श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ एका हाकेचे अंतर….भाग 3 ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – विचार करून रोहनचं डोकं सुन्न व्हायचं. उलट-सुलट विचार त्याच्या मनात भिरभिरत रहायचे. ‘आता दादा झालायस ना तू? थोडं दादासारखा वाग’  हे वाक्य सर्वांच्या तोंडून येता-जाता ऐकून तो खरच ‘दादा’ झाला दादागिरी करायला लागला.)

…………….

त्याचे वाढते हट्ट, चिडचिड, संतापणं हा एक व्यापच होऊन बसला. आईला बाळाकडे दुर्लक्ष करता येईना आणि रोहनची काळजी तिची पाठ सोडेना. त्यात त्याची वार्षिक परीक्षा जवळ आलेली. आई बिचारी  तिच्यापरीने त्याचा अभ्यास घ्यायचा प्रयत्न करायची. चार दिवस बरे जायचे की पुन्हा काहीतरी खुट्ट झाल्याचं निमित्त व्हायचं न् रोहन बिथरायचा.

अशातच त्याची परीक्षा संपली. निकाल लागला. रोहनच्या मार्कातली अधोगती पाहून सगळेच धास्तावले. हा मुलगा आता खरोखरच हाताबाहेर गेलाय यावर शिक्कामोर्तब झालं. यावर उघडपणे कसलीही प्रतिक्रिया व्यक्त न करता आई डोळे टिपत राहिली आणि तिने  दिवसभर रोहनशी अबोला धरला. रात्री उशिरा आतून कुठेतरी हललेला रोहन हळूच तिच्याजवळ  सरकला आणि तिच्या कुशीत शिरला तेव्हा तिने नि:शब्दपणे त्याचा हात अलगद बाजूला करीत त्याला दूर सारलं.

सर्वांच्या आपापसातल्या ओझरत्या कानावर आलेल्या बोलण्यातून आपल्याला आजोळी शिकायला पाठवायचा घाट घातला जातोय या समजुतीने तर रोहन अधिकच उध्वस्त झाला. या सगळ्या चर्चा कुठलाच निर्णय न होता केव्हाच संपल्या कारण आई-बाबा दोघांनाही रोहनला दूर ठेवणे नको होते, पण हे सगळं रोहनपर्यंत कधी पोचलंच नाही.

सुट्टीत थोडा बदल म्हणून आई बाळाला न् रोहनला घेऊन माहेरी जायची तयारी करु लागली आणि रोहनने रडून रडून  आकाश-पाताळ एक केलं. आईने त्याला परोपरीनं समजावलं पण त्याची समजूतच पटेना. रात्री बाबा घरी आले तेव्हा रोहन मोठ्या आशेने त्यांच्याकडे धावला. त्यांच्या पायांना त्याने घट्ट मिठी मारली. “रोहन, तुला थोडेच दिवस सुट्टीपुरतंच तिकडं जायचंय. आईबरोबर तू परत इकडेच यायचंयस” असं त्यांनी त्याला समजावलं खरं पण ते समजावणं रोहनला वरवरचंच वाटत राहिलं…,  रडून-रडून रोहन मलूल होऊन गेला…!

या पार्श्वभूमीवरचं त्याचं आई आणि लहान बाळाबरोबर आजोळी येणं, साध्या तापाचं निमित्त होऊन त्याला आजोबांनी डॉक्टरांकडे आणणं आणि तिथे त्यांनी केलेली आदळआपट, त्रागा, आक्रस्ताळेपणा.. आणि अखेर नर्सच्या सूचनेनुसार ‘ तो घरी आईकडूनच औषध घेईल ‘ या विचाराने आजोबानी त्याला रिक्षातून  घराकडे नेणं.

रिक्षातही आजोबा खरंतर मनातून थोडे अस्वस्थच होते. रिक्षा घराजवळ येऊन थांबताच आजोबांनी रिक्षावाल्याचे पैसे देऊन रोहनला उचलून कडेवर घ्यावं म्हणून त्याला हात लावला न् त्यांच्या हाताला एकदम चटकाच बसला. त्याला उचलून घेऊन कसेबसे आपल्या मुलीला आवाज देत आजोबा घराकडे धावले… .एव्हाना छोटं तान्हुलं बाळ शांत झोपलं होतं, म्हणून रोहनची आईच पुढे आली आणि तिने दार उघडलं. रोहनची न् तिची नजरानजर झाली. त्याचा तापानं फुललेला लालसर चेहरा पाहून ती गलबलली. तिचे डोळे भरूनच आले एकदम. रोहनला जवळ घ्यायला तिने आपले दोन्ही हात पुढे केले आणि त्या ओल्या नजरेनेच ती त्याला.. ‘ये बाळा’ .. म्हणाली.रोहन आपली मलूल नजर तिच्यावर रोखून तिला आजमावत राहिला. होय.. ही.. ही हरवलेली आईच आहे आपली… मनोमन खात्री पटताच त्याने क्षणार्धात ‘आईss ‘अशी केविलवाणी आर्त हाक मारली आणि तो तिच्याकडे झेपावला. तिच्या कमरेला त्याने घट्ट मिठी मारली. आजोबा लगबगीने आत निघाले. ‘ चल, रोहनला घेऊन आत ये बरं आणि हे औषध दे त्याला ..’ असं म्हणून आजोबा पाणी आणायला गेले. आईने रोहनला हलक्या हाताने थोपटलं आणि ती त्याची मिठी सोडवू लागली पण….? ..त्याने तिला मारलेली ‘आईss’  ही आर्त हांक हेच त्याचे अखेरचे शब्द होते आणि अखेरचा श्वासही…!!

घडले ते असे सगळे अनपेक्षित आणि धक्कादायकच होते पण म्हणूनच ते एवढ्यावरच  संपणारही नव्हते…!

दुःख रोहन अचानक गेल्याचं तर होतंच पण तो गेल्याच्या दुःखाइतकाच त्या धक्क्यातून आता त्याच्या आईला कसं सावरायचं हाही प्रश्‍न ऐरणीवर येऊन बसलाय. कारण त्या क्षणापासून ती दगड होऊन गेलीय. निश्चल बसून राहिलीय. रडणार्‍या आपल्या तान्ह्याकडे दिवसभरात तिने ढुंकूनही पाहिलेले नाहीय. सतत हाकेच्या अंतरावर वावरत असणाऱ्या रोहनच्या भावना घरी कोणाच्याही मनापर्यंत पोहोचण्याइतकं त्यांच्यातलं अंतर कोसो दूर झाल्याची ही परिणती..!

यात नेमकं चुकलं कोण या प्रश्नाचं उत्तर मला अजूनही नेमकेपणानं सापडलेलं नाहीय. पण परस्परांमधील एका हाकेचे अंतर जाणीवपूर्वक जपण्याची निकड मात्र मला नव्याने जाणवू लागलीय एवढं खरं..!!

समाप्त

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments