सुश्री सुनिता गद्रे

 ☆ दिलो दिमाग की बात है… डाॅ.राजेंद्र  बर्वे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

हिंदी सिनेमातला तद्दन फिल्मीपणा सोडला, कमालीची भावविवशता सोडली ,तर खरं म्हणजे खूप काही ऐकण्यासारखं  व क्वचित पाहण्यासारखं असतं.अखेर, दौलत- इज्जत, खानदान की आबरु, जमीन जायदाद यांपेक्षा मोहब्बत, प्यार आणि इश्क नक्कीच श्रेष्ठ  असतं.माणसांना जोडणाऱ्या या प्यारच्या पुलाची भिस्त असते हृदयावर आणि कमानीअसतात त्यागाच्या! पण या ‘प्यार’चा डोस जरा अति आणि नाटकी होतो व तो विश्वासार्ह वाटेल अशा रीतीने पेश केला जात नाही, एवढाच त्यातला दोष. अमेरिकेत ‘इमोशनल इंटेलिजन्स’ या संकल्पनेनं धुमाकूळ घालण्यापूर्वीच हिंदी सिनेमाच्या संवाद लेखकांनी दिल आणि दिमाग यातील फरक पचनी पाडला होता. दिल क्या चाहता है और दिमाग क्या सोचता है, अशा टाईपचे संवाद नेहमी ऐकायला मिळतील. विशेषतः शम्मी कपूर आणि दिलीप कुमारच्या सिनेमात. 

गोष्ट साधी आहे. दिल म्हणजे जजबात म्हणजेच भावना. भावना म्हणजे तरल संवेदना. कधी हलक्या कधी जजबात का तुफान किंवा सैलाब .तर दिमाग म्हणजे बुद्धीचातुर्य, तर्कनिष्ठ विचार, परिस्थितीचं सुसंगत, सुसूत्रित विश्लेषण व त्यानुसार काढलेले अनुमान आणि घेतलेले निर्णय.

दिल की बाते दिल ही जाने…. भावनांच्या मागे तसं लॉजिक नसतं. सिर्फ एहसास है ये, जो ‘रुह’नेच मेहसूस करायचा असतो. भावना समजून घ्यायच्या, त्या तशा का?  असा विचार करायचा नाही. तशा असतात झालं! त्याच्याशी युक्तिवाद न करता त्यांच्याशी एकरूप व्हायचं.

 दिल व दिमाग यातील फरक विशेषत: आपण व दुसरे यांच्याबाबत लक्षात घ्यायला हवा.

दुसऱ्याचा विचार करताना आपला दिमाग वापरायचा नाही; दिल वापरायचं. दुसऱ्या व्यक्तीशी संवाद करताना त्याच्या भावना जाणून घ्यायच्या. त्या व्यक्तीबरोबर सहानुभूतीनं (एम्पथी) वागायचं!

स्वतःचा विचार करताना मात्र दिलाऐवजी दिमाग वापरायचा. स्वतःविषयी निर्णय घेताना दिल के बजाय दिमागपर जोर दो बरखुरदार!

आपण प्रत्यक्षात नेमकं उलटं करतो. आपल्याला वाटतं दुसऱ्यानं दिमाग लढवावा आणि आपल्या दिलाला आपण कुरवाळावं!

** समाप्त**

लेखक डॉ.राजेंद्र बर्वे

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments