मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सायंकाळची शोभा….. ☆ स्व. भास्कर रामचंद्र तांबे

स्व. भास्कर रामचंद्र तांबे

भा. रा. तांबे

? कवितेचा उत्सव ?

☆ सायंकाळची   शोभा …. ☆ स्व. भास्कर रामचंद्र तांबे  ☆ 

पिवळे तांबुस ऊन कोवळे पसरे चौफेर

ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर.

 

झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी 

कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी!

 

हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर साळीचे

झोके घेते कसे चहुकडे हिरवे गालीचे!

 

सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे

रंग किती वर त-हेत-हेचे इंद्रधनुष्याचे.

 

अशी अचल फुलपाखरे फुले साळीस जणु फुलती

साळींवर झोपती जणु का पाळण्यात झुलती.

 

झुळकन् सुळकन् इकडून तिकडे किती दुसरी उडती

हिरे, माणके, पांचू फुटुनी पंखचि गरगरती !

 

पहा पांखरे चरोनि होती झाडावर गोळा

कुठे बुडाला पलीकडिल तो सोन्याचा गोळा.

 

स्व. भास्कर रामचंद्र तांबे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 107 ☆ डोळे ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 107 ?

☆ डोळे ☆

(जुन्या डायरीतून….)

काहूर भावनांचे

      अंतरात दाटलेले

           समजून घे जरा तू

       तुज सांगतील डोळे!

 

ही मूक वेदना

       हृदयास जाळणारी

             अंगार ना विझे हा

          व्यर्थ सांडतील डोळे!

 

गेले कुठून कोठे

    माझे मला कळेना

         गर्दीत माणसांच्या

      मज शोधतील डोळे!

 

सांभाळले प्रीतीला

         होऊन मुक्त राधा

             हे वेड भाळण्याचे

         बघ लावतील डोळे!

 

सर्वस्व वाहिले अन्

          झाले तुझी सख्या रे

                सारे कलंक काळे

          मूक शोषतील डोळे!

 

दृष्टावतील कोणी

         पडतील घाव देही

              अनुरागी तृप्त झाले

          मिटतील शांत डोळे!

© प्रभा सोनवणे

२९ नोव्हेंबर १९९८

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पहिली कोजागिरी ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? कवितेचा उत्सव ?

☆ पहिली कोजागिरी ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆ 

आभाळावरी भाळुनी

शुभ्र चांदणे आले

तुझी प्रीत स्मरुनी

मी बावरी झाले

 

चंद्र होता लाल

पुनवेचा तो गोल

नाही नाही म्हणताही

ढळला माझा तोल

 

होते तुझ्या बाहुत

उरी ती धडधड

तन शहारले होते

चांदण्यात लखलख

 

वेडी झाली होती

वर तारका आरास

तुझ्या संग न्हाऊन

मुक्त चंद्र प्रकाश

 

चंद्राची ती लाली

उतरली ती गाली

भान हरपले मी

त्या क्षितिजासाठी

 

सारे आकाश तारे

उजळुनी ते सजले 

तू आणि मी

एकच तेंव्हा झाले

 

आठवण आहे त्या

पुनवेची उरी

नाही विसरली ती

पहिली कोजागिरी

 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

मो. नं. ९८९२९५७००५. 

ठाणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नव्या वाटा…. ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ नव्या वाटा…. ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

 

गळूनी गेली सारी पाने

वृक्ष उभा ताठ

शिशीर संपूनी वसंत येईल

पुन्हा दिमाखात

 

बहर संपला

वादळ आले

तरूवर सारे

उन्मळूनी पडले

 

सोबतीला एकाकी जीवन

लेकुरवाळी मुले

इंद्रधनूचे सप्तरंग जणू

अंगण आनंदाने फुले

 

उदास स्वर ते माररव्याचे

परि वसंतात राग बहार

सुख दुःखाच्या झुल्यावरती

मिळे जगण्याला आधार

 

खेळ संपला जुना

चालणे नवीन वाटेवरी

अखेरच्या श्वासापर्यंत

जगायचे भूवरी

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्द… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ शब्द… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

शब्द बंबाळ जग आहे हे,

  शब्दांचा बडिवार तो किती!

कधी गोड तर कधी कडू,

  सारी शब्दांचीच दिठी !

 

कधी शब्द माणिक मोती,

  कधी मुक्ताफळे उधळती !

ओथंबून   मायेपोटी ,

  नाटकी पणी ही कधी येती!

 

शब्द सखा बनून  येती,

  ओढ जीवाला लावती!

शब्द भाव भरून येती,

  काळजाला जाऊन भिडती!

 

कधी शब्द नि:शब्द बनून येती,

  अन्  अंतरात  घुसती !

खोल रुतून बाणा परी ,

  जखमी करून जाती!

© सौ. उज्वला सहस्रबुद्धे

वारजे, पुणे (महाराष्ट्र)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 109 ☆ कातरवेळी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 109 ☆

☆ कातरवेळी ☆

तिला पाहुनी सुचती मजला सुंदर ओळी

तिच्या मनीचे भाव मांडतो देते टाळी

 

तिची भेट तर ठरली होते कातरवेळी

इतक्या साध्या स्वप्नांचीही व्हावी होळी

 

बाप करारी वाटत होता तो तर कोळी

मला पाहते नजर तिची तर ही मासोळी

 

मीही होतो शेर तसा तर एकेकाळी

बाप तिचा हा पाहुन झाली माझी शेळी

 

माय तिची तर खूपच होती साधीभोळी

हात तिचा तर सदैव होता अमुच्या भाळी

 

नशीब होते बागेचा मी झालो माळी

आज फुलांनी भरली होती माझी झोळी

 

अंगणातली सारवलेली जमीन काळी

त्या भूमीवर प्रिया काढते मग रांगोळी

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तिकडे कविता अंकुरते…. ☆ श्री अरूण म्हात्रे

? कवितेचा उत्सव ?

☆ तिकडे कविता अंकुरते…. ☆ श्री अरूण म्हात्रे ☆

पाऊलवाटेवरती त्याच्या कविता बांधित घर जाते

जिकडे पडते नजर तयाची तिकडे कविता अंकुरते

 

उरात घेऊन जाळ लोटला काळ तरीही तो चाले

त्या ज्वालांचे सत्वच त्याच्या शब्दांमध्ये पाझरते

 

सहस्त्र लाटा किती वादळे निमूट त्याने पांघरली

जशी उतरता भरती हळवी ओल तीरावर वावरते

 

निर्जन रस्त्यावरती त्याने झाड व्यथेचे वाढविले

तिथली माती सुजाण इतकी पायदळीही मोहरते

 

कवितेचे शतदीप लावले स्वतःस त्याने पाजळुनी

अशा कविच्या कवेत येण्या दूर चांदणी हुरहुरते

 

© श्री अरूण म्हात्रे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस म्हणाला…! ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस म्हणाला…! ☆ श्रीशैल चौगुले ☆

म्हणून तर पाऊस म्हणाला…

आज तुझ्या दारात पडतो आहे

आभाळाच्या काळजातून मुक्त

होऊन

तुझ्या देहावर कोसळतो आहे.

हे वसुंधरे,

किती पर्व, किती युगांनी ही निसर्गाची बीजे या मिलनातून

जन्मली हिरवी देवता तुझ्या

ऊदरातून

म्हणून तर पाऊस म्हणाला

या थेंबांच्या आस्तित्वातून व्यक्त

होऊन सांडायच होत मन

क्षणभर या वा-यासंगे समुद्र होऊन

जगताना मांडायचं होतं गा-हाणं

या पृथ्वीच्या जीवन-मृत्यूतं मलाही घडायचं होतं

म्हणून तर पाऊस म्हणाला,

हे धरतीराणी

तुझ्याचसाठी मेघ होताना

तुझ्याचसाठी मेघ होताना.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 53 ☆ जोडू रेशीम प्रीत धागा ☆ महंत कवी राज शास्त्री

महंत कवी राज शास्त्री

?  साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 53 ? 

☆ जोडू रेशीम प्रीत धागा ☆

(काव्यप्रकार… दश-पदी )

हा जोडू रेशीम प्रीत धागा

नच रोखता कुणाची जागा…०१

 

एकमेका सहाय्यक होऊ

प्रेमाचे मंगल गीत गाऊ…०२

 

इथे सांगा काय ते आपुले

भल्या-भल्यांचे हात टेकले…०३

 

सत्कार्य-सत्कर्म, शुद्ध करा

फुकट लोभ, त्यास आवरा…०४

 

शेवट छान व्हावा आपला

राज हे मनातून वदला…०५

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 18 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 18 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[८९]

‘आम्ही कोण?

आम्ही का?

आम्ही कुठून?’

म्हणत

मला खिजवणारे

हे माझे उदास विचार…

 

[९०]

कातर विचारांनो,

भिऊ नका ना मला

कवी आहे मी.

 

[९१]

राखेच्या लाटांनी

आणि

धुराच्या लोटांनी

पुन्हा पुन्हा बजावलं

धरतीला –

‘आम्ही सख्खे भाऊ

अग्नीनारायणाचे …’

 

[९२]

गजबजून गेलेला

माझा ओसंडता दिवस

त्याच्या ग्ल्ब्ल्यातून

तूच  आणलंस मला 

इथपर्यंत

जिथं माझी

विषण्ण संध्याकाळ

मिनवत राहते

एकटेपणाचं काहूर

पोरक्या प्राणांमधून….

काय अर्थ असतो

या सगळ्याचा?

पाहीन मी वाट

उत्तरासाठी

सोबतीला घेऊन

माझी दीर्घ रात्र

गूढ… शांत… निश्चल…

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print