? विविधा ?

☆ थोडं मनातलं… उमलत्या वेळा ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

सकाळी उठून बाहेर आलो आणि बागेत एक फेरफटका मारला. सूर्याची सोनेरी कोवळी किरणं सगळ्या सृष्टीला न्हाऊ घालत होती. झाडं, पानं, फुलं जणू चातक होऊन त्या सूर्यप्रकाशाचं रसपान करीत होती. पक्ष्यांची किलबिल सुरु होती. रात्री मिटलेली कमळाची कळी आपले डोळे अर्धवट उघडून साऱ्या परिस्थितीचा अंदाज घेत होती. हळूहळू तिला उमलून यायचंच होतं. गुलाबाच्या कळ्यांनाही आता जाग आली होती. जाई, जुई तर सूर्यदेवांचं स्वागत करण्यासाठी कधीच्या तयार होत्या. झेंडूची फुलं उमलली होती. सोनेरी, पिवळसर झेंडूच्या फुलांवर सोनेरी सूर्यकिरणे पडल्यामुळे त्यांचं सौंदर्य काही आगळंच  भासत होतं. मोगरा, जाई, जुई आपल्या अत्तराच्या कुपीतून सुगंधी शिडकावा करून वातावरण सुगंधित करीत होते. वाऱ्याच्या शीतल लहरी  हा सुगंध अलगद वाहून नेत होत्या. रंगीबेरंगी फुलपाखरं फुलांवर अलगद नर्तन करून आपला आनंद व्यक्त करीत होती.

सृष्टीच्या अंगणात हा प्रभातोस्तव रंगला होता. विविधरंगी पानं, फुलं, पक्षी यांनी हा रंगसोहळा साकार केला होता. सृष्टीमध्ये अव्यक्त असलेल्या निर्गुण निराकाराची पूजा निसर्गानं आपल्या परीनं मोठी सुरेख मांडली होती. या पूजेसाठी फुलं आपल्या पूर्ण शक्तीनिशी पूर्णपणे उमलून आली होती. त्यांच्या अंतरंगातून सुगंधाच्या भक्तीलहरी बाहेर पडत होत्या. पक्षी आपल्या सुरात त्याची आरती गात होते. सूर्यदेवांच्या सोनेरी प्रकाशात सृष्टीचा गाभारा उजळून निघाला होता. कुठूनतरी भूपाळीचे सूर अलगद कानी आले.

मलयगिरीचा चंदनगंधीत धूप तुला दाविला

स्वीकारा ही पूजा आता उठी उठी गोपाळा

माझ्या तोंडून आपोआप उद्गार बाहेर पडले. ‘ वा, किती सुंदर ! ‘ मनात एक प्रश्न आला. हे सगळं कशासाठी ? काही विशेष कारण आहे का ? इतका सुंदर असलेला हा सोहळा, हा उत्सव रोज कशासाठी ?

माझ्या मनातल्या प्रश्नाला सगळ्यांनी आपापल्या परीनं उत्तर दिलं. सूर्यकिरणं म्हणाली, ‘ कालची रात्र अंधारात गेली ना ! तुला उद्याची चिंता होती. मावळलेल्या दिवसाबरोबर तुझ्या कोमेजलेल्या आशा अपेक्षांना पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी आम्ही आलो आहोत. या प्रकाशाप्रमाणेच तुझा आजचा दिवसही प्रकाशमान होवो. ‘

फुलं म्हणाली, ‘ अरे रोजचा दिवस नवा. रोज आपल्या आयुष्याच्या पुस्तकाचे एक नवीन पान आपण उघडतो. मग तो रोजचा दिवस हा आपल्या जीवनातील एक सोहळाच नाही का ? म्हणून त्याची सुरुवात आम्ही पूर्णपणे फुलून करतो. उमलता उमलता सौंदर्याची बरसातही करतो. आम्ही कसे टवटवीत असतो ! तसंच प्रसन्न, टवटवीत तुम्हीही राहावं  असं आम्हाला वाटतं. तुम्हीही आपला दिवस आपले निहित कार्य, चांगली कामं करण्यात घालवावा. तोही आम्हाच्यासारखा प्रसन्न, हसतमुख आणि टवटवीतपणे. आणि जमलं तर सुगंधाची उधळण करावी. तुमच्या कर्तृत्वाचा सुगंध परिसरात दरवाळावा असं आम्हाला वाटतं. ‘

मी म्हटलं, ‘ अहो, थांबा थांबा. जीवनाचं सारं तत्वज्ञानच तुम्ही उलगडून सांगितलंत. तुमचे हे शब्द मला माझ्या अंतरंगात साठवू द्या. ‘ खरंच रोजची पहाट म्हणजे आमच्यासाठी त्या विधात्यानं दिलेलं अमूल्य वरदान आहे. प्रत्येक दिवस आमच्या आयुष्यातील सोनेरी पान आहे. कधी ऊन, वारा, पाऊस असेल. वादळे झेलावी लागतील. थंडीचा कडाका असेल. फुलं उमलण्याची थोडीच थांबली आहेत. त्यांना माहिती आहे की आपल्या या छोट्याशा आयुष्यात संकटे, सुखदुःख येणारच ! त्यासाठी उमलण कशाला सोडायचं ? कोमेजायचं कशाला ? दुर्मुखलेलं का राहायचं ? जमेल तसं फुलून यायचं. आपल्या सुगंधाची बरसात करायची.

फुलांचं मनोगत समजून घेता घेता शीतल सुगंधी वायू लहरी कानाशी येऊन गुणगुणू लागल्या. ‘ अरे, रोजचा दिवस म्हणजे सगळ्या गेलेल्या इतर दिवसांसारखाच एक असतो का ? कदाचित तुला तसं वाटेल. पण आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस आगळावेगळा असतो. जे काल होतं ते आज नाही. आणि जे आज आहे ते उद्या असणार नाही. बदल हा सृष्टीचा स्थायीभाव असतो. म्हणूनच या बदलाला रोज नव्या उत्साहानं, उमेदीनं सामोरं जायचं असतं. तुला माहिती असेलच की आम्ही सदा सर्वकाळ वाहत असतो. कधीही थांबत नाही. आम्ही थांबलो तर ही सृष्टी थांबेल. तुझ्या श्वासात आणि रोमारोमात आम्ही असतोच. तेव्हा मित्रा, या सकाळच्या प्रसन्न वेळी मोकळा प्रसन्न श्वास घे. आपल्या तनामनात नवीन ऊर्जा भरून घे आणि आजच्या दिवसाला सामोरा जा. ‘

मी वाऱ्याच्या लहरींना म्हटलं, ‘ अगदी खरं आहे तुमचं. तुम्ही आमचा प्राण आहात. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सोबत असते तुमची. तुमचा संदेश मी लक्षात ठेवीन. नवीन ऊर्जेनं भारून माझ्या कामाला सुरुवात करीन.

तेवढ्यात फुलाफुलांवर नाचणाऱ्या, बागडणाऱ्या फुलपाखरांकडे माझं लक्ष गेलं. त्यांचे विविध रंग मनाला प्रसन्न करीत होते. त्यातलं एक डोळे मिचकावीत म्हणालं, ‘ आमचंही थोडं ऐकशील का रे ? ‘ मी म्हटलं, ‘ जरूर. आज तुम्ही सगळेच मला अतिशय सुंदर संदेश देत आहात. तुमचं मला ऐकायचंच आहे. ‘

फुलपाखरू म्हणालं, ‘ आमच्या पंखांवरचे रंग तुला आवडतात ना ? पण नुसतं त्यावर जाऊ नकोस. तुला कदाचित माहिती नसेल आम्हा सुरवंटाचं फुलपाखरू होताना आम्हाला किती दिव्यातून जावं लागतं ! पण आम्ही त्याचा विचार करत बसत नाही. आम्हाला जमतील तसे निसर्गाचे रंग आमच्या अंगावर माखून घेतो. तसं आमचं आयुष्य अल्पजीवी असतं. पण आम्ही ते जगतो मात्र आनंदानं. दुसऱ्यालाही आनंद देतो. किती जगलो यापेक्षा कसं जगलो हे महत्वाचं आहे, नाही का ? ‘ असं म्हणून आपल्या पंखांची सुंदर उघडझाप करीत ते दुसऱ्या फुलावर जाऊन बसलं.

सूर्यदेवांची किरणं आता थोडी अधिक प्रखर होऊ लागली होती. निसर्गातले सगळेच घटक आपापल्या कामाला लागले होते. सगळी फुलं पूर्णपणे उमलली होती. दिवस उमलला होता. उमलत्या वेळा मला प्रसन्न करून गेल्या. माझं मनही उमललं होतं. रोमारोमात नवचैतन्याचा संचार झाला होता. उमलत्या वेळी होणारा सृष्टीचा सोहळा मी अनुभवला होता. तोच सोहळा माझ्याही जीवनात प्रतिबिंबित व्हावा म्हणून त्या निर्गुण निराकाराला मी हात जोडले.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments