(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता “गर्मी ”)
(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी जबलपुर से श्री राजेंद्र तिवारी जी का स्वागत। इंडियन एयरफोर्स में अपनी सेवाएं देने के पश्चात मध्य प्रदेश पुलिस में विभिन्न स्थानों पर थाना प्रभारी के पद पर रहते हुए समाज कल्याण तथा देशभक्ति जनसेवा के कार्य को चरितार्थ किया। कादम्बरी साहित्य सम्मान सहित कई विशेष सम्मान एवं विभिन्न संस्थाओं द्वारा सम्मानित, आकाशवाणी और दूरदर्शन द्वारा वार्ताएं प्रसारित। हॉकी में स्पेन के विरुद्ध भारत का प्रतिनिधित्व तथा कई सम्मानित टूर्नामेंट में भाग लिया। सांस्कृतिक और साहित्यिक क्षेत्र में भी लगातार सक्रिय रहा। हम आपकी रचनाएँ समय समय पर अपने पाठकों के साथ साझा करते रहेंगे। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता ‘राम जाने…’।)
मराठी चित्रसृष्टीतले भीष्माचार्य, कोल्हापूरची शान वाढवणारे “जयप्रभा स्टुडिओ”चे मालक, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कवी, नव्या कलाकारांना घडवणारे मूर्तिकार अशी असंख्य बिरुदे ज्यांना लावता येईल त्या भालजी पेंढारकर यांचा आज स्मृतीदिन
भालजी पेंढारकरांनी कोल्हापूर हे मराठी चित्रपट बनवण्याचे प्रमुख केंद्र बनवले. त्यांच्या जयप्रभा स्टुडिओ मधून एकाहून एक उत्तम चित्रपट निर्मिले गेले. भालजींचे चित्रपट किंवा त्यांची निर्मिती संस्था म्हणजे कलाकार व तंत्रज्ञ घडवणारी एक मोठी कार्यशाळाच होती. तसेच त्यांचा संच म्हणजे कुटुंबच होते. शिस्तबद्धता, वेळापत्रकानुसार काम, कामांचे नेटके वाटप, स्तोत्रपठण, प्रार्थना, रेखीव दिनक्रम, वगैरे…
चित्रपटाच्या माध्यमातून भालजींनी सुलोचनादीदी, चंद्रकांत मांडरे, सूर्यकांत मांडरे, जयश्री गडकर असे असंख्य कलाकार घडवले. शिवाजीराजांचा चा काळ आणि त्या काळातील व्यक्तिरेखा व प्रसंग ही भालजींच्या चित्रपटांची प्रमुख वैशिष्ट्ये होती. त्यांच्या युगप्रवर्तक अशा कारकिर्दीमुळे भालजींना यथार्थतेने चित्रतपस्वी असे म्हटले जाते.
१९४८ मध्ये गांधीजींची हत्या झाल्यानंतरच्या दंगलीमध्ये भालजींचा कोल्हापूर येथील जयप्रभा स्टुडिओ जाळला गेला. नुकताच तयार झालेला मीठभाकर व बाळ गजबरांचा “मेरे लाल” हे चित्रपट आगीत भक्षस्थानी पडले. दीडशे ते दोनशे कामगार बेकार झाले. भालजींनी पुन्हा लाखो रुपये खर्चून जयप्रभास परत उभे केले. जिद्दीतून मीठभाकर व मेरे लाल ची पुनर्निर्मिती केली. मीठभाकरने चांगला व्यवसाय केला. भालजींनी कोल्हापुरात मराठी चित्रनिर्मितीस पुन्हा एकदा वेग मिळवून दिला.
भालजींचे चित्रपट
आकाशवाणी, कान्होपात्रा, कालियामर्दन, गनिमी कावा, गोरखनाथ, छत्रपती शिवाजी, नेताजी पालकर, बहिर्जी नाईक, भक्त दामाजी, मराठा तितुका मेळवावा, महारथी कर्ण, मीठभाकर, मोहित्यांची मंजुळा, राजा गोपीचंद, वाल्मिकी, साधी माणसं, सावित्री, सुवर्णभूमी
भालजींनी योगेश या नावाने गाणी लिहिली ती गाणी देखील लोकप्रिय आहेत.
१) अखेरचा हा तुला दंडवत
२) अरे नंदनंदना
३) डौल मोराच्या मानच्या र
४) तुझी माझी प्रीत जमली नदीकाठी
५) माझ्या कोंबड्याची शान
६) माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात
७) राजाच्या रंगमहाली
९) वाट पाहुनी जीव शिणला
१०) चल चल जाऊ शिणुमाला.
सिनेसृष्टीतला दादासाहेब फाळके हा अत्युच्च पुरस्कार त्यांना १९९१ साली प्रदान केला गेला.
भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढले होते.
☆ दोन लघुकथा – बक्षिसी… / चांगला पर्याय – A better option☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
(१) बक्षिसी…
सकाळची वेळ. सुषमा आपली गावातल्या घराच्या व्हरांड्यात नुकती कुठे बसत होती.
तिचे गेले दोन चार दिवस खूपच धावपळीचे गेले होते. अगदी घोटभर चहाही गळ्याखाली उतरला नव्हता दोन दिवसांत.
पण आता सगळीच धावपळ संपली होती, शांत झाली होती.
सकाळची वेळ होती. दिवसाचा पहिला चहा करून सुषमाने आपल्या सासूला दिला, आणि व्हरांड्यात बसून, स्वतः पहिला घोट घेणार, एवढ्यात दारासमोर रिक्षा थांबली. आणि त्यातून उतरणारी शम्मो, कम्मो, राजो, राणी आदि तृतीयपंथींना बघून सुषमाला पुढे काय होणार ते तिला उमगलं.
साठ एक वर्षांची राणी त्यांची म्होरक्या – सगळ्यात पुढे होती.
“कुठं आहे आमची नवी सून ? हाय दैय्या, अजून बेडरूममध्येच आहे का ? आणा, आणा तिला बाहेर. तिला आशिर्वाद द्यायचे आहेत आणि आमची बक्षिसी घ्यायची आहे, ” घुंगरू मागवत राणीची वटवट सुरू झाली.
“सूनबाई नाहीये इथे, ” तिला मध्येच थांबवत सुषमा शांतपणे म्हणाली.
“ओ हो, हनीमूनला गेले का ? कुठे गेले – गोवा का काश्मीर का लक्षद्वीपला ? आणि परत कधी येणार ? आम्हाला सांगा, आम्ही तेव्हा परत येऊ, ” राणीची टकळी लगेच नव्या ट्रॅकवर सुरू झाली.
“नाही, ते परत येण्यासाठी नाही गेले. ते वेगळे झाले. ते दुसऱ्या नव्या घरात राहायला गेले. ” सुषमा.
“आं, ते का बुवा ?”
कधी नव्हे ते राणीला पुढं काय बोलावं ते सुचेना.
“तू यांना ओळखतेस ना ?” व्हीलचेअरवर बसलेल्या आपल्या सासूकडे बोट दाखवत सुषमाने विचारलं.
“म्हणजे काय ? तू लग्न होऊन इथे आलीस तेव्हा तुझी बक्षिसी घ्यायला मीच आले होते की. त्याच्या आधीपासून ओळखते मी तुझ्या सासूला. ” राणी म्हणाली, पण काय चालले आहे याचा तिला अजून उलगडा होत नव्हता.
“आमच्या नव्या सूनेला माझ्या या सासूबाईंची अडचण होत होती. तिला घरात ही अशी dustbins नको होती. तिचं माझ्या लेकाशी आधीच बोलणं झालं होतं म्हणे. त्याला तिचं म्हणणं मान्य होतं, पण आम्हा दोघींना सांगायची हिंमत झाली नव्हती.
लग्नाचे विधी पार पाडून वरात घरी आली, पाहुणेरावणे काल गेले आणि संध्याकाळीच हे दोघेही नव्या घरात शिफ्ट झाले.
मला म्हणत होती तूही ये म्हणून. पण मी काही सासूबाईंना सोडून गेले नाही. ते त्यांच्या घरात सुखी आहेत, मी माझ्या घरी. “
मंद हसत राणीने घुंगरू पायात बांधायला सुरुवात केली, सुषमा हैराण झाली.
“अग, हे एवढं रामायण ऐकूनही तू नाचणार आहेस ?”
“हो तर. बक्षिसी घ्यायला आली आहे, बक्षिसी घेऊनच जाणार. वर्षानुवर्षे नव्या सुनेसाठी बक्षिसी घेते, आज पहिल्यांदाच, सासूला जपणाऱ्या अशा सुनेबद्दल तिच्या सासूकडून बक्षिसी घेईन. काय आज्जी ?” व्हीलचेअरवरच्या आजींकडे सहेतुकपणे पहात राणी म्हणाली.
दिलखुलास हसत, आजीबाईंनी आपल्या बटव्यातून पाचशेची नोट काढली, राणीला दिली.
राणीने सुषमावरून ती नोट ओवाळली, तिची अलबला काढली. ते पाचशे रुपये कम्मोला दिले. आपल्या पर्समधून एकशे एक रुपये काढून तिनं सुषमाला दिले, म्हणाली, “हे माझ्याकडून बक्षीस तुला. तू नेक काम करते आहेस. सुखी रहा. “
आणि मग मंडळींनी घुंगरू बांधले, ढोल वाजू लागले, आणि राणी, शब्बो, कम्मो, राजो – सगळ्याच जणी बेभान होऊन नाचल्या, नाचतच राहिल्या.
लेखक : श्री मकरंद पिंपुटकर
= = = = = =
(२) चांगला पर्याय –a better option
नोकरीतील कामासाठी मला दर आठवड्याला एकेकदा पुण्याहून सातारा, सांगली आणि कोल्हापूरला जावे लागायचे, रात्री घरी परत.
खेड शिवापूरच्या ठरलेल्या धाब्यावर जेवण व्हायचं. इतक्या वर्षांच्या वेगवेगळ्या trial and error नंतर आता जेवणाचा मेनू ठरलेला आहे. पापड, ३ पोळ्या, रायता, दाल तडका, दही, आणि गोड म्हणून श्रीखंड वाटी.
सवयीने टेबलही ठरलेले आहे, “काय हवं ?” विचारायला येणारा वेटरही ठरलेला आहे. आताशा तर तो काय हवं हे विचारतही नाही. मी आलो की पापड आणून ठेवतो, आणि मग बाकीचं जेवण.
कालही तसंच झालं. मी माझ्या नेहमीच्या टेबलावर बसलो, पण माझा नेहमीचा वेटर दिसत नव्हता, पण दोन मिनिटात एक तरुण पोरगं आलं, “ते शंकरभाऊंना बरं नाहीये, आज रजेवर आहेत ते. “
अच्छा, म्हणजे, माझ्या अन्नदात्याचं नाव शंकर होतं तर. “बरं मग, तुझं नाव काय आहे ?”
“सचिन, सर. “
काळा सावळा, तरतरीत, चापून चोपून पाडलेला भांग, कॉलरशी झिजलेला, थोडा चुरगळलेला पण स्वच्छ हाफ शर्ट, पायात चपला.
“बरं, सचिन, असं कर, मला एक पापड… ” मी सांगायला सुरुवात करत होतो, तेवढ्यात मला हाताने थांबवत तो म्हणाला, “माहिती आहे, सर. २ पोळ्या, रायता, दाल तडका, दही, श्रीखंड. ”
“अरे व्वा, गृहपाठ झाला आहे तर. ठाऊक आहे तर मग आण लवकर, मित्रा, पोटात कावळे कोकलत आहेत. “
तो थबकला, म्हणाला, “सर, हरकत नसेल तर एक better option सुचवू ?”
“बोला, काय better option सांगताय ?” मला रूटीन बदलायला आवडत नाही. आणि एका वेटरच्या सांगण्यावरून तर नाहीच नाही. पण एकदम काहीतरी खवचटपणे बोलणं योग्य वाटलं नाही मला.
“सर, तुम्ही त्यापेक्षा आमची veg थाळी घेता का ? दोन पोळ्या, दोन भाज्या, दाल तडका, भात, रायता, दही, खीर, पापड अशी थाळी असते. तुम्हाला भात नको असेल तर त्या ऐवजी एक पोळी extra घेता येईल सर, किंवा एक भाजी कमी करून extra पोळी घेता येईल आणि तुमच्या नेहमीच्या बिलापेक्षा २०% कमी बिल होईल, सर. ” त्यानं सांगितलं.
मी मेनू कार्ड पाहिलं. तो बरोबर सांगत होता.
मला आश्चर्याचे एका पाठोपाठ एक धक्के बसत होते.
एकतर तो माझ्या टेबलवर कधीच आला नव्हता, तरीही मला काय हवं ते त्याला ठाऊक होतं. Better option म्हणण्याइतकं त्याला इंग्रजी येत होतं, बोलताना नम्रपणे बोलत होता, भाताऐवजी अथवा भाजीऐवजी पोळी देण्याची मॅनेजमेंट त्याला उमगत होती, आणि तो टक्केवारीची गणितं तोंडी करू शकत होता.
“तू काय करतोस ?” मी त्याला विचारता झालो.
“सर, इथे वेटर आहे, ” काहीसं गोंधळून तो म्हणाला.
“नाही, नाही. त्याव्यतिरिक्त काय करतोस ?”
“दिवसा एमपीएससी ची तयारी करतो, सर. रात्रपाळीच्या नोकरीचे दोन पैसे जास्त मिळतात, आणि निवांतपणा असला तर दोन पुस्तकंही वाचता येतात. ” आत्मविश्वासानं तो म्हणाला.
“मित्रा, better option च घेऊन ये. “
जेवण झालं, छान होतं. बिल घेऊन सचिन आला. मी बिल दिलं, पण आज मी टिप नाही ठेवली.
याच्यासाठी पैश्यांची टिप महत्त्वाची नव्हती.
माझ्या खिशाला पार्करचं चांगलं पेन होतं. मी ते खिशातून काढलं, आणि त्याच्या खिशात ते ठेवलं. “तुला सह्या करण्यासाठी, ” मी म्हटलं.
त्याचे डोळे लकाकले.
सगळी सुखं हात जोडून उभी असतानाही बहाणेबाजी करणारी एक जमात आहे, आणि गरीबी पाचवीला पूजली असताना, पोट हातावर असताना, नशिबाला दोष न देता, मेहनतीने better option शोधणारा एक वर्ग आहे.
सचिन या दुसऱ्या वर्गातला आहे. दिवसा अभ्यासाने स्वप्नांची दुनिया सजवत आहे, रात्री मेहनत करून सध्याच्या दुनियेत जगण्याची तजवीज करत आहे.
आणि सचिन नक्की जिंकणार, कारण याच्याकडे गमावण्यासाठी काहीच नाहीये, आणि जिंकण्यासाठी अख्खी दुनिया.
मी उद्याच्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याला एक पेन भेट म्हणून दिलं आले.
परिस्थितीबद्दल रडगाणं गाण्यापेक्षा, ती सुधारण्यासाठी प्रयत्न करणं हाच better option आहे.
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ जगात भारी…. आम्ही भिक्षेकरी…!!! – भाग-१☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
“पुणेरी टोमणे मारूया… प्लास्टिकला पळवून लावूया… “
प्लास्टिकच्या वस्तू…. खास करून प्लास्टिकच्या पातळ पिशव्या यांचे विघटन होत नाही.
पुरातन काळात राक्षस नावाची संकल्पना होती, आजच्या काळात प्लास्टिकच्या पिशव्या हाच एक राक्षस आहे. विघटन न झाल्यामुळे पर्यावरणाला धोका… माणूस म्हणून आपल्यालाही अनेक वैद्यकीय – सामाजिक धोके…. आणि उकिरड्यात पडलेल्या पिशव्या निष्पाप मूक प्राण्यांच्या पोटात जातात आणि त्यांचे मृत्यू होतात.
गोहत्या थांबवण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न केले जातात; परंतु प्लास्टिक पिशव्या खाऊन ज्या गोमाता देवाघरी गेल्या, त्यांचा हिशोब कोणी ठेवला आहे का… ?
हा विषय विविध स्तरावर सांगितला, तरी काही मूठभर लोक सोडुन इतरांना या विषयाशी काहीही घेणं देणं नाही… !
“भिक्षेकरी” हा असाच दुसरा ज्वलंत विषय…
भीक मागणारे मागतात आणि दोन पाच रुपये भीक देऊन, पुण्य मिळेल या भावनेने लोक भीक देतात…
… दोन पाच रुपयात पुण्य मिळतं ??? पुण्य इतकं स्वस्त असतं… ?
अशा दोन पाच रुपये भीक देण्याने; देणारा, अप्रत्यक्षपणे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढवायला मदत करतो, भीक मागण्यासाठी आपली मुलं पळवली जातात, चांगल्या लोकांना धाक दाखवून भीक मागायला लावली जाते, यांची मुलं कधीही शाळेत जात नाहीत, मुलांचं अख्ख आयुष्य बरबाद होतं….
अजून सुद्धा खूप काही आहे… विषय मोठा आहे, तो मी माझ्या पुस्तकात सविस्तर मांडला आहे…
“भीक नका देऊ… एखाद्याला पायावर उभं राहण्यासाठी मदत करा… ” हे मी विविध स्तरावर जीव तोडून सांगितलं आहे, तरी आपल्यासारखे काही संवेदनशील लोक सोडुन इतरांना या विषयाशी काहीही घेणं देणं नाही… !
तर या दोन समस्यांची सांगड एकत्र कशी घालता येईल याचा विचार करत होतो… !
भीक मागणाऱ्या लोकांची खूप मोठी ताकद आज माझ्या मागे उभी आहे…. या सेनेचा सेनापती म्हणून कसा वापर करून घेऊ ? हा सतत विचार मी करत असतो….
रस्त्यात जाताना कितीतरी वेळा आपल्याला पाईपलाईन फुटलेली दिसते, आकाशाकडे हे पाणी उंच उसळी घेत असतं…. त्याचा फोर्स खूप जास्त असतो….. म्हणजे फुटून बाहेर पडणाऱ्या या पाण्याला सुद्धा आकाशात उंच भरारी घ्यायची आहे, त्याच्यात तितकी धम्मक आहे, परंतु योग्य वेळी योग्य साथ मिळत नाही… म्हणुन मग ते पाणी निपचितपणे गुपचूप जमिनीवर पडतं आणि शेवटी एखाद्या गटारात वाहत जातं… आणि मग गटारातलं पाणी म्हणून पुढे कधीही याचा उपयोग होत नाही…. !
हाच संबंध मी भीक मागणाऱ्या लोकांशीही जोडतो…
त्यांच्याकडे असणारी ताकद अशीच अफाट आहे… त्यांच्यातही खूप मोठा फोर्स आहे…. त्यांनाही आभाळात उंच भरारी घ्यायची आहे; परंतु योग्य वेळी योग्य ती साथ मिळत नाही… शेवटी थकून ते सुद्धा निपचितपणे गुपचूप जमिनीवर पडतात… पुढे एखाद्या गटारात सापडतात…. आणि मग “भिकारी”असं हिनवून, त्यांच्यावर शिक्का मारून, त्यांनाही कधीही माणसात आणलं जात नाही…. !
भीक मागणाऱ्या माझ्या लोकांमध्ये असलेल्या इतक्या मोठ्या ताकदीला, सेनापती म्हणून आवरण्यास… सांभाळण्यास… वळण लावण्यास… बऱ्याच वेळा मी कमी पडतो… बऱ्याच वेळा मला अपराधी वाटतं…. !
निसर्गाने या समाजाच्या देखभालीसाठी माझी निवड केली, परंतु मी खरंच तितका सक्षम आहे का ? या विचाराने काही वेळा मी खचून जातो…. !
खूप वेळा मी परिस्थिती समोर गुडघे टेकतो… खाली मान घालतो… पण खाली मान घालून सुद्धा विचारच करत असतो; की मला यांच्यासाठी अजून काय करता येईल ???
कित्येक लोक मला म्हणतात, ‘डॉक्टर, तुम्ही किती सुखी आहात… तुम्हाला किती सुखात झोप लागत असेल…. ‘
पण मला झोपच लागत नाही; ही वस्तुस्थिती आहे… अजून काय करता येईल ? काय करता येईल ?? काय करता येईल??? – हा इतकासा किडा रोज रात्री मला चावत असतो… मग माझी झोप उडून जाते, मी घड्याळाकडे कुस बदलत येड्यासारखा पहात राहतो…. बारा वाजतात, मग दोन वाजतात, चार वाजतात, पुढे सहा सुद्धा वाजतात… घड्याळाचा काटा शांतपणे फिरतच असतो… तो मला चिडवत असतो… आणि हे कमी म्हणून की काय अलार्म वाजतो…. उठ रे बाबा…. !
उठायला मी झोपलोच कुठे आहे मित्रा…. ? पण कोणाला सांगू ?
रात्रीच्या त्या अंधारात आम्ही दोघेच जागे असतो….
एक तो घड्याळाचा काटा आणि दुसरे माझे विचार… !
तो शांतपणे फिरत असतो…. आणि मी सैरभैर… !
याच सैरभैर विचार मंथनातून, एक संकल्पना माझ्या डोक्यात परवा मध्यरात्री जन्माला आली…
मला नाही वाटत, या अगोदर संपूर्ण जगामध्ये अशी काही संकल्पना राबवली गेली असेल… !
संकल्पना सांगतो थांबा…. त्या अगोदर थोडी पार्श्वभूमी सांगावी लागेल….
मी मूळचा साताऱ्याचा, परंतु आख्ख आयुष्य पुण्यात गेलं… मग वाण नाही तर गुण लागणारच की…. !
माझ्या या पुण्यानं मला खूप काही दिलं…. त्याबरोबर टोमणे मारायला सुद्धा मला शिकवलं…
त्या अर्थाने “पुणेरी माणूस” माझा गुरु आहे… !
म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी माझ्या घरात बसून एक फूल, सर्व अस्सल पुणेरी माणसांना नेहमीच समर्पित करतो… (हो एकच फूल मिळेल… आमच्या बागेतली सर्व फुलं तुम्हाला वहायला, आम्ही काय कुठचे जहागीरदार नाही किंवा कुठल्या संस्थानचे संस्थानिक सुद्धा नाही… शिवाय तुम्ही काय आमचे जावई नाहीत किंवा व्याही सुद्धा नाहीत… तेंव्हा एक फूल घ्यायचं तर मानानं घ्या, नाहीतर तेही आम्ही परत काढून घेऊ… )
तर हा असा आहे पुणेरी टोमण्यांचा झटका… !
टोचत नाही…. बोचत नाही…. पण विषय हृदयापर्यंत भिडतो थेट…. !!!
आता वर जाऊन कंसातील वरील वाक्य परत वाचा…. वाचताना मनातल्या मनात नाकातून वाचावे, म्हणजे “कोंकणी” हापूस आंब्याचा खरा स्वाद येईल….
ओके… वर जाऊन, नाकातून वाचून…. परत खाली आला असाल, तर आता संकल्पना सांगतो…
ती मात्र नाकातून वाचायची नाही…
१. तर, अशाच पुणेरी टोमण्यांचा वापर करून मी काही बोर्ड तयार करणार आहे…. !
“प्लास्टिक पिशव्या वापरणे सोडून द्या आणि कापडी पिशव्या आमच्याकडून घ्या…. किंमत तुम्ही ठरवाल ती…. ” अशा अर्थाचे बोर्ड तयार करून घेणार आहे, अर्थात पुणेरी स्टाईलनेच, टोमण्यांच्या स्वादासह…. !
२. पूर्वी भीक मागणाऱ्या लोकांना आपण नवीन शिलाई मशीन घेऊन दिली आहे अशा, सुरुवातीला किमान चार लोकांना पिशव्या शिवायला लावायच्या. त्यांना पिशव्या शिवता येईल अशा प्रकारचे कापड आपणच द्यायचे, एक पिशवी शिवल्यानंतर त्याचे पाच रुपये त्यांना द्यायचे. (दिवसातून शंभर पिशव्या त्यांनी शिवल्या तर त्यांना पाचशे रुपये मिळतील)
३. शिवलेल्या पिशव्या यानंतर पाच ते सहा भीक मागणाऱ्या इतर लोकांना देऊन; तयार केलेल्या “पुणेरी टोमण्यांच्या पाट्या” त्यांच्या गळ्यात आणि पाठीवर अडकवायच्या….
☆ पठाण, गुलाम आणि सम्राज्ञी…☆ श्री संभाजी बबन गायके☆
चित्रपट संगीत श्रोत्यांच्या डोईवरचं ‘पठाणी’ कर्ज आणि आपल्याला स्वर‘सम्राज्ञी’ देणारा ‘गुलाम’!
संगीतातील ताल स्वरगंगेच्या प्रवाहावर स्वार होऊन स्वत:ला व्यक्त करीत राहतो. जाणकार म्हणतात की, ताल म्हणजे काल, मार्ग, क्रिया, अंग, ग्रह, जाती, कला, लय, यती व प्रस्तार अशा दहा प्राणांनी व्याप्तमान ठेका होय. आपल्या भारतीय शास्त्रीय संगीत मूळ बारा स्वरांच्या अंगाखांद्यावर क्रीडा करीत असते. परंतू प्रत्यक्षात आपल्या कर्णपटलांना अलगद स्पर्शून जाणिवेच्या पृष्ठभागास श्रवणाची अनुभूती देणारे नाद एकूण बावीस आहेत, असं म्हणतात. सर्वपरिचित सारेगमपधनी हे सप्तशुद्ध आणि रे, ग, ध, नी हे कोमल स्वर आणि तीव्र स्वर म्हणजे म! पण या द्वादश-स्वरांच्या अंतरंगात आणखी खोलवर बारा स्वरकमलं असतात. स्वरांच्या या खोल डोहात सहजी ठाव घेऊन पुन्हा श्वास राखून गाण्याच्या पृष्ठभागावर येणं फक्त एकाच मानवी कंठाला शक्य झालं… तो कंठ म्हणजे लता मंगेशकर यांचा कोकिळकंठ! लता शब्द उलट्या क्रमानं म्हणला तर ताल बनून सामोरा येतो !
हा ताल आणि ही स्वरलता रसिकांच्या हृदयउपवनातील एखाद्या डेरेदार वृक्षाला कवेत घेऊन आभाळापर्यंत पोहोचली असतीच केव्हा न केव्हा तरी. जसे कृष्णपरमात्मा धर्मसंस्थापनार्थाय कुणाच्या न कुणाच्या पोटी जन्मायचेच होते….. देवकी निमित्त्त झाल्या आणि यशोदा पालनकर्त्या !
विपरीत कौटुंबिक परिस्थितीमुळे लतादीदींना मुंबईत येणं भाग पडलं. आणि मनाविरुद्ध अभिनय करावा लागला. मनात गाणं असतानाही पोटातलं भुकेचं गाणं वरच्या पट्टीतलं होतं… त्यामुळे वीजेच्या प्रखर दिव्यांसमोर उभं राहून खोटं खोटं हसावं लागलं, रडावं लागलं आणि दुस-यांच्या स्वरांवर ओठ हलवत गावंही लागलं. पण हे सुद्धा मागे पडलं. रोजगारासाठी काहीतरी करणं भाग होतं आणि एकेदिवशी एका स्नेह्यांच्या पुढाकारानं गाण्याची संधी मिळाली. वसंत जोगळेकरांच्या ‘आप की सेवा में’ या हिंदी चित्रपटात दीदींना ‘पा लागू… कर जोरी…. कान्हा मो से ना खेलो होरी’ गायलं. हे त्यांचं पहिलं ध्वनिमुद्रीत हिंदी चित्रपट गीत. , वर्ष होतं १९४६. बडी मां या चित्रपटातही एक गाणं मिळालं होतं ‘मां तेरे चरनों में’! आणि पुढे सुभद्रा या चित्रपटातही एक भजन मिळालं होतं. पण या कामगिरीचा प्रभाव त्यावेळच्या हिंदी चित्रपट सृष्टीवर फारसा पडला नव्हता.. लता नक्षत्र अजून ठळकपणे उदयास यायला अवकाश होता. पुढे ज्या लव इज ब्लाईंड या हिंदी चित्रपटासाठी गाणी गायली तो चित्रपटच पूर्ण होऊ शकला नाही. हा इंग्लिश नावाचा हिंदी चित्रपट कायमचे डोळे मिटून बसला. त्यामुळे या चित्रपटासाठी ध्वनिमुद्रीत झालेली गाणी मूक झाली. पण याच वेळी एका पठाणाच्या कानांनी हा आवाज मनात साठवून ठेवला. या पठाणाच्या मूळ नावाचा शोध काही केल्या लागत नाही. खरं तर चित्रपटांसाठी मामुली भूमिका करणारे लोक (एक्स्ट्रा कलाकार) निर्मात्यांना पुरवणारा हा माणूस. पण त्याला संगीताचा कान असावा, हे विशेष आणि आपल्यासाठी आनंददायी ठरले. या माणसाने मास्टर गुलाम हैदर अली यांच्याकडे त्यावेळी केवळ अठरा वर्षे वय असलेल्या या कोवळ्या आवाजाची महती गायिली. गुलाम हैदर हे पाकिस्तानातून भारतात आले होते तेच मूळी संगीतकार म्हणून कारकीर्द करायला. आणि संगीत दिग्दर्शक म्हणून तर ते अतिशय उजवे होतेच. परंतू यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे नव्या आवाजांना संधी देणे. शमशाद बेगम, सुधा मल्होत्रा, सुरींदर कौर या गायिका मास्टर गुलाम हैदर यांनीच रसिकांसमोर आणल्या. आता त्यांच्या हातून एक अलौकिक रत्न चित्रपट-संगीत क्षेत्राला सोपवले जाणार होते…. लता मंगेशकर!
मास्टरजींनी लतादीदींना भेटीस बोलावण्याचा निरोप याच पठाण दादाच्या हाती धाडला. दीदींना त्यांना त्यांचेच एक गाणे ऐकवले… त्यांनी आणखी एक गाणे गा असा आग्रह धरला आणि मास्टर हरखून गेले. मात्र दीदींनी त्या ध्वनिमुद्रिकांत गायलेल्या गायिकांच्या आवाजाची नक्कल करीत ती गाणी हुबहू गायली होती. त्यांनी लतादीदींचा आवाज ध्वनिमुद्रीत केला आणि ते दीदींना घेऊन ताबडतोब दीदींना शशधर मुखर्जी या निर्मात्याकडे नेले. मुखर्जींनी लतांचे ध्वनिमुद्रीत गाणे ऐकले. मूळातच अतिशय कोवळा आणि विशिष्ट पातळीवर लीलया जाणारा आवाज, त्यात कोवळे वय. शशधर मुखर्जींच्या चित्रपटातील नायिका कामिनी कौशल वयाने लतादीदींपेक्षा मोठी होती आणि त्यामुळे हा पातळ आवाज त्या नायिकेला शोभणार नाही अशा अर्थाने त्यांनी यह आवाज नहीं चलेगी! असं म्हटलं असं म्हणतात. यात नायिकेसाठी हा आवाज चालणार नाही असं त्यांना म्हणायचं असावं! आणि ते खरेच होतं. कारण पुढे याच शशधर मुखर्जी यांनी अनारकली आणि नागिन या चित्रपटांसाठी दीदींकडून काही गाणी गाऊन घेतली!
परंतू यह आवाज नहीं चलेगी असं ऐकल्यावर मास्टर गुलाम हैदर रागावले. त्यांनी काहीशा तिरीमिरीनेच दीदींना स्वत:सोबत यायला सांगितले. एका स्टुडिओमध्ये एका चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं आणि त्या चित्रपटासाठी एक गाणं हवं होतं स्त्री गायिकेचं. दीदी आणि मास्टरजी रेल्वे स्टेशनवर पोहोचले. मास्टर्जींनी खिशातून ५५५ ब्रॅन्डचं सिगारेटचं पाकीट काढलं आणि त्यावर ठेका धरला. आणि दीदींना गाण्याचा मुखडा सांगितला… दिल मेरा तोडा…. हाय… मुझे कहीं का न छोडा! मुखर्जींनी बहुदा गुलाम हैदर यांचं दिल फारच जोरात तोडलं असावं! मग त्यांनीही जिद्दीनं जगाला कहीं का सोडलं नाही! रेल्वेगाड्यांच्या, प्रवाशांच्या, विक्रेत्यांच्या गदारोळात एक भावी गानसम्राज्ञी गात होती! मास्टर गुलाम हैदर त्यांनी त्याच दिवशी दीदींकडून काही गाणी गाऊन घेतली. चित्रपटाचं नाव होतं मजबुर (1948). मुन्नवर सुलताना नावाची अभिनेत्री या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होती. आणि तिच्यासाठी शमशाद बेगम किंवा नूरजहां यांचा आवाज मास्टर गुलाम हैदर वापरतील असा सर्वांचा होरा होता. परंतु त्यांनी तर लता मंगेशकर नावाच्या नव्या मुलीला हे गाणं देऊ केलं होतं. त्यामुळे निर्माते नाराज झाले होते. यावर मास्टरजींना अतिशय राग आला. आधीच शशधर यांनी नकारघंटा वाजवून मास्टरजींच्या पारखी नजरेवर प्रश्नचिन्ह उमटवलं होतंच! त्यांनी मी हा चित्रपट करणारच नाही असं सांगितलं आणि आपल्या साहाय्यकाला निर्मात्यांचे पैसे परत देण्यास फर्मावले. आणि त्याला त्यांना हे ही बजावून सांगायला सांगितलं की ही छोटी मुलगी पुढे गानसम्राज्ञी होईल हे लक्षात ठेवा! पण सुदैवाने निर्मात्यांनी गुलाम हैदर यांचे म्हणणे मान्य केले. आणि मजबूर ची गाणी लतादीदींना मिळाली. मास्टर गुलाम हैदर अतिशय कडक शिस्तीचे संगीतकार होते.. त्यांनी लतादीदींकडून अतिशय मेहनत करून घेतली. मास्टरजींकडे दीदींचं पहिलं गाणं जे ध्वनिमुद्रीत झालं ते मुकेश यांच्यासह गायलेलं होतं…. अब डरने की कोई बात नहीं… अंग्रेजी छोरा चला गया!
आता दीदींना आपला स्वत:चा आवाज गवसला होता. दिल मेरे तोडा या गाण्याच्या ध्वनिमुद्रणानंतर मास्टर गुलाम हैदर यांनी लतादीदींना सांगितलं… लोक नूरजहांला सुद्धा विसरून जातील तुझं गाणं ऐकल्यावर! मास्टरजींची भविष्यवाणी पुढे अक्षरश: प्रत्यक्षात उतरली हा इतिहास आहे. चित्रपट संगीताच्या राज्याची अनभिषिक्त सम्राज्ञी यशस्वीपणे जगापुढे आणण्याचं भाग्य लाभलेल्या या श्रेष्ठ संगीतकाराचं नाव गुलाम असावं हा योगायोग. आणि यांची भेट घडवून आणण्यात लोकांना व्याजानं पैसे देऊन ते दामदुप्पट वसूल करणा-या एका पठाणाची भूमिका असावी.. हा ही योगायोगच. या अर्थाने या पठाणाचे कर्ज रसिकांच्या माथी आहेच आणि ते कधीही फिटणार नाही! आणि मास्टर गुलाम हैदर… या गुलाम नावाच्या माणसाने आपल्याला गाण्याची राणी नव्हे सम्राज्ञी दिली हे ही खरेच. गुलाम या नावाचा अर्थ केवळ नोकर, सेवक, दास असा नसून स्वर्गातील देखणे, तरूण सेवेकरी असाही होतो! आपल्या चित्रपट संगीताच्या बाबतीत या गुलामाने मोठीच सेवा केली असं म्हणायला काही हरकत नाही, असं वाटतं. दस्तुरखुद्द लता दीदींनीच मास्टर गुलाम हैदर यांना त्यांचा ‘गॉडफादर’ म्हटलं आहे! मास्टर गुलाम हैदर नंतर पाकिस्तानात परतले. त्यांच्या पत्नीला लतादीदी मां जी म्हणून संबोधत आणि त्यांच्या मुलांना भाऊ मानत. मास्टरजी खूप आजारी पडले होते तेंव्हा त्यांना दीदींना भारतात उपचारांसाठी येण्याची विनंतीही केली होती आणि सर्व खर्चही करण्याची तयारी दाखवली होती.
लतादीदींबद्दल आणखी दोन तीन लेख होतील एवढं डोक्यात आहे. आपली पसंती समजली तर लिहावं असा विचार आहे.
एकदा एक गाढवाने वाघाला म्हटलं; “कसलं निळंशार गवत आहे बघ.”
वाघ म्हणाला; ” निळं गवत? उगाच काहीही काय सांगतो रे? गवत हिरवं असतं. हेही तसंच हिरवं आहे की.”
“अरे बाबा निळंच आहे हे गवत. तुझे डोळे खराब झाले आहेत.” असं म्हणून गाढवाने “वाघाचे डोळे खराब झाले आहेत” म्हणून सगळीकडे आरडाओरडा सुरू केला.
यामुळे वैतागलेला वाघ सिंहाकडे गाढवाची तक्रार घेऊन गेला. पूर्ण प्रकरण सांगितल्यावर वाघ म्हणाला;
“महाराज; गवत हिरवं असूनही गाढव मला मात्र निळंच असल्याचं सांगत राहिला. आणि बाकीच्या लोकांना पूर्ण प्रकरणही न सांगताच थेट माझे डोळे खराब आहेत म्हणून खुशाल माझी बदनामी करत सुटलाय. याला शिक्षा करा महाराज.”
सिंहाने बाजूला पडलेल्या हिरव्यागार गवताच्या गंजीकडे शांतपणे पाहिलं आणि वाघाला चार चाबकाचे फटके मारायची शिक्षा सुनावली आणि गाढवाला सोडून दिलं !
या निर्णयामुळे हैराण झालेल्या वाघाने सिंहाला शिक्षेबद्दल विचारलं.
” महाराज; इतकं हिरवंगार गवत समोर दिसत असूनही तुम्ही त्याला सोडलं आणि मलाच उलट शिक्षा? असं का महाराज?”
सिंह म्हणाला; ” शिक्षेचं गवताच्या रंगाशी काही देणंघेणं नाहीये. ते हिरवंच आहे; हे तुला मलाच काय .. सगळ्या जगाला माहिती आहे. पण तू वाघ असूनही एका गाढवाशी वाद घालत बसलास यासाठी तुला शिक्षा दिली आहे “
आपल्या आयुष्यात; त्यातही विशेषत: सोशल मीडियावर कोणाशी वाद घालत बसायचं याचा निर्णय नीट घेत चला ! सुप्रभात !!
☆
लेखक – वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति
प्रस्तुती : उज्ज्वला केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈