सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक १८ भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ झांबेझीवर झुलणारी झुंबरं  ✈️

नैरोबीहून लुसाका इथे जाणाऱ्या विमानात बसलो होतो. लुसाका येण्यापूर्वी अर्धा तास वैमानिकाच्या केबिनमधून सर्वांना डावीकडे बघण्याची सूचना करण्यात आली. आफ्रिकेतल्या सर्वात उंच  किलिमांजारो पर्वताचे विहंगम दर्शन विमानातून घडत होते. गडद निळसर- हिरव्या पर्वतमाथ्यावरचे शुभ्र पांढऱ्या बर्फाचे झुंबर सूर्यकिरणांमुळे चमचमत होते.

लुसाका ही झांबियाची राजधानी आहे. लुसाका येथून लिव्हिंग्स्टन इथे जगप्रसिद्ध ‘व्हिक्टोरिया फॉल्स’ बघायला जायचे होते. बसच्या खिडकीतून बाहेरचे रमणीय दृश्य दिसत होते. स्वच्छ सुंदर सरळसोट रस्त्यापलीकडे हिरव्या गवताची कुरणे होती. गहू, ऊस, मका, टोमॅटो, बटाटे यांची शेती दिसत होती. त्यात अधून-मधून अकेशिया ( एक प्रकारचा बाभूळ वृक्ष ) वृक्षांनी  हिरवी छत्री धरली होती. हिरव्यागार, उंच, चिंचेसारखी पाने असलेल्या फ्लेमबॉयंट वृक्षांवर गडद केशरी रंगाच्या फुलांचे घोस लटकत होते. आम्रवृक्षांवर लालसर मोहोर फुलला होता.

थोड्याच वेळात अमावस्येचा गडद काळोख दाटला. काळ्याभोर आकाशाच्या घुमटावर तेजस्वी चांदण्यांची झुंबरं लखलखू लागली. आमच्या सोबतच्या बाबा गोडबोले यांनी दक्षिण गोलार्धातील त्या ताऱ्यांची ओळख करून दिली. नैऋत्य दिशेला शुक्रासारखा चमकत होता तो अगस्तीचा तेजस्वी तारा होता.सदर्न क्रॉस म्हणून पतंगाच्या आकाराचा तारकासमूह होता. आपल्याकडे उत्तर गोलार्धात हा तारका समूह फार कमी दिसतो.हूकसारख्या एस्् आकाराच्या मूळ नक्षत्रामधून आकाशगंगेचा पट्टा पसरला होता. मध्येच एक लालसर तारा चमचमत होता. साऱ्या जगावर असलेलं हे आभाळाचं छप्पर, त्या अज्ञात शक्तीच्या शाश्वत आशीर्वादासारखं वाटतं .

आम्ही जूनच्या मध्यावर प्रवासाला निघालो होतो. पण तिथल्या व आपल्या ऋतुमानात सहा महिन्यांचे अंतर आहे. तिथे खूप थंडी होती. लिव्हिंगस्टन इथल्या गोलिडे लॉजवर जेवताना टेबलाच्या दोन्ही बाजूंना उंच जाळीच्या शेगड्या ठेवल्या होत्या. दगडी कोळशातून लालसर अग्निफुले फुलंत होती त्यामुळे थंडी थोडी सुसह्य होत होती.

दुसऱ्या दिवशी आवरून रेल्वे म्युझियमपर्यंत पायी फिरून आलो. ब्रिटिशकालीन इंजिने त्यांच्या माहितीसह तिथे ठेवली आहेत. नंतर बसने व्हिक्टोरिया धबधब्याजवळच्या रेल्वे पुलावर गेलो.झांबेझी नदीवरील या पुलाला शंभराहून अधिक वर्षे झाली आहेत. हा रेल्वे पूल ब्रिटनमध्ये बनवून नंतर बोटीने इथे आणून जोडण्यात आला आहे. या रेल्वेपुलाला दोन्ही बाजूंनी जोडलेले रस्ते आहेत. पुलाच्या एका बाजूला झांबिया व दुसऱ्या बाजूला झिंबाब्वे हे देश आहेत. या देशांच्या सीमेवरून वाहणाऱ्या झांबेझी नदीवर हा विशालकाय धबधबा आहे. पुलाच्या मध्यावर उभे राहून पाहिलं तर उंचावरून कोसळणारा धबधबा आणि खोल दरीतून वर येणारे पांढरे धुक्याचे ढग यांनी समोरची दरी भरून गेली होती. त्या ढगांचा पांढरा पडदा थोडा विरळ झाला की अनंत धारांनी आवेगाने कोसळणारे पांढरेशुभ्र पाणी दिसे. इतक्या दूरही धबधब्याचे तुषार अंगावर येत होते.

दोन डोंगरकड्यांच्या मधून पुलाखालून वाहणारी झांबेझी नदी उसळत, फेसाळत मध्येच भोवऱ्यासारखी गरगरत होती.पुलाच्या दुसऱ्या बाजूला बंगी जम्पिंगचा चित्तथरारक खेळ सुरू होता. कमरेला दोरी बांधून तरूण-तरूणी तीनशे फूट खोल उड्या मारत होत्या.झांबेझीने आपल्या प्रवाहात इंद्रधनुष्याचा झोपाळा टांगला होता. इंद्रधनुच्या झोक्यावर साहसी तरुणाई मजेत झोके घेत होती. साखरेच्या कंटेनर्सनी भरलेली एक लांबलचक मालगाडी रेल्वे पुलावरून टांझानियाच्या दारेसलाम बंदराकडे चालली होती.झांबियाची ही साखर जपान,अरब देश वगैरे ठिकाणी निर्यात होते.

दुपारी म्युझियम पाहायला गेलो. जगातील सर्वात प्राचीन मनुष्यवस्तीच्या खुणा आफ्रिकेत सापडतात. एक लक्ष वर्षांपूर्वीपासून मनुष्य वस्ती असल्याचे पुरावे या म्युझिअममध्ये ठेवले आहेत. अश्मयुगातील दगडी गुहांची घरे, त्याकाळच्या मनुष्याच्या कवट्या,दात हाडे आहेत. आदिमानवाने दगडावर कोरलेली चित्रे, मण्यांचे दागिने, शिकारीची हत्यारे, लाकडी भांडी, गवताने शाकारलेल्या झोपड्या, गवती टोपल्या, अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी, झाडांचे नमुने व माहिती दिलेली आहे.बाओबाओ नावाचा एक वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष आहे. त्याला भाकरीचे झाड असेही म्हणतात. या झाडाची फळे खाऊन आदिमानवाचा उदरनिर्वाह होत असे. पिवळसर बुंधे असलेले हे बाओबाओ वृक्ष म्हणजे हत्ती व जिराफ यांचे आवडते खाणे आहे.

नंतर हेलिकॉप्टर राईडसाठी जायचे होते. एका वेळी तीन जणांना घेऊन हेलिकॉप्टर झेप घेते. झांबेझीच्या प्रवाहाभोवतीचा दलदलीचा प्रदेश, तसेच त्यातील पाणघोडे, हत्ती,गेंडे यांचे जवळून दर्शन झाले. आफ्रिकेतील गेंड्यांच्या नाकावर दोन शिंगे असतात. आपल्याकडे आसाममधील गेंडे एकशिंगी असतात. दरीतून वाहणाऱ्या झांबेझीच्या दोन्ही कडांवर इंद्रधनुष्याचे पंख पसरले होते. हेलिकॉप्टरबरोबर ते इंद्रधनुष्य पुढे पुढे धावत होते. हेलिकॉप्टरच्या पट्टीवर उतरलो तर समोर पन्नास फुटांवरून दहा-बारा थोराड हत्ती- हत्तीणी व त्यांच्या पिल्लांचा डौलदार कळप गजगतीने एका सरळ रेषेत निघून गेला.

भाग-१ समाप्त

 © सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments