मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विसरु कसा मी गुरुचरणांना… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ विसरु कसा मी गुरुचरणांना… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

नव्हतो मी आस्तिक फार

सदगुरुंनी धरता हात बदलून गेलो चौफेर…

*

मी माझे एवढेचि होते विश्व

व्यापक झाले माझे भाव..

*

नव्हते धन माझ्या गाठी 

मिटली चिंता सदगुरु असता पाठी..

*

मनात नेहमी विचार नकारात्मक 

सहवासे सद्गुरुंच्या येती विचारही सकारात्मक…

*

गुरफटलो मी नात्यागोत्यात

आता हवाहवासा वाटे एकांत…

*

जगलो मी कुटुंबासाठी

वेळ देतो मी आता स्वतः साठी….

*

बदलली मम् दशा अन् दिशाही

आता सदगुरुशिवाय दिसेना मज काही…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 191 ☆ स्वप्नातलं विश्व… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 191 ? 

स्वप्नातलं विश्व… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

तिला बोलावं वाटतं

तिला पहावं वाटतं

तिला छेडावं वाटतं

स्वप्नात कधीतरी.!!

*

तिला ऐकावं वाटतं

तिला भांडावं वाटतं

तिला स्पर्शावं वाटतं

स्वप्नात कधीतरी.!!

*

तिच्यात गुंतावं वाटतं

तिच्यात असावं वाटतं

तिच्यात गुंगावं वाटतं

स्वप्नात कधीतरी.!!

*

तिला अनुभवावं वाटतं

तिला स्नेह द्यावं वाटतं

तिला हसवावं वाटतं

स्वप्नात कधीतरी.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ स्वत्व… – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? काव्यानंद ?

☆ स्वत्व… – सौ राधिका भांडारकर ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

राधिका भांडारकर हे नाव माझ्या मते आपणा सर्वांनाच माहित आहे, कारण त्या स्वतः या अभिव्यक्ती ई दैनिकांसोबत जोडलेल्या आहेत आणि सातत्याने त्यांचे गद्य /पद्य लेखन चालू असते.

रसग्रहणासाठी ही कविता मला खास निवडावीशी वाटली याचे कारण म्हणजे, मनस्पर्शी साहित्य परिवार या समूहातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या एका काव्य स्पर्धेत राधिका ताईंच्या या कवितेला उत्कृष्ट कविता असे मानांकन मिळाले आहे. अभिव्यक्तीनेसुद्धा ही खबर वाचकांपर्यंत पोहोचवली होतीच.

 सर्वप्रथम आपण ही कविता पाहूया.

सौ राधिका भांडारकर

☆  स्वत्व ☆

*

नकोच वाटते मला दया माया

आहेत वाटा कितीतरी अजून

चालेन त्यावर जरी एकटी मी

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

सारे मुखवटे भासतात मजला

का घ्यावे दान मी त्यांच्याकडून?

कशाला व्हावे मिंधे कुणाचे

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

नको लाचारी वा हाजी हाजी

प्रतिमाच माझी ठेवेन टिकवून

मन्यात आहे सळसळता प्रवाह

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

खोट्यापुढे का तुकवायची मान

मुलाम्याला का जायचे मोहून 

स्वत्वचा राखेन प्रश्नाला भिडून

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

आक्रमण माझ्या जर अस्तित्वावरी 

केले कुणी तर त्यांना डावलून

सिद्ध करेन मी माझ्या स्त्रीत्वाला

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

*

ही संपूर्ण कविता वाचल्यावर पटकन आपल्यासमोर उभी राहते ती या कवितेतील मी म्हणजे एक अत्यंत कर्तुत्ववान, करारी, स्वाभिमानी, असत्याची चीड असणारी आणि प्रचंड आत्मविश्वासाने समाजात वावरणारी कणखर निडर अशी स्त्री ! या स्त्रीमध्ये मला माझी आजीच दिसली आणि त्यामुळेच ही कविता मला अत्यंत जवळची वाटली.

नकोच वाटते मला दया माया

आहेत वाटा कितीतरी अजून 

चालेन त्यावरी जरी एकटी मी

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

या पहिल्याच कडव्यात कवितेतील नायिका म्हणते की तिला उगीचच कोणाची दया माया नको आहे. कितीही अडचणींनी तिला व्यापले असले, तिचे रोजचे रस्ते बंद झाले असले तरी आणखी कितीतरी वाटा तिच्यापुढे मोकळ्या आहेत. ती एकटीने त्या वाटांवरून चालण्यास समर्थ आहे. सहानुभूतीची तिला गरज नाही कारण तिचा स्वाभिमान अजूनही जाज्वल्य आहे.

सारे मुखवटे भासतात मजला

का घ्यावे मी दान त्यांच्याकडून

कशाला व्हावे मिंधे कुणाचे

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

तिला आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसे भेटली. अनेकांनी तिला मदतीचे हात देण्याचा प्रयत्न केला, परंतु खरे आणि खोटे चेहरे कसे ओळखावे हा मोठा प्रश्न तिच्यापुढे आहे. ती अत्यंत सतर्क आणि सजग अशी स्त्री आहे. त्यामुळे मुखवट्या मागचा चेहरा तिला दिसत असावा बहुदा. मायावी कांचन- मृगापाठी पळणारी ती स्त्री नाही, आणि म्हणूनच तिच्या आयुष्यात येणारे अनेक जण तिला वरवरचे मुखवटेच वाटतात. तिला असंही वाटतं की स्वतः सक्षम असताना उगीच कुणाचे उपकार घेऊन मिंधे का व्हावे? ती पुढे म्हणते,

नको लाचारी वा हाजी हाजी

प्रतिमाच माझी ठेवेन टिकवून

धमन्यात आहे सळसळता प्रवाह

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

कितीही अडचणी आल्या, संकटांना सामोरे जावे लागले, तरी तिला तिच्या कर्तुत्वाने समाजात मिळविलेली तिची प्रतिमा कायम ठेवायची आहे. यासाठीच तिला कोणाची लाचारी नको, कोणाची हाजी हाजी नको.

खोट्यापुढे का तुकवायची मान

मुलाम्याला का जायचे मोहून

स्वतःच राखेन प्रश्नाला भिडून

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

हे जग, ही माणसं म्हणजे वरवरचा मुलामा आहे. या मुलाम्याला मोहून मी खोट्याची साथ देणार नाही, त्यापुढे माझी मान तुकवणार नाही. स्वत्वाला सांभाळून मी खोटं पितळ उघडं पाडीन. केवढा हा आत्मविश्वास आणि कणखरपणा!

आक्रमण माझ्या जर अस्तित्वावरी

केले कुणी तर त्यांना डावलून

सिद्ध करेन मी माझ्या स्त्रीत्वाला

जाज्वल्य आहे स्वाभिमान अजून

या शेवटच्या कडव्यात ती समाजातील पुरुषांना आव्हान देते की मी स्त्री आहे म्हणून मला कोणी कमी समजू नका. माझ्या अस्तित्वावर जर तुम्ही हल्ला केलात तर याद राखा. मी माझं स्त्रीत्व सिद्ध करेन.

या ठिकाणी मला सीतेच्या अग्नी दिव्याची प्रकर्षाने आठवण आली. आजची स्त्री ही खरंतर कोणत्याही क्षेत्रात तसूभरही मागे नाही. मात्र असे असून सुद्धा कितीतरी निर्भया आपण पाहतोच.

राधिका ताईंची ही कविता अशा विकृतींना शह देणारी आहे. ही कविता वाचताना आपल्याही नसानसातून रक्त खवळते. या मनोविकृतींचा अगदी संताप संताप होतो, हेच या कवितेचे यश आहे.

वीर रसाची एक सकारात्मक दृष्टिकोन असलेली ही कविता आहे.

यात तसे कोणतेही काव्यमय शब्द नाहीत, परंतु साध्या शब्दातूनही अंगार फुलणारे असे हे काव्य आहे.

दिंडी वृत्तातील ही कविता. प्रत्येक चरणात ९+१० अशा मात्रांचे बंधन असूनही चरणातील कोणताही शब्द मात्रा जुळविण्यासाठी वापरला आहे असे मुळीच वाटत नाही

‘धमन्यात आहे सळसळता प्रवाह ‘ – – मात्राबद्ध असूनही किती चपखल बसले आहेत पहा हे शब्द! वृत्तबद्ध काव्य करताना हीच तर कवीची खरी कसोटी आहे. राधिकाताई या कसोटीला पूर्ण उतरल्या आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

त्यांनी अशाच विविध विषयांवर प्रकाश टाकणाऱ्या, आणि समाज प्रबोधन करणाऱ्या कविता लिहाव्या आणि वाचकांचे मनोरंजनही करावे. त्यांच्या पुढील लेखन प्रवासासाठी मी त्यांना सुयश चिंतीते.

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सर… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

☆ सर… ☆ 🖋 मेहबूब जमादार ☆

सर सर सर झडे

रान रानातच झुले 

पंख फुटे पिकांले 

वाऱ्यासंगे पिक डुले

*

सर येई अचानक

अन थांबे आपसुक 

काम मध्ये खोळंबे

उगी जीवा धाकधुक

*

दूर डोंगराशी कसे 

आभाळ पहुडलेले

मग हजारो सरींनी

रान होते उले उले

*

पिक येता रानामंधी 

सारं शिवार फुलतं

पीक आलं कणसात 

रानी गोकुळ नांदतं 

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माऊलीचे मनोगत… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ माऊलीचे मनोगत…  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

(गणपतीला गावाला गेलेले चाकरमानी आता मुंबईला परतू लागल्यानंतर, गावच्या घरात कायम वास्तव्यास असलेल्या माऊलीच्या मनातील विचार, खालील रचनेत मांडायचा प्रयत्न केला आहे !)

दहा दिवसांचा सोहळा 

झाला संपन्न काल परवा,

वाजत गाजत आले बाप्पा

वाजत गाजत गेले गावा !

*

 जातील परत चाकरमानी

 घरी आपल्या मुंबईला,

 येतील पुढल्या वर्षी लवकर

 सारे बाप्पाच्या तयारीला !

*

वेळ होता आरतीची

कानी घुमेल झांजेचा नाद,

गोडधोड प्रसादाचा मिळे 

पुन्हा पुढल्यावर्षी स्वाद !

*

 घर मोठे गजबजलेले

 शांत शांत होईल आता,

 सवय होण्या शांततेची 

 मदत करेल “तो” त्राता !

*

श्रींचे विसर्जन झाले तरी,

याद येईल सुंदर मखराची,

घर करून राहील मनी 

मूर्ती मखरातल्या गणेशाची !

मूर्ती मखरातल्या गणेशाची !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सांग परीक्षा कितीदा घेशील ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ सांग परीक्षा कितीदा घेशील ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

आभाळाला हात जोडूनी

केली होती मीच विनवणी

मशागत करूनी जे पेरले

तव येण्याने येई तरारुनी

*

 उशीर झाला जरी यायला

 धरती मनसोक्त भिजली

 पेरलेल्या सशक्त बीजाला

 पीकरूपाने देई भरूनी

*

 टपोर मोती रास शिवारी

 घरदार सारे हरखून गेले

भरून न्यायचे घरात आता

आभाळ ढगांनी भरून गेले

*

 हात जोडतो पुन्हा आभाळा

 आता मात्र तू पडू नको रे

 घरदार राबले इथे रातदिन

 इतकी परीक्षा पाहू नको रे

*

 पडशील शेतामध्ये जरी तू

 डोळ्यातून नित्य वाहशील

 प्रामाणिक कष्टाची आमची

 सांग परीक्षा कितीदा घेशील

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “तो आणि मी…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “तो आणि मी… ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

तो आणि मी

खूप दिवसांनी

एका निवांत क्षणी

भेट सुंदर घडली….

*

रुसलेली खळी 

खुदकन हसली

गालावरती छान

लाली पसरली….

*

डोळ्यांत पाणी 

ओठांवर गाणी

त्याच्या माझ्या भेटीची

अजब कहाणी….

*

सतत जवळ असूनी 

भेट घडत नाही

तडफड भेटीची

काही केल्या संपत नाही…

*

काढून वेळात वेळ

जमला आज मेळ

संपवून टाकला मग 

लपाछपीचा खेळ…..

*

रोज रोजचे ते

दुरुन पाहणे

होता नजरा नजर

स्वतः स रोखणे….

*

आज मात्र घडले

डोळ्यात पाहणे

खोलवर जाऊन

तळ मनाचा शोधणे….

*

तो आणि मी

उत्सुकता किती

जगाला मात्र तो

दिसतच नाही….

*

सर्वांसोबत असतानाही

मनात तो दडलेला

पण कधीच येतं नाही

जगासमोर भेटीला….

*

प्रेम आमचे एकमेकांवर नितांत

जगाच्या गर्दीत करते आकांत

मोकळ्या क्षणी देतो दृष्टांत

सखा तो माझा नाव त्याचे एकांत….

*

एकटेपणाची नसते भीती

एकांत म्हणजे थोडी शांती 

अखंड असतो तो सोबती

जडावी लागते फक्त त्याच्यावर प्रीती..

💞शब्दकळी विजया 💞 

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काक… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

? कवितेचा उत्सव ?

काक  डॉ.सोनिया कस्तुरे ☆

काव काव करी | एरव्ही कावळा

हाकलती त्याला | सारेजण

आठवतो काक | तिसरे दिवशी 

पितृपक्ष म्हाळ | दोन्ही वेळी

आशा ठेवी कसा | गत प्राण देह ?

पोटभर द्या रे | जीतेपणी

जीतेपणी छळ | द्वेष गोळा करी

मेल्यावर का रे | स्नेह दाटे

तिसरा, तेरावा | श्राद्ध वा तर्पण 

जीभेचे चोचले | गोडधोड 

सोवळे ओवळे | श्राद्ध अंधश्रद्धा 

दवा उपचारा | नड असे

अशी रे कितीशी | कावळ्यांची भूक | 

नासाडी अन्नाची | नको करु

तहानेला पाणी | भूकेलेल्या अन्न

हेची पुण्य कर्म | संतवाणी 

सोना म्हणे मग | मिळे खरी मुक्ती 

थोडेसे चिंतन | विवेकाशी

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆  पितृअष्टक… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

 

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ पितृअष्टक – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला

पुढे वारसा हा सदा वाढविला 

अशा नम्र स्मरतो त्या पितरांना

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || १ ||

*

इथे मान सन्मान सारा मिळाला 

पुढे मार्ग तो सदा दाखविला

कृपा हीच सारी केली तयांना

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || २ ||

*

मिळो सद् गती मज पितरांना

विनती हीच माझी त्रिदेवतांना

कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना 

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ३ ||

*

जोडून कर हे विनती तयांना

अग्नि वरूण वायु आदी देवतांना 

सदा साह्य देवोनी उद्धरी पितरांना

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ४ ||

*

वसुरूद्रदित्य स्वरूप पितरांना

सप्तगोत्रे एकोत्तरशतादी कुलांना 

मुक्तीमार्ग द्यावा उद्धरून त्यांना

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ५ ||

*

करूनी सिध्दता भोजनाची तयांना

पक्वान्ने आवडीनें बनवून नाना

सदा तृप्ती होवो जोडी करांना

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ६ ||

*

मनोभावे पुजूनी तिला, यवाने

विप्रास देऊन दक्षिणा त्वरेने 

आशिष द्याहो आम्हा सकलांना

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ७ ||

*

सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा 

न्यून काही राहाता माफी करा ना 

गोड मानुनी घ्यावे सेवा व्रतांना 

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ८ ||

कवी : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काजवे… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ काजवे ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

काळोखाला हळूवार उजळत

पथदर्शक ठरणारा

काजव्यांचा स्वयंप्रकाशित थवा

आता सक्रिय झाला आहे.

 

तोच दाखवील आता समाजाला 

पानथळ आणि गर्द हिरव्या झाडीन बहरलेलं नवं नंदनवन,

भविष्यातल्या चिरस्थायी वास्तव्यासाठीच…….

 

तिथं आपण सारेच 

एक जथा करून 

घाम गाळून राबत जगायला

कसलीच नसणार आहे आडकाठी 

 

लागणार नाहीत कुणाच्या 

भ्रष्टाचारी कुबड्या आधारासाठी 

या काजव्यांना जपू या जीवापाड 

जावूया स्वयंस्फूर्तीने त्यांच्या सोबत.

 

सांगू या त्यांना आपल्या कथा व्यथा

कारण त्यांची निर्मिती केली आहे निसर्गान,

अंधारबन उजळायला माणसांनी निर्माण केलेलं

 

आता आपणच आधारवड ठरूया काजव्यांचे.

त्यांना देऊया संधी मनमुराद चमकायला,

ते सक्षम आहेत त्यांचं आणि आपलंही 

वर्तमान उज्वल करण्यासाठी…..

 

देऊया आझादी त्यांना

त्यांच्या सुसंस्कृत, विशाल, विश्वासू कर्तृत्वा साठी 

पुढे जाऊन तेच ठरतील दीपस्तंभ.

इतकं तर आपण त्यांच्या साठी नक्कीच करू शकतो.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares