? वाचताना वेचलेले ?

⭐ अगरबत्ती… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

लग्नानंतर प्रथमच माहेरी आलेल्या मुलीचे माहेरपण आठवडाभर चालले. सगळा आठवडा तिला हवं ते करण्यात सरला.

परत सासरी जातांना वडिलांनी तिला एक सुगंधी अगरबत्ती पुडा दिला.  “जेव्हा सकाळी पुजेला बसशील तेव्हा ही अगरबत्ती लाव बेटा”, असं आठवणीने सांगितले.

आई म्हणाली “असं अगरबत्ती देतं का कुणी? ती प्रथमच माहेरपण करून सासरी जाते आहे, काहीतरी मोठं द्यायला हवे होतं. “

तसं वडिलांनी खिशात हात घातला अन् असतील तेवढे पैसे तिच्या हातात दिले.

सासरी पोहचल्यावर सासूने, सुनेच्या आईने दिलेल्या सगळ्या वस्तू बघितल्या. बाबांनी दिलेला अगरबत्ती पुडा बघून नाक मुरडले.

सकाळी मुलीने अगरबत्तीचा पुडा उघडला. आत एक चिठ्ठी होती.

“बेटा, ही अगरबत्ती स्वतः जळते, पण संपूर्ण घराला सुगंधी करून जाते. एवढंच नाही तर आजूबाजूचा परिसरही दरवळून टाकते. तू काही वेळा नवऱ्यावर रुसशील, कधी सासू-सासऱ्यांवर नाराज होशील, कधीतरी नणंद किंवा जावेचं बोलणं ऐकून घ्यावं लागेल, तर कधी शेजाऱ्यांच्या वर्तनावर खट्टू होशील, तेव्हा माझी भेट लक्षात ठेव. स्वतः जळताना अगरबत्ती जसं संपुर्ण घर आणि परिसर सुंगधी बनवते, तशी तू सासरला बनव…”

मुलगी चिठ्ठी वाचुन रडू लागली. सासू धावतच जवळ आली. नवरा, सासरे देवघरात डोकावले.

ती फक्त रडत होती.

“अगं ! हात पोळला का?” नवऱ्याने विचारले.

“काय झालं ते तरी सांग,” सासरे म्हणाले.

सासू आजुबाजुचे सामानात काही आहे का, ते बघू लागली.

तेव्हा ती वळणदार अक्षरातील चिठ्ठी नजरेला पडली. ती वाचून तिने सुनेला मिठीत घेतले. चिठ्ठी स्वतःच्या नवऱ्याच्या हातात दिली. सासरे चष्मा नसल्याने मुलाला म्हणाले , “बघ काय आहे.”

सारे कळल्यावर संपूर्ण घर स्तब्ध झाले.

“अरे, ही चिठ्ठी फ्रेम कर, ही माझ्या मुलीला मिळालेली सर्वात महागडी भेट आहे. देवघराच्या बाजूलाच याची फ्रेम लाव,”  सासू म्हणाली.

अन् त्यानंतर ती फ्रेम सातत्याने दरवळत राहिली, पुडा संपला तरीही…..

यालाच म्हणतात संस्कार…

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments