डॉ. जयंत गुजराती

??

इटुकली — ☆ डॉ. जयंत गुजराती

घरभर फिरली भिरभिरत्या पंखाने. अक्षरशः नाचतच होती इथून तिथे. पाय म्हणून, ठरतच नव्हते. जणू सगळं घाईचंच होऊन बसलं होतं. सांगावंसं वाटलं, अगं जरा हळू चाल…. पण ती काही ऐकणार नव्हती. तिचं आपलं निरीक्षण चालू होतं दिवसभर बस्तान कुठे बसवायचं ते. तिच्या चिवचिवाटाने कान कावले होते. मधूनच ती गायब होई. पुन्हा काहीवेळात खिडकीच्या गजावर दिसे. मग हॉलभर फिरे.  किचनमधे उडे, व्हरांड्यातून तर सारखी येजा. बेडरूममधे ही चक्कर मारून आली. कधी ट्युबलाईट वर विसावे तर कधी पंख्यावर विसावे. कधी कपाटावरचा कोपरा धुंडाळे तर कधी खोल्यांमधल्या दारांवरून सूर मारे.  शेवटी वैतागून मीच तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवलं. 

दुसऱ्या दिवशी सकाळीस ती लगबगीत असलेली इटुकली दिसेना म्हणून मीच अस्वस्थ झालो. बायको म्हणाली, ‘येईल पुन्हा, ’ मी वर्तमानपत्र हातात घेऊन स्वस्थ होण्याच्या प्रयत्नात. पण थोडंफार वाचून झाल्यावर, वर्तमानपत्र हलकेच खाली सरकलं जाई, मग माझी नजरच भिरभिरायला लागे. ती कुठेच दिसेना तर पुन्हा डोकं वर्तमानात खुपसलं.  तसाच ऑफिसला गेलो. मनात प्रश्नचिन्ह घेऊन, ‘ कुठे गेली असेल? ’ दिवसभर मीच ‘चिवचिव’ला अधीर. संध्याकाळी घरी आलो तरीही घरभर शांतताच. अगदी अचानक आलेली पाहुणी अलोप व्हावी याची रूखरूख मनात. 

सकाळीस जाग आली ती घागर हिंदकळावी खळखळून तसं हिचं  माझे दोन्ही बाहू धरून उठवणं चालू होतं.  काय? माझा प्रश्नचिन्ह असलेला चेहेरा पाहून ती बोलली. चला वरती हे बघा पोटमाळ्यात काय आहे ते!! धडकीच भरली. असं काय असेल सकाळी सकाळी पोटमाळ्यावर? मी तडक पाहिलं तर पोटमाळ्यावर एक कोनाडा रिकामा सुटलेला होता त्यात लगबगीनं ती इटुकली व तो पिटुकला वरच्या कौलांतून  व पोटमाळ्याच्या त्रिकोणी खिडकीतून वाट काढत गवताच्या काड्या व काटक्या गोळा करून आणून टाकत होते. बस्तान बसवायला जागा सापडली तर मी मनात खुश होऊन पुटपुटलो. खाली येताच छानशी शीळही घातली मी. तसं आल्याचा चहा हातात देत बायकोने कोपरखळी मारलीच. ‘ आली ना परत पाहुणी!! झाला ना मनासारखा शेजार!! ’ मीही चहाचा घोट घेत फिरकी टाकलीच, ‘ सखी शेजारिणी!! ’ तसं दोघं हसत सुटलो. 

दोन तीन दिवसात हॉल कम बेडरूम कम सबकुछ छानसं घरटं उभं राहिलं. त्यात कुठूनतरी कापूसही आणून टाकला होता बहुतेक पिटुकल्याने. बोर्ड लावायचं का? हिचं तुणतुणं चालूच. डोळ्यात मिश्कीली. तर माझ्यात पुन्हा प्रश्नचिन्ह. तिनंच खुलासा केला, ‘ छोटंसं बॅनर, नांदा सौख्यभरे! ’ आता माझ्यापेक्षा हीच जास्त गुंतत गेली. मातीचं खापर आणलं बाजारातून त्यात पाणी भरून ठेवलं. रोज वाटीभर मऊसूत भातही पोटमाळ्यावर पोहोचायला लागला. “ आणखी काय काय आवडतं हो खायला त्यांना, मी करत जाईन तेवढं!! ” मला तसं म्हटलं तर पाखरांबद्दलचं ज्ञान अगाधच!!  पोपट असता तर हिरवी मिरची, पिकलेला पेरू वगैरे सांगून तरी टाकलं असतं. मग हिनेच शक्कल लढवत, शिजवलेले तेही वाफाळलेले हिरवे मूग, वाफाळलेलेच मिठातले शेंगदाणे, लालचुटूक डाळिंबाचे दाणे अन् काय काय सुरू केलं!! मी आपला प्रश्नकर्ता नेहेमीचाच…. “ अगं इतकं सगळं लागतं का त्यांना? ” हिनं मान डोलावत चपखल उत्तर दिलं. “ तुम्हाला नाही कळायचं, डोहाळे लागले की लागतंच सगळं!! ” प्रश्नचिन्हा ऐवजी माझे डोळे विस्फारलेले. “ तुला कसं कळलं शुभवर्तमान? ” “ बघाच तुम्ही, मी म्हणतेय ते खरं की नाही? ’ तसं हीचं काहीच चुकत नाही. काही दिवसांतच सहा अंडी प्रकट जाहली मऊसूत कापसावर.  

मग काय इटुकली ठाण मांडून कोनाड्यात तर पिटुकल्याची येजा वाढली आतबाहेर. घरात कोवळे जीव वाढणार याचा कोण आनंद आम्हा दोघांना, त्या दोघांसह.  चैनच पडेना. सारखी उत्सुकता. ऑफिसमधूनही हिला विचारणं व्हायचं, “ एनी प्रोग्रेस? ” दिवसातून दोन तीनदा पोटमाळ्यावर चढणं.  काही हालचाल दिसतेय का? हे पाहणं! अजून काहीच कसं नाही? हा प्रश्न खांबासारखा उभाच. “ सगळं निसर्गनियमा सारखं होईल, धीर धरा. ” हिचा मोलाचा सल्ला. तरीही आतून आमचाच जीव वरखाली!! खरंतर आमचे अगोदर कावलेले कान आतुरलेले कोवळी चिवचिव ऐकण्यासाठी. 

(२०/०३/२०२३ – # जागतिक चिमणी दिवस)  

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments