सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – डाॅ.सोनिया कस्तुरे,  सुश्री ज्योत्स्ना तानवडे आणि सुश्री दीप्ती कुलकर्णी – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

डाॅ.सोनिया कस्तुरे

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

सुश्री दीप्ती कुलकर्णी

💐 मनःपूर्वक अभिनंदन 💐

सर्वद फाउंडेशन, मुंबई या संस्थेतर्फे दिले जाणारे राज्यस्तरीय  स्टार साहित्य पुरस्कार जाहीर झाले असून  २०२४ चे पुरस्कार  आपल्या अभिव्यक्ती परिवारातील साहित्यिका डाॅ.सोनिया कस्तुरे, सुश्री ज्योत्स्ना तानवडे आणि सुश्री दीप्ती कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आले आहेत. या साहित्यिकांचा आम्हाला अभिमान वाटतो. परिवाराकडून त्यांचे मनःपूर्वक  अभिनंदन  आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेछा .

💐 ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे डाॅ.सोनिया कस्तुरे, सुश्री ज्योत्स्ना तानवडे आणि सुश्री दीप्ती कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 💐

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ होळी आहे… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ होळी आहे☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

नकोत काही चिंता खंता

प्रेमभराने भेटूया

होळी आहे चला गड्यांनो

आनंदाने खेळूया …

 

नकोत दावे उण्यादुण्याचे

नको पवाडे आत्मस्तुतिचे

दिवस आठवत बालपणीचे

ओळखपाळख ठेवत आपण

मुक्त होउनी नाचूया …

 

कुठून आलो कुठे चाललो

वाढत गेलो जगू लागलो

वेळप्रसंगी हसलो रडलो

घडायचे ते घडून गेले

क्षणभर सारे विसरूया …

 

ऐलतिरावर  पैलतिरावर

बांधत आलो काचेचे घर

विशाल धरतीच्या पाठीवर

उरले सुरले आपल्या हाती

प्रेम जगाला वाटूया …

 

जगत राहिलो खेळत खेळी

स्वानुभवाने भरली झोळी

ओळखताना मने मोकळी

माळी होऊन कल्पकतेने

बाग फुलांची फुलवूया …

 

जाणे येणे इथे चालते

कुठे कुणाचे अडून बसते

नवे जोरकस उगवून येते

अंकुरणा-या नव्या पिढीला

मार्ग चांगले दावूया …

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #230 ☆ मोगलाई… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 230 ?

मोगलाई ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

दार उघडाया आता घाबरते चिऊताई

कावळ्याच्या रुपामध्ये नराधम दिसे बाई

*

रात्र झाली खूप होती झोपत का पिल्लू नाही

चिऊताई पिल्लासाठी गात होती गं अंगाई

*

पडताच अंगावर सूर्य किरणं कोवळी

झटकून आळसाला फुलल्या या जाई जुई

*

पाखरांची चिव चिव उठताच ही सकाळी

चारा शोधण्याच्यासाठी झाली साऱ्यांचीच घाई

*

तुला पाहताच घास बाळ आनंदाने खाई

साऱ्या बालंकांची तेव्हा असतेस तू गं ताई

*

चिमण्या ह्या गेल्या कुठे दिसायच्या ठायी ठायी

अचानक आली कशी त्यांच्यासाठी मोगलाई

*

नातं भावाचं पवित्र सांगा निभवावं कसं

आता तर गुंडालाही म्हणू लागलेत भाई

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जलदिन… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ जलदिन… ☆ सौ कल्याणी केळकर बापट

सध्या तीन चार दिवस झालेय विदर्भातील हवामान एकदम बदललयं.दिवसभर ऊनं असतं आणि अचानक संध्याकाळ झाली की जणू पूर्ण आभाळ घेरुन येतयं.अंधार पसरतो.सगळीकडे मळभ दाटल्यागतं उदास वाटू लागतं.मार्च एंडिंगच्या कामामुळे तसही संध्याकाळी सहा वाजतातच बँकेतून निघायला.

अशाच कालच्या संध्याकाळी स्कुटरवरुन परत येत असतांना अंधारुन आलं, सगळीकडे गच्च झालेल्या आभाळानं उदासलेलं वाटू लागलं. गार वारं वाहू लागलं. हवामान आणि वातावरणात सुध्दा एक प्रकारची नैराश्येची चादर पसरल्यागतं वाटतं होतं.

तेवढ्यात पावसाच्या पाण्याचे अलगद टपटप दोन तीन थेंब अंगावर पडले आणि काय सांगू ह्या अगदी इटुकल्या पिटुकल्या दोनचार पाण्याच्या थेबांनी वातावरणातील एकदम नूरच पालटला. गाडीने मस्त आपोआप स्पिड घेतला. हिंदी गाणे आठवायला लागले. आतापर्यंत गाडी चालवणे कंटाळवाणं वाटतं होतं ते अचानकच हवहवसं वाटू लागलं.अगदी “ए हँसी वादियाँ, ये खुला आसमाँ” गत फील आला बघा. ह्या पाण्याच्या दोनचार थेंबांनी अगदी जादूच करुन टाकली.आणि त्या क्षणी पाण्याला “जीवन” ह्या अर्थपूर्ण शब्दानी का संबोधतात हे परत एकदा नव्याने कळलं.

22 मार्च .”जागतिक जलदिन”

संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हणजेच युएनओ च्या सर्वसाधारण सभेने 22 मार्च 1993 साली “फर्स्ट वर्ल्ड वाँटर डे” घोषित केला.ह्याचं सगळं श्रेय डॉ. माधवराव चितळे ह्यांना जातं. त्यामुळेच 2015 साली जलदिनाच्या रौप्य महोत्सवाच्या निमीत्ताने त्यांना “स्टाँक होम” ह्या जल पुरस्काराने गौरविण्यात आले.

मी एक शेतकरी पण असल्याकारणाने माझ्यालेखी खरोखरच पाण्याचे महत्त्व अपरंपार आहे.कारण शेतीचा श्रीगणेशा करतांना आधी ह्या पाण्याशिवाय,जीवनाशिवाय एक पाऊलही पुढे  टाकता येत नाही. आधी पावसाचे पाणी जमिनीत मुरेल आणि मगच ह्या पाण्याचे स्त्रोत तयार होऊन शेतीला,पिण्यासाठी ह्याचा उपयोग होईल.

दुर्दैवाची गोष्ट तर अशी आहे की दिवसेंदिवस जंगल आणि रिकाम्या जमीनी कमीकमी होतात आहे आणि त्याची जागा अजस्त्र इमारती, सिमेंटची जंगल ह्यांनी घेतलीयं. लोकांना व सरकारला पाण्याचा व शेतात पिकणाऱ्या पिकापेक्षा निवा-याचा,घरांचा प्रश्न खूप मोठा वाटतोय. माझ्या बघण्यात असे कितीतरी लोकं आहेत की ज्यांच्याकडे राहत्या घराशिवाय दोन चार घरं,फ्लँट गुंतवणूक म्हणून रिकामी घेऊन पडलीय.मध्यंतरी एक छान आर्टीकल वाचायला मिळालं होतं. त्यात लिहीलं होतं राहण्यासाठी प्रत्येकाला एक घरच फक्त घेता येईल बाकी सगळी जमीन जंगलं, शेती, वेगवेगळी पिके ह्यासाठी वहिवाटीत आणता आली तर सगळीकडे सुजलाम सुफलाम होईल हे निश्चित.

अर्थात हे कोण्या एकट्याचे काम नव्हे. हे सरकार आणि त्यांना बरोबरीने साथ देणारी जनता असेल तरच हे शक्य आहे.कुठल्याही सरकारच्या आणि जनतेतील प्रत्येकाच्या मनात स्वार्थ, बुभूक्षिता सारखी हावरी वृत्ती ह्याबद्दल चीड निर्माण होऊन फक्त आणि फक्त देशप्रेमाची ज्योत मनात तेवत राहील तेव्हाच हे शक्य होईल. त्यामुळे सध्याची सगळी अवतीभवती ची परिस्थिती बघता आपण ह्या चांगल्या दिवसांचा,चांगल्या वृत्तीचा विचारही करु शकत नाही.

पाण्याचा स्त्रोत प्रदुषित न करणे,योग्य व आवश्यक तितकाच पाण्याचा वापर ह्या किमान गोष्टी तरी प्रत्येकाने पाळल्या तरच ठीक अन्यथा पाणी पाणी करीत सगळा -हास होण्याचा दिवस काही दूर नाही.

सरकारने चांगल्याचांगल्या योजनांसाठी प्रामाणिकपणे फंड उपलब्ध करून द्यावा, अधिकारी वर्गांनी प्रामाणिकपणे पणे कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता त्या फंडाचा त्याच लोकोपयोगी कामासाठी विनीयोग करावा व जनता जनार्दनाने त्या दिलेल्या गोष्टींना जागून आपल्या देशाचा विकास व उन्नती कशी होईल ह्याकडे लक्ष पुरवावं. अशी त्रिमूर्ती ची एकजुट आपल्या देशाला सुजलाम सुफलाम करेल हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ओली भेळ आणि गेलेली वेळ…! — लेखिका : सुश्री रमा ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? जीवनरंग ?

☆ ओली भेळ आणि गेलेली वेळ…! — लेखिका : सुश्री रमा ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

खूप दिवसांनी पक्याचा फोन… 

“नाक्यावर भेट, सत्याच्या भेळ कट्ट्यावर… सगळेच येतोय…”

सलग तीन दिवस सुट्टी आली होती… घरात जाम सडलो होतो. मॅच, वेब सिरीज सगळं पाहून झालं, पोटभर झोप काढून झाली, चवीचवीचं खाऊन झालं, तरी कंटाळा आला होता… आत्ता पक्याचा फोन आला आणि अंगात एकदम तरतरी आली !

बायकोला सांगून निघणार इतक्यात छोटी चिमणी आडवी आली… “बाबा, तू आज मला बागेत नेणार होतास, आता नको जाऊ बाहेर!”

“नेक्स्ट संडे जाऊ नक्की हां…” हे मी म्हणता क्षणीच भला मोठा भोंगा सुरू झाला.

मग बायको आडवी आली, “कशाला चिमूला उगाच प्रॉमिस करतोस? आज मला पण बाहेर पाणी पुरी खायला घेऊन जाणार होतास… दोन दिवस झाला ना आराम? साड्यांच्या एक्झिबिशनला पण घेऊन जाणार होतास!”

“नेक्स्ट संडे नक्की…”

“गेला महिना भर हेच सांगतोय तू…!” डोळे वटारून बायको करवादली, बॅकराऊंड ला भोंगा सुरूच होता.

“आम्ही मित्र किती दिवसांनी भेटत आहोत गं…”

“मॅच पाहायला आत्ता दहा दिवसांपूर्वी एकत्र जमला होतात ना…?”

बाकी कुंडली बाहेर यायच्या आत वटारलेले डोळे आणि चिमणा भोंगा दोन्हीकडे दुर्लक्ष करून मी पळ काढला.

भेळ कट्यावर आलो… सत्या भेळेच्या दुकानात गिऱ्हाईक सांभाळत होता. बाहेरून मी तोंडाने ‘टॉक’ आवाज करून त्याला बोलवलं.. 

“बस कट्ट्यावर… येतो अर्ध्या तासात…”

मी एकटाच लवकर आलो होतो. अजून कुणी चांडाळ जमले नव्हते. मी सुकी भेळ घेऊन आलो… मनात सत्या दिवसाला कसा आणि किती छापत असेल याचा हिशोब मांडत बसलो.

सुट्टीमुळं दुकान भरलेलं होतं. सत्या, त्याचा भाऊ आणि बापू फुल्ल खपत होते…

इतक्यात एक आज्जी-आजोबा आले. आजोबांचं वय अंदाजे ७० आणि आजीचं ६५ असावं. आजीला त्यांनी दुकानाच्या गर्दीत न बसवता माझ्या इथं मोकळ्या कट्ट्यावर बसवलं. 

“बाळा, मी आत जाऊन भेळ सांगून येतो. जरा हिच्याकडे लक्ष ठेवशील का?”

“हो… या…” इती मी.

मनात विचार आला… ‘वा ! काय हौस आहे भेळ खायची आजी आजोबांना… इथे आपण बायकोला अजून टांग मारतो!’

आजी शून्यात बघत बसल्या होत्या. चेहरा एकदम निर्विकार. आजोबा आले आणि आजीशी गप्पा मारायला लागले. पण आजीच्या चेहऱ्याची रेष हालेल तर शपथ…

“आज त्याला सांगितलंय… दाणे घालू नको, तुला त्रास होतो ना चावायला, जास्त कोथिंबीर, जास्त शेव पण घालायला सांगून आलोय. येईलच सत्या भेळ घेऊन हां…” आजोबा  आजीच्या हातावर थोपटत बसले. पण आजी एकदम फ्रीझ मोड मध्येच.

तितक्यात मिल्या आणि विक्या आले. एकेक कटींग मागवून आमच्या गप्पा सुरू झाल्या…

सत्यशील छोट्याशा द्रोणात भेळ घेऊन आला. ती त्यानं आजोबांना दिली, त्यांना वाकून नमस्कार केला, “आजी भेळ खाऊन आवडली का सांग गं!” असं काही बोलून आम्हाला जॉईन झाला. 

सत्या कस्टमर्सशी इतकी सलगी का दाखवत होता, हे आम्हाला समजलंच नाही. सत्याचं हे रूप आम्हाला नवीनच होतं. खुणेनं मी त्याला ‘काय हे?’ असं विचारलं, तेव्हा “आई आली की सांगतो,” म्हणाला मग आम्ही पण जास्त विचारत बसलो नाही.

आमच्यात सगळ्यात अतिशहाणा मिलिंद होता… चहा पित फिदीफिदी हसत म्हणाला, “काय राव रोमँटिक आहेत आजोबा… दोघं एका द्रोणात भेळ खातायत!”

सत्यानं त्याला जोरात चिमटा काढून गप केलं. पण आजोबांनी ऐकलंच आणि त्याला जवळ बोलावलं… 

“अरे बाबा, करायच्या वेळी रोमान्स केला असता तर काय हवं होतं रे? आज ही वेळ कदाचित आलीच नसती… पण एक लक्षात ठेव, आपल्याला माहीत नसेल, तर आपण काही बोलू नये!”

मिलिंद एकदम वरमला. आजीच्या नजरेतला तो निर्विकार भाव पाहून मिल्या अस्वस्थ झाला. मिल्यानं माफी मागितली आणि आमच्या कंपूत सामील झाला.

सत्यानं आणि मी मिलिंदला चागलं झापलं. तितक्यात सत्याई सत्याच्या बापूला घरचा चहा घेऊन आली. 

प्रेम करण्यात या बायकांचा हात कुणी धरू शकत नाही… भेळेच्या दुकानाशेजारी चहाची टपरी आहे, पण सत्याई, बापूला घरचाच चहा आवडतो, म्हणून घरून चहा करून आणते. सत्याच्या आईला आम्ही ‘सत्याई’ म्हणत असू. 

सत्यानं आईला हाक मारली आणि त्या आजी आजोबांची गोष्ट आम्हाला सांगायला सांगितली. मग सत्याईनं जे सांगितलं ते सगळं अचंबित करणारं होतं!

आजोबांचं नाव अविनाश भोळे… नाव ऐकून आम्ही एकदम चमकलो! भोळे कंपनीच्या उदबत्त्या, धूप, लोबान आजही घराघरात वापरले जात होते. आमच्या लहानपणापासून आम्ही घरात ‘A.B.’ कंपनीच्याच उदबत्या वापरल्यात… ते हे भोळे…? 

सत्याई सांगत होती… 

भोळे आजोबांचा तेव्हा एक छोटासा धंदा होता. आजोबांचं लग्न उषा आजीशी झालं आणि आजोबांना त्यांच्या धंद्यात एकदम यश मिळायला लागलं. कामानं आणि यशानं एकदम वेग घेतला. लग्नानंतरचे नवतीचे दिवस फुलपाखरू बनून उडून गेले. 

सुरुवातीला आजोबा जमेल तसा वेळ आजीला द्यायचे. पण हळू हळू सगळं बदलत गेलं… आजोबांना कामाची, यशाची, पैशाची झिंग चढत गेली.

बघितलं तर सगळं आलबेल होतं. लक्ष्मी घरी पाणी भरत होती. सुबत्ता होती, पण सगळं गोड असून कसं चालेल ना! यात वाईट एकच गोष्ट अशी होती, की आजीची कूस उजवत नव्हती… आजी या दु:खात होती आणि आजोबाही कामात खूप गुंतत गेले होते. त्यांना सुद्धा या गोष्टीची खंत होती पण ते कामात मन गुंतवून घेत होते. आजी मात्र हा मानसिक त्रास एकटी सहन करत होती.

आजी मनापासून आजोबांचं सगळं करायची… खाण्या पिण्याच्या वेळा, आवडी निवडी… पण आजीलाही काही इच्छा असतील, ती मातृसुखासाठी आसुसलेली आहे, मनानी कष्टी आहे, तिलाही काही हवं नको पाहायला हवं, वेळ द्यायला हवा, हेच आजोबा विसरले होते. 

आणि एक दिवस चमत्कार झाला… आजीला बाळाची चाहूल लागली ! आजीला वाटलं आता तरी आजोबा वेळ देतील, पण आता आजोबांना कामापुढे काही सुचत नव्हतं.

घरी काळजी घेणार मोठं कुणी नव्हतं. एक मुलगी त्यांनी आजीची काळजी घ्यायला सोबत आणून ठेवली होती. पण आजीला आजोबांची गरज होती. आजोबा म्हणायचे, “आता छोटे भोळे येतील, तर व्यवसाय अजून वाढवूयात…” ते सतत काम-काम-काम हाच जप करायचे. 

यातच आजीला सतत आंबटचिंबट खायचे डोहाळे लागले.. सोबतीची मुलगी हवं ते बनवून देई, पण एक दिवस आजीनी हट्ट केला की तिला बाहेरचीच ओली भेळ खायचीय!

आजोबा म्हणाले, “घरी बनवून खा.” 

आजी म्हणाली, “नाही खाणार.” 

आजोबा म्हणाले, “घरी आणून देतो!”

आजी म्हणाली, “तशी नाही खाणार… आपण सोबत जाऊन एकाच ताटलीत बाहेरच खायची…!” 

महिना झाला… आजीला आजोबा ‘आज जाऊ’, ‘उद्या जाऊ’ करत होते.

एक दिवस आजी हट्टालाच पेटली. रड रड रडली… “नाही नेलं आज तर आत्ताच माहेरी निघून जाईन, परत येणार नाही,” म्हणाली.

हे शस्त्र उपयोगी ठरलं. आजी एका संध्याकाळी गजरा माळून, सजून धजून तयार राहिली, पण आजोबा आलेच नाहीत! आजींनी कामाच्या ठिकाणी टेलिफोन केला तर आजोबा मीटिंग घेतायत असं कळलं… 

डोहळतुली बाई काही वेळा हळवी होते, काही वेळा चिडचिड करते. तिच्या मनाचे कल बदलत असतात.

आजोबा सांगून पण आले नाहीत याचा आजीला खूप राग आला… तिरीमिरीत आजी उठली, भलं थोरलं पोट घेऊन निघाली आणि उंबर्‍याला अडकून पडली…! क्षणात सगळं बिनसलं… होत्याचं नव्हतं झालं…!!!

आजी मरणाच्या दारातून परत आली… पण येणारा नवा जीव यायच्या आधीच देवाला प्यारा झाला! याचा आजीला भयानक मानसिक धक्का बसला. ती पडली तेव्हा डोक्याला वर्मावर मार बसला म्हणून, की बाळ गेलं हा मानसिक धक्का बसून, माहीत नाही… पण आजी ही अशी झाली!

तिची अनेक गोष्टींची पार ओळखच पुसली गेली. देव, यांत्रिक मांत्रिक, डॉक्टर, सगळं झालं, पण आजी अशी निर्जीव झाली ती आज पर्यंत. आजोबा या गोष्टीमुळं खूप हादरले… या सगळ्याला त्यांनी स्वतःला जबाबदार धरलं.

चाळीस वर्षांपूर्वीचा तो दिवस आणि आजचा दिवस… आजोबा आजीला महिन्यातून एकदा तरी भेळ खायला घेऊन येतात. त्यांना वाटतं कधीतरी भेळ खाऊन तिला जुनं काही आठवेल. तिला आपण आठवू, तिचा सगळा राग ती बाहेर काढेल. आजही ते म्हणतात… 

“देव मला इतकी कठोर शिक्षा देणार नाही… तिला एकदा तरी मी आठवेन!”

आजोबांकडे बघितलं तर आजोबा आजीला प्रेमानं एकेक घास भरवत होते.

“सत्याई, तुला कसं माहीत गं हे सगळं?” विक्यानं विचारलं.

“अरे, आजीला सोबतीला जी मुलगी ठेवली होती ना, ती मीच होते ! हे सगळं माझ्या डोळ्यासमोर घडलंय…!”

आम्ही सगळे वेगळ्याच मूड मध्ये गेलो होतो… मला एकदम तो चिमणा भोंगा आणि माझं वटारलेल्या डोळ्यांच प्रेम आठवलं…

“चल यार, मी निघतो… चिऊला बागेत आणि हिला पाणी पुरी खायला घेऊन जायचंय!”

आजी-आजोबाही भेळ खाऊन निघाले… सत्या आणि मी पटकन त्यांना आधार देऊन त्यांच्या गाडीपाशी सोडायला आलो. तितक्यात सत्याईनं एक चाफ्याचं फुल आणून आजीच्या अंबड्यात खोचलं. चाफा चाचपत आजी पहिल्यांदा एकदम गोड हसली. आजोबा पण त्यामुळे खुष झाले. 

दोघं गाडीत बसताना आजोबा म्हणाले, “मुलांनो, तरुण आहात, एक सांगतो… ऐका, वेळेला जपा… आज करायचं ते आजच करा! एकदा का वेळ गेली की गेली… मग आयुष्यात येतो तो फक्त यांत्रिकपणा…!” 

आणि आजीकडे बघत म्हणाले, “ओली भेळ कशी लगेच खाण्यात मजा, नंतर ती चिवट होऊन जाते! मला हे समजलं तेव्हा खूप उशीर झाला होता. म्हणून सांगतो… आयुष्यात योग्य वेळीच प्रत्येक गोष्टीला न्याय द्यायला हवा. उद्याची खात्री द्यायला आपण देव नाही… कायम ‘आज’ मध्ये जगा. चला निघतो, उषा दमली असेल आता !”

…. हे ऐकून डोळ्यात पाणी कधी जमा झालं, समजलंच नाही… पण सगळ्यांना ‘बाय’ करून मी सुसाट वेगानं घरी निघालो…

लेखिका : सुश्री रमा

संग्राहक : श्री मेघ:श्याम सोनावणे.  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ इटुकली — ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

??

इटुकली — ☆ डॉ. जयंत गुजराती

घरभर फिरली भिरभिरत्या पंखाने. अक्षरशः नाचतच होती इथून तिथे. पाय म्हणून, ठरतच नव्हते. जणू सगळं घाईचंच होऊन बसलं होतं. सांगावंसं वाटलं, अगं जरा हळू चाल…. पण ती काही ऐकणार नव्हती. तिचं आपलं निरीक्षण चालू होतं दिवसभर बस्तान कुठे बसवायचं ते. तिच्या चिवचिवाटाने कान कावले होते. मधूनच ती गायब होई. पुन्हा काहीवेळात खिडकीच्या गजावर दिसे. मग हॉलभर फिरे.  किचनमधे उडे, व्हरांड्यातून तर सारखी येजा. बेडरूममधे ही चक्कर मारून आली. कधी ट्युबलाईट वर विसावे तर कधी पंख्यावर विसावे. कधी कपाटावरचा कोपरा धुंडाळे तर कधी खोल्यांमधल्या दारांवरून सूर मारे.  शेवटी वैतागून मीच तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवलं. 

दुसऱ्या दिवशी सकाळीस ती लगबगीत असलेली इटुकली दिसेना म्हणून मीच अस्वस्थ झालो. बायको म्हणाली, ‘येईल पुन्हा, ’ मी वर्तमानपत्र हातात घेऊन स्वस्थ होण्याच्या प्रयत्नात. पण थोडंफार वाचून झाल्यावर, वर्तमानपत्र हलकेच खाली सरकलं जाई, मग माझी नजरच भिरभिरायला लागे. ती कुठेच दिसेना तर पुन्हा डोकं वर्तमानात खुपसलं.  तसाच ऑफिसला गेलो. मनात प्रश्नचिन्ह घेऊन, ‘ कुठे गेली असेल? ’ दिवसभर मीच ‘चिवचिव’ला अधीर. संध्याकाळी घरी आलो तरीही घरभर शांतताच. अगदी अचानक आलेली पाहुणी अलोप व्हावी याची रूखरूख मनात. 

सकाळीस जाग आली ती घागर हिंदकळावी खळखळून तसं हिचं  माझे दोन्ही बाहू धरून उठवणं चालू होतं.  काय? माझा प्रश्नचिन्ह असलेला चेहेरा पाहून ती बोलली. चला वरती हे बघा पोटमाळ्यात काय आहे ते!! धडकीच भरली. असं काय असेल सकाळी सकाळी पोटमाळ्यावर? मी तडक पाहिलं तर पोटमाळ्यावर एक कोनाडा रिकामा सुटलेला होता त्यात लगबगीनं ती इटुकली व तो पिटुकला वरच्या कौलांतून  व पोटमाळ्याच्या त्रिकोणी खिडकीतून वाट काढत गवताच्या काड्या व काटक्या गोळा करून आणून टाकत होते. बस्तान बसवायला जागा सापडली तर मी मनात खुश होऊन पुटपुटलो. खाली येताच छानशी शीळही घातली मी. तसं आल्याचा चहा हातात देत बायकोने कोपरखळी मारलीच. ‘ आली ना परत पाहुणी!! झाला ना मनासारखा शेजार!! ’ मीही चहाचा घोट घेत फिरकी टाकलीच, ‘ सखी शेजारिणी!! ’ तसं दोघं हसत सुटलो. 

दोन तीन दिवसात हॉल कम बेडरूम कम सबकुछ छानसं घरटं उभं राहिलं. त्यात कुठूनतरी कापूसही आणून टाकला होता बहुतेक पिटुकल्याने. बोर्ड लावायचं का? हिचं तुणतुणं चालूच. डोळ्यात मिश्कीली. तर माझ्यात पुन्हा प्रश्नचिन्ह. तिनंच खुलासा केला, ‘ छोटंसं बॅनर, नांदा सौख्यभरे! ’ आता माझ्यापेक्षा हीच जास्त गुंतत गेली. मातीचं खापर आणलं बाजारातून त्यात पाणी भरून ठेवलं. रोज वाटीभर मऊसूत भातही पोटमाळ्यावर पोहोचायला लागला. “ आणखी काय काय आवडतं हो खायला त्यांना, मी करत जाईन तेवढं!! ” मला तसं म्हटलं तर पाखरांबद्दलचं ज्ञान अगाधच!!  पोपट असता तर हिरवी मिरची, पिकलेला पेरू वगैरे सांगून तरी टाकलं असतं. मग हिनेच शक्कल लढवत, शिजवलेले तेही वाफाळलेले हिरवे मूग, वाफाळलेलेच मिठातले शेंगदाणे, लालचुटूक डाळिंबाचे दाणे अन् काय काय सुरू केलं!! मी आपला प्रश्नकर्ता नेहेमीचाच…. “ अगं इतकं सगळं लागतं का त्यांना? ” हिनं मान डोलावत चपखल उत्तर दिलं. “ तुम्हाला नाही कळायचं, डोहाळे लागले की लागतंच सगळं!! ” प्रश्नचिन्हा ऐवजी माझे डोळे विस्फारलेले. “ तुला कसं कळलं शुभवर्तमान? ” “ बघाच तुम्ही, मी म्हणतेय ते खरं की नाही? ’ तसं हीचं काहीच चुकत नाही. काही दिवसांतच सहा अंडी प्रकट जाहली मऊसूत कापसावर.  

मग काय इटुकली ठाण मांडून कोनाड्यात तर पिटुकल्याची येजा वाढली आतबाहेर. घरात कोवळे जीव वाढणार याचा कोण आनंद आम्हा दोघांना, त्या दोघांसह.  चैनच पडेना. सारखी उत्सुकता. ऑफिसमधूनही हिला विचारणं व्हायचं, “ एनी प्रोग्रेस? ” दिवसातून दोन तीनदा पोटमाळ्यावर चढणं.  काही हालचाल दिसतेय का? हे पाहणं! अजून काहीच कसं नाही? हा प्रश्न खांबासारखा उभाच. “ सगळं निसर्गनियमा सारखं होईल, धीर धरा. ” हिचा मोलाचा सल्ला. तरीही आतून आमचाच जीव वरखाली!! खरंतर आमचे अगोदर कावलेले कान आतुरलेले कोवळी चिवचिव ऐकण्यासाठी. 

(२०/०३/२०२३ – # जागतिक चिमणी दिवस)  

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ झुळुक… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ झुळुक… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

 ‘ वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, 

  घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे ‘

माझ्या बाल्कनीतल्या झोक्यावर संध्याकाळी बसले की मन असे स्वैरपणे फिरत असते. तीन-चार वर्षांपूर्वी लॉकडाऊनच्या काळात बाहेर फिरता तर येत नसे, पण या झोक्यावर बसून मन मात्र भरपूर फिरून येई. दिवसभराच्या उन्हाच्या काहिली नंतर येणारी संध्याकाळची वाऱ्याची झुळूक तन आणि मन दोन्ही शांतवून टाकते. थंडी किंवा पावसाळ्यात या झुळूकेचे तितके महत्त्व नाही ,पण उन्हाळ्यात ही झुळूक खूपच छान वाटते! दु:खानंतर येणार सुख जसं जास्त आनंद देते तसेच आहे हे!

सतत सुखाच्या झुल्यावर झुलणाऱ्याला ती झुळूक कशी आहे हे फारसे जाणवणार नाही, पण खूप काही कष्ट सोसल्यानंतर येणारे सुखाचे क्षण मात्र मनाला गार  वाऱ्याच्या झुळूकीचा आनंद देतात!हीच झुळूक कधी आनंदाची असते, 

कधी मायेची असते. एखाद्याला घरात जे प्रेम मिळत नाही पण दुसऱ्या कुणा कडून तरी, अगदी जवळच्या नात्यातून, शेजारातून किंवा मित्र-मैत्रिणींकडून मिळते तेव्हा तो प्रेमाचा सुखद ओलावा ही त्याच्या मनाला मिळालेली आनंदाची झुळूक असते!

कधी कधी साध्या साध्या गोष्टीतूनही आपण आनंद घेतो. गर्दीने भरलेल्या बसमध्ये कशीबशी जागा मिळून बस जेव्हा सुटते, तेव्हा खिडकीतून येणारी वाऱ्याची झुळूक आपल्याला’ हुश्श’ करायला लावते. कधी अशी झुळूक एखाद्या बातमी तून मिळते. अपेक्षा नसताना एखादी चांगली गोष्ट घडली तर ती सुखद झुळुकीसारखीच असते. माणसाचे आयुष्य सतत बदलत असते. कधी एकापाठोपाठ एक इतकी संकटे येतात की त्या सर्वांना कसे तोंड द्यावे कळतच नाही! पण अशावेळी अचानकपणे एखादी चांगली गोष्ट घडते की, त्यामुळे आयुष्याला कलाटणी मिळते!

माझ्या परिचित एका मैत्रिणीची गोष्ट. तिच्या नवऱ्याचा एक्सीडेंट झाला. जीव वाचला पण हॉस्पिटलमध्ये दोन महिने पडून राहावे लागले. दोन लहान मुली होत्या तिला. नवऱ्याचा व्यवसाय बंद पडलेला.. राहायला घर होते पण बाकी उत्पन्नाचे साधन नव्हते. पण अचानकपणे तिने अर्ज केलेल्या नोकरीचा कॉल आला. ट्रेनिंग साठी एक महिना जावं लागणार होतं, मुलींना आपल्या नातेवाईकांजवळ सोपवून ती ट्रेनिंग पूर्ण करून आली.आणि  नोकरी कायमस्वरूपी झाली आणि आयुष्यात सुखाची झुळूक आली.

वादळ वाऱ्यात झाडं ,घरं, माणसं सारीच कोलमडतात.. वादळ अंगावर घेण्याची कुवत प्रत्येकात असतेच असे नाही. पण ‘झुळूक’ ही सौम्य असते. ती मनाला शांती देते.

लहानपणी अशी झुळूक परीक्षेनंतर मिळायची. भरपूर जागरणे, कष्ट करून अभ्यास करायचा आणि मग पेपर्स चांगले गेले की मिळणारा आनंद असाच झुळूकीसारखा वाटायचा! रिझल्ट ऐकला की मन अगदी हलकं फुलकं पीस व्हायचं आणि वाऱ्यावर तरंगायला लागायचं! अशावेळी कृतकृत्यतेची झुळूक  अनुभवायला मिळायची!

वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या रूपात ही झुळूक आपल्याला साथ देते. कधी कधी आपण संकटाच्या कल्पनेने ही टेन्शन घेतो. प्रत्यक्ष संकट राहत दूर ,पण आपलं मन मात्र जड झालेलं असतं! अचानक कोणीतरी सहाय्य करते , आणि संकट दूर होते. एका आगळ्या झुळुकेचा अनुभव मनाला येतो.

कोरोनाच्या काळात आपण अशाच कठीण परिस्थितीतून जात होतो. मन अस्थिर झालं होतं. जीविताची काळजी, भविष्याची काळजी दिसून येत होती. प्रकृती आणि नियती दोन्ही आपल्या हातात नाहीत! पण तेच कोरोनाचं संकट जसं दूर झालं, तशी मनामध्ये समाधानाची झुळूक येऊन गेली! काही काळातच रोगाचे उच्चाटन झालं आणि निसर्गाने हिरावून घेतलेले आपले स्वातंत्र्य पुन्हा आपल्याला मिळाले! ती ‘सुखाची झुळूक’ अशीच सौम्य आनंद देणारी होती. सोसाट्याचा वारा आणि वादळ माणसाला सोसत नाही, त्याचप्रमाणे संकटांचा माराही झेलताना माणसाला कठीण जाते! पण थोडंसं जरी सुख मिळालं तर ती ‘सुखाची झुळूक’ माणसाला आनंद देऊन जाते.

संकटाच्या काळावर मात करताना कुठून तरी आशाताई स्वर येतात, “दिस येतील, दिस जातील…” या गाण्याचे! कोणत्याही संकटाला कुठेतरी शेवट असतोच, जेव्हा एखादं वादळ परमोच्च क्षमतेवर असतं तेव्हा कधीतरी ते लयाला जाणारच असतं! ते वादळ जाऊन शांत झुळूक येणारच असते.पण तोपर्यंत त्या  वादळाला धीराने, संयमाने तोंड देत वाट पहावी लागते ! …. 

… तेव्हाच त्या वादळाचे झुळुकीत रूपांतर झालेले आपल्याला अनुभवायला मिळते !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एआय – मदतनीस की स्पर्धक… भाग – 1 ☆ श्री श्रीकांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ एआय – मदतनीस की स्पर्धक… भाग – 1 ☆ श्री श्रीकांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे  ☆

इंजिनिअर या नात्याने मी गेली ४० वर्षे ऑटोमेशन क्षेत्रात काम करतो आहे. या वाटचालीत मी ऑटोमेशन क्षेत्रातली प्रगती जवळून बघितली. त्या वाटचालीतला काही अंशी वाटा उचलला आहे. या चाळीस वर्षात अगदी साध्या manual मशीन पासून ते आजच्या ए-आयपर्यंतचा काल मी बघतोय. कमीतकमी मानवी श्रमामध्ये क्षमतेपेक्षा जास्त काम करून घेणे हे ऑटोमेशनचे सुरवातीचे उद्देश. पुढे केवळ मानवी श्रम कमी करणे हा उद्देश राहिला नाही तर या ऑटोमेशनच्या माध्यमातून कमीतकमी वेळात आणि श्रमात जास्तीत जास्त उत्पादन घेणे हे शक्य झाले आणि मशीन्स त्या उद्देशाने डिझाईन होऊ लागली. टकळी चरखा वापरून सुत काढणे यापेक्षा इलेक्ट्रिक मोटारवर चालणारी मोठमोठी स्पिनिंग मशीन हे सुत काढू लागली आणि कापडाचे उत्पादन प्रचंड वाढले. मी म्हणेन की ऑटोमेशनने कापड स्वस्त केले आणि चांगल्या गुणवत्तेचे कापड सामान्य माणसाच्या आवाक्यात आले. महात्मा गांधींचा चरखा-माग वापरून जर इतक्या लोकसंख्येला कापड पुरवायचे म्हणले तर निम्मा देश आज गांधींसारखा उघडा राहिला असता आणि एक चतुर्थांश देश जाडेभरडे हरक आणि मांजरपाट कापड वापरत असता. या कापडाचे प्रकार आजच्या पिढीला माहित देखील नाहीत. जसजसा काळ गेला ऑटोमेशनचा उत्पादन क्षमता वाढवणे या पलीकडे  आता वस्तूची गुणवत्ता आणि अचूकता वाढवणे हा झाला. कारण मानवाला अशक्य जमणारी गुणवत्ता आणि अचूकता मशीन सहज देऊ लागली. वर मी कपड्यांचे उदाहरण दिले. पण इतर अनेक क्षेत्रात ऑटोमेटेड मशीनने प्रवेश केला. जसे की, प्लास्टिक, घातु प्रक्रिया, शेती आणि एक ना अनेक. आज कोणतेही क्षेत्र ऑटोमेशन शिवाय नाही. ऑटोमेशनमुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादकता, अचूकता आणि गुणवत्ता देऊन मानवी जीवन सुकर करण्याऱ्या वस्तू सामान्य माणसाच्या आर्थिक आवाक्यात आणून दिल्या. यात अगदी गृहिणींच्या स्वयंपाकघरातील वस्तूंपासून वाहनापर्यंत अनेक गोष्टी सामन्यांच्या आवाक्यात आल्या. ऑटोमेशनमुळे आलेली गुणवत्ता ठीक आहे पण उत्पादकता आता राक्षसी होऊ लागली आहे. उत्पादकता वाढली तशी कॉस्ट कमी होऊ लागली आणि किंमती सामन्यांच्या आवाक्यात आल्या हे जरी खरे असले. उत्पादकता मानवी मर्यादेच्या पलीकडे जाऊ लागली तसा याचा परिणाम निसर्गावर होऊ लागला. जास्त उत्पादन करण्यासाठी लागणारे रॉ मटेरीअल निसर्गातून मिळवणे अपरिहार्य असल्याने निसर्ग ओरबाडला जाऊ लागला. नवीन तयार होणारा माल बाजारात प्रचंड प्रमाणात येऊ लागल्याने यातून use and throwवृत्ती वाढली आणि प्रचंड प्रमाणात कचरा निर्मिती होऊ लागली. मानवाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट ही कचरा निर्मितीचे पाहिले पाउल ठरू लागले. वस्तू गरजेतून घेण्यापेक्षा स्टेट्स सिम्बॉल म्हणून घेण्याची वृत्ती वाढू लागली. ऑटोमेशनच्या पुढच्या टप्प्यात जसे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल आणि software आधारित वस्तू आल्या तसे एकाच वस्तूंचे नवनवीन प्रकार (versions) आणि वैशिष्ठ्य (features) बाजारात येऊ लागले तसे वस्तूचे आपल्याकडील असलेले व्हर्जन जुने वाटू लागले. जुने टाकून नावे घ्या ही होड सुरु झाली. वस्तू टाकून देण्यासाठी ती निकामी होण्याची गरज राहिली नाही version जुने झाले out dated (obsolescence ) झाले, old fashioned झाले, हे वस्तू टाकून देण्याचे महत्वाचे कारण होऊ लागले. दर २ वर्षांनी बदलता मोबाईल, तीन वर्षांनी बदलती कार हे अभिमानाचे विषय होऊ लागले. हे घड्याळ माझ्या वडिलांनी १० वर्षे वापरले मग मी १५ वर्षे वापरले किंवा मी स्कूटर गेली १५ वर्षे उत्तम मेंटेन करून अजून वापरतोय असे अभिमानाने सांगणारी माणसे हास्यास्पद ठरू लागली.

ही सगळी प्रस्तावना करायचे कारण म्हणजे आता ए-आय येऊ घातले आहे नव्हे दारात उभे आहे. आजपर्यंत जे ऑटोमेशन घडत होते ते वस्तू उत्पादकता, वस्तू गुणवत्ता आणि अचूकता यासाठी घडत होते. मी या क्षेत्रात काम करताना उत्पादकता,गुणवत्ता आणि अचूकता या कारणांबरोबर एक सुप्त पण महत्वाचे आणि जास्त जाहीर चर्चा न केलेले कारण म्हणजे मनुष्यबळ कमी करणे हे हमखास असायचेच. एखादे ऑटोमेशन करण्याचे ठरवताना किती माणसे ते काम करत आहेत त्यातील किती कामगार कमी करता येतील किंवा दुसऱ्या कामावर वळवता येतील हा विचार करून ऑटोमेशन बजेट आणि आमचे कोटेशन मंजूर केले जाई. मनुष्यातले काही स्वभावतः असणारे दुर्गुण, भावनिक मूडवर असलेले अवलंबित्व  आणि बदलती परिस्थिती यातून हे ऑटोमेशन वाढत गेले. जिथे माणूस काम करणे शक्य आहे अशी कामे देखील यंत्रे करू लागली. वाढती मनुष्यबळ कॉस्ट, सततच्या आर्थिक मागण्या, कामचुकारपणा, अनाठायी सुट्ट्या घेणे, काही अवास्तव कामगार कायदे इत्यादीमुळे उत्पादन प्रक्रियेतील मनुष्यबळ काढून तिथे automated machine ने काम करून घेण्याकडे व्यवस्थापनाचा कल वाढू लागला. यातून NC/CNC/VMCमशीन्स, रोबोट, SPMs हे सर्रास येऊ लागले या मशीन्सची उत्पादकता मानवापेक्षा जास्त होतीच पण अचूकता आणि गुणवत्ता हा मोठा फायदा व्यवस्थापनाला आणि पर्यायाने ग्राहकाला मिळू लागला. उत्पादन क्षेत्रात ऑटोमेशन वाढले तसे softwareने ऑफिस ऑटोमेशन क्षेत्रात अचूकता, वेळेची बचत आणली. वेगवेगळ्या व्यवसायात घडणाऱ्या प्रत्येक activity चे dataस्वरुपात documentation होऊ लागल्याने प्रचंड data तयार होऊ लागला. हा data व्यवसायाची पुढील दिशा (Strategy) ठरवण्यास उपयुक्त ठरू लागला. निर्णय प्रक्रियेतला महत्वाचा घटक झाला. मानवी अनुभवला फारशी किंमत उरली नाही. त्यामुळे केवळ वयाच्या आणिअनुभवाच्या जोरावर प्रमोशन देणे. १९८४ साली मी फिलिप्स कंपनीत असताना word processorनावाचे electronic टायपिंग मशीन फिलिप्सच्या डायरेक्टरच्या केबिनमध्ये आले. ते फक्त डायरेक्टर आणि त्यांची सेक्रेटरी वापरत असे. साधे पत्र लिहिण्याचे मशीन पण आम्हाला ते वापरण्याची परवानगी नसल्याने त्याचे फार अप्रूप. हे मशीन वापरणारी त्यांची सेक्रेटरी लई भाव खायची याचा आमच्या मनात मत्सर होता. आता कॉम्पुटर ऑफिस ऑटोमेशनचा भाग झाल्याने सेक्रेटरीच्या भाव खाण्याचे आणि आमच्या जळण्याचे हसू येते. फिलिप्सच्या प्रत्येक मॅनेजरच्या केबिन बाहेर त्याची सेक्रेटरीचे टेबल आणि टाईप रायटर असे. आता कॉम्प्युटरमुळे मॅनेजरच राहिले नाहीत.

मशीन ऑटोमेशनमुळे उत्पादकता वाढली त्यामुळे काही कामातील मनुष्यबळ कमी झाले असले तरी बेकारी फारशी वाढली नाही कारण या वाढत्या उत्पाद्कतेमुळे नवी क्षेत्रे तयार होत होती आणि मनुष्यबळ तिकडे वळवले गेले. आर्थिक व्यवहार प्रचंड वाढले. या वाढीव आर्थिक व्यवहारांना सहजपणे तोंड देईल अशी बँकिंग प्रणाली विकसित झाली. 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री श्रीकांत कुलकर्णी

मो ९८५००३५०३७ 

Shrikaant.blogspot.com;  Shrikantkulkarni5557@gm

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

पुणे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सख्खं नातं सतत का देतं दुःख?… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ सख्खं नातं सतत का देतं दुःख?… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सख्ख्याच्याच ठायी का वसतात मत्सर, सूडबुद्धी, द्वेष आणि अहंकार की जो साधतो विध्वंस मानव जातीचा?

फक्त प्रेम करा !

सख्खा भाऊ, सख्खी बहीण, सख्खे काका, सख्खी काकू, सख्खी मावशी, सख्खी मैत्रीण…

नेमकं काय असतं हे ‘सख्खं प्रकरण?’

 

सख्खा म्हणजे आपला सखा.

सखा म्हणजे जवळचा. जवळचा म्हणजे ज्याला आपण कधीही, केव्हाही, काहीही सांगू शकतो.

त्याला आपलं म्हणावं,

 त्याला सख्खं म्हणावं !

 

सध्याच्या कलियुगात, आपण काय करतोय, हे सख्ख्या नातेवाईकांच्या कानावर पण पडता कामा नये, इतकी खबरदारी घेतली जाते.तिथे सख्य नसते, पथ्य असते.

 

ज्याच्या जवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो, मोठ्ठ्याने हसू शकतो किंवा काळजातलं दुःख सांगून स्फुंदून स्फुंदून रडूही शकतो, त्याला सख्खं म्हणावं, त्याला आपलं म्हणावं !

 

ज्याच्याकडे गेल्यानंतर, आपलं स्वागत होणारच असतं. आपल्याला पाहून त्याला हसू येणारच असतं.

अपमानाची तर गोष्टच नसते.’फोन करून का आला नाहीस’ अशी तक्रारही नसते !

 

पंढरपूरला गेल्यावर

विठ्ठल म्हणतो का,

“या या फार बरं झालं !”

 

माहूर वरून रेणुका मातेचा किंवा कोल्हापूर वरून महालक्ष्मीचा किंवा तिरुपतीहून गिरी बालाजीचा आपल्याला काही Whatsapp call आलेला असतो का ? या म्हणून !

मग आपण का जातो ?

कारण भक्ती असते, शक्ती मिळते आणि संकट मुक्तीची आशा वाटते ….म्हणून !

हापण एक प्रकारचा ‘आपलेपणाच’ !

 

लौकिक अर्थाने, वस्तूंच्या स्वरूपात देव आपल्याला कुठे काय देतो ?

किंवा आपण नेलेले तो काय घेतो ?

काहीच नाही.

 

रुक्मिणी काय पाठीवरून हात फिरवून म्हणते का,

“किती रोड झालीस ?

 कशी आहेस ?

सुकलेला दिसतोस,

 काय झालं ?”

नाही म्हणत ना.

 

मग दर्शन घेऊन निघताना वाईट का वाटतं ?

पुन्हा एकदा मागे वळून का पहावंसं वाटतं ?

प्रेम, माया, आपुलकी, विश्वास म्हणजेच ‘आपलेपणा’!

 

हा आपलेपणा काय असतो ?

 

आपलेपणा म्हणजे भेटण्याची ओढ.

भेटल्या नंतर बोलण्याची ओढ.

बोलल्या नंतर ऐकण्याची ओढ.

निरोप घेण्या आधी पुन्हा

भेटण्याची ओढ !

 

ज्याला न बोलताही आपलं दुःख कळतं त्याला आपलं म्हणावं.

आणि चुलत,मावस असलं तरी

सख्खं म्हणावं !

 

मी त्याचा आहे आणि तो माझा आहे ही भावना दोघांच्याही मनात सारखीच असणे

म्हणजेच ‘आपलेपणा’ !

 

एक शब्दही न बोलता ज्याला पाहिल्या पहिल्या डोळे भरून येतात आणि निःसंकोचपणे गालावरून अश्रू ओघळू लागतात, तो आपला असतो, तो सख्खा असतो !

 

लक्षात ठेवा,

ज्याला दुसऱ्या साठी ‘सख्खं’ होता येतं त्यालाच कुणीतरी सख्खं असतं,

बाकी फक्त परिचितांची यादी असते,

नको असलेल्या माणसांची गर्दी असते !

 

तुम्हीच सांगा…..

 

फक्त आईची कूस एक आहे म्हणून सख्खं म्हणायचं का ?

ज्याला तुमच्या दु:खाची जाणीवच नाही त्याला सख्खं म्हणायचं का ?

 

आता एक काम करा..

 

करा यादी तुम्हाला असणाऱ्या सख्ख्या नातेवाईकांची..

झालं न धस्सकन..

होतंय न धडधड..

नको वाटतंय न यादी करायला ….

रडू नका, पुसून टाका डोळ्यातलं पाणी..

आणि मानायला लागा सर्वांना आपलं.कोणी कितीही झिडकारलं तरी

कारण …..

राग राग आणि तिरस्कार करून काहीच हाती लागत नाही.

जग फक्त प्रेमानेच जिंकता येतं… वादाने, मत्सर हेवा करून तर नक्कीच नाही…

लेखक  :अज्ञात

संग्राहिका :सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ या चिमण्यांनो परत फिरा… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– या चिमण्यांनो परत फिरा – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

दार बंद करून,

चिऊताई बसली |

कळत नाही,

का बर ती रुसली |

*

ओसरीवर रोज नाचणारी,

आता ती दिसेनाशी झाली |

पूर्वापार माणसाळलेली,

माणसांपासून दूर गेली |

*

एक घास चिऊचा, एक काऊचा

भरवत पिढ्यानं पिढ्या वाढल्या |

चिऊताई तुझ्या गोष्टी ऐकत,

लहानाच्या मोठ्या झाल्या |

*

काळ बदलत गेला,

फ्लॅट संस्कृतीत कुठं राहिली ओसरी |

तुझेच घरटे हिरावलं आम्ही,

भूतदयेचे संस्कार सगळेच ते विसरी |

*

तुझा चिवचिवाट ऐकायला,

मनाची फुरसतच ती राहिली नाही |

चार दाणे तुला टाकायचे असतात,

सुचतच नाही आता मनाला काही |

*

असेल तिथे सुरक्षित रहा,

नामशेष मात्र नकोस होऊ |

चूकचूक करते पाल मनी,

चित्रात उरतील का हो चिऊ?

© श्री आशिष  बिवलकर

दि. 20 मार्च 2024

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares