मराठी साहित्य – विविधा ☆ “ज्ञानपीठाच्या निमित्ताने…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “ज्ञानपीठाच्या निमित्ताने…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

26 फेब्रुवारी.! आजच्याच तारखेला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि.स.खांडेकर ह्यांच्या “ययाती”ला मिळाला होता.

कुठलीही व्यक्ती, व्यक्तीमत्व वा पुस्तकातील गाभा जाणून घ्यायचा असेल तर थेट तिला अगदी मूळापासून गाभ्याला जाणून घेऊनच अभ्यासावं लागतं.अन्यथा वरवर ती व्यक्ती वा ते पुस्तक अभ्यासलं वा चाळलं तर खरे रुप न जाणून घेताच मनात गैरसमज वा संभ्रम निमार्ण व्हायचीच दाट शक्यता.

बरेचदा काही पुस्तकं वा काही व्यक्ती वाचण्याची वा जाणण्याची तीव्र ईच्छा होते, तेव्हा जसजसं त्या गोष्टीच्या खोलापर्यंत आपण अभ्यासतो तो आपण जे बघतं होतो, जाणतं होतो ते निव्वळ हिमनगाचे दिसणारे टोकच होते बाकी सगळा उर्वरित गोष्टींचा आवाका खूप प्रचंड आहे ह्याची जाणीव होते.काही व्यक्तींच्या हातून खूप सारी साहित्य निर्मीती होते.पण त्या साहित्यातील एखादे साहित्य पराकोटीचे लोकप्रिय होऊन त्या व्यक्तीची जणू ओळखच बनते.वि. स. खांडेकर हे ह्याच प्रकारातील “ययाती”ह्या पौराणिक कादंबरीमुळे अजरामर झाले. जणू वि.स.खांडेकर आणि ययाती हे एक समीकरणच बनले. आपलं आवडीचं वाचनं आणि पुस्तक ह्याचा विचार आल्याबरोबर जी काही पुस्तक माझ्या चटकन नजरेसमोर येतात त्यात ययाती हे असतचं.

सांगली,मिरजकडील खांडेकरांनी साहित्य क्षेत्रात विविध पदं भुषविलीतं,साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.त्यांना अकादमी पुरस्कार, मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मभूषण तसेच कोल्हापूर च्या शिवाजी विद्यापीठाची मानाची डिलीट पदवी मिळाली.आज 26 फेब्रुवारी. 1976 साली ह्याच दिवशी ययाती साठी वि.स.खांंडेकरांना  शिरपेचात मानाचा तुरा खोवल्यासारखा  पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.

ययाती मी कित्येक वेळा वाचली असेल ह्याचं काही गणितचं नाही. काँलेजजीवना पासून आजवर वाचतांना तिच्यातील दरवेळी नवीनच पैलू नजरेसमोर येतात.खूप सारं जीवनाचं तत्वज्ञान सांगितलयं,शिकवलयं ह्या कादंबरीनं.

आधी ऋषीकन्या आणि नंतर राणी झालेल्या देवयानीची संसारकथा,प्रेमाचेच दुसरे नाव त्याग,समर्पण हे मानणाऱ्या राजकन्या शर्मिष्ठेची प्रेमकथा,संयमी कचाची भक्तीगाथा, त्यागमूर्ती शर्मिष्ठा पूत्र पुरूरवाची त्यागकथा, आणि मुख्य म्हणजे आधी राजपुत्र व नंतर राजा झालेल्या ययातीची भरभरून जगण्याच्या आसक्तीची कथा ह्यात सुरेख रंगवलीयं.विशेष म्हणजे एकेक घटनांची साखळी गुंफतांना कुठलीही कडी विस्कळीत झाल्याची वा निखळून पडल्याची अजिबात जाणवत नाही.

ह्यातील एक एक पात्र सजीव होऊन आपल्या डोळ्यासमोर अवतीभवती वावरल्याचा वाचतांना भास होतो.कामुक,लंपट

संयम न पाळणारा ययाती आपल्याला खूप काही शिकवतो.त्याच्या कामुकपणाचा राग न येता त्याच्या शारीरिक मागणीमुळे येणाऱ्या हतबलतेची कीव येते तेव्हाच तो कुठेतरी जवळचा पण वाटायला लागतो.देवयानी च्या प्रबळ महत्वकांक्षे बद्दल वाचतांना अचंबित होतो.शर्मिष्ठेचा त्याग व समर्पण बघितले की नतमस्तक व्हायला होत.खरचं मनापासून केलेलं प्रेम ही खूप उदात्त संकल्पना आहे.ख-या प्रेमात एकमेकांची काळजी घेणं,काळजी वाटणं,हे सगळं असतं.ख-या प्रेमात ना वैषयिक भावना असते ना सतत डोक्याला डोकी लाऊन सतत जवळ राहण्याची गरज हे आपल्याला हे लिखाण समजावून सांगतं.शर्मिष्ठा व ययाती हे दोघे घालवित असलेले काहीच क्षण हे देवयानी ययातीच्या एकत्र सहवासापेक्षाही जास्त समाधान देऊन जातात हे कांदबरीत अतिशय छान उलगडून सांगितलयं.प्रेम हे घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद देऊन जात हे ही वाचतांना जाणवतं. गुरुबंधू कचाने वेळोवेळी केलेली मदत किती अनमोल असते हे उलगडतं.ख-या सद्भावना असल्या की ती व्यक्ती नेमक्या अडचणीच्या प्रसंगी परखडपणे वागून योग्य मार्गदर्शन करते ह्याचा प्रत्यय गुरूपुत्र कचदेव देतात.रक्ताच्या नात्यात प्रसंगी सर्वात प्रिय असलेले तारुण्यही लिलया हसतहसत कसे पित्याला द्यावे हे राजपुत्र पुरुरवा कडून. शिकावं.आणि शेवटी ह्या सगळ्या अनुभवांनी आलेल्या शहाणपणामुळं किंवा आलेल्या समजामुळं राजा ययाती ला उपरती होऊन त्याच्यात होणारे सर्वांगिण चांगले बदल आपल्याला खूप काही शिकवून जातात.

…म्हणून जर कोणी चुकून ही कादंबरी वाचली नसेल तर अवश्य वाचा इतकचं मी म्हणेन. आज काही वाचकांच्या आग्रहास्तव ह्या दिवसाचे औचित्य साधून परत ही ययाती बद्दल पोस्टलयं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कोयता… भाग – 3 ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

श्री सचिन वसंत पाटील

? जीवनरंग ?

☆ कोयता… भाग – 3 ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

(कुठं रात्रीच पाणटूळ भाईर आलं तर? आणि समजा व्याली यवस्थित आणि वार पडंना झाली तर? वार कुत्र्यानं वडून न्हेली तर? तिला नुसता विचार सुद्धा सहन होईना.) – इथून पुढे —

सुलीला गेल्यावर्षी सुक्यानानाची, कुत्र्यांनी फाडून खाल्लेली शेरडी आठवली. आणि तिला ऊभं वारं सुटलं.

जेवा-खायाचं सोडून सुली शेजारच्या रघूआप्पाच्या खोपीत घुसली. सुनंदा वैनीला तिनं विचारलं, 

“जेवलासा का?”

“हे न्हवं आत्ताच जेवले बग!”

“आणि तू गंऽ सुले. तू जेवलीस का?” 

“जेवले मी बी!” सुलीनं दाबून खोटंच सांगितलं. उगी लांबड लागाय नगो म्हणून.

“गाड्या काय आज लवकर येणार न्हाईत म्हणं!”

“व्हय गं, म्याबी ऐकलं मघा. अण्णाच्या गाडीची टायर फुटलीया जणू! बाकी येतील की सगळी.”

“व्हयवं, आता कवा दुरूस्ती हुतिया कुणास ठावं? कारखान्याची गाडी येणार, मग जॅक लावून दुसरा टायर घालणार. मग गाडी कारखान्यावर यिऊन खाली हुणार!”

“व्हय, रात उजडंल त्येला! झोप तू आपली बिनघोरी, का आमच्यात येतीस आजच्या रोज झोपायला?”

“आली आसती खरं, ती शेरडी एक व्याला झालीया. बाळाला आणि घेतलं पायजे. जागा पुरायची न्हाय तुमच्या खोपीतबी. झोपते आपली माजी मी!”

“झोप झोप, त्येला काय हुतंय? आणि आमी हायच की हितं. काय लागलं केलं तर कवाबी हाक मार. लगी येतो!”

“तुझ्या आईचा काय फोनबीन आल्ता काय? म्हातारीच्या तब्येतीचं कसं काय कळलं का?” 

“परवादिशी आल्ता. मुकादमाच्या मोबाईलवर. हाय बरं म्हणत्या. कवा बिगाडतंय, कवा सवंनी आसतीया. हाय तसंच म्हणायचं!”

आसंच काहीबाही दोघी बोलत बसल्या. तोवर बैलगाड्या आल्याचा आवाज आला. बैलांच्या गळ्यातील चाळ, साठ्यातला पत्रा वाजताना ऐकू येऊ लागला. “आरं शिरप्या हैऽ.. चलरंऽ..!” गाडीवानाचा आवाज लांबून येत होता.

सुली आपल्या खोपीबाहेर आली. आपला अण्णा आज येणार नाही, हे माहीत असूनही तिनं सगळ्या गाड्या नजरेनं धुंडाळल्या. त्यात तिचा अण्णा तिला कुठंच दिसत नव्हता. तिची घोर निराशा झाली.

हळूहळू सगळ्या गाड्या आपापल्या जाग्यावर गेल्या. उदास मनानं पाय ओढत ती आपल्या खोपीत आली. गाड्या आल्यामुळे तळ काही काळ जिवंत झाला. काही वेळ जनावरांना वैरणपाणी देतानाचे आवाज. पुरूष माणसं जेवताना बोलत असलेली. टोळीत काही दारूडेही होते. येताना टाकुनच आलेले. विनाकारण आपल्या बायकापोरांना शिव्या हासडीत होते.

काही वेळातच सारे चिडीचूप झाले. दमूनभागून आलेली अंगे विसावली. मेल्यागत मुरगाळून पडली. सुलीनंही पातेल्यातल्या भाताचे चार घास खावून घेतले. घास जात नव्हतं. भूकच मेली होती. भाताचं घास तसंच पाण्याच्या घोटाबरोबर गिळलं.

तळावर अंधार दाटला होता. रात्रीचे नऊ-साडेनऊ झाले असावेत. पाण्यात पडल्यागत तळ शांत झालेला. सगळं वातावरण थंडगार झालेलं. मधेच एखाद्या बैलाच्या गळ्यातील घुंगरांची किनकिन नि रातकिड्यांची किरकिर तेवढी ऐकू येत होती. बाळाच्या शेजारी पटकूर हातरून तिने पाठ टेकली. तोवर शेरडीची धडपड ऐकू आली. ‘अगं बाईऽ..! वैरण टाकायची राह्यलीच की!’ असं स्वतःशीच पुटपुटत ती पुन्हा उठली. शेरडीला बारीक-बारीक कोंबऱ्या आणि शेवरीची मूठ टाकली. शेरडी कुरूकुरू शेंडे कुरतडू लागली.

बराच वेळ ती शेळीकडे एकटक बघत अंगणात उभी राहिली. वातावरण चिडीचूप झालेलं. तिनं आभाळाकडं बघितलं. नुकतीच पौर्णिमा होऊन गेल्यामुळं टिपूर चांदणं पडलेलं. ढगाआडून चंद्राची कोर बाहेर आली. तिचा झिरपलेला पांढराशुभ्र प्रकाश खोपीवर पडला. चांदण्याच्या त्या मंद प्रकाशानं सारा तळच न्हाऊन निघालेला. खोपीवरला वाळला पाला चंद्राच्या लख्ख प्रकाशानं उजळून निघाला होता. हळूहळू खोपीच्या निर्जिव सावल्या आपले पाय पसरत चालल्या होत्या.

सुली आत आली. चुलीवरची चिमणी विझवली. अंथरुणावरती अंग टाकलं. तिला आपल्या आईची आठवण झाली. आईनं जाताना दिलेल्या सूचना तिला आठवल्या. झोपताना चिमणी बंद करायची. बाहेर कुणी बोलवलं तर जायचं नाही. ओळख असल्याशिवाय बोलायचं नाही. असं बरंच काहीबाही ती अंथरुणावर पडल्या पडल्या आठवत होती.

हळूहळू झोप येऊ लागली. डोळे पेंगुळले. तिला झापड पडली. पहाटेच्या निबिड अंधारातली अस्वलं तिला आठवू लागली. त्यांचे नख्या असणारे पंजे. तोंडावरचे काळेभोर केस. माणसांसारखी दोन पायांवर उभी राहून ती पुढे पुढे चालत येतायत… 

ती दचकून उठली. घामानं डबडबलेली. तोंड पुसलं. थोडं पाणी पिऊन घेतलं. पुन्हा अंथरुणावर पडली. तिने मन घट्ट केलं. कशाला घाबरायचं नाही, असं ठरवलं. ती पुन्हा झोपी गेली.

मध्यान रातचंच कसल्यातरी आवाजानं ती दचकली. काळजात चमक उठली. दाराबाहेर कुणीतरी खोकल्यासारखं झालं. तिने डोळे उघडले. अंधाराचा ती अंदाज घेऊ लागली. कोण असावं इतक्या रात्री? का आलं असावं? बुलटवाला मुकादम तर नसेल? असेल, तर तो का आला असेल? एवढ्या रात्री? त्याला माहीत आहे, आज अण्णा-आई घरात नाहीत. त्या संधीचा फायदा उठवायचा आहे का त्याला?

मनात प्रश्नांचं काहूर माजलं. ते झटकून ती अंथरुणावरून उठली. खिडकीपाशी गेली. तिने एक डोळा बाहेर लावला. कोणच कसं दिसेना? ती तशीच थोडावेळ थांबली… कारखान्यावरची कुणी उडाणटप्पू पोरं आली असावीत का? काय नेम सांगावा तेंचा? ती तशीच थोडावेळ कोणोसा घेत थांबली. पण, परत काहीच हालचाल नाही. तिचे डोळे मिटू लागले.

तिथनंच गुडघ्यानं रांगत-रांगत ती अंथरुणावर आली. कलंडली. तिची झोप लागली. पुन्हा थोडा वेळ गेला. दार ढकलल्यासारखा आवाज आला. पाल चमकावी तशी ती चमकली. खडबडून उठली. खच्चून जोरात ओरडली, “कोणाय तेऽ..!”

बाहेर कुणी पळून गेलेल्या पावलांचा आवाज. लांब लांब जाणारा. तिने खिडकीतनं बघितलं तर बाहेर कुणीच नव्हतं. टिपूर चांदणं तळावर पसरलेलं.

ती अंथरुणावर येऊन बसली. कोण असावं ते? मुकादम? कारखान्यावरची पोरं? की आणखी कोण? आज्जीनं काढलेला नवरा नंदू तर नसेल? काळाकुट्ट. बसलेल्या नाकाचा. अंगावर केस असणारा. अस्वलासारखा दिसणारा! तिची मती गुंग झाली. कोण असावं? एवढ्या रात्री येण्याचा त्याचा काय उद्देश असावा? पेपरला आलेल्या, टिव्हीवर सांगितलेल्या बलात्काराच्या घटना ती ऐकून होती.

ती विचार करू लागली. असं घाबरून राहिलो तर आपणही उद्या पेपरची बातमी होऊन जाऊ? आई-अण्णानं येवडी आपल्यावर जबाबदारी टाकलीया ती पार पाडली पायजे. आता इथनं पळ काडायचा न्हायी. काय हुईल त्येला सामोरं जायाचं. आल्या संकटाला धिरानं तोंड द्यायला पायजे… खरंतर तिचं पोरपण आता सरलं होतं. विचाराला बळकटी आली होती. असे अनेक प्रसंग बाईच्या जातीला निभावून न्यावे लागतात, याची बारीकशी चुणूक आज यौवनाच्या उंबरठ्यावर असताना तिच्या वाट्याला आली होती.

विचार करता-करता तिचं लक्ष कुडाला अडकवलेल्या कोयत्याकडं गेलं. आणि लख्खकन तिच्या मनात विचार आला. त्या विचारासरशी तिने कोयता उपसला. हातात घेतला. त्याची धार तपासली. अगदी पुढं येणाऱ्या हाताचं मनगट एका घावात तुटण्यासारखी कारी धार होती त्याला. आणि कोयता चालवून ऊसाचे कंडके पाडायचा अनुभवही तिच्या गाठीशी होता.

ती पुन्हा झोपली. एक हात तिने बाळाच्या अंगावर टाकला होता तर दुसर्‍या हातात तिने कोयत्याची मूठ गच्च धरली होती. आता तिला कुणाची भिती वाटत नव्हती. मुकादमाची, कारखान्यावरच्या पोरांची, नंदूची आणि त्या अंधारातल्या अस्वलांची सुद्धा!

— समाप्त — 

©  श्री सचिन वसंत पाटील

विजय भारत चौक, मु. पो. कर्नाळ, ता. मिरज, जि. सांगली.

मोबा. ८२७५३७७०४९.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सावरकरांची आठवण… — लेखक – श्री शरद पोंक्षे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

❤️ मनमंजुषेतून ❤️

☆ सावरकरांची आठवण… — लेखक – श्री शरद पोंक्षे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

बरोबर १९६६ च्या १ फेब्रूवारीला सावरकरांनी प्रायोपवेशन करायचे ठरवले. आपले ह्या जन्मीचे कार्य पूर्ण झाले आहे ही तात्यांची भावना होती. आपल्या दीर्घायुष्याचे महत्व काय,अशा प्रश्नावर ऊत्तर देताना ते एकदा म्हणाले होते की, ” जगण्याची चिंता मी कधीच केली नाही, म्हणूनच बहुधा इतका दीर्घकाळ जगलो 

असेन. “ तात्यांनी वांच्छिलेले स्वातंत्र्य, भाषाशुध्दी, सामाजिक सुधारणा, सैनिकीकरण, आदी विषयात पुष्कळ यश मिळाले होते.. म्हणून तात्या म्हणत की त्यांचे जीवन कृतार्थ झाले आहे. त्यांनी पूर्वी जेजे पेरलंय ते आता उगवत आहे. त्याला आता फळे येत आहेत. हा आपल्या आयुष्याचा फलऋतु आहे. यावर आपण त्यांना म्हटले की, “ हे ठीक आहे.. पण अद्याप पाकिस्तान नष्ट व्हायचे आहे, आपल्याला मानणारे असे राज्यकर्ते राज्यावर बसायचे आहेत, त्यासाठी आपले मार्गदर्शन आवश्यक आहे.” त्यावर ते म्हणत ”अरे जगात कोणाचीही सर्व स्वप्ने कधीच साकार होत नाहीत. जे झाले हे अपेक्षेपेक्षा, कल्पनेपेक्षा पूर्ण झाले आहे. उरले ते काम पुढच्या पिढीचे आहे. तिला मार्गदर्शन हवे तर मी ते ग्रंथरूपाने लिहून ठेवले आहे. ते वाचणे आणि त्याला अनुसरून वागणे किंवा न वागणे हे त्यांचे काम आहे.” तेव्हा तात्यांचा जीवन संपवण्याचा विचार पक्का ठरला. ज्ञानेश्वरांप्रमाणे गुहाप्रवेश शक्य नव्हता.जलसमाधी घ्यावी असा विचार केला, पण तो सोडून दिला व शेवटी समर्थ रामदासस्वामींप्रमाणे प्रायोपवेशन करायचे ठरवले. आणि १ फेब्रू १९६६ ला अन्न पाणी त्याग केला. सर्वांच्या भेटीगाठी बंद केल्या. ५,६ दिवस गेले. तात्यांचा रक्तदाब खूप खाली गेला. डॉ.पुरंदरेना घाम फुटला. औषध दिले पण ते औषधही घेत नव्हते. पण दुसऱ्या दिवशी रक्तदाब स्थिरावला. डॉ. ना  आश्चर्य वाटले. हे कसे झाले? कारण तात्यांचा योगाभ्यास दांडगा होता. काही सिध्दी त्यांना प्राप्त होत्या. हिंदू धर्मातील न पटणाऱ्या आचार विचारांवर कडक टीका करणाऱ्या सावरकरांनी त्यांच्या ध्वजावर अभ्यूदयनिदर्शक कृपाणासमवेत निःश्रेयस निदर्शन कुंडलिनीही अंकित केली होती. शास्त्रीय दृष्टीचे सावरकर, त्यांना पटल्यावाचून, स्वतः अनुभवल्यावाचून ही गोष्ट मानणे शक्य नाही. त्यांना योगशास्त्र अवगत होते. म्हणूनच सर्व भयंकर हालअपेष्टा सोसूनही ते इतकी वर्ष जगले. त्यांच्या लिखाणात, भाषणात लोकांना मोहून टाकणारी शक्ती आली. त्यांचे नाक, कान, डोळे आदी ज्ञानेंद्रीये शेवटपर्यंत उत्तम कार्यक्षम राहिली.

८३ व्या वर्षीसुध्दा त्यांचे केस काळे होते. प्रायोपवेशन चालू होते.. दिवस चालले होते. आयुष्यभर ज्या मृत्यूला त्यांनी पळवून लावले त्याला आता निमंत्रण देऊनही तो जवळ यायला घाबरत होता .त्याही परिस्थितीत ते सहाय्यकाला बोलावून पत्रे वाचून घेत होते. उत्तरे देत होते. एका मोठ्या नेत्याची तार आली.  एकाने लिहीले होते, ” तात्यांची प्रकृती कशी आहे? कळवा “.तर दूसऱ्याची होती, ”तात्यांची प्रकृती सुधारो, अशी मी प्रार्थना करीत आहे ”.  हे वाचून तात्या म्हणाले, “ नीट वाच..अर्थ समजून घे.” सहाय्यक म्हणाले “भावना एकच आहेत तात्या.’ त्यावर ते म्हणाले,” नाही.. मनातल्या भावना तारेत उतरतात. पहिला मी जायची वाट बघतोय व दूसरा मी बरा व्हावा असे म्हणतोय.”  अनेक लोक भेटायला येत होते. आचार्य अत्रेही आले. ते कोणालाच भेटत नव्हते.  १७ व्या दिवशी सहाय्यकाचा हात हातात घेऊन म्हणाले,

”आम्ही जातो अमुच्या गावा।आमुचा राम राम घ्यावा।

आता कैचे देणे घेणे। आता संपले बोलणे।”

सहाय्यकाशी बोललेले हे ते शेवटचे शब्द. त्यानंतर तात्यांनी  हे जीर्ण शरीर टाकून त्यांचा आत्मा पुढच्या प्रवासावर निघाला. जन्माची सांगता त्यांनी पूर्ण केली .

लक्षावधी लोकांना स्फूर्ती देणारे वक्ते, ग्रंथकार, नाटककार, महाकवी, परकीय साम्राज्याला आव्हान देणारे स्वातंत्र्यवीर, विचारवंत, समाजसुधारक, स्वाभिमानी, हिंदूंचे  ‘हिंदूहृदयसम्राट‘ —  श्री विनायक दामोदर सावरकर— अखेर त्यांनी मृत्यूला २६ दिवसांनी कवटाळले व २६ फेब्रू १९६६ ला सकाळी ह्या जन्माची सांगता करून अनादी अनंत अवध्य आत्मा स्वर्गाकडे गेला.

त्यांचे महान स्फूर्ती कार्य, त्यांचे विचार, हिंदू युवक युवती कार्यप्रवण करून त्यांचे उर्वरित कार्य पूर्ण करतील हीच अपेक्षा. हा दृढ विश्वास.

लेखक : श्री शरद पोंक्षे

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ SSLV-D2 प्रक्षेपणाचा आँखो देखा हाल – भाग-1 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ SSLV-D2 प्रक्षेपणाचा आँखो देखा हाल – भाग-1 ☆ श्री राजीव गजानन पुजारी

डिसेंबरमध्ये आम्ही बेंगलोरला ईशाकडे गेलो होतो. मला बरेच दिवस इस्रो करत असलेल्या प्रक्षेपकांचे प्रक्षेपण प्रत्यक्ष बघण्याची अतिशय इच्छा होती. त्यामुळे बेंगलोरमध्ये असतानाच सहज म्हणून बेंगलोर ते श्रीहरीकोटा अंतर गुगलवर बघितले. ते कारने साधारण सहा तासांचे आहे असे दिसले. ऑक्टोबरमध्ये इस्रोने वन वेब कंपनीच्या छत्तीस उपग्रहांच्या तुकडीचे प्रक्षेपण केले होते. पुढील छत्तीस उपग्रहांचे प्रक्षेपण जानेवारी २०२३ मध्ये करण्यात येईल असे इस्रोने तत्वतः जाहीर केले होते. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निघतांना मी योगेशला म्हटले, ” बहुतेक या महिन्यात मी परत येईन असं दिसतंय. कारण या महिन्यात इस्रो एक प्रक्षेपण करणार आहे आणि मला ते बघायचे आहे.” तो म्हणाला, “मग कशाला जाताय? प्रक्षेपण बघूनच जावा कि!” पण प्रक्षेपणाची तारीख नक्की नसल्याने आम्ही सांगलीला परत आलो. सांगलीला आल्यावर कांही दिवसांनी हे प्रक्षेपण मार्च २०२३ ला होणार असल्याचे समजले. दरम्यान सात फेब्रुवारीला सहज फेसबुक बघत असताना इस्त्रोच्या फेसबुक पेजवर वाचनात आले की दहा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी SSLV-D2(Small satellite launch vehicle-demonstration launch 2)चे प्रक्षेपण आहे. मला माहित होते की हल्ली  सतीश धवन अंतरिक्ष केंद्रात थेट प्रक्षेपण बघण्यासाठी एक प्रेक्षागार उभारण्यात आले आहे व तेथून आपणास प्रक्षेपकाचे प्रक्षेपण थेट पाहता येते व त्यासाठी आगाऊ नोंदणी करावी लागते. त्यानंतर रजिस्ट्रेशन कसे करायचे हे  SDSC-SHAR (Satish Dhavan space center- Shriharikota high altitude range)च्या वेबसाईटवरून हुडकून काढले. lvg. shar. gov या साइटवर ‘Schedulded’ म्हणून एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक केले असता एक पेज उघडते त्या पेजवर ‘click here for witness the launch’ असा ऑप्शन येतो. त्यावर क्लिक केले असता आपणास रजिस्ट्रेशन करता येते.  अशा पद्धतीने माझे रजिस्ट्रेशन झाले (REGISTRATION NO/SNO: T333A0C7774/7382). मला अत्यंत म्हणजे अत्यंत आनंद झाला. लगेच मी इशाला फोन केला. हे घडले संध्याकाळी साडेचार वाजता. दहा तारखेला सकाळी प्रक्षेपण म्हणजे नऊ तारखेलाच मला तिथे पोचावे लागणार होते. ईशाने लगेचच संध्याकाळच्या साडेपाचच्या कोंडुस्करच्या स्लीपरचे बुकिंग केले. मी नेट कॅफेमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन केल्यावर आलेल्या पासची प्रिंट काढून आणली. तोपर्यंत श्रीहरीकोटाला कसे जायचे हे अजिबात माहीत नव्हते. बेंगलोर मध्ये ईशा व योगेश यांनी व मी कोंडुस्कर मध्ये बसल्या बसल्या google वरून माहिती मिळवली. बेंगलोरहून चेन्नई व तेथून सुलूरूपेटा या श्रीहरीकोटा जवळ असलेल्या गावी मला जावे लागणार होते. प्रत्यक्ष श्रीहरीकोटा मध्ये राहण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे श्रीहरीकोटा पासून १७ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावात मला मुक्काम करावा लागणार होता व तेथून प्रक्षेपणाच्या दिवशी मला  श्रीहरीकोटाला जावे लागणार होते. ईशा- योगेश यांनी नऊ तारखेचे बेंगलोर ते चेन्नई साठीचे रिझर्वेशन पाहिले.पण कोणत्याही गाडीचे रिझर्वेशन उपलब्ध नव्हते. मग त्यांनी बेंगलोर ते पेराम्बूर आठ तारखेचे रात्री साडेबाराचे म्हणजेच नऊ तारखेचे 0.30 चे रिझर्वेशन केले. पेरांबूर गाव चेन्नई सेंट्रल पासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. चेन्नई ते सुलुरूपेटा रिझर्वेशन  एसी टू टायरचे मिळाले.

    बेंगलोरला सकाळी सात वाजता पोचलो. योगेश घ्यायला आला होता. आठ वाजता घरी पोचलो. नाश्ता वगैरे झाल्यावर ईशाने सुलुरूपेटा मधील हॉटेल बुक केले. प्रक्षेपण झाल्यावर व्ह्यूइंग गॅलरीमध्येच स्पेस म्युझियम व रॉकेट गार्डन आहे असे SHAR च्या साइटवर दिसले. त्यामुळे परतीची रिझर्वेशन्स ११ तारखेची केली. जेवण करून मस्तपैकी झोप काढली. रात्री साडेबारा वाजता मुजफ्फुर एक्सप्रेसने मला जायचे होते. ईशा व योगेश मला सोडायला आले होते. सकाळी सात वाजता गाडी पेरांबूर स्टेशनवर पोहोचली. रिक्षा करून मी चेन्नई सेंट्रलला आलो. एमजीआर चेन्नई सेंट्रल(MAS) ते सुलुरूपेटा नवजीवन एक्सप्रेस दहा वाजून दहा मिनिटांनी होती ती साडेअकराला सुलुरूपेटा येथे पोहोचली. उतरल्यावर रिक्षा केली आणि अगोदर बुकिंग केलेले श्री लक्ष्मी पॅलेस हे लॉज गाठले. (जनरली गाडी एक नं प्लॅटफॉर्मला लागते. तेथून वर उल्लेखलेल्या लॉजला जायला रिक्षा केली तर महाग पडते, म्हणून रेल्वे ब्रिज वरून दुसऱ्या टोकाला जाऊन तिथून रिक्षा केली तर स्वस्त पडते) सुलुरूपेटा हे  तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामानाने हे लॉज खूपच चांगले आहे. रूम स्वच्छ, प्रशस्त व हवेशीर आहेत. ए.सी. व टी.व्ही. ची सोय आहे. २४ तास गरम पाणी उपलब्ध असते. रूममध्ये गेल्यावर अन्हीके उरकून खालीच असलेल्या चंदूज रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलो. शाकाहारी व मांसाहारी एकत्र आहेत. राईस प्लेट मिळत नाही. वेगवेगळे जिन्नस मागवावे लागतात आणि अति महागडे आहेत. जेवण एवढे खास नव्हते, पण भुकेपोटी खाऊन घेतले. जेवण करून थोडे विश्रांती घेतली. नंतर काउंटर वर जाऊन लॉजचे मालक श्री दोराबाबू यांना भेटलो व श्रीहरीकोटाला कसे जायचे याची चौकशी केली. त्यांनी खिडकीतून जवळच असलेल्या एका चौकाकडे बोट दाखवून सांगितले की येथे सकाळी सहा वाजल्यापासून SHAR ला जायला जीप मिळतात. एका जीपमध्ये दहाजण बसवतात व माणसे पन्नास रुपये आकारतात. माहिती जाणून घेतल्यावर मी गावात रपेट मारायला बाहेर पडलो. तालुक्याचे गाव जसे असायला पाहिजे तसेच हे आहे. दोन तास फिरून परत रूमवर आलो. दुपारचे जेवण जास्त झाल्याने लॉज शेजारच्या मॉल मधून ब्रेड व बटर आणून  खाल्ले. सकाळचा साडेपाचचा गजर लावून झोपलो. उद्या प्रत्यक्ष प्रक्षेपण बघायचे या कल्पनेने बराच वेळ झोप लागली नाही, पण नंतर लागली. सकाळी साडेपाचला उठून अन्हीके आवरून बरोबर सहा वाजता चौकात आलो. जीप उभी होती. जीपमध्ये अजून कोणी आले नव्हते, म्हणून ‘गणेश टी स्टॉल’ असे नांव लिहिलेल्या टपरीवर कॉफी प्यायला गेलो. कॉफी अप्रतिम होती. टपरीचा मालक राजस्थानी होता. त्याला हिंदी व इथली तेलगू भाषा दोन्ही चांगल्या अवगत होत्या. बोलता बोलता मला शारला  जायचे आहे असं मी त्याला म्हणालो. तेथेच एक रिक्षावाला होता. तो कॉफीवाल्याला तेलगूत म्हणाला, ” यांना म्हणावं मी त्यांना तीनशे पन्नास रुपयात शारला नेतो.” कॉफी वाल्याने मला हे हिंदीत सांगितले. मी कॉफीवाल्याला सांगितले,  “तीनशे रुपयात नेतो काय विचार.” तो तयार झाला. नाही तरी  जीपमध्ये दहा माणसांची जुळणी व्हायला किती वेळ लागणार होता कोणास ठाऊक! मी रिक्षात बसलो. मस्त गुलाबी थंडी होती. दोन्हीकडे समुद्राच्या भरती ओहोटीमुळे तयार झालेली क्षारपड जमीन आहे. सूर्योदय व सूर्यास्त बघण्यासाठी थोड्या थोड्या अंतरावर मचाणे आहेत, त्यांना व्ह्यू पॉईंट्स म्हणतात. अर्ध्या तासात आम्ही श्रीहरीकोटाच्या मुख्य प्रवेशाजवळ  पोहोचलो. तेथे रिक्षावाल्याने मला सोडले. उजवीकडे towards viewing gallary असा बोर्ड होता. तेथे गणवेशधारी जवान होते. त्यांनी माझ्याकडील आधार कार्ड व पास बघून मला पुढे जाण्याची अनुमती दिली. मी विचारले, “किती चालावे लागेल?” ते म्हणाले, “साधारण दोन मैल” मी चालायला सुरुवात केली. 

– क्रमशः भाग पहिला

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सही तेवढी देऊन जा … ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ सही तेवढी देऊन जा … ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

अडगळीच्या खोलीमधलं

दप्तर आजही जेव्हा दिसतं |

मन पुन्हा तरूण होऊन

बाकांवरती जाऊन बसतं || 

 

प्रार्थनेचा शब्द अन शब्द

माझ्या कानामध्ये घुमतो |

गोल करून डबा खायला

मग आठवणींचा मेळा जमतो ||

 

या सगळ्यात लाल खुणांनी

गच्च भरलेली माझी वही |

अपूर्णचा शेरा आणि

बाई तुमची शिल्लक सही ||

 

रोजच्या अगदी त्याच चुका

आणि हातांवरले व्रण |

वहीत घट्ट मिटून घेतलेत

आयुष्यातले कोवळे क्षण ||

 

पण या सगळ्या शिदोरीवरंच

बाई आता रोज जगतो |

चुकलोच कधी तर तुमच्यासारखं

स्वतःलाच रागवून बघतो ||

 

इवल्याश्या या रोपट्याची

तुम्ही इतकी वाढ केली आहे |

हमखास हातचा चुकण्याची सुद्धा

सवय आता गेली आहे ||

 

चांगलं अक्षर आल्याशिवाय

माझा हात लिहू देत नाही |

एका ओळीत सातवा शब्द

आता ठरवून सुद्धा येत नाही ||

 

दोन बोटं संस्कारांचा

समास तेवढा सोडतो आहे |

फळ्यावरच्या सुविचारासारखी

रोज माणसं जोडतो आहे ||

 

योग्य तिथे रेघ मारून

प्रत्येक मर्यादा ठरवलेली |

हळव्या क्षणांची काही पानं

ठळक अक्षरात गिरवलेली ||

 

तारखेसह पूर्ण आहे वही |

फक्त एकदा पाहून जा |

दहा पैकी दहा मार्क

आणि सही तेवढी देऊन जा |

 

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 40 – भाग-2 – साद उत्तराखंडाची ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 41 – भाग-3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ साद उत्तराखंडाची  ✈️

हरिद्वारहून चारधाम यात्रेची सुरुवात झाली.  गढवाल निगमच्या बसने हरिद्वारपासून हनुमान चट्टीपर्यंत गेलो . तिथून जानकी चट्टीपर्यंत जंगलातील खूप चढावाचा रस्ता चढायचा होता.( आता बसेस जानकी चट्टीपर्यंत जातात .)दुपारी दोन अडीच वाजता आम्ही चढायला सुरुवात केली तेव्हा आकाश निरभ्र होतं. चार वाजता अकस्मात सारं बदलून गेलं .हां हां म्हणता चारी बाजूंनी काळे ढग चाल करून आले. गारांचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला. थंडीने हृदय काकडू लागलं. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा दाट काळोख, वारा आणि पाऊस होता. डावीकडील दरीतून अंधार चिरत येणारा रोरावणार्‍या यमुनेचा आवाज जिवाचा थरकाप करीत होता. बरोबरच्या ग्रुपमधील कोण कुठे होते त्याचा पत्ता नव्हता. सारंच विलक्षण अद्भुत वाटत होतं. एका पहाडी माणसाने आम्हाला खूप मदत केली. ‘आस्ते चलो, प्रेमसे चलो, विश्वाससे  चलो’ असे सांगत धीर दिला. रस्ता दाखविला. सोबत केली. वाटेत कुणी त्याचा गाववाला भेटला की दोघं एकमेकांना ‘जय जमुनामैया’ असं अभिवादन करीत. सर्वजण कसेबसे, थकूनभागून, संपूर्ण भिजून गढवाल निगमच्या जानकी चट्टीच्या निवासस्थानी आलो. कोणी कोणाशी  बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतो. तिथल्या माणसाने जी खिचडी वगैरे दिली ती खाऊन ओल्या कपड्यातच कशीबशी उरलेली रात्र काढली. पहाटे लवकर उजाडलं. सूर्याच्या सोनेरी किरणांनी पर्वतांच्या माथ्यावरचे बर्फ सोन्यासारखे चमकू लागले .इतकं सगळं शांत आणि स्वच्छ होतं की कालचं वादळ ‘तो मी नव्हेच’ म्हणंत होतं.फक्त आजूबाजूला कोसळलेल्या वृक्षांवरून कालचा वादळाची कल्पना येत होती.

जानकी चट्टीहून यमुनोत्रीपर्यंतचा सहा- सात किलोमीटरचा रस्ता उभ्या चढणीचा, दरीच्या काठाने जाणारा आहे. हिरवेगार डोंगर, बर्फाच्छादित शिखरे आहेत.चालत किंवा घोड्यावरून अथवा दंडी म्हणजे पालखीतून किंवा कंडीतून जाता येते .कंडी म्हणजे आपण आसाममध्ये पाठीवर बास्केट घेऊन चहाची पाने खुडणाऱ्या बायका पाहतो तशाच प्रकारची निमुळती बास्केट असते. त्यात आपल्याला बसवतात आणि पाठीवर घेऊन ती शिडशिडीत ,काटक माणसे तो उभा चढ चढतात. या दुर्गम प्रदेशातील जीवन खडतर आहे. अज्ञान, गरिबी, शिक्षणाचा अभाव यामुळे त्यांचे कष्टमय जीवन पर्यटकांवरच अवलंबून असतं.

यमुनोत्रीचे देऊळ बारा हजार फुटांवर आहे. निसर्गाचं आश्चर्य म्हणजे जिथे यमुनेचा उगम होतो, तिथेच गरम पाण्याचे कुंडसुद्धा आहे. त्यात तांदुळाची पुरचुंडी टाकली की थोड्यावेळाने भात शिजतो. अनेक भाविक हा प्रयोग करीत होते .अक्षय तृतीयेपासून दिवाळीपर्यंत खूप यात्रेकरू इथे येतात. त्यानंतर बर्फवृष्टीमुळे मंदिर सहा महिने बंद असते.

यमुनोत्री ते गंगोत्री हा साधारण अडीचशे किलोमीटरचा रस्ता दऱ्यांच्या काठावरून नागमोडी वळणाने जातो. पहाडांना बिलगून चालणारी ही अरुंद वाट, पहाडातून खळाळत येणारे निर्मल, थंडगार पाण्याचे झरे ,लाल- जांभळ्या फुलांनी डवरलेले खोल दरीतले वृक्ष सारे हजारो वर्षांपूर्वी भगीरथाने गंगावतरणासाठी केलेल्या भगीरथ प्रयत्नांची आठवण करून देतात. यमुनोत्री व गंगोत्रीचा हा परिसर उत्तरकाशी जिल्ह्यात येतो. उत्तरकाशी हे एक नितांत रमणीय ठिकाण आहे. उत्तरकाशीमध्ये शिवाचे प्राचीन मंदिर आहे. इथले मॅग्नेलिया वृक्ष मंद मधूर सुवासाच्या, पांढऱ्या, तळहाताएवढ्या कमलांसारख्या फुलांनी डवरलेले होते.

गंगोत्री मंदिरापर्यंत बस जाते .बर्फाच्छादित शिखरे  व गंगेचा खळाळणारा थंडगार प्रवाह इथे आहे. गंगेचा खरा उगम हा गंगोत्रीच्या वर २५ किलोमीटरवर गोमुख इथे आहे. अतिशय खडतर चढणीच्या या रस्त्यावरून काहीजण गोमुखाकडे चालत जात होते. तिथे प्रचंड अशा हिमकड्यातून भागिरथीचा( इथे गंगेला भागिरथी म्हटले जाते)  हिमाच्छादित प्रवाह उगम पावतो.

गंगोत्रीहून गौरीकुंड इथे आलो. तिथे गरम पाण्याचे कुंड आहे. असंख्य भाविक त्यात स्नान करीत होते .तिथली अस्वच्छता पाहून आम्ही नुसते हात पाय धुवून केदारनाथकडे निघालो .गौरीकुंडापासूनचा १४ किलोमीटरचा चढ छोट्या घोड्यावरून ( पोनी ) पार करायचा होता. एका बाजूला पर्वतांचे उभे कातळकडे, निरुंद वाट आणि लगेच खोल दरी असा हा थोडा भीतीदायक पण परिकथेसारखा प्रवास आहे. खोल दरीतून मंदाकिनी नदीचा अवखळ हिमशुभ्र प्रवाह कधी वेडी- वाकडी वळणे घेत तर कधी उड्या मारत धावत होता. फार चढणीच्या वेळी घोड्यावरून उतरून थोडे पायी चालावे लागते. त्यावेळी पर्वतांच्या कपारीतून धावत येणारे धबधबे, झरे दिसतात. त्यांचे शुद्ध, मधुर, गार पाणी पिता येते. झऱ्याच्या पाण्याने निसरड्या झालेल्या अरुंद पाय वाटेवरून चालताना आजूबाजूचे उंच पर्वतकडे, हिरवी दाट वृक्षराजी ,अधूनमधून डोकावणारी हिमाच्छादित शिखरे, दरीच्या पलीकडच्या काठाला संथपणे चरणाऱ्या शेकडो गुबगुबीत मेंढ्यांचा कळप हे सारे नितळ गूढरम्य वातावरण आपल्याला या अनादी, अनंत, अविनाशी चैतन्याचा साक्षात्कार घडविते.

केदारनाथचे चिरेबंदी मंदिर साधारण ११००० फुटांवर आहे. इथे मंदाकिनी नदीचा उगम होतो. अशी कथा आहे की कुरुक्षेत्राची लढाई झाल्यानंतर पाचही पांडव पापक्षालन करण्यासाठी तीर्थयात्रा करीत होते. त्यांना पाहून भगवान शंकराने रेड्याचे रूप घेतले व आपले तोंड जमिनीत खुपसले. म्हणून इथले केदारनाथाचे लिंग नेहमीच्या शाळुंका स्वरूपात नसून फुगीर पाठीसारखे आहे. इथल्या महाद्वारापुढे नंदी आहे. नंदीच्या मागे मोठी घंटा आहे. महाद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल आहेत. गाभाऱ्यात तुपाचे नंदादीप अहोरात्र तेवत असतात. इथे अभिषेक करण्याची पद्धत नाही. त्या ऐवजी लिंगावर तुपाचे गोळे थापतात. सभामंडपाच्या भिंतीत पाच पांडव, द्रौपदी, कुंती, पार्वती, लक्ष्मी अशा पाषाणमूर्ती आहेत. इथून जवळच आदि शंकराचार्यांची समाधी आहे. इथे सतत बर्फ पडत असल्याने मंदिरात जाण्याची वाट ही बर्फ बाजूला करून बनविलेली असते.दोन्ही बाजूंचे बर्फाचे ढिगारे न्याहाळत अलगद वाटचाल करावी लागते. अक्षय तृतीयेपासून दिवाळीपर्यंत हे मंदिर उघडे असते व नंतर सहा महिने बंद असते.

उत्तराखंड भाग तीन समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares