सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ लेकच ती… – लेखिका : सुश्री विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

साडीचे टेक्श्चर थोडं कडकच होतं…निऱ्या नीट बसेनात, माझी आपली कसरत चालूच…खाली मान घालून मोडायची वेळ आली तरी साडी काही मनासारखी नेसली जाईना. कॉलमध्ये व्यग्र असलेली लेक…कानात हेडफोन्स् घालून धावत आली..हाताने खूण करत तिने पटकन निऱ्यांच्या चुण्या हातात घेतल्या आणि मांडी घालून मस्तपैकी खाली बसली. एक एक चुणी दोन बोटांच्या चिमटीत धरुन एकसारखी निरीवर निरी घालत तिने सगळ्या निऱ्या सेफ्टीपिनेत अडकवून दोन मिनिटांत नेटकी साडी नेसायला मला मदत केली.

हुश्श…मी एकदम रिलॅक्स झाले. क्षणभर या आवडलेल्या साडीऐवजी दुसरी साडी नेसून मोकळं व्हावं असंही वाटून गेलं. पण शेवटी लेकच ती…मनातलं सगळं जाणणारी… अगदी ऐनवेळी मदत करुन नामानिराळी होणारी…

तिचा कॉल म्यूट करत तिने, मी बांधलेल्या पोनीवर ही आक्षेप घेतला. “ इतकी छान साडी नेसलीस तर ते केस का आवळून बांधतेस…सोड जरा मोकळे….मी छानपैकी क्लचर लावून देते.” तिने डोक्याचा देखील ताबा घेतला. मी अगदी दहा वर्षाच्या पोरीसारखी तिच्यापुढं उभी राहिले, “ कर बाई तुला माझं काय करायचं आहे ते. ऑफिस चालू आहे हे मात्र विसरु नकोस,म्हणजे झालं !”

तिने मॅचिंग क्लचर मध्ये केस सैलसर अडकवून दिले…हलकीशी लिपस्टिक ओठावर ओढली…आणि माझी हनुवटी दोन बाजूस फिरवून…’ हं नाऊ ओके…जा आता…’ चा इशारा दिला.

तिच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसून गेलं.आणि ती … “ मोठी गबाळी पर्स खांद्यावर टांगून जाऊ नकोस, एखादी वन साईड नाजुक पर्स घे, पैसे मोबाईल बसतील अशी.. तू म्हणजे ना कशावर काहीही करत असतेस.” 

कोण कुणाची आई आहे हेच क्षणभर मला विसरायला झालं. “ आई छान रहावं ग…तू अशी छान असलीस की मलाही छान वाटतं…”

“अग गधडे…हेच लहानपणी मला तुमच्याकडून अपेक्षित असायचं..पण आम्हाला धुडकावून तुम्ही कधी ऐकलंत का आमचं?”

मला एकदम लहानपणीची हीच ती लेक आठवून गेली. खेळ,शाळा, अभ्यासातून वेळ मिळत नसताना, तिला असं आवरून देताना, माझ्या आईपणाला असंच भरतं येत असे. ती वैतागायची…बाहेर मैत्रिणी उभ्या असायच्या…” तू बाहेर जाताना टोकत जाऊ नकोस ना आई… “ तिचा सूर चिडका व्हायचा. “ नीट आवरून सावरून जावं ग बाहेर पडताना…” मी आपली सूचनावजा एखादं वाक्य टाकायची.पण त्या फटकुऱ्या जुनाट जीन्स् अन् वर ते टिचभर झबलं अडकवून, त्यांना धावायची कोण घाई असायची.

“ नको ग घालूस त्या रंग उडालेल्या जीन्स ,कसं दिसतं ते जुन्या बाजारातून आल्यासारखं….!”

“ आई हीच फॅशन आहे…आणि कंफर्टेबल पण असतात. तुमचा आणि आमचा फॅशन सेन्स फार वेगळा आहे… “ आपली बोलती बंदच !

सवयीने जुनीच, समोर असलेली चप्पल पायात अडकवली…तिचं लक्ष होतंच …. 

“ नवीन घेतलेल्या मोजड्या घाल पायात…ते जुनं पादत्राण फेकून दे आता…!”

जाता जाता…एक बाण आलाच.

मी बाहेर पडताना…हळूच तिच्या कानाशी कुजबुजले… “ समजलं…कसं वाटतं ते ! माझीही अशीच चिडचिड होते, तुझा जीन्समधला अवतार बघून….कर्मा रिटर्न्स  हं !” 

ती मनापासून हसली…” आई तू पण ना….. “

लेखिका : सुश्री सौ विदुला जोगळेकर

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments