(संस्कारधानी जबलपुर की सुप्रसिद्ध साहित्यकार सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ ‘जी सेवा निवृत्त जिला एवं सत्र न्यायाधीश, डिविजनल विजिलेंस कमेटी जबलपुर की पूर्व चेअर पर्सन हैं। आपकी प्रकाशित पुस्तकों में पंचतंत्र में नारी, पंख पसारे पंछी, निहिरा (गीत संग्रह) एहसास के मोती, ख़याल -ए-मीना (ग़ज़ल संग्रह), मीना के सवैया (सवैया संग्रह) नैनिका (कुण्डलिया संग्रह) हैं। आप कई साहित्यिक संस्थाओं द्वारा पुरस्कृत एवं सम्मानित हैं। आप प्रत्येक शुक्रवार सुश्री मीना भट्ट सिद्धार्थ जी की अप्रतिम रचनाओं को उनके साप्ताहिक स्तम्भ – रचना संसार के अंतर्गत आत्मसात कर सकेंगे। आज इस कड़ी में प्रस्तुत है आपकी एक अप्रतिम रचना – नवगीत – कर्मों की गीता…।
रचना संसार # 3 – नवगीत – कर्मों की गीता… ☆ सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ’
(आदरणीय श्री संतोष नेमा जी कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं.“साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है एक बाल गीत – बिल्ली मौसी। श्री संतोष नेमा जी की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)
☆ मतदान..काही आठवणी..भाग – १ –☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
मतदानाचे वारे वाहू लागले की या काही आठवणी हमखास येतातच. तसे आम्ही शिक्षक खूप भाग्यवान! कारण आम्हाला प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचे भाग्य सेवानिवृत्ती नंतरच मिळते. पूर्वी मतदान करण्याचे वय २१ होते. आणि बहुतेक शिक्षकांचे जॉब १८ किंवा १९ व्या वर्षी सुरू झालेले असतात. मी तर प्रथम मतदान अधिकारी म्हणून काम केले आणि नंतर मतदानाचे वय झाले. मग पोस्टल मतदान करावे लागे.
सुरुवातीच्या काळात संपूर्ण शाळेतील सगळे शिक्षक,शिपाई एकाच केंद्रावर असायचे. पण नंतर बरेच बदल झाले. आणि सगळे वेगवेगळ्या ठिकाणी नेमले जाऊ लागले. आणि आपली नेमणूक कोणत्या ठिकाणी असेल हे घरातील मंडळींना पण समजायचे नाही. एखाद्या गाडीत बसवून कामाच्या ठिकाणी नेले जायचे. तिथे गेल्यावरच कळायचे आपल्याला दोन दिवस इथे काम करायचे आहे. बरेचदा अती संवेदशील भागात काम करावे लागायचे. त्यातील एक आठवण…. आत्ता हसू येते. पण त्या वेळी जीवाचे पाणी होणे म्हणजे काय,किंवा पाचावर धारण बसणे या सारखे सगळे वाक्प्रचार व म्हणी आठवल्या होत्या.
असेच एका ठिकाणी नेऊन सोडले. कोणत्या भागात जायचे कोणालाच माहित नव्हते. दोन दिवस तर काम करायचे,कुठे कायमचे रहायचे आहे? या विचारात गेलो. प्रत्येक गोष्ट आनंदाने स्वीकारून काम करायचे अशी शिकवण. हे सतत लक्षात ठेवून गेलो. हळूच कोणीतरी म्हणाले अती संवेदनशील भाग आहे काळजी घ्या. एकंदर पोलिसांच्या जास्त असलेल्या गाड्या बघून हे लक्षात येऊन थोडी धाकधूक होतीच. पण कोणी काही न बोलता कामाला सुरुवात केली. आपापल्या जागी आसनस्थ झालो. आणि मतदान सुरू झाले. रांगा तर खूप मोठमोठ्या होत्या. अक्षरशः जागेवरून हलता पण येत नव्हते. साधारण तीन तास शांततेत पार पडले.आणि हळूहळू भीती कमी झाली.
तेवढ्यात आम्ही काम करत असलेल्या केंद्राच्या पत्र्यावर कोणीतरी उड्या मारत आहे असे जाणवले. मुले पतंग वगैरे काढत असतील असे वाटले. पण तितक्यात त्या पत्र्यातून हातात तलवार घेऊन धप्पकन उडी मारून एक व्यक्ती प्रगट झाली. आणि कोण रांगेत थांबवतो? बघतोच त्याच्याकडे… मला प्रथम मतदान करु द्या. असा आरडा ओरडा सुरु केला. सगळे हादरून गेले. आणि त्याचा हा अवतार बघून आमचे वरिष्ठ अधिकारी अतिशय चपळतेने बाहेर पडले. ते बाहेर का गेले हे अद्याप कोडेच आहे. आणि शिपाई त्या रुमच्या बाहेर… मग आमचे कौशल्य कामी आले. पटकन दोन बोटे तोंडात घातली आणि शिट्टी मारली ( कधी नव्हे ती वेळेवर वाजली ) सगळे बघतच राहिले. पण ती शिट्टी ऐकून आमचे शिपाई व दोन हवालदार देवासारखे पटकन दाखल झाले आणि त्या तलवार धारी व्यक्तीला बाहेर नेले. आणि आम्ही सुटलो. आणि आता त्या आठवणीने हसत सुटतो.
ही वार्ता बाहेर गेल्यावर लगेच स्थानिक लोक तत्परतेने आले आणि काही काळजी करु नका असा धीर व पाणी,चहा देऊन गेले. त्यानंतर अधून मधून येऊन आमची विचारपूस करुन जात होते. एकच वेळी दोन अनुभव येत होते. अशा दोलायमान परिस्थितीत मतदान
संपे पर्यंत जीव मुठीत धरून काम केले. आणि रात्री नऊ नंतर आम्हाला पोलीस बंदोबस्तात तेथून बाहेर काढले.
एक अनुभव तर फार चटका लावणारा आहे. आपल्या केंद्रा वरील टीमची शेवटच्या प्रशिक्षणाला ओळख होते. आणि एकमेकांचे नंबर घेतले जातात. असेच एका ट्रेनिंगच्या वेळी ओळखी झाल्या. आम्ही आपापल्या घरी निघालो. निम्म्या रस्त्यात आल्यावर आमच्या टीम मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आला. फोन घेतला तर एक अनोळखी व्यक्ती बोलत होती. आणि त्या व्यक्तीने धक्का दायक बातमी सांगितली. “हा फोन ज्यांचा आहे,त्यांचा आत्ता अपघात झाला आहे व जागेवर मृत्यू झाला आहे. डायल नंबर मध्ये तुमचा शेवटचा नंबर होता म्हणून तुम्हाला फोन केला आहे.” आम्हाला तर त्यांची काहीच माहिती नव्हती. फक्त ऑफिस माहिती होते. मग तिकडून त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा नंबर घेऊन त्यांना कळवले.
असे अनेक भले बुरे अनुभव येतात. नवीन ओळखी होतात.
अशा प्रत्येक वेळच्या निरनिराळ्या आठवणी निवडणूक तयारी सुरू झाली की मनात दाटून येतात. आता मात्र मुक्तपणे मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा आनंद घेते. आता तर केंद्राच्या बाहेर बऱ्याच ठिकाणी सेल्फी पॉइंट्स ठेवतात. मग काय छान कृत्रिम महिरपीत उभे रहायचे आणि शाई लावलेले बोट ( या फोटोत ते महत्वाचे असते ) समोर धरुन सेल्फी ( दुसऱ्याने काढलेला) घ्यायचा आणि फेसबुक,whatsapp आणि इतर मीडियावर पोस्टून टाकायचे. आणि आम्ही किती कर्तव्यदक्ष आहोत मिरवायचे.
☆ “संध्याछाया भिवविती हृदया…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर☆
… संध्याकाळच्या परतीच्या वाटेवर थव्यातून जात होतो…कळले नव्हते सकाळी तेव्हा घरट्यापासून किती लांबवर आलो होतो… पिल्लांच्यासाठी आणि तिच्या ओढीसाठी घरट्याकडे, अंतरामागुन अंतर कापत जात होतो…कितीतरी वेळ पंख पसरून हवेत विहरत निघलो पण घरट्याच्या झाडाजवळ काही अजून पोहचलो नव्हतो… सोबत घेतलेला होता चिमणचारा कच्चा बच्च्या पिलांना आणि आणि तिच्यासाठीही… त्याचं ओझं काहीच वाटत नव्हतं…आतुरतेने वाट पाहत बसली असतील माझी घरट्याच्या तोंडाशी… चिवचिवाट किलबिलाटाचा करत असतील कलकलाट झाडावरती…रातकिड्यांना रागावून सांगत असतील तुमची किर्र किर्र नंतर करा रे संध्याकाळ उतरून गेल्यावर…येणारेत आमचे बाबा आता एवढ्यात या संधिप्रकाशात… फुलेल आनंदाचा गुलाल मग सारा घरट्यात… मग सांडून जाऊ दे काळोखाचे साम्राज्य.. पण पण त्या आधी आमचा बाबा घरी आलेला असूदे… “
“… का कुणास ठाऊक आता आताशा मला दम लागुन राहिला…लांब पल्ल्याच्या झपाट्याला श्वास कमी पडू लागला..दिवसभर काही जाणवत नाही पण संध्याकाळी घरट्याकडे परताना थव्याबरोबर विहरणे जमत नाही… हळूहळू मग मागे मागे पडत जातो… नि थवा मात्र ‘त्याचं कायं येईल तो मागाहून… कशास थांबावे त्याच्यासाठी.. ‘नि मला न घेताच तसाच पुढे निघून जातो… क्षणभराचे कसंनुसे होते मला.. धैर्य एकवटून पुन्हा पंख जोराने फडफडवत त्यांच्या बरोबर जाण्याचा प्रयत्न करतो… पण पण तो आटापिटा आता पूर्ण पणे निष्फळ ठरतो.. सगळे त्राण, अवसान कधीच संपलेले असते.. आता फक्त काही वेळ विश्रांती घेणे गरजेचे ठरते… आंगातुक मला..वाटेवरील झाडे नि त्यावरील आमचेच जातभाई आसरा देण्यावरून कालवा कालवा करतात.. ‘तू इथं थांबू नको बाबा तुझ्या ईथे असण्याने आमच्या शांतेत येतेय बाधा… ‘मग तसाच नदीच्या प्रवाहातला काळ्या कातळावर जरा विसावतो… चौफेर नजर फिरवतो… शांत एकसुरीचा जलप्रवाह कातळावर डचमळून जातो…नदीतील कातळाचा हुंकार ऐकू येतो.. ‘तू पूर्ण अंधार पडण्याआधी तूझ्या घरट्याकडे जाशील बरं… रात्र गडद होत जाईल तसं नदीचं पाणी शांत गहिरं होत जाईल.. काही जलचर आवाज न करता मग या कातळावर येतील नि तुला पाहून त्यांना आयतीच मेजवानी होईल…’असा त्याचा मित्रत्त्वाचा सबुरीचा सल्ला.. भले मदतीला मर्यादा असल्या तरी त्याच्या… अस्ताचा सूर्य सांगत असतो… मंद मंद गतीने मी अस्ताचलाला जाई पर्यंत तू त्त्वरेने उडत उडत जा.. आपल्या घरट्यात पोहचून जाशील…माझ्याकडे वेळ आहे फारच थोडा…तो संपला कि अंधाराचा उधळीत येईल काळाघोडा… आभाळाने घातले आपल्या डोळी काजळ गडद अंधाराचे.. ते पाहूनी भिउनी मान लवूनी बसले तृणपाती किनाऱ्यावरचे… आ वासूनी धावून येती अंगावर काळे काळे बागुलबुवांची तरूवर नि झाडेझुडे… थकल्या तनाला , बळ कुठले मिळण्याला,… भीतीच्या काट्याने थडथड लागली मनाला… राहिले घरटे दूर माझे… त्राण नाही उरले या देहात… जरी उडून जावे करून जीवाचा तो निर्धार… अर्ध्यावरती हा डावच संपणार…समीप आलेला अंत ना चुकणार..आणि घरचे माझे नि मी घरच्यांना कायमचा मुकणार… वियोगाची आली अवचित अशी घडी… लागले नेत्र ते पैलथडी… मी जाता मागे घरच्यांना कशी मिळावी माझी कुडी…आठवणीचीं राहावी एकतरी जुडी..
(आणि तेच झालं. कित्येक महिने गेले. शंभुदयाल ना धरणीधरच्या घरी आला,ना त्याने पुन्हा फोन केला. धरणीनेही त्याचा नंबर सेव्ह केला नव्हता. त्यामुळे कॉलबॅकची शक्यता नव्हती .दिवस-रात्री उलटत गेल्या. जग आपल्या चालीने चक्कर काटत राहिलं.) …इथून पुढे…..
विश्वविद्यालयाच्या समोरच्या लंकाच्या युनिव्हर्सल बुक डेपोमध्ये आदिवासींवर एक पुस्तक आलं होतं. धरणी काहीबाही लिहित असतो. तेव्हा त्याने फोनवर त्यांना विचारलं होतं. आज दुपारी तो तेच घेऊन परत येत होता. पण रेवडी तलावाच्या पुढे राजपुर्यात ट्रॅफिक एवढा ठप्प झाला होता, की वैतागून त्याला रिक्षातून खाली उतरावं लागलं.
तेव्हा त्याच्या लक्षात आलं, की तो कुंवरजींच्या हवेलीजवळ उभा आहे. ‘अरे!’ तो विचार करू लागला, ‘ शंभूने सांगितलं होतं,की इथेच त्याने एक घर विकत घेतलंय. आज वेळ आहे, तर त्याला भेटून का येऊ नये?’
डॉ अमिताभ चौधुरी
पण फक्त नावावरून नक्की पत्ता कसा मिळणार? या बाबतीत काशीचे चहावाले,पानवाले इन्क्वायरी काउंटरचं काम चोख बजावतात.
“भैया, शंभुदयालजीचं घर कुठे आहे,सांगू शकता?”
“कोण शंभुदयालजी? जमुहरामध्ये काम करायचे ,ते? दोन-तीन वर्षांपूर्वी त्यांनी इथे वर्माजींचं घर खरेदी केलं.”
“हा.हा. तोच.”
मग दिशा दिग्दर्शन सुरू झालं, ‘बाजूच्या रस्त्याने जा. पुढे खांबाकडून एक गल्ली आत गेलीय. त्या गल्लीत शिरा.तीन-चार घरं सोडून डावीकडे त्यांचंच घर आहे. समोरची खिडकी हिरवी आहे. वगैरे वगैरे.कोणालाही विचारलं तर सांगेल.’
विचारायची गरजच पडली नाही. धरणीने बेल वाजवली. एका बाईने बाजूच्या खिडकीचं एक दार उघडून विचारलं,”कोण आहे?”
“नमस्कार. मी धरणीधर.शंभुदयालचा बालमित्र. त्याला सांगा,मी भेटायला आलोय.”
आतमध्ये काहीतरी बोलणं झालं. मग दरवाजा उघडला,”या.”
हावभाव आणि बोलण्यावरून अंदाज करणं सोपं होतं, की ती शंभुदयालची बायको होती. धरणीला एका खुर्चीवर बसवून ती आत गेली. थोड्याच वेळात तिने नवर्याला आधार देत बाहेर आणलं.
धरणीधर उठून उभा राहिला,” अरे शंभू, बच्चू! ही काय अवस्था करून घेतलीयस?”
साठी ओलांडलेले दोन्ही मित्र एकमेकांना बघत होते. बहुधा मनात विचार करत असावेत – ‘पंधरा-सोळाव्या वर्षी जेव्हा शेवटचं बघितलं होतं, तेव्हा हा कसा दिसत होता?’
शंभूने तोंड उघडलं,” आता एवढे आजार….त्या दिवशी सांगितलं होतं ना तुला?”
“अरे,वहिनींशी ओळख तर करून दे.”
“हो,हो. देतो ना. हा धरणीधर. आम्ही दोघं प्रायमरीपासून एका वर्गात होतो. आता काय सांगू? तीन वर्षांपूर्वी मला पॅरॅलिसिस झाला. डाव्या बाजूला. तीन महिने बिछान्यात होतो.हळूहळू बरा झालो. आताही व्यायाम करावे लागतात.हीच करून घेते.”
“मग मुलाकडे का जात नाहीस? तो तर डॉक्टर आहे. आम्ही आपसात बोलत असतो, तुझे दोन्ही मुलगे चांगले निघाले.”
“काय म्हणता, भाईसाहेब?” ती एवढ्या धारदार आवाजात बोलली,की धरणी नजर उचलून सरळ तिच्याकडे पाहायला लागला. “कोण डॉक्टर? आमचा मुलगा?”
“अगं,कमला,इतक्या दिवसांनी मित्र घरी आलाय,त्याला चहा-बिहा नाही पाजणार?” शंभुदयाल गोंधळून गेला. जणू त्याच्या रहस्यावरचा पडदा बाजूला झाला होता. तो स्वतःच कसातरी उठून उभा राहिला. पण वादळात सापडलेल्या झाडासारखं त्याचं शरीर थरथरू लागलं. त्याचा डावा पाय आणि हाततर कमजोर होतेच. तो त्या पायावर नीट उभासुद्धा राहू शकत नव्हता. त्याचा उजवा हात हवा कापत होता. त्याचं तोंड एका बाजूला मिटलं गेलं होतं. “अरे यार, बस ना. एवढ्या दिवसांनी भेटलो आहोत! “
कमला काहीतरी बडबडत आत निघून गेली,” हं. मुलगे! त्यांच्यापेक्षा परके बरे.”
“तूच सांगितलंस ना? की तुझा मोठा मुलगा इंजिनिअर आहे आणि धाकटा डॉक्टर? खरं सांगायचं,तर आम्हाला थोडीशी असूयाच वाटायला लागली होती -साल्याचं नशीब किती जोरावर आहे!”
“देवाच्या मनात होतं,तसंच सगळं झालं. ते लोक आपआपला संसार सांभाळताहेत. आम्ही दोघं कोंबडा-कोंबडी इकडे बसून कुकूचकू करतोय. हे घर घेतलं. आयुष्यभर जमवलेल्यातली अर्धी पुंजी या घरातच गेली.”
‘ठक’…. कमला कधी खोलीत आली,कळलंच नाही. चहाचा कप टेबलावर ठेवून ती बोलायला लागली,” आणि आता तेच मुलगे सांगताहेत – हे घर विकून आम्हाला अर्धा-अर्धा हिस्सा देऊन टाका.”
“म्हणजे?” धरणीधर चकित झाला.
“जाऊ दे गं. आपल्या मुलांनी काही मागितलं,तर काय झालं?”
” इंजिनिअर आणि डॉक्टर तर स्वतःच एवढं कमावतात,की…”धरणी बोलताना अडखळला.
” कुठचा इंजिनिअर आणि कुठचा डॉक्टर?” कमला तिरमिरीत बोलली, “मोठ्याला ह्यांनी टेम्पो विकत घेऊन दिला होता. तो त्याला धड चालवायला जमलं नाही. विकून टाकला. पिऊन पडलेला असतो आता. धाकटा कुठच्यातरी प्रॉपर्टी डीलरकडे काम करतो. जमिनीच्या खरेदी-विक्रीत काय घपला केला,कोणास ठाऊक.त्याला ते शहर सोडून दुसरीकडे पळून जावं लागलं.आता दोघेही बापाचा गळा दाबून सांगताहेत – घर विकून आम्हाला अर्धेअर्धे पैसे द्या.”
“अरे!” बस्स.धरणी फक्त एवढंच बोलू शकला. काही न बोलता ,तो आपल्या बालमित्राकडे बघत राहिला. त्याला खूप राग आला होता. एवढं मोठं खोटं! एवढं धडधडीत असत्य! आणि कशासाठी? फक्त लोकांसमोर मोठेपणा मिरवण्यासाठी?
शंभुदयालच्या चेहर्यावर विचित्र उदासी तरंगत होती. डोळ्यांत अश्रू नव्हते. पण त्याच्या रक्तातून एक प्रकारचा पश्चात्ताप चेहर्यावर झिरपत होता. त्याने हसण्याचा प्रयत्न केला,”धरणी, कोण जाणे मेंदूत हे वेड कसं शिरलं? माझी मुलं जसजशी उद्दाम बनत गेली, तसतसा मी जुन्या मित्रांना फोन करून-करून मुलांविषयीच्या स्वप्नांची बहार सजवत गेलो. कित्येकांच्या मुलांना, अगदी मुलींनासुद्धा चांगलं शिकून,एमबीए करून चांगल्या नोकर्या मिळाल्या. कोणी बॅंकेत नोकरीला लागले. पण माझी मुलं?”
शंभुदयाल गप्प झाला. खोलीत भरलेल्या शांततेत विष तरंगत असल्यासारखं वाटत होतं आणि तो ते हळूहळू गिळत होता. “जेव्हा माझ्या कानावर यायचं – कोणाचा मुलगा स्पर्धापरीक्षेत पास झाला, कोणाच्या मुलीला नोकरी लागली, आता तिच्या लग्नाचं बघताहेत,तेव्हा माझ्या छातीत विचित्र जळफळाट व्हायचा. डोक्याचा दाह व्हायचा. देवा,मी काय पाप केलं, म्हणून माझ्या नशिबात असली मुलं आली?”
शंभुदयालला धाप लागली.
मित्राला बघून धरणीधरच्या जिभेला जणू अर्धांगाचा झटका आला. काय सांगणार होता तो मित्राला? कसं करणार होता त्याचं सांत्वन? एका बापाने नकळत आपल्या आकांक्षांचा एक काचमहाल उभा केला होता. आणि आज तो फुटून विखुरला होता. शंभूदयाल हळूहळू बोलायला लागला,”आणि नंतर तर पॅरॅलिसिस झाला. त्यातून सावरल्यावर रोज कोणा ना कोणाला फोन करून हेच सगळं सांगत राहिलो, की माझा मोठा मुलगा इंजिनिअर आहे आणि धाकटा डॉक्टर . का कोणास ठाऊक, पण त्यामुळे मला एक विचित्र शांती मिळायची. मला माहीत आहे, सगळ्यांना वाटायचं की या साल्याने तर बाजी मारली!”
धरणीधर आ वासून आपल्या मित्राकडे पाहत होता. माणूस स्वप्न व वास्तवाचा हा कुठचा साप-शिडीचा खेळ खेळू लागतो?
त्याला चहाचा कप उचलण्यासाठी हात पुढे करावासा वाटला. पण त्याच्या हाताचा जणू दगड झाला होता. तो उठून उभा राहिला,”चल,यार.निघतो.येईन पुन्हा कधीतरी.”
मागून शंभूचा आवाज आला,” अरे,निदान चहा तरी पिऊन जा.”
कमला काहीच बोलली नाही. ती गुपचूप उभी होती. दरवाजाजवळ भिंतीला टेकून.
– समाप्त –
मूळ लेखक :डॉ. अमिताभ शंकर रॉय चौधुरी
मूळ हिंदी कथा : कांच की जन्नत
मराठी अनुवाद :सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘साबुदाण्याची उसळ—’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
‘नववधू प्रिया मी बावरते’ असे होते ते दिवस. “उगवत्या चंद्राला लागली रजनीची चाहूल…. माजगावकरांची कन्या गोपीनाथ रावांच्या संसारात ठेवते पाऊल. .” असा काहीसा कुणीतरी शिकवलेला घोटून घोटून पाठ केलेला उखाणा अडखळत धडधडत मी घेतला खरा पण डोळ्यासमोर काजवे चमकत होते. कसं असेल बाई हे सासरच गाव ? आपण अस्सल पुणेरी आणि सासर अस्सल खान्देशी.. त्यातून भुसावळ कधी पाह्यलेलं पण नाही. शाळेत भूगोलाच्या पुस्तकात डोकं खुपसतांना नकाशात ठिपका बघितला होता. बस एवढीच काय ती त्या गावाची ओळख. आणि आता तर सगळं आयुष्यच काढायचय तिथे. मनात भीती, हुरहूर सगळ्या भावनांचं मिश्रण होतं. त्यातून . महाराष्ट्र एस्प्रेसचा बारा तासांचा प्रवास. दुसऱ्या गाडीने गेलं तर मनमाडला गाडी बदलावी लागायची . मनमाड स्टेशन हें sssभलं मोठ्ठ, आणि तें बघून मॅडच व्हायची वेळ यायची. तर अशा ह्या भुसावळ गावांत माझा गृहप्रवेश झाला. खान्देशी आमटी जिभेला चव आणायची, तर ठेचा आणि भरीत मेंदूला झटका देऊन डोळ्यात पाणी आणायचं. पण माझी खरी त्रेधा तिरपीट उडाली ती खान्देशी भाषेशी हात मिळवणी करतांना.
एकदा काय झालं, बस स्टॉपवर उभी होते .एका आजी बाईंना विचारलं,” बस गेली का हो आजी?” खडया आंवाजात उत्तर आलं , ” बस कवांच चालली गेली. सरळ जाऊन फाकली बी असलं ., ” अरे बाप रे ! फाकली काय, चालली गेली काय, माझ्या मेंदूला काही अर्थ बोधच होईना. काय करावं ? हे गावात वाट बघत असतील. मी भांबावून उभीच . तोवर आजींचा दणदणीत आवाज कानावर पडला , “आता काय करून राह्यली तू ? तरणीताठी पोरगी हायेस. जा कीं झपाझपा चालत. नायतर घरी जाऊन दादल्या संगट ये सायकल वरन डब्ब् ल शीट. ” काय सांगू त्यांना,दादला घरी नाही तर गावात वाट बघतोय म्हणून . मख्ख उभी राहयले. आता कुठला नविन गोंधळात टाकणारा शब्द कानावर पडणार ह्या भीतीने गप्प बसले. बाईं गं ! धसकाच घेतला होता मी त्या आजींच्या शब्दांचा. अहो काय सांगु तुम्हाला ? दुसरी फजिती माझी घरीच झाली की हो !. त्याचं असं झालं सासूबाईंचा उपास होता. आपली पाककृती दाखवून त्यांना खुश करावं म्हणून मी विचारलं . “आई काय करू उपवासाच ? कुणाशी तरी बोलताना त्यांनी उत्तर दिलं. “कर की साबुदाण्याची उसळ”.. मी उडालेच. बाप रे! साबुदाण्याची उसळ ? आणि आता हा कुठला नवीन पदार्थ ?
माहेरी लाडोबा आणि त्यातून शेंडेफळ . मोठ्यां तिघी बहिणी,आई ,आत्या, काकु अशा गृहकृत्यदक्ष अन्नपूर्णा होत्याच की घरात.त्यामुळे वहिनीवर पण सून असून जबाबदारी नव्हती. मग माझी काय कथा ! त्यातून माझी नोकरी. स्वयंपाक घराशी सबंध खाण्यापुरताच . जरा इकडे तिकडे केल., कधीतरी वरणाला मोहरी जाळून सणसणित फोडणी दिली, तरी वडील कौतुक करायचे. अशा सुगरणीला सासूबाईनी साबुदाण्याची उसळ करायला सांगितली… दिवसा तारे चमकले डोळ्यासमोर. सासूबाई वयानी माझ्यापेक्षा बऱ्याच मोठया. मला संकोच आणि भीती वाटायची त्यांची. त्यातून त्या चार बायकात बसलेल्या . साबुदाण्याची उसळ कशी करायची ? हें त्यांना विचारू कसं बाई ? अज्ञानाला आमंत्रणच कीं हो ! मनात नुसता गोंधळ चालला होता. साबुदाणा भिजेल पण ==पण त्याला मोड कसे आणायचे ? हे दिवे आईपुढे पाजळावे.तर फोनची सोय पण नव्हती तेव्हा. तरी आई लग्नाआधी कानी कपाळी ओरडायची, स्वयंपाकाची सवंय ठेव म्हणून. आता काय करायच ? बसा आता रडत. घड्याळ तर पुढे सरकत होतं. जरा वेळाने सासरे व सासूबाई फराळाला आत येतील. साबुदाणा तर केव्हाच भिजवलाय., डोकं लढवून. पण???त्याची उसळ???फराळाच्या ताटलीत सासऱ्यां पुढे काय ठेऊ? दरदरून घाम फुटला मला. आणि मग एकदम, शेजीबाई आठवली. मागच्या दाराने तिच्याकडेपळत गेले. ‘ ‘उसळीच ‘ अज्ञान तिच्या पुढे उघडं केल. तीने पण एवढंही येत नाही कां हीला? अशा नजरेने बघून कृती सांगितली. आणि मग एकदम ट्यूब पेटली. ‘अय्या !अगंबाई! हीं तर साबुदाण्याची खिचडी ..ही तर येते कीं मला.सोप्पी तर आहे . उगीचच घोळ घातला बाई इतका वेळ .आणि अहो मग काय!खिचडी जमली कीं हो मला ! सासुबाई आणि सासरे एकदम खुश झाले,खिचडी खाऊन. पण एक मात्र झालं हं! आपल्याकडच्या साबुदाण्याच्या खिचडी ला तिकडे ‘ साबुदाण्याची उसळ ‘ म्हणतात ह्या नविन शब्दाची ज्ञानात भर पडली.आणि तेव्हाच साबुदाण्याची उसळ पदार्थाचा शोध मला लागला. अशी खानदेशी भाषेशी फुगडी खेळता खेळता भुसावळ वास्तव्यातला बहिणाबाईंच्या भाषेतला ‘अरे संसार संसार ‘ पार पाडला. आणि बरं कां मंडळी!अजूनही बरेच किस्से आहेत बरं का ! पण आपली फजिती एकाचं वेळी सगळी सांगणं बरं नव्हे ! नाही का ? सांगेन हं,पुढच्या वेळी,पुन्हा कधी तरी , केव्हा तरी…
☆ माझ्या भावाला माझी माया कळू दे !☆ श्री संभाजी बबन गायके☆
एक गाणारं तळं होतं आणि त्यात राजहंसांची पाच सुरेख पिलं होती. पण दुर्दैवानं यातलं एक पिलू काहीसं अधू होतं शरीरानं. तळ्यातल्या पाण्यात विहार करायचा तर पाय तर पाहिजेत ना भक्कम? पण नेमके हेच तर शल्य होतं त्या राजहंसाच्या तनमनाचं! या पिलांचे आई-बाबा स्वत:च प्रपंचाच्या लाटांचे तडाखे साहीत कसेबसे तरंगत होते जीवनाच्या या पाण्याच्या पृष्ठभागावर….त्यांच्या पायांतील आणि पंखांतील शक्ती क्षीणक्षीण होत जाणारी! यातला वडील राजहंस तर अकालीच उडून गेला! आई पक्षिणीसह सारेच राजहंस केविलवाणे झाले. कल्पवृक्ष लावून गेलेल्या बाबाचा वंश पुढे चालवणारा राजहंस पायांनी चालू शकत नव्हता आणि आई पक्षिणी करून करून करणार तरी किती?….त्यावेळी ती स्वत:हून पुढे झाली आणि त्या पिलाची जणू आईच झाली.
जागृती,स्वप्नी सुषुप्ति या तिन्ही अवस्थांमध्ये भगवदभक्त जसा देवाच्या सान्निध्यात असतो तशी ती त्याला आपल्या अंगाखांद्यावर वागवू लागली….पाऊलं थकली तरी तिला तिच्या कडेवरचं हे पिलू कधी ओझं नाही वाटलं. गाय जसं आपलं वशिंड सहज वागवते तशी ती या बाळाला मिरवत होती.
बाकी सारं घर स्वरांच्या साधनेत मग्न असताना ती मात्र प्रपंच्याच्या व्यवहारात आपलं गाणं शोधत असे. अस्सल गवय्याची लेक…गळा असा सुनासुना राहीलच कसा? पण एकाजागी बसून गाणं शिकावं,ऐकावं आणि सादर करावं असं तिचं काही नसायचं. घर,अंगण झाडून काढताना,भांडी घासताना आणि अगदी कपडे धुवत असतानाही बाळ तिच्या अंगाशीच असायचा. बघणाराला यांच्याकडे पाहून चित्रातल्या गाय-वासराची आठवण व्हावी! बाळाच्या दुधासाठी भराभरा चरणारी गाय आणि तिच्या पायांत घुटमळत चालणारं वासरू….पण हे वासरू मात्र स्वत: चालू शकत नसायचं त्यावेळी.
दोन-चार मैलांवरच्या नदीपात्रात कपडे धुवुन येताना तिच्या एका हातात ओल्या कपड्यांचं ओझं असायचं आणि कडेवर बाळ. पायांखाली फुफाटा…तापलेला. रस्त्यावर सावली नावाची पुसटशी रेघही नाही. वाटेच्या सोबतील दुसरं कुणीही नाही. पडक्या आसमंताची साथ आणि ही दोन पावलं दूरवरच्या घराकडे निघालीत…आपल्याच धुंदीत. कडेवरच्या बाळाच्या पायांपासून तापल्या धुळीची धग एक हात दूर. चालणारी जेमतेम दहा वर्षांची तर कडेवरचं बालक पाचेक वर्षांचं. त्याची पावलं तिच्या गुडघ्यापर्यंत पोहोचणारी आणि त्यामुळे चालणं तसं मंदगतीनं. पोटात भूकेचं काहूर माजलेलं आणि तिची पावलं थकलेली…तरी कडेवरचं ओझं हे ओझं नव्हतं वाटत तिला….तिचा जीवलग होता तो.
ती अजूनही तशी अल्लड वयातच होती. त्यात सावली धरणारा राजहंस परलोकी निघून गेल्यानं या आयुष्याकडे कटाक्षानं पाहणारंही कुणी नव्हतं तसं…थोरल्या बहिणीशिवाय. ती सुद्धा बालपणातच कपाळावर पोक्तपणाचा गंध लेवून सगळ्यांची आई झालेली पोर. फाटलेलं आभाळ सांधता सांधता तिच्याही हातून एखादा धागा चुकून निसटून गेला असावा. दिवस मागे पडले आणि या पिलांची आभाळं बदलत गेली. बाळ आता थोडा स्वतंत्र उभा राहू शकत होता,चालू शकत होता. त्याच्या पायांत तिनेच बळ भरले होते बहुदा.
तो अजूनही तिच्यासोबतच चालत होता…पण एका वळणावरून ती अचानक दिसेनाशी झाली. तिच्या भावविश्वातल्या एका लुभावणा-या पायवाटेनं तिला जणू मंत्र टाकून आत खोल वनात ओढून नेलं होतं. आता बाळ तसा आधाराविना राहिला होता आणि मग त्यालाही मोठेपणाचा अंगरखा चढवावा लागलाच. आयत्यावेळी कुणी आधी ठरलेला नट आलाच नाही तर घरातल्याच कुणीतरी ती भूमिका वठवायची असं कित्येकवेळा झालेलं होतं त्यांच्या नाट्यप्रयोगांमध्ये. हा तर प्रत्यक्ष आयुष्याचा मंच…इथं घरचाच पुरूष असायला पाहिजे!
तिचं असं अचानक निघून जाणं कुणालाच झेपलं नाही. पण कुणीही तिच्या आठवणींशिवाय झोपलं नाही कधी बिनघोर. ठेच लागलेलं पायाचं बोट जसं चालताना एकदा तरी ठेचकाळतंच…आंधळं बोट म्हणतात त्याला ते काही उगाच? दूर वनातून तिने हाक दिली आणि बाळ तिच्यासाठी धावत गेला…त्याच्या पायांत आता जबाबदारीची ताकद आली होतीच. ती संसाराच्या चटक्यांनी हैराण झालेली होती आणि त्या वणव्यातून निसटू पहात होती. फक्त तिला कुणीतरी हात देणारं पाहिजे होतं. फसलेल्या पायवाटेवरून ती पुन्हा हमरस्त्यावर आली आणि तिला सावली गवसली.
माहेरी गाणं कानांमागे टाकणारी ती आता गाण्यानेच जगाचे कान तृप्त करीत होती. गीतकार जणू तिचेच शब्द तिलाच गायला लावत होते…आणि ती भान विसरून गातही होती….गाण्यांमधून ती जशी जगली तशी दिसू लागली होती….अल्लड,खोडकर,नीडर….तर कधी दुखावलेली,दुरावलेली आणि काही तरी गमावलेली! ती नेमकी कशी हे ताडणं कुणालाही कधीही न जमलेलं.
अब के बरस भेज भैय्या को बाबूल…सावन में लीजो बुलाय रे! बाबा…या श्रावणात तरी दादाला पाठवा ना मला माहेरी घेऊन यायला! माझ्या मैत्रिणी येतील मला भेटायला…आंब्याच्या झाडांना झोके बांधले जातील…श्रावणसरी बरसतील…..आपल्या घरच्या आठवणींनी मी व्याकुळ झाले आहे….यौवनानं बालपण चोरलं माझं….माझी बाहुली हरवून टाकली….तुमची किती लाडकी होते ना मी…मग? किती दिवस झाले…नव्हे जणू युगं उलटलीत….दादाला पाठवा!
माई,दादा आणि सर्व भावंडं या सासुरवाशीनीच्या मागे उभी राहिली. ती बाळच्या आयुष्यात परतली आणि त्याचेही सूर त्याला गवसले. बाळला आता कडेवर बसण्याची गरज नव्हती….पण तिने त्याचे सूर तिच्या कडेवर अंगा खांद्यावर घेतले. त्याने सुरांना तिचा आवाज मागितला आणि इतरांना दुर्बोध वाटणारे शब्द तिच्या कंठातून सुगम होऊ लागले.
लहानपणी तिने त्याला कधी दटावलेले असेल की नाही माहित नाही पण आता हा मोठा झालेला बाळ शिकवताना कठोरपणाची छडी हाती घेऊन तिच्या मागे उभा. तिनंही ते सारं निभावून नेलं. तिच्या जीवलगा….राहिले रे दूर घर माझे…. म्हणण्यात प्रत्येकाला आपला जीवलग भेटू लागला. तिच्या स्वरांच्या आवर्तनांमध्ये रात्री उलटून गेल्याचं अगदी पहाटेपर्यंत लक्षातही आलं नाही. चालींच्या मधाळपणात कुणी स्वत:ला हरवून बसले तर काहीचं आभाळ अगदी अंगणात उतरू आलं. प्राणाची तळमळ सागराच्याही काळजात उतरली…पिकलेल्या जांभळांचा सडा कुणाच्या ओट्यांमध्ये पडला तर कुठे समईच्या शुभ्र कळ्या…..देवघरात उमलल्या!
लतादीदी जर गोड आरोह असतील तर आशाताई मुलायम अवरोह म्हणूयात. गायनी कळा धन्य करणा-या या भावंडांनी संगीत विश्वाला मोहिनी घातली ते अविनाशी आहे. यात आशाताईंचं आयुष्य म्हणजे एक दीर्घ काव्य…जी वाचणं सोपं पण भोगणं कठीण. हृदयनाथांबरोबरचं आशताईंचं नातं म्हणजे भावा-बहिणीतल्या नात्याचं एक विलोभनीय चित्र. बालपणी स्वत:च्या पायांनी ‘चाल’ अशक्य असणारे हृदयनाथ पुढे गाण्यांच्या ‘चालीं’नी रसिकांच्या श्रवणाचा मार्ग प्रशस्त आणि श्रीमंत करीत गेले. आणि ते स्वत:च्य हिंमतीवर ते केवळ चाललेच नाहीत तर दीनानाथांच्या संगीत परंपरेच्या वारशाचे भक्कम आधारही झाले.
माझ्या भावाला माझी माया कळू दे असं आशाताई एका गाण्यात म्हणाल्यात…. आई बाबांची सावली सरं…छाया भावाची डोईवर उरं! आशाताईंनी त्यांच्या ‘बाळा’च्या डोईवर धरलेल्या छायेबद्द्ल ह्र्दयनाथ यांनी लिहिलेलं वाचताना असं वाटतं की….त्यांना बहिणीची माया खरंच कळली आहे.
(आजच्या दैनिक सकाळ वृत्तपत्रातील सप्तरंग पुरवणीत ह्र्दयनाथ मंगेशकरांनी आशाताईंविषयी जे काही लिहिलं आहे ते अगदी हृदयाच्या तळापासूनचं आहे..त्यामुळेच ते अस्सल आहे. ते वाचून हे मी माझ्या शब्दांत मांडलं आहे.)