☆ जीवनरंग ☆ तिबेटी लोककथा – समुद्र खारा नव्हता तेव्हा ☆ डॉ. मंजुषा देशपांडे

खूप वर्षांपूर्वी…जेव्हा समुद्र खारट नव्हता.  पृथ्वीचा बराचसा भाग घनदाट जंगलाने व्यापला होता.  त्यावेळी एका जंगलाने वेढलेल्या विस्तीर्ण डोंगर पठारावर  सूर्य देवाचे राज्य होते. राजा प्रजेचा आवडता होता. राजाची प्रजा शहाणी होती.  मंत्रीमंडळ राजाची आज्ञा मोडत नव्हते. कोणीही बंडखोर अजून पैदा झाला नव्हता.

बायको एकच होती. सोन्यासारख्या दोन राजकन्या होत्या आणि एकापेक्षा एक बुध्दीमान आणि धाडसी तीन राजपुत्र होते. वेळेवर पाऊस पडे.  शेती पिके.  फळाफूलांचे हंगाम भरपूर असत. लोक उत्सवप्रिय होते.  राज्यातला प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कलेत निपुण होता. त्यामुळे गाणे,  बजावणे,  नाच, नाटके यासारख्या कार्यक्रमांनी रात्री उजळलेल्या असत.

अर्थातच लोक आरोग्याने मुसमुसलेले आणि अतिशय आनंदी होते. सगळं कसं हवं तसं.  देखणं आणि रेखीव.

एका संध्याकाळी एक देवदूत आणि त्याची पत्नी आकाशातून विहरत चाललेले होते. त्या दिवशीही गावात कसलासा उत्सव होणार होता. सगळीकडे मोगरा आणि गुलाबाच्या माळा लावल्या होत्या. गरमागरम मिष्टान्नांचा घमघमाट सुटलेला होता.  रंगीबेरंगी कपडे आणि फूलांच्या माळांनी सजलेले लहान थोर लगबगीने उत्सवाच्या ठिकाणी निघाले होते.

आज राजदरबार आणि गावातील मुले विविध प्रकारे मनोरंजनाचे कला प्रकार सादर करणार होते.  ती मुले संगीत, वादन,  नर्तन आणि नाटक या सर्वातच प्रवीण होती.  दरवर्षी हा उत्सव अभिनव पध्दतीने सादर करण्याची त्या गावातली प्रथा असल्याने, सर्वजण अतिशय उत्सुकतेने कार्यक्रमाची वाट पहात होते.

राजा राणीचे आगमन होताच कार्यक्रमाला सुरूवात झाली. पहिल्याच नांदीला लोकांनी माना डोलावल्या.

……तर त्या आकाशातल्या देवदूताची पत्नी त्या गावातला आनंद पाहून स्वतःही खुदुखुदू हसू लागली आणि ते विमान गदागदा हलायला लागलं.  देवदूताला फारच राग आला, तो तिरसटल्या स्वरात म्हणाला, “गप बस ग ए.. विमान पडेल तुझ्या हसण्याने… पृथ्वीवर कोणताही आनंद फार काळ टिकत  नाही, लक्षात आहे ना!”  त्यावर ती पत्नी ठासून म्हणाली,  “काळ बदलतो.  माणसंही बदलतात.” त्यावर देवदूताने एक सुस्कारा सोडून विमान आणखी उंचावर नेत म्हटले, ” माणसे आहे त्यात समाधानी नसतात आणि त्यांना नेहमीच अधिकचे काहीतरी हवे असते.  त्यामुळेच ते स्वतःबरोबर

दुस-यांचाही नाश ओढवून घेतात.”

मी म्हणतोय त्याचा प्रत्यय तुला लवकरच येईल.” देवदूत काहीशा विषादाने म्हणाला.

कदाचित केवळ त्यामुळेच त्या उत्सवानंतर मधल्या रिकाम्या काळात त्या राणीला एक व्रत करायची बुध्दी झाली असावी.  ते व्रत म्हणे राज्य हजार वर्ष पर्यन्त टिकण्यासाठी होते.  प्रथम राजाने ती कल्पना हसण्यावारी नेली.  तो म्हणाला,  ” आपण शंभर वर्षापुढे जगणार नाही,  आपली मुले,  नातवंडे,  पंतवंडेही हजार वर्षापर्यन्त जगत नाहीत. आपल्यानंतर आपला वंश हजार वर्षापर्यंत टिकतो का नाही याची आपल्याला कशाला चिंता!

राणीला ते मुळीच आवडले नाही. ती अगदी हट्टालाच पेटली.  ते 15 दिवसाचे आणि अगदी सोपे व्रत होते.

रात्रीला दिवस मानायचा आणि दिवसाची कामे रात्री करायची आणि रात्रीची कामे दिवसा.  असे 15 दिवस केले की संध्याकाळी देवीची पूजा करून लोकांना मेजवानी द्यायची.

रात्री जागरण करायचे. यज्ञ करायचा. देवीला संतुष्ट करायचे.. ..

आणि सोळाव्या दिवसापासून परत सगळे पूर्वीसारखे…

राजा काही त्याला तयार नव्हता.

राणी सतत राजाच्या मागे भुणभुण करी आणि राजा तिला उडवून लावी.

मग राणीने ही कल्पना प्रधान आणि सेनापती यांच्या बायकांसमोर बोलून दाखवली.

त्या राज्यात सेनापतीला युध्दाचा पोशाख घालून आपल्या शिपायांसह रस्त्यावरून मिरवत जाण्याव्यतिरिक्त काही काम नसे. त्यामुळे सेनापती आणि त्याची बायको सतत सोंगट्यांचा खेळ मांडून हास्य विनोद करत बसलेली असत.

सेनापतीण बाईंनी या व्रताची गोष्ट  नव-याच्या कानावर घातली. सेनापतीलाही थोडे विचित्रच वाटले…’असले कसले व्रत… ते सुध्दा वंश 1000 वर्षे राज्यावर असावा… म्हणून..’

पण बाईंनी बसता उठता त्याच्या डोक्याशी कटकट केल्यामुळे तो राजाशी त्याबद्दल बोलायला तयार झाला.  इकडे प्रधानाचेही तेच झाले.

सेनापती आणि प्रधानजी दोघांनीही राजाकडे त्या व्रताचा विषय काढला आणि मुत्सद्दीपणे त्यांनी राजाचे मन त्यासाठी  वळवले.

राजा म्हणाला.. ” त्या व्रतामध्ये रोज देवीची पूजा करावी लागेल. ” हे माहिती आहे ना.. रोजच्या पूजेसाठी डोंगरापलिकडच्या राजाच्या तळ्यातली 100 कमलपुष्पे आणायची आहेत,  ती देखील त्यांच्या नकळत!

हे मात्र सेनापतीला भारी आवडलं.  सेनापती म्हणाला.. “अहो रोज नव्या दमाच्या शिपायांची तुकडी पाठवेन आणि कमळं आणवेन. ” लेकाच्यांना काहीच काम नसल्याने सोदे झालेत नुसते…..

खरे तर त्या तिघांनाही त्या व्रतात ना दम वाटत होता ना रस!

पण असो… व्रताची तयारी जोरात सुरू झाली.  विणकर, सोनार आणि माळी भराभर कामाला लागले.  चहूबाजूंनी मंडप घातले. पताका लावल्या.

देवीचे देऊळ रंगवले.  रांगोळ्या काढल्या. या व्रतामध्ये दिवसाची कामे रात्री करायची होती आणि सूर्य उगवल्याबरोबर झोपायचे होते. सूर्य मावळायच्या सुमाराला उठून प्रथम देवीची पूजा करून नित्य कामांना सुरुवात करायची होती.  मध्यरात्री आरती झाली की जेवून पुन्हा पहाटे शेजारती करून घरी जाऊन झोपायचे..

कसलं हे विचित्र व्रत!  प्रजाजन म्हणाले.  पण त्यांचा राजावर विश्वास.  त्यामुळे कोणी काही उघड बोलले नाही. अखेरीस व्रताच्या रात्रीचा दिवस उजाडला. शिपायाची एक तुकडी डोंगरापलिकडे आदल्या दिवशीच रवाना झाली होती.

तिथल्या एका सुंदर तळ्यात असंख्य कमळे फूलली होती.  शिपायांनी भराभर शंभर कमळे तोडली आणि परतायला निघाले.  शंभर कमळावर एका फूलाला हात लावायचा नाही अशी त्यांना सक्त ताकीद होती.

पहिल्या रात्री कमळांसकट सांग्रसंगीत पूजा झाली पण मध्यरात्री कुणाला जेवण जाईना.  अंधार असल्यामुळे दिवसाची कामेही होईनात.

पहाटे पटापट लोक अंथरूणात शिरले.  दुपार नंतर जागे झाले तर बहुतेकांचे पोट बिघडलेले. डोकेही दुखत होते.  कसेतरी सगळेजण देवळातल्या सायंपूजेला गेले उत्साह तर नव्हताच.

त्या दिवशीही मध्यरात्रीचे जेवण जवळ जवळ वायाच गेले.  खुद्द राणीला झोप आवरेना पण आपल्या वंशाचे राज्य हजार वर्षे टिकणार…या आशेने… तिने मनाला ढळू दिले नव्हते.

आता शिपायांनी कमळे आणली खरी… पण त्या राजाच्या शिपायांना चोरीचा पत्ता लागल्याने त्यांची आणि या शिपायांची चकमक झाली.

त्यात यांचे दोघे आणि त्यांचे तिघे जखमी झाले. पण ती ही रात्र पार पडली.  रात्री झोप न झाल्याने लोक चीडचीड करायला लागले.  एकमेकांवर डाफरू लागले.

राजा तर भयंकर वैतागला होता. पूजेच्या वेळी त्याने राणीचा हात जोरात हिसडला.. राणीच्या डोळ्यात पाणीच आले.

तिस-या दिवशी दुपारी  या गावातले सगळे गाढ झोपेत आणि पहा-यावरील शिपाई पेंगत असताना त्या राज्यातले काही सैनिक त्यांच्या सेनापतीसह या राज्यात आले त्यांनी त्या पेंगुळलेल्या शिपायांच्या मुसक्या आवळल्या आणि ते राजाच्या गुलाबाच्या बागेत शिरले.  फूले तर सगळी तोडलीच वर बागेची नासधूसही करून ठेवली.

प्रमुख  माळ्याला बांधून ठेवले माळीणबाई राजाकडे पळत सुटल्या.  त्यांना पळण्याच्या शर्यतीत मिळालेली बक्षिसे अशी कामी आली.

राजा डोळे चोळत उठला.  भूपाळी नाही तरीही भाटही जागे झाले.

यांचे सेनापती लगबगीने शिपायांना घेऊन निघाले.  अगोदरचे आळशी बनलेले शिपाई आणि त्यात झोपाळलेले.

त्यांच्या नव्या दमाच्या शिपायांना अगदी सहज यांच्या सेनापतीलाच कैद करता आले.  राजा तसा चतुर होता.  त्याने त्यांच्या सेनापतीला बोलणी करण्याचे निमंत्रण दिले.  त्या वेळेला फारशा लढाया होत नसत. त्यामुळे तो सेनापतीही फार तंदुरुस्त नव्हता. शिवाय डोंगरावरून दौडत आल्याने त्याला तहान भूकही जबरीची लागली होती.

त्याने यांच्या सेनापतीला काटेरी बुंध्याला बांधून ठेवले आणि तो त्याच्या शिपायांसकट राज्याकडे गेला.

इकडे सेनापतीच्या बायकोने तिच्या नव-यावर पहारा करणा-या दहा शिपायांना जेवायला बसवून तिच्या मैत्रिणींना आग्रह करायला लावला आणि स्वतः जाऊन

नव-याला सोडवले. त्याला ठिकठिकाणी काटे टोचल्यामुळे त्याचे शौर्य जागे झाले त्याने एकट्याने त्या जेऊन ढेकर देत असलेल्या शिपायांना असे धोपटले म्हणता की राजवाड्यात चर्चेसाठी गेलेल्या त्यांच्या सेनापतीच्या कानावर त्यांच्या किंकाळ्या पोचल्या.

तो सेनापती त्याच्या शिपायासह या सेनापतीशी लढायला लागला.  राजा डोके धरून बसला आणि राणीवर कावायला लागला.  ते शिपाई आणि सेनापती पळून गेले खरे पण सापाच्या शेपटीवर पाय पडलाच होता.

एवढे होईपर्यंत संध्याकाळ झाली.  आज लोकांना दिवसाही जागरण झालं.

पर-राज्यातून कमळे तर आली पण पूजेसाठी कोणाची मनःस्थिती असणार.. पहा! सगळं चांगलं चाललं असताना राणीला खुळचट व्रत करायची दुर्बुध्दी सुचली.

साध्या कमळावरून शेजारच्या राजाशी वैर घ्यावं लागलं.  शेवटी ते वैर संपावं म्हणून त्या राजाच्या दोन बावळट राजपुत्रांशी राजाला त्याच्या गोड राजकन्यांचा विवाह करावा लागला.  पण कायम कुरबुरी… वैर धुमसतच राहिलं.  सतत चकमकी,  असुरक्षित आयुष्य…त्यामुळे लोक चिडचिडे बनले.  बायका पोरांच्या रडण्यामुळे समुद्र खारट बनला.

परत काही वर्षानंतर जेव्हा देवदूत …आकाशात त्याच्या बायकोबरोबर फिरत होता तेव्हा डोंगर बोडके झाले होते आणि जंगले उजाड,  माणसे चिडचिडी आणि राजा राणी वैतागलेले… कुठे निषेधाच्या घोषणा… कुठे कसल्या तरी फालतू कारणामुळे सत्कार… असे सगळे अराजक माजलेले होते…

देवदूत म्हणाला… पहा!  सगळे सुरळीत चाललेले असताना राणीला वंश हजार वर्षे टिकवावासा वाटला.. इकडे स्वतःचे आयुष्य किती ते माहिती नाही.

माणसाच्या क्षुधांना अंतही नाही आणि पारावार नाही… देवदूताच्या पत्नीने खिन्नपणे मान हलवली.

आणखी काय करणार!

 

©  डॉ. मंजुषा देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments