

“आता पुढच्या विधींसाठी तरी त्यांना बोलावू नकोस. त्यांची बहिण गेली संपले त्यांचे संबंध “

” विधी संपेपर्यंत तरी त्यांचे संबंध रहातील बाबा आणि तोपर्यंत तरी मी त्यांना बोलावणारच. मग पुढचं पुढे पाहू “वैभव जोरातच बोलला पण मग त्याचं त्यालाच आश्चर्य वाटलं. आजपर्यंत तो वडिलांशी अशा भाषेत बोलला नव्हता. का कुणास ठाऊक पण आता त्याला वडिलांची भिती वाटेनाशी झाली होती.

दशक्रिया विधी झाला पण पिंडाला कावळा शिवेना. कावळे घिरट्या घालत होते पण पिंडाला शिवत नव्हते. श्यामलाबाईंची शेवटची इच्छा काय होती हेच कुणाला कळत नव्हतं. सगळे उपाय थकले. वैभव रडू लागला. जयंतरावांचेही डोळे भरुन आले होते. अचानक संजूमामाला काय वाटलं कुणास ठाऊक. तो पुढे आला आणि वैभवला जवळ घेऊन म्हणाला,

” ताई काही काळजी करु नकोस. आम्ही मरेपर्यंत तुझ्या मुलाला अंतर देणार नाही. त्याचं लग्न, संसार सगळं व्यवस्थित करुन देऊ. “

तो तसं म्हणायचा अवकाश, कावळ्यांची फौज पिंडावर तुटून पडली. वैभव मामाला घट्ट मिठी मारुन रडू लागला. जयंतरावांना मात्र अपमान झाल्यासारखं वाटलं. याचा अर्थ स्पष्टच होता की मेल्यानंतरही बायकोचा त्यांच्यावर विश्वास नव्हता.

तेराव्याचा कार्यक्रम आटोपल्यावर मामा वैभवजवळ आला.

“वैभव आम्ही आता निघतो. आता यापुढे तुझ्या घरी आमचं येणं होईल की नाही ते सांगता येत नाही. पण तू आमच्याकडे नि:संकोच येत जा. काही मदत लागली तर आम्हांला सांगायला संकोचू नको. तुझ्या लग्नाचंही आम्ही बघायला तयार आहोत पण तुझ्या वडिलांना ते चालेल का? हे विचारुन घे. तुझ्या आईला तुझी काळजी घ्यायचं मी वचन दिलंय ते मी मरेपर्यंत विसरणार नाही. अडचणीच्या वेळी रात्रीबेरात्री केव्हाही काँल कर, मी मदतीला हजर असेन. बरं. ताईच्या आजारपणात तुझा खर्च खुप झाला असेल म्हणून मी तुझ्या खात्यात दोन लाख ट्रान्सफर केले आहेत. पाहून घे. आणि हो. परत करायचा वेडेपणा करु नकोस. माझ्या बहिणीच्या कार्यासाठी मी खर्च केलेत असं समज “

वैभवला भडभडून आलं. त्याने मामाला मिठी मारली. रडतारडता तो म्हणाला,

” मी खुप एकटा पडलोय रे मामा. हे बाबा असे तिरसट स्वभावाचे. कसं होईल माझं ?”

“काही काळजी करु नकोस. आता बायको गेल्यामुळे तरी त्यांच्या स्वभावात फरक पडेल असं वाटतंय. “

वैभव काही बोलला नाही पण मामाचं बोलणं कितपत खरं होईल याचीच त्याला शंका वाटत होती.

सगळे पाहुणे गेल्यावर दोनतीन दिवसांनी वैभव वडिलांना म्हणाला,

“तुम्ही त्या मामाचा नेहमी रागराग करता पण बघा, शेवटी तोच मदतीला धावून आला. आईच्या अंत्यविधीसाठी त्यानेच मदत केली. शेवटी जातांनाही मला दोन लाख रुपये देऊन गेला. तुमच्या एकातरी नातेवाईकाने एक रुपया तरी काढून दिला का?”

एक क्षण जयंतराव चुप बसले मग उसळून म्हणाले,

“काही उपकार नाही केले तुझ्या मामाने!वडिलोपार्जित वाडा ८० लाखाला विकला. तेव्हा तुझ्या आईच्या हिश्शाचे ८ लाख त्याने स्वतःच खाऊन टाकले. एक रुपया तरी दिला का त्याने?”” चुकीचं म्हणताय तुम्ही. आई आणि मावशीनेच विनामुल्य हक्क सोडपत्र करुन दिलं होतं. मामा तर त्यांचा हिस्सा द्यायला तयार होता असं आईनेच मला तसं सांगितलं होतं. “

” खोटं आहे ते!गोडगोड बोलून त्याने त्यांच्याकडून सह्या करुन घेतल्या आणि नंतर त्यांना रिकाम्या हाताने घरी पाठवलं. महाहलकट आहे तुझा मामा. “

आता मात्र वैभव खवळला.

“बस करा बाबा. आख्खं आयुष्य तुम्ही मामाला शिव्या देण्यात घालवलं. आता आई गेली. संपले तुमचे संबंध. आणि मला तर कधीच मामा वाईट दिसला नाही. तुम्ही किती त्याच्याशी वाईट वागता. त्याला हिडिसफिडीस करता. पण तो नेहमीच तुमच्याशी आदराने बोलतो. फक्त तुम्हांलाच तो वाईट दिसतो. विद्यामावशीच्या नवऱ्याचं तर त्याच्याशिवाय पान हलत नाही. त्याचा सल्ला घेतल्याशिवाय ते कुठलंही काम करत नाहीत. इतके त्या दोघांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. “

” बस पुरे कर तुझं ते मामा पुराण “जयंतराव ओरडून म्हणाले “मला त्यात आता काडीचाही इंटरेस्ट उरला नाहिये. आणि आता यापुढे मामाचं नावंही या घरात काढायचं नाही. समजलं ” त्यांच्या या अवताराने वैभव वरमला. आपल्या बापाला कसं समजवावं हे त्याला कळेना.

वैभव दिवसभर ड्युटीनिमित्त बाहेर असल्यामुळे जयंतराव घरी एकटेच असायचे. हुकूम गाजवायला आता बायको उरली नसल्याने त्यांना आयुष्यभर कधीही न केलेली कामं करावी लागत होती. घरच्या कामांसाठी बाई होती तरीसुद्धा स्वतःचा चहा करुन घेणं, पाणी भरणं इत्यादी कामं त्यांना करावीच लागायची. त्यामुळे त्यांची खुप चिडचिड व्हायची. स्वयंपाकाला त्यांनी बाई लावून घेतली होती पण बायकोच्या हातच्या चटकदार जेवणाची सवय असणाऱ्या जयंतरावांना तिच्या हातचा स्वयंपाक आवडत नव्हता. तिच्या मानाने वैभव छान भाज्या बनवायचा. म्हणून संध्याकाळी तो घरी आला की ते त्याला भाजी करायला सांगायचे. थकूनभागून आलेला वैभव कधीकधी त्यांच्या आग्रहास्तव करायचा देखील. पण रोजरोज त्याला शक्य होत नव्हतं. त्याने नाही म्हंटलं की दोघांचेही खटके उडायचे.

एक दिवस वैभव संतापून त्यांना म्हणाला,

“एवढंच जर चटकदार जेवण तुम्हांला आवडतं तर आईकडून शिकून का नाही घेतलंत?”

” मला काय माहीत ती इतक्या लवकर जाईल म्हणून!”

“हो. पण कधी तरी आपण स्वयंपाक करुन बायकोला आराम द्यावा असं तुम्हांला वाटलं नाही का?आईच्या आजारपणातही तुम्ही तिला स्वयंपाक करायला लावायचात. तिचे हाल पहावत नव्हते म्हणून मीच स्वयंपाक शिकून घेतला पण तुम्हांला कधीही तिची किंव आली नाही ” ” मीच जर स्वयंपाक करायचा तर बायकोची गरजच काय?”

“याचा अर्थ तुम्ही आईला फक्त स्वयंपाक करणारी, घरकाम करणारी बाई असंच समजत होतात ना?माणूस म्हणून तुम्ही तिच्याकडे पाहिलंच नाही ना?”

“चुप बैस. मला शहाणपणा शिकवू नकोस. नसेल करायची तुला भाजी तर राहू दे. मी बाहेर जाऊन जेवून येतो “

“जरा अँडजस्ट करायला शिका बाबा. एवढंही काही वाईट बनवत नाहीत त्या स्वयंपाकवाल्या मावशी “

जयंतरावांनी त्याच्याकडे जळजळीत नजरेने पाहिलं मग ते कपडे घालून बाहेर निघून गेले. ते हाँटेलमध्ये जेवायला गेलेत हे उघड होतं.

वैभवला आता कंपनीतून घरी यायचीच इच्छा होत नव्हती. एकतर घरी आल्याआल्या हातात चहाचा कप हातात ठेवणारी, सोबत काहीतरी खायला देणारी आई नव्हती शिवाय घरी आल्याआल्या वडिलांचा चिडका चेहरा बघितला की त्याचा मुड खराब व्हायचा. त्यांच्या तापट स्वभावामुळे वडिलांबद्दल त्याला कधीही प्रेम वाटलं नव्हतं. जयंतरावांनी नोकरीत असतांना कधी घरात काम केलंच नव्हतं पण निव्रुत्तीनंतरही सटरफटर कामं सोडली तर दिवसभर टिव्ही पहाण्याव्यतिरिक्त ते कोणतंही काम करत नव्हते. बायको होती तोपर्यंत हे सगळं ठिक होतं पण ती गेल्यावरही वैभवच्या अंगावर सगळी कामं टाकून ते मोकळे व्हायचे. वैभवची त्याच्यामुळे चिडचिड व्हायची.

एक दिवस त्याने वैतागून मामाला फोन लावला,

” मामा या बाबांचं काय करायचं रे? खुप वैताग आणलाय त्यांनी. आजकाल घरातच थांबावसं वाटत नाही बघ मला “

” हे असं होणार याची कल्पना होतीच मला. तुझ्या वडिलांना मी गेल्या तेहतीस वर्षांपासून ओळखतोय. एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे. तुझ्या आईलाही खूप त्रास दिलाय त्यांनी. विचार कर कसा संसार केला असेल तिने. पण इतका त्रास सहन करुनही कधीही तिने आम्हांला नवऱ्याबद्दल वाईट सांगितलं नाही. कधी तक्रार केली नाही. ” पदरी पडलं आणि पवित्र झालं “एवढंच ती म्हणायची. तू एकदोन महिन्यातच त्यांना कंटाळून गेला. तिने तेहतीस वर्ष काढली आहेत अशा माणसासोबत. आम्हीही सहन केलंच ना त्यांना. माझा तर कायम दुःस्वास केला त्या माणसांने. कधी आदराने, प्रेमाने बोलला नाही. उलट संधी मिळेल तेव्हा चारचौघात अपमान करायचा. खुप संताप यायचा. कधीकधी तर ठोकून काढायची इच्छा व्हायची. पण बहिणीकडे बघून आम्ही शांत बसायचो. तुही जरा धीर धर. लवकरात लवकर लग्न करुन घे म्हणजे तुलाही एक प्रेमाचं माणूस मिळेल. “

“मी लग्नाला तयार आहे रे पण येणाऱ्या सुनेशी तरी बाबा चांगले वागतील का? की तिलाही आईसारखाच त्रास देतील?”

” हो. तोही प्रश्न आहेच. पण लग्न आज उद्याकडे करावंच लागणार आहे. आता तुही २८ वर्षाचा असशील. मुली बघताबघता आणि लग्न ठरेपर्यंत एक वर्ष तर निघूनच जाईल. मी असं करतो, मुली बघायला सुरुवात करतो “

क्रमश: भाग २

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पीळ… – भाग -1 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

अल्प परिचय — 

प्रकाशित साहित्य:-

कथासंग्रह

कथा माणुसकीच्या, हा खेळ भावनांचा, रंग हळव्या मनाचे, गिफ्ट आणि अशी माणसं अशा गोष्टी

पुरस्कार-

विविध मान्यवर साहित्य मंडळांचे 16 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत

? जीवनरंग ?

☆ पीळ… – भाग -1 ☆ श्री दीपक तांबोळी

डाँक्टरांनी श्यामलाबाईंच्या छातीवर स्टेथास्कोप ठेवून थोडा वेळ तपासणी केली. मग वैभवकडे पहात ते म्हणाले,

” साँरी शी इज नो मोअर “

ते ऐकताच वैभवने “आईsss”असा जोरात हंबरडा फोडत आईच्या पार्थिवाला मिठी मारली आणि तो हमसून हमसून रडू लागला. जरा सावरल्यावर त्याने बाजूला पाहिलं. त्याचे वडील-जयंतराव खुर्चीवर बसून रडत होते. गेली पाचसहा वर्ष श्यामलाबाईंच्या आजारपणामुळे जे हाल बापलेकांचे झाले होते त्यांचं स्पष्ट प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं दिसत होतं. पाचसहा वर्षं प्रचंड प्रयत्न करुन आणि पाण्यासारखा पैसा खर्च करुनही हाती शुन्य लागलं होतं. एकुलत्या एक मुलाचं लग्न बघायची श्यामलाबाईंची खुप इच्छा होती पण तीही अपूर्ण राहिली होती.

त्याच्या खांद्यावर हात पडला तसं वैभवने वळून पाहिलं. शेजारपाजारचे बरेच जण जमा झाले होते. त्याच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या पाटील काकांनी त्याला नजरेने इशारा केला तसा तो उठून त्यांच्यासोबत बाहेर आला.

” वैभव कुणाला फोन करुन कळवायचं असेल तर मला नंबर दे मी फोन करतो “

‘ मामा, मावशीला सोडून सगळ्यांना कळवून टाक वैभव ” अचानक जयंतराव मागून येत म्हणाले,

” असं कसं म्हणता बाबा?त्यांची सख्खी बहिण होती आई “

” असू दे. मला नकोत ती दोघं इथं “

” कमाल करता जयंतदादा तुम्ही!अहो तुमची काहिही भांडणं असोत. सख्ख्या भाऊबहिणीला कळवणं आवश्यकच आहे.  ” पाटील काका आश्चर्य वाटून म्हणाले.  

” बरोबर म्हणताय पाटील काका तुम्ही.  अहो भाऊबहिण आले नाही तर बाईंच्या पिंडाला कावळा तरी शिवेल का? काही काय सांगताय जयंतदादा?”

घोळक्यात बसलेली एक म्हातारी रागावून म्हणाली तसे जयंतराव चुप बसले. वैभवने त्यांच्या रागावलेल्या चेहऱ्याकडे दुर्लक्ष करत मोबाईल काढला आणि पहिला फोन संजूमामाला लावला.  ‘मामा ,  अरे आई गेली.  ‘ संजू रडत रडत बोलला.

” “काय्य्यsss?कधी आणि कशी?”मामा ओरडला आणि रडू लागला.

” आताच गेली आणि तुला तर माहितीच आहे की ती पाचसहा वर्षापासून आजारीच होती.  तिला काय झालंय हे डाँक्टरांना शेवटपर्यंत कळलं नाही.  मागच्या आठवड्यात तिला रक्ताच्या उलट्या होत होत्या म्हणून आयसीयूत अँडमीट केलं होतं.  काल डाँक्टरांनी ट्रिटमेंटचा काही उपयोग होत नाहिये हे पाहून तिला घरी घेऊन जायला सांगितलं होतं. म्हणून काल घरी घेऊन आलो होतो. कालपासून ती मला मामाला बोलव असं म्हणत होती “

“अरे मग कळवलं का नाही मला?मी ताबडतोब आलो असतो “

वैभव बाहेर अंगणात आला. आसपास जयंतराव नाहीत हे पाहून हळूच म्हणाला,  

” बाबांनी मला तुला कळवायला मनाई केली होती”

एक क्षण शांतता पसरली मग मामा जोरात ओरडून म्हणाला,

“हलकट आहे तुझा बाप.  मरतांना सुद्धा त्याने माझ्या बहिणीची इच्छा पुर्ण केली नाही “

आता मामा जोरजोरात रडू लागला. ते ऐकून वैभवही रडू लागला.

थोड्या वेळाने भावना ओसरल्यावर मामा म्हणाला,

“मी निघतो लगेच. विद्या मावशीला तू कळवलंय का?”

“नाही.  बाबांनी मना केलं होतं “

” खरंच एक नंबरचा नीच माणूस आहे. पण आता त्याच्यावर बोलण्याची ही वेळ नाही.  मी कळवतो विद्याला आणि मी लगेच निघतो.  तरी मला तीन तास तरी लागतील पोहचायला,  तोपर्यंत थांबवून ठेव तुझ्या बापाला.  नाहितर आमची शेवटची सुध्दा भेट होऊ नये म्हणून मुद्दाम घाई करायचा “

” नाही मामा. मावशी आणि तू आल्याशिवाय मी बाबांना निघू देणार नाही.  खुप झाली त्यांची नाटकं. आता मी त्यांचं ऐकून घेणार नाही “

” गुड. बरं तुला पैशांची मदत हवीये का?”

वैभवला गहिवरून आलं. बाबा मामाशी किती वाईट वागले पण मामाने आपला चांगूलपणा सोडला नव्हता.

“नको. सध्यातरी आहेत.  अडचण आलीच तर तसं तुला सांगतो.  “

” बरं. ठेवतो फोन “

मामाने फोन ठेवला आणि वैभवला मागच्या गोष्टी आठवू लागल्या. संजूमामा आणि जयंतराव यांचं भांडण अगदी जयंतरावांच्या लग्नापासून होतं आणि त्यात चूक जयंतरावांच्या वडिलांचीच होती. लग्नाला “आमची फक्त पन्नास माणसं असतील” असं अगोदर सांगून जयंतरावांचे वडील दोनशे माणसं घेऊन गेले होते. बरं वाढलेल्या माणसांची आगावू कल्पनाही त्यांनी मुलीकडच्या लोकांना दिली नाही.  अचानक दिडशे माणसं जास्त आल्यामुळे संजूमामा गांगरला. त्यावेळी कँटरर्सना जेवणाचे काँट्रॅक्ट देण्याची पध्दत नव्हती. अर्थातच ऐनवेळी किराणा आणून जेवण तयार करण्यात साहजिकच उशीर झाला. जेवण्याच्या पंगतीला उशीर झाला, वराकडच्या मंडळींना ताटकळत बसावं लागलं म्हणून जयंतरावांच्या वडिलांनी आरडाओरड केली.  आतापर्यंत शांततेने सगळं निभावून नेणाऱ्या संजूमामाचा संयम सुटला आणि त्याने सगळ्या लोकांसमोर जयंतरावांच्या वडिलांची चांगलीच कान उघाडणी केली. नवरामुलगा म्हणून जयंतराव त्यावेळी काही बोलले नाहीत पण वडिलांचा अपमान केला म्हणून त्यांनी संजूमामाशी कायमचा अबोला धरला. मात्र संधी मिळाली की ते चारचौघात संजूमामाचा पाण उतारा करत.  त्याला वाटेल ते बोलत. इतर नातेवाईंकांमध्येही त्याची बदनामी करत,  पण आपल्या बहिणीचा संसार व्यवस्थित रहावा म्हणून संजू सगळं सहन करत होता.  सात आठ वर्षांपूर्वी संजूचा जुना वडिलोपार्जित वाडा विकला गेला.  त्यावेळी वैभवच्या आईने जयंतरावांना न सांगताच एक रुपयाही हिस्सा न घेता हक्कसोड पत्रावर सह्या केल्या होत्या. तिचंही साहजिकच होतं. ज्या माणसाने आयुष्यभर आपल्या भावाचा अपमान केला त्याला आपल्या वडिलोपार्जित इस्टेटीतला एक रुपयाही द्यायची त्या माऊलीची इच्छा नव्हती. एक वर्षाच्या आतच जयंतरावांना ही गोष्ट कुठूनतरी कळली आणि त्यांनी एकच आकांडतांडव केलं. श्यामलाबाईंना आणि संजूला खुप शिव्या दिल्या. संजूशी आधीच संबंध खराब होते ते आता कायमचेच तोडून टाकले. तीन महिने ते श्यामला बाईंशी बोलले नाहीत. त्या दिवसांनंतर त्यांनी आपल्या सासरी पाऊलही टाकलं नाही. संजूने मात्र आपलं कर्तव्य सोडलं नाही. दर दिवाळीला तो आपल्या बहिण, मेव्हण्याला न चुकता निमंत्रण द्यायचा पण जयंतराव त्याच्याशी बोलायचे नाहीत शिवाय श्यामला बाईंनाही माहेरी पाठवायचे नाहीत. श्यामलाबाईंच्या शेवटच्या दिवसात त्यांची भावाला भेटायची इच्छाही त्यांनी पुर्ण होऊ दिली नव्हती.

बरोबर तीन तासांनी संजू आला. आल्याआल्या आपल्या मेव्हण्याला भेटायला गेला. आपल्यापरीने त्याने जयंतरावांना सांत्वन करायचा प्रयत्न केला. पण जयंतराव त्याच्याशी एक शब्दानेही बोलले नाहीत. सुंभ जळाला पण पीळ मात्र तसाच होता. थोड्या वेळाने विद्या आली. तिने मात्र काळवेळ न बघता बहिणीच्या तब्येतीबद्दल काहीही न कळविल्याबद्दल जयंतरावांची चांगलीच खरडपट्टी काढली. तिच्याशीही जयंतराव एक शब्दानेही बोलले नाहीत.

अंत्यविधी पार पडला. सगळे घरी परतले. जयंतराव वैभवला घेऊन मागच्या खोलीत आले.

“वैभव कार्य पार पडलं. मामा मावशीला घरी जायला सांग “

वैभव एक क्षणभर त्यांच्याकडे पहातच राहिला. मग संतापून म्हणाला.

” कमाल करता बाबा तुम्ही!आईला जाऊन आताशी पाचसहा तासच झालेत आणि तिच्या सख्ख्या भावाबहिणीला मी घरी जायला सांगू?”

” मला ते डोळ्यासमोर सुध्दा नको आहेत “

आता मात्र वैभवची नस तडकली.  वेळ कोणती आहे आणि हा माणूस आपलं जुनं वैर कुरवाळत बसला होता. तो जवळजवळ ओरडतच म्हणाला, ” मी नाही सांगणार. तुम्हांला सांगायचं असेल तर तुम्हीच सांगा. अशीही या दु:खाच्या प्रसंगी मला मामा मावशीची खुप गरज आहे”तो तिथून निघून बाहेर आला. बाहेरच्या खोलीत विद्या मावशी संजू मामाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होती. तिला तसं रडतांना पाहून वैभवला ही भडभडून आलं आणि तो मावशीला मिठी मारुन रडू लागला. मामा त्यांच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाला,

” वैभव काही काळजी करु नकोस. आम्ही आहोत ना!तुझ्या वडिलांमुळे आम्हांला मनात असुनही तुम्हांला मदत करता आली नाही. पण तू मात्र बिनधास्त आमच्याशी बोलत रहा. काही गरज लागली तर नि:संकोचपण सांग “

कित्येक वर्षात असं कुणी वैभवशी प्रेमाने बोललंच नव्हतं. ” खरंच आईच्या आजारपणात मामाचा आधार असता तर किती बरं वाटलं असतं. काय सांगावं कदाचित आई बरी सुद्धा झाली असती “वैभवच्या मनात विचार येऊन गेला.

” चल आम्ही निघतो. तिसऱ्या दिवशी परत येतो “मामा म्हणाला,

“का?थांबा ना. मी इथे एकटा पडेन. तुम्ही दोघं थांबलात तर बरं वाटेल “

” मला कल्पना आहे. पण नको. तुझा बाप आम्ही कधी जातो याकडे डोळे लावून बसला असेल. ते आमच्याशी बोलत नसतांना आम्हालाही घरात कोंडल्यासारखं होईल “

मामा बरोबरच म्हणत होता त्यामुळे वैभवचा नाईलाज झाला. मामामावशी गेले तसा वैभव उदास झाला. त्याला लहानपणीचे दिवस आठवले. खुप मजा यायची मामाकडे रहायला. दिवाळी आणि उन्हाळ्यातल्या सुट्यांची तो आतुरतेने वाट बघत असायचा. केव्हा एकदा सुट्या लागतात आणि मामाकडे जातो असं त्याला होऊन जायचं. वैभवला सख्खे भाऊबहिण नव्हते.  त्यातून वडिलांचा स्वभाव असा शिघ्रकोपी. त्यामुळे स्वतःच्या घरी असंही त्याला करमायचं नाही.  मामाकडे मात्र मोकळेपणा असायचा. तिथे गेल्यावर मामाची मुलं, विद्या मावशीची मुलं आणि तो स्वतः खुप धिंगाणा घालायचे. गंमत म्हणजे त्यावेळीही मोबाईल होते पण मामा मुलांना मोबाईलला हात लावू द्यायचा नाही. त्यामुळे ही मुलं दिवसभर खेळत असायची. प्रेमळ आजी जितके लाड करायची त्यांच्या दुप्पट लाड मामा करायचा. तेव्हा मामाची आर्थिक स्थिती जेमतेमच होती तरीही मामा खर्चाच्या बाबतीत हात आखडता घेत नसे. खाण्यापिण्याची तर खुप रेलचेल असायची. रात्री गच्चीवर झोपता झोपता मामा आकाशातल्या ग्रह ताऱ्यांची माहिती द्यायचा. मामाकडे सुटीचे दिवस कधी संपायचे तेही कळत नसायचं.

” गेले ते आनंदाचे दिवस “वैभव मनातल्या मनात बोलला. त्याला आठवलं तो मोठा झाला,  इंजिनीयर झाला तरीही मामाच्या घरी जायची त्याची ओढ कधीही कमी झाली नाही. सात आठ वर्षांपूर्वी ते श्यामलाबाईंचं हक्क सोड प्रकरण झालं आणि जयंतरावांनी दोघा मायलेकांना संजू मामाकडे जायला मनाई केली. तेव्हापासून संजू मामाशी त्यांचे संबंध तुटले होते.

क्रमश: भाग १ –  

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print