मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “वस्त्र” – लेखिका : सुश्री अश्विनी मुळे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “वस्त्र” – लेखिका : सुश्री अश्विनी मुळे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

त्या वैभवशाली, भव्य दरबारात ती एखाद्या भिंगरीसारखी गरगरत होती. हात जोडत होती, विनवण्या करत होती. ती तेजस्वी बुद्धीमती युक्तिवाद करत होती. पण सर्वांच्याच माना खाली होत्या. अखेर दु:शासनाने तिच्या केसांना पकडून तिला थांबवलं आणि तिच्या वस्त्राला हात घातला. एकच जळजळीत नजर  आपल्या महापराक्रमी पतींकडे टाकून तिने डोळे घट्ट मिटून घेतले. कृष्णाचा धावा सुरु केला. “तुझं बोट कापल्यावर मी बांधलेल्या चिंधीएवढं वस्त्रसुद्धा माझ्या अंगावर उरणार नाहीये आता. तू तरी काही करणार आहेस कां? की तूही बसणार आहेस मान खाली घालून?” पण हे काय? संपूर्ण शरीराला वस्त्राचा स्पर्श अजूनही कसा काय जाणवतोय? दुर्योधनाचं मन बदललं कां? तिने हलकेच डोळे उघडले. दु:शासन दात ओठ खात दरादरा वस्त्र ओढत होता आणि ते संपतच नव्हतं. एकाला जोडून दुसरं. दुसऱ्यात गुरफटलेलं तिसरं. शालू, शेले, अंशुकं, किंशुकं, पटाव. रेशमी, कशिदाकारीची, जरीबुट्टयांची वसनं. ओघ संपतच नव्हता. संपूर्ण राजसभा पुतळ्यासारखी स्तब्ध होऊन ते आश्चर्य बघत होती. दुर्योधनाचा मदोन्मत्त चेहरा भयचकित झाला होता. बलदंड दु:शासन घामाने नाहून निघाला होता. आणि एका क्षणी ते पृथ्वीमोलाचे पाटव प्रकटलं. त्याच्या सुवर्ण झळाळीने सर्वांचे डोळे दिपले. त्या वस्त्राला मात्र हात घालण्याची हिंमत दु:शासनात नव्हती. ते तेज असह्य होऊन तो खाली कोसळला. पितामह भीष्मांनी हात उंचावून इशारा केला आणि नि:शब्दपणे दरबार रिकामा झाला. उरले फक्त अग्निकुंडातल्या ज्वालेसारखी दिसणारी द्रौपदी आणि तिच्या पायाशी कोसळलेला दु:शासन. त्याच क्षणी अठरा दिवस चालणाऱ्या सर्वसंहारी महायुद्धाचं बीज रोवलं गेलं.

वस्त्राच्या हरणामुळे महाभारत झालं आणि हरणाच्या वस्त्रामुळे रामायण घडलं. एक पळही विचार न करता, राजवस्त्रांचा त्याग करून, वल्कलं लेऊन रामा पाठोपाठ वनाची वाट धरणाऱ्या राजसबाळी सीतेला सुवर्णमृगाच्या काचोळीचा मोह कसा काय पडला असेल? तो मोह इतका प्रभावी होता की रामाने परोपरीने सांगूनही तिने आपला हट्ट मागे घेऊ नये? तिची फक्त पाऊले पहिलेल्या लक्ष्मणावर तिने संशय घ्यावा? त्याने संरक्षणासाठी आखून दिलेली मर्यादा तिने ओलांडावी?

आपल्या तीन प्राथमिक गरजांमधे दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वस्त्रांची ही ताकद. ज्यांनी दोन अजरामर युद्धं घडवून आणली. समरभूमीवर अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्णाला वस्त्रच आठवलं. ‘वासांसी जीर्णानी यथा विहाय’.

‘एक नूर आदमी, दस नूर कपडा’. माणसाचं व्यक्तिमत्त्व खुलवणारी वस्त्रं. आत्मविश्वास वाढवणारी. ऊब देणारी. सन्मान करणारी. आदर, माया, प्रेम दर्शवणारी वस्त्रं. 

गेले तेरा दिवस एक वस्त्र लाखो लोकांना जोडून घेत होतं. रेशमी धाग्यांबरोबर अतूट श्रद्धा गुंफली  जात होती. लाखो हात ते विणत होते. लाखो पाय त्या वस्त्रापर्यंत पोचण्यासाठी आनंदाने तिष्ठत होते. प्रेम, श्रद्धा, भक्तीचा कशिदा त्यावर उमटत होता. राजवस्त्र हा शब्दसुद्धा अपुरा ठरेल त्या महावस्त्राला. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामासाठी विणल्या जाणाऱ्या वसनात आपले दोन धागे सोडताना लाखो मनं उचंबळत होती. अनघाताई घैसास, तुमचं कौतुक तरी किती करू? आपण मांडलेल्या या खेळात किती सहजपणे तुम्ही सर्वांना सामावून घेतलंत. रोज बारा बारा तास चालणारे पंधरा हातमाग आणि त्यात आम्ही दिलेलं दोन धाग्यांचं अर्घ्य. त्या दोन धाग्यांत तुम्ही आम्हाला श्रीरामापर्यंत पोचवलंत.  अयोध्येला कधी जाणं होईल, माहित नाही. कधी ते रामदर्शन होईल, माहित नाही. पण माझ्या हातचे दोन धागे आज ना उद्या रामचंद्राच्या पोशाखात असतील, ही भावनाच किती तोषवणारी आहे. रामाची मूर्ती घडवण्यासाठी आणलेल्या शिळेला स्पर्श करताना जे‌ समाधान मिळालं, त्याच तोडीचं धागे विणतानाचं समाधान होतं. त्या दोन धाग्यांनी प्रत्येकाचा सहभाग राममंदिराच्या उभारणीत नोंदला गेला. पुणे ते अयोध्या हे अंतर एका नाजुकशा धाग्यावर स्वार होऊन, आम्ही सहज पार केलं. जेव्हा प्रभू रामांचं प्रत्यक्ष दर्शन घेऊ तेव्हा आम्ही विणलेले धागे त्यांच्या वस्त्रातून आम्हाला ओळख देतील. हे भाग्य अनघाताई, तुम्ही आम्हाला दिलंत. 

लेखिका : अश्विनी मुळे

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ व्यक्ती…  वल्ली…  आणि स्टेटस् – भाग-२ – लेखक : अभय कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ व्यक्ती…  वल्ली…  आणि स्टेटस् – भाग-२  – लेखक : अभय कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

(पण माझा मुलगा मांचुरियन शिवाय काही खात नाही असे अभिमानाने सांगणारे महाभाग आपल्याला बरेच दिसतात.) इथून पुढे —–

हाच प्रकार डोमिनोज किंवा मॅकडॉनल्ड्स च्या बाबतीत.   एक तर यांच्याकडे  सगळं मटेरियल असतं ते फ्रोजन मध्ये.  फ्रेश काहीही  नसतं.  फक्त हिट अँड इट या तत्वावर यांचे काम चालते.  पिझ्झा म्हणजे अक्षरशः एका ब्रेडच्या लादीवर काही भाज्यांचे तुकडे आणि केवळ घातलय म्हणायला घातलेले चीज …..  आणि यासाठी आपण चारशे – पाचशे रुपये देतो आणि हा पिझ्झा तिथे सेंटरवर जाऊन खायचा नाही ….. तो होम डिलिव्हरी ने घरी मागवायचा……  म्हणजे आसपासच्या लोकांना कळतं यांच्याकडे पिझ्झा मागवतात , स्टेटस दाखवायचा हा ही एक प्रकार.

मॅकडॉनल्ड्स सुद्धा  मुलांच्या मानसिकतेचा बरोबर विचार करून मार्केटिंग करत असते.  उदाहरणार्थ हॅप्पी मिल ……एका हॅपी मिल बरोबर एक छोटे खेळणे मोफत आणि पालक सुद्धा माझ्या मुलाला ही वेगवेगळी खेळणी जमवायला आवडतात म्हणून हॅप्पी मिल खरेदी करत असतात.  आता या मिल मध्ये एक बर्गर,  फ्रेंच फ्राईज आणि कोक असतो.  कुठल्या अँगलने हे मिल होऊ शकते ? पण माझा मुलगा हट्टच करतो…..  त्याला हेच आवडतं म्हणून  सांगणारे  खूप लोक  आहेत आणि माझ्याकडे इतकी खेळणी जमा झाली आहेत असे फुशारकीने सांगणारी मुले …..

अजून लोकांचा एक प्रकार असतो तो  म्हणजे ट्रीप ला जाणारी  लोकं . ही लोकं उत्तर भारताच्या ट्रीपला गेली की इडली सांबार मिळत नाही म्हणून अस्वस्थ होतात आणि दक्षिण भारताच्या ट्रीपला गेली की यांना छोले,परोठे पाहिजे असतात .

आमचे एक शेजारी आहेत.  ते एका नामांकित ट्रॅव्हल एजन्सी मार्फत काश्मिर ट्रीप ला गेले होते.  आल्यावर ते अभिमानाने सर्वांना सांगत होते की …..  आम्हाला गुलमर्गमध्ये नाश्त्याला कांदे पोहे दिले आणि श्रीनगर मध्ये तर चक्क पुरणपोळीचे जेवण दिले . आता या माणसापुढे हसावे की रडावे हे कळेना.  अरे बाबा आयुष्यभर कांदेपोहे आणि पुरणपोळी खातच जगला आहेस की …….. आता गेलाच आहेस काश्मीरला तर तेथील स्थानिक खाणे खा की ……… तिथला प्रसिद्ध कहावा पी ….  शाकाहारी असशील तर कमल काकडी ची भाजी खा ……पराठे खा ….. छोले  खा… राजमा खा …  नॉनव्हेज खात असशील तर वाझवान  पद्धतीचे नॉनव्हेज खा …. पण नाही ….. हे सगळीकडे वरण-भात  आणि कांदे पोहे मागतच फिरणार.

जर तुम्ही दिल्लीत गेलात तर पहाडगंज,  करोल बाग,  जुनी दिल्ली आणि लाल किल्ला या परिसरात गेलात तर रोज एक नवीन पदार्थ ट्राय करायचा तर एक वर्ष पुरणार नाही एवढी व्हरायटी मिळते . एकंदरीतच दिल्लीच्या बाजूचे लोक खाण्यापिण्याचे  शौकीन . साधे चाट खायचे म्हणले तरी कमीत कमी पन्नास प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला मिळणार . …..

उदाहरण सांगायचे झाले तर राम लड्डू….. आता लड्डू म्हणल्यावर आपल्याला गोड पदार्थ आठवतो ….  परंतु हा राम लड्डू म्हणजे मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ भिजवून व बारीक करून त्याच्यात बऱ्याच प्रकारचे मसाले घालून तळलेली मोठीच्या मोठी भजी …..त्याच्यावर बारीक कापलेला मुळा आणि कोबी … त्यावर  मिरची – पुदिना चटणी आणि गोड चटणी घालून  देतात …..  अत्यंत वेगळा असा हा पदार्थ ….

त्याच प्रमाणे राजकचोरी हा सुद्धा तिकडचा एक अत्यंत वेगळा प्रकार …. मोठ्या पुढच्या आकाराची ही कचोरी ….. त्यामध्ये दही भल्ला , उकडलेला बटाटा, उकडलेले छोले,  आलू टिक्की, बारीक शेव, गोड तिखट चटणी आणि इतर अनेक मसाले घालून वरून भरपूर दही घालतात  ….  ही राजकचोरी एकट्या माणसाला संपवणे जवळपास अशक्य …..

तसेच अजून एक मिळणारा वेगळा पदार्थ म्हणजे दहीभल्ला ….  आपल्याकडच्या दहीवड्याचा चुलत भाऊ म्हणलं तरी हरकत नाही ….. फक्त हा उडदाच्या डाळीची ऐवजी  मुगाच्या डाळीपासून तयार केला जातो …..  असा हा दहीभल्ला ….. त्यावर तिखट आणि गोड चटण्या …. चाट मसाला आणि शेव ….. तसेच बेडमी पुरी , आलू पुरी,  कांजी बडा,  कचोरी , छोले भटूरे, कुलचे छोले, भीगा कुलचा, ईमरती … किती पदार्थ सांगू….

चांदणी चौकातल्या पराठेवाली गल्ली मध्ये तर जवळपास दीडशे प्रकारचे पराठे मिळतात ….. अगदी कारल्याचा पराठा ,पापड पराठा, रबडी पराठा, ड्रायफ्रुट पराठा, फ्रुट पराठा ,…..असे कितीतरी आपल्याकडं न मिळणारे प्रकार  येथे मिळतात ……….पण नाही आम्हाला इथे वरण भातच  पाहिजे…..

नागपूर म्हणजे ज्यांना झणझणीत खाणे आवडतं त्यांच्यासाठी तर स्वर्गच  …… सकाळचा नाष्टा म्हणजे  तर्री पोहे …..  कांदेपोह्या मध्ये हरभर्‍याची उसळ व  वरून मस्तपैकी झणझणीत रस्सा ….. वरुन थोडासा मक्याचा चिवडा आणि चिरलेला कांदा ….. आणि नंतर गरमागरम चहा …… दिवसाची सुरुवात अशी झाली तर दिवस कसा जाईल हे वेगळे सांगायची गरज नाही…..  नागपुरी वडा भात ही पण एक नागपूरची स्पेशल डिश ….  गरमा गरम वाफाळता भात त्यावर डाळीचे वडे कुस्करून घातलेले आणि वरून घातलेली मिरचीची फोडणी …..  सोबत कढी… क्या बात है ……  तसेच नागपूर साईड चे वांग्याचे भरीत सुद्धा आपल्यापेक्षा वेगळे असते ……. नागपूरची वांगीच वेगळी ….  छान पैकी तुराट्या वर ठेवून ही वांगी भाजायची नंतर फोडणी करून त्याच्यामध्ये कांदा, भरपूर मिरची,  भाजून बारीक केलेले वांगे घालायचे आणि छान पैकी परतायचे ….. परतून झाल्यावर त्यावर कांद्याची पात आणि तळलेले शेंगदाणे घालायचे ….  हे  भरीत तुम्हाला कळण्याच्या भाकरीबरोबर  किंवा पुरी बरोबर मस्त लागते…….  तसंच पाटवडी रस्सा,  शेव भाजी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सांबारवडी …… आता या सांबारवडी चा आणि साऊथ इंडियन सांबार याचा काही संबंध नाही बर का ……  नागपूर साईडला सांबार म्हणजे कोथिंबीर …… तर ही कोथिंबीरीची वडी ही सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीने करतात आणि नागपूर साईडला वेगळ्या पद्धतीने करतात ….. कोथिंबीर बारीक चिरून त्यामध्ये मिरची ,आलं, लसूण यांची पेस्ट, धने पूड, जिरे पूड, मीठ  घालतात आणि नंतर हरभरा डाळीचे पीठ व गव्हाचे पीठ  यांचे मिश्रण करून त्याची पोळी लाटतात व त्या पोळी मध्ये हे  कोथिंबिरीचे मिश्रण भरतात आणि तळतात आणि ते तर्री  किंवा कढी बरोबर खायला देतात .. हल्दीराम ची दुधी भोपळा आणि संत्र्याचा रस या पासून बनवलेली संत्रा बर्फी नागपुरात जाऊन खाल्ली नाही तर तुम्हाला शंभर टक्के पाप लागणार….. कारण का ही बर्फी जास्त काळ टिकत नसल्याने नागपूरच्या बाहेर फारशी कोठेही मिळत नाही.  ….पण नाही …..  आम्हाला इथेही वरण-भातच  पाहिजे ………

जसे उत्तरेकडील जेवण चमचमीत आणि झणझणीत तसेच दक्षिणेकडील जेवण एकदम सौम्य आणि सात्विक.  आपल्याला वाटते दक्षिणेत काय फक्त इडली, डोसा आणि भात  मिळणार……. पण नुसती इडली म्हणाल तर साधी इडली,  रवा इडली ,बटन इडली, गुंटूर इडली,  तट्टे इडली,  कांचीपुरम इडली , पोडी इडली,  रागी इडली , दही इडली , घी इडली ……. किती प्रकार सांगू…..  याशिवाय उडीद वडा,  डाळ वडा,  मैसूर बोंडा , आलुबोंडा, साधा डोसा, मसाला डोसा, बेन्ने डोसा, नीर डोसा, रवा डोसा,  कट डोसा, उत्तपा आणि भातात म्हणाल तर पुलियोगरे , बिशीबाळी,  चित्रांन्ना,  स्वीट पोंगल,  पोंगल , लेमन राईस , टोमॅटो राईस, कर्ड राईस….. किती नाव सांगू. नुसत्या  रस्सम आणि सांबारचेच दहा बारा प्रकार असतात .

हिरव्यागार केळीच्या पानावर वाढलेला उकड्या तांदळाचा वाफाळलेला भात ….. आणि त्यावर गरमागरम सांबार …… हे संपल्यावर पुन्हा भात आणि त्यावर गरमागरम रस्सम ……. आणि शेवटी दहिभात ……. सोबतीला पापड , केळाचे वेफर्स आणि लोणचे. ……  वा…  याशिवाय जगात दुसरे कोणते सुख असूच शकत नाही. …..  पण इथेही काही लोक छोले भटोरे, आलू पराठा आणि टोमॅटो सूप हुडकत फिरत असतात.

जाऊ दे …. गाढवाला गुळाची चव काय हे म्हणतात तेच खरं.

क्रमश : भाग दुसरा 

लेखक : अभय कुलकर्णी, कराड

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ व्यक्ती…  वल्ली…  आणि स्टेटस् – भाग-१ – लेखक : अभय कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ व्यक्ती…  वल्ली…  आणि स्टेटस् – भाग-१ – लेखक : अभय कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

माझ्यासारखे काही लोक जसं खाण्यासाठी जगणारे असतात… तसे काही लोक हे  दाखवण्यासाठी खाणारे असतात ………

आता हीच गंमत बघाना  ….. कराड मधून खूप लोक गाडी घेऊन कायम पुण्याला जात असतात.  कधीतरी गंमत म्हणून यांना विचारून बघा…..  की पुण्याला जाताना किंवा पुण्याहून येताना तुम्ही चहा – नाश्ता घेण्यासाठी कुठे थांबता?  90 टक्के लोकांचे उत्तर येणार की…..  हॉटेल विरंगुळा किंवा हॉटेल आराम…… कारण इथे थांबणे म्हणजे स्टेटस चे लक्षण …….  आमच्या चिंटूला ना विरंगुळा मधले थालपीठ खूप आवडते आणि आमच्या बायकोला ना आराम मधली भजी……..  खरंतर महाराष्ट्रातल्या कुठल्याही हॉटेलमध्ये जशी पदार्थांची चव असते त्याच सर्वसामान्य चवीचे इथले पदार्थ असतात……  इतर हॉटेलमध्ये मिळणारा दहा रुपयाचा चहा येथे वीस रुपये देऊन घ्यायचा आणि चाळीस रुपये चा डोसा शंभर रुपयाला घ्यायचा …….  कशासाठी ? तर स्टेटस दाखवण्यासाठी…..

एकदा मी व माझा मित्र किशोर पुण्याला निघालो असताना पाचवड पुलाखाली एका टपरीवजा हॉटेलमध्ये थांबलो होतो . तिथली मिसळ आणि मिसळ बरोबर ब्रेड च्या ऐवजी दिलेली गरमा गरम पुरी दिल खुश करून गेली.  त्याचबरोबर एक प्लेट कांदा भजी….  आणि दोन कमी साखर स्पेशल चहा …… आणि एवढं सगळं फक्त शंभर रुपयात . आणि चवीच्या बाबतीत म्हणाल तर ही दोन्ही हॉटेल याच्या पासंगालाही पुरणार नाहीत…..  इथे स्टेटस नाही…..  भपका नाही …..पण चव मात्र नक्की आहे.  माझ्या सारखी माणसे मात्र अशी ठिकाणे शोधत असतात .

पुण्यात गेल्यावर सुद्धा  गंमत बघा ….. जे उच्च मध्यमवर्गीय आहेत किंवा नवश्रीमंत आहेत त्यांचे खाण्याबद्दल चे बोलणे कधीतरी ऐका …… मसाला डोसा ना मला वैशाली शिवाय कुठला आवडतच नाही …… आणि इडली खायची तर फक्त व्याडेश्वर मध्येच ……. चायनीज ना Menland China शिवाय कुठेच चांगले मिळत नाही …….. म्हणजेच याचा अर्थ आपण समजून घ्यायचा की……  मी दोनशे रुपये देऊन वैशाली मध्ये जाऊन मसाला डोसा खातो  हे त्यांना सांगायचे आहे ………. काय खातो  या पेक्षा  कुठे खातो ते दाखवण्याची जास्त हौस.

पंजाबी जेवण जेवायचे असेल …..दोन-दोन तास नंबरला थांबून  चांगले जेवण मिळते अशी भ्रामक समजूत करून घेतलेल्या लोकां बद्दल काय सांगायचे? ……  खरंतर पंजाबी जेवण म्हणजे एक शुद्ध फसवणूक आहे …… आठवड्यातून एकदाच करून ठेवलेल्या तीन प्रकारच्या ग्रेव्हीज ……. लाल ग्रेव्ही, पिवळी ग्रेव्ही व पांढरी ग्रेवी याच्या जोरावर हे जेवण चालते.  यामध्ये कौतुकाची फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे …… या तीन प्रकारच्या ग्रेव्ही पासून जवळपास 200 भाज्यांची नावे ज्यांने तयार केली असतील त्याला नोबेल पारितोषिक द्यायला हरकत नाही. 

आता हेच बघा ना  …. पिवळ्या ग्रेव्हीमध्ये हिरवे वाटाणे आणि पनीरचे तुकडे घातले की झालं मटर पनीर …… नुसतेच मटर घातले की झाला ग्रीनपीस मसाला……  नुसतं पनीर आणि वरून थोडे क्रीम घातलं की झाला पनीर माखनवाला …….. या ग्रेव्हीत काजू तळून घातले ती झाला काजू मसाला …….. लाल ग्रेव्हीत उकडलेला फ्लॉवर , वाटाणा,  गाजर घातले की झाले मिक्स व्हेज……  याच मिक्स व्हेजला तिखट पूड घालून तडका मारला की झाले व्हेज कोल्हापुरी …… याच व्हेज कोल्हापुरी वर दोन हिरव्या मिरच्या तळून ठेवल्या की झाला व्हेज अंगारा…….  मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्याला वाटतं अरे वा ….. काय व्हरायटी आहे इथं?  खरंतर भाज्या दहा-बारा प्रकारच्याच असतात ….. पण नावं वेगवेगळी देऊन त्याच पुढे येतात.  आता मला सांगा व्हेज दिलबहार किंवा व्हेज शबनम म्हणून तुमच्या पुढे काय येणार आहे हे तुम्हाला ती डिश समोर आल्याशिवाय काही कळणार आहे का?  नाही . पण मी पैज लावून सांगतो की वर सांगितलेल्या भाज्या पैकीच कोणतीतरी भाजी तुमच्यासमोर नक्की येणार. 

हॉटेलात जाऊन सुद्धा आपण कसे Health Cautious  आहोत असे दाखवणार्यांची  सुद्धा संख्या बरीच असते . गाजर ,काकडी, कांदा, मुळा आणि टोमॅटो यांच्या चार – चार चकत्या ….. की ज्याची किंमत पंधरा रुपये सुद्धा होणार नाही ते ग्रीन सॅलेड म्हणून प्लेटमध्ये सजवून दीडशे रुपयाला समोर येते…..  तीच गोष्ट रोटीची…..  बरेच जण आता रोटी मैद्याची आहे का आट्याची आहे हे विचारत असतात …… आता एवढ्या तेलकट आणि मसालेदार भाज्या , स्टार्टर्स आपण खात असतो पण आपण तब्येतीची काळजी घेतो हे दाखवायला रोटी मात्र आट्याची पाहिजे असते.

हीच गोष्ट पिण्याच्यापाण्याची. तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन टेबलवर बसला की वेटर तुम्हाला विचारतो पाणी कसले आणू ?  साधे की बिसलेरी ?  आता साधे पाणी आण म्हणून सांगण्याची लाज वाटते . मग आपोआप सांगितले जाते की बिसलेरीचे आण . बऱ्याच मोठ्या हॉटेलमध्ये बाहेर वीस रुपयाला मिळणारी पाण्याची बाटली पन्नास रुपयाला मिळते आणि आपण तेही निमूटपणे देतो.  कारण काय तर स्टेटस …… हाच प्रकार वेटरला टीप देण्याच्या बाबतीत. खरे तर चांगली सर्विस देणं हे वेटरचे कामच आहे, आणि त्या साठीच त्याला पगार मिळतो. पण बऱ्याचदा कमी टीप ठेवली तर कसे दिसेल , म्हणून आपले स्टेटस दाखवायला मनात असो वा नसो भरघोस टीप ठेवली जाते. 

अजून एक प्रकार म्हणजे अनलिमिटेड बार्बेक्यु किंवा बुफे. प्रत्येकी साधारण आठशे ते हजार रुपये यासाठी आकारले जातात. तुम्ही हॉटेलमध्ये गेल्या गेल्या तुमच्यासमोर शेफ चा वेश केलेला एक माणूस येतो.  तुम्हाला आदराने नमस्कार करतो. हॉटेलच्या मेनू मध्ये मध्ये आज काय काय स्पेशल आहे त्याची माहिती सांगतो आणि तुम्हाला स्टार्टरच्या काउंटरवर नेऊन सोडतो . या काउंटरवर पाणीपुरी, शेवपुरी ,आलू टिक्की, डोसा, पावभाजी, पकोडे ,दहिवडा अशा प्रकारचे पदार्थ ठेवले असतात. तेथे उभे असणारे कर्मचारी तुम्हाला आग्रहाने एक एक पदार्थ घ्या म्हणून खायला घालतात.  हे स्टार्टर खाऊन होईपर्यंत  तुमचे  पोट बऱ्यापैकी भरलेले असते,  त्यामुळे मेन कोर्स मध्ये एखाद दुसरी भाजी, एखादा फुलका आणि थोडासा राईस घेऊन तुमचे जेवण संपते.  स्वीट्स मध्ये सुद्धा बरेच प्रकार ठेवलेले असतात.  त्यातला एखादा तुकडा किंवा आईस्क्रीमचा एखादा स्कुप कसा तरी खाल्ला जातो आणि आपले जेवण संपते. आपण खाल्लेल्या पदार्थांचे जर वेगवेगळे असे बिल कॅल्क्युलेट केले तर अडीचशे तीनशे रुपये पेक्षा जास्त होणार नाही , पण त्यासाठी आपण जवळपास प्रत्येकी हजार रुपये मोजलेले असतात कशासाठी मी पोर्टिगोला किंवा बार्बेक्यू नेशन ला गेलो आहे हे सांगण्यासाठी. 

हीच गोष्ट चायनीज खाण्याची.  कोबी ,सिमला मिरची, गाजर, आलं, लसूण व हिरवी मिरची या मंडईत नेहमी मिळणाऱ्या भाज्या …… टोमॅटो, चिली आणि सोया हे तीन प्रकारचे सॉस,  व्हीनेगर ची बाटली , शिजवलेला भात आणि शिजवलेल्या नूडल्स आणि सर्वात महत्वाचे म्हणजे …… तोंडाने चिनी माणसासारखा दिसणारा आचारी…….  एवढं सामान जमवलं की झाला चायनीज चा सेट अप तयार.  

लोखंडी चपटी कढई कि ज्याला वॉक म्हणायचे …..ती मोठ्या आचेवर ठेवून , त्यात भरपूर तेल घालून आलं ,लसूण, मिरची, कोबी ,गाजर, सिमला मिरची , इत्यादी सर्व घालायचे आणि परतायचे….  त्यात वर सांगितलेले सर्व सॉस घालायचे आणि त्यात शिजवलेला नूडल्स घातल्या की झाल्या हक्का नूडल्स तयार……..  नूडल्स च्या ऐवजी  भात घातला की झाला फ्राईड राईस…….  यातच जरा सिमला मिरची जास्त घातली कि झाला सिंगापुरी राईस ……. भाताचे ऐवजी कोबीची कॉर्नफ्लॉवर घालून तळलेली वातड भजी घातली की झालं व्हेज मंचुरियन.  सगळ्यात वाईट म्हणजे या पदार्थात अजिनोमोटो नावाची एक पावडर वापरतात ….. याने तुमच्या जिभेवरील टेस्ट बडस उत्तेजित होतात आणि तुम्हाला या खाण्याची चटक लागते.  हा अजिनोमोटो कॅन्सर Causing Agent  आहे आणि त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो.  यावर  जगात सगळीकडे बंदी आहे पण तो सर्रास चायनीज पदार्थात वापरला जातो …..  चायनीज पदार्थांमध्ये वापरले जाणारे सॉस म्हणजे फक्त केमिकल असतात. एकदा माझ्याकडून घरात व्हिनेगरच्या बाटलीतले व्हिनेगर  फरशीवर सांडले. त्यावेळी फरशीवर पडलेला डाग दहा वर्षे झाली तरी तसाच आहे. म्हणजे या गोष्टी खाल्ल्यावर आपल्या पोटाची काय अवस्था होत असेल याचा विचार सुद्धा करवत नाही.  पण माझा मुलगा मांचुरियन शिवाय काही खात नाही असे अभिमानाने सांगणारे महाभाग आपल्याला बरेच दिसतात. 

क्रमश : भाग पहिला

लेखक : अभय कुलकर्णी, कराड

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बापाच्या काळजावरचा गोवर्धन ! – भाग – 2 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

बापाच्या काळजावरचा गोवर्धन ! – भाग – 2 ☆ श्री संभाजी बबन गायके 

(योगायोगच म्हणावा की यशोदाही याचवेळी आई होणार होती. पण मीही बाप होणार होतो याचा मला विसरच पडून गेला होता म्हणा !) – इथून पुढे —

व्यवहारी मनाला हा हिशेब पटला होता. माझी मुलगी वासुदेवाच्या हातून कंसाच्या हाती पडेल. आठवा मुलगा असणार होता… आणि हे तर स्त्री जातीचं अर्भक. स्त्री काय करणार या कंसराजाचं? असा विचार अविचारी कंस नक्कीच करणार. कंस तिला देवकीच्या हाती परत सोपवेल आणि निघून जाईल. देवकीचा कृष्ण माझ्याकडे आणि माझी माया देवकीकडे सुरक्षित वाढतील. पुढचं पुढं बघता येईल की… फक्त ही वेळ निभावून नेणं गरजेचं आहे. आणि काळाचंही हेच मागणं होतं माझ्याकडे.

मनावरचा गोवर्धन सावरून धरीत मी तिला दोन्ही हातांवर तोलून धरलं आणि छातीशी कवटाळलं. तिचे डोळे आता मिटलेले होते. आईच्या आधी ती बापाच्या काळजाला बिलगली होती. ती माझ्या हृदयाची कंपनं ऐकत असावी कदाचित. पण मला मात्र ते ठोके निश्चित ऐकू येत होते… नव्हे कानठळ्या बसत होत्या त्या श्वासांच्या आंदोलनांनी. चिखल तुडवीत निघालो. पाऊस थांबला होता. यमुनेपर्यंतची वाट हजारो वेळा तुडवलेली होती… पायांना सवयीची होती. तरीही वीजा वाट दाखवायचं सोडत नव्हत्या. मी आज चुकून चालणार नव्हतं हे त्यांना कुणीतरी बजावलेलं असावं बहुदा! पण माझी पावलंच जड झालेली होती. काही विपरीत घडलं तर या आशंकेने मनाच्या यमुनेत भयानक भोवरा फिरू लागला. योजनेनुसार नाहीच घडलं तर? कंसाशी गाठ होती. कंसाची मिठी सुटली तरच आयुष्याचं प्रमेय सुटण्याची आशा. अन्यथा त्याच्यात अडकून पडावं लागणार हे निश्चित होतं. तीरावर पोहोचलो. आता अंगावर खरे शहारे यायला सुरूवात झाली. यमुना दावं सोडलेल्या कालवडींसारखी उधळलेली होती रानोमाळ. वासुदेव येणार कसा या तीरावर? यमुनेच्या धारांच्या आवाजाने काही ऐकूही येण्यासारखी स्थिती नव्हती आणि त्यात त्या वीजा! माझ्या कुशीत मला बिलगून असलेल्या तिनं… डोळे किलकिले केले आणि यमुना दुभंगली! वाटेवर पाणी असतं, वाटेत पाणी असतं… इथं पाण्यात वाट अवतरली होती. आणि त्या अंधारातून दोन पावलं घाईघाईत या किना-याकडे निघालेली होती. त्या पावलांच्या वर जे शरीर होतं त्या शरीराच्या माथ्यावर एक टोपलं होतं… भिजलेलं. आणि त्यातून दोन कोमल पावलं बाहेर डोकावत होती… जणू ती पावलंच या पावलांना गती देत होती. इकडं माझ्या हातातल्या तिनं डोळे मिटून घेतले होते.

वासुदेव जवळ आला. बोलायला उसंत नव्हती. पण आधीच भिजलेल्या डोळ्यांत आसवं आणखी ओली झाली आणि बोलावंच लागलं नाही फारसं. त्याने टोपली खाली ठेवली. तो माझ्याकडे पाहू लागला. मी तिला वासुदेवाच्या हाती देताना शहारून गेलो. हातांना आधीच कापरं भरलं होतं. आणि त्यात ती माझ्याकडे पहात होती… मायेच्या डोळ्यांतली माया त्या अंधारातही ठळक जाणवत होती. वासुदेवानं तिला त्याच्याकडे अलगद घेतलं. मी त्याच्या मुलाला उचलून घेतलं. वासुदेवानं रिकाम्या टोपलीत तिला ठेवलं. तिने आता डोळे मिटले होते…. ती आता मथुरेकडे निघाली होती.. तिथून ती कुठं जाणार होती हे दैवालाच ठाऊक होतं.

“मुलगी आहे असं पाहून कंस हिला काही करणार नाही. ” वासुदेव जणू सांगत होता पण मला मात्र ते काही पटत नव्हतं… मला म्हणजे माझ्यातल्या पित्याला! धर्माच्या स्थापनेसाठी हा एवढा मोठा धोका पत्करावा लागणारच हे देहाला समजलं होतं पण मनाची समजूत काढणं अशक्य…. आणि त्या बालिकेच्या डोळ्यांत पाहिल्यापासून तर केवळ अशक्य! वासुदेव झपाझप पावलं टाकीत निघूनही गेला…. कंस कधीही कारागृहाचा दरवाजा ठोठावू शकत होता. त्याला त्या रात्री झोप लागू शकतच नव्हती. पण त्याच्या पापण्या क्षणार्धासाठी एकमेकींना स्पर्शल्या होत्या मात्र आणि लगोलग उघडल्या सुद्धा… पण या मिटण्या-उघडण्यामधला निमिष खूप लांबला होता त्या रात्री…. दोन जीवांची अदलबदल जगाला यत्किंचितही सुगावा लागू न देता घडून गेली होती. कृष्ण गोकुळात अवतरले होते आणि नंदनंदिनी माया कारागृहात देवकीच्या पदराखाली निजली होती.

माझ्या मनाने आता माझ्याच वै-याच्या भुमिकेत प्रवेश केला होता नव्हे परकाया प्रवेशच केला जणू. प्रत्यक्ष भगवंत माझ्या हातांत असताना मला कुशंकांनी घेरलं होतं पुरतं. कंस आधीच कारागृहात पोहोचला असेल तर? पहारेकरी जागे झाले असतील तर? कंसाला संशय आला तर? मन जणू यमुनेचे दोन्ही काठ…. प्रश्नांच्या पुराला व्यापायला आता जमीनही उरली नव्हती…. काळजाच्या आभाळापर्यंत काळजीचं पाणी पोहोचू पहात होतं…. विचारांचा गोवर्धन त्यात बुडून गेला होता…. पण त्याचं ओझं कमी मात्र झालं नव्हतं.

पण वाटेत एक गोष्ट लक्षात आली. मघासारखी थंडी नव्हती वाजत आता. बाळाला छातीशी धरलं होतं तिथं तर मुर्तिमंत ऊबदारपण भरून राहिलं होतं. बाळाचे आणि माझे श्वास आता एकाच गतीनं आणि एकच वाट चालत होते. तसाच यशोदेच्या कक्षात शिरलो आणि बाळाला तिच्या उजव्या कुशीशेजारी अलगद ठेवले आणि त्यानं आपण अवतरल्याचा उदघोष उच्चरवाने केला…. सारं गोकुळ जागं झालं…. अमावस्येच्या रात्री पूर्ण चंद्र आकाराला आला होता… हजारो वर्षांपूर्वी अयोध्येत भरदुपारी उगवलेला सूर्य आता गोकुळात चंद्राचं रूपडं लेऊन मध्यरात्री अवतरला होता. जगाच्या लेखी यशोदेला पुत्र झाला होता… नंदाला लेक झाला होता…. गायींना गोपाळ मिळाला होता आणि गवळणींना त्यांचा कान्हा! मी मात्र मथुरेकडे दृष्टी लावून बसलेलो!

वासुदेवही आता मथुरेत पोहोचला असेल… माझी लेक आता देवकीवहिनीच्या कुशीत विसावली असेल. माझी वासुदेवाच्या वाटेकडे पाठ असली तरी माझ्या मनाचे डोळे मात्र त्याचीच वाट चालत होते. मी बाळाला यशोदेच्या हवाली करून राजवाड्याच्या मथुरेकडे उघडणा-या गवाक्षाजवळ जाऊ उभा राहिलो…. !

नीटसं पाहूही शकलो नव्हतो तिला. डोळेच लक्षात राहिले होते फक्त… अत्यंत तेजस्वी. मूर्तीमंत शक्तीच. या मानवी डोळ्यांनी ते तेज स्मृतींमध्ये साठवून ठेवणं शक्तीपलीकडचं होतं. मथुरेकडच्या आभाळात वीजा आता जास्तच चमकू लागल्या होत्या. ढगांचा गडगडाट वाढलेला होता. काय घडलं असेल रात्री मथुरेच्या त्या कारागृहात? कंस कसा वागला असेल मुलगा जन्माला येण्याऐवजी मुलगी जन्मल्याचं पाहून? नियतीची भविष्यवाणी एवढी खोटी ठरेल यावर त्याचा विश्वास बसला असेल सहजी?

आणि एवढ्यात सारं काही भयाण शांत झालं घटकाभर…. सारं संपून तर नाही ना गेलं?

यानंतरचा एक क्षण म्हणजे एक युग. कित्येक युगं उलटून गेली असतील माझ्या हृदयातल्या पृथ्वीवरची. आणि तो क्षण मात्र आलाच…. अग्निची एक महाकाय ज्वाळा आभाळात शिरून अंतरीक्षात दिसेनाशी झाली… तिने मागे सोडलेला प्रकाशझोत मथुरेलाच नव्हे तर अवघ्या गोकुळालाही प्रकाशमान करून गेला…. मायाच ती… ती बरं कुणाच्या बंदिवासात राहील… सारं जग तिच्या बंधनात बांधले गेलेले असताना ती य:कश्चित मानवाच्या कारागृहातील साखळदंडांनी जखडून राहीलच कशी?

कंसाच्या हातून निसटून माझी लेक आता ब्रम्हांड झाली होती. माझी ओंजळ कदाचित तिचं तेज सांभाळून ठेवू शकली नसती म्हणून दैवानं तिला माझ्याच हातून इप्सित ठिकाणी पोहोचवलं असावं… परंतू तिचं जनकत्व माझ्या दैवात लिहून नियतीनं माझ्यावर अनंत उपकार करून ठेवले होते.

मायेने जाताना माझ्या काळजावरचा काळजीचा गोवर्धन अलगद उचलून बाजूला ठेवला होता… एका बापाचं काळीज आता हलकं झालेलं होतं !

पुत्रप्राप्तीच्या आनंदात यशोदा मग्न झाली आहे.. आता पुढे कित्येक वर्षे तिला हे कौतुक पुरेल.. अक्रूर गोकुळात येईपर्यंत. काही घडलंच नाही अशी भावना आता माझ्या मनात घर करू लागली आहे… नव्हे निश्चित झाली आहे… ही सुद्धा तिचीच माया!

(भगवान श्रीकृष्णांच्या जीवनकथा अलौकिक. त्यांचा जन्म आणि त्यांचं गोकुळात यशोदेकडे जाणं यावर करोडो वेळा लिहिलं, बोललं गेलं आहे. घटनाक्रम, संदर्भात काही ठिकाणी बदलही आहेत. पण ते सारे एकच गोष्ट सांगतात… श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव ! हरी अनंत आणि हरिकथा अनंत ! नंदराजाचा विचार आला मनात आणि त्यांच्या मनात डोकावलं. आणि हे काल्पनिक शब्दांमध्ये उतरलं… प्रत्यक्षात जे काही घडून गेलं असेल ते समजायला माझ्या बुद्धीच्या मर्यादा आहेत. जय श्रीकृष्ण.)

– समाप्त – 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बापाच्या काळजावरचा गोवर्धन ! – भाग – 1 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

बापाच्या काळजावरचा गोवर्धन ! – भाग – 1 ☆ श्री संभाजी बबन गायके 

वासुदेव दादाला शब्द दिला होता खरा…पण प्रत्यक्षात तो शब्द पाळण्याची वेळ आली तेंव्हा यशोदेच्या शेजारून तिला अलगद उचलताना हात प्रचंड थरथरू लागले!

पुरूषांचं काळीज पाषाणाचं असतं तसं माझंही असेल असा माझा समज होता. पण याच पाषाणातून कधी माया पाझरू लागली ते माझं मलाही समजलं नाही…होय माझ्या पोटी माया उपजली आहे!

आणि या पाझरानं आजच्या या भयाण रात्री महाप्रलयाचं रूप धारण केलं आहे. यमुनेच्या उरात जलप्रलय मावत नाहीये. तिला आणखी दोनचार काठ असते तरीही ते तिला अपुरेच पडले असते त्या रात्री. वीजांचा एरव्ही लपंडाव असतो पावसाच्या दिवसांत. पण आज त्या लपत नव्हत्या…आभाळात ठाण मांडून होत्या! एक चमकून गेली की तिच्या पावलावर पाऊल टाकून दुसरी वीज धरणीला काहीतरी सांगण्याच्या आवेगात आसमंत उजळून टाकीत होती. या दोन क्षणांमधल्या अवकाशातच काय ती अमावस्या तग धरून होती. अमावस्येला निसर्गाने जणू आज खोटं पाडण्याचा चंग बांधला होता. अमावस्या म्हणजे काळामिट्ट अंधार….पण आजच्या रात्री अंधाराने काळेपणाशी फारकत घेतली होती….जगाचं माहित नाही…पण मला तरी स्पष्ट दिसत होतं…सारं काही!

दूर मथुरेच्या प्रासादातले दिवे लुकलुकत होते. आणि तिथून जवळच असलेल्या कारागृहाच्या भिंतीवरच्या पहारेक-यांच्या हातातील मशाली लवलवत होत्या…काहीतरी गिळून टाकण्यासाठी. या कारागृहाने आजवर सात जीव गिळंकृत केले होतेच. त्याच्या भिंतींवर रक्ताचे डाग सदोदित ताजेच भासत असत. सुरूवातीपासून आठ जन्म मोजायचे की शेवटापासून मागे मोजत यायचे हा प्रश्न नियतीने कंसाच्या मनात भरवून दिला होता. पाप कोणताही धोका पत्करत नाही. धोका पत्करण्याचा मक्ता तर पुण्याने घेतलेला असतो. पापाला अनेक सल्ले मिळतात आणि पुण्याला सल्ल्याची आवश्यकताच नसते.!

आज देवकी गर्भारपणाच्या नवव्या महिन्यानंतरच्या नवव्या दिवसात गवताच्या गंजीच्या बिछाण्यावर

निजून आहे. आणि याची तिला सवय झालीये गेल्या सात वर्षांपासून. खरं तर ती राजकन्या. सोन्याचा पलंग आणि रेशमाची सेज तिच्या हक्काची होती. पण दैवगतीपुढे तिचाही नाईलाज होता. तिची कूस माध्यम होणार होती एका धर्मोत्थानाची. पण त्यासाठी तिला एक नव्हे, दोन नव्हे तर आठ दिव्यांतून जावे लागणार होते. पण कसं कुणास ठाऊक आज तिला प्रसुतीपूर्व कळा अशा जाणवतच नव्हत्या..आधीच्या खेपांना जाणवल्या होत्या तशा. आज अंगभर कुणीतरी चंदनाचा लेप लावल्यासारखं भासत होतं. रातराणी आज भलतीच बहरलेली असावी कारागृहाबाहेरची. पहारेकरी देत असलेले प्रहरांचे लोखंडी गोलकावरचे कर्णकर्कक्ष ठोके आज तसे मधुर भासत होते. घटिका समीप येऊ लागली होती. आज तो येणार..आठवा! त्याच्या आठवांनी आत्मा मोहरून गेला होता. पावसाची चिन्हं होती सभोवती आणि वा-यातून पावा ऐकू येऊ लागला होता.

यशोदेच्या दालनाबाहेर मी दुस-या प्रहारापासूनच येरझारा घालीत होतो, याचं सेविकांना आश्चर्य वाटत नव्हतं. या गोकुळाच्या राज्याला वारस नव्हता लाभलेला अजून. बलराम होता पण तो यशोदेचा नव्हता. वासुदेवाचा होता. आम्हांला आपलं बाळ असण्याचा कित्येक वर्षांनी योग आला होता. राजाला चैन कसे पडेल? त्यात हा पाऊस! एखाद्या अनाहूत पाहुण्यासारखा….घडणा-या सर्वच घटनांचा साक्षीदार होण्याचा प्रयत्न करणारा. तो जा म्हणता जाणार नाही!

मध्यरात्र जवळ येऊन उभी आहे सर्वांगी थरथरत. तिलाही जाणीव झालेली असेलच की तिच्या उदरातून उदय होऊ पाहणा-या विश्वाची. माझ्या महालाबाहेर पहा-यावर असणारे गोपसैनिकही आता पेंगळून गेले आहेत. दिवसभर गायी चारायला जाणारी आणि दिवेलागणीला गोकुळात येणारी माणसं ती. त्यांनाही प्रतिक्षा होती त्यांच्या राजाच्या भविष्याची. सुईणी तर दुपारपासूनच सज्ज होत्या. दासी आज त्यांच्या घरी जाणार नव्हत्या. कोणत्याही क्षणी जन्माचं कमलदल उमलेल ते सांगता येत नव्हतं. गोठ्यांतील गायींचाही आता डोळा लागलेला असावा कारण त्यांचं हंबरणं कानी येईनासं झालं होतं आणि त्यांच्या वासरांचे नाजूक आवाजही. पोटभर दूध पिऊन झोपली असतील ती लेकरं.

यशोदेला कळा सुरू होऊन आता तसा बराच उशीर झाला होता. ती प्रचंड अस्वस्थ होती पण तिच्या डोळ्यांत आज निराळीच चमक. अंग चटका बसावा इतकं उबदार लागत होतं. सुईणी सांगत होत्या तशी यशोदा कळा देत होती पण तिची सुटका काही होत नव्हती.

माझी एक नजर यशोदेच्या कक्षातून येणा-या आवाजाकडे तर एक नजर यमुनेपल्याडच्या काठाकडे खिळून राहिलेली होती. आज त्या काठावरून या गोकुळाच्या काठावर प्रत्यक्ष जगत्जीवनाचं आगमन होणार होतं. पण यमुना तर आज भलतीच उफाणलेली! तिला काय झालं असं एकाएकी. असे कित्येक पावसाळे पाहिले होते मी आजवर पण आजचा पाऊस आणि आजची यमुना…न भूतो! पण माझी ही अवस्था कुणाच्या ध्यानात येण्यासारखी परिस्थिती नव्हती. यशोदा तर भानावर असण्याचा प्रश्नच नव्हता. एका जीवाला जन्माला घालताना तिचा जन्म पणाला लागलेला होता.

कळा देऊन यशोदा क्लांत पहुडलेली….सुईणीच्या,दासींच्या पापण्या अगदीच जडावलेल्या होत्या. मानवी देहाच्या मर्यादा त्यांनाही लागू होत्या. त्या निद्रेच्या पांघरूणाखाली गडप झाल्या…तारका काळ्या ढगांनी व्यापून जाव्यात तशा. त्या रात्रीतील सर्वांत मोठी वीज कडाडली आणि इकडे यशोदा प्रसुत झाली….आणि लगोलग तिला बधिरतेने व्यापलं…ती स्थळ-काळाचे भान विसरून गेली. गायींसाठीच्या चा-याचं प्रचंड ओझं डोक्यावरून खाली उतरवून एखादी गवळण मटकन खाली बसावी तशी गत यशोदेची. बाळाच्या श्वासांचा स्पर्श गोकुळातल्या हवेला झाला आणि सर्वकाही तिच्या प्रभावाखाली आलं. मायेचा प्रहर सुरू झाला होता…गोकुळ भारावून गेलं होतं…निपचित पडलं होतं आणि माया गालातल्या गालात मंद स्मित हास्य करीत कक्षाच्या दरवाज्याकडे पहात होती.

मी लगबगीने आत शिरलो तसा माझ्या डोळ्यांवर प्रखर प्रकाश आला. डावा हात डोळ्यांवर उपडा ठेवीत ठेवीत मी यशोदेच्या पलंगापर्यंत पोहोचलो…ती निपचित झोपलेली…तिच्या चेह-यावर पौर्णिमेचं चांदणं.

मला आता थांबून चालणार नव्हतं. वासुदेव यमुना ओलांडून येतच असावा….मला यमुनातीरी पोहोचलं पाहिजे. आणि मी लगबगीनं बाळाच्या मानेखाली हात घातला आणि तिच्या डोळ्यांकडे लक्ष गेलं. कक्षातील दीप अजूनही तेवत होते. बाहेरचा थंड वारा गवाक्षांचे पडदे सारून आत घुसण्याचा प्रयत्न करीत होता. हे तर मुलीचे डोळे….माझ्या मुलीचे डोळे! डोळ्यांच्या मध्यभागी जणू सारी काळी यमुना जमा झालेली. आणि त्या दोन डोहांभोवती पांढरे स्वच्छ काठ. आता मात्र माझी नजर खिळून राहिली….मी सारे काही विसरून जातो की काय असं वाटू लागलं. आणि ठरलंही होतं अगदी असंच…मी सारं काही विसरून जाणार होतो नंतर.

मायेच्या पुरत्या अंमलाखाली जाण्याआधी तिला उचलली पाहिजे सत्वर असं एक मन सांगत होतं पण बापाचं काळीज….गोकुळाच्या वेशीवर असलेला सबंध गोवर्धन येऊन बसला होता काळजावर. आणि तो हलवायला अजून कृष्ण गोकुळात यायचा होता! तोपर्यंत हे ओझं मलाच साहावं लागणार होतं!

वासुदेवाला शब्द देताना किती सोपं सहज वाटलं होतं सारं! दैवाची योजनाच होती तशी. मथुरेत देवकीनंदन येतील आणि गोकुळात नंदनंदिनी. तो वासुदेव-देवकीचा आठवा तर ही माझी,नंद-यशोदाची पहिली! बाप होण्याची स्वप्नं पाहून डोळे आणि मन थकून गेलं होतं. यशोदा गर्भार राहिल्याचं समजताच मला आभाळ ठेंगणं झालेलं होतं. गाईला वासराशिवाय शोभा नाही आणि आईला लेकराशिवाय. शेजारच्या गोठ्यांतील गायींची वासरं पाहून इकडच्या गायी कासावीस झालेल्या पाहत होतो मी. आणि आता माझा मळा फुलणार होता…..मी आणि यशोदा..आमच्या दोघांच्या मनांची रानं अपत्यप्राप्तीच्या सुखधारांनी आबादानी होऊ पहात होती. स्वत:च्या शिवारात आता स्वत:ची बीजं अंकुरणार होती…ही भावना ज्याची त्यालाच समजावी अशी!

कंसाने सात कळ्या खुडून पायातळी चिरडल्या होत्या आणि आता फक्त एक कळी यायची होती वेलीवर. काटेरी कुंपणाआड वेल बंदिस्त होती. वा-यालाही आत जाण्यास कंसाची अनुमती घ्यावी लागत होती. देवकीच्या उदरातून अंकुरलेला जीव मोठा होऊन त्याला संपवणार होता म्हणून तो मोठा होऊच द्यायचा नाही असं साधं सरळ गणित त्याचं. योगायोगच म्हणावा की यशोदाही याचवेळी आई होणार होती. पण मीही बाप होणार होतो याचा मला विसरच पडून गेला होता म्हणा !

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक ४१ ते ४३) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक ४१ ते ४३) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ । 

पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम्‌ ॥ ४१ ॥ 

गात्रांना वश करुनीया  ठेवी त्यांच्यावर अंकुश 

विनाशी ज्ञानविज्ञानाच्या भारता बळे करी तू नाश ॥४१॥

इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः । 

मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः ॥ ४२ ॥ 

इंद्रिये असती परा त्याहुनी आहे मन सूक्ष्म

मनाहुनीही बुद्धी परा आत्मा त्याहुनी सूक्ष्म  ॥४२॥

एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना । 

जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्‌ ॥ ४३ ॥ 

जाणुनी घेई महावीरा सूक्ष्मतम अशा आत्म्याला 

मनास घेई वश करुनीया  तल्लख बुद्धीने अपुल्या

अंकित करुनी अशा साधने दुर्जय अरिला कामाला

अंत करूनी कामरिपूचा प्राप्त करुनी घे मोक्षाला ॥४३॥

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥ 

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी कर्मयोग नामे निशिकान्त भावानुवादित तृतीय अध्याय संपूर्ण ॥३॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ✹ ३१ डिसेंबर ✹ इतिहासाचार्य वि. का. राजवाडे स्मृतिदिन — संकलन : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ✹ ३१ डिसेंबर ✹ इतिहासाचार्य वि. का. राजवाडे स्मृतिदिन — संकलन : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

जन्म – १२ जुलै १८६३ (वरसई,रायगड)

स्मृती – ३१ डिसेंबर १९२६ (धुळे)

इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील वरसई येथे झाला. ते मराठी इतिहास संशोधक होते. त्यांनी संपादित केलेले ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या ग्रंथाचे २२ खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते. बीए पर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी भाषांतर नावाचे मासिक सुरू केले. १८९८ साली त्यांनी लिहिलेल्या ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. ७ जुलै १९१० रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली. राजवाडे म्हणायचे, “ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील; माझ्या ग्रंथांची पूजा करतील. मी परकीय भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीला हपापलेला नाही.”।महाराष्ट्राच्या विचारविश्‍वात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा मोठा दरारा, दबदबा आणि धाक होता. राजवाडे आपल्या हयातीतच एक आख्यायिका बनून गेले होते. राजवाडे यांच्यावर भरपूर टीका झाली. त्यांच्या हयातीतच प्रबोधनकार के.सी. ठाकरे, विठ्ठल रामजी शिंदे, जिवाजी मंगेश तेलंग यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरले होते. नंतरही इतिहास संशोधक त्र्यं.शं. शेजवलकर यांनी राजवाडे यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. तथापि, या सर्व गोष्टी एकत्र केल्या तरी राजवाडे यांचे वाक्‍य न्‌ वाक्य ब्रह्मवाक्‍य मानणारा एक वर्ग अस्तित्वात राहिलाच आणि विशेष म्हणजे मराठी विचारविश्‍वात याच वर्गाचे वर्चस्व असल्यामुळे राजवाडे यांचे स्थान अबाधित राहिले. राजवाडे यांच्या नावावर स्वतंत्र असा एकही ग्रंथ नाही. त्यांनी नियतकालिकांमधून किरकोळ स्वरूपाचे लेख लिहिले. ‘महिकावतीची बखर’ आणि ‘राधामाधवविलास चंपू’ या प्राचीन ग्रंथांचं संपादन केले आणि मुख्य म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साधने गोळा करून ती तब्बल बावीस खंडांमध्ये छापली. त्यांच्यापैकी काही खंडांना प्रस्तावना लिहिल्या. राजवाडे संपादनांपेक्षा अधिक गाजले ते या प्रस्तावनांमुळे. ज्यांना या प्रस्तावना आवडल्या नाहीत, त्यांनाही राजवाडे यांनी अविश्रांत कष्ट घेऊन, प्रचंड भ्रमंती करून जमा केलेल्या इतिहासाच्या साधन सामग्रीसाठी त्यांच्या ऋणात राहण्यावाचून पर्यायच नव्हता. राजवाडे यांनी लिहिलेली ‘ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण’ या पुस्तकाची प्रस्तावना मूळ पुस्तकापेक्षा अधिक वाचनीय आहे. असेच त्यांच्या बहुतेक पुस्तकां बद्दल म्हणता येईल. राजवाडे बुद्धिमान तर होतेच; पण त्यांना प्रतिभा शक्तीचीही देणगी लाभली होती. जबरदस्त आत्मविश्‍वास हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य होते. त्यामुळं साधा अंदाज किंवा कयास सुद्धा ते अशा पद्धतीने व अशा आक्रमकपणाने मांडत, की जणू काही तो त्रिकालाबाधित सत्य असलेला महासिद्धान्तच आहे.

संकलन : श्री मिलिंद पंडित, कल्याण

संदर्भ : विकिपीडिया

संग्रहिका –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ समाधी संजीवन… लेखिका : सुश्री विद्या हर्डीकर सप्रे ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ समाधी संजीवन… लेखिका : सुश्री विद्या हर्डीकर सप्रे ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

बराच वेळ नकाशातून वाट काढत काढत  मी आणि माझा नवरा  एका दफन भूमीच्या दारात पोहोचलो. मला पहाताच समोरची बाई चटपटीतपणे पुढे आली आणि हसतमुखाने विचारती  झाली, “Are you here for Dr Joshi?” मी चकितच झाले. “How do you know?” मी विचारले.. 

तिन सांगितलं की ,” तू भारतीय  दिसते आहेस. इथे खूप भारतीय येतात डॉ. जोशींच्या समाधीला भेट द्यायला.! खरं तर   या दफन भूमीत सर्वात  जास्त  भेट दिली जाणारी .. सर्वात लोकप्रिय समाधी आहे ही ! “ 

आणि आमच्या वॉकिंग टू र मध्ये आम्ही या समाधीचाही समावेश केलाआहे.” 

हे ऐकून मला अभिमानानं भरून आलं ! 

त्या स्वागतिकेन मला दफनभूमीचा नकाशा दिला. ‘कार्पेन्टर/ Eighmie लॉट’ कुठे आहे त्याची खूण  नकाशावर केली आणि तिथे जायचा मार्गही दाखवला. आमचे मिशन ‘ए २१६’ सुरु कझाले ! (Eighmie हे कार्पेन्टर मावशीच्या माहेरचे नाव.) 

मी  त्यांच्या नोंदणीपत्रकात मोठ्या अभिमानाने आमची नाव नोंदवली आणि आम्ही मार्गस्थ झालो. 

कार्पेन्टर लॉट तसा मोठा आहे. आता इतक्या सगळ्या थडग्यातून आनंदीबाईंची समाधी कशी शोधायची असा विचार करत आम्ही चालत होतो. तेवढ्यात मला’ ती’ दिसली.  मी समाधीचा फोटो पाहिला होता. त्यामुळे चटकन दिसली. “ भेटलीस ग बाय ..” असं म्हणत मी    उंचवटा चढून लहानशा   टेकाडावर गेले, ..काहीशा  अधीरपणे! 

समाधीच्या दगडाच्या एका बाजूला अक्षर अस्पष्ट होती. पण दुसऱ्या  बाजूला सुस्पष्ट अक्षरात 

“द फर्स्ट ब्राह्मण वुमन टू  लीव्ह इंडिया टू ऑबटेन  ऍन एज्युकेशन “  असे आनंदीबाईंबद्दल कोरून ठेवले आहे. 

माझ्या डोळ्यांसमोरून दीडशे वर्षांपूर्वीचा आनंदीबाईंच्या जीवनाचा  सगळा पट उलगडला होता…. कादंबऱ्या आणि चरित्रातून वाचलेला.. पण  मनावर त्याचा सुस्पष्ट अक्षरातला खोल ठसा उमटवून गेलेला. 

समोरून उतरत्या सूर्याची  किरणे समाधीवर पडली होती. बाजूला काही हिरवळ, काही पाचोळा होता. आम्ही ते सर्व बाजूला करून आमच्या बरोबर आणलेली फुले समाधीसमोर ठेवली.  काही फुले समाधीवर छान रचून ठेवली. कातर मनाने , भरल्या डोळ्यांनी मी तिला वाकून  नमस्कार केला… आणि मग  तिच्या जवळ थोडा वेळ निशब्द पणे बसून राहिले. मध्ये उलटलेल्या काळाचा वारा मनात सळसळत होता.  

किती वर्षे या भेटीची आस लागून राहिली होती ! 

मन काही वर्षे मागे गेले. .. १९९१ पर्यंत..मी फिलाडेल्फयाला  एका स्नेह्यांकडे गेले होते, तो दिवस आठवला.  त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांना भेटण्यासाठी मलाही मुद्दाम बोलावले होते.  जवळच्याच एका लहान गावात रहाणारे अशोक आणि मनीषा गोरे आणि त्यांच्याबरोवर आलेल्या त्यांच्या नातेवाईक ‘अंजली कीर्तने !’  हे नाव मी ऐकलं होत. मला वाटत चेरी ब्लॉसम की  अशा काही नावाचं त्यांचं पुस्तक वाचलं होत. अंजलीताई मुद्दाम आल्या होत्या त्या आनंदीबाई जोशींवर संशोधन करायला. फिलाडेल्फियातल्या कॉलेज मध्ये आनंदीबाईंची डॉक्टर ची डिग्री झाली होती. तिथे  अंजलीताईना घेऊन जाऊन श्री. गोरे यांनी तिथल्या पुरातत्व विभागात कागदपत्रे शोधायला सुरवात केली होती. आजवर कधीच माहिती नव्हता तो माहितीचा खजिना तिथे मिळाला होता. त्यात एक पुस्तक हाती आलं. कॅरल डॉल ने लिहिलेलं आनंदीबाईंचं चरित्र !   त्यात एका वाक्याचा उल्लेख होता : आनंदीबाईंची अमेरिकेत  कार्पेन्टर मावशींकडे पाठवलेली रक्षा कुठे जतन केली जाणार आहे त्याचा. 

तेवढ्या धाग्यावरून ती समाधी शोधून काढण्याचा खटाटोप चालू होता.  गोपाळराव जोशी यांनी  आनंदीबाईंचा रक्षाकलश बोटीने अमेरिकेत पाठवल्याचे उल्लेख आहेत. पण त्याच पुढे काय झालं ते कोणाला माहिती नव्हतं. 

मी  अमेरिकेत आल्यावर त्यांची समाधी शोधून काढण्याचा विचारही  मी कधी केला नव्हता !  पण आपल्याला देवतेसारख्या वाटणाऱ्या आनंदीबाईंच्यासाठी चाललेल्या या  प्रकल्पाबद्दल आता मात्र मलाही उत्सुकता वाटायला लागली. 

गोरे पतिपत्नी आणि अंजलीताई यांची ओळख  नुकतीच झाली होती, पण पहिल्याच भेटीत  त्यांच्याशी कुठेतरी  सूर जुळले .त्यामुळे  न्यूयॉर्क राज्या मध्ये एका लहानशा गावात कुठेतरी असणारा तो   कार्पेन्टर लॉट शोधण्यात त्यांना कशी मदत करता येईल याचा विचार मी करु  लागले.  गुगल , विकिपीडिया आणि इंटरनेट  यांच्या आधीचे ते दिवस.  म्हणजे “आपल्या ओळखीचं कोण कोण आहे न्यूयॉर्क राज्यात” अशी आठवणींची साखळी बांधून माझी विचारांची साखळी सुरु झाली.    योगायोग असा की  कार्पेन्टर लॉटबद्दल चा उल्लेख  आहे त्या गावाच्या आसपास   माझे एक मित्र विराज आणि लीना सरदेसाई रहात होते, हे मला एकदम आठवलं.  

मी लगेच  विराज ला फोन केला.तोपर्यंत  विराजचा संदर्भ आणखी कोणीतरी सुद्धा  अंजलीताईना दिला. होता.    गावातल्या दफन भूमी विंचरून हा कार्पेन्टर लॉट शोधण्याची  आणि तिथेच रक्षाकलश असण्याचे पुरावे शोधण्याची जबाबदारी विराजने घेतली. पुष्कळ परिश्रम करून त्याने हे इतिहास संशोधन केलं. आणि अंजलीताईना तिथे पोहोचता आलं. मला त्यावेळी जण शक्य नव्हतं. पण अंजलीताईनी समाधीचा फोटो  आठवणीने मात्र पाठवला.( मी तो अजूनही जपून ठेवला आहे. )…. 

शंभर वर्षे उलटून गेल्यावरही आनंदीबाईंची समाधी तिथे होती .. वादळ वारे , हिमवर्षाव सहन करत होती. खोदलेली अक्षरे पुसट  झाली होती. त्यात खडू भरून त्या अक्षरांना उठाव देत कोरलेली वाक्ये वाचावी लागली. 

दफनभूमीवरील यादीत आनंदीबाईंचं नाव होत. पण बाकी माहिती कुणालाच नव्हती. ती अंजलीताईनी दिली आणि कागद प्रत्रातले रिकामे रकाने भरले गेले.  इतिहासाच्या अक्षरांना पुन्हा  उठाव मिळाला.

आनंदीबाई आली अमेरिकेत तेव्हा इथे कोणी नव्हतं.  पण आनंदीबाईनी इथे जात, धर्म, भाषा यांचे तट ओलांडत  कॅरल डॉलशी मैत्रीचे बंध  जुळवले. कार्पेन्टर मावशीनं तर तिला कुटुंबातच सामावून घेतलं आणि  माहेरच्या दफनभूमीत तिच्यासाठी खास जागा निर्माण केली. तिची समाधीशिळा उभारली. 

त्याकाळच्या मराठी बाईची चाकोरी माजघर, स्वयंपाकघर ते मागील आंगण एवढीच होती. ती ओलांडून आनंदीबाई वेगळ्या वाटेने चालल्या. .. ती वाट शिक्षणाची होती. अमेरिकेत जाऊन शिक्षण घेणे .. म्हणजे केवळ चाकोरीबाहेरची वाट चोखाळणे नव्हते, तर व पायवाट सुद्धा नव्हती तिथे राजमार्ग उभारणे होते.. पहिली  भारतीय डॉकटर स्त्री होण्याचा सन्मान घेताना आनंदीबाईंच्या या अलौकिक कार्याचं सार्थक झालं खरं; पण त्या राजमार्गावरून पुढे जाण्यापूर्वीच त्यांना  मृत्यूने कलाटणी दिली आणि त्यांच्या रक्षा या  न्यूयार्क  मधल्या आडगावात एका दफनभूमीत एकाकी होऊन पडून राहिल्या होत्या. नंतर इतके मराठी लोक आले, त्यांनाही याचा पत्ता  नव्हता. .. 

बाविसाव्या वर्षी पराक्रम करून गेलेल्या झाशीच्या राणीच्या समाधीस्थळी 

‘रे हिंद बांधवा थांब  या स्थळी  अश्रू दोन ढाळी …..” अशी भा रा तांबे यांनी घातलेली साद … 

तशी बाविसाव्या वर्षी  पराक्रम करून गेलेल्या आनंदीबाईच्या समाधीस्थळी अंजली कीर्तने , विराज , लीना सरदेसाई, अशोक, मनीषा गोरे यांनी घातलेली ही साद … 

मराठी, भारतीय  लोकांपर्यंत हळू हळू पोहोचली. आणि आता  इथे लोक दर्शनाला येऊ लागले. 

हे सगळं आठवत मी समाधीपाशी स्तब्ध झाले होते…

माझी ही  तीर्थ यात्रा पूर्ण झाली ती विराज आणि लीना यांच्या घरी जाऊनच.. लीना आणि विराज आता त्या गावात रहात नाहीत. ते आता दूरच्या एका गावात असतात.  मधल्या काळात  आमच्या भेटी झाल्या होत्या, काही प्रकल्पसुद्धा आम्ही एकत्रित पणे केले होते. 

पण तरीही समाधीदर्शनानंतर लगेच  त्यांना भेटल्याशिवाय तीर्थयात्रा पूर्ण होणार नव्हती. म्हणून आम्ही पुढे निघालो.  त्या दोघांनाही  आमच्या या विशेष भेटीचा  खूप आनंद झाला. .पुष्कळ जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तेव्हाच्या आठवणी विराजने सांगितल्या. संशोधनाचं आव्हान, समाधी सापडल्याचा आनंद, कितीतरी गोष्टी.! आम्ही ऐकताना भारावून गेलो होतो… 

समाधीच्या शिळेवरची अक्षर पुसट  झाली, ती महत्प्रयासाने परवानग्या काढून विराजने पुन्हा खोल करून घेतली. त्यामुळे एका बाजूला आता सुस्पष्ट खोदकाम दिसते.  हा ऐतिहासिक दुवा मला कळला. 

आनंदीबाईंवर अंजलीने पुस्तक लिहिले. लहान माहितीपट केला. लेख लिहिले. (अलीकडेच आनंदीबाई गोपाळरावांवर एक चित्रपटही निघाला)

या समाधी संशोधनानंतर अनेक लोकांनी  समाधीला भेट द्यावी अशी तिची इच्छा होती आणि आहे. तिच्या संशोधनाचे आणि धडपडीचे सार्थक झाले.  आज खरोखरच जास्तीत जास्त लोक येऊन या समाधीला भेट देतात…..  अमेरिकेत आलेल्या प्रत्येक भारतीय  डॉकटर ने विशेषतः: महिला डॉक्तरने समाधीला  भेट द्यावी असे मला मनोमन वाटते. त्यासाठी मी काही लेख लिहून समाधीचा पत्ता प्रसिद्ध केला. आमच्या दुसऱ्या पिढीच्या  मुलींनी ही  समाधी  पहावी  आणि काही प्रेरणा त्यांना मिळावी! कारण आनंदीबाईनी  चाकोरीचे आणि परंपरांचे अवघड घाट ओलांडून,  आमचे मार्ग सोपे केले. आम्ही आज इथे आहोत, ते त्यांच्यामुळे आणि आमच्या मुली आज मोठ्या मोठ्या भराऱ्या  घेत आहेत , त्या त्यांच्याचमुळे !  आम्ही आनंदीबाई जोशींच्या लेकी आहोत !   

तेव्हा आनंदीबाईनी विराज, लीना, अशोक, मनीषा , अंजली आणि मी यांचे बंध अनुबंध  जुळवले, ते आज तीस वर्षांनंतरही जुळलेले आहेत. आनंदीबाईंच्या संजीवन नामाने नामांकित झालेले आहेत !        

लेखिका : विद्या हर्डीकर सप्रे 

(समाधीस्थळ :  Poughkeepsie Rural Cemetery, 342 Sounth Ave, N.Y. 12602

दूरध्वनी: (845) 454-6020   https://poughkeepsieruralcemetery.com/

या दफनभूमीच्या वॉकिंग टूर मध्ये आनंदीबाईंच्या समाधीला असते.

Her ashes were sent to Theodicia Carpenter, who placed them in her family cemetery at the Poughkeepsie Rural Cemetery in Poughkeepsie, New York. The inscription states that Anandi Joshi was a Hindu Brahmin girl, the first Indian woman to receive education abroad and to obtain a medical degree). 

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

पुणे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पुण्यातल्या काही ऐतिहासिक आठवणी…” – संग्राहक : सुनील इनामदार ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “पुण्यातल्या काही ऐतिहासिक आठवणी…” – संग्राहक : सुनील इनामदार ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

पुण्यातला बाहुली हौद आणि स्त्री शिक्षणाची पहिली बळी …… 

महात्मा जोतिबा फुलेंनी आपल्या पत्नी क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या सोबतीने पुण्यात भिडेवाडा येथे मुलींची शाळा सुरू करून भारतात स्त्री शिक्षणाचा पाया घातला.

त्याकाळी पुणे हे अत्यंत कर्मठ व सनातनी शहर मानलं जातं होतं. जोतिबा आणि सावित्रीबाई यांच्यावर अनेकदा हल्ले झाले. काही वेळा हे हल्ले शारीरिक होते तर काही वेळा मानसिक अत्याचार केला गेला.

याच पुण्यात काहीजण असे होते जे फुले दाम्पत्याच्या पाठीशी खंबीर उभे राहिले. त्यांच्या कार्याला पाठिंबा दिला, इतकंच नाही तर त्यांचा वारसा पुढे नेला.

यातच प्रमुख नाव येते डॉ. विश्राम रामजी घोले यांचे.

गुहागर येथील अंजनवेलच्या किल्लेदार गोपाळराव घोले यांच्या नातवाचा हा मुलगा. घराण्याची ऐतिहासिक परंपरा जपत वडील ब्रिटिश पलटणीमध्ये भरती झाले, सुभेदार झाले.

वडील सैन्यात नोकरीला असल्यामुळे विश्वास घोले यांना शिक्षणाची संधी मिळाली. ते शिकून सर्जन बनले. १८५७ सालच्या बंडात देशभर फिरून जखमी सैनिकांची त्यांनी सेवा केली. ब्रिटिश आमदानीत एक नामवंत शल्यविशारद म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती पसरली. डॉ. घोले यांना गव्हर्नरच्या दरबारात रावबहादूर ही पदवी देण्यात आली होती.

पुण्यात असताना विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यापासून ते लोकमान्य टिळक, आगरकर यांच्या पर्यंत तत्कालीन पुढाऱ्यांशी त्यांची चांगली मैत्री होती पण त्यांना भारावून टाकले महात्मा फुले यांच्या सुधारकी विचारांनी.

सत्यशोधक समाजाचा दुसरा वार्षिक समारंभ 1875 ला साजरा करण्यात आला. त्यावेळेस सत्यशोधक समाजाचे अध्यक्षपद डॉ. विश्राम रामजी घोले यांना देण्यात आले.

महात्मा फुलेंचे विचार सर्वत्र पोहचवेत म्हणून डॉ. घोले प्रयत्नशील होते. उक्ती व कृती मध्ये त्यांनी कधीच अंतर येऊ दिलं नाही. साक्षरतेचा प्रसार केला मात्र सुरवात स्वतःच्या घरापासून केली. आपल्या मुलींना इंग्रजी शिक्षण दिले.

त्यांच्या थोरल्या मुलीचं नाव होतं काशीबाई. सर्वजण तिला लाडाने बाहुली म्हणायचे. या काशीबाईला त्यांनी मुलींच्या शाळेत घातले. जुन्या विचारांच्या अनेकांनी त्यांना विरोध केला, प्रसंगी धमकी दिली.मात्र डॉ. घोले मागे हटले नाहीत.

ही बाहुली शाळेत हुशार व चुणचुणीत होती. दिसायला देखील ती गोड बाहुली सारखी दिसायची. तिचे शाळेत जाणे पहावले नाही. डॉ. घोले यांच्या नातेवाईकांपैकीच कोणी तरी तिला काचा कुटुन घातलेला लाडू खायला दिला. यातच त्या आश्रप मुलीचा मृत्यू झाला.मात्र या घटनेनंतरही विश्राम रामजींनी माघार घेतली नाही. आपली दुसरी मुलगी गंगूबाई हिला त्यांनी जिद्दीने शिकवले. केवळ तिचे शिक्षणच केले नाही तर तिचे लग्नही लहानपणी न लावता वयाची सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच केले. तिचे पती डॉक्टर होते.

आपल्या लाडक्या बाहुलीचा स्मरणार्थ डॉ. घोल्यानी १८८० साली पुण्यात बुधवार पेठेमध्ये आपल्या घरासमोरच हौद बांधला आणि तो सर्व जातीधर्मातील लोकांसाठी खुला ठेवला. कोतवाल चावडी समोर असलेल्या या हौदाचा लोकार्पण सोहळा मातंग समाजातील थोर सुधारक दादा भुतकर यांच्या हस्ते भाऊबीजेच्या दिवशी करण्यात आला.

याच हौदाला बाहुलीचा हौद म्हणून ओळखले जाऊ लागले. हौदावरील उल्लेखानुसार काशीबाईचा जन्म १३ सप्टेंबर १८६९ रोजी व मृत्यू २७ सप्टेंबर १८७७ रोजी झाला होता. तिची एक मूर्ती  या हौदावर उभी केली होती. कात्रजवरून येणारे पाणी या हौदात पाडण्यात येत असे. या अष्टकोनी हौदावर कारंजा देखील होता.

पुढे रस्ता रुंदीकरणामध्ये हा हौद हलवण्यात आला. इथली बाहुलीचा मूर्ती देखील गायब झाली. आता हा हौद फरासखाना पोलिस चौकीच्या हद्दीत सध्याच्या दगडूशेठ दत्त मंदिराजवळ आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती याला “बाहुलीचा हौद गणपती” असेच पूर्वी ओळखले जायचे.

घोलेंनी बांधलेला हौद, तिच्या वरची ती बाहुलीची मूर्ती या जुन्या पुणेकरांच्या आठवणीतच उरला आहे. या ठिकाणी वापरलेला फोटो देखील प्रातिनिधिक नागपूरच्या बाहुली विहिरीचा आहे. स्त्री शिक्षणाचे स्मारक म्हणून काशीबाई घोले यांचे स्मारक जुन्या वैभवात उभे केले.

संग्राहक : श्री सुनील इनामदार

मो.  ९८२३०३४४३४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डोळस – लेखक : श्री सुनील गोबुरे – संकलन : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

डोळसलेखक : श्री सुनील गोबुरेसंकलन : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

तो अंध तरुण रोज कॉर्पोरेशनच्या त्या बसस्टॉपवर उभा असतो. मी ज्या वारजेमाळवाडी बस मधे चढतो, तोही त्याच बस मधे चढतो. मी वारजे जुन्या जकात नाक्याला माझ्या ऑफिसशी उतरतो अन तो अजून तसाच पुढे माळवाडीला जातो. त्याच्या पाठीवर जी सॅक सदृश्य बॅग असते त्यावर फिक्कट पुसट अक्षरे दिसतात ‘जीवन प्रकाश अंध शाळा, माळवाडी’. 

गर्दीमुळे बऱ्याच वेळेला बसायला जागा मिळत नाही तेव्हा काही सुजाण लोक त्याला बसायला जागा देतात, तेव्हा तो विनम्रपणे नकार देतो. 

कोथरुड स्टँडच्या आसपास गाडी बऱ्या पैकी रिकामी होते, तेव्हा आम्हाला बसायला जागा मिळते. माझा स्टॉप त्यानंतर लगेच असल्याने मी पुढे जाउन बसतो व उतरुन जातो. बस बरोबर त्या तरुणाची आठवण दुसऱ्या दिवसापर्यंत पुढे निघून जाते. 

त्या दिवशी योगायोगाने आम्ही नळस्टॉपला एका सिटवर बसतो. बऱ्याच दिवसांचे कुतुहल असल्याने मी त्याला विचारतो, “तुम्ही रोज बस ला दिसता. पुढे माळवाडीला जाता. स्टुडंट आहात का?”

अचानक मी विचारलेल्या प्रश्नाने तो आधी चमकतो. मग उत्तर देतो, “सर, मी विद्यार्थी नाही, मी शिकवतो.”

“ओ अच्छा. ब्रेल वाचायला वगैरे शिकवता का मुलांना?” मी विचारतो.

तो हसतो. मग उत्तरतो. “नाही सर. मी ज्या मुलांना शिकवतो, ती ब्रेल मधले मास्टर आहेत. मी त्यांना कम्प्यूटर ब्रेल कोड शिकवतो. आम्ही अंध व्यक्तींना उपयुक्त ब्रेल सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी लागणारी कोड्स तिथल्या मुलांना शिकवतो. ही मुले पुढे ब्रेल प्रोग्रामर होतील.”

माझ्यासाठी हे नवीनच होतं. मी उत्सुकतेने त्याला विचारतो, “अरे वा, म्हणजे दिवसभर तुम्ही तिकडेच शिकवायला असता?”

पुन्हा मला खोडून काढत तो म्हणतो, “नाही मी दुपारी परत येतो. डेक्कनला आमच्या कंपनीत तिथे आम्ही काही स्पेशल प्रोजेक्टस वर काम करतो.”

मी चिकाटीने पुन्हा त्याला विचारतो, “म्हणजे ब्रेल प्रोग्रामिंग वगैरे?”

पुन्हा एकदा नकारार्थी मान हलवत तो म्हणातो, “आम्ही जे करतो त्याला एथिकल हॅकिंग म्हणतात. तुम्ही त्याबद्दल ऐकले असेल.”

आता थक्क होण्याची वेळ माझ्यावर वर आली.

“माय गाॕड. पण एथिकल हॅकिंग साठी लागणारे सिस्टीम्स. सर्व सुविधा?”

“आमच्याकडे आहेत” तो पटकन म्हणतो, “आता विषय निघालाय म्हणून सांगतो. आपल्या देशात ज्या  सरकारी वेबसाईट्स आहेत त्यांचे सतत हॅकिंग होत राहते. ते काम देश विरोधी ग्रुप्स करत राहतात. आम्ही अशा हॅकर्स ना कसा प्रतिबंध करता येइल यासाठी नॅशनल इन्फॉर्मेटीक्स सेंटर म्हणजे NIC बरोबर मिळून काम करतो. आम्ही चार अंध मित्र आहोत. आम्ही या लोकांना लोकेट करतो. आम्ही हे काम NIC बरोबर मिळून करतो, कारण NIC या सर्व सरकारी वेबसाईट्स होस्ट करते व त्यांच्या सुरक्षेची काळजी घेते. या सर्व अज्ञात शक्तींना प्रातिबंध करण्यासाठी आम्हाला आम्हा अंध लोकांमधे जन्मजात असलेले Intuition कामाला येते.” तो हसत म्हणतो. 

तो तरुण जे सांगत असतो त्याने मी अवाकच होतो. हा तरुणसवदा मुलगा जे एवढ्या सहजतेने सांगत आहे ते करणे सोपे नसते. मी स्वतः माझी छोटीशी आयटी कंपनी चालवत असल्याने हे सारे किती अवघड आहे हे मला ठाउक असते. तरीही न राहवून मी त्याला शेवटचं विचारतो,

“फक्त या कामावर तुम्ही व तुमची कंपनी चालते?”

“नाही सर” तो उत्तरतो, “आम्ही ब्रेल कम्प्युटींग व एथिकल हॅकिंग साठी काही अल्गोरिधम वर ही बरंच काम करतोय की जेणे करुन हे काम आमच्या इतर अंध बांधवापर्यंत आम्हाला पोचवता येइल. आमचं काम प्रत्यक्ष NIC चे हेड ऑफिस हँडल करतं. काम खूप सिक्रेटीव्ह असल्याने यापेक्षा जास्त सांगता येत नाही.”

तो हसतो व म्हणतो, “बाय द वे तुमचा स्टॉप आलाय.”

मी पाहतो तर खरोखरच माझा स्टॉप आलेला असतो. 

“अरेच्चा” मी विचारतो, “तुम्हाला कसे कळाले माझा स्टॉप आलाय?”

“सर तुम्ही तिकीट घेतला तेव्हा मी तुमचा स्टॉप ऐकला. माझ्या डोक्यातही एक प्रोग्राम देवाने अपलोड केलाय. Travelled Distance Analysis चा. पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी सांगेन. गुड डे सर” तो मला हसत म्हणतो.

मी बस मधून उतरतो व स्तंभित होउन ती नाहीशी होइ पर्यंत मी फक्त पहात राहतो. खरे सांगू? आपल्या आंधळ्या दुनियेत आज मला एक डोळस माणूस भेटलेला असतो. त्याच्या प्रखर प्रकाशात मी अक्षरशः दिपून जातो.

लेखक : सुनील गोबुरे, सांगली

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print