ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २२ फेब्रुवारी – संपादकीय (2) – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? २२ फेब्रुवारी –  संपादकीय  ? 

विनायक सदाशिव वाळिंबे (वि. स. वाळिंबे) (11ऑगस्ट 1928 – 22 फेब्रुवारी 2000)

वि. स. वाळिंबे या लेखक व पत्रकारांचे शिक्षण पुण्यात झाले. इ. स.1948साली गांधीहत्येनंतर रा. स्व. संघावर घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधातील सत्याग्रहात सहभागी झाल्यामुळे त्यांना तीन महिने येरवडा कारागृहात ठेवण्यात आले. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला.

1962-63मध्ये ते ‘केसरी’ वृत्तपत्रात वृत्तसंपादक म्हणून काम करू लागले. पत्रकारितेच्या प्रशिक्षणासाठी ते  कार्डिफ येथे गेले होते.

त्यांनी विशेषकरून ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. ‘1857ची संग्रामगाथा’, ‘गरुडझेप’, ‘मध्यरात्रीचा स्वातंत्र्यसूर्य ‘, ‘वॉर्सा ते हिरोशिमा ‘, ‘व्होल्गा जेव्हा लाल होते ‘, ‘श्री शिवराय ‘, ‘सावरकर’, ‘हिटलर’ यासारख्या अनेक ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.

त्याचप्रमाणे ‘अरुण शोरी : निवडक लेख’, ‘इंदिराजी ‘, ‘इन जेल’, ‘भारत विकणे आहे ‘वगैरे बऱ्याच पुस्तकांचे मराठीत अनुवाद केले.

इतिहास वा तो घडवणारी माणसे यांचे त्यांना आकर्षण होते. तीच त्यांची प्रेरणा होती. इतिहासाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण असूनही त्यांचे लिखाण क्लिष्ट, कोरडे झाले नाही की इतिहासाला जिवंत करण्याच्या  नादात भावाविवशही झालं नाही.

अभ्यास आणि कष्ट करून त्यांनी निवडून -पारखून घेतलेला तपशील, ते वाचनीयता व रसवत्ता राखून उत्तम रीतीने मांडत असत.

त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या साहित्यामध्ये ‘उमदा लेखक, उमदा माणूस ‘ या अरुणा ढेरे संपादित लेखसंग्रहाचा समावेश आहे.

ओघवत्या वा चित्रदर्शी निवेदनशैलीने ऐतिहासिक लेखन करणाऱ्या वि. स.वाळिंबेंना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त ई -अभिव्यक्ती परिवाराकडून नम्र आदरांजली. ????

 

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कऱ्हाड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २१ फेब्रुवारी – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? २१ फेब्रुवारी –  संपादकीय  ? 

रा. श्री. जोग.

रामचंद्र श्रीपाद जोग (15 मे 1903 – 21फेब्रुवारी 1977)

रा. श्री. जोग यांचा जन्म गडहिंग्लज, कोल्हापूर इथे झाला.

पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून संस्कृत व मराठी घेऊन ते मुंबई विद्यापीठाचे बीए (1923) व एमए (1925) झाले. एमएला त्यांना संस्कृतची भगवानदास पुरुषोत्तम शिष्यवृत्ती मिळाली. 1926 ते 1963 या काळात ते संस्कृत व  मराठीचे प्राध्यापक होते.

‘निशिगंध’ या टोपणनावाने कवी म्हणून त्यांनी साहित्यक्षेत्रात पदार्पण केले.सरल भावाविष्कार हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य.’ज्योत्स्नागीत’ (1926) व ‘निशागीत'(1928) हे त्यांचे काव्यसंग्रह.

पुढे साहित्यशास्त्र व काव्यसमीक्षा हेच त्यांनी आपले कार्यक्षेत्र मानले.

‘अभिनव काव्यप्रकाश'(1930), ‘सौंदर्यशोध आणि आनंदबोध'(1943), ‘संस्कृत काव्यवाङ्‌मय ‘(1945), ‘अर्वाचीन मराठी काव्य’ (1946),’केशवसुत काव्यदर्शन’ (1947), ‘काव्यविभ्रम'(1951), ‘मराठी वाङ्‌मयरुचीचे विहंगमावलोकन'(1951) हे त्यांचे समीक्षात्मक ग्रंथ.त्याचप्रमाणे ‘चर्वणा'(1960), ‘विचक्षणा’ (1962) व ‘दक्षिणा’ (1967) हे त्यांचे साहित्यविषयक स्फूटलेखांचे संग्रह. तपशिलाविषयी दक्ष असणारे साक्षेपी व समतोल समीक्षक म्हणून त्यांचा लौकिक होता.

मराठी साहित्य परिषदेच्या मराठी वाङ्‌मयेतिहास योजनेतील तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या खंडांचे संपादनही त्यांनी केले.

1960 मध्ये ठाणे येथे भरलेल्या 42व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

21 फेब्रुवारी 1977 रोजी रा. श्री. जोग यांनी या जगाचा निरोप घेतला.

 

डॉ. किशोर शांताबाई काळे

डॉ. किशोर शांताबाई काळे(1970-21फेब्रुवारी 2007)

डॉ. किशोर काळे हे मराठी लेखक व समाजसेवक होते.

त्यांची आई कोल्हाटी तमाशा कलावंत होती.या अनौरस मुलाला तिने आपल्या माहेरी सोडले. आजोळी, शाळा-कॉलेजात त्यांच्या वाटेला फक्त निंदा, हेटाळणीच आली.

कोल्हाटी समाजातील पुरुष स्वतः काहीही कमवत नाहीत व व्यसनग्रस्त असतात.

पण आपले आयुष्य घडवण्याचा निर्धार आणि धैर्य यामुळे किशोर काळे यांनी जिद्दीने अभ्यास  करून ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजमधून एम  बी बी एस  ही पदवी मिळवली.ते त्यांच्या समाजातील पहिले डॉक्टर झाले.

‘कोल्हाट्याचं पोर’ हे त्यांचे आत्मचरित्र ग्रंथालीने नोव्हेंबर 1994मध्ये प्रकाशित केले. या आत्मचरित्रामुळे साहित्यजगतात चांगलीच खळबळ माजली. त्यातून तमाशाच्या कोल्हाटी समाजाचे वास्तव जगासमोर आले. त्यामुळे त्यांना त्यांच्या समाजाने बहिष्कृत केले. पुढे त्यांच्या पुस्तकावर बंदी आणण्यासाठीही प्रयत्न झाले.

Against all odds हा त्या पुस्तकाचा संध्या पांडे यांनी केलेला अनुवाद पेंग्विन पब्लिकेशनने प्रकाशित केला.

त्यांचे दुसरे पुस्तक ‘मी डॉक्टर झालो’ हे ‘आपलं प्रकाशन’ने प्रकाशित केलं.

त्यांनी लिहिलेली ‘हिजडा, एक मर्द ‘ ही कादंबरीही गाजली. तिच्यावरून लिहिण्यात आलेल्या ‘अंधारयात्रा’ या नाटकात डॉ. काळे यांनी नायकाची भूमिका केली.

आपल्या समाजाची उन्नती करण्यासाठी व वंचितांचा विकास करण्यासाठी त्यांनी तळमळीने काम केले.

पण आपलं नियोजित कार्य पूर्णत्वाला नेण्यापूर्वीच 21 फेब्रुवारी 2007मध्ये एका अपघातामुळे त्यांचे अकाली निधन झाले.

आज 21 फेब्रुवारी. कै.रा. श्री. जोग  व कै.डॉ. किशोर शांताबाई काळे यांचा स्मृतिदिन. त्यांना ई -अभिव्यक्ती परिवारातर्फे विनम्र अभिवादन.

 

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २० फेब्रुवारी – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? २० फेब्रुवारी – संपादकीय  ?

श्रीकांत ग. माजगावकर :

श्री.ग.माजगावकर, शिरूभाऊ, माणूसकार

श्रीगमा अशा विविध नावांनी परिचित असलेले माजगावकर हे सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक,अशा सर्व प्रकारचे लेखन करणारे समर्थ लेखक होते.स्वतःच्या लेखनाबरोबरच लेखक घडवण्याचे व त्यांना प्रकाशात आणण्याचे कामही त्यांनी केले.राजहंस ही प्रसिद्ध प्रकाशन संस्था त्यांचीच.माणूस हे मासिककाही त्यांनी 01/06/1961 ला सुरू केले. हे मासिक वाचण्याची लोकांना इतकी ओढ होती की मासिकाचे रूपांतर साप्ताहिकात करावे लागले.’माणूस’ चे वैशिष्ट्य असे यात  की सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना मते  मांडण्याची मुभा होती.ध्यास असलेले लेखक तयार करण्याचे व्यासपीठ असेच त्याचे वर्णन करावे लागेल.

आणीबाणीच्या काळात याच साप्ताहिकातून जनतेचा आवाज उठवला गेला होता.हे साप्ताहिक नंतर 1986 मध्ये बंद करण्यात आले.

श्री.ग.माजगावकर यांनी निर्माणपर्व , बलसागर आणि श्रीग्रामायन या तीन पुस्तकांचे लेखन केले आहे.याशिवाय वृत्तपत्रीय लेखन, संपादन, नवोदित लेखक, वार्ताहर यांना मार्गदर्शन करून लेखकांची नवी पिढी घडवण्याचे महत्वाचे काम केले आहे.    

त्यांना ॲग्रोफाॅरेस्ट्री व उत्कृष्ट संपादक हे पुरस्कार बहाल करण्यात आले.तसेच त्यांच्या नावे श्रीगमा पुरस्कार 2019 मध्ये सुरू करण्यात आला असून तो त्यांच्या जन्मशताब्दी वर्षापर्यंत म्हणजे  2029 पर्यंत देण्यात येणार आहे.

लेखन आणि संपादन समर्थपणे पेलणा-या श्री.ग. यांचे वयाच्य  68 व्या वर्षी 1997 मध्ये निधन झाले.आज त्यांचा स्मृतीदिन.त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.!

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकिपीडिया, दै.प्रभात.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १९ फेब्रुवारी – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? १९ फेब्रुवारी –  संपादकीय  ? 

नामदार गोपाळ कृष्ण गोखले  (9 मे 1866 – 19फेब्रुवारी 1915)

ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध, कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणारे राजकीय व सामाजिक नेते आणि कुशल राजनीतितज्ज्ञ नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म रत्नागिरीतील एका खेड्यात झाला.

1884मध्ये ते बी. ए. (गणित) झाले. ते न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक व पुढे फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक व नंतर प्राचार्यही झाले.

न्या. रानडे यांचे शिष्यत्व पत्करून त्यांनी त्यांच्याकडे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास केला व ते भारतातील पहिल्या श्रेणीचे अर्थतज्ज्ञ झाले. केंद्रीय विधिमंडळात त्यांनी अर्थसंकल्पावर बारा भाषणे केली.

समाजकार्याच्या बाबतीत ते मवाळवादी होते.

शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचा सखोल अभ्यास करुन सरकारकडे निवेदन पाठवणे, त्याचा पाठपुरावा करणे वगैरे करून त्या कार्यात त्यांनी शिस्त निर्माण केली. लोकशिक्षण, स्त्रीशिक्षण, अस्पृश्यता, जातिनिर्मूलन वगैरे संदर्भात त्यांनी कार्य केले. इंग्रजी शासकांना समजतील, अशा पद्धतीने समाजसुधारणा मांडून त्यांनी त्या मान्य करुन घेतल्या.1902 साली त्यांची निवड मध्यवर्ती कायदेमंडळात झाली  व ते नामदार झाले. त्यांच्या क्षमतेची दखल घेऊन तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांनी त्यांना मार्ले मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितले.

गोखले यांनी ‘राजकारणाचे आध्यात्मिकरण’ ही संकल्पना मांडली. राजकारण हे साधनशुचितेला महत्त्व देऊन, सेवाभावाने करायचे विशेष कार्य आहे, असे त्यांचे ठाम मत होते.

कोणतीही चळवळ कायद्याच्या चौकटीतून करणे, तसेच स्वदेशीच्या वापरातून आपल्या देशातील उत्पादनास चालना देऊन आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे, हे गोखले यांचे विचार होते. महात्मा गांधी हे त्यांचे शिष्य होते.

लोकमान्य टिळकांच्या ‘मराठा’ या साप्ताहिकात नियमितपणे लेख लिहून ते लोकांमध्ये देशभक्ती जागृत करीत असत. गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलेल्या ‘सुधारक’च्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी गोखले यांनी काही काळ सांभाळली. पुढे त्यांनी ‘हितवाद’ हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले. ‘सार्वजनिक सभा’, ‘राष्ट्रभाषा समाचार’या वृत्तपत्रांतून लेखन करुन त्यांनी सतत समाजसुधारणांचा पाठपुरावा केला.1887साली ते सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे संपादक झाले.

‘अंकगणित’ हे त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे लिहिलेले पुस्तक शालेय अभ्यासक्रमात होते.

आज नामदार गोखले यांचा स्मृतिदिन आहे. या थोर, बुद्धिमान समाजसेवकाला विनम्र श्रद्धांजली. ????

 

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १८ फेब्रुवारी – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? १८ फेब्रुवारी –  संपादकीय  ? 

अशोक जैन

अशोक जैन यांचा जन्म ११ एप्रिल १९४४ चा. त्यांची पत्रकारिकतेतील कारकीर्द विशेष गाजली. दै.. तरुण भारत ( पुणे), सकाळ, महाराष्ट्र टाईम्स, मधून त्यांनी पत्रकारिता केली. त्यांची महाराष्ट्र टाईम्समधली कारकीर्द महत्वाची ठरली. मुंबईत १२ वर्षे काम केल्यावर म.टा. चे प्रतिनिधी म्हणून ते दिल्लीला गेले. तिथून त्यांनी ‘राजधानीतून या नावाने साप्ताहिक वार्तापत्रे लिहिली. अशोक जैन यांची चौफेर दृष्टी, विचक्षणपणा आणि खेळकर शैली यामुळे ही वार्तापत्रे  गाजली. ८९ साली ते म. टा. चे सहसंपादक झाले. ‘मैफल या साप्ताहिक पुरवणीची जबाबदारी त्यांनी पेलली. विषय वैविध्य, नाविन्य यामुळे या पुरवणीला प्रतिष्ठा मिळाली. त्यांनी ‘कलंदर’ या टोपण’ नावाने ‘कानोकानी’ हे सदर लिहिले. राजकीय, सामाजिक, साहित्यिक, संस्कृतिक घटना-घडामोडींवर मिश्किल टिपणी करणारे हे सदर अतिशय लोकप्रीय झाले व पुढे याचे पुस्तकही निघाले. त्यांनी अनेक चांगल्या इंग्रजी पुस्तकांचे सुबोध मराठीत अनुवाद केले आहेत.

अशोक जैन यांचे काही प्रकाशित साहित्य –

अत्तरचे थेंब, कानोकांनी हे लेखसंग्रह, कस्तुरबा ( शलाका तेजाची ),  अंतस्थ ( मूळ लेखक पी.व्ही. नरसिंह राव), इंदिरा अंतीम पर्व ( मूळ पुपुल जायकर ), इंदिरा, आणीबाणी आणि भारतातील लोकशाही (अनुवादीत),    शेशन ( चरित्र ), डॉक्युमेंट ( कादंबरी – आयर्विंग वॅलेस), फॅन्टॅस्टिक फेलुदा ( मूळ सत्यजित रॉय), लक्ष्मण रेषा (आर. के. लक्ष्मण यांचे आत्मचरित्र ), व्योमकेश बक्षी , स्वामी व त्याचे दोस्त ( मूळ आर. के. नारायणन.) ही त्यांची महत्वाची पुस्तके.  

आज त्यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन 

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, विकिपीडिया, इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १७ फेब्रुवारी – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? १७ फेब्रुवारी – संपादकीय  ?

कै. पुरूषोत्तम शिवराम रेगे:  (२ ऑगस्ट १९१० – १७ फेब्रुवारी १९७८)

“जीवन जगले तर साहित्य जगेल असे नसून साहित्य जगले तर जगण्यासारखे काही उरणार आहे” अशी ज्यांची साहित्याविषयी श्रद्धा व धारणा होती त्या पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा आज स्मृतीदिन आहे.मराठीतील मागच्या पिढीतील नामवंत कवी,कादंबरीकार व लेखक श्री.रेगे यांनी मुंबई व लंडन विद्यापीठाची अर्थशास्त्रातील पदवी संपादन केली होती.महाराष्ट्र व गोवा राज्यातील अनेक ठिकाणी त्यानी अध्यापनाचे काम केले होते.

रेगे यांची कविता प्रामुख्याने मुक्तछंदातील असली तरी स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवणारी होती.

पाश्चात्य काव्याचा प्रभावही त्यांच्या कवितेत दिसून येतो.  सृजनशक्ती  म्हणजेच स्त्रीशक्ती या मताशी ते ठाम असल्यामुळे त्यांच्या काव्यात,लेखनात याचे प्रत्यंतर येते.

काव्य व कादंबरी तसेच नाट्य निर्मितीशिवाय त्यांनी समीक्षा व शैक्षणिक पुस्तकांचे लेखनही केले होते. 1954 ते 1960 या कालावधीत त्यांनी ‘छंद’ या साहित्यक द्वैमासिकाचे संपादनही केले होते.त्यांनी सुहृदचंपा व  रूपकथ्थक या टोपण नावांनीही काही काळ लेखन केले आहे. त्यांच्या काही कथा व कविता गुजराती, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, चिनी, रशियन अशा विविध भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. 1969 साली वर्धा येथे झालेल्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.  1965 मध्ये मास्को येथे झालेल्या लघुकथा परिसंवादात त्यानी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच त्याच वर्षी केरळ मध्ये भरलेल्या अ.भा.लेखक परिषदेचे ते उद्घाटक होते.

पु.शि.रेगे यांची साहित्य संपदा :

कविता संग्रह:- फुलोरा,गंधरेखा,दुसरा पक्षी,दोला,प्रेमळ,हिमसेक,सुहृदगाथा,पुष्कळा,साधना आणि इतर कविता,पु.शि.रेगे यांची निवडक कविता (संपादित).अनीह हा काव्यसंग्रह मरणोत्तर प्रकाशित झाला .

कादंबरी.:- मातृका, अवलोकिता,रेणू,सावित्री.

नाटक.:- कालयवन,रंगपांचालिक,सावित्री,माधवी–एक देणे.

नाटिका.:- चित्रकामारव्यम्,पालक,मध्यंतर.

कथा :- रूपकथ्थक,मानवा

अन्य साहित्य:- एका पिढीचे आत्मकथन(आत्मचरित्र), छांदसी आणि मर्मभेद(समीक्षा) .

आज त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना नम्र अभिवादन.

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकीपीडिया ,मराठी विश्वकोश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १६ फेब्रुवारी – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? १६ फेब्रुवारी –  संपादकीय  ? 

म श्री .दीक्षित यांचा जन्म १६ मे १९३४चा. ते मराठी साहित्य परिषदेचे कार्यकर्ते होते. ते इतिहासाचे लेखक होते. संपादक होते. त्यांना पुण्याचा चलता- बोलता इतिहास म्हणत.

श्री. म. माटे यांच्याकडे त्यांनी लेखनिक म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी परिषदेच्या कामात सहभाग घेतला.  म.सा.प. चा १०५ वर्षांचा इतिहास लिहून त्यांनी प्रसिद्ध केला.

 म श्री .दीक्षित यांनी ६० वर्षे वृत्तपत्रातून, विविध नियतकालिकातून विविध प्रकारचे प्रासंगिक, ऐतिहासिक व चरित्रात्मक लेखन केले. अनेक स्मरणिकांचे संपादन केले. शंभरावर पुस्तकांचे परीक्षण केले. त्यांनी आत्मचरित्रही लिहिले.

अहिल्याबाई होळकर, आनंदीबाई पेशवे, बाबासाहेब आंबेडकर, शिवरायांची आई जिजाई , वीररमणी झाशीची राणी, तात्या टोपे, नेपोलियन, विठ्ठल रामजी शिंदे. अनेक चरित्र त्यांनी लिहिली. कौरव पांडव ( कथा) , मुळा-मुठेच्या तीरावरून (व्यक्तिचित्रे) इ. त्यांची विपुल साहित्य संपदा आहे. आज त्यांचा स्मृतीदिन. ( १६ फेब्रुवारी २०१४) .त्यांच्या या विपुल साहित्य संपदेला विनम्र आदरांजली.

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी, विकिपीडिया, इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १० फेब्रुवारी – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? १० फेब्रुवारी – संपादकीय  ?

धुंडीराज गणेश बापट:

दिक्षीत धुंडीराज बापट यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाचवड येथे झाला.त्यांनी प्रामुख्याने वैदिक वाड्मयाचे भाषांतर केले.अग्निहोत्र आणि वेदविद्येचे अध्ययन आणि अध्यापन त्यांच्या घराण्यात पिढ्यान् पिढ्या चालत आले आहे.ही परंपरा जतन करण्यासाठी त्यांनी पाचवड येथे स्वाध्याय मंदिर स्थापन केले.तसेच स्वाध्याय हे मासिक काही वर्षे चालू ठेवले.श्री.बापट यांनी वैदिक संशोधन मंडळाच्या श्रौतकोशाचे  संपादन केले.

त्यांच्या कडून झालेली ग्रंथ निर्मिती अशी:–

  1. आर्यांचे संस्कार
  2. ऋग्वेदाच्या ऐतरेय ब्राह्मणांचे भाषांतर
  3. कृष्ण यजुर्वेद भाग 1 व भाग 2 तैत्तिरिय  संहिता
  4. गणपतिअथर्वशिर्ष
  5. वैदिक राष्ट्रधर्म
  6. शुक्ल यजुर्वेद संहितेचे मराठी भाषांतर.

13 फेब्रुवारी1956 ला त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: महाराष्ट्रनायक, विकीपीडिया.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १२ फेब्रुवारी – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? १२ फेब्रुवारी –  संपादकीय  ? 

पद्मा गोळे 

पद्मा गोळे यांचा जन्म १० जुलै १९१३ चा. तासगाव येथील पटवर्धन राजघराण्यात त्यांचा जन्म झाला. त्या मराठी कवयित्री, लेखिका व नाटककार होत्या.

त्यांचा पाहिला कवितासंग्रह प्रीतीपथावर १९४७ साली प्रकाशित झाला. रायगडावरील एक रात्र, स्वप्न, नवी जाणीव इ. नाटिका त्यांनी लिहिल्या . वाळवंटातील वाट ही त्यांची कादंबरी.

तर आकाशवेडी, श्रावणमेघ, निहार, स्वप्नजा हे त्यांचे कवितासंग्रह.

एका संवेदनाशील, अंतर्मुख स्त्री मनाचे विविध विलोभनीय आविष्कार त्यांच्या कवितेत दिसतात. त्यांच्या रसिक, चिंतनशील आणि स्वप्नदर्शी, व्यक्तिमत्वाचा प्रत्यय त्यातून येतो. स्निग्ध सूर, संपन्न निसर्ग प्रतिमा, आणि शालीन संयम ही त्यांच्या कवितांची लक्षणीय वैशिष्ट्ये.

स्वप्नजा या त्यांच्या काव्यसंग्रहाला व रायगडावरील एक रात्र आणि इतर नाटिका या बालनाटिका या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाचा पहिला पुरस्कार मिळाला आहे.

१२ फेब्रुवारी १९९८ ला त्यांचे निधन झाले. आज त्यांचा स्मृतीदिन. त्या निमित्ताने त्यांच्या प्रतिभेला विनम्र  श्रद्धांजली ?

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी, विकिपीडिया, इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १० फेब्रुवारी – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? १० फेब्रुवारी –  संपादकीय  ? 

नरहर अंबादास कुरूंदकर

नरहर अंबादास कुरूंदकर यांचा जन्म १५5 जुलै १९३२ रोजी झाला. ते लेखक होते. समीक्षक होते. समजाचिंतक होते आणि प्रभावी वक्तेदेखील होते. पीपल्स कॉलेज नांदेड इथे त्यांनी प्राचार्य म्हणून काम पाहिले.

नरहर अंबादास कुरूंदकर यांचे प्रकाशित साहित्य –

अभयारण्य, थेंब अत्तराचे, धार आणि काठ, निवडक कुरूंदकर भाग १ आणि २, परिचय, पायवाट, आकलन ( व्यक्तिचित्रे ) जागर (लेखसंग्रह) मनुस्मृती (इंग्रजी) , रूपवेध, रंगशाला. इ. अनेक पुस्तकांपैकी ही काही.

कुरूंदकरांनी अनेक पुस्तकांना प्रदीर्घ प्रस्तावना लिहिल्या आहेत.

कुरूंदकरांच्या प्रस्तावना लाभलेली पुस्तके

चक्रपाणी ( रा.चिं ढेरे), श्रीमान योगी (रणजीत देसाई – ७० पानी प्रस्तावना ), हिमालयाची सावली ( वसंत कानिटकर), संस्कृती (इरावती कर्वे ) ,

निवडक कुरूंदकर भाग१ मध्ये या प्रस्तावना समाविष्ट आहेत.

वरील पुस्तकांपैकी धार आणि काठ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळाला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दोन वेळा अध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आले होते पण त्यांनी नम्रपणे त्याला नकार दिला.

१० फेब्रुवारी १९८२ मध्ये या विद्वान व्यक्तीचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावर मधु जामकर यांनी स्व.  नरहर कुरूंदकर समज आणि गैरसमज हे पुस्तक लिहिले.

त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नरहर कुरूंदकर प्रतिष्ठानची स्थापना झाली. नांदेड एज्यु. सोसायटी व त्यांचे विद्यार्थी यांच्या मदतीने स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्रात, नरहर कुरूंदकर प्रगत अध्यापन व संशोधन केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रातर्फे वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करणार्यांरना त्यांच्या प्रकल्पासाठी  शिष्यवृत्ती दिली जाते.

अभ्यास केंद्राच्या वतीने व्याख्यानमाला ही आयोजित केली जाते. आत्तापर्यंत अशोक बाजपेयी, गंगाधर गाडगीळ, जयंत नारळीकर, दुर्गा भागवत, भालचंद्र फडके, म.द. हातकणंगलेकर यांची व्याख्याने झाली.

आज त्यांचा स्मृतिदिन. त्यांच्या विद्वत्तेला भावपूर्ण, विनम्र  श्रद्धांजली ?

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी, विकिपीडिया, इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print