सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

दुःख कुरवाळणारी माणसं… — लेखिका : सौ. शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

वीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्ही दोघं नुकतेच अमेरिकेला राहायला गेलो होतो. तीन-चार महिने झाले असतील. नवरा कामात व्यस्त होता, आठवड्यातून तीन-चार दिवस त्याचा प्रवास चालायचा. घरी मी एकटीच. मला अजून अमेरिका म्हणावी तितकी झेपत नव्हती. सारखी भारताची, घरच्या लोकांची आठवण यायची. त्यात अजून तिथे फार ओळखीही झाल्या नव्हत्या. त्यामुळे एकटेपणा खूप जाणवायचा. त्यात तो सरत्या नोव्हेंबरचा काळ होता. शहरातले सगळे रस्ते, मॉल्स, घरे ख्रिसमसच्या रोषणाईने सजले होते. मला मात्र दिवाळी ह्या वर्षी भारतात साजरी नाही करता आली याचं दुःख होतं आणि त्यामुळे ती रोषणाई बघून अजूनच खिन्न वाटत होतं.

त्यातच आम्ही वीकेंडला कुठेतरी फिरायला जाणार होतो. ती सुट्टी ऐन वेळी रद्द करावी लागली होती. कारण नवऱ्याला नवीन प्रोजेक्ट मिळाला होता. त्यावरून आमची माफक वादावादीही झाली होती आदल्या दिवशी आणि नवरा सकाळच्या फ्लाईटने त्याच्या प्रोजेक्टच्या ठिकाणी गेलाही होता. घरी मी एकटीच होते, त्यामुळे स्व-अनुकंपेला बऱ्यापैकी वावही होता. सबंध दिवस घरात बसून स्वतःची कीव करून थोडंफार रडूनबिडून झाल्यावर त्याचाही कंटाळा येऊन मी घराबाहेर पडले. तशी माझी जायची ठिकाणं तोपर्यंत दोन-तीनच होती. घराजवळची पब्लिक लायब्ररी, एक मॉल आणि कोपऱ्यावरचं कॉफी शॉप!

मॉलमध्ये जायचं ठरवून तिथे पोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती. तिथे सगळं उत्सवी वातावरण होतं. मोठा ख्रिसमस ट्री, सगळीकडे रोषणाई, ठिकठिकाणी सेल आणि ऑफर्स. बराच वेळ मी निरुद्देश्य भटकले. पण माझं एकटेपण राहून राहून अंगावर येत होतं. शेवटी चालून चालून पाय दुखायला लागले, तेव्हा मी एका मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये शिरले. मला बऱ्याच दिवसांपासून बूट्स घ्यायचे होते, म्हणून बायकांच्या फुटवेअरच्या सेक्शनमध्ये गेले. तिथे एक सत्तरेक वर्षांची कृष्णवर्णीय बाई सेल्सवूमन होती. त्यावेळेला मी एकटीच कस्टमर होते. मला काय हवं ते विचारून ती चपळाईने तिथल्या स्टेप लॅडरवर चढून मला हवे तसे बूट दाखवत होती.

आपल्याला सहसा भारतात इतक्या वयस्कर व्यक्तीकडून सेवा घ्यायची सवय नसते. त्यामुळे तिची लगबग पाहून मला थोडं कानकोंडं होत होतं. बूट दाखवता दाखवता आमचं जुजबी बोलणं सुरु झालं. पॅट्रिस नाव होतं तिचं. ’डू यू नो, आय ऍम सेवेंटी टू?’ ती माझ्या पायात बूट चढवता चढवता म्हणाली. मला अजूनच अवघडल्यासारखं झालं. मी तिला सांगितलं, मीच ट्राय करते. बुटांच्या सात-आठ वेगवेगळ्या जोडया तिने आणल्या होत्या आणि गुडघ्यांवर बसून ती मला ते बूट ट्राय करायला मदत करत होती. उठ-बस करताना तिचे गुडघे दुखत आहेत, हे मला जाणवत होतं आणि म्हणून तिला जास्त त्रास नको म्हणून तिला थँक्स म्हणून मी जायला उठले. तर ती पटकन म्हणाली की तिने विकलेल्या दर जोडीमागे तिला कमीशन मिळतं. ‘यू शुड बाय अ पेअर,’ पॅट म्हणाली.

मी एक बुटांची जोडी पसंत केली. ती पॅक करता करता पॅट बरंच काही बोलत होती. कदाचित माझा एकटेपणा तिला जाणवला होता म्हणून असेल, कदाचित तिलाही बोलायचं होतं म्हणून असेल, पण तिने मला तिची कहाणी सांगितली. तिची पाच मुलं होती, त्यातली शेवटची दोन तिच्याबरोबर रहात होती. एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी तिशीची आज मुलगा पस्तिशीचा. दोघेही काही करत नव्हते आणि ही सत्तरीची आई त्यांना सांभाळण्यासाठी दिवसातून दोन-दोन नोकऱ्या करत होती, सकाळी नऊ ते चार एका डॉक्टरच्या ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून आणि संध्याकाळी सहा ते नऊ ह्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये सेल्सवूमन म्हणून, आणि सुट्टीच्या दिवशी बेबीसीटिंग! हे सर्व बहात्तर वर्षाच्या वयात!

‘साऊंडस सो डिप्रेसिंग!’ तिचं बोलणं ऐकण्याच्या नादात अनवधानाने मी बोलून गेले. पॅट हसली,म्हणाली, ‘हन, आय डोन्ट हॅव दी बँडविडथ टू बी डिप्रेसड, आय हॅव माय हॅंड्स फुल’!

मला एकदम चटका बसल्यासारखं झालं. सगळं व्यवस्थित असून फक्त एक विकेंडची सुट्टी मनासारखी नाही झाली आणि अमेरिकेत एकटेपणा वाटतोय हे स्वतःचं इवलंसं दुःख कुरवाळत मी स्वतःची कीव करत पूर्ण सकाळ घालवली होती आणि ही बहात्तर वर्षांची बाई मला सांगत होती की निराश होऊन रडत बसायला माझ्याकडे वेळच नाहीये!

पॅटचं ते वाक्य मी आयुष्यात कधी विसरणार नाही. आजही कधी छोट्या छोट्या कारणांवरून आपण फार दुःखी वगैरे आहोत असं वाटायला लागतं, तेव्हा मी प्रयत्नपूर्वक पॅटचं हे वाक्य आठवते. आपोआपच चित्त ताळ्यावर येतं.

स्व-अनुकंपा आणि स्वतःचे खरे-खोटे दुःख कुरवाळत बसणे हे कधी ना कधी आपल्यापैकी प्रत्येकाने केलेलं आहे. नव्हे, ते अगदी नैसर्गिक आहे. कारण प्रत्येकासाठी त्याच्या किंवा तिच्या अडचणी मोठ्याच असतात आणि त्या त्या वेळेला हतबल वाटू शकतं. ‘हे माझ्याच बाबतीत का होतंय’ असे प्रश्नही पडू शकतात, पण हाताशी असलेला रिकामा वेळ जितका जास्त तितकं ह्या स्व-अनुकंपेमध्ये   स्वतःला गुरफटून घेणं जास्त सोपं होतं. जगण्यासाठी सतत संघर्ष करावा लागणाऱ्या, सतत कामात व्यस्त असणाऱ्या व्यक्तींकडे स्वतःचं दुःख कुरवाळत बसायला वेळच नसतो.

पूर्वी हा स्व-अनुकंपेचा सोहळा खासगी तरी असायचा. केवळ कुटुंब आणि काही मित्र मैत्रिणी ह्यांच्या समोरच हा कार्यक्रम चालायचा. आता सोशल मीडियामुळे दुःख कुरवाळणे हा एक सार्वजनिक इव्हेंट बनत चाललाय. बऱ्याच लोकांसाठी आणि दुर्दैवाने माझ्या पाहण्यात तरी यात स्त्रियांची संख्या जास्त आहे. ’मला घरात कुणी समजून घेत नाही’ इथपासून ते ’सासू/सून/नवरा/मुलं/बॉस ऐकत नाही’ इथपर्यंतची सर्व लहान मोठी, खरी-खोटी दुःखे फेसबुकच्या किंवा इन्स्टाच्या चव्हाट्यावर उगाळली जातात.

अशा पोस्टसवर तोंडदेखल्या, खोटया सहानुभूतीचा रतीब घालणारा एक प्रेक्षकवर्ग आहेच, जो ह्या स्व-अनुकंपेच्या रोपट्याला सतत खतपाणी घालून ते जोपासतो आणि मग त्या दुःख कुरवाळत बसण्याची सुद्धा सवय लागते माणसांना. मग कुणी सोल्यूशन दिलेलेदेखील आवडत नाही. कारण मुळात पडलेले प्रश्न सोडवायचेच नसतात, फक्त त्यांचं भांडवल करत मनावरचं दुःखाचं गळू तसंच ठसठसतं ठेवायचं असतं काही लोकांना.

मी ह्या ट्रॅप मध्ये शिरतेय, अशी शंका जरी मला आली तरी मी पॅटचं हे वाक्य मनाशी परत परत आठवते आणि स्वतःला कसल्या ना कसल्या कामात गुंतवून ठेवते. अगदी काही नाही तर दीड-दोन तास चालायला तरी जाते. आपली बरीचशी दैनंदिन आयुष्यातली दुःखं किंवा अडचणी ह्या फुग्यासारख्या असतात, आपण जितकी हवा देऊ तितकी ती फुगत जातात आणि आपण कामाची टाचणी लावली की विरून पण जातात!

लेखिका : सौ. शेफाली वैद्य

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments