? इंद्रधनुष्य ?

☆ “अमेरिकेतील चिमण्यांचे पुण्यातल्या मैत्रिणीशी हृदयस्पर्शी नाते.…” – लेखक : श्री रमेश खरमाळे ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

(२० मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त खास हा लेख) 

तो दिवस मला आजही आठवतोय. मला रात्री अचानक एक वाजता फोन आला. मी भर झोपेतून खडबडून जागा झालो होतो. मोबाईल हातात घेतला व नंबर पाहीला तर तो परदेशी कॉल असल्याचे समजले. मी मोबाईल रिसिव्ह केला व हॅलो बोललो. समोरून एक महिला बोलत होती व डिस्टर्ब केले म्हणून क्षमा मागत होती. आपण कोठून बोलताय विचारले तर अमेरिकेतून बोलत आहे असे सांगितले. काय विशेष विचारले तर त्या सांगू लागल्या की आपला चिमण्यांविषयी संभाषणाचा इको फ्रेंडली क्लब वरील फेसबुक पेज वर अपलोड केलेला व्हिडिओ पाहीला व तो खुपचं भावला व रहावलेच नाही म्हणून आपणास फोन केला. पुढे त्या बोलू लागल्या व त्यांची त्यातील काही वाक्य मात्र काळजाला भिडणारी होती व त्या वाक्यांनी माझ्या शरीरावरील रोम खडे झाले होते. त्या सांगत होत्या पुण्यामध्ये माझे लहानपण गेले अगदी लग्न होईपर्यंत मी तेथे  खुप खेळले बागडले. वडीलांनी घराच्या आवारात पक्षांसाठी खुप झाडे लावली होती. ते पक्षी पाहुन त्यांच्या विषयी खुप कुतुहल वाटायचे.  त्यांच्या प्रेमात मी कधी पडले समजलंच नाही. या प्रेमाचे रूपांतर आमचे मैत्रीत झाले. त्यांना मी रोज खाण्यासाठी धान्य टाकायची. त्या सुरूवातीला धान्य टाकताच क्षणी उडून जायच्या व मी तेथून निघून गेले की मग टाकलेले धान्य टिपुन खायच्या. या खेळात मी व त्या अगदी फार जवळ जवळ येत गेलो. आता त्या माझ्या हातात धान्य पाहीले की कधी कधी हातावरच येऊन बसायच्या. धान्य टाकायला उशीर झाला की जोर जोराने चिवचिवाट करायच्या. अगदी मुलाने हट्ट करावा तशा त्या हट्टी होत चालल्या होत्या. मी कुमारीका अवस्थेत आता या चिमण्यांची आई झाले होते. त्यांच्या जेवण पाण्याची काळजी मी रोज घेत असे व त्यांच्याशी संवाद साधत असे. मला माहीत नाही पण कोणत्या जीवनाची हि पुण्याई कामी आली होती माहीत व यांची सेवा करण्याचे मला भाग्य लाभले होते.

पुढे माझे  शिक्षण पूर्ण झाले. आई वडीलांनी माझे लग्न करून दिले. लग्नानंतर मी पतीसोबत अमेरीकेला रहायला गेले. चिमण्याचा सहवास मिळत नसल्याने मी पहिले खूप उदास व्हायची. कधी कधी तर हातात धान्य घेऊन व्हरांड्यात यायची व नाराज होऊन माघारी फिरायची कारण अंगणात चिमण्याच नसतं.

अमेरिकेत वर्षातील ४ महिने तर सुर्य दर्शन घडने कठिणच होते. बर्फ बारी सुरू झाली होती त्यामुळे पक्षी पहायला मिळायचे परंतु आपल्या सभोवताली नेहमीच चिवचिव करणा-या चिमण्या मात्र पहायला मिळणे दुर्मिळच होत. लग्नाचे दोन वर्ष चिमणी सारखे भुर्कुन कधी उडुन गेले कळलेच नाही. 

एके दिवशी बाल्कनीत फिरत असताना अचानक माझी नजर एका जागेवर खिळुन राहीली. अमेरिकेतील तो क्षण तर माझा आयुष्यात अतिशय आनंद देणारा ठरला. चक्क मी समोर अंगणात चिमणी पाहत होते. मला तर या दृष्यावर  विश्वासच बसत नव्हता. आता ती चिमणी रोजच दिसू लागली होती.

मी त्या दिवसापासून अंगणात ती चिमणी रोज धान्य वेचुन खायला यावी व मला पहायला मिळावी म्हणून तीला धान्य टाकु लागले. ती एकच चिमणी रोज दिसायची. मी पण.. एक त एक म्हणून धान्य टाकण्याचा नित्यक्रम चालूच ठेवला. कालांतराने दोन, तीन, चार अशा चिमण्या वाढत गेल्या व मी धान्य टाकतच गेले. आता त्यांची व माझी चांगली ओळख निर्माण झाली होती व त्यांना पण माझा लळा लागला होता. ८ महिन्यांत त्यांची संख्या जवळपास १५ / २० झाली होती. आता त्या माझ्या व मी त्यांच्या चांगलीच परीचयाची झाली होती.  गॅलरीत बसुन हाताच्या अंतरावर त्या धान्य टाकताना बसु लागल्या होत्या. आता मी  अंगणात धान्य टाकण्याऐवजी त्यांना गॅलरीत धान्य टाकत होते व त्या तेथे येऊन खाऊ लागल्या होत्या. माझी धान्य टाकायची वेळ अगदी त्यांच्या परीचयाची झाली होती. मी दरवाज्याची कडी काढायला खोटी की त्या आवाजाने ते तेथे हजर होत असत. आता त्यांनी माझ्या घराच्या शेडच्या आवारातच त्यांनी घरटी केली होती. बर्फ पडायला सुरुवात झाली होती. भयंकर पडणा-या बर्फात या कशा राहतील समजत नव्हते. थंडीचा जोर वाढला होता. त्या दिवशी धान्य टाकायला मला थोडा उशीर झाला होता. दरवाजावर  सारखा टक टक आवाज येऊ लागला. दरवाजा का वाजतोय समजायला मार्ग नव्हता. दरवाजा उघडला तर समजले की चिमण्या दरजावर चोची आपटत होत्या व धान्य मागत असल्याचा संकेत देत होत्या कारण बर्फाने सगळा परिसर पांढराशुभ्र होऊन गेला होता व त्यांच्या पोटापाण्याचा गहन प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर मी त्यांचा धान्य घालण्याचा नियम कधीच मोडला नाही व  कधी कधी दरजावर मुद्दाम त्यांचा चोचीचा आवाज ऐकण्यासाठी मी उशीर करायची . दोन वर्षांत त्यांची संख्या जवळपास ६०/७० वर पोहचली. खूप आनंद झाला मला हे सर्व पाहून व अनुभवून. आता मी एकटी नव्हते तर आमचं कुटुंब जवळपास ७२ सदस्यांच झाले होते. गेल्या महिन्यात मी अचानक आजारी पडले. मला उठणे बसणे कठीण झाले. पती या कठीण काळात माझी सेवा करायचे. त्यांना खायला घालायचे माझ्या लक्षातच आले नव्हते व ना कधी दरवाजावर टकटक झाली. आजारपणात मला माहित नाही पण कसा काय विसर पडला कळलेच नाही. जवळपास ४ दिवस मी बेडवरून उठू शकले नव्हते. आज ५ व्या दिवशी मी स्वतः उठून बसले व बाथरूममध्ये जाऊन आले. तर लगेच दरवाजावर टकटक सुरू झाली. मला तर हे ऐकून आश्चर्याचाच धक्काच बसला. गेली ४ दिवस यांनी कधीच दरवाजावर टकटक केली नव्हती. कसं बरं समजलं असेल त्यांना की मी आजारी आहे? व आपण दरवाजा वाजवून या आजारी आईला  सतावने उचित नाही म्हणून. आज फक्त घरात उठून बसले तर लगेच दरवाजा ठोठावला. असे कसे घडले असेल? कोणत शास्र यांना आवगत असेल बरं? याच विचारात गेली कित्येक दिवस मी होते. याच उत्तर मला अनेक दिवसांनी मिळाले. आज आपला व्हिडिओ पाहण्यात आला आणि पक्षांना खरोखरच व्हायब्रेशन समजतात याची खात्रीच पटली. मी मला रोखुच शकले नाही तुमच्या त्या व्हिडिओ मधील विधान ऐकुन व लागलीच आपणास फोन केला. 

    पंधरा ते वीस मिनिटे दिपालीजी बोलत होत्या. त्यांचे कानावर पडणारे शब्द अंगावर काटे उभे करत होते. आनंद याच गोष्टीचा वाटत होता की एक चिमणी पासुन ६० ते ७० चिमण्यांचा गोतावळा दिपाली ताईंनी अन्नदाता म्हणून उभा केला होता तो पण परदेशात. ताई तुमचे पक्षांच्या पाठीशी सदैव असेच प्रेम राहो व आपला हा गोतावळा अतिशय मोठा होत राहो व आपल्या हातुन त्यांना सदैव अन्नदान मिळत राहो हीच सदिच्छा.

आज आपण मला चिमणी पक्षांचं आगळवेगळ रुप दर्शन घडवलत़ त्याबद्दल निश्चितच ऋण व्यक्त करतो. आज जागतिक चिमणी दिन या आपल्या सर्व चिमण्या ताईंना जागतिक चिमणी दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे नक्कीच द्याल ही सदिच्छा व्यक्त करतो.

मित्रांनो पक्षांचे जतन आणि संवर्धन हाच पिकांवर परिणाम करणा-या किडींवर नियंत्रण उपाय आहे. त्यामुळे त्यांचे जतन करा व त्यांना उन्हाळ्यात पाणी व अन्न ठेवत चला. 

लेखक : रमेश खरमाळे, माजी सैनिक 

मो ८३९०००८३७०

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments