सुश्री तृप्ती कुलकर्णी

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “पुनर्जन्म” …डाॅ.प.वि.वर्तक☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी 

पुस्तकाचे नाव : पुनर्जन्म 

लेखक – डॉक्टर प. वि. वर्तक

प्रकाशक : डॉ. प.वि.वर्तक 

पुनर्जन्म असं म्हटलं की लगेच अंधश्रद्धा, अज्ञान, अडाणीपणा अशा दृष्टिकोनातूनच त्याच्याकडे पाहिलं जातं, आणि याला कारण आहे ते पुनर्जन्म या संकल्पनेची आतापर्यंत करण्यात आलेली मांडणी. चित्रपट, नाटक किंवा आणखीन कोणत्याही साहित्यकृती असोत या सगळ्यांमध्ये पुनर्जन्म हा विषय मांडला गेला आहे‌ तो पूर्णतः काल्पनिक आणि अशास्त्रीय दृष्टिकोनातून. त्यामुळे या संकल्पनेची हेटाळणीच जास्त प्रमाणात झाली. पाश्चात्यानुकरण करणाऱ्यांनी तर या संकल्पनेला उडवूनच लावले. निरनिराळ्या साधुसंतांनी सांगितलं असूनसुद्धा या संकल्पनेची साधी दखल घ्यावी असंही आपल्या समाजाला वाटू नये यासारखी खेदाची गोष्ट नाही, अशी खंत डॉक्टर वर्तक यांनी व्यक्त केली आहे.

ज्यावेळी पाश्चात्य लोकांना या कल्पनेत काहीतरी तथ्यता जाणवली, त्यांनी अभ्यास सुरू केला तेव्हा आपल्याकडच्या लोकांना त्यामध्ये खरोखरच तथ्य आहे असं दिसू लागलं. 

तत्पूर्वी पुनर्जन्म या सिद्धांताचा व्यवस्थित अभ्यास शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि आध्यात्मिकदृष्ट्या करून डॉक्टर वर्तक यांनी बरंच कार्य केलं. त्यांच्यापाशी सांगण्याजोगे अनेक अनुभव जमा झाले.  आणि लिहिण्याएवढा अभ्यास झाल्यावर, अधिकार प्राप्त झाल्यावर डॉक्टर वर्तकांनी हे पुस्तक लिहिलं.

या पुस्तकाच्या मनोगतातच ‘ पुनर्जन्मासारख्या विषयावर मी का लिहितो आहे? ‘ हा हेतू डॉक्टरांनी स्पष्ट केला आहे. 42 वर्षं वैद्यकीयक्षेत्रात असल्यामुळे जन्म आणि मृत्यू या घटना अगदी जवळूनच त्यांनी पाहिलेल्या आहेत. त्यामुळे पुनर्जन्म संकल्पनेसाठी आवश्यक गोष्टी म्हणजे जन्म आणि मृत्यू हे त्यांच्या नित्याच्या अभ्यासाचेच विषय होते. आणि त्यामुळेच या संकल्पनेची सत्यासत्यता पडताळून बघताना जन्म म्हणजे नेमकं काय आणि मृत्यू म्हणजे नेमकं काय याचाही ऊहापोह या पुस्तकात केला आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून या घटना कशा घडतात ते सर्वसामान्य माणसाला समजेल, उमजेल अशा पद्धतीने साध्या सोप्या भाषेत आणि क्रमवार सांगितलेले आहे. 

पुनर्जन्म ही संकल्पना मानणारे आपल्याकडील संतमहंत, विचारवंत, काही शास्त्रज्ञ यांचे दाखले दिले आहेत. तसंच आता काही पाश्चात्त्य शास्त्रज्ञांनीदेखील या संकल्पनेचा अभ्यास करून ही संकल्पना खरी असल्याचं मान्य केलं आहे. 

अति विज्ञाननिष्ठ आणि अश्रद्ध माणसांना कदाचित या गोष्टी तरीही पटणार नाहीत, त्या न पटोत. पण या संकल्पनेचा प्रभावी उपयोग माणसाच्या सद्यस्थितीतल्या वर्तनावर कसा होऊ शकतो हे मात्र विचार करण्याजोगं आहे. या पुस्तकातला हा विचार मला जास्त महत्त्वाचा वाटला. 

असं अनेकदा घडतं की एखादी व्यक्ती विनाकारण आपल्याशी वाईट वर्तन करते किंवा संकट प्रसंगी आपोआप आपल्याला मदत करते. अशा दोन्ही वेळी जर आपण तटस्थपणे या गोष्टींचा विचार केला तर जाणवतं, की या व्यक्तीशी माझा पूर्वी कधीही संबंध आला नसताना तिने माझ्याशी असं वर्तन करण्यामागे नक्की काय कारण असावं आणि आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कर्माचा सिद्धांत म्हणजेच पुनर्जन्म देऊ शकतं.

घडून गेलेल्या अनेक घटनांचा कार्यकारणभाव आध्यात्मिकदृष्ट्या बघायला गेलं, तर पुनर्जन्म ही संकल्पना अधिकाधिक पटत जाते. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे विज्ञानदेखील कोणतीही गोष्ट कार्यकारणभाव असल्याशिवाय घडत नाही, या गोष्टीला अनुमती देते. 

फक्त एक गोष्ट ठराविक प्रयोग करून सर्वसामान्यांसाठी सिद्ध करता येते… तर दुसरी गोष्ट ही एका विशिष्ट पातळीवरील ज्ञान प्राप्त झाल्यावर अनुभवास येते. बहिणाबाईंनी मरतेसमयी आपल्या बारा पुनर्जन्मांचं कथन केलेलं आहे. अकबराचा पुनर्जन्म आणि त्याचं वर्तन, बिरबलाचा पुनर्जन्म आणि त्याचं वर्तन… याच प्रमाणे पांडव, ज्ञानेश्वर भावंडं, सावरकर बंधू या सगळ्यांचे पुनर्जन्म यात सांगितले आहेत. आणि त्यात त्या जन्मात त्यांनी केलेली कार्यं यांचा सविस्तर अभ्यास करून ही सत्यता मांडली आहे. 

मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य माणसाने जर आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीचा परिणाम, मग तो चांगला असो वा वाईट, आपल्याला भोगावा लागणार आहे हे जर जाणलं तर त्याच्या कर्मामध्ये आपोआपच शुद्धता आणि सत्यता येईल. वाईट कर्म करण्याची त्याची प्रवृत्ती ही आपोआपच नियंत्रित होईल. आणि ज्याचा फायदा समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी नक्कीच होईल. हे कसं घडेल यासाठी सर्वसामान्य व्यक्तींच्या पुनर्जन्माची काही उदाहरणं आणि त्यांची कर्मफलं आणि त्यातून त्यांना मिळणारे परिणाम हे लेखकांनी सोदाहरण स्पष्ट केलं आहे. 

अल्पवयात अचाट, अफाट पराक्रम करणारी मुलं असोत, किंवा विशिष्ट व्यंग घेऊन जन्माला आलेली बालकं असोत– ही सारी उदाहरणे विज्ञानाच्या पातळीवर पूर्णतः सिद्ध होत नाहीत. फार फार तर यातील व्यंगाचे कारण समजू शकते.  परंतु ते घडण्यामागचे कार्यकारण भाव मात्र विज्ञानही स्पष्ट करू शकत नाही आणि त्याच्यावर पूर्णतः उपचारही शोधू शकत नाही. गुणांच्या बाबतीतही, अचंबित होण्यापलीकडे विज्ञान त्यावर काहीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. असं असताना पुनर्जन्म ही संकल्पना नाकारण्यामागे केवळ हटवादीपणा तर नाही ना, हे सगळ्यांनी पडताळून पाहायला हवं आणि त्या दृष्टिकोनातून या संकल्पनेचा अधिकाधिक अभ्यास व्हायला हवा हे या पुस्तकानं अधोरेखित केलं आहे.

किमान एकदा तरी वाचावं असं‌ पुस्तक.

 

तळटीप – पुस्तकात याव्यतिरिक्तही खूप काही आहे पण ते वाचूनच समजून घ्यावं. 

 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments