मराठी साहित्य – काव्यानंद ☆ या झोपडीत माझ्या… कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ☆ रसग्रहण – सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

? काव्यानंद ?

☆ या झोपडीत माझ्या… कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ☆ रसग्रहण – सौ. सुचित्रा पवार

☆ या झोपडीत माझ्या… कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ☆

राजास जी महाली

   सौख्ये कधी मिळाली

   ती सर्व प्राप्त झाली

   या झोपडीत माझ्या….

 

भूमीवरी पडावे

ताऱ्यांकडे पहावे

प्रभूनाम नित्य गावे

या झोपडीत माझ्या..

 

पहारे आणि तिजोऱ्या

त्यातून होती चोऱ्या

दारास नाही दोऱ्या

या झोपडीत माझ्या

 

  जाता तया महाला

    ‘मज्जाव’शब्द आला

    भीती न यावयाला

     या झोपडीत माझ्या.

 

   महाली मऊ बिछाने

   कंदील श्यामदाने

    आम्हा जमीन माने

     या झोपडीत माझ्या..

 

   येता तरी सुखे या

    जाता तरी सुखे जा

    कोणावरी ना बोजा

     या झोपडीत माझ्या

 

  पाहून सौख्य माझे

       देवेन्द्र तो ही लाजे

        शांती सदा विराजे

         या झोपडीत माझ्या..

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

 – कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

☆ या झोपडीत माझ्या… कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ☆ रसग्रहण – सौ. सुचित्रा पवार

झोपडी म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती झोपडपट्टी,झोपड्यांची गळकी वस्ती,दुःख, दैन्य,दारिद्र्य,बकाल वस्ती आणि तिथली व्यसनाधीनता,अस्वच्छता,

गुन्हेगारी.थोडक्यात जिवंतपणी नरक.

मोठमोठ्या शहरात अशाच प्रकारचे चित्र असते.आणि बऱ्याचदा झोपड्या हटत नाहीत त्याला झोपडपट्टीचे एक राजकारण असते.बऱ्याचदा बेरकी माणसांच्या  परिस्थितीची ती एक ढाल असते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी  त्यांच्या एका कवितेत वर्णन केलेली झोपडी मात्र खूपच आगळी वेगळी आहे.प्राप्त परिस्थितीत सुखी राहण्याचा जणू आनंदी मंत्र!

  राजास जी महाली

   सौख्ये कधी मिळाली

   ती सर्व प्राप्त झाली

   या झोपडीत माझ्या….

राजाचा महालसुद्धा माझ्या झोपडीपुढं फिका आहे कारण त्याला इतका खर्च करून बांधलेल्या महालात जी सुख समृद्धी लाभल्या ती माझ्या चंद्रमौळी झोपडीमध्ये काहीच खर्च न करता अनुभवतो आहे.कोणती सौख्ये कवी अनुभवत आहे?

भूमीवरी पडावे

ताऱ्यांकडे पहावे

प्रभूनाम नित्य गावे

या झोपडीत माझ्या..

साधी गोष्ट आहे!तुम्ही सहजच माझ्या झोपडीतल्या जमिनिवर झोपलात तर आकाशात नजर जाईल आणि असंख्य लुकलुकत्या चांदण्या तुमचं मन वेधून घेतील.ते चांदण्याचे आभाळ दिलासा देत असतानाच मुखात मात्र प्रभूचे नाव नित्य असते  कारण त्याचीच तर सर्व कृपा आहे.हे चांदण्यांचे आकाश,ही हवा, हा स्वच्छ सूर्यप्रकाश त्याचीच तर रूपे आहेत!त्याच्याच कृपेने आपण हे सारे अनुभवतो आणि श्वासदेखील घेतो.या माझ्या झोपडीत फक्त इतकेच करायचेआहे.

महालात हे काहीच तुम्हाला अनुभवता येणार नाही.

पहारे आणि तिजोऱ्या

त्यातून होती चोऱ्या

दारास नाही दोऱ्या

या झोपडीत माझ्या

महालात रात्रंदिवस पहारेकरी दाराशी असतात, गस्त घालतात.संपत्तीचे रक्षण करण्यासाठी मोठमोठ्या अवजड तिजोऱ्या असतात तरीही तिथं चोरी होतेच पण झोपडीत माझ्या ही भीती मुळीच नाही.माझ्या झोपडीला दरवाजा नाही,पहारेकरी नाहीत की लुटारूनी चोरून नेण्यासाठी ऐहिक संपत्तीदेखील ;त्यामुळं चोरी होऊच शकत नाही. अष्टौप्रहर माझी झोपडी कुणालाही सामावून घेण्यास सज्ज असते.असे असूनही चोर मात्र कधीच चोरी करत नाहीत.(कारण ऐहिक असते त्यालाच लोक मौल्यवान म्हणतात आणि आत्मिक अदृश्य चिरंतन असते त्याला मात्र सोडून देतात)

      जाता तया महाला

    ‘मज्जाव’शब्द आला

    भीती न यावयाला

     या झोपडीत माझ्या..

महालात तुम्ही सहज जावयाचे म्हणले तर पहारेकरी लगेच अडवतात,आत जायला मज्जाव अर्थात बंदी असते पण इकडं माझ्या झोपडीच्या शब्दकोशात मज्जाव हा शब्दच नाही.ती कुणालाही सहजच आत सामावून घेते.कुठलाही पहारेकरी तुम्हाला दरडावणार नाही की भीतीही घालणार नाही.सहजच कुणीही यावे न माझ्या झोपडीत विसावावे.

       महाली मऊ बिछाने

   कंदील श्यामदाने

    आम्हा जमीन माने

     या झोपडीत माझ्या..

महालात सर्वांना झोपायला मऊ मऊ बिछाने असतात.परांच्या गाद्या,मऊ उश्या डोक्याखाली, पांघरायला ऊबदार पांघरुण असतात.वर छताला छान छान ,आकर्षक झुंबरे,प्रकाशासाठी कंदील- शामदाने लटकवलेली असतात.छान,शांत झोपेसाठी सर्वप्रकारच्या सोयी सुविधा केलेल्या असतात पण तरीही सुखाच्या झोपेची शाश्वती नसते; मात्र आमच्या झोपडीत जमीन अंथरायला, आभाळ पांघरायला असते,जमिनीला पाठ लागताच शांत सुखाची झोप लागते.

      येता तरी सुखे या

    जाता तरी सुखे जा

    कोणावरी ना बोजा

     या झोपडीत माझ्या..

महालात जाताना सर्वसामान्य माणसाला एक अनामिक भीती,दडपण असते.तिथल्या भव्य -दिव्यपणाने उर दडपतो; पण झोपडीत तुम्हाला असे काही वाटणार नाही.माझ्या या झोपडीत प्रत्येकाने कधीही केंव्हाही आनंदाने यावे-जावे,इथं कुठलंच भय नाही की अवघडलेपण वाटणार नाही.

      पाहून सौख्य माझे

       देवेन्द्र तो ही लाजे

        शांती सदा विराजे

         या झोपडीत माझ्या..

असं हे झोपडीतलं वैभव आणि सौख्य पाहून प्रत्यक्षात इंद्राला सुद्धा लाज वाटते,इंद्रसुद्धा माझ्या झोपडीचा आणि तेथील सौख्याचा हेवा करतो,यापेक्षा झोपडीतली महानता मी काय वर्णावी?माझ्या या झोपडीत नेहमीच शांतता वसते.आणि जिथे शांती तिथेच सौख्य आणि समाधानही.

अगदी साध्या सोप्या शब्दात तुकडोजी आपल्या झोपडीचे वर्णन करतात.माणसाचे चित्त समाधानी असेल तर त्याला कोणत्याही भौतिक ऐश्वर्याची गरज नसते हेच यातून सूचित होते.माणूस भौतिक सुखांच्या मागे लागतो आणि चिरंतन,शाश्वत मनाची शांती हरवून बसतो.कितीही सुख मिळाले तरी त्याचे मन भरत नाही आणि हाव सुटत राहते.यातच त्याचे मानसिक स्वास्थ्य हरवते आणि सुखाची निद्रा देखील.

एखाद्या शेतकऱ्याच्या बांधावरील खोपसुद्धा अशीच असते ना?खोपीत सुद्धा हेच सुख असते.

काय नसते या झोपडीत?

समोरील शेत शिवार,नाना पाखरांचे नाना आवाज,भिरभिरता मोकळा वारा,काम करून भूक लागल्यावर खाल्लेली अमृताहून रुचकर खर्डा भाकरी महालातील पंच पक्वान्नाला मागे सारते.

सुखाचे परिमाण आपल्या मनातच असते.म्हणूनच महालात सर्व सुखे असून तिथली माणसे सुखी असतीलच असे नाही आणि झोपडीत काही नाही म्हणून तिथली माणसे दुःखी असतीलच असेही नाही.

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – आत गोडवा वर काटेरी – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?आत गोडवा वर काटेरी – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

वरवरचे हे रूप तुझे रे

ऊगा कशाला असे दावशी ?

बाहेरून तू ओबडधोबड

पोटी तुझ्या रे अमृत  राशी

काही चांगले हवे असे तर

कष्टायाची करा तयारी

हेच सांगते रूप तुझे रे

आत गोडवा वर काटेरी

मिळवायास्तव गरे आतले

हवीच असते शक्ति युक्ति

सहज लाभे तुझा गोडवा

प्रयत्नांवर असावी भक्ति

चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आवेग… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ आवेग… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

कृष्णमेघ पावसाचे,

नभात जमले होते.

इतिवृत्त पावसाचे,

वार्‍यास ज्ञात होते.

बेबनाव पावसाचे,

पूर्वनियोजित होते.

अंदाज पावसाचे,

माझेच चुकले होते.

वाटेत एकटा मी,

अनभिज्ञ पुरता होतो.

गनिम पावसाने मज,

चाैफेर घेरले होते.

या थरारनाट्यांनी,

मी थिजून गेलो होतो.

आंधळ्या आवेगांनी,

चिंबचिंब भिजलो होतो.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 137 – हरवलेले माणूसपण ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 137 – हरवलेले माणूसपण ☆

समृध्दीने नटलेल घर पाहून हरवले देहभान ।

शोधून सापडेना कुठेही हरवलेले माणूसपण ।।धृ।।

 

कुत्र्या पासून सावध राहा भलीमोठी पाटी।

भारतीय स्वागताची आस ठरली खोटी।

शहानिशा करून सारी आत घेई वॉचमन ।।१।।

 

झगमगाट पाहून सारा पडले मोठे कोडे ।

सोडायचे कुठे राव हे तुटलेले जोडे ।

ओशाळल्या मनाने कोपऱ्यात ठेऊन ।।२।।

 

सोफा टीव्ही एसी सारा चकचकीतच मामला।

पाण्यासाठी जीव मात्र वाट पाहून दमला ।

नोकराने आणले पाणी भागली शेवटी तहान ।।३।।

 

भव्य प्रासादातील तीन जीव पाहून ।

श्रीमंतीच्या कोंदणाने गेलो पुरता हेलावून ।

चहावरच निघालो अखेर रामराम ठोकून।।४।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काव्य -घरटे ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  कवितेचा उत्सव  ?

☆ काव्य -घरटे ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

काव्य घरटे बांधत होते,

 मनी शब्दांचे पक्षी!

घेऊन आले विचार काड्या,

 बांधून केली नक्षी !

 

भावनांचा थवा आला,

 जणू रेशीम कापूस शेवरी!

गुंफण त्याची काव्यात करता,

 घरटे बनते सुबक परी!

 

एखादी सुगरण असते ,

 करते ती कशिदाकारी!

बनतो कवितेचा खोपा सुंदर,

 देखणा दिसतो बाहेरी !

 

एक असते चिमणीवाणी,

 घरटे बनते तिचेही भारी !

कुवत तिची जरी इवली इवली,

 शब्दघरटे बनवीते न्यारी !

 

शब्दपक्षी हे भिरभिर फिरती,

 प्रत्येकाची अलग तऱ्हा!

कधी भरारी गरुडासम घेती!

  तर कधी बिलगती धरा!

 

शब्द पक्षांची जैसी कुवत,

 तसेच बनते शब्दांचे घरटे!

शब्द घरटे ते बांधत जाता,

 अधिक अधिकच सुंदर बनते!

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #159 ☆ ईश वंदन…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 159 – विजय साहित्य ?

☆ ईश वंदन…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(वसंत पंचमी.. देवी शारदा जन्मोत्सव निमित्ताने काव्य रचना…)

विनम्र भावे, माझे वंदन

आशिष द्यावा गौरी नंदन………||धृ.||

 

विद्या दायिनी, देवी शारदा,

रहा पाठिशी, सदा सर्वदा

कला गुणांचे, भाळी चंदन……||१||

 

अभिजात ते,विणा वादन

मती गतीचे, तूं मानांकन

जन्मदिनी या, जागे स्पंदन……||२||

 

शब्द फुलांची, ओंजळ हाती

नव निर्मिती, जुळवी नाती

काव्य कलेचे,व्हावे मंथन……||३||

 

ऋतू वसंती, सजे पंचमी

अक्षर लेणे, तुझ्या संगमी

प्रतिभा शक्ती, होई गुंजन…..||४||

 

माघ पंचमी, मिळो चेतना

कृपा प्रसादी, तुझी प्रेरणा

वाणी, वैखरी, हे संकीर्तन……||५||

© कविराज विजय यशवंत सातपुते

२६/१/२०२३

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १६ (इंद्र सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १६ (इंद्र सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १६ (इंद्र सूक्त )

ऋषी – मेधातिथि कण्व: देवता – इंद्र 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील सोळाव्या  सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी इंद्रदेवतेला आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त इंद्रसूक्त म्हणून ज्ञात आहे. 

मराठी भावानुवाद : 

आ त्वा॑ वहन्तु॒ हर॑यो॒ वृष॑णं॒ सोम॑पीतये । इंद्र॑ त्वा॒ सूर॑चक्षसः ॥ १ ॥

पर्जन्याची तूच देवता वृष्टी तू करीशी 

सोमरसाला तुला अर्पितो स्विकारुनिया घेशी

करीत दर्शन सूर्याचे यावे या यज्ञासी

हरिद्वर्ण तव अश्व रथातून घेउनी यावे तुजसी ||१||

इ॒मा धा॒ना घृ॑त॒स्नुवो॒ हरी॑ इ॒होप॑ वक्षतः । इंद्रं॑ सु॒खत॑मे॒ रथे॑ ॥ २ ॥

ज्या इंद्राचे हिरवे वारू घेऊन येत तयांना

हविर्भाग हे सिद्ध ठेविले प्रसन्न करण्या त्यांना 

घृतात ओथंबुनिया धानी तुम्हास्तवे सज्ज

स्वीकारुनिया झणी तयांना राख अमुची लाज ||२||

इंद्रं॑ प्रा॒तर्ह॑वामह॒ इंद्रं॑ प्रय॒त्यध्व॒रे । इंद्रं॒ सोम॑स्य पी॒तये॑ ॥ ३ ॥

प्रभात समयी मंजुळ गातो इंद्रस्तोत्र आम्ही

यज्ञाचा आरंभ होतसे यावे झडकरी तुम्ही

आवाहन हे आर्त होऊनी सुरेन्द्रास करितो

सोमरसाच्या सेवनासि देवेद्रा पाचारितो ||३||

उप॑ नः सु॒तमा ग॑हि॒ हरि॑भिरिंद्र के॒शिभिः॑ । सु॒ते हि त्वा॒ हवा॑महे ॥ ४ ॥

सोमरसाला सिद्ध करोनी पाचारण तुम्हा 

आगमनाची तुमच्या आहे आर्त प्रतिक्षा आम्हा  

रथयानाला अश्व जोडूनी रथावरी आरुढ व्हा

होऊनिया साक्षात प्राशुनी घ्या या सोमरसाला ||४||

सेमं न॒ स्तोम॒मा ग॒ह्युपे॒दं सव॑नं सु॒तम् । गौ॒रो न तृ॑षि॒तः पि॑ब ॥ ५ ॥

भक्तीभावाने आळवितो तुम्हास ही प्रार्थना

ऐकुनिया तिज अपुली मानुन आम्हा धन्य करा ना

यज्ञी येउन सोमरसाला घावे  स्वीकारुनी

मृगासारखे तृषार्त होउनि घ्यावे त्या प्राशुनी ||५||

इ॒मे सोमा॑स॒ इन्द॑वः सु॒तासः॒ अधि॑ ब॒र्हिषि॑ । ताँ इ॑न्द्र॒ सह॑से पिब ॥ ६ ॥

सोमरसाचा मान राखण्या दर्भ इथे मांडिले 

सोमरसाने भरुनी कलशा दर्भावर ठेविले

काये तुमच्या आगमनाचे होत फार क्लेश 

परिहारार्थ त्याच श्रमांच्या प्राशी सोमरस ||६|| 

अ॒यं ते॒ स्तोमो॑ अग्रि॒यो हृ॑दि॒स्पृग॑स्तु॒ शंत॑मः । अथा॒ सोमं॑ सु॒तं पि॑ब ॥ ७ ॥

अती मधुर ही स्तवने गातो तुमच्या आवाहना

अंतर्यामी भावुक होवो तुमच्या अंतःकरणा

प्रसन्न व्हावे अशा स्तुतीने देई या दाना

सोमरसाला प्राशुन घेण्या यावे या यज्ञा ||७||

विश्व॒मित्सव॑नं सु॒तमिंद्रो॒ मदा॑य गच्छति । वृ॒त्र॒हा सोम॑पीतये ॥ ८ ॥

सोमरसाचे प्राशन करण्या साऱ्या यज्ञात

रिपुसंहारी इंद्र जातसे मोठ्या मोदात

सोमरसाची अवीट गोडी देवेन्द्रा आहे

यज्ञामध्ये भक्तगणांच्या कल्याणा पाहे ||८||

सेमं नः॒ काम॒मा पृ॑ण॒ गोभि॒रश्वैः॑ शतक्रतो । स्तवा॑म त्वा स्वा॒ध्यः ॥ ९ ॥

समर्थ हे इंद्रा आम्हाला देई रे वैभव

धेनु अश्व अन् धनास देण्या आम्हासी तू पाव 

अमुच्या साऱ्या आकाक्षांना स्वरूप मूर्त दे

तुझ्याच स्तवनासाठी बुद्धी जागृत राहू दे ||९||  

(हे सूक्त व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.) 

https://youtu.be/KjGbB_bQX7k

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 16 :: ऋग्वेद मंडळ १ सूक्त १६

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ महा पंचाक्षरी  द्रौपदीची थाळी… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ महा पंचाक्षरी  द्रौपदीची थाळी… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

थंडीत भाज्या

मिळती ताज्या

खाव्यात रोज

म्हणती आज्या…. १

 

दिल्ली मटार

हिरवागार

करंज्या करा

चटकदार…. २

 

वांगं भरीत

झणझणीत

घाला फोडणी

चरचरीत…. ३

 

खीर , हलवा

घालून खवा

काजू पिस्त्याने

मस्त सजवा…. ४

 

सार नी कढी

सांबार वडी

उंधियोमध्ये

वालपापडी…. ५

 

वरण भात

लिंबाची साथ

तूप हवेच

सढळ हात… ६

 

सलाड ,फळ

कधी उसळ

कधी झटका

शेव मिसळ… ७

 

मेथी लसूणी

डाळ घालूनी

पालक, चुका

ही बहुगुणी… ८

 

शिळी वा ताजी

अळूची भाजी

मसालेभात

मारतो बाजी… ९

 

चिंचेचे सार

सूप प्रकार

सोलकढीही

पाचक फार… १०

 

गाजर, मुळे

हादगा फुले

शेवगा शेंगा

खा कंदमुळे… ११

 

शेपू दोडका

घेवडा मका

खा,नाक मुळी

मुरडू नका…. १२

 

कडू कारले

करा आपले

आरोग्यासाठी

आहे चांगले… १३

 

माठ, चवळी

खावी टाकळी

केळफूल नि

घोळू,तांदळी…. १४

 

मूग कढण

भेंडी, सुरण

चिंच खोबरे

लावा वाटण…. १५

 

सुरळी वड्या

शुभ्र पापड्या

पापडां साथ

देती बापड्या… १६

 

बीट काकड्या

करा पचड्या

वाटली डाळ

कोबीच्या वड्या… १७

 

पोळी आमटी

लोणी दामटी

खर्ड्याची वर

थोडी चिमटी… १८

 

चटकदार

मसालेदार

जेवण कसे

खुमासदार… १९

 

कांदा, बटाटा

आलं टमाटा

व्यंजनी मोठा

असतो वाटा…. २०

 

मिर्ची लसूण

घाला वाटून

खा बिनधास्त

पण जपून…. २१

 

कढीपत्त्याची

नि पुदिन्याची

चटणी खावी

शेंगदाण्याची…. २२

 

चणा, वाटाणा

बेताने हाणा

गुळासवे खा

दाणा, फुटाणा…. २३

 

पॅटिस, वडे

भारी आवडे

कांद्याची भजी

फक्कड गडे… २४

 

तूप भिजली

स्वाद भरली

पुरणपोळी

पक्वान्नातली…. २५

 

लोणचे फोड

जिला न तोड

सुग्रास घासां

शोभेशी जोड… २६

 

भाजी नि पाव

कधी पुलाव

भाज्या घालून

खा चारीठाव…. २७

 

कधी मखाणे

पनीर खाणे

मश्रूम पण

योग्य प्रमाणे…. २८

 

मनमुराद

घ्यावा आस्वाद

मठ्ठा जिलबी

केशर स्वाद… २९

 

श्रीखंड पुरी

जाम जरुरी

बासुंदी विना

थाळी अपुरी… ३०

 

मांडी ठोकून

बसा वाकून

जेवणे शांत

मौन राखून…३१

 

देवाचा वास

वेळेला घास

समजावे ही

सुखाची रास…. ३२

 

बसे पंगत

येई रंगत

लज्जतदार

खाशी संगत…. ३३

 

थंडीत मस्त

रहावे स्वस्थ

हे खवैय्यांनो

तुम्ही समस्त…. ३४

 

नियम स्वस्त

व्यायाम सक्त

वर्ज आळस

राहणे व्यस्त…. ३५

 

थोडे जेवण

थोडे लवण

तब्येतीसाठी

हवे स्मरण.. ३६

 

भागते भूक

हेच ते सुख

खाताना रहा

हसत मुख…. ३७

 

बांधावा चंग

व्यायामा संग

सांभाळा सारे

खाण्याचे ढंग…..३८

 

साहित्य कृती

ह्या पाककृती

जपूया सारे

खाद्य संस्कृती…३९

 

गृहिणी भाळी

तिन्ही त्रिकाळी

अन्नपूर्णेची

द्रौपदी थाळी… ४०

 

मुखी सकळ

मिळो कवळ

हीच प्रार्थना

हरिजवळ…. ४१         

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माऊली… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

सौ.मंजुषा सुधीर आफळे

 कवितेचा उत्सव ?

☆ माऊली… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

भिंतीवरले ताटाळे

अर्धचंद्र आकाराचे

पितळेचे रोवलेले

साक्षीदार स्वातंत्र्याचे

 

देशभक्त अन्नपूर्णा

रात्रंदिवस राबते

कार्यकर्त्यांचे जेवण

न थकता बनवते

 

“वंदे मातरम्” शब्द

मनामध्ये ठसविला

प्रेरणा, शक्ती देणारा

कार्यभाग निवडला.

 

माऊली न मागे कधी

देशकार्य प्रथम ते

स्वतःच्या या कृतीतून

आदर्श पुढे ठेवते

 

घडल्या पिढ्या अशाच

सुसंस्कारी सहजच

म्हणूनी, विश्वात शोभे

“भारत देश” एकच

 

पळीभर रक्त रोज

स्वातंत्र्याच्या कामी आले

सांडशीने निखाऱ्यास

युक्तीने हुलकावले

 

सत्पात्री अमृत दान

अनेक वीर जेवले

गाजविता पराक्रम

ताटाळे सोन्याचे झाले.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #145 ☆ आठवांच्या आसवांनी…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 145 ☆ आठवांच्या आसवांनी…! ☆ श्री सुजित कदम ☆

आभाळालाही असते तुझ्या पदराची ओढ

जरी असला अंथाग तरी ममता अजोड..!

 

ओठी जेव्हा पहिलाच शब्द आई अंकुरतो

आईलाही तेव्हा तिचा शब्द आई आठवतो..!

 

आई शब्दात असतो माया ममतेचा झरा

आई शब्दानेच होतो वेदनेचा अंत सारा..!

 

जात्यावरची ही ओवी त्यात नशीबाच गाणं

काळ्या आईच्या कुशीत आई पेरते बियाण..!

 

आई स्नेहाची साऊली घाली मायेची पाखर

तिच्या साऊलीत मिळे रोज प्रेमाची भाकर..!

 

देवळात गेल्यावर लीन जाहलो भक्तीने

असो आई माझी सुखी देवा मागतो मागणे..!

 

आई विना आयुष्यची झाली आहे परवड

संकटाची रोजनिशी रोज नवी धडपड..!

 

तुच माझी जिजाविठा आहे तुलाच कदर

आठवाच्या आसवांनी तुझा भिजला पदर…!

 

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares