(ई-अभिव्यक्ति में श्रीमति उमा मिश्रा ‘प्रीति’ जी का स्वागत। पूर्व शिक्षिका – नेवी चिल्ड्रन स्कूल। वर्तमान में स्वतंत्र लेखन। विधा – गीत,कविता, लघु कथाएं, कहानी, संस्मरण, आलेख, संवाद, नाटक, निबंध आदि। भाषा ज्ञान – हिंदी,अंग्रेजी, संस्कृत। साहित्यिक सेवा हेतु। कई प्रादेशिक एवं राष्ट्रीय स्तर की साहित्यिक एवं सामाजिक संस्थाओं द्वारा अलंकृत / सम्मानित। ई-पत्रिका/ साझा संकलन/विभिन्न अखबारों /पत्रिकाओं में रचनाएँ प्रकाशित। पुस्तक – (1)उमा की काव्यांजली (काव्य संग्रह) (2) उड़ान (लघुकथा संग्रह), आहुति (ई पत्रिका)। शहर समता अखबार प्रयागराज की महिला विचार मंच की मध्य प्रदेश अध्यक्ष। आज प्रस्तुत है आपकी लघुकथा – जूठन।)
☆ लघुकथा – जूठन ☆ श्रीमति उमा मिश्रा ‘प्रीति’ ☆
जूठन समेटकर एहतियात से पन्नी में भर रही थी। मैंने उसे बड़े गुस्से की नजरों से देखा
” मैं गुस्से में बोली यह क्या जाहिल पन है?”
तुम्हें शर्म नहीं आती है ऐसा करते हुए।
उस काम वाली बाई के ऊपर मेरी बातों का कोई असर नहीं हो रहा था। वह मेरी बातों को अनसुना सा कर रही थी।
बड़े ही इत्मीनान से वह सारी जूठन पन्नी में गांठ लगाते हुए बोली मेम साहब घर में मेरी मां बीमार है बहन और 5 साल की छोटी बेटी भी है।
उन्हें आज भरपेट खाना खिलाऊंगी आज खाने में बहुत सारे पकवान है मैं तो भगवान से यही प्रार्थना करती हूं कि आप और आपके बच्चे रोज इसी तरह खाना बनाने को काहे लेकिन वह खाना खाते कहां है प्लेट में थोड़ा सा लेते हैं यह पतीले का खाना जूठन कहां हुआ। छोड़ें में साहब आप लोग खाने की कीमत कहां समझोगे?
हम जैसे भूखे मरते लोगों का पेट तो भरेगा, और यह अच्छा खाना मिलेगा। हमारी किस्मत में ऐसा परोसा भोजन नहीं है। आप के कारण हमें यह सब अच्छी चीजें भी खाने को मिल जाती हैं।
मैं अवाक रह गई उसकी बातें सुनकर मैं स्वयं को बहुत बौना महसूस कर रही थी। उसकी आंखों में खुशी झलक रही थी।
जल्दी पहुंचने का उतावलापन उसकी आंखों में दिख रहा था। और तुरंत सारा सामान एक झोले में भरकर वह घर की ओर जाने लग गई मैं भी उसे दरवाजे में खड़ी हो कर देखती रह गई जब तक वह मेरी आंखों से ओझल नहीं हो गई।
☆ निघाले आज स्मृतींच्या घरी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
खूप दिवसांनी रेडिओ लावला आणि रेडिओवर गाणे लागले होते निघाले आज तिकडच्या घरी…
लगेच डोळ्यासमोर निरोप घेणारी मुलगी तिला निरोप देणारे आई-वडील लग्न सोहळा एकाला निरोप देणे दुसऱ्याचे स्वागत करणे हे सगळे सगळे डोळ्यापुढे उभे राहिले…
दुसरे स्टेशन लावले तर ते इथे कोणाच्यातरी वाढदिवसाच्या कार्यक्रम चालू होता प्रत्येक जण गाण्यातून शुभेच्छा देत होता बार बार दिन ये आये बार बार दिल ये गाये तुम जियो हजारो साल ये मेरी है आरजू… पुन्हा विचार आला एक वर्ष संपून दुसऱ्या वर्षात पदार्पण केले म्हणून वाढदिवसाचे हे क्षण आनंदी उत्साही करून हा उत्सव साजरा करणे म्हणजे वाढदिवस…
पुन्हा स्टेशन बदलले आणि तेथे गाणे लागले होते आनेवाला पल जानेवाला है |हो सके तो इसमें जिंदगी बितादो पल ये भी जानेवाला है ||खरच सगळेच जाणारे असते ना?
तसेच आज ३१ डिसेंबर… २०२३ संपून २०२४ घेऊन येणारे काही भारीत क्षण. सरत्याला निरोप येणाऱ्याचे स्वागत. सासरी चाललेल्या मुलीला निरोप द्यायच्या वेळे सारखेच. किंवा वाढदिवसाच्या दिवशी पूर्ण झालेल्या वर्षांना धन्यवाद देऊन नवे वर्ष सुख शांती समृद्धीचे जावो म्हणून केलेले अभिष्टचिंतन हे आदर्श क्षण जसे आपण जगतो ना अगदी तसेच नव्या वर्षातील शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी जल्लोष हर्ष उल्हास यांनी सरत्या वर्षाला दिलेला निरोप आणि नव्याचे केलेले स्वागत यांचा एकत्र मिलाप.
किती भान हरपून मनात कुठलाच विचार न ठेवता सगळ्यांच्याच भावना साजरा करण्याच्या आंनदी असल्याने साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी असली तरी आनंदाने भारलेले हे क्षण असतात.
मग मनात विचार आला फक्त ३१ डिसेंबरचे नव्हे तर रोजचा येणारा दिवस दिवसातील प्रत्येक सेकंद हा जाणारच असतो. हा क्षण आपल्याला आनेवाला पल जानेवाला है याचा संकेत देत असतो आणि ती वेळ निघाले आज स्मृतीच्या घरी असे सांगत असते. येणारा प्रत्येक क्षण आठवण होऊन मनात साठवायचा असेल तर फक्त ३१ डिसेंबरच नाही तर प्रत्येक क्षण साजरा करता यायला हवा.
वर्षातले सगळेच महिने, आठवडे दिवस, तास, मिनिटे, क्षण हे जाणारेच असतात तो प्रत्येक क्षण जाणार म्हणून दुःख आणि नवा येणार म्हणून आनंद अशा संमिश्र भावना असायला हव्यात फक्त ३१डिसेंबरलाच नको.
जेव्हा तुमच्या प्रत्येक क्षणात सकारात्मकता भरलेली असेल तेव्हा आता असणारा क्षण हा जाणारच असल्याने तोच क्षण जगून घ्यायची वृत्ती ठेवली तर जाणारे वर्षच फक्त निघाले आज स्मृतीच्या घरी असे न होता प्रत्येक क्षण तसा होईल.
मग जीवनातील प्रत्येक क्षण उत्सव होऊन राहील. तेव्हा नव्या वर्षाच्या प्रत्येक क्षणाचा उत्सव व्हावा या नव्या वर्षाच्या शुभेच्छा आणि सगळ्यांची वृत्ती अशी सदा हर्ष उल्हासाने भरलेली रहावी ही प्रार्थना 🙏
(मनमोहिनी मॉलीन्नोन्ग व मेघालयाच्या कुशीतले लिव्हिंग रूट ब्रिज)
प्रिय वाचकांनो,
कुमनो! (मेघालयच्या खासी या खास भाषेत नमस्कार, हॅलो!)
फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)
मॉलीन्नोन्गच्या निमित्याने आपणा सर्वांना ही सफर आनंददायी वाटत आहे, याचा मला कोण आनंद होत आहे!
तर मॉलीन्नोन्गबद्दल थोडके राहून गेले सांगायाचे, ते म्हणजे इथले जेवण अन नाश्ता. माझा सल्ला आहे की इथं निसर्गाचेच अधिक सेवन करावे. इथे बरीच घरे (६०-७०%) होम स्टे करता उपलब्ध आहेत, अग्रिम आरक्षण केले तर उत्तम! मात्र थोडकी घरे (मी पाहिली ती ४-५) जेवण व नाश्ता पुरवतात! जास्त अपेक्षा ठेऊ नयेत, म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही! ब्रेड बटर, ब्रेड आम्लेट, मॅगी अन चहा-कॉफी, इथे नाश्त्याची यादी संपते! तर जेवणात थाळी, २ भाज्या (त्यातली एक पर्मनन्ट बटाट्याची), डाळ अन भात, पोळ्या एका ठिकाणी होत्या, दुसरीकडे ऑर्डर देऊन मिळतात. जेवणात नॉनवेज थाळीत अंडी, चिकन आणि मटन असतं. हे घरगुती सर्विंग टाइम बॉउंड बरं का. जेवणाचे अन नाश्त्याचे दर एकदम स्वस्त! कारभार कारभारणीच्या हातात! इथे भाज्या जवळच्या मोठ्या गावातून (pynursa) आणतात, आठवड्यातून दोनदा भरणाऱ्या बाजारातून! सामानाची ने-आण करण्यासठी बेसिक गाडी मारुती ८००!. मुलांची मोठ्या गावात शिक्षणाकरता ने-आण करण्यासाठी पण हीच, पावसाळी वातावरण नेहमीचेच अन दुचाकी मुळे अपघात होऊ शकतात, म्हणून गावकरी वापरत नाहीत, असं कळलं. इथे ATM नाही, नेटवर्क नसल्यामुळे जी पे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरे उपयोगाचे नाहीत. म्हणून आपल्याजवळ रोख रक्कम हवीच!
स्काय पॉईंट (Nohwet Viewpoint)
या भागात फिरतांना बांगला देशाची सीमा वारंवार दर्शन देते. मात्र बांगलादेशाचे दर्शन घडवणारा एक स्काय पॉईंट अतिशय सुंदर आहे. मॉलीन्नोन्गपासून केवळ दोनच किलोमीटर असलेला हा पॉईंट न चुकता बघावा. बांबूने बनलेल्या पुलावरचा प्रवास मस्त झुलत झुलत करावा, एका ट्री हाऊस वरील ह्या पॉईंटवर जावे अन समोरचा नजारा बघून थक्क व्हावे. हा पॉईंट ८५ फूट उंच आहे, संपूर्ण बांबूने बनवलेला अन झाडांना बांबू तसेच जूटच्या दोरांनी मजबूत बांधलेला हा इको फ्रेंडली पॉईंट, समोरील नयनरम्य नजाऱ्यांचे फोटो काढणे आलेच! मात्र सेल्फी पासून सावधान, मित्रांनो! येथून सुंदर मावलींनॉन्ग दिसतेच शिवाय बांगलादेशची सपाट जमीन व जलसंपदा यांचेही प्रेक्षणीय दृश्य दिसते!
सिंगल डेकर अन डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज मेघालय पर्यटनाचा अविभाज्य भाग आहेत जिवंत पूल! अन ते पाहिल्यावर कवतिकाचे आणि प्रशंसेचे पूल बांधायला पर्यटक मोकळे! म्हणजे जुन्या झाडांची मुळे एकमेकात “गुंतता हृदय हे” सारखी हवेत, अर्थात अधांतरी (आणि एखाद-दुसरी चुकलेल्या पोरांसारखी जमिनीत) अशी गुंतत गुंतत जातात, अन हे सगळं घडतं नदीपात्राच्या साक्षीनं, “जलगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला” असं गुणगुणत! जसजशी वर्षे जातात, जलाचा अन प्रेमाचा शिडकावा मिळतो, तसतशी ही मुळे जन्मोजमीच्या ऋणानुबंधासारखी एकमेकांना घट्ट कव घालतात अन दिवसागणिक घालताच राहतात, मित्रांनो, म्हणूनच तर हे “लिव्हिंग रूट ब्रिज”, अर्थात जिवंत ब्रिज आहेत, काँकिटचे हृदयशून्य ब्रिज नव्हे, अन यामुळेच आपल्याला दिसतो तो प्रेमाच्या घट्ट पाशासारखा मजबूत जीता जागता मूळ पूल!
आता या मुळांच्या पुलाची मूळ कथा सांगते! साधारण १८० वर्षांपूर्वी मेघालयच्या खासी जमातीतील जेष्ठ व श्रेष्ठ लोकांनी नदी पात्राच्या अर्ध्या अंतरापर्यंत अधांतरी आलेली रबराच्या (Ficus elastica tree) झाडांची मुळे, अरेका नट पाम (Areca nut palm) जातीच्या पोकळ छड्यांमध्ये घातली, नंतर त्यांची निगा राखून काळजी घेतली. मग ती मुळे, (अर्थातच अधांतरी) वाढत वाढत विरुद्ध किनाऱ्यापर्यंत पोचलीत. तीही एकेकटी नाहीत तर एकमेकांच्या गळ्यात अन हातात हात गुंफून. या रीतीने माणसांचे वजन वाहून नेणारा आगळावेगळा असा या जिवंत पूल माणसाच्या कल्पनाशक्तीतून तयार झाला! आम्ही पाहिलेल्या सिंगल डेकर लिव्हिंग रूट ब्रिजला मजबूत बनवण्यासाठी भारतीय लष्कराने बांबूचे टेकू तयार केलेत. हे आश्चर्यकारक पूल पाहण्याकरता पर्यटकांची संख्या वाढतेच आहे! म्हणूनच असे आधार आवश्यक आहेत, असे कळले. नदीवर असा एक अधांतरी पूल असेल तर तो असेल सिंगल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज, मात्र एकावर एक (अर्थात अधांतरी) असे दोन पूल असतील तर तो असेल डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज!!! मी केवळ डबल-डेकर बस पाहिल्या होत्या, पण हे प्रकरण म्हणजे खासी लोकांची खासमखास मूळची डबल गुंतवणूक! खासी समाजाच्या त्या सनातन बायो इंजिनीयर्सला माझा साष्टांग कुमनो! असे कांही पूल १०० फूट लांब आहेत. ते सक्षमरित्या साकार व्हायला १५ ते २५ वर्षे लागू शकतात, एकदाची अशी तयारी झाली, की मग पुढची ५०० वर्षे बघायला नको! यातील कांही मुळे पाण्याच्या सतत संपर्कामुळे सडतात, मात्र काळजी नसावी, कारण इतर मुळे वाढत जातात अन त्यांची जागा घेऊन पुलाला आवश्यक अशी स्थिरता प्रदान करतात. हीच वंशावळ खासियत आहे जिवंत रूट ब्रिजची! अर्थात हा स्थानिक बायो इंजिनिअरींगचा उत्तम नमुनाच म्हणायला हवा. काही विशेषज्ञांच्या मते या परिसरात(बहुदा चेरापुंजी आणि शिलाँग) असे शेकडो ब्रिज आहेत, मात्र त्यांच्यापर्यंत पोचणे हे खासी लोकांचच काम! फार थोडे पूल पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत, कारण तिथं पोचायला जंगलातील वाट आपली सत्वपरीक्षा पाहणारी, कधी निसरड्या पायऱ्या तर कधी दगड धोंडे तर कधी ओल्या मातीची घसरण!
या सर्वात “नव नवल नयनोत्सव” घडवणारा, पण ट्रेकिंग करणाऱ्या भल्या भल्या पर्यटकांना जेरीस आणणारा पूल म्हणजे “चेरापुंजीचा डबल डेकर (दोन मजली) लिव्हींग रूट ब्रिज!” मंडळी आपण शक्य असल्यास हे (एकाखाली एक ऋणानुबंध असलेले) चमत्काराचे शिखर अन मेघालयची शान असलेले “डबल डेकर लिव्हींग रूट ब्रिज” नामक महदाश्चर्य जरूर बघावे! मात्र तिथे पोचायला जबरदस्त ट्रेकिंग करावे लागते. मी मात्र त्याचे फोटो बघूनच त्याला मनोमन साष्टांग कुमनो घातला! ‘Jingkieng Nongriat’ हे नाव असलेला, सर्वात लांब (तीस मीटर) असा हा जिवंत पूल २४०० फूट उंचीवर आहे, चेरापुंजीहून ४५ किलोमीटर दूर Nongriat या गावात! हे पूल “जागतिक वारसा स्थळ” म्हणून घोषित केलेले आहेत.
मित्रांनो असा कुठलाही जिवंत पूल नदीवर लटकत असतो, नदीजवळ पोचायला वरच्या पर्वतराजीतून (उपलब्ध) वाटेने खाली उतरा, पूल बघा, जमत असेल तर देवाचे अन गाईडचे नाव घेत घेत तो पूल पार करा, वनसृष्टीचा आनंद घ्या. गाईडच्या किंवा स्थानिकांच्या आदेशाप्रमाणेच पाण्याजवळ जाणे, उतरणे वगैरे कार्यक्रम उरका अन पर्वताची चढण चढा! हे जास्त दमवणारे, कारण उत्साह कमी अन थकवा जास्त! सोबत पेयजल अन जंगलातलीच काठी असू द्यावी. कॅमेरा अन आपला तोल सांभाळत, जमेल तसे फोटो काढा! (सेल्फीचे काम जपून करावे, तिथे जागोजागी सेल्फी करता डेंजर झोन निर्देशित केले आहेत, “पण लक्षात कोण घेतो!!!”)
मॉलीन्नोन्गपासून रस्ता आहे सिंगल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज बघायचा! मेघालयातील हे अप्रूप पहिल्यांदा बघितल्यावर त्या पुलावर चालतांना आपण कुणाच्या हृदयावर घाला घालीत आहोत असा मला खराखुरा भास झाला! आम्ही सिंगल रूट ब्रिज बघितला, तिथे जायला दोन रस्ते आहेत, मॉलीन्नोन्गपासून जाणारा कठीण, बराच निसरडा, वेडावाकडा, पायऱ्या अन कठडे नसलेला, रस्त्यात लहान मोठे दगड. मी मुश्किलीने तो पार केला. दुसऱ्याच दिवशी एक अजून ब्रिज बघायच्या तयारीने मालिनॉन्ग मधून बाहेर पडलो, Pynursa पार केलं, इथल्या हॉटेल मध्ये बरेच पदार्थ होते. या मोठ्या गावात ATM तर आहे, पण कधी बंद असते, कधी मशीन मध्ये पैसे नसतात, म्हणून आपल्याजवळ कॅश हवीच! Nohwet या ठिकाणून खाली चांगल्या कठड्यांसहित असलेल्या पायऱ्या उतरून पोचलो तर काय, कालचाच सिंगल रूट ब्रिज दिसला की! हे डबल दर्शन सुखावणारे होते, पण इथे येणारा हा (आपल्या माहितीसाठी) सोपा मार्ग गावला.
आम्ही Mawkyrnot या गावातून वाट काढत अजून एक सिंगल रूट ब्रिज बघितला. हे गाव पूर्व खासी पर्वतातील Pynursla सब डिव्हिजन येथे वसलेले आहे. नदीकाठी पोचायला चांगल्या बांधलेल्या अन कठडे असलेल्या १००० च्या वर पायऱ्या उतरून आम्ही खाली पोचलो. पुलाच्या नावाखाली (पण नदीच्या वर तरंगत असलेला) ४-५ बांबूचा बनलेला झुलता पूल पाहून, मी याच किनारी थांबले! माझ्या घरची मंडळी (मुलगी, जावई अन नात) स्थानिक गाईडची मदत घेऊन उस-पार पोचलेत अन तिथले निसर्ग दर्शन घेऊन तिथून (बहुदा २० मीटर अंतरावरच्या) दुसऱ्याच तत्सम पुलावरून इस-पार परत आलेत. तवरीक मी इकडे देवाचे नाव घेत, जमेल तसे त्यांचे अन पुलाचे फोटो काढले. या स्थानिक गाईडने मला पायऱ्या उतरणे अन चढणे यात खूप मदत तर केलीच पण माझे मनोबल कित्येक पटीने वाढवले. या अतिशय नम्र अन होतकरू मुलाचे नाव Walbis, अन वय अवघे २१! दुपारी जेवणानंतर माझ्या घरच्या मंडळींना या पेक्षाही जास्त काठिण्यपातळी असलेल्या शिलियांग जशार (Shilliang Jashar) या गावातील बांबू ब्रिजवर जायचे होते, मी मात्र गाईडच्या सल्ल्यानुसार व माझ्या आवाक्यानुसार त्या पुलाच्या वाटेकडे वळलेच नाही.
प्रिय वाचकहो, पुढील प्रवासात आपण डॉकी आणि चेरापुंजी येथे अद्भुत प्रवास करणार आहोत. तयारीत ऱ्हावा
तर आतापुरते खुबलेई! (khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)
टीप – लेखातील माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेटवर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो आणि वीडियो (काही अपवाद वगळून) व्यक्तिगत आहेत!
संध्याकाळ झाली होती.नीता अंगणात पायरीवर बसली होती. हा दगडी भक्कम बंगला तिच्या आहे सासऱ्यांचा!कित्ती भक्कम आणि सुंदर बांधलेला होता तो. नीता अंगणात आली आणि शेजारी फुललेल्या जाईची फुलं तिनं ओंजळ भरून घेतली आणि आत वळणार तोच पलीकडे रहाणाऱ्या आजींनी हाक मारली.” नीता, ये की चहा प्यायला ! ये !छान केलाय गवती चहा घालून !” नीता कम्पाउंड ओलांडून पलीकडे गेली आणि आजींच्याजवळ झोपाळ्यावर बसली.आजींनी गरम चहा तिच्या हातात ठेवला आणि म्हणाल्या, “ घे ग ही आल्याची वडी !आत्ताच केल्यात– बघ बरी झालीय का? “
“ आजी,एकदम मस्त झालीय. किती हौस हो तुम्हाला या वयात सुद्धा !” नीता म्हणाली.”
“ अग, आवडतं हो मला करायला. सुनेला ,नातसुनेला कुठला आलाय वेळ? पण मला आवडेल ते करते
मी ! आहेत भरपूर नोकरचाकर हाताशी. काही काम नसतं मला ! बरं, कधी आलीस अमेरिकेतून? बरे आहेत ना सगळे? संजय फार लवकर गेला ग ! एकटी पडलीस बाळा, पन्नाशी जेमतेम उलटली नाही तोवरच ! “ आजींनी मायेने हात फिरवला नीताच्या पाठीवरून ! डोळे भरून आले नीताचे.
“आजी राहिले की मी सहा महिने ! आणखी किती रहाणार लेकीकडे. ते सगळे तिकडे सुखात आहेत,
नात मोठी होईल आता आणि शेवटी आपलं घर ते आपलं घर. मला कायम राहायला नाही हो आवडणार तिकडे. आपलं घर आणि आपला परिवार खरा शेवटी. आणि आहेत की तुमच्यासारखे सख्खे शेजारी. आणि मी काम करते ते ब्लाइंड स्कूल, तिथली गोड छोटी मुलं माझी वाट बघत असतील ना ! “ नीता हसत म्हणाली. जाईची ओंजळ तिने झोपाळ्यावर रिकामी केली आणि म्हणाली, “ येते हं.. आजी.थँक्स चहाबद्दल.”
सहा महिने राहिल्यावर नीता मागच्याच महिन्यात भारतात परतली. दोन वर्षांपूर्वी अचानकच काहीही हासभास नसताना संजय हार्टअटॅकने गेला. नीताची एकुलती एक मुलगी मेघना लग्न होऊन अमेरिकेला गेली होती आणि तिला तिकडे छान नोकरीही होती. बाबांचे अचानक निधन झाल्यावर मेघना लगेचच भारतात आली आणि एक महिना राहिली. “आई,तू माझ्या बरोबर येतेस का? चल.बरं वाटेल ग तुला.”
पण नीता नको म्हणाली. “ नको ग मेघना,खूप कामं उरकावी लागतील मला. संजयच्या पेन्शनचं बघावं लागेल, बँकेचे व्यवहार बघावे लागतील. मग नंतर येईन मी नक्की. अग माझी काळजी नको करू तू !
माझी अजून चार वर्षे नोकरी आहे कॉलेज मध्ये. मग मलाही मिळेल पेन्शन. मी घरी बसून तरी काय करू? कॉलेजमध्येही जायला सुरुवात करीन.” नीताने मेघनाची समजूत घातली आणि मेघना एकटीच गेली अमेरिकेला. नीताने आपले रुटीन सुरू केले.
नीताचे आईवडील नीताच्या लग्नानंतर लवकरच गेले आणि नीताचे भाऊ भावजय कोल्हापूरला रहात होते. नीता पुण्यात एकटीच होती. कॉलेजमध्ये तिचा वेळ सुरेख जायचा. तिच्या सहकारी मैत्रिणी मित्र आणि स्टुडंट्सनी नीताला कधी एकटं पडू दिलं नाही. संजय असतानाही अनेक वेळा ती या ग्रुपबरोबर चार दिवसाच्या ट्रीपला सुद्धा जायची. सहज लक्षात आलं नीताच्या … आपला नेहमीचा ग्रुप चार दिवस दिसला नाही. मग तिने हाताखालच्या रश्मीला विचारलं “ अग मानसी सुहास कुठे दिसल्या नाहीत ग?” रश्मी म्हणाली “ मॅम, त्यांचा ग्रुप चार दिवस कोणाच्यातरी फार्म हाऊसवर नाही का गेला? तुम्हाला माहीत नाही का? “ नीता गप्प बसली. पुढच्या आठवड्यात सुहास तिच्याजवळ आली आणि म्हणाली “ रागावलीस का? पण तुला कसं विचारावं असं वाटलं आम्हाला ! आम्ही सगळे कपल्स ग आणि तू एकटी ! तुला ऑकवर्ड झालं असतं ग, म्हणून नाही बोलावलं. “ नीता काहीच बोलली नाही पण तिनं खूणगाठ बांधली मनाशी की संजय गेल्याने आपल्या आयुष्याचे संदर्भ बदलले. तिला म्हणावेसे वाटले, ‘ संजय असतानाही मी एकटीच तर येत होते कितीतरी वेळा, तेव्हा हा प्रश्न कसा आला नाही तुमच्या मनात ‘. नीताने हळूहळू या ग्रुपशी संबंधच कमी करून टाकले. आपल्यामुळे त्यांना अडचण नको. मनातून अतिशय वाईट वाटलं तिला, पण हे करायचंच असा निर्णय घेतला तिनं. एका माणसाच्या जाण्यानं आपल्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम्स उभे रहातील याची कल्पनाच नव्हती नीताला. तिने आपलं मन काढून घेतलं या लोकांतून !अतिशय मानसिक त्रास झाला तिला पण मुळात अतिशय खम्बीर असलेली नीता हाही आघात झेलू शकलीच.
त्या दिवशी दबक्या पावलांनी सुहास नीता जवळ आली आणि म्हणाली, “ नीता अशी नको आमच्याशी तुटक वागू !आपली किती वर्षाची मैत्री एकदम तोडून नको टाकू. आम्हाला खूप वाईट वाटतं ग. परवा माझ्या मुलीचं, तुझ्या लाडक्या अश्विनीचं मी डोहाळजेवण करतेय. तू नक्की नक्की ये बरं का..मला फार वाईट वाटेल तू नाही आलीस तर. “ .यावर शांतपणे नीता म्हणाली, “ खूप खूप अभिनंदन सुहास.आणि थँक्स मला तू बोलावलंस म्हणूनही. पण तुझ्या घरी आजेसासूबाई, सासूबाई आहेत. त्यांना माझ्यासारखी विधवा आलेली चालणार नाही. मी ओटी भरलेली तर मुळीच नाही चालणार.. नकोच ते. मी येणार नाही. अग मी हे तुझ्यावर रागवून नाही म्हणत पण आता अनुभव घेऊन शहाणी नको का व्हायला? अश्विनीला माझे आशीर्वाद सांग.” गोऱ्यामोऱ्या झालेल्या सुहासकडे न बघता नीता तिथून उठून गेली. हा बदल नीताने स्वीकारला पण तिला ते सोपे नाही गेले. आता नोकरीची तीन वर्षे राहिली होती. नीताने विचार केला ही नोकरी संपली की आपण काहीतरी सोशल वर्क करूया. नीताने आता कॉलेज सुटल्यावर ब्रेल लिपी शिकण्याचा क्लास लावला. फार आवडला तिला तो. हळूहळू नीता ब्रेलमधली पुस्तकं सहज वाचायला शिकली. तिचा जुना मैत्रिणीचा ग्रुप कधी सुटला तिला समजलं पण नाही आणि वाईट तर मुळीच वाटलं नाही.
नीताला ब्रेल शिकवणारी मुलगी अगदी तरुण होती. तिने एम एस डब्ल्यू केल्यावर ब्लाइंड स्कूलमधेच नोकरी करायची ठरवली होती आणि आपण होऊन ब्रेल शिकणाऱ्या नीताचे तिला फार कौतुक वाटले. आता रोज नीता ब्लाइंड स्कूलमध्ये जाऊन छोट्या मुलांना गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवू लागली. किती आनंदाच्या वाटा खुल्या झाल्या नीताला ! नीता रमून गेली तिकडे. ही ब्रेल शिकवणारी तरुण मुलगी नीना तर तिची मैत्रिणच झाली .नीताची नोकरी संपली आणि नीता रिटायर झाली. होणाऱ्या निरोप समारंभाला तिने निक्षून नकार दिला आणि घरी परत आली. आता ती करेल तेवढ्या वाटा तिला बोलावत होत्या.
☆ आपल्याला असं जगता येईल? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
ऑफीस सुटल्यावर घरी निघालो , खूप भूक लागली होती. पण आई व बायको दोघींही घरी नव्हत्या म्हणून रस्त्यात पाणी पुरीची गाडी दिसली म्हणून पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो. पाणीपुरीवाल्याकडे गर्दी होती. गपचूप आपला नंबर येईपर्यंत वाट बघण्यापालिकडे काही हातात नव्हते.
पाणीपुरीवालाच्या बाजूला एक आजोबा त्यांचा नंबर यायची वाट बघत उभे होते. पायात पांढरा शुभ्र पायजमा, वर हाफ शर्ट, चेहऱ्यावर निर्विकार भाव, आणि हसरा चेहरा, वय वर्ष साधारण ६५-७०.
आजोबा मस्त पाणीपुरी च्या पिशवीत हात घालून एक एक कोरडी पुरी तोडांत कोंबत होते. माझा नंबर आला. पाणीपुरीवाल्यासमोर द्रोण हातात घेऊन उभा राहिलो. व एकामागोमाग एक पाच पाणीपुऱ्या खाल्ल्या. पोटातली आग जरा शांत झाली होती. आजोबांचा मात्र पुऱ्या खाण्याचा कार्यक्रम चालूच होता. पाणीपुरीवाला चांगलाच वैतागला होता.
“बाबूजी प्लेट देता हुँ। बराबरसे खाओ ना” आजोबांनी नुसतेच गालातल्या गालात हसून पुऱ्या खाणे चालूच ठेवले.
एक प्लेट पाणीपुरी खाऊन माझे तोंड खवळले होते. म्हणून आजून एक पाणीपुरीची प्लेट सुरु केली.
आजोबा मात्र तल्लीन होऊन पिशवीमधल्या पुऱ्या मटकावत होते.
“ओ आजोबा नीट घेऊन खा की?” मी बोललो. आजोबा हू नाही की चू नाही. वाटले काहीतरी गडबड आहे. माझी दुसरी प्लेट संपत आली. आजोबा तिथेच उभे.
तेवढ्यात मागून एक माणूस स्कुटीवर आला.
“काळजी करू नकोस, बाबा सापडले!!” कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता. गळ्यात ऑफिस बॅग, पायात साधी चप्पल, चाळीशीतला असावा तो, आणि त्याच्या चेहऱ्यावर त्याचे बाबा सापडल्याचा आनंद दिसत होता.!
त्याने गाडी बाजूला घेवून स्टँडला लावली.
“काय बाबा आज पाणीपूरी का? खायची का अजून???”
त्याने आजोबांना विचारले. आजोबांचे त्यावर काहीच उत्तर नाही. त्याने आजोबांना गाडीवर बसवले. व पाणीपुरीवाल्याला नम्रपणे विचारले की, आजोबांनी किती पुऱ्या खाल्ल्या आणि त्याचे पैसे देऊन टाकले. हे सगळे बघून मला नवलच वाटले.
“हे आजोबा कोण आहेत तुमचे?” मी विचारले.
“वडील आहेत माझे.” त्याचे उत्तर.
“त्यांना काही त्रास आहे का?” माझा पुढचा प्रश्न.
“हो त्यांना अल्झायमर आहे.”
अत्यंत शांतपणे त्याने सांगितले. त्याच्या बोलण्यात कुठेही दुःख, ताण, त्रास नव्हता. अगदी सहजतेने तो बोलत होता.
” मग हे आजोबा असे कुठेही जातात का?”
” हो, आत्ताच बघा ना, पाच किलोमीटर चालत आलेत.”
मी शॉकच झालो.
“मग तुम्ही यांना शोधता कसे?”मी विचारले.
“आम्ही यांच्या खिशामध्ये कायम एक मोबाईल ठेवतो आणि त्यात एक GPS ट्रॅकर लावला आहे. त्याच्या साहाय्याने शोधतो ह्यांना मी.”
“असे वारंवार होत असेल” मी आश्चर्याने विचारले.
तो स्मितहास्य करून म्हणाला “महिन्याला एक दोन वेळेस”
“काळजी घ्याआजोबांची ! बाप रे काय हा वैताग” मी बोललो. त्यावर तो गृहस्थ म्हणाला, “बाबाही मी लहानपणी खेळायला गेलो की मला शोधून आणायचे ,याञेत हरवलो तर शोध शोध शोधायचे. त्यात काय येवढं.”
त्याने त्याच्या वडिलांना व्यवस्थित गाडीवर बसविले आणि निघून गेला.
खूप काही शिकण्यासारख होतं त्या माणसाकडून. इतका दुर्दम्य आजार वडिलांना असून सुद्धा किती शांत होता तो. बिलकुल चिडचिड नाही की कुठल्याच प्रकारचा मनस्ताप नाही.
उतारवयात आपल्या वडिलांना लहान बाळाप्रमाणे सांभाळणाऱ्या त्या माणसाला मनोमन सलाम ठोकून मी पुढे निघालो…
महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे काम केले आहे.
युवकांनी देशसेवेसाठी दोन वर्ष पुर्ण वेळ द्यावे, या बाळासाहेब देवरसांच्या आवाहनानुसार पहिले चार महिने आसाम ला व नंतर मध्यप्रदेशात अभाविप चे काम केले.
कामासाठी होशंगाबाद जिल्हा मिळाला असता एका आक्रमणकाऱ्याचे नाव आपण आपल्या सुंदर शहराला का देतो, असे म्हणत, “होशंगाबाद नहीं नर्मदापुर कहो!” हे अभियान सुरू केले. त्याला ३१ वर्षांनी यश आले व होशंगाबाद चे नामांतरण नर्मदापुरम् झाले. या नामांतरणादरम्यान भव्य मंचावर अतिथी म्हणून आमंत्रित केले गेले होते.
आजकाल नर्मदा परिक्रमा करून आलेल्यांना संगठित करत, माझी गावनदी हीच माझी नर्मदा हे अभियान चालवतो. यासाठी गुगलमिटवरून नर्मदाष्टक उपासना मंडळ चालवतो. महाराष्ट्रासह अनेक राज्यातील गावांमध्ये गावनदी अभियान सुरू झालेले आहे.
व्यवसाय – मुद्रण
छंद – स्वदेशी चळवळी अंतर्गत हेअर आॅईल शिकाकाई शाम्पू, दंत मंजन व आंघोळीचे नदीपुरक साबण बनवत असतो.
इंद्रधनुष्य
☆ बहुता सुकृतांची जोडी ☆ श्री किशोर पौनीकर ☆
वय केवळ ११७ वर्ष
केंद्रीय रस्ते विकास मंत्री श्री. नितीनजी गडकरींनी नर्मदा परिक्रमा मार्गात रस्ते बांधतो म्हटल्यावर, परिक्रमा मार्ग हा पारंपरिक पद्धतीचाच असावा, असा आग्रह करणारा लेख मी लिहिला होता. तो अनेकांना आवडला व भरपूर शेअर, फाॅरवर्ड झाला. लगोलग तिसऱ्याच दिवशी नर्मदा परिक्रमा क्षेत्रातील काही परिक्रमींच्या गैरवर्तणुकीवरही लेख लिहावा लागला. हा लेख सपाटून शेअर व काॅपी पेस्ट झाला. साम टिव्ही मराठी वर माझी मुलाखतही झाली. गेल्या चार दिवसांपासून सकाळी ८.०० ते रात्री ९.३० फोन सतत वाजतोय. व्हाॅटस् ॲपवरही कितीतरी मेसेजेस येत आहेत.
असाच एक मेसेज आला…..
डाॅक्टर स्वामी केशवदास.
करनाली, तालुका डभोई, जिला बड़ौदा, गुजरात.
इतक्या फोन व मेसेजमध्ये या मेसेजकडे विशेष लक्ष जाणे शक्यच नव्हते. त्यांना विचारले, “आपल्याला मराठी येते का?” तर ते म्हणाले की, “गुजराती/हिंदी/इंग्लिश/तमिल/तेलगु/कन्नड़ भाषा अच्छी तरह जानते है। मराठी समझता हूं, पर बोल नहीं सकता!”
मी त्यांना माझे नर्मदा मैय्यावरील काही हिन्दी लेख पाठवलेत. त्यांनी माझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली.
(सततचे फोन व मेसेजेस मध्ये गुंतून पडल्याने दुर्देवाने मी कोणाशी चॅटिंग करत आहे, हे मला माहितच नव्हते.) मी त्यांना म्हणालो की, केंव्हाही फोन करा.
आज त्यांचा मेसेज आला की, ते रात्री ८.३० नंतर मला फोन करतील. फोन तेच करणार होते, त्यामुळे मला चिंता नव्हती. नर्मदाप्रेमी अलग अलग बंधु भगिनींचे फोन व मेसेज सुरूच होते.
रात्री ९.३० ला फोन वाजला. हा नंबर व्हाॅटस ॲप चॅटिंग मुळे माझ्या जवळ सेव्ह होता. स्क्रिनवर नाव आले. #स्वामी_केशवदास, बडोदा, गुजरात.
मी फोन सुरू केला. अंदाजे ६५ वर्षे वय असलेला तो आवाज वाटला. मी बोलणे सुरू केले. स्वामीजींचेही बोलणे सुरू झाले. त्यांना माझा ‘गडकरींवरील लेख’ व ‘परिक्रमा की बेधुंद तमाशे’ हे दोन्हीही लेख फार आवडले होते. त्यांनी माझी साम टिव्ही मराठी वरील लाईव्ह मुलाखतही बघितली होती. मुलाखत संपल्यावर लगोलगच त्यांनी मला फोन लावला होता. पण तेंव्हा माझा फोन सतत बिझी असल्याने आमचे बोलणे झाले नव्हते. म्हणून त्यांनी मला मेसेज केला होता.
स्वामीजींना बोलतं करावं म्हणून मी काही प्रश्न विचारले व त्या दरम्यान ते बोलत असतांना दर वाक्यागणिक थक्क होण्याची वेळ माझ्यावर आली होती.
म्हैसूरला जन्म झालेले स्वामीजी प्रख्यात डेहराडून स्कूल मध्ये शिकले व नंतर ब्रिटनमध्ये ते वयाच्या ६७ वर्षापर्यंत प्रख्यात हार्ट सर्जन म्हणून कार्यरत होते. अमाप पैसा कमावला. त्यांनी लाहिरी महाशयांकडून क्रिया योगाची दिक्षा घेतली आहे.
मी सहजच त्यांना विचारले, “स्वामीजी, आपने नर्मदा परिक्रमा कब की?”
“१९५६ में ” ते म्हणाले व मी एकदम उडालोच….
“स्वामीजी आपकी उम्र कितनी है? ” मी आतुरतेने नव्हे अधिरतेने विचारले…
“११७ वर्ष “
“ क्ऽक्ऽक्ऽक्ऽक्या????”
मी जवळपास किंचाळलोच. चौथ्या मजल्यावरच्या गॅलरीत उभा राहून बोलणारा मी, मला कोणीतरी १०० व्या मजल्यावर पॅराफिट वाॅल नसलेल्या गॅलरीत उभे केलेय, अशा चक्रावलेल्या अवस्थेत होतो.
मला, मी काहीतरी चुकीचेच ऐकत आहे, असे वाटत होते. मी पुन्हा त्यांना विचारले, “आपका जन्म वर्ष कौनसा है?”
“सन १९०५” ते उत्तरले.
माझे वय वर्ष ५७ होत असल्याने, आता बरीच कामं कमी करावीत, अशा सर्वसामान्य मराठी विचारांचा मी, मनातल्या मनात तुटक गणित मांडू लागलो….. १९०५ ते २००५ म्हणजे १०० वर्ष. २००५ ते २०२२ म्हणजे १७ वर्ष….. म्हणजे ११७ वर्ष बरोब्बर होते.
गॅलरीत वाहत असलेल्या हिवाळी थंड हवेतही मला घाम आला…
तिथूनच मी नर्मदा मैय्याला व मला घडवणाऱ्या वैनगंगेला नमस्कार केला…. एक साधा यःकश्चित व्यक्ती मी, ४५ वर्ष विदेशात विख्यात हार्ट सर्जन म्हणून काम केलेल्या, ११७ वर्षांच्या विभुतीने मला स्वतःहून फोन करून तुमचे व माझे विचार एकसारखे आहेत, हे म्हणावे…. मी पुन्हा चक्रावलो होतो.
पण….
माझे हे चक्रावणे येवढेच असावे, असे जे वाटत होते, ते त्यांच्या दर वाक्यागणिक वाढतच होते.
मी त्यांना त्यांच्या आश्रमा बद्दल विचारू लागलो. मला वाटले की एक हाॅल व कुटी, असे काहीसे ते सांगतील….
ते म्हणालेत, “नर्मदाजी के दोनो तट मिलाकर हमारे सात आश्रम है, पर हर आश्रम में मंदिर बनाने की जगह मैने २००, २५० काॅट के अस्पताल बनवाये है। पर इसकारण आप मुझे नास्तिक मत समझना। “
त्यांच्या आश्रमाचे सेवाकार्य ते सांगू लागले. “हमारे तीन आश्रम में ही नर्मदा परिक्रमावासी आते है, बाकी में अस्पताल, क्रियायोग साधना व स्वावलंबन के कार्य चलते है। हमारे किसी भी आश्रम में दानपेटी नहीं है, न ही हमने कोई रसिदबुक छपवाये है। हमारे ट्रस्ट में जो पैसा है, उसके ब्याज पर हमारे सब कार्य चलते है।”
मी जे ऐकत होतो, ते सर्व भव्य-दिव्य व व्यापक होते… स्वतःच्या आकलनशक्तीची संकुचितता मला कळली होती. मी हतबल होतो की, दिःग्मुढ, हेच मला कळत नव्हते.
काहीतरी बोलायचे म्हणून मी बोललो,” आपकी हिन्दी तो बहुत अच्छी है, आप दक्षिण भारतीय नहीं लगते। “
ते म्हणालेत, “हां ठिक पहचाना, वैसे हम उत्तर भारतीय है। मेरे पिताजी मैसूर के महाराजा के कुलपुरोहित थे।”
अजून एक मोठा धक्का मला बसायचा बाकी आहे, हे मला माहीत नव्हते…
मी विचारले, “आपके दादाजी कौन थे? “
“पंडित मदन मोहन मालवीय!”
” क्ऽक्ऽक्ऽक्ऽक्या?” आपण कितव्यांदा आश्चर्यचकित होत आहोत, हे मोजणे मी बंद केले होते.
“महामना पंडित मदन मोहन मालवीय?” न राहवून मी त्यांना पुन्हा विचारले.
“हां! मेरे दादाजी बॅरिस्टर थे…. ” ते महामना पंडित मदन मोहन मालवीयांबद्दल सांगू लागलेत.
थोड्या वेळाने त्यांनी आपली गाडी पुन्हा नर्मदा परिक्रमेकडे वळवली. म्हणालेत, “आप परिक्रमा के बारे में जो आग्रह कर रहे है, वह बहुतही सटिक है। गुरू आज्ञा के बिना नर्मदा परिक्रमा करना मात्र चहलकदमी ही है! “
मग ते मराठी परिक्रमावासी व त्यांचे वागणे, परिक्रमेत शूलपाणी झाडीतून जाण्याचा अवास्तव आग्रह, शूलपाणीतील सेवाकेंद्रांची काही गडबड, असे बोलू लागले.
पुढे ते म्हणालेत,”मै अब तक खुद होकर केवल “राहूल बजाज” से फोनपर बात करता था। आपके परिक्रमापर के लेख व परिक्रमा फिरसे अध्यात्मिक ही हो, यह आपका प्रयास मुझे बहुत भाया। इसलिये आज मै आपसे खुद होकर फोन से बात कर रहा हूं।”
नर्मदा मैय्या अनाकलनीय चमत्कार करत असते, हे मला माहीत होते. यातले काही माझ्या वाहन परिक्रमेत मी अनुभवले होते. पण ती सामाजिक जीवनातही चमत्कार करते, हे मला यावर्षीच्या ४ ते ८ फेब्रुवारी दरम्यान कळले होते. होशंगाबादचे नामांतरण नर्मदापुरम् होण्याचे पूर्ण श्रेय तिने मला त्या भव्य मंचावर मुख्यमंत्री, खासदार व आमदारांच्या सोबत बसवून दिले होते.
आता राहूल बजाज यांचे शिवाय स्वतःहून कोणालाच फोन न करणारे स्वामी केशवदास, माझ्याशी स्वतःहून फोनवर बोलत होते.
मी पण नर्मदेच्या या चमत्काराचा फायदा घेतला. त्यांना म्हणालो की, “परिक्रमेतील वाढत्या गर्दीमुळे वमलेश्वर (विमलेश्वर) ला परिक्रमावासींना तीन चार दिवस अडकून पडावे लागते. त्यांच्यासाठी विमलेश्वर गावाअगोदर अंदाजे १५०० परिक्रमावासी राहू शकतील असा आश्रम बनवायला हवा, जेणेकरून नावाडी व ट्रॅव्हल कंपन्यांच्या साटेलोट्यांचा त्रास पायी व छोट्या वाहनाने परिक्रमा करणाऱ्यांना होऊ नये. तसेच आज केवळ १२ नावा चालतात, त्या वाढवून किमान २५ तरी व्हाव्यात.”
स्वामीजी म्हणालेत,”अभी गुजरात मे चुनाव का मौसम चल रहा है। चुनाव होने के पंद्रह बीस दिन बाद अपने उस समय के मुख्यमंत्री से ही सिधी बात करेंगे। विमलेश्वर में बडा आश्रम तो हम खुद ही बना देंगे। “
गेल्या दोन दिवसांपासून वमलेश्वर/विमलेश्वरच्या गर्दीमुळे मी फारच चिंतीत होतो. यावर काय तोडगा निघू शकतो? म्हणून मी भरपूर जणांना फोन केले होते. आपण यावर काय करू शकतो? हे चाचपडणे सुरू होते.
अशा वेळी नर्मदेने त्या क्षेत्रातला सुप्रिम बाॅसच माझ्याकडे पाठवून दिला. ११७ वर्षांचा हा तरुण आपल्या वयाच्या अर्ध्याहूनही लहान, नाव किशोर, पण स्वतःला प्रौढ समजायला लागलेल्या मला, नर्मदा प्रेरित सामाजिक कार्यासाठी नवचैतन्य भरत होता.
नर्मदा मैय्या के मन में क्या चल रहा है, यह तो बस वहीं जानती है!
☆ – पॅराशूटस्… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
एअर कमांडर विशाल एक जेट पायलट होता. एका मिशन मध्ये त्याचं फायटर विमान मिसाईल ने उडवलं गेलं. तत्पूर्वी त्याने पॅराशूट घेऊन उडी मारली आणि बचावला. सर्वांनी त्याचं फारफार कौतुक केलं.
पाच वर्षांनंतर पत्नीसोबत तो एका रेस्टोरन्टमध्ये बसला असताना बाजूच्या टेबलवरील एक व्यक्ती त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, “तुम्ही कॅप्टन विशाल ना? तुम्ही जेट फायटर चालवायचात आणि ते पाडण्यात आले होते.”
“पण हे तुला कसे माहीत?” विशालने त्याला विचारले.
तो मंद स्मित करीत म्हणाला, “मीच तुमचं पॅराशूट पॅक करून विमानात ठेवत असे”.
विशाल आश्चर्य आणि कृतज्ञतेने आ वासून विचारात पडला की जर पॅराशूट नीट उघडलं नसतं तर मी आज इथे नसतो.
त्या रात्री विशाल त्या व्यक्तीच्या विचाराने झोपू शकला नाही.
त्याला आश्चर्य वाटत राहिलं की त्या व्यक्तीला कितीवेळा पाहिलं असेल, पण साधं शुभप्रभात, तू कसा आहेस? एवढं देखील आपण विचारलं नाही. का तर तो स्वतः फायटर पायलट आहे आणि ती व्यक्ती एक साधी सुरक्षा कामगार.
तर मित्रानो, तुमचं पॅराशूट कोण बरं पॅक करतेय?
प्रत्येकाला कोणी ना कोणी दिवसभरात काही न काही आवश्यक त्या गोष्टी पुरवत असतो.
आपल्याला विविध प्रकारच्या पॅराशूटची आवश्यकता पडत असते – आपल्याला शारीरिक पॅराशूट, मानसिक पॅराशूट, भावनात्मक पॅराशूट आणि अध्यात्मिक पॅराशूटची गरज पडत असते.
सुरक्षा जोपासण्यासाठी आपण या सर्व आधारांची मदत घेत असतो.
काहीवेळा दैनंदिन आव्हानांना सामोरे जाताना आपण काहीतरी महत्वाचं विसरत असतो.
आपण समोरच्याला हॅल्लो, प्लिज, धन्यवाद, त्याच्या आयुष्यात घडलेल्या आनंददायी गोष्टींसाठी अभिनंदन, एखादी छानशी कॉम्प्लिमेंट किंवा त्यांच्यासाठी काहीही कारण नसताना काहीतरी चांगलं करावं हे करायचं राहून गेलं असणारच.
आता जरा आठवून पहा, ह्या वर्षभरात कोणी कोणी तुमचं पॅराशूट पॅक केलं ते.
या वर्षभरात ज्यांनी ज्यांनी शब्दांद्वारे, कृतीद्वारे, प्रार्थनेद्वारे माझं पॅराशूट पॅक केलं आहे त्या सर्वांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. कुणालाही गृहीत धरू इच्छित नाही.
अगदी मनःपूर्वक प्रेमपूर्वक मी आपणा सर्वांना 2023 च्या संस्मरणीय अखेरीसाठी आणि 2024 च्या सुंदर प्रारंभासाठी शुभेच्छा देतो
☆
कवी : अज्ञात
संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈