सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 39 – भाग-1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ साद उत्तराखंडाची  ✈️

शाळेत असताना हिंदीच्या पाठ्यपुस्तकात ‘चांदणी’ नावाची एक गोष्ट होती. अलमोडा पहाडात राहणाऱ्या अबूमियांची चांदणी नावाची एक खूप लाडकी बकरी होती. कापसासारख्या शुभ्र, गुबगुबीत चांदणी बकरीच्या कपाळावर एकच काळा ठिपका होता. एकदा चरण्याच्या नादात चांदणी एकटीच पहाडात दूर दूर जाते. चुकलेल्या चांदणीला अबूमिया हाकारत राहतात आणि शेवटी नाइलाजाने इतर बकऱ्यांना घेऊन उदास मनाने घरी परततात. पहाडात सैरभैर फिरणाऱ्या चांदणीची गाठ एका कोल्ह्याशी पडते. चांदणी प्राणपणाने कोल्ह्याशी झुंज देते. पण…….! चांदण्याने निथळलेला गुढरम्य अलमोडा पहाड, तिथली घनदाट वृक्षराजी, चांदणीची आर्त साद आणि एकाकी झुंज दीर्घकाळ स्मरणात राहिली. त्यानंतर खूप वर्षांनी हिमालयातील अलमोडा पर्वतराजी पाहण्याचा योग आला तेव्हा चांदणीची आठवण झाली.

पूर्वीच्या उत्तर प्रदेशचे २००० साली विभाजन करून उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली. डेहराडून ही या राज्याची राजधानी. गढवाल आणि कुमाऊँ असे उत्तराखंडचे दोन भाग पडतात. गढवालचे टेहरी गढवाल आणि पौरी गढवाल असे दोन मोठे विभाग आहेत, तर कुमाऊँ टेकड्यांमध्ये नैनीताल, अलमोडा हा पूर्वेकडचा भाग येतो. उत्तराखंडाच्या उत्तरेकडे तिबेट, पूर्वेकडे नेपाळ आणि पश्चिम व दक्षिणेकडे उत्तर प्रदेश राज्य आहे.

आम्ही लखनौहून रात्रीच्या ट्रेनने काठगोदाम इथे सकाळी पोहोचलो. काठगोदामहून नैनीताल हा साधारण दोन तासांचा रस्ता अतिशय सुंदर आहे पण आमची बस अर्ध्यावाटेमध्ये बिघडल्याने मेकॅनिकची वाट पाहण्यात बराच वेळ गेला. शेवटी तिथेच उतरून पहाडाच्या माथ्यावरच बरोबर आणलेलं जेवण घेतलं. एका बाजूला खोल दरी होती. लांबवर कुमाऊँ पहाडांची रांग दिसत होती. सगळ्या दऱ्या डोंगरांवर साल, देवदार आणि पाईन वृक्ष ताठ मानेने उंच उभे होते. गाडी दुरुस्त होऊन थोडा प्रवास झाल्यावर डोंगर आडोशाच्या एका छोट्या टपरीत चहासाठी थांबलो. पण कसले काय? भन्नाट वाऱ्याने तिथे थोडा वेळसुद्धा थांबू दिले नाही. टपरीवाल्याचे टेबलांवरचे, छपरावरचे प्लास्टिक उडून गेले. टेबल- खुर्च्या थरथरायला लागल्या. पाऊसही सुरू झाला. धावत पळत कसेबसे गाडीत येऊन बसलो. नैनितालला पोहोचायला रात्र झाली.

आमचं हॉटेल नैनी लेकच्या समोरच होतं. लंबगोल प्रचंड मोठ्या नैनीतालच्या भोवती रमत- गमत एक फेरी मारली. तलावात बोटिंगची सोयही आहे. वातावरणात थंडी होती आणि डोक्यावर ऊन होते. मॉल रोडवर प्रवाशांना हाकारणारी शेकडो दुकाने आहेत. तिबेटी स्त्रियांच्या दुकानातील असंख्य स्वेटर्स, आकर्षक कपडे, परदेशी वस्तू, वस्तूंच्या भावावरून घासाघीस सारे हिल स्टेशनला साजेसे होते. नैना देवीचं दर्शन घेतलं. दुपारी भीम ताल, सात ताल  बघायला बाहेर पडलो. बसमधून घनदाट वृक्ष आणि कुमाऊँ रेंजची दूरवर दिसणारी बर्फाच्छादित शिखरं न्याहाळत चाललो होतो. आमचा गाईड चांगला बोलका व माहीतगार होता. कालच्या  सोसाट्याच्या भन्नाट वाऱ्यात ठामपणे उभ्या असलेल्या वृक्षांबद्दल विचारलं. तर त्याने पाईनवृक्षाचे एक पडलेले फळ आणून दाखविले. त्या फळाच्या देठाशी जो चिकट द्रव होता तो म्हणजे राळ. या राळेपासून टर्पेंटाईन बनवलं जातं. इथल्या गावातून दिव्यात घालण्यासाठीसुद्धा राळ वापरली जाते. पाईनचे लाकूड पटकन पेट घेते म्हणून थंडीच्या दिवसात शेकोटीसाठी याचा वापर करतात. या लाकडापासून बनवलेली झाकणं स्वयंपाकाच्या भांड्यांवर ठेवतात. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत पदार्थ बराच वेळ गरम राहू शकतो अशी छान माहिती त्याने सांगितली. भीमतालवर जाण्यासाठी उतरलो पण तिथे पोहोचू शकलो नाही. मुसळधार पाऊस सुरू झाला. थंडीने हृदय काकडले. कसेबसे हॉटेलला परतलो.

दुसऱ्या दिवशी जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान बघायला निघालो. जाताना खोल दऱ्यांमधील अनेक छोटेमोठे जलाशय दिसत होते. त्यात स्वच्छ निळ्याभोर आकाशाचे प्रतिबिंब पडल्यामुळे ते नीलमण्यांसारखे भासत होते. पुढचा रामनगरपर्यंतचा रस्ता पहाडी नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गव्हाची आणि मोहरीची मोठी शेती होती. भरपूर आम्रवृक्ष होते. आपल्याइथला हापूस आंब्याचा सिझन संपत आला की बाजारात येणारे दशहरी, केशर, नीलम, लंगडा आंबे हे उत्तराखंड, उत्तर प्रदेशचे असतात. थंडगार पहाडावरून सपाटीवर आलो होतो. भरपूर वृक्ष आणि हवेतला ओलसर दमटपणा यामुळे घामाघूम झालो होतो .एका धाब्यावर गरम चविष्ट पराठा खाऊन मोठा ग्लास भरून दाट मधुर लस्सी घेतली आणि पोटभरीचे जेवण झालं. अभयारण्यच्या आधी ‘जीम कॉर्बेट’ म्युझियम आहे. पुढे थोड्या अंतरावर छोटासा धबधबा आहे. रंगीबेरंगी पक्षी, सुगरणीची घरटी, हरणे, रान कोंबड्या यांचं दर्शन झालं. तीन-चार फूट उंच वारूळं रस्त्याच्या दोन्ही कडांना होती. ड्रायव्हरने जंगलवाटा धुंडाळल्या पण व्याघ्रदर्शन झाले नाही. दूरवर चरणारे जंगली हत्ती, मोर, गरुड दिसले. कडूलिंबाचे प्रचंड मोठे वृक्ष होते.

उत्तराखंड भाग १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments