डॉ. प्राप्ती गुणे

? मनमंजुषेतून ?

☆ “सपोर्ट सिस्टीम…” ☆ डॉ. प्राप्ती गुणे ☆

परवाच पेपरमध्ये अमेरिकेतील सुप्रसिद्ध भारतीय वंशी जर्नल सर्जन यांचे बोल वाचले.

‘एकाकीपणामुळे मनुष्याच्या तब्येतीवर कसा हानिकारक परिणाम होतो’ असे त्यांचे भाष्य होते.

काल ‘पोज’ नावाची 1980-90 दशकातलं चित्रण असणारी वेब सिरीज पाहिली. त्या काळात अमेरिकेत तृतीयपंथी लोकांनी, स्वतःच्या अस्तित्वासाठी, मूलभूत आरोग्य सेवेसाठी दिलेला लढा, त्यांची एड्स या गंभीर आजारामुळे झालेली दुरावस्था, त्यांचा खडतर जीवनप्रवास असे अनेक अतिसंवेदनशील मुद्दे,यात नाजूकपणाने हाताळले होते.

  शीर्षकाशी ह्या दोन्ही गोष्टींचा संबंध काय,असा प्रश्न आपल्याला पडलेला असेल.

.. ही वेब सिरीज पाहताना अनेक वेळा माझे डोळे पाणावले. परंतु ते दुःखद घटनांपेक्षा आल्हाददायक भावनिक प्रसंगांमुळे घडले. 

सर्वांची एकमेकांना असणारी अतूट साथ, एकमेकांच्या प्रगतीसाठी स्वतःच्या सुखाचा केलेला  निरपेक्ष त्याग, चुकांमध्ये अडकलेल्या दुसऱ्यांसाठी त्याला नावं न ठेवता, प्रसंगी स्वतः जोखीम पत्करून, धोकादायक परिस्थितींमधून त्यांना सोडवणं, स्वतःला मिळालेली जास्तीचं जीवन जगायची संधी दुसऱ्याला, ज्याचं आयुष्य जगणं अजून उरलंय, त्याला देण्यातली निस्वार्थता, पाहून कोणाचेही हृदय भरूनच येईल. मी ही त्याला अपवाद नव्हते.

त्याकाळात, समाजात अनेक गैरसमजुती व अपुरी माहिती असल्याने, स्वतःच्या कुटुंबाने झिडकारलेल्या आणि हिंस्र जगात अनोळखी व्यक्तींमध्ये स्वतःचं ‘घर’  सापडलेल्या व्यक्तींचा हा एकत्रित प्रवास होता.

घर म्हणजे छत, भिंती आणि खांब. डोक्यावरचं छत जरी सुरक्षा देत असलं, तरी भिंती आणि खांब, या  सपोर्ट सिस्टीममुळे छत त्याच्या जागी खंबीर राहतं. 

आपल्याला आयुष्यात येणारया वादळवाऱ्यांपासून सुरक्षा हवी तर आपल्या जीवनात मनुष्यरुपी खांब, भिंती म्हणजे ‘सपोर्ट सिस्टीम’ ही तेवढीच खंबीर हवी. आपल्या डोक्यावरचं कधी छप्पर उडालं की आपल्याला निवारा देणारी माणसे हवीत. आपण व्हर्चुअल जगात असणाऱ्या फॉलोवर्स, फ्रेंड्स च्या आकड्यांवरून आपलं गणगोत ठरवत असू, तर आपण चुकतोय,असं ते जर्नल सर्जन यांचे मत होतं.  आपल्या आयुष्याची खरी सफलता, आपल्या आयुष्यात असणाऱ्या त्या मोजक्या लोकांमुळे ठरते, जे एका मध्यरात्री केलेल्या फोन कॉल मुळे स्वतःची झोप मोडून आपल्या मदतीसाठी धावत येतात.

आपण चुकल्यावर ,आपल्याला दोन बोल कमीजास्त सुनावून आपली चूक सुधारण्यासाठी मार्ग सुचवतात आणि म्हणतात “खबरदार ! पुन्हा असा चुकलास तर याद राख.”

ज्यांच्याशी वर्षांचा अबोला असला तरी आपल्या आयुष्यातली सुखद अथवा दुःखद घटना घडल्यावर त्यांना सांगण्यासाठी आपला फोनकडे हात वळतो, ज्यांच्यावर किती जरी राग असला तरी आयुष्याने आपल्या श्रीमुखात भडकवली, की जो बर्फाप्रमाणे वितळून जातो,

जे स्वतःच्या आयुष्यात कधी कमी पडले असतील कधी, पण तुम्हाला गरज पडली म्हणून, आपल्या गरजांना मुरड घालून तुमच्या पाठीशी खंबीर उभे राहतात,

— अशा लोकांना कधीच कोणत्याही परिस्थितीत, आपल्या आयुष्यातून जाऊ देऊ नका.

 या खंबीर सपोर्ट सिस्टिम मुळेच, अनेक वादळं आली तरी आपण ठामपणे उभे राहू शकतो.

 हे ‘सपोर्ट सिस्टीम’ नात्यात सापडतीलच असं नाही, जिथे सापडेल तिथे त्यांना आपण मात्र घट्ट धरून उभं राहावं.

© डॉ. प्राप्ती गुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments