सौ राधिका भांडारकर

 

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “सुनृत” – लेखिका सुश्री ऊषा ढगे ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तकाचे नांव… सुनृत

कवीयत्री… सुश्री ऊषा ढगे.

प्रकाशक… यशोदीप प्रकाशन

प्रथम आवृत्ती… १२सप्टेंबर २०२१

पृष्ठे.. ६४

मूल्य.. रु.१३०/—

परिचय… राधिका भांडारकर.

सुश्री उषा ढगे

सुनृत हा उषा ढगे यांचा दुसरा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. त्यांच्या  पहिल्या  “पोटनाळ” या काव्यसंग्रहातला काव्यानंद घेतल्यानंतर! हा दुसरा संग्रहही वाचण्याची उत्सुकता  वाढलेलीच होती.

या संग्रहात त्यांच्या चाळीस कविता आहेत.

मला नेहमी असं वाटतं,कविता ही कुठला ठराविक विषय घेउन निर्माण होत नसते.

जेव्हां भवताल आणि मन यांचं कुठेतरी नकळत नातं जुळतं आणि त्या स्पंदनातून शब्द अवतरतात तेव्हां कवितेचा जन्म होतो.शब्दांनंतर विषय ऊमटतो.उषाताईंच्या या कविता वाचताना हे प्रकर्षाने जाणवतं.त्यांच्या प्रत्येक कवितेत टिपणं आहे. वेचणं आहे. स्पंदनं आहेत. हास्य आहे, हुंकार आहेत. उपहास आहे, तशी स्वीकृतीही आहे. प्रश्न आहेत अन् उत्तरंही आहेत.

वास्तविक उषाताई यांचा मूळ पिंड चित्रकाराचां.

मुंबईच्या प्रसिद्ध, नामांकित कला महाविद्यालयात (J J School of Arts) त्यांनी कलाशिक्षण घेउन पदवी प्राप्त केली.

रंग रेषेत रमणार्‍या उषाताई,शब्द प्रवाहातही सहजपणे विहार करु लागल्या. रंग रेषा आणि शब्द यांची एक लयबद्धता ,त्यांच्या प्रत्येक कवितेत जाणवते.चित्रकार हा अंतस्थ कवी असतो हे उषाताईंनीसिद्ध केले आहे.

काव्य हे, हलकं फुलकं तरलच असतं,असं नव्हे.

ते भेदकही असतं .बोचणारंही असतं.

निसर्गातील तरलता टिपतानाच, उषाताईंच्या काव्यात कधीकधी भेदकताही जाणवते. जसा गारवा, तसा तप्तपणाही जाणवतो. आणि या दोन्ही स्तरांवर उषाताईंचं काव्य हे, अस्सल वाटतं. खरं वाटतं.

परिमळ ही या संग्रहातील पहिलीच कविता.

रंगी बेरंगी, सुगंधी फुलांची ओंजळ भरलेली आहे.मन तृषार्त आहे. पण तरीही शेवटच्या चार पंक्तीत ,त्यांनी सहजपणे ,एक प्रकारची व्याकुळता व्यक्त केली आहे.त्या  म्हणतात,

शब्दातीत होते सारे।

मग मन होई विव्हळ।

सुगंधामधूनी पाठव ना रे।

एक संदेश स्नेहाळ।।

याओळींत असलेली कसलीतरी अनामिक प्रतीक्षा मनाला भिडते….जाणवते.

पृच्छा या कवितेत एक प्रश्न ,एक सहज शंका आहे.काट्याकुट्यात जगणारे ,फाटक्या  ,तोकड्या ,अपुर्‍या कपड्यातले भटके भिल्ल ,अपुर्‍या कपड्यात ,फॅशनच्या नावाखाली हिंडणारी शहरी मुले पाहून अचंबीत होतात.आणि सहजपणे म्हणतात,

शोभा दावूनी लाजशरम

अशी बाजूस ठेवूनी

वावरती विचीत्र वंगाळ

भलतेच लेउनी…..

पहाडातले ,जंगलातले आदीवासी आणि शहरातली ही सो काॅल्ड फॅशनेबल माणसे…

दोघंही अपुर्‍या वस्त्रांत..पण एक नैसर्गिक आणि दुसरे मात्र बाजारी…हे वास्तव काव्यरचनेत चपखल मांडलंय…

त्यांच्या कवितेत ,हिरवी धरती आहे.हसरा नाचरा श्रावण आहे.मृद्गंध आहे.मिस्कील पाउस आहे.गाणारे पक्षी आहेत.बागडणारी फुलपांखरे आहेत.आणि या सर्वांमधे वाहणारं एक सुंदर कवीमन आहे.

कधी कधी त्यांच्या  काव्यात आत्म संवाद जाणवतो.त्यांना सतावणारे अनेक प्रश्न त्या सहजपणे काव्यरुपात मांडतात.

वास्तव सत्यात की

असत्य जगात

कां बरं अशी मी

व्याज संभ्रमात….

कधी म्हणतात,

आज असे मुक्त मी

निवृत्त मी निवृत्त मी

माझ्याच जीवनाचे

वाचेन एक मोठे

वृत्त मी….

तर कधी त्या बेफिकीर ,कलंदर होतात..उपहासाने म्हणतात,

काय घडेल ..होईल काय उद्याला

माहीत नाही ..मग फिकीर कशाला….??

खुशीत आपुला ,माझा मीच भला…

सुनृत या शीर्षक कवितेत निसर्गाची भावलहर आहे.लाजणं आहे .शृंगार आहे.आणि निर्मीतीचं सत्यही आहे.

पर्णपाचू पालवी ही

भारावून गेली

उन्मुक्त भावनांना

तरुण वेल सुखावली…

पाने ती ऋतुगान गाती…

सुमन उरी गोंजारुन घेई,,.

गाली निर्झर हसली…

अशा काव्यपंक्ती वाचकाला काव्यानंद देतात…

सुंदर प्रपाताखाली नहावतात…

काही कवितांमधे सहज दिलेले संदेशही आहेत…

कशास रे उणे दुणे

देउनी सकळास दूषणे

नको करुस हेवादावा

मत्सर अन् दुस्वास….

कोल्ड वाॅर सारखी हलकी फुलकी हसवणारी घराघरातील कविताही त्या अगदी सहजपणे सादर करतात…

बायकोला हवा असतो

नवानवा नेटका संसार

नवरा म्हणतो

कुठून देउ सारं

अजुन झालाच नाही

बघ की गं माझा पगार…

शेवटच्या बिंबीतया कवितेत,त्या म्हणतात,

सदृष्य सारं समेटलेलं

यादगारीचा दर्पण

प्रांजल संवेदनेचे प्रतिबिंब

चिंब उर्मीचे अंतरंग..

अशा विवीध भावनांच्या,रंगांच्या,नादाच्या,लयीच्या शब्दरेषांच्या काव्यपंक्ती वाचताना,सहजच कवीयत्रीच्या आयुष्याचा एक पथ सहज उलगडून जातो.ज्या पथावर त्या थिरकल्या, चालल्या ,थबकल्या,कधी ऐटीत,कधी कोसळत, कधी मोडत पण जगण्याचा एक सकारात्मक धागा पकडत….म्हणूनच या कविता मनात उलगडत  तात…डुबवतात.भारावून टाकतात.

या पुस्तकाचे मुखपृष्ठ स्वत: उषा ढगे यांनीच चित्रीत केले आहे.आणि ते अतिशय बोलके आहे.उंच चढणारी वेल,विखुरलेली फुले पाने आणि एक थेंब..हा थेंब जीवनाचे प्रतीक आहे.

तो पाण्याचाही आहे..दंवाचा आहे..आणि अश्रुंचाही आहे..

सुनृत हे शीर्षक एक नवा, अप्रचलीत शब्द नवा अर्थ घेउन येतो. मनाच्या डोहातून वाहत आलेलं सत्य, सुंदर शब्दांतून हलकेच अनावृत केलं… सुरेख!!! कवीयत्रीच्या कल्पकतेला मनापासून दाद  द्यावीशी वाटते..

या चाळीस कविता वाचताना मला दिसलं ते एक पाखरु.. त्यानं आकाशातून धरती टिपली ,अन् धरतीवरुन आकाशही कवेत घेतलं….

कवीवर्य अरुण पुराणिक यांची प्रस्तावना लाभलेला,यशोदीप प्रकाशनाने सौंदर्य जपत सादर केतेला हा उषा ढगे यांचा सुनृत हा काव्यसंग्रह केवळ आनंद देणारा,रिझवणारा आणि तितकाच विचार करायला लावणारा…

उषाताई मनापासून अभिनंदन आणि पुढील काव्य प्रवासा साठी शुभेच्छा!!!

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments