एक मदारी असतो. तो आपल्या माकडाला घेऊन गावोगावी फिरायचा, माकडाचे खेळ करून दाखवायचा आणि त्यातून येणाऱ्या पैशातून आपला उदरनिर्वाह करायचा.
ते माकड सुद्धा अगदी छान काम करायचे. कोलंट्या उड्या मारायचे, पाणी आणून द्यायचे आणि मालक सांगेल तसे सगळे काम करायचा. त्याने त्या माकडाचे नाव रघुवीर ठेवले होते.
सगळे त्याला म्हणतात अरे याचे नाव रघुवीर का ठेवलेस? हे तर श्री रामांचे नाव आहे ना? याचे नाव हनुमान, मारुती असे काही तरी ठेव.
यावर त्या मदाऱ्याने खूप छान उत्तर दिले. तो म्हणाला कामात राम असतो. मग माझे माकडाचे खेळ करून दाखवणे हे काम म्हणजे रामाचे झाले ना? दुसरे असे की त्या निमित्ताने माझ्या तोंडून श्रीरामाचे नाव दिवसातून 1000 वेळा तरी घेतले जाते. तेवढाच रामाचा जपही होतो आणि श्रीरामाचे स्मरणही होते.
मग श्रीरामाचे स्मरण करणारा मीच हनुमान होतो. मग मला आठवतात हनुमंताच्या लीला आणि त्या लीला मी माझ्याशी पडताळून पहातो.
मग हनुमानाने सीता माईने घातलेल्या मोत्याच्या माळेत श्री राम आहेत का ते बघितले होते तसे मी या रघुवीरला सांगितलेल्या कामात राम शोधतो आणि मला तो गवसतो. जर गवसला नाही तर मग माझे काही चुकले आहे असे मला समजते आणि मी ते सुधारतो आणि मग मला माझा राम सापडतो.
हनुमानाने आपली छाती फाडून तेथे श्री राम वास करत असल्याचे दाखवले होते. मला खात्री आहे मी माझ्या कामाप्रती श्रद्धा ठेवली असल्याने आणि माझे काम हे ईश्वराचे काम मी मानत असल्याने माझ्याही ह्रदयात श्रीराम वास नक्कीच आहे.
हनुमंताने श्रीरामाची सेवा मनोभावे केली तशी मी माझ्या या रघुवीरची करतो. त्याने दिवसभर माझे काम केले असले तरी मी रात्री त्याचे पाय चेपतो, त्याला चांगले न्हाऊमाखू घालतो आणि हो मला स्वतःला मी कपडे नाही घेतले तरी मी नेहमी याच्यासाठी नवे कपडे घेतो. अशी मी त्याची सेवा माझा राम म्हणून करतो.
मला खात्री आहे की तुम्ही कोणतेही काम करत असाल तर ते काम ईश्वराचे काम समजून केले, आपल्या कामाबद्दल निष्ठा आणि श्रद्धा ठेवली, आपल्या मालकावर पूर्ण विश्वास ठेवला तर कोणत्याही कामात सफलता मिळाल्या शिवाय राहणार नाही. तुमच्या बाबतीत चांगले घडल्या शिवाय राहणार नाही.
श्रद्धा असेल तर भक्ती नकळत होते आणि अशी निस्वार्थ, निष्काम भक्ती केली तर तुमचे चांगलेच होणार.
आयुष्यात राम मिळावा असे वाटत असेल तर तुम्ही हनुमान व्हायला पाहिजे.
☆ ‘तुमचं गाणं ऐकत-ऐकत प्राण सोडायचाय …‘ लेखक : श्री हृदयनाथ मंगेशकर – संकलन : श्री विनय बडवे ☆ श्री आशिष बिवलकर ☆
बांगलादेशाच्या युद्धात प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणाऱ्या जवानांसाठी लता मंगेशकर यांनी अत्यंत तळमळीनं कार्यक्रम सादर केले होते. या कार्यक्रमांत त्यांना साथ दिली होती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. तो रोमांचकारी, तसंच हृदयद्रावक अनुभव पंडितजींनी शब्दबद्ध केला…
‘‘सन्माननीय! आपल्याला सूचना देण्याचं काम माझ्याकडं देण्यात आलं आहे…या विमानात आसनं नाहीत, फक्त लोखंडी पट्ट्या आहेत…त्यांवर आपल्याला बसावं लागेल…आधारासाठी एक लोखंडी साखळी आहे…तिला धरून बसावं…खिडक्या उघड्या आहेत…बाहेर डोकावू नये…प्रवास फक्त अर्ध्या तासाचा आहे…आत कोकाकोला मिळेल…’’
एवढं बोलून तो जवान बाजूला झाला. कलाकार विमानात बसू लागले. सुनील दत्त, नर्गिस, माला सिन्हा, दीपक शोधन, दीदी, मी, नारायण नायडू असे एकेक कलाकार त्या लोखंडी बारवर बसले. समोर लटकलेली साखळी घट्ट धरून मी एका जवानाला विचारलं ‘‘या खिडक्या उघड्या का?’’
‘‘गोळ्या झाडण्यासाठी.’’
‘‘थंडी वाजत नाही?’’
‘‘जीव वाचवण्यात थंडी लागत नाही,’’ निर्विकार उत्तर. मी गप्प.
विमान एका मैदानात उतरलं. छोटासा रंगमंच…पडदा नाही. समोर पाच ते सात हजार जवान. एक कर्कश माईक. बस्स. ‘कार्यक्रम सुरू करा’
कार्यक्रम सुरू झाला. सुनील दत्त यांनी निवेदन केलं. नर्गिस यांनी जवानांचे आभार मानले. माला सिन्हा यांनी जवानांना शुभेच्छा दिल्या. पुढं काय? मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणजे नायक-नायिकांनी रंगमंचावर येणं, जवानांना नमस्कार करणं, शुभेच्छा देणं…बस्स. असा मनोरंजनाचा कार्यक्रम होऊ शकत नाही. जवानांमध्ये चुळबुळ सुरू होण्याआधीच सुनील दत्त यांनी दीदीचं नाव घोषित केलं. दीदी रंगमंचावर आली. पाहिलं आणि जिंकलं. जवानांमध्ये नवा जोश आला.
‘भारतमाता की जय…’ ‘लतादीदी झिंदाबाद…’
आणि टाळ्यांचा कडकडाट…
कोई सिख, कोई जाट-मराठा
कोई गुरखा, कोई मदरासी
असे वेगवेगळ्या जातींचे-प्रांतांचे-भाषांचे ते जवान आपापल्या भाषेत दीदीचा जयजयकार करू लागले. कुणी दीदीच्या पाया पडतंय…कुणी रडतंय…कुणी शुभेच्छा देतंय…कुणी फर्माईश करतंय…संगीताच्या अमोघ शक्तीचा साक्षात्कार घडत होता. दीदीवर रसिक किती निरपेक्ष प्रेम करतात याचा प्रत्यय येत होता. कुठलाही देश, कुठलेही रसिक, कुठलीही परिस्थिती असो; पण संगीताशिवाय कार्यक्रम होऊच शकत नाही. कारण, संगीत ही प्रत्यक्ष संवेदना आहे. दीदीनं गायला सुरुवात केली.
एकदा माझ्याकडं बघून मिष्किलपणे हसली. नायडूला खूण केली आणि तिनं गायला सुरवात केली. युद्धभूमीवर अत्याचार, किंचाळ्या, विव्हळणं, गोळीबाराचे आवाज यापेक्षा एक ईश्वरी सूर त्या हिंसाचारी भूमीवर घुमू लागला.
तृषार्त भूमीवर ‘बरखा ऋतू’ रिमझिम बरसू लागली. ते जवान, ती रणभूमी पावन झाली. दीदी जीव लावून प्रत्येक रसाची गाणी गात होती. न थकता, न दमता. आणि, शेवटच्या गाण्याची तिनं सुरुवात केली…
ऐ मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी
जो शहीद हुए है उन की जरा याद करो कुरबानी
जब देश में थी दीवाली वो खेल रहे थे होली
जब हम बैठे थे घरों में वो झेल रहे थे गोली
थे धन्य जवान वो अपने थी धन्य वो उन की जवानी
जो शहीद हुए है उन की जरा याद करो कुरबानी…
कार्यक्रम संपला. आम्ही मेसमध्ये आलो. दुसऱ्या दिवशीही कार्यक्रम होता. सर्वजण थकले होते. आराम करत होते. तोच एक अधिकारी दीदीला भेटायला आले. त्यांनी दीदीचे खूप आभार मानले आणि शेवटी म्हणाले : ‘‘इथं खूप मराठी जवान आहेत. त्यांच्यासाठी एक तरी मराठी गाणं गा…’’
दीदी म्हणाली : ‘‘अगदी आनंदानं…उद्याच्या कार्यक्रमाची सांगता मी मराठी गाण्यानं करणार.’’
अधिकारी आनंदानं दीदीचे आभार मानून गेले.
दुसऱ्या दिवशी एका शेतात रंगमंच लावून कार्यक्रम सुरू झाला. जे काल घडलं होतं तसंच आजही घडत होतं.
मध्येच मी दीदीला म्हणालो : ‘‘काल तू ‘मराठी गाण्यानं कार्यक्रमाची सांगता करणार’ असं म्हणालीस; पण पसायदानसारख्या प्रार्थनेनं सांगता करू नकोस. ही समरभूमी आहे.’’
‘‘मला हे शिकवण्याची आवश्यकता नाही. कुठं काय गावं हे मला बाबांनी शिकवलं आहे. ऐक, मी काय गाते ते!’’ दीदी म्हणाली.
कार्यक्रमाच्या शेवटाला दीदीनं जवानांना मनोगत सांगितलं ‘ ‘ऐ मेरे वतन के लोगो…’ या गाण्यानं मी आजच्या कार्यक्रमाची सांगता करणार नाही. ‘ऐ मेरे वतन के लोगो…’ हे फार लोकप्रिय आहे. फार हृद्य आहे…पण ते पराभवानंतर केलेलं सांत्वनगीत आहे.
मी ज्या गाण्यानं सांगता करणार आहे ते गाणं तुम्ही ऐकलेलं नसेलही. तुम्हाला ते कळणारही नाही; पण तुम्हाला त्या गाण्यातून जयध्वनी ऐकू येईल. पराजयाचा डाग पुसून तुम्हाला त्यात जयाची छबी दिसेल. विजयाचा जयजयकार ऐकू येईल…’’
सारे जवान, कलाकार अधिकारी शांत झाले. प्रत्येकाच्या मनात एक पाल चुकचुकत होती…‘ऐ मेरे वतन के लोगो… ’सारखं हुकमी गाणं सोडून लतादीदी हे अनामगीत का गात आहेत…सगळे कुतूहलानं ऐकत होते. दीदीनं गायला सुरुवात केली
हे हिंदुशक्तिसंभूत दिप्तितम तेजा
हे हिंदुतपस्यापूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्रीसौभाग्यभूतीच्या साजा
हे हिंदुनृसिहा प्रभो शिवाजी राजा
प्रभो शिवाजी राजा…
काव्याचा एक शब्दही कुणालाच कळला नाही. कळलं एकच की, ही शिवस्तुती आहे. ‘प्रभो शिवाजी राजा’ हा शब्द आला आणि श्रोत्यांमध्ये ‘छत्रपती’ अशी आरोळी उठली. सारं वातावरण शिवमय झालं. हिंदुपदपादशाही…शिवाजीमहाराज छत्रपती…सारं वातावरण भगवं झालं. गर्जा जयजयकार क्रांतीचा…गर्जा जयजयकार…
छत्रपती शिवाजीमहाराज, राणा प्रताप, भगतसिंग, मदनलल धिंग्रा, सुखदेव, सावरकर या साऱ्या क्रांतिवीरांच्या जयघोषानं सारं वातावरण भरलं-भारलं. ‘‘दीदी! काय गाणं शोधून काढलंस तू! सारं वातावरणच बदलून गेलं.’’ ‘‘काय आहे बाळ…माझं सारं बालपण क्रांतिकारकांबरोबर गेलं. का कुणास ठाऊक; पण नेमस्तांपेक्षा मला क्रांतिकारक जवळचे वाटतात…’’
दीदी! आम्ही तुमचं मुंबईमध्ये स्वागत करतो. बांगलादेशात जवानांसाठी तुम्ही वीस दिवसांत बावीस कार्यक्रम केले. आम्ही जवानांतर्फे आपले आभार मानतो. एक विनंती आहे, ‘सारे जखमी जवान इथं ‘अश्विनी हॅास्पिटल’मध्ये आहेत. त्यात एक जाधव नावाचा जवान खूप गंभीर अवस्थेत आहे. तो सारखी तुमची आठवण काढतो. तुम्हाला भेटण्यासाठी त्याचे प्राण अडकले आहेत. मी आपल्याला विनंती करतो की, आपण ‘अश्विनी हॅास्पिटल’ला भेट द्यावी.’
दुसऱ्या दिवशी दीदी हॅास्पिटलमध्ये गेली. अतिशय उदास होती. घाबरली होती.
‘‘बाळ, तो जवान माझ्यासमोर मृत्यू पावला तर? माझ्या मनाला फार लागेल ते…’’
प्रत्येक जखमी जवानाशी बोलत, सांत्वन करत, कधी धीर देत दीदी त्या जाधव नावाच्या जवानापाशी पोहोचली. जवान अगदी खरोखरच जवान होता. पांढऱ्या कापडानं त्याचं शरीर झाकलेलं होतं. दीदीला बघून तो मनमोकळं हसला.
‘‘दीदी, माझं काही खरं नाही, माझी एकच इच्छा आहे, ‘आपलं गाणं ऐकत ऐकत प्राण सोडावा… आपण माझ्यासाठी गाणं गाल ना?’’
मला वाटलं, दीदी आता तणावानं कोसळणार; पण दीदी स्तिथप्रज्ञासारखं म्हणाली : ‘‘कोणतं गाणं आपल्याला ऐकायचं आहे…?’’
तो हसला ‘‘आ जा रे परदेसी…’’
दीदीनं गायला सुरुवात केली. ती इतकी सहज गात होती की, जणू तालीमच चालली आहे.
मैं तो कब से खडी उस पार
के अखियाँ थक गई पंथ निहार
आ जा रे ऽऽ परदेसीऽऽ
आणि आश्चर्य…दीदी आणि ऐकणारे सगळे जण प्रसंग काय हे विसरून गाण्याशी एकाकार होऊ लागले. तेवढ्यात डॅाक्टरांनी दीदीला थांबवलं.
सारं संपलं होतं. जखमी जवान साऱ्या यातनांमधून मुक्त होऊन ‘उस पार’ गेला होता. दीदी शांत होती; पण हात धरून चालत होती…
लेखक : श्री हृदयनाथ मंगेशकर.
माहिती संकलन : श्री विनय बडवे
प्रस्तुती : श्री आशिष बिवलकर
बदलापूर – मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
साहित्य संघ मंदिरात ‘नटसम्राट’ चा प्रयोग सुरू होता. आयुष्याचा अखेरचा काळ व्यतीत करणारे, थकलेले, खालावलेले नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक तेथे आले. तात्यासाहेब शिरवाडकरांना त्यांनी विचारले…
“ डॉ.लागू कुठे आहेत?मला त्यांना सांगायचं…”
“काय”?
” हे नाटक माझे आहे “
आणि हो..खरोखरच हे नाटक त्यांचे होते. कारण अगदी मागच्याच वर्षीची गोष्ट. नानासाहेब फाटक वि.वा शिरवाडकरांना म्हणाले होते..
” आमच्या सारख्या जुन्या नटांना मानवेल असे एखादे नाटक तुम्ही लिहायला हवे “
त्यांनी ‘किंग लिअर’ चे नावही सुचवले होते आणि मग तात्यासाहेबांना जाणवले.. नानासाहेबांसारख्या नटश्रेष्ठांवरच नाटक लिहायला हवे.
तात्यासाहेब म्हणतात…
नानासाहेबांसारखा एक महान म्हातारा नट माझ्या मनात उभा रहात होता.. आणि किंगलिअर चे नायकत्व स्वतःसाठी मागत होता.
त्याचवेळी साहित्य संघात काही नेहमीचीच मंडळी वाद घालत होती.शंकरराव घाणेकर उच्च स्वरात म्हणाले…
” बस्स.. वाद कशाला? तुम्हा नवीन नटांचे सम्राट दाजी भाटवडेकर.. आणि आम्हा जुन्या नटांचे नटसम्राट.. नानासाहेब.”
आणि त्याचवेळी नाटकाचे नाव ठरले. वास्तविक तात्यासाहेबांना नाटकाचे नाव शोधण्यात नेहमीच तकलीफ होत असे. हे असे पहिलेच नाटक की ते लिहिण्यास घेण्यापूर्वी त्यांना त्याचे नाव सापडले.
तात्यासाहेबांनी नाटक लिहायला घेतले. पहिल्या अंकांचे वाचन ‘गोवा हिंदू असोसिएशन’ च्या कार्यकर्त्यांपुढे झाले. मुख्य भुमिका डॉ.श्रीराम लागू आणि शांता जोग यांनी करायचे ठरले.
डॉ.लागू यांनी नाटक वाचायला घेतले.. आणि पहिल्या पाच दहा पानात त्यांना त्याचे वेगळेपण जाणवु लागले. ते म्हणतात….
” पहिल्या अंकातील सुरुवातीचा तो अप्पासाहेबांचा प्रवेश.. निवृत्त झालेला तो वृध्द नटसम्राट.. हजारो प्रेक्षकांसमोर उभा राहुन आपले भरुन आलेले मन अगदी मोकळेपणाने, भाबडेपणाने पण मोठ्या सकस आणि काव्यमय भाषेत रिकामे करतो आहे. नाजूक, सुगंधी फुलांचा सतत वर्षाव व्हावा तसे सारे प्रेक्षक त्या मनोगताच्या आनंदात, कारुण्यात,रागलोभात आणि प्रेमात न्हाऊन चिंब होताहेत असे लोभसवाणे द्रुष्य मी चांगले अर्धा पाऊण तास सर्वांगाने बघत होतो.”
या नाटकाच्या मानधनाबाबत डॉ.लागू यांना विचारले गेले तेव्हा त्यांनी निरोप पाठवला..
‘ शून्य रुपयापासुन..सव्वाशे रुपयापर्यंत कितीही.पण मला हे नाटक करायचेच आहे.’ (त्यावेळी डॉक्टर एका प्रयोगाचे सव्वाशे रुपये घेत)
दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर यांना नागपूर येथील नोकरीतून फक्त महीनाभराची सवड मिळणार होती. पण ते येण्यापूर्वीच डॉ.लागुंनी मनातच तालीम करण्यास सुरुवात केली जवळजवळ संपूर्ण संहिता तालीम सुरू होण्यापूर्वीच त्यांनी पाठ केली.
नागपुराहुन दारव्हेकर मास्तर आले आणि नाटकाच्या तालमी सुरु झाल्या आणि एक दोन मुद्द्यावरून वाद सुरू झाले बऱ्याच जणांचे म्हणणे होते.. सुरुवातीचे जे अप्पांचे भाषण आहे, ते फार लांब आहे. ते कमी केले पाहिजे पण डॉ.लागुंनी ठामपणे विरोध दर्शविला. शेवटी असे ठरले की.. प्रत्यक्ष प्रयोगात ते कसे वाटते ते बघू .. प्रेक्षकांना कंटाळवाणे वाटले तर थोडा भाग कमी करु.
दुसरा वाद होता.. तिसऱ्या अंकातील जंगलातील प्रसंगाचा.दारव्हेकरांना तो अजिबात आवडला नव्हता.
“कुणी घर देता का घर..”
आणि..”जंगलातील जनावरं मोकाट सुटली आहेत..”
पण याही वेळी डॉ.लागूंनी तो भाग हट्टाने नाटकात ठेवायला भाग पाडले.
नाटकाचा पहिला प्रयोग २३ डिसेबल १९७० ला बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.रंगमंदिर जाणकार प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. नाटकाचा पडदा वर उचलल्यापासुन शेवटपर्यंत नाटक रंगत गेले. प्रयोग सुरेख झाला, आणि…
दुसऱ्याच मिनीटाला विठोबाचे काम करणारे नट..बाबुराव सावंत अचानक कोसळले.. बेशुद्ध झाले लगेचच त्यांना जवळीक बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.. पण तासादोन तासात त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
खरंतर पहिल्या अंकानंतरच बाबुरावांच्या छातीत दुखु लागले होते..घाम येत होता.अधुनमधून झोपून रहात.. गोळ्या घेतला ते कसेबसे काम करत होते.तिसऱ्या अंकातील शेवटच्या प्रवेशात ते म्हणाले देखील.. मी स्टेजवर गेलो नाही तर चालणार नाही का?
पण नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगात अशी परवानगी कोण देणार?
शेवटचा प्रवेश संपेपर्यंत त्यांनी मृत्युला थोपवून धरले आणि मग मात्र त्यापुढे शरणागती पत्करली.
सुरुवातीला नाटकाला प्रेक्षकांचा प्रतिसाद फारसा नव्हता. पण हळूहळू प्रत्येक प्रयोग हाऊसफुल्ल होऊ लागला.
दिल्लीतील एका प्रयोगाच्या वेळी दुसऱ्या अंकानंतर अचानक पं.रवीशंकर पडद्यामागे आले आणि त्यांनी डॉ.लागूंना मिठीच मारली. गदगदल्या स्वरात ते म्हणाले..”you are killing me”
डॉ. श्रीराम लागू म्हणतात..
“या नाटकाने मला खूप काही भरभरून दिले माझ्या लायकीपेक्षा खुपच जास्त दिले माझ्या फाटक्या झोळीला ते सारे पेलले की नाही.. माहीत नाही. मराठी नाट्यरसिकांच्या मानसात,कोपऱ्यात का होईना, एक पाट बसायला दिला आणि कलावंत म्हणून आत्माविष्काराला एक विस्तीर्ण, मुक्त आनंदाने भरलेले अंगण दिले .. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे माझी जीवनाची जण अधिक विस्तीर्ण करणारा सखोल संस्कार दिला. भाषेचे सौंदर्य, तिची अफाट ताकद, शब्दाशब्दाला फुटणारे आशयाचे धुमारे आणि ह्या साऱ्यांनी जीवनाला मिळणारा भरभक्कम आधार दिला.’नटसम्राट’ करण्याच्या आधीचा मी जो होतो त्यापेक्षा नंतरचा मी अधिक बरा ‘माणूस’ झालो.एका नाटकाने माणसाला यापेक्षा जास्त काय द्यावे?कलावंताचे आपण जन्मभर ऋणी रहायचे ते याकरिताच.”
आणि म्हणूनच मराठी नाट्यस्रुष्टीत ‘नटसम्राट’ चे स्थान अत्युच्च आणि अतुलनीय आहे पाश्चात्य रंगभूमीवर प्रत्येक नटाचे अंतिम स्वप्न हे ‘हँम्लेट’ ची भुमिका करण्याचे असते. त्याचप्रमाणे मराठी रंगभूमीवरील नटाचे स्वप्न ‘नटसम्राट’;ची भुमिका करण्याचे असते डॉ.लागु यांच्यानंतर दत्ता भट,सतिष दुभाषी पासून अगदी अलीकडे मोहन जोशींपर्यंत प्रत्येकाने ही भूमिका पेलण्याचे शिवधनुष्य उचलले आहे
‘नटसम्राट’ हे नाटक आता केवळ वि.वा.शिरवाडकरांचे राहिले नाही.. तर अवघ्या मराठी जनांचे झाले आहे ज्याप्रमाणे नानासाहेब फाटक म्हणाले होते..
“हे नाटक माझे आहे”
त्याचप्रमाणे प्रत्येक मराठी माणुस, मग तो कलावंत असो की रसिक.. नेहमीच म्हणत राहील…
१९२७ मध्ये रंगून (तत्कालीन बर्मा, आत्ताचे म्यानमार) शहरा HVतील एका श्रीमंत घराण्यात एक मुलगी ‘सोन्याचा चमचा’ घेऊन जन्माला आली ! हो, अक्षरशः सोन्याचा चमचा घेऊनच; कारण त्या मुलीचे वडील सोन्याच्या खाणीचे मालक होते! सुखवस्तू घरातील मंडळींनी त्या मुलीचे नाव “राजमणि” ठेवले. राजमणिच्या वडिलांचा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा होता. त्यासाठी ते वेळोवेळी आर्थिक मदतदेखील करीत असत. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित नेते किंवा भारतीय व्यावसायिक रंगूनला गेले तर त्यांच्या घरी आवर्जून जात असत.
एकदा गांधीजी या कुटुंबाच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले होते. घरातील सर्वांचा परिचय झाला. राजामणि मात्र कुठे दिसली नाही म्हणून सर्वजण तिला शोधत असता, घराच्या बागेत राजमणि हातात बंदूक घेऊन निशाणेबाजी करतांना आढळली. दहा वर्षाच्या एका मुलीच्या हातात बंदूक पाहून गांधीजींना आश्चर्य वाटले, ते तिच्या जवळ गेले आणि तिला म्हणाले, “बेटी, तुला बंदुक शिकायची काय गरज?”
“इंग्रजांचा खात्मा करण्यासाठी”, आपले निशाणावरील लक्ष जराही विचलित न होऊ देता राजमणि उत्तरली.
“हिंसा हि काही एखाद्या प्रश्नाचे उत्तर नाही मुली, आम्ही सर्वजण अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांचा विरोध करीत आहोत. तुलादेखील हातात शस्त्र न घेता विरोध करता आलं पाहिजे,” गांधीजींनी तिला समाजावणीच्या सूरात अहिंसेचे महत्व सांगितले.
“का? आम्ही डाकू, लुटारूंना मारीत नाही? हे इंग्रज आमच्या देशाला लुटत आहेत, त्यामुळे ते लुटारू आहेत! त्या लुटारूंना मारणे हि काही हिंसा नाही.” अतिशय निर्भय आणि स्पष्ट शब्दात राजामणि उत्तरली, “मी मोठी झाल्यावर निदान एकातरी इंग्रज अधिकाऱ्याला शूट करणार!”
गांधीजी अवाक होऊन ऐकण्याव्यतिरिक्त काहीच करू शकले नाहीत.
#एके दिवशी राजमणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भाषण ऐकले. त्यांच्या भाषणाने ती पेटून उठली. गांधीजींची ‘अहिंसा’ आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा इंग्रजांविरुद्ध चा ‘सशस्त्र लढा’; यात तिला नेताजींचा प्रखर विरोध अधिक भावला!
#एका सभेमध्ये नेताजींनी लोकांना अपील केले की, त्यांनी इंग्रजांच्या विरुद्धच्या त्यांच्या लढाईसाठी आर्थिक मदत करावी. हे ऐकून सोळा वर्षाच्या राजमणिने आपले सारे सोन्याचे दागिने काढून नेताजींच्या ‘आझाद हिंद सेनेला’ (INA-Indian National Armi- आयएनए) दान केले.
‘एवढे सारे सोन्याचे दागिने कुणी दिले?’ याची चौकशी करत असताना नेताजींना कळाले की, एका सोळा वर्षाच्या मुलीने हे सर्व दागिने दिले आहेत. अधिक चौकशी केल्यानंतर; ते सर्व दागिने परत करण्यासाठी नेताजी स्वतः राजमणिच्या घरी गेले. सर्व दागिने राजामणिच्या वडिलांच्या हाती सुपूर्द करतांना नेताजी म्हणाले, “मला वाटतं, आपल्या मुलीने चुकून हे सर्व दागिने आम्हाला दिले आहेत. मी ते सर्व परत करायला आलो आहे.” खरंतर, राजमणिच्या वडिलांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामासाठी असं दान अनेक वेळा केलं होतं; त्यामुळे त्यांच्या मुलीने जे केलं त्याबद्दल त्यांना अजिबात आश्चर्य वाटलं नाही. नेताजी परत करीत असणाऱ्या त्या दागिन्यांकडे पहात ते फक्त हसले. तेवढ्यात राजमणि तिथे आली. समोरचा प्रकार पाहून ती रागात उद्गारली, “हे सर्व दागिने माझे स्वतःचे आहेत; वडिलांचे नाही! मी आता ते आपल्याला दान केले आहेत आणि दान केलेली वस्तू मी परत घेत नाही.”
#त्या षोडशवर्षीय मुलीचा दृढनिश्चय पाहून नेताजींना तिची प्रशंसा केल्याशिवाय रहावले नाही, ते राजामणीला म्हणाले, “लक्ष्मी येते आणि जाते; परंतु सरस्वतीचं तसं नाही. सरस्वती म्हणजे बुद्धी! ती आली की परत कधीच जात नाही; तर ती सतत वाढत जाते! तू सरस्वती सारखीच बुद्धिमान आहेस; म्हणून मी आजपासून तुझं नाव “सरस्वती” ठेवतो! त्या दिवशीपासून राजमणि आता “सरस्वती राजमणि” या नावाने ओळखू जाऊ लागली.
परंतु राजमणी एवढ्यावरच थांबली नाही. तिने नेताजींच्या शिबिरात जाऊन त्यांची भेट घेतली. तिला त्यांच्या आर्मीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी विनंती केली. सरस्वती राजमणिचा निश्चय एवढा पक्का होता की; नेताजी तिला नाही म्हणू शकले नाहीत. तिला ‘आयएनए’ मध्ये समाविष्ट करून घेण्यात आले!
सुरुवातीला सरस्वती राजमणि सैन्याच्या सेवा-सुश्रुशेचं काम करू लागली. परंतु केवळ या कामावरती सरस्वती राजामणिचे समाधान झालं नाही. तिला अधिक जोखमीचं काम हवं होतं. #तिची जिद्द आणि बुद्धी पाहून नेताजींनी तिला गुप्तहेराची कामगिरी दिली. इंग्रजांच्या छावणीमध्ये जाऊन तिथल्या बातम्या काढणे आणि त्या ‘आयएनए’ च्या कार्यालयापर्यंत पोचवणे अशी महत्वाची जिम्मेदारी देण्यात आली. अशाप्रकारे सरस्वती राजमणि ही सर्वात कमी वयाची गुप्तहेर ठरली!
खरंतर गुप्तहेराचे काम म्हणजे; सदैव प्राण संकटात ठेवणे! गुप्तहेर जर पकडला गेला तर त्याला हाल-हाल करून मारण्यात येतं, शिवाय आपली माहिती शत्रूला जाण्याची शक्यता असते; म्हणून गुप्तहेर जर शत्रूकडून पकडला गेला तर त्याला स्वतःच प्राणार्पण करण्याचे आदेश देण्यात आलेले असतात. आझाद हिंद सेनेसाठी आपले प्राणपणाला लावण्याची जबाबदारी या सोळा वर्षाच्या मुलीने हसत-हसत स्वीकारली!
#लांबसडक केस कापण्यात येऊन मुलांसारखे छोटे केस करून झाले. मुलींच्या पेहरावाऐवजी मुलाचे कपडे घालण्यात आले. राजमणि आता “मणि” नावाने मुलगा झाला! तसेच वेष बदलून नीरा आर्य, मानवती आर्य आणि दुर्गा मल्ल गोरखा या तीन तरुणीदेखील हेरगिरीच्या कामगिरीसाठी नियुक्त केल्या गेल्या.
सफाई-कर्मचारी, लाउंड्री- बॉय आदींच्या माध्यमातून आझाद हिंद सेनेचे हे वीर हेरगिरी करण्यासाठी इंग्रजांच्या छावणीत प्रवेश मिळविते झाले. काकदृष्टीने आणि प्रसंगावधान राखून इंग्रजांच्या छावणीतील हालचाली, गोपनीय माहिती, बातम्याच नव्हे तर प्रसंगी शस्त्रदेखील नेताजींच्या शिबिरापर्यंत पोचवणे सुरु झाले. सुमारे दोन वर्षे त्यांची हेरगिरीची कामगिरी बिनबोभाटपणे चालू होती. दुर्दैवाने एकेदिवशी “दुर्गा” इंग्रजांच्या तावडीत सापडली. तिचे आत्महत्येचे प्रयत्न विफल झाले. इंग्रजांनी तिला पकडून जेलमध्ये बंदिस्त केले! आता सारेच बिंग बाहेर येण्याची परिस्थिती निर्माण झाली. दुर्गाला एकटीला इंग्रजांच्या विळख्यात सोडून पळून जाणे सरस्वती राजामणिच्या मनाला पटेना. शेवटी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिने धाडस करायचे ठरवले. पुन्हा आपला वेष बदलून; ती दुर्गाला जिथे डांबून ठेवले होते तिथे पोचली. पिनच्या सहाय्याने कुलूप उघडून दुर्गाला सोडवले आणि पहारेकऱ्यांच्या हातावर तुरी देऊन दुर्गासह पसार होण्यात यशस्वी झाली. परंतु लगेचच हि बाब इंग्रज सैन्याच्या निदर्शनास आली. एकच गोंधळ माजला, “लडकी भाग गयी, लडकी भाग गयी” करीत इंग्रजी सैन्याने शोधाशोध सुरु केली. सरस्वती राजामणि, नीरा आर्य आणि दुर्गा जंगलाच्या दिशेने पळत सुटल्या. त्यांच्या मागे इंग्रजी सैनिक लागले, मुली हाताशी येत नाहीत हे पाहून सैनिकांनी मुलींच्या दिशेने गोळ्या झाडल्या, त्यातील एक गोळी सरस्वती राजामणिच्या पायाला लागली. रक्ताळलेला पाय तसाच घेऊन ती खुरडत खुरडत पळू लागली. कोणत्याही परिस्थितीत त्यांना इंग्रजांच्या हातात सापडायचे नव्हते! आझाद हिंद सेनेच्या त्या शूर सेनानी होत्या! आता पळणे अशक्य झाल्याचे पाहून त्या तिघी एका झाडावर चढल्या… गोळीमुळे झालेली भळभळती जखम घेऊन नि उपाशीपोटी त्यांनी तीन दिवस झाडावरच काढले. केव्हढे ते साहस, धडाडी, सहनशीलता, जिद्द, त्याग नि नेताजींवरील निष्ठा!
जंगलातील शोधाशोध थांबल्याचा अदमास घेऊन त्या खाली उतरल्या आणि नेताजींच्या शिबिरापर्यंत पोचल्या. अवघ्या अठरा वर्षाच्या त्या कोवळ्या सरस्वती राजामणिचे धाडस नि जिद्द पाहून नेताजी खुश झाले. #तीन दिवस पायात बंदुकीची गोळी घुसून राहिल्याने सरस्वती राजामणि एका पायाने कायमची अधू झाली. या साहसाबद्दल नेताजींनी सरस्वती राजमणिला आझाद हिंद सेनेच्या ‘राणी झाँसी ब्रिगेड’ मध्ये “लेफ्टिनेंट” चे पद देऊन तिचा सन्मान केला!
इ. स. १९४५ मध्ये इंग्रजांचा विजय होऊन दुसरे विश्वयुद्ध समाप्त झाले. आझाद हिंद सेना बरखास्त करून नेताजींनी सैनिकांना भारतात परतण्याची मुभा दिली. दुर्दैवाने त्याच दरम्यान तैवानमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विमानाला अपघात झाला आणि आझाद हिंद सेनेचे हजारो देशभक्त पोरके झाले!
#पुढे दोन वर्षात १९४७ ला हिंदुस्थान स्वतंत्र झाला. या नव्या भारताला सरस्वती राजामणि सारख्या आझाद हिंद सेनेच्या सैनिकांची गरज उरली नव्हती. भारतीय स्वतंत्रता संग्रामात आपल्या सुखी नि ऐश्वर्यसंपन्न तारुण्याची राखरांगोळी करून घेणाऱ्या अनेक क्रांतीकारकांच्या वाट्याला उपेक्षाच आली!
#एकेकाळी सोन्याच्या खाणींची वारसदार असलेल्या सरस्वती राजमणि; चेन्नईमधील एका पडझड झालेल्या घरात किरायाने राहू लागल्या. “सुमारे पंचवीस वर्षांनंतर” मिळालेली स्वातंत्र्य सैनिकांची मिळालेली तुटपुंजी पेन्शन यावरच त्यांची गुजराण चाले. तशाही परिस्थितीत त्यांनी समाजसेवाच केली. ड्रेसेस शिवणाऱ्या टेलरकडून उरलेल्या कापडाचे तुकडे त्या आणायच्या. त्यांना जोडून, त्याचे कपडे शिवून; ते गरीब नि गरजू लोकांना फुकटात देऊ करायच्या.
दरम्यान स्वातंत्र्यप्राप्तीची पन्नास वर्षे उलटून गेल्यावर; एका शोध पत्रकाराने ‘सरस्वती राजमणिला’ शोधलं. त्यांची माहिती आणि सद्यस्थिती वर्तमानपत्रात छापली. तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय जयललिता यांच्या निदर्शनास ती बातमी आली; पन्नास वर्षानंतर का होईना पण जयललिताजींनी त्यांचा यथोचित सन्मान केला, सरकारी घर आणि भत्ता देऊ केला!
दिनांक १३ जानेवारी २०१८ रोजी नेताजींच्या आझाद हिंद सेनेतील सरस्वती राजमणि या शूर सेनानीने शेवटचा श्वास घेतला!
#चेन्नईमधील छोट्याशा सरकारी घरात आयुष्य काढणाऱ्या सरस्वती राजामणि, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या अनेक ‘अनसंग हीरोज’ चे प्रतिनिधित्व करतात. ज्यांना ना इतिहासाच्या पानांवर गौरवास्पद स्थान मिळाले, ना राजकीय नेत्यांनी लक्ष दिले, ना हि जनतेने त्यांच्या कर्तृत्वाचे गीत गायले! हा इतिहास आम्हाला कधी शिकवलाच गेला नाही; तो नवीन पिढीपर्यंत पोचला नाही तर कदाचित त्यांना स्वातंत्र्याची किंमत कळणार देखील नाही आणि मग स्वातंत्र्य म्हणजे केवळ “सत्याग्रह आणि अहिंसेचे बक्षीस” अशीच धारणा बनली जाण्याचा धोका संभवतो. सरस्वती राजामणिसारख्या देशभक्तांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आपण सारे त्यांचे ऋणी आहोत, स्वातंत्र्यदिन साजरा करीत असतांना सरस्वती राजामणि सारख्या देशभक्तांचे कर्तृत्व आणि योगदान सर्वदूर पोचवण्याचे काम केलेतरी आपण काही प्रमाणात त्यांचा गौरव करू शकलो असे म्हणता येईल.
“स्पाय गर्ल” “सरस्वती राजमणिला” ही एक श्रद्धांजली ! जय हिंद !
लेखक : श्री शिरीष अंबुलगेकर
मुंबई, मो 7021309583
प्रस्तुती : मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
व्हेल हा मत्स्य योनीतला राजस मासा, व समुद्रातील सर्वोच्च भक्षक! (Apex Predator). असं म्हणतात की व्हेल हा पृथ्वीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी. पूर्ण वाढलेला व्हेल जवळजवळ 200 टन वजनाचा आणि शंभर फूट लांब इतका असतो. Toothed व Baleen असे व्हेल चे दोन प्रकार. डॉल्फिन, पॉर्पोईज या व्हेलच्याच उपजाती. पृथ्वीवरील सर्व ठिकाणी समुद्रात व्हेल्सचा वास असतो. त्यांची आवाज काढण्याची एक विशिष्ट पद्धत असते. समुद्राखालून सोनार लावल्यास व्हेलचे आवाज ऐकू येतात. व्हेल्सच्या या आवाजांचा वापर करून युद्धामध्ये गुप्तहेर पाणबुड्या टेहळणीसाठी वापरतात, जेणेकरून त्यांचे अस्तित्व कोणाला समजू नये.
व्हेल बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे, परंतु आज मी व्हेलच्या शेवटच्या उडी बद्दल लिहिणार आहे. दर्यावर्दी लोकांची अशी एक म्हण आहे – “When a whale falls, everything grows” हे कसे काय? तेच सांगणार आहे. असा विश्वास आहे की, व्हेल माशात एक अजब क्षमता असते. मरण जवळ आल्याची पूर्व सूचना! जेव्हा ही वर्दी येते तो चूपचाप आपला समूह सोडतो. आणि कोठेतरी शांत व एकांत स्थळ निवडतो. तो आता त्याच्या आयुष्यातील काही गंमतीशीर कवायती करणार असतो. त्याचे हे शेवटचे व उत्तम सादरीकरण असणार असते. आहे नाही त्या शक्तीनिशी तो समुद्राच्या पृष्ठभागावर येऊन त्याच्या नेत्रदीपक कवायती करतो. आयुष्याच्या अंताला हसत हसत कवटाळतो अगदी शांतपणे, लयबद्ध व आनंदात ! शरीराचा एक सुंदर पवित्रा घेऊन तो त्याची शेवटची उडी मारतो, डोळे बंद करतो, श्वासही बंद करतो व समुद्रतळाकडे हळूहळू जाऊ लागतो. होय… आता मरणास तो आनंद, संयम व निर्भीडपणे सामोरा जातो. हीच ती व्हेल ची शेवटची उडी.
व्हेल ची ही शेवटची उडी अनेक नवनिर्मितीला आमंत्रण देत असते. शार्क व ईल माशांना याचा पहिला सुगावा लागतो. ते तुटून का पडत नाहीत? कारण एवढा प्रचंड महाकाय मासा त्यांना अनेक दिवस खाद्य म्हणून पुरणार असतो. जेव्हा व्हेलचे शरीर समुद्रतळावर येऊन स्थिर होते तेव्हा समुद्रतळातले छोटे छोटे मासे (Crustaceans) त्यातील प्रोटीन्स व ऑरगॅनिक पदार्थ खाऊ लागतात. ते त्या शरीरात वस्ती करूनच राहतात. जवळजवळ दोन वर्ष ही प्रक्रिया चालते. व्हेलच्या शरीरातील सर्व काही खाऊन फस्त झाल्यावर जो उरतो तो फक्त त्याचा सांगाडा! त्यांचे प्रजनन तर चालूच असतं. आता यापुढे काम असतं एका बॅक्टेरियाचं. (Anaerobic Bacteria). सांगाडा पोखरून त्यातील लिपिडचे विच्छेदन करून त्यापासून हायड्रोजन सल्फाईड वायू निर्माण केला जातो. ही प्रक्रिया येथेच थांबत नाही तर यातूनही व्हेलचे जे पार्थिव असते त्याचे रूपांतर रिफ (प्रवाळ) मध्ये होते. हेच ते समुद्र जलचरांचे छोटे छोटे निवास. शंभर वर्ष ही प्रक्रिया चालते व एका व्हेल माशाचा शेवटचा अणु रेणू ही वापरला जातो. व अशा प्रकारे एका व्हेलच्या शरीरातून ४३ प्रजाती व जवळपास १२,४९० जीव जीवाणूंना रोजगार व जीविताचा आधार होतो पुढील जवळ पास शंभर वर्षे … एक व्हेल समुद्र तळाशी जातो, जेणेकरून एवढे सगळे जीव जीवाणू त्यावर जगू शकतील …
लेखिका : सुश्री अंजली राजाध्यक्ष
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अमेरिकेतील एका मोठ्या शहरातील एका हॅास्पिटल मधे जेन नवीन नर्स म्हणून कामाला लागली होती. त्या रात्री तिथे एक बाळ जन्माला आले पण त्या बाळाला severe congenital disorder होती. बाळाच्या मेंदूवर परिणाम झाला होता व ते बाळ जगणार नाही हे डॉक्टरांना दिसत होते. जेनला वाटले की नेमके आपल्या नोकरीच्या पहिल्या आठवड्यात अगदी असे बाळ का जन्माला यावे? माणसाचे मन तरी किती विचित्र असतं..कायम फक्त स्वतःचा विचार करतं..
जेनने यापूर्वी अशा प्रकारचे बाळ जन्माला आले तर काय होते बघितले होते. अशा बाळांना ॲडमिट करून ती जाण्याची वाट बघितली जाते. कारण उपचाराचा काही उपयोग नसतो.
त्या रात्री मॅटर्निटी वॉर्डची प्रमुख नॅन्सी कामाला आली. जेनने नॅन्सीला या बाळाची माहिती दिली. नॅन्सीने बाळाजवळ जाऊन सर्व रिपोर्ट वाचले. त्यानंतर नॅन्सीने जे केले ते बघून जेनला जी शिकवण मिळाली ती जेन आयुष्यभर विसरली नाही.
नॅन्सी त्या बाळाजवळ गेली. तिने तिचा चेहरा बाळाच्या अगदी शेजारी आणला आणि ती बाळाशी बोलू लागली. “कसं आहे आमचे बाळ? तू किती सुंदर आहेस हे तुला माहिती आहे का? किती गोड आहेस तू” असे बोलत नॅन्सीने त्या अत्यंत आजारी बाळाला हळुवारपणे उचलून घेतले. त्याला जवळ घेऊन ती थोडावेळ बसून राहिली. तिने गाणे गुणगुणत त्याला दुधाच्या बाटलीने दूध पाजले. परत त्याच्याशी गोड आवाजात बरच काही बोलली. बाळाला झोपवून तिने त्याला अलगद पाळण्यात ठेवले. हे तिने एकदाच नाही पण त्या रात्री अनेकवेळा केले. जणू काही ते तिचे स्वतःचे बाळ होते..
जेन अंतर्बाह्य हलून गेली. तिच्या नर्सिंग कॉलेजमध्ये असे काही शिकवले नव्हते. नॅन्सी म्हणाली,”जिथे मेडीकल उपचार संपतात त्यानंतर सगळं संपलं असं कधीच नसते. प्रत्येक जीवाला प्रेमाचा स्पर्श कळतो. आवाजातलं प्रेम कळतं. कुठल्याही नर्सचं हे कर्तव्य आहे की जोवर एखाद्या जीवाचा श्वासोच्छवास सुरू आहे तोवर त्याची काळजी घ्यायची! सर्व प्रकारे जपायचं! प्रेम द्यायचं!”
स्पर्श ही मानवी जीवाला समजणारी सर्व भाषांपलीकडील भाषा आहे. इतर कोणत्याही औषधांचा उपयोग नसताना नॅन्सीने त्या चिमुकल्या जीवाला प्रेमळ स्पर्शाचे औषध देऊन त्याचा कठीण काळ थोडा का होईना सुलभ केला होता. जिथे डॉक्टरांनी हात टेकले होते तिथे नॅन्सीने एक नवा उपचार शोधून काढला होता.
जेनला ही महान शिकवण त्या रात्री मिळाली. पुढची ५० वर्षे जेन ने वेगवेगळ्या मॅटर्निटी वॉर्डमध्ये काम केले. तिला उत्तम नर्स म्हणून अनेक बक्षिसे मिळाली. मान- सन्मान मिळाले. तिने कित्येक जाणारी बाळे पण बघितली आणि नॅन्सीची शिकवण डोळ्यापुढे ठेऊन त्या प्रत्येक आजारी बाळाला प्रेमाचा स्पर्श दिला. बाळाच्या शेजारी आपला चेहरा आणून त्या बाळाचे कौतुक केले. त्याला जवळ घेऊन बाटलीतून दूध पाजून ती बसून राहिली आणि त्या पलीकडे जाऊन त्या बाळाच्या आईचे सांत्वन केले.
स्पर्श ही आपण एखाद्या व्यक्तीला दिलेली अमूल्य भेट आहे. दोन हाताच्या उबेतून एक शब्द न बोलता आपले प्रेम दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोचवणारी! आपल्यातले तेज दुसऱ्याला देऊन त्या व्यक्तीचे जग उजळवून टाकणारी! एक पाठीवरची प्रेमळ थाप सर्व ताणातून मुक्त करण्यास पुरेशी असते.
जगात अनेक प्रकारची कनेक्टीव्हीटी आली आहे पण माणसाचा एकटेपणा काही कमी होत नाही..म्हणून एखाद्या व्यक्तीला भेट द्यायची असेल प्रेमळ स्पर्शाची भेट द्यावी. शेजारी श्रोता होऊन बसावे आणि त्या व्यक्तीचा एकटेपणा दूर करावा.
बुद्धिबळपटू बॉबी फिशर ने म्हटले आहे, “Nothing is so healing as the human touch.”
लेखिका : सुश्री ज्योती रानडे
प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ जंगल फार्म आणि स्मार्ट सॉफ्टवेअर☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
गोष्ट खूप जुनी. २००८ सालापूर्वीची. साल नमूद करायचं कारण म्हणजे २००८ साली भारतात गूगल मॅप पहिल्यांदा अवतरलं, त्याच्या आधीचा हा प्रसंग.
तेव्हाच्या ठाणे जिल्ह्यातील (आताच्या पालघर जिल्ह्यातील) बोर्डी/डहाणूजवळील असवाली येथील सूर्यहास चौधरींच्या “जंगल फार्म” येथील हा प्रसंग thejunglefarm.in.
निसर्गाच्या सान्निध्यात, जैवविविधता, पर्यावरण, adventure आणि unlimited धमाल याचं अफलातून मिश्रण म्हणजे “जंगल फार्म”. पैसा फेकून AC खोल्यांमध्ये निव्वळ ऐदीपणे लोळणे याच्यापलीकडे ज्यांची बुद्धी चालते अशांसाठी अप्रतिम पर्वणी.
बार्डाचा डोंगर, असवाली धरण, कोसबाड हिल, बोर्डी – घोलवड – डहाणूचे समुद्रकिनारे आणि खुद्द जंगल फार्मवरील अनेकविध उपक्रम या सगळ्याचा आस्वाद घेण्यासाठी दोन तीन दिवससुद्धा कमी पडतात आणि यासाठी वेगवेगळ्या शाळा कॉलेजांतून, मित्रमंडळासोबत अथवा IT/ अन्य कंपन्यांमधून अनेकजण इथे येत असतात, पुन्हा पुन्हा येत असतात.
या वेळी, एका IT कंपनीतून बस भरून ४०-४५ जण मुंबईहून “जंगल फार्म”ला येत होते. पश्चिम द्रुतगती मार्गाने चारोटी टोल नाक्यानंतर त्यांनी डावीकडे डहाणूसाठी वळण घेतले, पुढे सागर नाक्यापर्यंत आले आणि मग त्यांच्यातल्या एकाने सूर्यहास दादांना फोन लावला.
“सूर्यादादा, आम्ही सागर नाक्यापर्यंत आलो आहोत, आता डावीकडे वळून “पार नाक्या”ला येतो आणि मग बोर्डीच्या रस्त्याला लागतो,” तो फोन करणारा सांगत होता.
सूर्यादादाने ते कितीजण आहेत, कसे येत आहेत, बसने येत आहेत म्हटल्यावर बसचा नंबर काय वगैरे माहिती विचारून घेतली आणि मग तो बोलू लागला.
“तुम्ही मला वाटत पहिल्यांदाच येत आहात ना जंगल फार्मला ?” दादाने खात्री करून घेतली, “डहाणू ते बोर्डी साधारण २० किलोमीटर अंतर आहे आणि तिथून आपलं जंगल फार्म आणखी १० किलोमीटर. खरं सांगायचं तर रस्ता थोडा confusing आहे. पण माझ्या एका मित्राने मला एक नवीन सॉफ्टवेअर पाठवले आहे. तुम्ही जर फोन चालू ठेवलात आणि तुमचा मोबाईल डाटा चालू ठेवलात, तर तुम्ही कुठे आहात, आजूबाजूला काय आहे, ते मला इथे माझ्या फोनवर समजू शकतं.”
मुंबईहून येणाऱ्या ITवाल्याचे कान टवकारले. असं काही सॉफ्टवेअर ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी दुर्गम भागात राहणाऱ्या माणसाकडे असावं आणि मुंबईत राहणाऱ्या आपल्याला त्याचा थांगपत्ताही नसावा, याचं त्याला अप्रूपही वाटलं आणि वैषम्यही.
“तुम्ही फोन चालू ठेवा,” सूर्यादादा पुढे बोलत होता, “मी जरा ते सॉफ्टवेअर चालतं आहे ना खात्री करून घेतो, म्हणजे कसं यायचं ते मला तुम्हाला सांगता येईल.”
पुढच्या पाच मिनिटात पुढे कसं यायचं ते सूर्यादादा मुंबईच्या ग्रुपला सांगत होता. बस कितीही वेगात धावली किंवा तिची गती कमी झाली, तरी सूर्यादादांच्या सांगण्यातले landmarks चुकत नव्हते.
पुढे सहज सांगताना जेव्हा दादाने “जरा म्हशींचा घोळका येत आहे, सांभाळून हां” किंवा “तुमच्या मागून स्कूल बस येत आहे” अशा बारीक सारीक खाणाखुणाही सांगितल्या, तेव्हा बसमधल्या समस्त मुंबईकरांसी अचंबा जाहला.
पाऊण एक तासानंतर बस असवाली धरणाजवळील कच्च्या रस्त्यावरून “जंगल फार्म”च्या रस्त्याला लागली, आणि गेटमधून आत वळली. सूर्यादादाचा फोन चालूच होता, त्यामुळे हा सगळा प्रवास निर्धोक निर्वेध पार पडला.
सगळे जण उतरले, बसमधून सामान काढायला लागत होते, तेवढ्यात सूर्यादादा एका गाडीतून बसपाठोपाठ “जंगल फार्म”मध्ये शिरला.
बसमधल्या माणसाने त्याचा कॉल कट केला आणि तो सूर्यादादांना भेटायला धावला. त्याला ते सॉफ्टवेअर बघायचे होते, समजावून घ्यायचे होते.
सूर्यादादा त्याला भेटले आणि म्हणाले, “तुम्ही एवढ्या दुरून मुंबईहून आले आहात, दमला असाल, हात पाय तोंड धुवून घ्या, फ्रेश व्हा, चहा पिताना निवांत बोलू.”
हातात चहाचा कप घेतल्याघेतल्या तो फोनवरचा माणूस दादाच्या खनपटीला बसला, “दादा, हे कसं काय तुम्ही केलंत ते सांगा ना. म्हणजे बस कुठे आहे, कुठे वळायचं, एवढंच नाही तर मागेपुढे म्हशी आहेत, शाळेची बस आहे हे सगळं सगळं तुम्हाला कळत होतं. कोणतं सॉफ्टवेअर आहे ते सांगा तरी आम्हाला. तुम्ही आम्हाला ते विकू शकाल का ?” वगैरे वगैरे.
चहा पित, मिश्किल हसत सूर्यादादा म्हणाला, “माझं secret मी तुम्हाला सांगतो, पण त्याआधी मी तुमची सगळ्यांची माफी मागतो.
असलं कुठलं सॉफ्टवेअर माझ्याकडे नाही. अहो, तुमची बस डहाणूला सागर नाक्याला होती, तेव्हा तुमच्या मागोमाग माझी गाडी होती. त्यामुळे कुठे वळण आहे, मागेपुढे कोण आहे हे मला प्रत्यक्ष दिसत होतं आणि मी तुम्हाला तसं सांगत होतो. बाकी ते मोबाईल डाटा चालू ठेवा – सगळं उगाच बनवाबनवी होतं.”
बसमधल्या IT तज्ञांनी कपाळावर हात मारला. सूर्यादादांनी त्यांना सहजी गंडवलं होतं.
“अर्थात, हे असं नकाशा दाखवणारं सॉफ्टवेअर पुढेमागे येईलही कदाचित,” दादा गंभीरपणे सांगत होते.
“गूगल मॅपच्या रूपाने आता तसं ॲप आलं आहे खरं, पण मागच्यापुढच्या म्हशी ओळखता येण्याची सोय अजूनही गुगलचे सर्वेसर्वा सुंदर पिचाई करू शकले नाहीयेत,” जंगल फार्मची धुरा आता समर्थपणे पेलणाऱ्या आपल्या मुलाला – तपन (8830262319) ला ही जुनी आठवण सांगताना, डोळे मिचकावत सूर्यादादा सांगत होते.
☆ क्रांतिकारक दामोदर हरी चापेकर — लेखक : श्री संतोष भोसेकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
(प्रखर राष्ट्रभक्ती आणि शौर्याचा मूर्तिमंत अवतार असलेले क्रांतिकारक दामोदर हरी चापेकर)
भारताच्या स्वातंत्र्यासाठी एकाच घरातील तीन भावंडांनी आपली शिर कमले भारतमातेच्या चरणी अर्पण केली. जुलमी इंग्रज अधिकारी रँडचा वध करणारे मोठे बंधू दामोदर हरी चापेकर यांना १८ एप्रिल १८९८ रोजी फाशी देण्यात आले.
हरिकीर्तनकारांच्या घराण्यात जन्मलेले दामोदरपंत, बाळकृष्ण आणि वासुदेव हे तिघे बंधू . बालपणापासूनच त्यांना व्यायामाची आवड होती .त्यांच्यावर लोकमान्य टिळकांचा प्रचंड प्रभाव होता. तिघेही बंधू हरिकीर्तनात वडिलांना मदत करीत असत. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गाऊन लोकांमध्ये क्रांतीसाठी स्फूर्ती घडवीत. मुलांना कवायत शिकवीत. व्यायामाचे महत्त्व पटवून देत असत.
१८९७ मध्ये प्लेगची साथ सुरू झाली. त्यावेळी इंग्रजांनी पुण्यात प्रचंड अत्याचाराचा हैदोस मांडला होता. पुण्याचा कलेक्टर रँड हा अत्यंत क्रूर होता. पुण्यातील नागरिकांवर प्रचंड अत्याचार करू लागला. अत्याचारी रँड विषयी चापेकर बंधूंच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली. त्या अत्याचाराचा सूड घेण्यासाठी दामोदरपंतांनी रँडच्या वधाची योजना आखली.
२२ जून १८९७ या दिवशी पुण्यातील गणेश खिंडीत एका कार्यक्रमाहून परतत असताना उन्मत रँड आणि आयस्टर या दोघांना गोळ्या झाडून वध केला. द्रविड बंधूंच्या फितुरीमुळे दामोदर पंतांना पकडले आणि त्यांना पुण्याच्या येरवडा तुरुंगात आजच्या दिवशी फाशी देण्यात आले. तीनही बंधू अत्यंत धैर्याने फासावर चढले. या सशस्त्र क्रांतिकारकांचा इतिहास अजरामर आणि प्रेरक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्यावर जहाल असा पोवाडा रचला.
स्वार्थ मारुनी लाथ; ठोकिला रँड जनछळ शमनाला l
परार्थसाधू श्री चाफेकर योग्य का न ते नमनाला ll
पराक्रमाच्या तेजा तुमच्या त्रासुनि निंदिती जरि घुबडे l
वीर कथा तुमची ही गाईल पिढीपिढी नव पुढे पुढे ll
दामोदर चाफेकर फासावर गेले त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले वर्णन..
न्यायाधीश हा जोशी उत्तम उदय मुहूर्ता योग्य गणी l
सत्य देशहित वऱ्हाड जमले कीर्ती नीति ह्या वऱ्हाडणि l
टिळक गजानन नमस्कारिला फास बोहले मग पुरले l
स्मरले गीतमंत्र दामूने मुक्ती- नवरीला हो वरिले l
परी अहाहा! मायावी ही नवरी वर पळवील कुठे l
कुठे हरपले वऱ्हाड सारे अंगाला बहु कंप सुटे !
भारतमातेला सुद्धा या शूर अशा तीन बंधूंचा अभिमान वाटला असावा. जगाच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण आहे.
क्रांतिकारक दामोदर हरी चाफेकर यांच्या पराक्रमाला वंदन.
लेखक : संतोष भोसेकर
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ डोक्यात राख घालून घेतलेली मुलगी!☆ श्री संभाजी बबन गायके☆
ती विमनस्क अवस्थेतच स्मशानात पोहोचली. तिचा एकंदर अवतार पाहून ही आजही काहीतरी भलतंच करणार असा कयास तिथं उपस्थित असलेल्या एकाने लावला आणि त्याने आपल्या मोबाईलचा कॅमेरा सुरू केला. ती जळून राखरांगोळी झालेल्या चितेजवळ जाऊन दोन्ही पायांवर बसली आणि तिने त्या राखेत हात घातला. यातील चिमुटभर राख ती कपाळावर लावेल असं वाटत असतानाच का कुणास ठाऊक तिने अत्यंत आवेगाने दोन्ही हातांच्या ओंजळीत ती राख घेतली…आधी तोंडाला फासली आणि मग आपल्या डोक्यात घातली….बघणारे सर्व स्तब्ध आणि नि:शब्द! काय बोलणार?
“मी यानंतर कोणालाही असं बेवारस जळू देणार नाही!” असं काहीसं ती पुटपुटत राहिली बराचवेळ आणि तिथून निघून गेली झपाझप पावलं टाकीत.
कालच दुपारी ती आली होती आपल्या सख़्ख्या भावाचं शव घेऊन इथं. सोबत मोजकीच माणसं. आणि त्यात कुणीही पुरूष नाही. तिच्या भावाला आदल्या संध्याकाळी काही लोकांनी गोळ्या घालून ठार मारलं होतं भररस्त्यात. तिने खूप आरडाओरडा केला पण कुणीही तिच्या मदतीला धाऊन आलं नाही. तिने स्वत: कशीबशी रुग्णवाहिका बोलावून घेऊन रक्तबंबाळ झालेल्या भावाला सरकारी इस्पितळात पोहोचवलं. खरं तर तो जागीच गतप्राण झालेला होता. त्याचा देह उत्तरीय तपासणीसाठी शवागारात हलवला पोलिसांनी..ती ही तिथपर्यंत गेली पाय ओढत ओढत आणि तिथलं भयावह वास्तव पाहून ती मनातून पार हादरून गेली. अगणित शवं पांढ-या कापडांनी गुंडाळून ठेवलेली…नातेवाईकांची वाट पहात.
उत्तरीय तपासणी होण्यास काही वेळ तर लागणारच होता….भावाचं शव ताब्यात घेण्याची तिची हिंमत होईना…एकटीच होती ती त्याची नातेवाईक म्हणून. आईचं काहीच महिन्यांपूर्वी अचानक निधन झालं होतं. वडील कामावर गेलेले होते. दिल्लीच्या मेट्रो रेल्वेत ते हंगामी चालक म्हणून कामावर होते. ती इस्पितळातून थेट घरी पोहोचली. आणि अगदी विमनस्क अवस्थेत बसून राहिली. वडील घरी आले…त्यांना ही बातमी समजली होती उडत उडत. पण नेमकं काय झालं हे त्यांना तिच्या तोंडूनच कसे बसे समजले आणि ते धाडकन खाली कोसळले आणि थेट कोमा मध्ये गेले…बेशुद्ध!
खुनासारखं भयानक प्रकरण ऐकून जवळचा कुणीही नातेवाईक यांच्या घरी फिरकायला तयार नव्हता. आपण भावाला असं एकटं बेवारस टाकून तिथून निघून यायला नको होतं…तिला वाटलं. तो पर्यंत रात्र सरून गेली होती. ती तशीच इस्पितळात पोहोचली. काहूर माजलेल्या काळजानं तिने सोपस्कार उरकले आणि भावाला स्मशनात आणलं. पण अंत्यविधी पार कोण पाडणार. घरचा एकही पुरूष तिथं आलेला नव्हता. महिला तर करूच शकत नाहीत अंत्यविधी. मग तिने आपल्या डोक्यावर एक मोठं फडकं बांधलं…पगडी सारखं. आणि स्वत: पुढे होऊन जे काही करायचं असतं ते केलं भरल्या डोळ्यांनी. “दादा, तुला काल तिथं असं एकट्याला टाकून यायला नको होतं रे मी!” ती त्याचा देह विद्युतदाहिनीच्या मुखात दिसेनासा होईपर्यंत म्हणत होती. तिथं रडायला ती एकटीच होती. स्मशान भूमीत आणखी बरेच देह प्रतिक्षेत होते अंतिम निरोपाच्या. पण त्यापैकी अनेकांच्या देहासमवेत फक्त एखादा पोलिसच होता. अन्य कुणीही नाही. मग तिला समजलं….अशा हजारो बेवारस मृतदेहांची पोलिसांना विल्हेवाट लावावी लागते. २०१८ ते २०२२ या चार वर्षांतली आकडेवारी होती…अकरा हजार बेवारस देह. पैकी केवळ दीड हजारांच्या नातेवाईकांची तपास लागला आणि त्यांना शेवटचा निरोप मिळाला. बाकीचे असेच सरकारी यंत्रणांनी थंडपणे आणि यांत्रिकपणे इथपर्यंत पोहोचवले आणि इथल्यांनी एखादी चीजवस्तू जाळून टाकावी तसे ते देह अग्निच्या हवाली केले होते!
ती सकाळी एका निश्चयानेच स्मशानभूमीत पोहोचली होती. तिने भावाची राख आपल्या डोक्यात घालून प्रण केला…मी करीन बेवारसांवर अंतिम संस्कार!
वर्ष २०१८…खरं तर तिचं लग्न ठरलं होतं. एका फौजीसोबत तिचं रीतसर लग्न लागणार होतं. ती उच्चशिक्षित समाजसेवा विषयात पदव्युत्तर पदवी. कायद्याचा अभ्यास सुरु होता. एका इस्पितळात एडसग्रस्तांसाठी समुपदेशक म्हणून सेवाही करीत होती. चारचौघींसाराखीच तिचीही स्वप्नं होती. आईने लग्नासाठी दागिने खरेदी करूनही ठेवले होते. पण ती आईच देवाघरी गेली आणि पुढच्याच वर्षी माणसा-माणसांतली करूणा रसातळाला नेणारा कोरोना उपटला. लग्न लांबणीवर पडलं. तिचा भाऊ एका रुग्णवाहिकेवर चालक म्हणून नोकरी करत असे. त्याचे कुणाशी काही वाद झाले आणि त्यात त्याचा खून पडला.
हिच्या घरात आता आजारी वडील, त्यांची वृद्धा आई एवढीच माणसं शिल्लक राहिली होती. भावाच्या अंत्यसंस्कार प्रसंगी तिने त्याला दिलेला शब्द अक्षरश: खरा करून दाखवला आहे आजवर. गेल्या दोन वर्षात थोड्याथोडक्या नव्हे तर सुमारे चार हजारांना प्रेतांवर तिने विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत. त्यात विविध जातीधर्मांच्या माणसांच्या प्रेतांचा समावेश आहे. दिल्ली सारख्या महानगरामध्ये आसपासच्या राज्यांतून हजारो लोक पोटाची खळगी भरण्यासाठी येत असतात घरंदारं सोडून. यातल्या अनेकांच्या नशिबी अशी एकाकी मरणं येतात. देहांवर ओळखपत्रं सापडत नाहीत. फौजदारी कायद्यामधील तरतुदींनुसार विशिष्ट काळ वाट पाहून या मृतदेहांची विल्हेवाट लावली जाते.
आपली कथानायिका पुजा शर्मा गेल्या दोन वर्षांपासून दरदिवशी सरासरी तीन-चार मृतदेहांवर स्वखर्चाने अंत्यसंस्कार करते. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हरिद्वार गंगा किनारी जाऊन या बेवारस लोकांची रक्षा विधिवत विसर्जित करते पापक्षालिनी गंगेच्या वाहत्या प्रवाहात…..हे पुण्यकर्मच नाही तर काय?
नातेवाईक आता पुजा पासून अंतर ठेवून आहेत. तिच्या या कामामुळे तिचे लग्न होण्याची शक्यता कमी झाली आहे. तिच्या घरीही कुणी फारसं येत नाही. हो, पोलिस आणि सरकारी यंत्रणांना मात्र पुजा आता एक हक्काची माणूस झाली आहे. फाटलेल्या आभाळाला हे पुजा नावाचं थिगळ पुरणार नसलं तरी काही भाग झाकणारं तर निश्चितच आहे. पुजाचे वडील तिला त्यांच्या वेतनातून काही रक्कम देत असतात, तर आजी तिच्या निवृत्तीवेतनाचा काही भाग देते. आजीच्या मालकीचा असलेला जमिनीचा एक छोटा तुकडा तिने पुजाला दिला आहे…त्या जागी आता काही बेवारस वृद्धांना,बालकांना आधार मिळतो. पुजाने पुढे जाऊन Bright the Soul Foundation नावाने सामाजिक संस्था स्थापन केली आहे.
डोक्यात राख घालून काहीतरी विध्वंसक करण्याऐवजी पुजाने एक अत्यंत वेगळा मार्ग अनुसरला आहे…आणि म्हणूनच तिचं कौतुक वाटतं. पुजा शर्माच्या या कार्याला समाजाने पाठबळ दिलं तर बरंच होईल!
सोळा संस्कारांपैकी हा सोळावा संस्कार न लाभणं यापरती दुर्दैवाची गोष्ट नसावी. सोबती काही जीवाचे मात्र यावे न्यावयाला..तारकांच्या मांडवाखाली चिता माझी जळावी…असं कविवर्य सुरेशजी भट म्हणून गेलेत…खरा तर हा सर्व जीवांचा हक्क आहे. हा हक्क मिळवून देण्यासाठी झगडणारी अनेक माणसं,संस्था आपल्या आसपास असतील…सांगलीतल्या अशाच एका मित्रमंडळाविषयी वाचल्याचं स्मरतं. या सर्व जिवंत मनाच्या माणसांना मानाचा मुजरा!
एका गावात बैल विकणारा एक माणूस दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर दूर कुठल्याशा मुलखातून येत असे. त्याच्याकडच्या मोठ्या शिंगांच्या बैलांना स्थानिक भाषेत लोक हेडी बैलं म्हणून ओळखायचे…आणि म्हणून त्या विक्रेत्याला हेड्याबाबा असं नाव पडून गेलं होतं. मशगतीच्या कामाचा मौसम असल्यानं शेतकरी त्याच्याकडचे मोठाल्या शिंगांचे,ताकदवान बैल विकत घेतही असत. एकेवर्षी विकायला आणलेल्या बैलांना पाणी पाजायला म्हणून हा हेड्याबाबा नदीवर गेला आणि नदीतल्या त्याला अनोळखी डोहातल्या चिखलात रुतून बुडाला! दोन दिवसांनी त्याचं प्रेत पाण्यावरती आलं. त्याच्या देहाला हात कोण लावणार? ना ओळखीचा ना पाळखीचा…न जाणो कोणत्या जातीचा? जुना काळ तो. पोलिस पंचनामा असे फारसे सोपस्कार नव्हते त्या काळी. लोक नुसते काठावर उभे राहून दर्शक बनले होते. त्याच गावकुसाबाहेर राहणारा एक मोठ्या काळजाचा माणूस त्या चिखलात उतरला आणि त्याने ते प्रेत काठावर आणले. जनावरांची प्रेतं हाताळणं वेगळं…पण माणसाचा मृतदेह? सोपं काम नसतं हे! त्याने ते प्रेत दोन्ही हातांवर घेतलं आणि थेट त्याच्या मालकीच्या शेतावर नेलं. रीतसर सरण रचलं…आणि त्या अनोळखी,बेवारस देहाला अग्निच्या स्वाधीन केलं…सकाळी राख सावडली आणि ज्या नदीत त्याला मरण आलं होतं त्याच नदीत ती राख प्रवाहीत केली! लोक म्हणतात…हेड्याबाबा त्याच्या शेताची आजही राखण करतो…त्याने केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून! असो.
पूजा शर्माची प्रेरणादायी कहाणी नुकतीच वाचनात आली. ती आपल्या माहितीसाठी लिहिली. पूजा शर्मा यांच्या सामाजिक संस्थेविषयी अधिक माहिती इंटरनेट वर मिळू शकते. ([email protected] या ईमेलवर संपर्क करता येईल.) विषय अप्रिय असला तरी अपरिहार्य आहे.