श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“संध्याछाया भिवविती हृदया…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… संध्याकाळच्या परतीच्या वाटेवर थव्यातून जात होतो…कळले नव्हते सकाळी तेव्हा घरट्यापासून किती लांबवर आलो होतो… पिल्लांच्यासाठी आणि तिच्या ओढीसाठी घरट्याकडे,  अंतरामागुन अंतर कापत जात होतो…कितीतरी वेळ पंख पसरून हवेत विहरत निघलो पण घरट्याच्या झाडाजवळ काही अजून  पोहचलो नव्हतो… सोबत घेतलेला होता चिमणचारा कच्चा बच्च्या पिलांना आणि आणि तिच्यासाठीही… त्याचं ओझं काहीच वाटत नव्हतं…आतुरतेने वाट  पाहत बसली असतील माझी घरट्याच्या तोंडाशी… चिवचिवाट किलबिलाटाचा करत असतील कलकलाट झाडावरती…रातकिड्यांना रागावून सांगत असतील तुमची किर्र किर्र नंतर करा रे संध्याकाळ उतरून गेल्यावर…येणारेत आमचे बाबा आता एवढ्यात या संधिप्रकाशात… फुलेल आनंदाचा गुलाल मग सारा घरट्यात… मग सांडून जाऊ दे काळोखाचे साम्राज्य.. पण पण त्या आधी आमचा बाबा घरी आलेला असूदे… “

“… का कुणास ठाऊक आता आताशा  मला दम लागुन राहिला…लांब पल्ल्याच्या झपाट्याला श्वास कमी पडू लागला..दिवसभर काही जाणवत नाही पण संध्याकाळी घरट्याकडे परताना थव्याबरोबर विहरणे जमत नाही… हळूहळू मग  मागे मागे पडत जातो… नि थवा मात्र ‘त्याचं कायं येईल तो मागाहून… कशास थांबावे त्याच्यासाठी.. ‘नि मला न घेताच तसाच पुढे निघून जातो… क्षणभराचे कसंनुसे होते मला.. धैर्य एकवटून पुन्हा पंख जोराने फडफडवत त्यांच्या बरोबर जाण्याचा प्रयत्न करतो… पण पण तो  आटापिटा आता पूर्ण पणे निष्फळ ठरतो.. सगळे त्राण, अवसान कधीच संपलेले असते.. आता फक्त काही वेळ  विश्रांती घेणे गरजेचे ठरते… आंगातुक मला..वाटेवरील झाडे नि त्यावरील आमचेच जातभाई आसरा देण्यावरून कालवा कालवा करतात.. ‘तू  इथं थांबू नको बाबा तुझ्या ईथे असण्याने आमच्या शांतेत येतेय बाधा… ‘मग तसाच नदीच्या प्रवाहातला काळ्या कातळावर जरा विसावतो… चौफेर नजर फिरवतो… शांत एकसुरीचा जलप्रवाह कातळावर डचमळून जातो…नदीतील कातळाचा हुंकार ऐकू येतो.. ‘तू पूर्ण अंधार पडण्याआधी तूझ्या घरट्याकडे जाशील बरं… रात्र गडद होत जाईल तसं नदीचं पाणी शांत गहिरं होत जाईल.. काही जलचर आवाज न करता मग या कातळावर येतील  नि तुला पाहून त्यांना आयतीच मेजवानी होईल…’असा त्याचा मित्रत्त्वाचा सबुरीचा सल्ला.. भले मदतीला मर्यादा असल्या तरी त्याच्या… अस्ताचा सूर्य सांगत असतो… मंद मंद गतीने मी अस्ताचलाला जाई पर्यंत तू त्त्वरेने उडत उडत जा.. आपल्या घरट्यात पोहचून जाशील…माझ्याकडे  वेळ आहे फारच थोडा…तो संपला कि अंधाराचा उधळीत येईल काळाघोडा… आभाळाने घातले आपल्या डोळी काजळ गडद अंधाराचे.. ते पाहूनी भिउनी मान लवूनी बसले तृणपाती किनाऱ्यावरचे… आ वासूनी धावून येती अंगावर काळे काळे बागुलबुवांची तरूवर नि झाडेझुडे… थकल्या तनाला , बळ कुठले मिळण्याला,… भीतीच्या काट्याने थडथड  लागली मनाला… राहिले घरटे दूर माझे… त्राण नाही उरले या देहात… जरी उडून जावे करून जीवाचा तो निर्धार…  अर्ध्यावरती  हा डावच संपणार…समीप आलेला अंत ना चुकणार..आणि घरचे माझे नि मी घरच्यांना कायमचा मुकणार… वियोगाची आली अवचित अशी घडी… लागले नेत्र ते पैलथडी… मी जाता मागे घरच्यांना कशी मिळावी माझी कुडी…आठवणीचीं  राहावी एकतरी जुडी..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments