सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

वेडा कलाकार कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

जगाचे काही नियम असतात. काही विशिष्ट शिष्टाचार, विचारांच्या चौकटी असतात. या चौकटीतच सर्वसामान्य माणूस वावरत असतो, समाजमान्य होईल असे वागत असतो. या चौकटींच्या पलीकडे जात स्वतःच्या मनाप्रमाणे, स्वतःच्या आनंदासाठी जगणाऱ्याला ‘कलंदर’ म्हणतात. ” त्याचं सगळं जगावेगळंच असतं ” असा ठपकाही त्याच्यावर येतो. अशाच एका मनस्वी कलाकाराचे मनोगत म्हणजे डॉ. निशिकांत श्रोत्री लिखित ‘ वेडा कलाकार ‘ ही कविता. आज आपण तिचा रसास्वाद घेणार आहोत.

वेडा कलाकार कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆

आहे कलंदर, एक कलाकार

कवी मनस्वी, मनाचा दिलदार

 

नाही जमलं तोलायला कधी

घेतलेलं व्रत चांदीच्या तराजूतून

शब्द, सूर, रंग, इतकंच काय

माणसाचं आयुष्य देखील मापायचं असतं

सोन्याच्या मापाने

कधी उमगलंच नाही मला

 

श्रीखंड चाटलं, जामून खाल्ला

भुरके घेतले बासुंदीचे मनसोक्त

अगदी मनमुराद आस्वाद घेतला भेळेचाही

त्यांच्या चवीतच रमून गेलो

पर्वा नव्हती खातोय कसल्या चमच्याने याची

कधी बोट, कधी द्रोण तर कधी पुठ्ठ्याचे तुकडेसुद्धा

 

अन् अचानक अनपेक्षितपणे मिळाला

हातात एक सोन्याचा चमचा

हरखून गेलो, मोहून गेलो

तोंडात घालतांना एकेक घास

काय खातोय जाण नव्हती

सोन्याच्या चमच्यानी खातोय

हीच धुंदी होती

 

धुंदी वाढतच होती

पण पोट भरल्याचं काही जाणवत नव्हतं

का?

लक्षात आलं

तोंडात न श्रीखंड, न बासुंदी, न भेळ

नुसता चमचाच चघळतोय

….. सोन्याचा …..

©️ डाॅ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

आहे कलंदर, एक कलाकार

कवी मनस्वी, मनाचा दिलदार

मी एक कलाकार आहे. कवी आहे. मनाने खूप दिलदार आहे.पण मी कलंदर म्हणा, मनस्वी म्हणा, म्हणजे अगदी बिनधास्त जगणारा, स्वतःच्या आनंदासाठी जगणारा स्वाभिमानी, समाधानी माणूस आहे.

ही कविता प्रथम पुरूषी एकवचनात लिहिली आहे हे याचे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कवी आपले मनोगत सरळपणे, प्रांजळपणे मांडतो.

नाही जमलं तोलायला कधी

घेतलेलं व्रत चांदीच्या तराजूतून

शब्द, सूर, रंग, इतकच काय

माणसाचं आयुष्य देखील मापायचं असतं

सोन्याच्या मापाने

कधी उमगलंच नाही मला

मुक्तछंदातली ही कविता संपूर्णपणे रूपकात्मक आहे. चांदीचा तराजू आणि सोन्याचे माप ही इथे रूपके आहेत. कवी म्हणतो, ” एखादे व्रत घेतल्यासारखे मी माझ्या मनाप्रमाणे जगताना फक्त समाधान मिळविले कोणत्याही गोष्टींपासून तोटा काय आहे फायदा किती आहे याचा कधी विचारच केला नाही. म्हणजे त्या गोष्टींना चांदीच्या तराजूत तोलले नाही. त्यातून मिळालेले समाधान हीच माझी मिळकत आहे.

जग खूप व्यवहारी आहे. लोकांचे यशाचे मापदंड वेगळे आहेत‌. त्यामुळेच साहित्य, संगीत, चित्रकला यासारख्या गोष्टींचेच फक्त नव्हे तर अगदी माणसांचे पण मोजमाप केले जाते, तेही सोन्याच्या मापाने. म्हणजे सगळे काही पैशातच मोजले जाते. हा व्यवहार मला कधी जमलाच नाही, समजलाच नाही. कारण मला पैशांपेक्षा या गोष्टीतून मिळणारे समाधान खूप मोलाचे वाटते.”

कवीच्या या मनस्वी वागण्याने जगाने छांदिष्ट, विक्षिप्त अगदी वेडा अशी विशेषणे त्याला दिली. पण कवीने कधी त्याची फिकीर केली नाही.

श्रीखंड चाटलं, जामून खाल्ला

भुरके घेतले बासुंदीचे मनसोक्त

अगदी मनमुराद आस्वाद घेतला भेळेचाही 

त्यांच्या चवीतच रमून गेलो

पर्वा नव्हती खातोय कसल्या चमच्याने याची

कधी बोट, कधी द्रोण तर कधी पुठ्ठ्याचे

तुकडे सुद्धा

मी प्रत्येक गोष्ट आनंदासाठी, समाधानासाठीच केल्याने अनेक सुखाचे, यशाचे, आनंदाचे चांगले अनुभव घेतले. असे क्षण मनापासून अनुभवले. त्यामध्ये अगदी मनापासून रममाण झालो. यामध्ये मला समाधान मिळवणे हे साध्यच खूप महत्त्वाचे होते. ते मिळवण्यासाठी कोणत्या साधनांचा, कोणत्या गोष्टींचा वापर केला याला माझ्या दृष्टीने फारसे महत्त्व नव्हते.

इथे पक्वान्ने, भेळ, द्रोण, पुठ्ठ्याचा तुकडा ही रूपकेच आहेत. कवीने आपली मनोधारणा जपताना, त्याप्रमाणेच वागताना कधी अगदी श्रीखंड, गुलाबजाम, बासुंदी ही मिष्ठान्ने तर कधी अगदी चटकदार भेळेचाही आस्वाद घेतला. म्हणजे आपल्या जगण्यातून भरपूर आनंद,सुखाचे क्षण, अतीव समाधान मिळवले. त्याच वेळी त्यासाठी काय काय करावे लागले, किती कष्ट करावे लागले, कोणत्या मार्गांचा अवलंब करावा लागला याची कधी पर्वा केली नाही. म्हणजे या पक्वान्नांच्या आस्वादासाठी चमचा, बोट, द्रोण, अगदी पुठ्ठ्याचा तुकडाही कधी वापर करावा लागला तरी त्याची फिकीर केली नाही. फक्त पदार्थांचा आस्वाद घेणे हीच गोष्ट महत्त्वाची होती. त्यामुळे त्यासाठीची साधने गौण मानली.

अन अचानक अनपेक्षितपणे मिळाला

हातात एक सोन्याचा चमचा

हरकून गेलो, मोहून गेलो

तोंडात घालताना एकेक घास

काय खातोय जाण नव्हती

सोन्याच्या चमच्याने खातोय

हीच धुंदी होती

मी आयुष्यात पक्वांन्नांचा आस्वाद मनसोक्तपणे घेतला. तेव्हा ते खायला कोणत्या साधनांचा वापर केला याला फारसे महत्त्व दिले नाही. तर आस्वाद घेणे हेच उद्दिष्ट होते. पण अचानकपणे ध्यानीमनी नसताना मला सोन्याचा चमचा मिळाला. त्यामुळे मी अगदी हरखून गेलो. मती गुंग झाली. त्या नादात आता काय खातोय याचे भानही मला नव्हते. फक्त सोन्याच्या चमच्याने खातोय याचीच धुंदी मला चढली होती.

इथे सोन्याचा चमचा हे खूपच महत्त्वाचे रूपक आहे. ते म्हणजे लक्ष्मीचे वरदान, भरपूर कमावण्याचा मार्ग. हे आजच्या वास्तवाचे, प्रगतीचे रूपक आहे.आजकाल अगदी भरपूर पगाराच्या नोकऱ्या मिळतात. सांपत्तिक स्थिती खूप सुधारते. त्या पैशांचा मोहपाश आवळत जातो. काम-काळ-वेळेचे गणित चुकत जाते. पैसा भरपूर कमावतात. पण त्याचा आस्वाद घ्यायला हाताशी सवड नसते. म्हणजेच हातात सोन्याचा चमचा आहे पण त्याच्या धुंदीपायी आपण काय खातोय हेच समजतही नाही. फक्त खाणे होते अन् अनुभूती शून्य.

धुंदी वाढतच होती

पण पोट भरल्याचं काही जाणवत नव्हतं

का ?

लक्षात आलं

तोंडात न श्रीखंड, न बासुंदी, न भेळ

नुसता चमचा चघळतोय

………सोन्याचा………

ही धुंदी अशी वाढतच होती. पण पोट भरल्याचं मला जाणवत नव्हतं. असं का होतंय ? असा विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की, माझ्या तोंडात ना पक्वान्न आहे ना भेळ. तर मी नुसताच चमचा चघळतोय. तोही सोन्याचा चमचा.

                            इथे कवितेचा क्लायमॅक्स आहे. पैसा मिळवणे आणि पैशाचा मोह, हव्यास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अती पैशाने संवेदना बोथट होतात. एक प्रकारची पैशाची धुंदी मनाला ग्रासून टाकते. त्यामुळे पैशाचा आनंद घेणे, उपभोग घेणे, त्यातून मन:स्वास्थ्य मिळवणे या गोष्टी होतच नाहीत. आपण फक्त त्या पैशाच्या हातातले खेळणे बनून त्याच्या मागे धावत राहतो. म्हणजेच तो सोन्याचा चमचा नुसताच चघळत रहातो आणि पोट काही भरत नाही.

                             या कवितेत कवीने रूपकांचा फार  सुंदर वापर केला आहे. चांदीचा तराजू, सोन्याचे माप, श्रीखंड, जामुन, बासुंदी, भेळ, बोट, द्रोण, पुठ्ठ्याचा तुकडा, सोन्याचा चमचा या रूपकां मधून कवींने आजकालच्या जीवन पद्धतीचे फार अचूक वर्णन केलेले आहे. रूपकांमुळे कमीत कमी शब्दात सखोल वर्णन केले गेलेले आहे. जगण्यासाठी नेमके किती हवे, त्यातून मिळणारे समाधान जपायचे का पैशाची हाव धरून त्यामागे धावायचे आणि मग त्यापायी जगायचेच राहून जाते हे भीषण वास्तव आहे.

                            असे हे एका मनस्वी, कलंदर कलाकाराचे मनोगत सांगताना त्यातून कवीने फार मोठा संदेश दिला आहे. तो म्हणजे पैसा मिळवणे हे जितके महत्त्वाचे आहे त्यापेक्षा त्या पैशाचा  योग्य उपभोग घेणे महत्त्वाचे आहे‌. त्यातून मिळणारे समाधान हे खरे लाखमोलाचे असते. आपल्या कृती-उक्तीतून मिळणारे समाधान हेच आपले खरे वैभव असते हीच गोष्ट कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांच्या ‘वेडा कलाकार ‘या कवितेतून आपल्याला सांगतात.

 

ज्योत्स्ना तानवडे. पुणे

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments