मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे ! ☆ प्रस्तुति – सुश्री उषा आपटे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे ! ☆ प्रस्तुति – सुश्री उषा आपटे ☆

एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो 

जो जातो तो सुटतो, परीक्षा असते मागे राहणाऱ्याची

कोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार हे तर भगवंतालाच माहीत

जो मागे रहातो त्याला आठवणी येणं, अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं !

आता प्रश्न असा असतो की ही आसवं हे रडणं थांबवायचं कुणी ?

मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं ?

पाठीवरून हात कुणी फिरवायचा ?

निश्चितपणे ही जबाबदारी असते मुलांची, मुलींची, सुनांची….

 

थोडक्यात काय तर

दोघांपैकी एकजण गेल्यानंतर

मुलामुलींनाच आपल्या आई वडिलांचे आईवडिल होता आलं पाहिजे!

 

लक्षात ठेवा लहानपणी आई वडिलांनी नेहमी अश्रू पुसलेले असतात

आजारपणात अनेक रात्री जागून काढलेल्या असतात

स्वतः उपाशी राहून, काहीबाही खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात

परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतात.

 

म्हणून आता ही आपली जबाबदारी असते, त्यांच्या सारखच निस्वार्थ प्रेम करण्याची

असं झालं तरच ते आणखी जास्त आयुष्य समाधानाने जगू शकतील नाहीतर ” तो माणूस म्हणजे वडील ” किंवा ” ती स्त्री म्हणजे आई ” तुटून जाऊ शकते , कोलमडून पडू शकते !

आणि ही जवाबदारी फक्त मुलं , मुली आणि सुना यांचीच असते असे नाही तर ती जबाबदारी प्रत्येक नातेवाईकाची , परिचिताची , मित्र मैत्रिणींची …….सर्वांची असते !

फक्त छत , जेवणखाणं आणि सुविधा देऊन ही जबाबदारी संपत नाही तर अशा व्यक्तींना आपल्याला वेळ आणि प्रेम द्यावेच लागेल तरंच ही माणसं जगू शकतील !

आयुष्याचा जोडीदार गमावणं म्हणजे नेमकं काय ? हे दुःख शब्दांच्या आणि अश्रूंच्या खूप खूप पलीकडचं असतं ……म्हणून अशा व्यक्तींना समजून घ्या !

केवळ माया , प्रेम आणि आपुलकीचे दोन गोड शब्द एवढीच त्यांची अपेक्षा असते ती जरूर पूर्ण करा त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करा आणि त्यांना वेळ द्या !

उद्या हा प्रसंग प्रत्येकावर येणार आहे याची जाणीव ठेवून नेहमी सर्वांशी प्रेमाने,मायेने आणि आपुलकीने वागा !

 

🙏विचारधारा आवडली तर नक्कीच पुढे पाठवा🙏

प्रस्तुती – सुश्री उषा आपटे

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पुरणपोळी… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? इंद्रधनुष्य ?

☆ पुरणपोळी… ☆ डॉ. ज्योती गोडबोले  ☆ 

शाळेत असताना बाईंनी शिकवलेली वॄत्ते आठवा…..

एखाद्याचा “पुरणपोळी” या विषयावर किती अभ्यास असावा, त्याला “पुरण” किती आवडत असावं, त्याचा उत्तम नमुना ….

 

इंद्रवज्रा:

चाहूल येता मनि श्रावणाची

होळी तथा आणखि वा सणाची

पोळीस लाटा पुरणा भरोनी

वाढा समस्ता अति आग्रहानी ||

 

भुजंगप्रयात:

सवे घेउनी डाळ गूळा समाने

शिजो घालिती दोनही त्या क्रमाने

धरी जातिकोशा वरी घासुनीते

सुगंधा करावे झणी आसमंते ||  (जातिकोश – जायफळ)

 

वसंततिलका

घोटा असे पुरण ते अति आदराने

घ्यावे पिळूनि अवघे मऊ कापडाने

पिळता फुटे गठुळ ते मऊसूत होते

पोळीमधे पसरते सगळीकडे ते ||

 

मालिनी

अतिव मधुर ऐसे पुरण घ्यावे कराते

हळू हळू वळू गोळे पारिला सारणाते

कणिक मळूनी घ्यावी सैलशी गोजिरी ती

कडक नच करावी राहुद्या तैलवंती

 

मंदाक्रांता:

घ्यावी पारी करतळ स्थळी अल्प लावोन पीठी

ठेवा गोळी अतिव कुतुके सारणाची मधे ती

बांधा चंबू दुमडुनि करे सारणा कैद ठेवा

पाटा ठायी पसरूनि पिठा लाटण्या सिद्ध ठेवा ||

 

पृथ्वी

करे धरुन चेंडुला अधिक दाब द्यावा बळे

पटा धरुन लाटण्या सुकर होतसे आगळे

समान फिरवा रुळा पसरि चर्पटी सुस्थळे

असे न करता पहा पुरण बाहरी ओघळे ||

 

शार्दूल विक्रिडित:

हाताने उचला झणि प्रतल ते गुंडाळुनी लाटण्या

उत्कालू हलके तसे उलटता खर्पूस ही भाजण्या

वाफा येत जशा उमाळत सवे सूवासही दर्वळे

नाका गंध मिळे सवेच उदरी क्षूधा त्वरे उत्फळे……!!

 

सर्व  मित्रं ,मैत्रिणींना होळीच्या खूप खूप शुभेच्छा! 🔥 होळी रे होळी पुरणाची पोळी😊

 

©️ डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ !!  समिधा  !! ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ !!  समिधा  !! ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

साधनाताई आमटे

‘समिधा’ सेवायज्ञातील

आत्मचरित्रातून सांगती

व्रत आनंदवनातील ||

 

दोघे मिळून जपतात

सप्तपदीची वचने

घननिबिड अरण्यात

एकसाथ एकदिलाने ||

 

खुरटलेल्या तनामना

घातली मायेची फुंकर

वठलेल्या देहावरती

फुटले आशेचे अंकुर ||

 

या सेवा यज्ञातील पुज्य

एक ज्वलंत समिधा त्या

या थोर तपश्चर्येतील

पुण्यश्लोक ‘साधना’ त्या ||

 

या करूणामयी प्रेमळ

मुरलीधराची धून  त्या

या घनदाट अरण्यातील

आश्वासक कोवळे ऊन त्या ||

 

त्याग प्रेम सेवेची त्या

साक्षात सजीव मूर्ती

या त्यांच्या वाटचालीतून

मिळो आम्हाला स्फूर्ती ||

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे #75 ☆ प्रभात… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 75 ? 

☆ प्रभात… ☆

प्रभात…

सकाळ झाली

प्रभात…

पाखरे घरट्यातून

पहा उडाली.

प्रभात…

चंद्राने रजा घेतली,

सूर्य किरणे   प्रसवली.

प्रभात…

मंदिरी घंटानाद, मंजुळ स्वर आरती

पुजाऱ्याने पहा गायिली.

प्रभात…

गरम चहा पिऊन, तब्येत खुश झाली,

पुन्हा नवी पर्वणी मिळाली.

प्रभात…

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 4 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 4 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

७.

माझ्या गीतानं सर्व अलंकार उतरवलेत

सुशोभित वस्त्रांचा अभिमान त्याला उरला नाही

 

आपल्या मीलनात त्याचा अडथळाच आहे.

त्यांच्या किणकिणाटात

आपल्या कानगोष्टी बुडून जातील

 

केवळ तुझ्या दर्शनानेच माझ्या

कवित्वाचा अहंकार गळून गेला आहे.

हे कविश्रेष्ठा, मी तुझ्या पायाशी आलो आहे.

 

या बांबूच्या बासरीप्रमाणं माझं जीवन

साधं, सरळ बनवू दे.

आता तुझ्या स्वर्गीय संगीतातच

ते भरुन जाऊ दे.

 

८.

ज्याच्या अंगाखांद्यावर राजपुत्राप्रमाणं

उंची वस्त्रं घातली आहेत,

ज्याची मान रत्नजडित दागिन्यांनी

जखडली आहे,

त्या बालकाच्या खेळातला

आनंद हिरावला जातो.

त्याचं प्रत्येक पाऊल त्याच्या

कपड्यात अडकून पडतं.

 

धुळीनं ती राजवस्त्रं मिळतील,

त्यांना डाग पडतील,

या भयानं ते बालक जगापासून दूर राहतं.

त्याला हालचालीची पण भिती वाटते.

धरणीमातेच्या जीवनदायी धुळीपासून कप्पाबंद

करणारे आणि अंगाला जखडून ठेवणारे

हे अलंकार, हे माते, निरुपयोगी आहेत कारण,

ते साधारण मानवी जीवन यात्रेच्या प्रवेशद्वारातून

जायचा हक्क हिरावून घेतात.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चकवा… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ चकवा… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

लिहिता लिहिता लेखणी थांबते

भूतकाळाच्या आठवणीवर मोहोर उमटते

 

मनाच्या कप्प्यात दडलेल्या आठवणी

बाहेर येतात बघता बघता हरखून जाते

 

हिरव्यागच्च झाडीतून दिसतो एक पांढरा ठिपका

तो असतो एक चकवा

 

त्यात मला हरवायचं नसतं

नकळतपणे एकाकी चालायचं असतं

 

वादळवा-याशी अखंड तोंड

देत जायचं असतं

 

आठवणींच्या कड्यावरून स्वतःला

झोकून द्यायचं असतं

 

निसर्गाने शिकविले की

वनवास कपाळी आला तरी

 

मानानं जगायचं असतं

त्यागाची महती गायची असते

 

तो एक चकवा असतो

त्यातूनही सहीसलामत सुटायचं असतं.. !!

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ग्रहांकीत प्रेम… ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ग्रहांकीत प्रेम… ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

पाडगावकरांची माफी मागून सादर करतोय

 ‘ग्रहांकीत प्रेम ‘ 📝❣️

 

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

तुमच्या आमच्या पत्रिकेत अगदी सेम नसतं

 

काय म्हणता?

या ओळी चिल्लर वाटतात?

काव्याच्या दृष्टीने अगदी थिल्लर वाटतात?

 

असल्या तर असू दे

फसल्या तर फसु दे

तरीसुद्धा 

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

तुमच्या आमच्या पत्रिकेत अगदी सेम नसतं 💕

 

पंचमातील शुक्राकडून 

प्रेम करता येतं

सप्तमातील ‘राहू’ कडून

आंतरजातीय होता येतं

घरचा विरोध पत्करून

गुरुजींना धरता येतं

‘गुण-मिलन’ न करता ही 3️⃣6️⃣

पळून जाता येतं 

 

म्हणूनच म्हणतो, –

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

तुमच्या आमच्या पत्रिकेत अगदी सेम नसतं 💞

 

जसं डोक्यात राग घातलेल्या ‘मेषेच’ असतं

तसंच डंख मारणाऱ्या ‘ वृश्चिकेचं ‘ असतं

या राशी आपल्या मानणा-या मंगळालाही 

प्रेमाचं मर्म चांगलच माहित असतं 

 

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

तुमच्या आमच्या पत्रिकेत अगदी सेम नसतं 💕

 

नटण्या मुरणा-या ‘ वृषभेला ‘

समतोल ‘तुळेची ‘ साथ असते

राशी स्वामी ‘शुक्राचे’ मात्र

‘शनिशी ‘ अधेमधे नाते तुटते

‘प्रजापती’ ची उलटी भूमिका

पालकांना अधून मधून डसत असते 

( जरा बघता का हो पत्रिका म्हणत

ज्योतिषाकडे त्यांची विनंती असते) 

त्यांनाही परत तेच सांगतो…

 

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

तुमच्या आमच्या पत्रिकेत अगदी सेम नसतं ❤‍🔥

 

असाच एक जण चक्क मला म्हणाला,

आम्ही कधी पत्रिकेच्या 

मागे लागलो नाही

दोन मुलं झाली तरी

त्यांचीही पत्रिका काढली नाही

 

आमचं काही नडलं का?

पत्रिकेशिवाय अडलं का?

 

त्याला वाटलं मला पटलं!

तेंव्हा मी इतकचं म्हणलं 

 

कर्म कर्म कर्म म्हणजे कर्म असतं

ते ही सगळ्यांच्या पत्रिकेत सेम नसतं 💘

 

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हिरवी सजली पायवट… ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? हिरवी सजली पायवट… ! ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆ 

वाढता तलखी मध्यांन्हीला

आले कल्पतरु मदतीला,

सावली धरून वाटेवरी

स्वागत तुमचे करण्याला !

हिरवी सजली पायवट

जाई सरळ सागरतीरी,

रमत गमत जा टोकाला

शोभा अनुपम दिसे न्यारी !

छायाचित्र – दीपक मोदगी, ठाणे.

© श्री प्रमोद वामन वर्तक

२३-०२-२०२२

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वरलता पुन्हा बहरावी… ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वरलता पुन्हा बहरावी… ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

आज हिरमुसला वसंत

उरी तयाच्या बोचरी खंत..१

 

गानकोकिळा अबोल झाली

सुरमयी जादू हरपली..२

 

विसर पडला मोगऱ्याला

राजी न पाकळी फुलायला..३

 

स्वरसम्राज्ञी गानकोकिळा

वेड लावी जीवा गोड गळा..४

 

स्वर जादुई मंतरलेले

अवीट गोडीने भारलेले..५

 

सप्तसूर ते अजरामर

सदा फुलता गुलमोहर..६

 

झाले  साजरे सुखाचे क्षण

कातरवेळी हलके मन..७

 

सूर जणू शारदेची वीणा

धून बासरीची छेडी कान्हा..८

 

सांज सकाळ फुलून आली

सुरांची मैफिल बहरली..९

 

आठवतात सुरेल गाणी

रुंजी घाली मनी आठवणी..१०

 

दीदींच्या स्वरांनी जाग यावी

स्वरमोहिनी अवतरावी..११

 

स्वरलता पुन्हा बहरावी

ईश्वरा मागणी स्वीकारावी..१२

 

©  सौ. स्वाती रामचंद्र कोरे

भिवघाट.तालुका, खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 95 – संवेदना ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 95 – संवेदना ☆

स्पंदनाने जागवली

संवेदना ही मनाची।

रास जणू जमलेली

जीवघेण्या वेदनांची।।धृ।।

 

व्यथा बालमनाची ही

कथा सांगे मजुरीची ।

मृत्यू दारी कुपोषित।

झुंज देई जीवनाची।

 

शिक्षणाच्या बाजारात

पैशाची हो चाले बोली।

पारडे हे गुणांचे हो

नेहमीच कसे खाली।

 

गर्भातच खुडलेल्या

नसे गणती कळ्यांना।

व्यापारात विवाहाच्या

सूरी लागेते गळ्यांना।

 

बेकारीच्या चरख्यात

आज हरे तरूणाई ।

ऐन उमेदीत कुणी

फासावर का जाई।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares