श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ एआय – मदतनीस की स्पर्धक… भाग – 1 ☆ श्री श्रीकांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे  ☆

इंजिनिअर या नात्याने मी गेली ४० वर्षे ऑटोमेशन क्षेत्रात काम करतो आहे. या वाटचालीत मी ऑटोमेशन क्षेत्रातली प्रगती जवळून बघितली. त्या वाटचालीतला काही अंशी वाटा उचलला आहे. या चाळीस वर्षात अगदी साध्या manual मशीन पासून ते आजच्या ए-आयपर्यंतचा काल मी बघतोय. कमीतकमी मानवी श्रमामध्ये क्षमतेपेक्षा जास्त काम करून घेणे हे ऑटोमेशनचे सुरवातीचे उद्देश. पुढे केवळ मानवी श्रम कमी करणे हा उद्देश राहिला नाही तर या ऑटोमेशनच्या माध्यमातून कमीतकमी वेळात आणि श्रमात जास्तीत जास्त उत्पादन घेणे हे शक्य झाले आणि मशीन्स त्या उद्देशाने डिझाईन होऊ लागली. टकळी चरखा वापरून सुत काढणे यापेक्षा इलेक्ट्रिक मोटारवर चालणारी मोठमोठी स्पिनिंग मशीन हे सुत काढू लागली आणि कापडाचे उत्पादन प्रचंड वाढले. मी म्हणेन की ऑटोमेशनने कापड स्वस्त केले आणि चांगल्या गुणवत्तेचे कापड सामान्य माणसाच्या आवाक्यात आले. महात्मा गांधींचा चरखा-माग वापरून जर इतक्या लोकसंख्येला कापड पुरवायचे म्हणले तर निम्मा देश आज गांधींसारखा उघडा राहिला असता आणि एक चतुर्थांश देश जाडेभरडे हरक आणि मांजरपाट कापड वापरत असता. या कापडाचे प्रकार आजच्या पिढीला माहित देखील नाहीत. जसजसा काळ गेला ऑटोमेशनचा उत्पादन क्षमता वाढवणे या पलीकडे  आता वस्तूची गुणवत्ता आणि अचूकता वाढवणे हा झाला. कारण मानवाला अशक्य जमणारी गुणवत्ता आणि अचूकता मशीन सहज देऊ लागली. वर मी कपड्यांचे उदाहरण दिले. पण इतर अनेक क्षेत्रात ऑटोमेटेड मशीनने प्रवेश केला. जसे की, प्लास्टिक, घातु प्रक्रिया, शेती आणि एक ना अनेक. आज कोणतेही क्षेत्र ऑटोमेशन शिवाय नाही. ऑटोमेशनमुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादकता, अचूकता आणि गुणवत्ता देऊन मानवी जीवन सुकर करण्याऱ्या वस्तू सामान्य माणसाच्या आर्थिक आवाक्यात आणून दिल्या. यात अगदी गृहिणींच्या स्वयंपाकघरातील वस्तूंपासून वाहनापर्यंत अनेक गोष्टी सामन्यांच्या आवाक्यात आल्या. ऑटोमेशनमुळे आलेली गुणवत्ता ठीक आहे पण उत्पादकता आता राक्षसी होऊ लागली आहे. उत्पादकता वाढली तशी कॉस्ट कमी होऊ लागली आणि किंमती सामन्यांच्या आवाक्यात आल्या हे जरी खरे असले. उत्पादकता मानवी मर्यादेच्या पलीकडे जाऊ लागली तसा याचा परिणाम निसर्गावर होऊ लागला. जास्त उत्पादन करण्यासाठी लागणारे रॉ मटेरीअल निसर्गातून मिळवणे अपरिहार्य असल्याने निसर्ग ओरबाडला जाऊ लागला. नवीन तयार होणारा माल बाजारात प्रचंड प्रमाणात येऊ लागल्याने यातून use and throwवृत्ती वाढली आणि प्रचंड प्रमाणात कचरा निर्मिती होऊ लागली. मानवाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट ही कचरा निर्मितीचे पाहिले पाउल ठरू लागले. वस्तू गरजेतून घेण्यापेक्षा स्टेट्स सिम्बॉल म्हणून घेण्याची वृत्ती वाढू लागली. ऑटोमेशनच्या पुढच्या टप्प्यात जसे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल आणि software आधारित वस्तू आल्या तसे एकाच वस्तूंचे नवनवीन प्रकार (versions) आणि वैशिष्ठ्य (features) बाजारात येऊ लागले तसे वस्तूचे आपल्याकडील असलेले व्हर्जन जुने वाटू लागले. जुने टाकून नावे घ्या ही होड सुरु झाली. वस्तू टाकून देण्यासाठी ती निकामी होण्याची गरज राहिली नाही version जुने झाले out dated (obsolescence ) झाले, old fashioned झाले, हे वस्तू टाकून देण्याचे महत्वाचे कारण होऊ लागले. दर २ वर्षांनी बदलता मोबाईल, तीन वर्षांनी बदलती कार हे अभिमानाचे विषय होऊ लागले. हे घड्याळ माझ्या वडिलांनी १० वर्षे वापरले मग मी १५ वर्षे वापरले किंवा मी स्कूटर गेली १५ वर्षे उत्तम मेंटेन करून अजून वापरतोय असे अभिमानाने सांगणारी माणसे हास्यास्पद ठरू लागली.

ही सगळी प्रस्तावना करायचे कारण म्हणजे आता ए-आय येऊ घातले आहे नव्हे दारात उभे आहे. आजपर्यंत जे ऑटोमेशन घडत होते ते वस्तू उत्पादकता, वस्तू गुणवत्ता आणि अचूकता यासाठी घडत होते. मी या क्षेत्रात काम करताना उत्पादकता,गुणवत्ता आणि अचूकता या कारणांबरोबर एक सुप्त पण महत्वाचे आणि जास्त जाहीर चर्चा न केलेले कारण म्हणजे मनुष्यबळ कमी करणे हे हमखास असायचेच. एखादे ऑटोमेशन करण्याचे ठरवताना किती माणसे ते काम करत आहेत त्यातील किती कामगार कमी करता येतील किंवा दुसऱ्या कामावर वळवता येतील हा विचार करून ऑटोमेशन बजेट आणि आमचे कोटेशन मंजूर केले जाई. मनुष्यातले काही स्वभावतः असणारे दुर्गुण, भावनिक मूडवर असलेले अवलंबित्व  आणि बदलती परिस्थिती यातून हे ऑटोमेशन वाढत गेले. जिथे माणूस काम करणे शक्य आहे अशी कामे देखील यंत्रे करू लागली. वाढती मनुष्यबळ कॉस्ट, सततच्या आर्थिक मागण्या, कामचुकारपणा, अनाठायी सुट्ट्या घेणे, काही अवास्तव कामगार कायदे इत्यादीमुळे उत्पादन प्रक्रियेतील मनुष्यबळ काढून तिथे automated machine ने काम करून घेण्याकडे व्यवस्थापनाचा कल वाढू लागला. यातून NC/CNC/VMCमशीन्स, रोबोट, SPMs हे सर्रास येऊ लागले या मशीन्सची उत्पादकता मानवापेक्षा जास्त होतीच पण अचूकता आणि गुणवत्ता हा मोठा फायदा व्यवस्थापनाला आणि पर्यायाने ग्राहकाला मिळू लागला. उत्पादन क्षेत्रात ऑटोमेशन वाढले तसे softwareने ऑफिस ऑटोमेशन क्षेत्रात अचूकता, वेळेची बचत आणली. वेगवेगळ्या व्यवसायात घडणाऱ्या प्रत्येक activity चे dataस्वरुपात documentation होऊ लागल्याने प्रचंड data तयार होऊ लागला. हा data व्यवसायाची पुढील दिशा (Strategy) ठरवण्यास उपयुक्त ठरू लागला. निर्णय प्रक्रियेतला महत्वाचा घटक झाला. मानवी अनुभवला फारशी किंमत उरली नाही. त्यामुळे केवळ वयाच्या आणिअनुभवाच्या जोरावर प्रमोशन देणे. १९८४ साली मी फिलिप्स कंपनीत असताना word processorनावाचे electronic टायपिंग मशीन फिलिप्सच्या डायरेक्टरच्या केबिनमध्ये आले. ते फक्त डायरेक्टर आणि त्यांची सेक्रेटरी वापरत असे. साधे पत्र लिहिण्याचे मशीन पण आम्हाला ते वापरण्याची परवानगी नसल्याने त्याचे फार अप्रूप. हे मशीन वापरणारी त्यांची सेक्रेटरी लई भाव खायची याचा आमच्या मनात मत्सर होता. आता कॉम्पुटर ऑफिस ऑटोमेशनचा भाग झाल्याने सेक्रेटरीच्या भाव खाण्याचे आणि आमच्या जळण्याचे हसू येते. फिलिप्सच्या प्रत्येक मॅनेजरच्या केबिन बाहेर त्याची सेक्रेटरीचे टेबल आणि टाईप रायटर असे. आता कॉम्प्युटरमुळे मॅनेजरच राहिले नाहीत.

मशीन ऑटोमेशनमुळे उत्पादकता वाढली त्यामुळे काही कामातील मनुष्यबळ कमी झाले असले तरी बेकारी फारशी वाढली नाही कारण या वाढत्या उत्पाद्कतेमुळे नवी क्षेत्रे तयार होत होती आणि मनुष्यबळ तिकडे वळवले गेले. आर्थिक व्यवहार प्रचंड वाढले. या वाढीव आर्थिक व्यवहारांना सहजपणे तोंड देईल अशी बँकिंग प्रणाली विकसित झाली. 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री श्रीकांत कुलकर्णी

मो ९८५००३५०३७ 

Shrikaant.blogspot.com;  Shrikantkulkarni5557@gm

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

पुणे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments