डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆  ज्यू लोकांची मातृभूमी (प्रॉमिस्ड लँड) – वरदान की शाप ? — भाग-4 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे

(ज्यु लोकांच्या शास्रधारी गटांनी त्याचा सशस्त्र प्रतिकार केला.) इथून पुढे — 

1939 ते 1945 मध्ये दुसरे महायुद्ध झाले. या काळात फळणीची योजना मागे पडली. दुसऱ्या महायुद्धात युरोपातील 60 लाख निरापराध ज्यु लोकांची नाझी जर्मनीने अमानुष कत्तल केली. आता मात्र ज्यु लोकांना आत्मरक्षा करता येण्याजोगा स्वातंत्र्य देश निर्माण करण्याची गरज सर्व जगाला जाणवली. 1947 साली संयुक्त राष्ट्र संघटनेने ज्यु लोकांच्या मायाभूमीची फाळणी करून ज्यु लोकांसाठी स्वतंत्र्य देश आणि अरबांसाठी स्वतंत्र देश निर्माण करण्याचा निर्णय घेतला. अरबांनी त्याला परत विरोध केला. पण दुसऱ्या महायुद्धात अनन्वित अत्याचार झालेल्या ज्यु लोकांसाठी संपूर्ण जगाने लावलेल्या रेट्यामुळे 1948 साली इस्राईल या नवीन देशाची स्थापना झालीच. लगेच शेजारील इजिप्त, सिरिया, ट्रान्सजॉर्डन, लिबेनोन, इराक, सौदी अरेबिया, येमेन या अरब राष्ट्रांनी मिळून ईस्राएलवर हल्ला केला. इस्राईलने सर्व अरब राष्ट्रांचा एकत्रित पराभव केला. आपले पहिले स्वातंत्र्ययुद्ध इस्राईलने महत प्रयासने जिंकले. त्यानंतर जगभरातून ज्यु आपल्या मायभूमीमध्ये येऊन स्थायिक होऊ लागले. अरब लोक इस्राईलचे अस्तित्व नष्ट करण्याचे प्रयत्न करत राहिले. दहशदवादी गटांकडून छोटे मोठे हल्ले तर सतत चालूच होते. पण शेजारील अरब देशांनी 1956 ला सुवेज कॅनल युद्ध, 1967 ला सहा दिवसाचे युद्ध, 1973 चे योनकिपरचे युद्ध करून इस्राईलचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला.  इस्राईलने या सर्व युद्धात अरबांचा पराभव करत आपले अस्तित्व टिकवले.

ज्यु लोकांनी कायम आपल्या मायभूमीत आपले अस्तित्व टिकवून ठेवले. इतकेच नव्हे तर अमाप कष्ट करून त्या वाळवंटात नंदनवन फुलवले. कमी पाण्यात केले जाणारी इस्राईली शेती आणि औद्योगिक प्रगती जगतमान्य आहे. इस्राईलची संरक्षण दले आणि गुप्तचर यंत्रणांची जगात दहशद आहे. मध्यपूर्व भागात तेल नसलेले एकमेव प्रगत राष्ट्र असा लौकिक इस्राईलने मिळवला आहे.

एकेश्वरवादी ज्यु लोकांनी स्वतःचा धर्म संभाळला. पण त्यांनी इसाई आणि मुस्लिम लोकांसारखा आक्रमक धर्मप्रचार केल्याची उदाहरणं फारशी ऐकीवात नाहीत. पण त्यांनी आपली वेगळी धार्मिक ओळख म्हणजे अहंकार जपला. त्यात ज्यु समाज कायम आर्थिक दृष्टया प्रगत होते. त्याचा फटका त्यांना वारंवार बसला. आर्थिक प्रगती करणे समाजमान्य आहे. त्यामुळे आर्थिक प्रगतीचा सरळ तिरस्कार करता येत नाही. काहीतरी वेगळे कारण शोधावे लागते. ज्यु लोकांनी जपलेले धार्मिक वेगळेपण त्यांच्या तिरस्काराचे कारण झाले.

‘नंगे से खुदा डरता है’ असे म्हणतात. पण ज्यु लोक कधीच भूखे किंवा नंगे नव्हते. व्यक्तीजवळ गमावण्याजोगे काही असेल तर व्यक्ती जरा घाबरूनच राहतो. ज्यु लोकांच्या अशा व्यापारी स्वभावामुळे त्यांना कधी कुणी घाबरले नाही. त्यामुळे ज्यु लोक सॉफ्ट टार्गेट झाले. त्यांच्या धर्मिक वेगळेपणाच्या आधारावर जगभर त्यांचा छळ झाला. नंगाडपणातून येणारी सत्ता आणि ताकत असल्याशिवाय संपत्ती टिकवता येत नाही. हे सत्य हिंदूप्रमाणे ज्यु लोकांनाही उशिरा उमगले. आजही सुसंस्कृत आणि सधन असललेले ज्यु इस्राईल बाहेर फारसे आक्रमक नाहीत. चालुबाजूनी ज्यु द्वेष्ट्या मुस्लिम अरब राष्ट्रानीं वेढलेल्या इस्राईल मध्ये ते आक्रमक राहिले नसते तर कधीच त्यांचे अस्तित्व नष्ट केले गेले असते.

जगभरात सर्वत्र फ्रस्ट्रॅटेड लोक आढळतात. त्यांच्या आत सुरु असलेली खदखद बाहेर काढण्यासाठी ते सॉफ्ट टार्गेट शोधत असतात. पूर्वीपारपासून ज्यु लोक हे अतिशय सॉफ्ट टार्गेट असल्यामुळे इस्राईलवर दहशदवादी हल्ला होऊनही जगभरातील सगळे वैफल्यग्रस्त लोक ज्युं आणि इस्राईल विरुद्ध मोर्चे काढत आहेत. आपले फ्रस्ट्रेशन कमी करायचा प्रयत्न करत आहेत.  मनातील दुःख आणि इर्षा कुठेतरी बाहेर पडणारच असते. इतिहासात असेच सर्व लोकांनी सॉफ्ट टार्गेट असलेल्या ज्यु लोकांवर आपले फ्रस्ट्रेशन काढले आहे. पहिल्या महायुद्धाशी ज्यु लोकांचा काहीही संबंध नव्हता. पहिले महायुद्ध हरल्यानंतर जर्मनीत प्रचंड अगतिकता निर्माण झाली. हिटलरने ज्यु लोकांना जर्मनीच्या परिस्थितीसाठी जबाबदार ठरवून ती सगळी अगतिकता काढण्यासाठी वांगे उपलब्ध करून दिले. 

इस्लाम आणि इसाई आक्रमक धर्मप्रचार करतात. धर्मप्रचार करताना इतर धर्माना आधी वाईट म्हणावे लागते. त्यामुळे धर्मप्रचार संघर्ष निर्माण होतात. इसाई धर्माला इतर धर्मांचे सहअस्तित्व तरी मान्य आहे. इस्लामला तेही मान्य नाही. ते आजवर मोठमोठया संघर्षाचे कारण ठरले आहे. पण हे दोन्ही धर्म कमालीचे आक्रमक आहेत. प्रतिकारात यांना उलटा मार पडल्यावर पटकन ते व्हिक्टिम कार्ड बाहेर कडून जगभर प्रदर्शने आयोजित करतात. ही कला ज्यु आणि हिंदू लोकांना आजवर जमलेली नाही. 

एकेश्वरवादी धर्म सर्वसमावेशक होऊ शकत नाहीत हे सत्य आहे. मी ज्यावर विश्वास ठेवला आहे तेच एकमेव सत्य आहे असा भ्रम झाला की आपल्या सारखा विश्वास असणारे आपले आणि त्या व्यतिरिक्त विश्वास असणारे परके वाटू लागतात. ‘केवळ आपण शहाणे आणि इतर जग बावळट’ इथपर्यंत ठिक आले. इतर लोकांशी संघर्ष होण्याची शक्यता कमी असते. पण धार्मिक नेत्याची ताकत त्याच्या समर्थकांच्या संख्येवरून ठरते. म्हणून ते आपल्या समर्थकांना संपूर्ण जगाला स्वतः सारखे शहाणे करून टाकण्याला म्हणजे धर्माप्रचार करण्याला धर्मकर्तव्य घोषित करून टाकतात. समस्या येथे सुरु होते. जेव्हा आपलाच विश्वास अंतिम सत्य आहे असा मानणारे लोक आपापल्या विश्वासाच्या प्रचारासाठी समोरासमोर समोर येतात तेव्हा संघर्ष अटळ असतो. सामूहिक धार्मिक ओळखीचा वैयक्तिक फायदा नगण्य असतो. पण या सामूहिक धार्मिक ओळखीचा फायदा धूर्त नेत्याने उचलला तर समूहातील बहुतेक मंडळी नागवले जातात. सामान्य लोकांचे ब्रेन वॉशिंग करून हे धूर्त नेते त्यानां धर्मायुद्धासाठी तयार करतात. असे कडवे सैनिक धर्मासाठी (म्हणजे नेत्यासाठी) लढले की नेत्याचा राजकीय फायदा पक्का होतो. अशा धर्मायुद्धात युद्धात मारतात ती सामान्यांची मुले. सामान्यांच्या मुलांच्या प्रेतांच्या पायऱ्या करून धूर्त नेते मंडळी उच्चं राजकीय पदापर्यंत पोहचतात. त्यासाठी आपल्या समूहाची वेगळी धार्मिक ओळख ते प्रयत्नपूर्वक जपतात. समूहाची धार्मिक ओळख सोडू पाहणाऱ्या सदस्यांवर कठोर कारवाई करून इतरांना समूह सोडण्यापासून पराववृत्त केले जाते. 

याउलट एका ईश्वराच्या अनेक रूपांना मानणारे हिंदू सारखे लोक ‘एकम् सत् विप्रा बहुदा वदन्ति’ असे म्हणत नवीन लोकांना त्यांच्या आराध्य देवांसहित स्विकारतात. म्हणूनच भारतावर हल्ले करायला आलेले शक, कुषाण, हुण सारखे अनेक लोक सुद्धा त्यांच्या देवा-धर्मासहीत हिंदू जीवन पद्धतीत समाविष्ट झाले. राजकीय संघर्षानंतर होऊ शकणारा मोठा धार्मिक संघर्ष टाळला. परदेशी गेलेले हिंदू तेथील देवांना आपल्या अनेक देवांपैकी एक देव म्हणून सहज स्विकारतात आणि त्या समाजाचा भाग होतात. वेगवेगळ्या लोकांचे आराध्य देव एकाच परमेश्वराची वेगवेगळी रूपे असल्याचा विश्वास असल्याने हिंदूंनी धर्मप्रचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे हिंदू समाज जगभर शांतताप्रिय म्हणून ओळखला जातो.

कृष्णानेही अधर्मी लोकांविरुद्ध धर्मयुद्ध करायला सांगितले. पण सनातन परंपरेत न्यायाने वागण्याला धर्म वा यम म्हटले आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय(चोरी न करणे), अपरिग्रह(गरजेपेक्षा जास्त संचयाचा लोभ न करणे) आणि ब्रम्हचर्य(निस्पृहतेच्या ज्ञानमार्गावर चालणे) या पाच नैसर्गिक न्याय तत्वानुसार मनुष्य वागल्यास त्याचा वैयक्तिक फायदा तर होतो. समाजातील बहुतांश लोक या पाच न्याय तत्वानुसार वागल्यास सामाजिक न्याय प्रस्थापित होतो. या पाच न्यायतत्त्वांना डावलून समाजातील एखाद्या घटकावरती अन्याय झाल्यास सामाजिक समस्या निर्माण होतात आणि समाज स्वास्थ बिघडते.

सनातन परंपरेत या पाच यमधर्मा प्रमाणे न वागणाऱ्या लोकांना अधर्मी म्हटले जाई. धर्मी आणि अधर्मी या अतिशय वैयक्तिक ओळखी होत्या. ‘न्यायाने अर्थात धर्माने वागणारा’ ही जन्माने येणारी ओळख नव्हे. जन्मावरून कुणाला धर्मी वा अधर्मी म्हणता येत नव्हते. तसे असते तर एकाच कुटुंबात जन्मलेले कौरव अधर्मी आणि पांडव धर्मसंगत ठरले नसते. धर्मी-अधर्मी कर्मावरून ठरते. सनातन समाजात अधर्मी अशी ओळख असणे ही भूषणाची गोष्ट नव्हती. त्यामुळे अधर्मी व्यक्तींच्या समूहाला अधर्मी अशी सामूहिक ओळख देऊन संघटित करणे आणि त्या संघटीत शक्तीचा उपयोग आपला राजकीय फायद्यासाठी करणे हे धूर्त नेत्यांसाठी कठीण होते.

प्रेषितांना अपेक्षित असलेले बहुतेक संघटित ऐकेश्वरवादी धर्म हे वैयक्तिक आत्म उन्नतीचा मार्ग होते. पण नंतरच्या काळात जेव्हा धूर्त अनुयायी या महापुरुषांच्या विचाराचा पराभव करून धर्माचे राजकारण करतात तेव्हा मात्र धर्म अफूची गोळी झाले.  नेते गबर झाले आणि धर्माचे सामान्य अनुयायी नागवले गेले. जोपर्यंत सामान्य जनतेला हा खेळ नीट कळत नाही तोपर्यंत हा खेळ असाच चालू राहणार आहे.

– समाप्त –

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments