सुश्री प्रभा सोनवणे

? आत्मकथन ?

☆ लेखांक# 9 – मी प्रभा… मैत्रबन ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

मी अशा काळात आणि समाजात जन्माला आले जिथे बायकांना मित्र नसतात पण लहानपणापासून मला खूप चांगले मित्र मिळाले आहेत, मी पाचवीत असताना, दिलीप मैंदर्गी आणि राजेंद्र किल्लेदार या मित्रांबरोबर शाळेत जात असे.

पुण्यात पाचवी सहावीत शिकत असताना हे दोनमित्र !….नंतर सातवीत असताना शिरूरला गेले, शाळा मुलामुलींची असली तरी मुलंमुली बोलत नसत! त्या शाळेत असताना अनेक मैत्रीणी मिळाल्या, राणी गायकवाड, सरस बोरा, उज्वल धारिवाल, निर्मल गुंदेचा, संजीवनी कळसकर इत्यादी !

नववीत असताना मी आणि राणी गायकवाड एकाच बाकावर बसत असू आणि शाळेत ही बरोबरच येत जात असू,

नववीत असताना आमच्या आयुष्यात अशी घटना घडली की,आयुष्यभर त्या घटनेचे पडसाद येत राहिले, एका काॅलेज मधल्या मुलाने आमच्या दोघींच्या नावे एक पत्र लिहिले होते, मी तुमच्याशी मैत्री करायचे ठरविले आहे….वगैरे !

माझ्या मैत्रीणीला तो मुलगा आवडला होता, म्हणजे प्रेमप्रकरण नाही पण ते एकमेकांकडे पहात असत,हसत असत, मी एकदा  तिच्या घरी गेले असताना तिने तिच्या खिडकीतून रस्त्याच्या पलिकडे उभा असलेला तो मुलगा दाखवला आणि म्हणाली, तो रोज संध्याकाळी इथे उभा असतो,मी या कशातच नव्हते, त्या काळात आमच्या भावांना कोणी सांगितलं की एखादा मुलगा आमच्या मागे आहे की त्या मुलाची चांगलीच पिटाई होत असे.तशी त्या मुलाचीही झाली,त्या मुलाचे नाव वसंत पाचरणे !

काॅलेजमधे गेल्यावर खूपच विचित्र योगायोगाने मी वसंत पाचरणेशी बोलायला लागले.त्याने मला “कुसुमानील” हे कुसुमावती देशपांडे आणि कवी अनिल यांच्या पत्रांचा संग्रह असलेलं पुस्तक वाचायला दिलं,त्यानंतर मी अनिल, बी,बोरकर, पद्मा गोळे,भा.रा.तांबे यांचे कविता संग्रह वाचले, वसंत पाचरणेची मैत्री माझ्या आयुष्यातला टर्निंगपाॅईंट ठरली आहे.

संशयास्पद ठरली तरी ती निखळ, स्वच्छ मैत्री होती, वयाची पासाष्टी ओलांडल्यानंतर स्वतःकडे तटस्थपणे पहाताना हेच जाणवतं काॅलेज मधल्या त्या मैत्री मुळेच पुढील आयुष्यात माझ्या जाणिवा प्रगल्भ झाल्या !

प्रतिकुल परिस्थितीतून बाहेर पडून काव्यक्षेत्रात पाय ठेवता आला,काव्यक्षेत्रात अनेक चांगले मित्रमैत्रीणी मिळाल्या, सगळ्यांचीच नावं घेणं शक्य नाही नाहीतर हा लेख म्हणजे केवळ नामावलीच होईल!

या लेखात मी फक्त मित्र हाच विषय घेतला आहे,वर उल्लेख केलेल्या मैत्रीणी ज्या काळात होत्या तेव्हा कुणीही मित्र नव्हता!

काव्यक्षेत्रातला विशेष उल्लेखनीय  मित्र म्हणजे अॅडव्होकेट प्रमोद आडकर रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष, रंगत संगत या संस्थेशी १९९३ पासून निगडित आहे.या संस्थेत सूत्रसंचालनाच्या अनेक संधी मिळाल्या,साहित्य, नाट्य,कला क्षेत्रातील अनेक मातब्बर लोकांना भेटता आलं! अनेक कविसंमेलनाच्या  आयोजनात सहभागी होता आलं!

रंगत संगत ची कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिले,एकूण ही कारकीर्द समाधान कारक!

या सात आठ वर्षांत व्हाॅटस् अॅप ग्रुप मुळे शाळेत असताना वर्गातील न बोलणारी मुलं आता चांगले मित्र झाले आहेत, पन्नालाल कोठारी,दीपक भटेवरा,सुभाष जैन, दिलीप बोरा, धरमचंद फुलफगर, राजू वाघ डाॅ ढवळे इत्यादी अनेक चांगले मित्र  व्हाॅटस अॅप मुळे मिळालेले !

आणखीन एका मित्राचा उल्लेख  मला करायचा आहे, मी त्यांना भाईसाब म्हणते आणि आमची अजूनही प्रत्यक्ष भेट झालेली नाही,पण खूप चांगली दखल घेऊन मला सतत लिहितं ठेवणारे ईअभिव्यक्ती चे संपादक श्री.हेमंत बावनकर हे सुद्धा एक चांगले मित्र आहेत.

माझ्या आयुष्यात मैत्रीणींचं स्थानही खूप महत्वाचं आहे. ही “सहेलियोंकी बाडी” ही खूप संपन्न आहे पण मैत्रबनात मला मुख्यत्वेकरून मित्रांचाच उल्लेख करायचा होता कारण स्त्रीपुरूष मैत्री कडे अजूनही दुषित नजरेने पाहिले जाते !

स्री च्या आयुष्यात बाप, भाऊ,नवरा, प्रियकर या नात्यांइतकंच मित्र हे नातं महत्त्वाचं आहे……या निखालस  नात्याचे नितांत सुंदर अनुभव मी घेतले आहेत.

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments