मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ #119 – विजय साहित्य – स्री म्हणजे खेळणे नव्हे…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 119 – विजय साहित्य ?

☆ स्री म्हणजे खेळणे नव्हे…!  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कठपुतळीच्या सवे

नाच नाच नाचविले.

रीतीरिवाजाच्या पोटी

नारीलाच नागवले.

 

जन्म द्याया हवी नारी

नारी शय्या सोबतीला .

छळ करण्याचा चळ

आला कधी संगतीला.

 

कारे तुझ्या अर्धांगीला

दिली जागा वहाणेची

जाग आली पुरूषाला

छेड काढता मातेची.

 

देह नारीचा भोगाया

नरा कारे चटावला

बळी बहिणीचा जाता

मग का रे पस्तावला ?

 

छळवाद अमर्याद

किती भोगायचे भोग.

वास्तल्याच्या कातड्याला

वासनेचा महारोग.

 

नारीच्याच वेदनेने

जन्म झाला पुरूषाचा .

किती सोसायचा सांग

माज त्याच्या पौरूषाचा.

 

सळसळे रक्तातून

माय भगीनीचा पान्हा

सांगा कुठे झोपलाय

कुण्या यशोदेचा कान्हा?

 

नको समजू स्त्रियांना

कुण्या हातचे खेळणे.

तिची हारजीत  आहे

तुझ्या अस्तित्वाचे देणे. . . !

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्दांच्या गावात… ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

? कवितेचा उत्सव  ?

☆ शब्दांच्या गावात… ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

कधी वाटे मजला की

आपण शब्द बनावे

 

या ओठातून त्या ओठी

अलगद गिरकत जावे 

 

कधी शिरावे निलआभाळी

पाऊसगाणे छेडित जावे

 

उडूनी जावे विहंगदेशी

कोकिळकंठी मधुर स्वरावे

 

हळूच उतरूनी नदीकिनारी

लाटांवरी झुलताना गावे

 

प्रकाशवाटा जिथ सांजवती

कातरसूर मारवा बनावे

 

अलवार शिरावे कवीच्या चित्ती

कविता होऊन बरसून जावे

 

असे होऊनी शब्दरुपापरी

शब्दांच्या गावात फिरावे

 

अर्थ निराळा शब्द शब्द जरी

गुपित मनीचे कविता व्हावे

 

जात पंथ ना धर्म तरीही

शब्दांचे या गीत बनावे

 

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वासंतिक मास… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ वासंतिक मास… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

(अष्टाक्षरी)

वासंतिक मास आला

सृष्टी संपन्न जाहली

प्रतिपदा शुभ दिन

गुढ्या तोरणे सजली॥१॥

 

गुढी पाडवा म्हणती

सीता राम आले घरा

अंगणात रंगावली

होतो आनंद साजरा ॥२॥

 

मांगल्याची गुढी उभी

बांधुनिया वस्त्र जरी

साखरेची शोभे माळ

लांब अशा काठीवरी ॥३॥

 

वाद्ये मंगल वाजती

वर्षारंभ मराठ्यांचा

सुमुहूर्त शुभकार्या

घास श्रीखंड पुरीचा ॥४॥

 

नव वर्षाची प्रतिज्ञा

करू आपण सर्वांनी

नको राग नको द्वेष

प्रेमे राहू उल्हासानी ॥५॥

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #107 – पाऊस…!  ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 107 – पाऊस…! 

तुझ्या माझ्यातला पाऊस

आता पहिल्यासारखा

राहिला नाही..

तुझ्या सोबत जसा

पावसात भिजायचो ना

तसं पावसात भिजण होत नाही

आता फक्त मी पाऊस

नजरेत साठवतो…

आणि तो ही

तुझी आठवण आली की

आपसुकच गालावर ओघळतो..

तुझं ही काहीसं

असंच होत असेल

खात्री आहे मला

तुझ्याही गालावर नकळत

का होईना

पाऊस ओघळत असेल…!

 

© सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माझिया माहेरा जा ! … कवी राजा बढे  ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ माझिया माहेरा जा ! … कवी राजा बढे  ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे 

माझिया माहेरा जा !

माझिया माहेरा जा,  रे पाखरा,

माझिया माहेरा जा !

 

देतें तुझ्या सोबतीला, आतुरलें माझें मन

वाट दाखवाया नीट, माझी वेडी आठवण

मायेची माउली, सांजेची साउली माझा ग भाईराजा !

 

माझ्या रे भावाची ऊंच हवेली

वहिनी माझी नवीनवेली

भोळ्या रे सांबाची भोळी गिरिजा !

 

अंगणात पारिजात, तिथं घ्याहो घ्या विसावा

दरवळे बाई गंध, चोहिंकडे गावोगावा

हळूच उतरा खाली, फुलं नाजुक मोलाची

माझ्या माय माऊलीच्या काळजाच्या कीं तोलाचीं

‘तुझी ग साळुंकी, आहे बाई सुखी’

सांगा पाखरांनो, तिचिये कानी

एवढा निरोप माझा !

 

गीत — राजा बढे

संगीत — पु. ल. देशपांडे

स्वर — ज्योत्स्ना भोळे

संकलक — ज्योत्स्ना तानवडे. पुणे

 

☆ रसग्रहण ☆ ” माझिया माहेरा जा ” कवी — राजा बढे ☆

श्री. राजा बढे हे संपादक, चित्रपट अभिनेते, गद्यलेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार आणि गायक असले तरी त्यांची खरी ओळख कवी आणि गीतकार अशीच होती.

अतिशय भावमधुर, नाजूक, हळव्या भावनांची अप्रतिम भावगीते लिहिणारे ते कोमलवृत्तीचे प्रतिभासंपन्न कवी होते. संस्कृत काव्य आणि उर्दू शायरीचाही त्यांचा खूप अभ्यास होता. त्यांची भावगीते प्रचंड लोकप्रिय झाली होती.

चांदणे शिंपीत जाशी, हसतेस अशी का मनी, दे मला गे चंद्रिके, त्या चित्त चोरट्याला, कशी ही लाज गडे, कळीदार कपुरी पान, कशी रे तुला भेटू, जय जय महाराष्ट्र माझा, दार उघड बये आता दार उघड अशी एकाहून एक अप्रतिम गीते लिहिणाऱ्या राजा बढे यांचे असेच एक सर्वांग सुंदर गीत म्हणजे ” माझिया माहेरा जा ! “

‘माहेर’ हा समस्त स्त्री वर्गाच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. मग स्त्रीचे भावविश्व व्यापणाऱ्या माहेर या विषयावर अतिशय संवेदनशील शब्दप्रभू राजा बढे लिहीत असतील तर काय ? एक अतिशय हळुवार, भावसंपन्न काव्य जन्माला आले, ” माझिया माहेरा जा पाखरा “

पूर्वीच्या काळी सतत माहेरी जाणे सहज शक्य व्हायचं नाही. संपर्काची तर कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. पण मन मात्र सतत माहेरच्या विचारात गुंतलेले असायचे. मग हेच विचार जात्यावरील ओव्यातून, उखाण्यातून, नाहीतर अशा एखाद्या गाण्यातून व्यक्त व्हायचे. म्हणून ते गाणाऱ्याच्या, ऐकणाराच्या दोघांच्याही अंतर्मनाला स्पर्शुन जायचे.  त्यामुळेच या गीतात एक सासुरवाशीण एका पाखराला आर्जवी स्वरात विनंती करते ती आपल्या मनाला भिडते.

आईला कुणा हाती निरोप पाठवावा हे न समजून ती पाखरापाशी आपले मन मोकळे करते. त्याच्याबरोबर निरोप पाठवायची ही कल्पनाच मनोहरी आहे. माहेरच्या विचाराने अधीर, उत्सुक बनलेले तिचे मन प्रत्येक शब्दातून प्रत्ययाला येते. आपले माहेर ओळखण्याच्या खाणाखुणा ती सांगते. सोबतीला आपले आतुरलेले मन आणि वाटाडी म्हणून आपली आठवण देते. भावाची हवेली उंच आहे. ती सापडणे अगदी सहजशक्य आहे. नवीन लग्न झालेली नवीनवेली वहिनी घरी आहे. ही वहिनी म्हणजे भोळ्या शंकराची जणू भोळी गिरिजा अशीच आहे. घराबद्दल सांगताना घरातल्यांच्या बद्दलच्या आपल्या भावना पण ती पाखराला सांगून जाते. अंगणातल्या पारिजातकाचा दरवळ म्हणजे मायेच्या माहेराची चहूकडे पसरलेली कीर्ती. माय माऊलीचे काळीज या फुलांच्या इतकेच नाजूक. किती छान उपमा आहेत ना ! ‘तुझी लेक सासरी सुखात आहे’ एवढाच निरोप आईला सांगायची तिची विनंती आहे. एवढ्या निरोपानेही दोघीजणी आपापल्या ठिकाणी बिनघोर होणार आहेत. हे अंतर्मनाचे संकेत आहेत.

‘माहेर’ या भावनेची पकड संपूर्ण गीतात कुठेच सैल होत नाही. यातूनच हे उत्तम काव्य साकार  होते. पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न संगीतकाराने या गीताला अप्रतिम चालीत बद्ध केले आहे. योग्य तिथे येणारा ताल आणि गायनाचा ठेहराव शब्दांची परिणामकारकता वाढवितो. ‘हळुच उतरा खाली’ या ओळीच्या सुरावटीने अगदी पायर्‍या खाली उतरल्या सारखे वाटते. संपूर्ण गाणे एक हळुवार अप्रतिम सुंदर अनुभूती देऊन जाते.

राजा बढे यांचे भावपूर्ण शब्द, पु.ल.देशपांडे यांची भावानुकूल स्वररचना आणि मन आकर्षित करणारी ज्योत्स्ना भोळे यांची गायन शैली यांच्यामुळे हे भावगीत प्रचंड लोकप्रिय झाले होते. या त्रिवेणी संगमा मुळे ही भावकविता आजही तितकीच मनाला जाऊन भिडते.

आज सतत माहेरी जाता येते, हाताशी संपर्काची विविध माध्यमे उपलब्ध असण्याच्या काळात या गीताची अपूर्वाई तितकी जाणवणार नाही. पण त्या काळाची कल्पना करून गीत ऐकले तर निश्चित ती अनुभूती जाणवेल.

माझे वडील हार्मोनियमवर हे गाणे वाजवत आणि आई अतिशय सुंदर ते म्हणत असे. त्यामुळे माझ्यासाठी तर ही मर्मबंधाची ठेव आहे.

कवी. राजा बढे यांच्या या सुंदर रचनेला सलाम आणि त्यांना विनम्र अभिवादन.

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रेशीम गुंता… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ रेशीम गुंता…    सुश्री नीलांबरी शिर्के ☆ 

माझे अंबर मला मिळाले

आनंदाने पंख पसरले

जोर देऊनी उडू पाहता

आपोआपच पंख मिटले

 

पंखानाही कळून आले

फक्त तुम्हा आभाळ मिळाले

कर्तव्याच्या रेशमी दोरांनी

पाय तुझे गुंतुन बसलेले

 

डोळेभरुनी आभाळ पहा तू

आपुलकीने प्रेमही कर तू

मुक्तपणाने विहरायाचे तव

ह्रदयामाजी स्वप्न दडव तू

 

पायामधला  रेशीम गुंता

नखानखांशी गुंतत जातो

खंत तयाची करता करता

हताशतेला   भक्कम करतो

 

म्हणून आपण आपुलकीने

जे आहे ते मान्य। करावे

नियती निर्मित रेशीम गुंत्याशी

स्नेहभारले  प्रेम करावे

 

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 126 ☆ आभाळ भरून आलं होतं… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 126 ?

☆ आभाळ भरून आलं होतं… ☆

सिंगापूर मधली रविवारची

सुंदर सकाळ….

आम्ही बाहेर जायच्या तयारीत,

आभाळ भरून आलं होत,

मनात आलं—

कसं पडायचं बाहेर?

सूनबाई म्हणाली,

इथे रोज पाऊस पडतो….

छत्र्या घेऊन बाहेर पडायचं!

खिडकीच्या काचेतून मस्त कोसळणारा पर्जन्यराजा पहात,

वाफाळणारा चहा घेत असतानाच,

विजाही कडाडू लागल्या!

चहा संपला आणि….

“झाले मोकळे आकाश” …..

मी गुणगुणले !

बस स्टॉपवर आल्यावर

नातू म्हणाला,

“आपण एकही छत्री घेतली नाहीए आज”

बस…ट्रेन..मधून पोहचलो…

 सनटेक सिटी….मरीना बे …

च्या स्वप्ननगरीत  !!

हा रविवार खूपच अविस्मरणीय…

एक-दोन चुकार थेंब पावसाचे…

अल्हाददायक!

सारंच वातावरण रमणीय!!!

टेस्टी फूड….कोल्ड कॉफी…

डोळ्याचं पारणं फेडणारी भव्यता!!

कुटुंबासमवेतची,

ही मस्त भटकंती !

नातवाला म्हटलं हा स्वर्गच आहे रे…

मानवनिर्मित,

तो हसला आणि म्हणाला,

“काश्मिर निसर्गनिर्मित स्वर्ग आहे तसं का ?”

उदंड फोटो काढले या स्वर्गीय सौदर्याचे….

आणि आठवलं,लहानपणी तंबूत पाहिलेल्या सिनेमातलं गाणं,

“जीवनमे एक बार आना सिंगापूर” ।

खरंच अनुभवला,

मस्त मस्त माहौल….

सुंदर संध्याकाळी—-

मन भरून आलं होतं,

सकाळच्या पावसासारखं  !!!

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नववर्षाला नवा प्रणाम ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ नववर्षाला नवा प्रणाम ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

युगे युगे क्रीडेत रंगले

अवकाशाचे असीम अंगण

तेजोनिधिभोवती फिरतसे

अचूक ग्रहगोलांचे रिंगण.

 

धूमकेतुही येती जाती

नक्षत्रांच्या रचना सुंदर

उल्का तेजे क्षणिक तळपती

खेळ चालला असा निरंतर

 

मंथर गती या वसुंधरेची

साथीला छोटासा चंदर

प्रदक्षिणेची होता पूर्ती

म्हणतो आले नव संवत्सर

 

दिन रजनीचे येणे जाणे

सहा ऋतूंचे सहा तराणे

गतीमान त्या हिंदोळ्यावर

तुमचे अमुचे झुलते जगणे.

 

आदि अंत ना या खेळाला

वर्ष संपता स्वल्पविराम

वळणावर या थांबून करुया

नववर्षाला नवा प्रणाम !

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुखी संसाराचं रहस्य ☆ श्री सोमनाथ साखरे

? कवितेचा उत्सव ?

☆  सुखी संसाराचं रहस्य ☆ श्री सोमनाथ साखरे ☆

सहज सुचलं म्हणून…   सुखी संसाराचं रहस्य

 

बायको बोलत असताना

आपण शांत रहावं,

वादळ शांत झाल्यावर

निःशब्द गाणं गावं

 

नैराश्यात वादळ मग

स्वायंपाक घरात जातं

भांड्यांच्या गळ्यातून

कर्कश गाणं येतं

 

आपण आपलं तेव्हा

कर्णबधिर व्हायचं

वर्तमानपत्रा आडून

गुपचूप फक्त बघायचं

 

अनुभवाने सर्वकाही

अंगवळणी पडेल

संसार होईल सुखाचा

सारं शुभ घडेल.

 

© श्री सोमनाथ साखरे

नाशिक

मोबा.९८९०७९०९३३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 132 ☆ संवादी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 132 ?

☆ संवादी ☆

हिंदू नववर्ष आज उठे करोनाची बंदी

एकमेकांना वाटुया सातारी हे पेढे कंदी

 

किती गोड ही बातमी झाले सारेच आनंदी

तुम्हा घरी शिरा पुरी आम्ही करतो बासुंदी

 

हार गाठीच्यासोबत कडूनिंबाचीही फांदी

वर गडवा उलटा साडी नेसवली खादी

 

दोन वर्षे बाजाराने होती भोगलेली मंदी

नव्यावर्षाने मिळेल आता व्यापाराला संधी

 

मुख बांधून फिरलो झालो होतो जायबंदी

राग रंग हा कळला आता होउया संवादी

 

गुढ्या तोरणं उभारू लागू आरोग्याच्या नादी

नवा संकल्प करुया योगासने करू आधी

 

एका रोगाने माजली जगामध्ये आनागोंदी

नको पुन्हा असा रोग ज्याने झाली बरबादी

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares