आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सुश्री कुंदा कुलकर्णी यांना मराठी साहित्य मंडळ, ठाणे यांच्यातर्फे, साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा राज्यस्तरीय “सावित्रीबाई फुले साहित्य भूषण” हा मानाचा व अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या “ भगवान वेदव्यास “ या उत्कृष्ट माहितीपूर्ण पुस्तकासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.
“ भगवान वेदव्यास “ यांचे जीवनकार्य या पुस्तकरूपाने लोकांना माहिती करून द्यावेसे का वाटले – याबाबतचे लेखिकेचे मनोगत आपण याआधी वाचलेलेच आहे. आता या पुरस्काराने हे पुस्तक सन्मानार्थ ठरले आहे ही गोष्ट खरोखरच खूप अभिमानास्पद आहे.
या निमित्ताने लेखिकेने वेदव्यासांविषयी दिलेली थोडी माहिती वाचू या —
व्यासोऽच्छिष्टं जगत्सर्वम्.
“असा एकही विषय नाही की ज्याला महर्षी व्यासांनी स्पर्श केला नाही. ते अत्यंत ज्ञानी होते. मला लहानपणापासून अनेक ग्रंथ ,पोथ्या, पुराणे वाचायला मिळाली. प्रत्येक अध्यायाचे शेवटी “इति श्री वेदव्यासविरचितम्” असे असायचे किंवा सुरुवातीला “व्यास उवाच” असे असायचे. त्यामुळे व्यासांविषयी प्रचंड उत्कंठा होती. मध्यंतरी नैमिषारण्य यात्रा घडली. तिथे व्यास गद्दी आहे. ज्या आसनावर बसून महर्षी व्यासांनी वेद, पुराणे, महाभारत, भागवत कथन केले ते आसन आणि त्यावर बसलेली त्यांची पूज्य मूर्ती पाहताच आपोआप हात जोडले गेले आणि अक्षरश: डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला. तिथून आल्यानंतर अधाशासारखे त्यांच्याबद्दल मिळेल तिथून माहिती काढली. अनेक हात मदतीला आले. अनेक संदर्भ ग्रंथ मिळाले. आणि “भगवान वेदव्यास “या पुस्तकाचे प्रकाशन 19 मे २०२२ रोजी झाले. खूप मागणी आली. या विषयावर अनेक व्याख्याने पण झाली. आणि 19 मे 23 रोजी मला या पुस्तकाबद्दल पुरस्कार मिळाला ही व्यासांचीच कृपा. वेदव्यासांबद्दल खूप माहिती या पुस्तकात आहे. कुणाला हवे असल्यास मला पर्सनल वर कॉन्टॅक्ट करावा ही विनंती.” — सौ. कुंदा कुलकर्णी
💐ई – अभिव्यक्तितर्फे लेखिका सुश्री कुंदा कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.💐
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ दिलो दिमाग की बात है… डाॅ.राजेंद्र बर्वे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆
हिंदी सिनेमातला तद्दन फिल्मीपणा सोडला, कमालीची भावविवशता सोडली ,तर खरं म्हणजे खूप काही ऐकण्यासारखं व क्वचित पाहण्यासारखं असतं.अखेर, दौलत- इज्जत, खानदान की आबरु, जमीन जायदाद यांपेक्षा मोहब्बत, प्यार आणि इश्क नक्कीच श्रेष्ठ असतं.माणसांना जोडणाऱ्या या प्यारच्या पुलाची भिस्त असते हृदयावर आणि कमानीअसतात त्यागाच्या! पण या ‘प्यार’चा डोस जरा अति आणि नाटकी होतो व तो विश्वासार्ह वाटेल अशा रीतीने पेश केला जात नाही, एवढाच त्यातला दोष. अमेरिकेत ‘इमोशनल इंटेलिजन्स’ या संकल्पनेनं धुमाकूळ घालण्यापूर्वीच हिंदी सिनेमाच्या संवाद लेखकांनी दिल आणि दिमाग यातील फरक पचनी पाडला होता. दिल क्या चाहता है और दिमाग क्या सोचता है, अशा टाईपचे संवाद नेहमी ऐकायला मिळतील. विशेषतः शम्मी कपूर आणि दिलीप कुमारच्या सिनेमात.
गोष्ट साधी आहे. दिल म्हणजे जजबात म्हणजेच भावना. भावना म्हणजे तरल संवेदना. कधी हलक्या कधी जजबात का तुफान किंवा सैलाब .तर दिमाग म्हणजे बुद्धीचातुर्य, तर्कनिष्ठ विचार, परिस्थितीचं सुसंगत, सुसूत्रित विश्लेषण व त्यानुसार काढलेले अनुमान आणि घेतलेले निर्णय.
दिल की बाते दिल ही जाने…. भावनांच्या मागे तसं लॉजिक नसतं. सिर्फ एहसास है ये, जो ‘रुह’नेच मेहसूस करायचा असतो. भावना समजून घ्यायच्या, त्या तशा का? असा विचार करायचा नाही. तशा असतात झालं! त्याच्याशी युक्तिवाद न करता त्यांच्याशी एकरूप व्हायचं.
दिल व दिमाग यातील फरक विशेषत: आपण व दुसरे यांच्याबाबत लक्षात घ्यायला हवा.
दुसऱ्याचा विचार करताना आपला दिमाग वापरायचा नाही; दिल वापरायचं. दुसऱ्या व्यक्तीशी संवाद करताना त्याच्या भावना जाणून घ्यायच्या. त्या व्यक्तीबरोबर सहानुभूतीनं (एम्पथी) वागायचं!
स्वतःचा विचार करताना मात्र दिलाऐवजी दिमाग वापरायचा. स्वतःविषयी निर्णय घेताना दिल के बजाय दिमागपर जोर दो बरखुरदार!
आपण प्रत्यक्षात नेमकं उलटं करतो. आपल्याला वाटतं दुसऱ्यानं दिमाग लढवावा आणि आपल्या दिलाला आपण कुरवाळावं!
** समाप्त**
लेखक डॉ.राजेंद्र बर्वे
संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ देणाऱ्याने देत जावे…– भाग- २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆
(“सगळ्यांना मदत करायला आपण काही धनाढ्य लागून गेलो नाही. जग हे या कवींच्यामुळे चालत नाही. माणूस थोडा व्यवहारीदेखील असावा लागतो.” असं बडबडत सुजाता आत गेली.) इथून पुढे —-
दुसऱ्या दिवशी संध्याकाळचे साडेसात वाजायला आले. जावेदचा पत्ता नव्हता. सतीशने जावेदला फोन लावला. त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. जावेद कुठं राहतो हेही माहीत नव्हते.
सतीशला आता काळजी वाटायला लागली. पैसे गेल्याचे दु:ख नव्हते. देवाच्या कृपेने आजही तो काहीतरी मिळवतोच आहे. माणुसकीवरचा आपला विश्वास उडायला नको असं सतीशला मनोमन वाटत होतं. जावेदने शब्द पाळला नाही तर ‘सतीश फसवला गेला’ हा शिक्का कायमचा बसला असता, तो त्याला नको होता. यापुढे कुणा गरजू माणसाला मदत करताना आपला हात आखडता घ्यावा लागेल म्हणून सतीशला खरी धास्ती वाटत होत
सुजाता दार उघडं ठेवून शेजारच्या काकूंना सांगत होती, “कालच मी ह्याना म्हटलं होतं की तो परत फिरकणार नाही म्हणून. अख्खी दुनिया बदलली तरी आमचे हे अजून तसेच आहेत. कुणी न कुणी यांच्या हळवेपणाचा फायदा घेत असतो आणि हे फसत जातात. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ म्हणतात. भले तुम्ही लोकांच्या अनुभवातून शिकू नका. अमुक रस्त्यावरून जाताना कधीतरी ठेच लागली होती हे तरी माणसानं विसरू नये. लोकांना मदत करण्याच्या भानगडीत कशाला पडावं? .. मागे ती कोण एक इन्वेस्टर बॅंकर आली. फारच गयावया करत होती म्हणून ह्यांनी तिला वीस हजार रूपये दिले. तिने महिन्याअखेरचा चेक दिला. महिन्याअखेरीस तिनं दहा हजार रूपये यांच्याकडे जमा करून चेक लावू नका असं सांगितलं. उरलेले दहा हजार रूपये द्यायला तिने तीन महिने लावले…..आम्ही मध्यंतरी तिरूपतीला गेलो होतो. हॉटेलातून आम्ही बाहेर पडताच एक केविलवाणं जोडपं, छोटीशी मुलगी आणि आजी यांच्यासमोर हात जोडून उभे. ‘सर आमचा खिसा कापला गेला आहे. आमच्या परतीच्या प्रवासासाठी कृपा करून पाचशे रूपयाची तरी मदत करा. तुमच्या पत्त्यावर पैसे पाठवतो.’ अशी विनवणी करीत होते. ‘आता एनीव्हेअर बॅंकिग आहे. तुमच्या नातेवाईकाकडून पैसे मागवून घ्या ‘ म्हणून सांगायचं ना? पण नाही, यांनी लगेच खिशातून शंभरच्या दोन नोटा काढून दिल्या. बाकीची व्यवस्था करून घ्या म्हणून पुढं निघाले. उलट मलाच म्हणत होते, ‘अग वेंकटेशाच्या हुंडीत दोनशे रूपये अधिक टाकले असे समज.” तिची टकळी सुरूच होती.
सतीश खिन्न मनाने डोळे मिटून आरामखुर्चीत विसावला. थोड्याच वेळात सुजाता आली आणि शांतपणे म्हणाली, “चला, साहेब आता विसरा सगळं, जेवून घ्या पाहू.”
सतीश जेवायला बसला खरा. त्याचं जेवणात लक्ष नव्हतं. ‘ इतक्या वर्षाच्या नोकरीत मला माणसं ओळखता आली नाहीत की काय? कितीतरी लोकांना लहानसहान कर्जे दिली. एकाही खातेदारानं कधी फसवलं नव्हतं. अमुक व्यक्ति व्यसनी आहे त्याला कर्ज देऊ नका असं गावकऱ्यांनी पूर्वसूचना दिली असताना देखील मी त्या व्यक्तिला कर्ज दिलं होतं. त्याला मी सांगितलं होतं की, ‘तुम्ही व्यसनी आहात अशी माहिती मिळाली असतानाही मी तुम्हाला हे कर्ज देतोय. गावकऱ्यांना खोटं ठरवायचं काम आता तुमच्या हातात आहे.’ त्या पठ्ठ्याने कर्जाचे हप्ते नियमितपणे फेडून माझा माणुसकीवरचा विश्वास खरा ठरवला होता.’ या विचारातच दोन घास गिळून सतीश ताटावरून उठला.
पायात चपला सरकवून सतीश तडक एटीएम बूथवर गेला. पाच हजार रूपये खिशात कोंबून त्यानं गुपचूप घरात पाऊल टाकलं.
“पैसे काढायला एटीएमला गेला होतात ना?” सुजाताने तोफ डागली.
सतीशला क्षणभर काय बोलावं, कळलं नाही. सतीशच्या मनात काय चाललेलं असतं हे तिला नेमकं कळतं, हा अनुभव सतीशने आजवर कित्येकदा अनुभवला होता. आता एटीएमला जाऊन पैसे काढायची गोष्ट म्हणजे हद्दच झाली होती. तो दिंग्मूढ होऊन पहात राहिला.
“अहो, आपल्या शंभूने तुम्हाला एटीएम बूथमध्ये शिरताना पाहिलं होतं म्हणून मला म्हटलं. काय गरज होती पैसे काढायची?” सुजाता म्हणाली.
सतीश न डगमगता म्हणाला, “हो गेलो होतो पैसे काढायला. अडीअडचणीला कामाला यावेत म्हणून घरात ठेवलेले पैसे मी जावेदला दिले होते. ते पैसे परत आणून ठेवावेत म्हणून…” गंभीर मुद्रा करून सतीश सोफ्यावर बसला.
अचानक कौन बनेगा करोडपतीतल्या अमिताभ बच्चनच्या स्टाईलमध्ये हात वर उंचावून सुजाता उच्च स्वरात गरजत म्हणाली, ‘आप सही हो, सतीशबाबू. आप जीत गए.’ सुजातानं सतीशच्या हातात पांच हजार ठेवताच चिरंजीव शंभू टाळ्या वाजवत खळखळून हसत होते.
“अहो, तुम्ही बाहेर पडलात तितक्यात जावेद आला अन पैसे देऊन गेला. किल्ल्या अडकवण्यासाठी तुम्ही एक बोर्ड सांगितलं होतंत म्हणे, ते ही तो देऊन गेला.”
सतीश बोर्डाचं काहीच बोलला नव्हता. जावेदनं दाखवलेलं ते कृतज्ञतेचं एक द्योतक होतं. सतीश मनोमन खूश झाला. त्याचा विश्वासावरचा विश्वास आणखी पक्का झाला.
तितक्यात दारावरची बेल वाजली. शेजारचे प्रभाकरपंत आत आले. चौफेर नजर टाकत ते म्हणाले, “तुमच्याकडचं फर्निचर चांगलं झालं आहे असं ऐकलंय. खरंच, खूपच छान. मला त्या सुताराचा फोन नंबर द्याल काय?”
सतीश गप्पच होता. मघाशी जावेदचा मोबाईल नंबर स्वीच्ड ऑफ आला होता. सुजाता जावेदचं नवं कार्ड त्यांच्या हातात देत म्हणाली, “ लिहून घ्या हा त्याचा नवा नंबर. आणि हो त्याला काम देताना तुमच्या जबाबदारीवर द्या बरं का, आमच्या विश्वासावर देऊ नका.”
प्रभाकरपंत निघता निघता म्हणाले, “अहो वहिनी, विश्वास म्हणजे दोन व्यक्तीमधलं ते एक अलिखित नातं असतं. कित्येक वेळेला विश्वासाला तडा बसतो, नाही म्हणत नाही. परंतु एकमेकांवरील विश्वासाशिवाय कुणाचंच पान हलत नाही. खरं तर विश्वासावरच जग चालतं.”
ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध दशमी पर्यंत गंङ्गा नदीचा जो उत्सव करतात, त्याला दशहरा किंवा गङ्गोत्सव म्हणतात.
भगीरथांच्या प्रदीर्घ प्रयत्नांती , ज्येष्ठ शुद्ध दशमीस, मंगळवारी, हस्त नक्षत्रावर गङ्गा नदीचे पृथ्वीवर अवतरण झाले.
या १० दिवसांमधील, गङ्गा- स्नानाच्या योगाने 10 पातकांचे, रोज एक याप्रमाणे क्षालन होते, म्हणून याला “दश-हरा” म्हणतात.
यालाच “गङ्गावतरण” असेही म्हणतात. गङ्गेचे अवतरण, हिंदू लोक, हा “दशहरा-काल” एक सण म्हणून साजरा करतात. गङ्गेचे, स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले. हा सण दहा दिवस साजरा केला जातो. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी.
माँ गङ्गा नदीला, संपूर्ण विश्वात सर्वात पवित्र नदी मानले जाते.
सर्व नद्यांचे , मनुष्य जातीवर खूपच उपकार आहेत. सर्व नद्या पवित्र व साक्षात जलदेवता आहेत. त्यांचे प्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी, नद्यांची पूजा केली जाते.
गङ्गा नदीने आपल्या पिताश्रींना, म्हणजे श्री शिवजींना विचारले, की सर्व लोक माझ्या मध्ये येऊन स्नान करून आपली पापे धुवून टाकतात. माझ्याकडे, साठलेल्या या सर्व पापांचे, निर्मूलन करण्यासाठी, मी काय करू? तेव्हा श्रीशिवजींनी सांगितले, की तू श्रीनर्मदा- मैया मध्ये जाऊन स्नान कर. व त्यायोगे, तू , स्वतःला शुद्ध करून घेऊ शकशील; कारण श्रीनर्ममदा ही स्वतःच पापनाशिनी आहे. त्यामुळेच या दशहराच्या कालखंडात श्री नर्मदा मैया मध्ये स्नान केल्यामुळे गङ्गास्नानाचेही पुण्य लाभते.
काही ऋषींनी असेही पाहिले आहे की, श्री श्रीगङ्गा- मैय्या ही काळ्या गाईच्या रुपाने, श्री नर्मदा मैया मध्ये स्नानासाठी येते व परत जाताना ती शुभ्र रंगाची होऊन जाते. म्हणून या गङ्गा दशहराच्या काळात, गङ्गामैया, नर्मदा मैया किंवा त्यांच्या किनारी जाणे शक्य नसेल, तर कोणत्याही नदीमध्ये त्या दोघींचे नाव घेऊन स्वतःच्या पापनाशनासाठी स्नान करावे. पुण्यशालिनी अशा सप्त नद्यांचे स्मरण करावे.
आपल्या निवासाच्या ठिकाणी जी नदी आहे, तिचेसुद्धा आपल्यावर खूप मोठे ऋण असते. तिची पूजा करावी. मैय्याला खस (वाळा), कापूर, सुगंधी द्रव्ये अर्पण करावीत. ओटी भरावी. नैवेद्य दाखवावा. ऋतुकालोद्भव अंबा अर्पण करावा. मैय्याला भरवावे. काठावर दिवे लावावे. त्यांची स्तोत्रे म्हणावीत.
गावातील सांडपाणी नदीत जाणार नाही यासाठी प्रयत्न करावेत.
आद्य श्री शंकराचार्यांनी गङ्गाष्टक, गङ्गा स्तोत्र, यमुनाष्टक, नर्मदाष्टक, मणिकर्णिकाष्टक अशा स्तोत्रांची रचना केलेली आहे. नद्यांवरती इतरही बरीच काही स्तोत्रे आहेत. त्यांचे पठण करावे. श्री जगन्नाथ पंडित यांनी गङ्गालहरी स्तोत्र याची सुंदर रचना केलेली आहे. श्री शंकराचार्य व श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी नर्मदा लहरींची रचना केलेली आहे. श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी कृष्णा लहरींची पण रचना केलेली आहे. या स्तोत्रांमध्ये या नद्यांची स्तुती केलेली आहे, महती सांगितलेली आहे व फलश्रुती पण सांगितलेली आहे. तरी या दहा दिवसात अशा प्रकारे उपासना करून स्वतःचा उद्धार करून घ्यावा. श्री जगन्नाथ पंडितांनी गङ्गा लहरी रचताना गङ्गास्तुतीच्या सहाय्याने स्वतःचा उद्धार करून घेतलेला आहेच. ज्या लोकांना, योग मार्गाने आपल्या शरीरातील नाड्यांची शुद्धता करून घेता येणे जवळ जवळ अशक्य असते, त्यांना या नद्यांच्या उपासनेमुळे, स्तवनामुळे, त्या प्रकारची नाडी शुद्धी प्राप्त करून घेता येत असते, असे शास्त्र वचन आहे, भागवत पुराणात याचा उल्लेख आहे. या काळामध्ये नदीमध्ये स्नान, जप जाप्य उपासना व दान करणे या गोष्टींमुळे उच्च दर्जाची अध्यात्मिकता प्राप्त होते.
पूर्वीचे काळी, म्हणजे सुमारे 60-70 वर्षांपूर्वी, मंदिरांमधून, जसे आपण नवरात्र साजरे करतो, तसे गङ्गा दशहरा काळांत, दहा दिवस कीर्तन, जागरण, भागवत श्रवण, भगवत्कथा, जप जाप्य, अभिषेक होत असत.
माझी आई “मंगला कुलकर्णी” ही, कीर्तनकार असल्याने या दशहराच्या काळात लहानपणी, तिची कीर्तने अनेक वेळा ऐकण्याचे भाग्य मला लाभले होते. कारण मी तिला पेटीची साथ करत असे. ती उच्च विद्या विभूषित असल्याने व प्रोफेसर असल्याने तिचे अर्थार्जन बऱ्यापैकी उच्च प्रतीचे होते. कीर्तनातून मिळालेले पैसे, स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी वापरायचे नाहीत, असे तिने ठरवले असल्याने, त्या संपत्तीचा, तिने विविध प्रकारच्या दानांसाठी विनियोग केला होता.
अशा दशहराच्या काळात, एक प्रकारचे वाचिक तप म्हणून, कोणाचीही निंदा तसेच चहाडी, न करणे यांसारखी बंधने, स्वतःवर लादून घेणारी बरीच मंडळी असतात.
या दहा दिवसांच्या काळात प्रामुख्याने श्री गङ्गामैया, श्री नर्मदा मैया, श्री शिवशंभू व भगवान श्री विष्णू यांची उपासना जास्तीत जास्त प्रमाणात करण्याचा प्रघात आहे. अशाप्रकारे या पवित्र कालावधीमध्ये जास्तीत जास्त उपासना करून आपण आपला अध्यात्मिक उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न करू या.
या काळात ज्या सोप्या मंत्रांचा जप करावा ते असे…
१) हरगङ्गे भागीरथी।।
२) नर्मदे हर।।
३) नमः शिवाय।।
४) राम कृष्ण हरी गोविंद।।
ज्यांना येते त्यांनी इतर विविध प्रकारची गीते, स्तोत्रे, मंत्र यांचे पठण करावे.
या काळात गंगाकिनारी किंवा नर्मदा किनारी स्थित असलेल्या तीर्थस्नानांचे दर्शन घ्यावे.
तसेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एखाद्या ज्योतिर्लिंगाचे आणि श्री महाविष्णूंच्या एखाद्या प्रसिद्ध मंदिराचे दर्शन घ्यावे.
ज्यांना यज्ञयाग इ. पुण्यकर्मे करणे, कोणत्याही कारणांमुळे करणे अशक्य असेल त्यांनी निदान अशी कर्मे जिथे नेहमी/ मोठ्या प्रमाणात केली जातात, अशा ठिकाणी स्वतःच्या आर्थिक कुवतीनुसार त्या हवनासाठी ज्या वस्तू लागतात, त्यांचे दान अवश्य करावे.
तेही खूप पुण्यवर्धक असते.
२० मे ते ३० मे पर्यंत या वर्षीचा गंगा दशहराचा पुण्यकाल आहे.
प्रसिद्ध कथा लेखिका राधिका भांडारकर यांचा पाचवा लघुकथा संग्रह र्हस्व नुकताच प्रकाशित झाला. कथा लेखनावर विशेष प्रभुत्व असणाऱ्या राधिकाताईंचा हा संग्रह सुद्धा अतिशय वाचनीय झालेला आहे. या संग्रहात एकूण १३ कथा आहेत. सर्वच कथा आपल्या सर्वांच्या भावविश्वाशी सहजपणे धागा जोडतात. प्रत्येक कथा ही जीवनातल्या एकेका पैलूचे दर्शन घडवते.
सौ राधिका भांडारकर
कथा विषयांचे वैविध्यही खूपच भावते. आवर्जून उल्लेख करावा असा विषय म्हणजे स्त्रीचे ऋतुमती होणे. हा विषय तसा खुलेपणाने न बोलला जाणारा आहे. ‘ पाउल ‘ या कथेत या स्थित्यंतरातील स्त्रीची भावनिक आंदोलने खूप छान पद्धतीने टिपली आणि मांडली आहेत.
‘ पत्त्यांचा बंगला ‘ ही कथा समाजात घडणाऱ्या विलक्षण मनोव्यापाराचे दर्शन घडविते. अत्यंत हलाखीत बालपण गेलेल्या कथानायकाला परिस्थितीच महाराज बनवते. माणसांची दुखरी नस अचूक ओळखणारा तो धूर्त, चाणाक्ष नायक हे नाटक कसे वठवतो हे वाचण्यासारखेच आहे. एका वेगळ्याच विषयावरची ही कथा प्रभावी मांडणीने मनाची पकड घेते.
‘ पस्तीस – छत्तीस ‘ ही कथा मनमानी नवऱ्याचा इगो, वर्चस्व, रुबाब जपताना संसाराचा तोल सांभाळण्यासाठी करिअर सोडून देणाऱ्या एका हुशार, कर्तृत्ववान ‘ती’ ची कथा आहे. ‘आम्ही सिद्ध लेखिका’ या संस्थेच्या राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारी ही कथा अप्रतिम जमून आली आहे.
आणखी एक सुंदर कथा म्हणजे ‘ क्षपणक ‘. अतिशय बुद्धिमान, महत्त्वाकांक्षी पण तितकाच अस्थिर स्वभावाचा पती आणि प्राणपणाने घर, संसार, मुलं, नवरा यांना जपणारी, नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणारी पत्नी यांची ही कथा. रासायनिक प्रक्रियांमध्ये प्रत्यक्ष सहभागी न होता त्या क्रियांना मदत करून शेवटी त्यातून बाहेर पडणारे क्षपणक म्हणजे कॅटाॅलिस्ट तो बनवितो. पण शेवटी तो मनापासून कबुल करतो की,’ त्याच्या खऱ्या आयुष्यातली क्षपणक तीच आहे.’ ही कथा अतिशय प्रभावी झाली आहे.
‘ उत्तरायण ‘ ही कथा ‘आम्ही सिद्ध लेखिका’ संस्थेच्या राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत द्वितीय पुरस्कार प्राप्त ठरली आहे . दुर्दैवाने बालविधवा झालेली कथा नायिका मोठ्या जिद्दीने, हिंमतीने पुढची वाटचाल करते. एकुलता एक मुलगा संस्कारी, सक्षम, कमावता बनतो. तिथेच तिचे उत्तरायण सुरू होते. लेखिकेने ग्रहताऱ्यांची भ्रमंती आणि मानवी जीवनाची वाटचाल यांची खूप छान सांगड घातली आहे .
सर्वच तेरा कथा एकापेक्षा एक सरस झाल्या आहेत. विषयही सामान्यांच्या जीवनाशी निगडित असल्याने वाचक पटकन त्यांच्याशी जोडले जातात.
‘ चंद्रोदय ‘, ‘ शुभरजनी ‘ या आजकाल मुले परदेशस्थ आणि देशात पालक एकटे या वास्तवावर सकारात्मक भाष्य करणाऱ्या दोन सुंदर कथा आहेत. ‘चंद्रोदय’ मध्ये शिसवी पाटावर साक्षात चंद्रच जेवत होता या सुंदर वाक्याने होणारा कथेचा शेवट मनाची पकड घेतो.
‘ स्थळ ‘ कथा आजकालच्या लग्न जमणे, जमवणे या गोष्टींवर छान प्रकाश टाकते. यात लेखिकेने एक जबाबदार सदस्य म्हणून केलेली निरीक्षणे विचार करायला लावणारी आहेत. शेवटही छान केला आहे.
कथांची शीर्षकं ही लेखिकेची खासियत आहे. सर्वच शीर्षकं वेगळी, वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पस्तीस छत्तीस हा आलिशान बीएमडब्ल्यू चा नंबर आहे. त्याचा तो स्टेटस सिम्बॉल. पत्त्याचा बंगला, शुभरजनी, परीघ, क्षपणक, पाउल ही शीर्षकं कथेला वेगळा आयाम देतात.
‘ वाळा ‘ म्हणजे तसं पाहिलं तर शुष्क गवतच ना !पण त्यावर पाणी शिंपडताच शीतल सुगंध दरवळतो. त्याप्रमाणे वयाची साठी पार झाल्यावरही परिस्थितीचा तगादा आणि मनातील वडिलांचे प्रोत्साहन यामुळे संगीत शिकून एक प्रतिथयश गायिका बनलेल्या नायिकेची ही कहाणी आहे. संगीतातील तपशीलवार बारकाव्यांचेही छान वर्णन आहे. त्यामुळे कथा रसाळ झाली आहे.
या कथासंग्रहाचे शीर्षक असलेली र्हस्व ही कथा सर्वात लहान बहीण सर्वात आधी गेल्याने विलक्षण दुःखी झालेल्या मोठ्या बहिणीचे हे मनोगतच आहे.
” ज्येष्ठांच्याही आधी कनिष्ठांचे जाणे ॥
केले नारायणे उफराटे ॥”
हा संत निवृत्तीनाथांचा अभंग वाचताना जसा जीव गलबलतो ही कथा वाचतानाही तशीच भावना मनी दाटून येते
सर्वच कथांमध्ये लेखिकेने अतिशय हळुवारपणे कथाबीज फुलवलेले आहे. त्यातून तिचे प्रगल्भ, संवेदनशील मन, वास्तवाचे सखोल निरीक्षण जाणवते. जगण्यातले काही तरल क्षण सामोरे येतात. सुंदर सकारात्मक संदेशही देतात.
कथेची भाषा अगदी सहज सोपी, ओघवती, चित्रदर्शी आणि मनाला भिडणारी आहे. त्यामुळे वाचताना निखळ आनंद मिळतो.
या कथासंग्रहाला ज्येष्ठ लेखिका अरुणाताई मुल्हेरकर यांची प्रस्तावना लाभली आहे.
राधिकाताईंनी हे पुस्तक आपले प्रेरणास्थान असणाऱ्या रसिक वाचकांना अर्पण केले आहे ही विशेष बाब आहे.
या आधीच्या कथासंग्रहांप्रमाणेच या कथासंग्रहाचे पण वाचक उस्फूर्तपणे स्वागत करतील यात शंका नाही. कारण याही कथा वाचनीय आणि प्रभावी आहेतच. त्यासाठी राधिकाताईंचे मनापासून अभिनंदन. यापुढेही त्यांच्या उत्तम उत्तम कथा रसिकांना वाचायला मिळोत यासाठी त्यांना खूप हार्दिक शुभेच्छा.
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆.आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – बिटिया सोन चिरैया…।)