मनुष्याच्या जडणघडणीत अनेक गोष्टी आपली महत्वाची भूमिका बजावत असतात. यातील अनेक गोष्टींचा प्रभाव मनुष्याच्या मनावर दीर्घकाळ राहू शकतो, त्याला प्रभावित करू शकतो, नव्हे करतोच करतो…..
प्रत्येक मनुष्याचे आयुष्य, जीवन म्हणजे कंगोऱ्यांची वाटी म्हणता येईल. कंगोऱ्याची आत गेलेली बाजू जर दुःख मानली तर बाहेर आलेली बाजू सुख मानावी लागेल. प्रत्येकाच्या वाटीला असे कंगोरे कमीअधिक प्रमाणात असतात.
मनुष्याला प्रभावित करणारे अनेक पैलू आहेत. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू हा त्यातील एक महत्वाचा मानला जातो.
एक मनुष्य होता. त्याला दोन मुले होती. दोघेही दहावीला होते. एक मुलगा नापास झाला तर दुसरा शाळेत पहिला आला. पत्रकारांनी त्या दोघांची मुलाखत घेतली तेव्हा दोघांनी एकच उत्तर दिले की माझे बाबा वारले म्हणून माझा शाळेत पहिला क्रमांक आला आणि माझे बाबा वारले म्हणून मी नापास झालो. घटना एकच आहे पण दोघांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्याच्या त्याच्या जीवनात वेगवेगळा प्रभाव दर्शवित असतो….
एकाने असे ठरवले असेल की आता माझे बाबा नाहीत, मी चांगला अभ्यास करून चांगले गुण मिळवून दाखवले तर माझ्या बाबांना आनंद होऊ शकेल, त्याने तसा प्रयत्न केला आणि भगवंताने त्याला त्यात यश दिले…
आणि दुसऱ्याने…?
दृष्टीपेक्षा दृष्टिकोन महत्वाचा. दृष्टी तर प्रत्येकाला असते पण जो मनुष्य विवेकाने आपला दृष्टिकोन बदलतो, तो यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते….. !
जगात अनेक घटना घडत असतात, कधी त्यातील एक घटना आपल्या आयुष्यात घडते, ती आपली परीक्षा असते…. ! परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करायचा की घाबरून परीक्षा न देण्याचा निर्णय घ्यायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे ?
☆ काय असते गिरनार वारी…? लेखक : श्रीकांत कापसे पाटील ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆
नेहमी गिरनारला जायचे म्हटले की काही जण म्हणतात, ” काय वेड लागले की काय? दर 2 महिने झाले की गिरनारला पळतोस!”
हो. आमच्या भाषेत वेडच ते आणि आम्ही तेच वेडे आहोत. नाहीतर तुम्ही शहाणे तिथे जालच कशाला? बरोबर ना? (कारण… वेळेला वेडेच उपयोगी येतात आणि शहाणे पळून जातात.)
काय मिळतं तिथे सारखं जाऊन?
काम धंदे सोडून पळतात तिकडे ते…?
असं काय आहे गिरनार?
अहो, काम धंदे सोडून कोणी जात नाही तर आमच्या गिरनारीसाठी वेळ काढून जातो, दर्शनासाठी… जिथे प्रत्येक पायरी चढताना चांगली, वाईट केलेली कर्मं आठवतात ना ते आहे गिरनार…
तिथे गेल्यावर आठवतं व चांगली बुद्धी जागृत होते, ते आहे गिरनार…
जीवनातली सगळी दुःख विसरून, रोजची घरातली, बाहेरची कटकट विसरून पाच दिवस जो सुखाने जगतो ना, जिथे सुख, समाधान मिळतं ना, ते आहे गिरनार…
भक्तीमय वातावरणात राहून जो आनंद मिळतो ना, ते आहे गिरनार…
श्रीमंत, गरीब जिथे एकत्र येतात ना, ते आहे गिरनार…
सगळ्या सुख दुःखांची जिथे बेरीज वजाबाकी करूनसुद्धा शिल्लक काही राहत नसेल, तरी सुध्दा काहीतरी मिळतं, ते आहे गिरनार….
आरोग्याच्या तक्रारी, नोकरीत बढती, व्यवसायात वाढ, मुलांची शिक्षणं, लग्न, घरदार सगळं काही मनासारखे होते जिथे गेल्यावर, ते म्हणजे गिरनार….
ढोपरं दुखतात, दम लागतो, तरीसुद्धा एक एक पायरी चढून जाण्याची इच्छाशक्ती जिथे वाढते, ते म्हणजे गिरनार…
जिथे भल्या भल्यांची परीक्षा घेतली जाते, अहंकार जिथे गळून पडतो, व मग अक्कल ठिकाणावर येते, अपराधाची केल्याची जिथे जाणीव होते, ते गिरनार…
असे हे आमच्या गिरनारी महाराजांचे गिरनार… आणि तुम्ही म्हणता काय मिळतं तिथे सारखं सारखं जाऊन? गिरनार…
माहेर वाशीण जशी माहेराला येते व तिला जो आनंद होतो ना आल्यावर व निघताना पाय निघत नाही, तसंच आमचं हे गिरनार…
हे सर्व वाचून ज्याचे मन म्हणते बरोबर आहे, व ज्याच्या डोळ्यात आपसूक पाणी येते ना, ते हे गिरनार…
तर असंआहे गिरनार…
जय गिरनारी
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त
लेखक: श्री. श्रीकांत कापसे पाटील
प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
कोयनानगर – ज्या भूमीवर माझं बालपण, शालेय शिक्षण झालं ती स्वप्ननगरी १९६७ मध्ये ११ डिसेंबर या दिवशी भूमिगत (!) झाली. त्याच्या आठवणी अजूनही मधून मधून डोके वर काढतात आणि कधी कधी काव्यरूपातही उमटतात.
सर्वांना भरभरुन चैतन्य व उत्साह देतोस अगदी हातचे काही न राखता…
भरपूर खा… प्या… व्यायाम करा असा संदेश घेऊन तू येतोस त्यामुळे दिवाळी नंतर आलेली मरगळ झटकून गृहिणी परत लगबगीने खाद्य पदार्थ करायला लागतात
सुरुवात होते ती डिंकाच्या लाडवाने बाजरीचा भात वांग्याचे भरीत मिरचीचा ठेचा त्याबरोबर गरम गरम भाकरी हुलग्याचे शिंगोळे वेगवेगळ्या चटण्या यामुळे रसना तृप्त होते
हा स्वर्गिय आनंद फक्त तूच देऊ शकतोस
हुरडा पार्टी तर तुझ्या शिवाय होतच नाही आणि पतंगोत्सव तो तुला मानाचा शिरपेच देऊन जातो
रात्री शेकोटीच्या भोवती बसून मारलेल्या गप्पा गाणी यांचा आनंद केवळ अवर्णनीय…
अश्या सर्व उत्साहवर्धक वातावरणातच तुझ्या मुळे दत्तजयंतीच्या निमित्ताने श्री दत्तगुरुंचे कृपाशिर्वाद आम्हाला मिळतात
नाताळ हा सण जायच्या आधी तू आम्हाला तो भेट म्हणून देतोस. तुझ्यावरच्या प्रेमाने आम्ही तो स्वीकारतो आणि सांताक्लाँजच्या प्रेमात पडून नाताळचा आनंद घेतो
तू आम्हाला खूप जवळचा वाटतोस… वर्षभरातील सर्व गुपिते उघड करण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे तू…
वर्षभरातील केलेल्या घटनांची तसेच चुकांची कबुली व नवीन संकल्प तुझ्याच साक्षीने होतात
चांगल्या वाईट गोष्टींचा पाढा तुझ्या समोरच वाचला जातो
पण सर्व माफ करुन नवीन उमेद तूच देतोस. आणि येतो तो तुला निरोप देण्याचा दिवस…
तुझ्या मुळेच आम्हाला नवीन वर्ष चुका सुधारण्याची संधी नवी स्वप्ने साकारण्याची जिद्द मिळते..
आम्ही धूमधडाक्यात तुला निरोप देतो. या कृतज्ञता सोहळ्यात गुंग असतानाच तू हुलकावणी देऊन निघून जातोस… हुरहुर लावून… मन हळवे करुन…
संप्रत्ति – माझा स्वतःचा Milk Products चा व्यवसाय होता. आता बंद केला.
रुची – छंद… वाचन, लेखन, कुकिंग, पर्यटन इत्यादी ..
☆ “अनामिक हुरहुर…” —☆ सौ. प्रतिभा कुळकर्णी☆
वर्षाचा शेवटचा आठवडा हा एक अनामिक हुरहुर घेऊन येतो. गतवर्षीच्या आठवणी आणि येणाऱ्या वर्षाची उत्सुकता…. खरंतर ही हुरहुर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरच असते, नाही का ?
तिचे तारुण्यात पदार्पण.. एक गोड हुरहूर…
नवविवाहिता ते मातृत्व… तिच्या आयुष्याची परिपूर्णता…. अत्यंत आनंदातही एक अनामिक हुरहुर….
आता तिचं तान्हुलं बालवाडीत जातं आणि तिला झालेला आनंद एकीकडे आणि आपलं बोट सोडून गेलेलं बाळ पहाताना हृदयात झालेली कालवाकालव एकीकडे… एक अनामिक हुरहूर!
तेच बाळ मोठं होतं…. त्याला पंख फुटतात आणि आकाशाला गवसणी घालण्यासाठी विश्वविद्यालयीन जगतात भरारी घेतं, त्यावेळेस तिचा आनंद काय वर्णावा!…. तरीही एक अनामिक हुरहूर असतेच.
आता तर तिचे पिल्लू स्वतःच्या पायावर उभे राहिले आहे… एवढेच नव्हे तर त्याने स्वतःबरोबर तिचेही नाव उज्ज्वल केले आहे… आणि आता आयुष्याच्या अगदी महत्त्वाच्या टप्प्यावर आले आहे. मग ती लेक असेल तर परक्याचेच धन…. ह्यापुढे तिचे नावासकट सारे आयुष्यच बदलणार आणि मुलगा असला तरीही त्याची सहचारिणी म्हणून एक नवीन व्यक्तीच आयुष्यात येणार आणि तिच्या घरट्यालाच नवं रूप येणार…. हीही एक अनामिक हुरहुर !
आयुष्याची सांजवेळ आणि तिच्या दुधावरच्या सायीचे आगमन…. आनंद आणि धास्तावलेलं मन……
पण ती आता तृप्त आहे… शांत आहे.
आयुष्याच्या साथीदाराचा हात हातात घेऊन निवांतपणे तिच्या गोकुळात रमली आहे.
मला वाटतं, आयुष्यातील ह्या अनामिक हुरहुरीवर तिने सकारात्मक वृत्तीने आणि स्वकर्तृत्वाने विजय मिळविला आहे.
असेच गतवर्षीच्या सार्या कटू आठवणींना मागे ठेवून नववर्षाला सामोरे जाऊया… एका गोड हुरहरी सह….
माझ्या सगळ्या मित्र -मैत्रिणींना नव वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
☆ प्रवास पुस्तकाचा… सादर नमन… — हिन्दी लेखक : श्री. प्रदीप शर्मा ☆ भावानुवाद – सुश्री प्रभा हर्षे ☆
एखाद्या पुस्तकाचा प्रवास खरंतर तेव्हा सुरू होतो, जेव्हा एखादा वाचक ते पुस्तक वाचायला सुरुवात करतो. या प्रवासाची सुरुवात कुठूनही कशीही होऊ शकते.. कधी ठरवून तर कधी अचानक… कधी स्टडी रूममधून.. कधी बेडरूम मधून.. तर कधी लायब्ररीमधून. इतकंच नाही तर कधी ऑफिसमध्ये
किंवा कॉलेजमध्ये कुणाच्या लक्षात येऊ न देता.. इतरांचा डोळा चुकवून ! नाहीतर मग ट्रेनच्या लांबच्या प्रवासाच्या साथीने…
आणि पुस्तक वाचण्याची प्रत्येकाची पध्दतही अगदी वेगळी असते. काहीजण फक्त पानं चाळून बघतात, काहीजण फक्त काही पाने वरवर वाचून मजकुराचा अंदाज घेतात.. काहीजण ‘फक्त’ ते पूर्ण वाचतात. आणि अगदी मोजकेच वाचक असे असतात की जे पुस्तक अगदी मनापासून.. चवीने परत परत वाचतात.. ते पूर्ण समजेपर्यंत.. मनाचे समाधान होईपर्यंत वाचतात.!
पुस्तकाची मजा कशी घ्यायची हे खरंच वाळवीकडून शिकावं ! काही जण अगदी ‘ पुस्तकातला किडा ‘ म्हणावेत असे असतात, तर काही जण पुस्तकांवर अगदी मनापासून खूप प्रेम करतात … इतकं प्रेम की त्यांची नसलेली.. इतरांकडची पुस्तकेही त्यांना आपलीच वाटतात.. त्यांच्या घरातल्या पुस्तकांना ते वर्तमान पत्राइतकीच किंमत देतात आणि परक्यांच्या पुस्तकांवर मात्र जणू स्वतःचाच हक्क असल्याचे समजतात.
त्यांना दुसऱ्याची पुस्तके हडप करण्याचा जणू छंदच असतो. पुस्तकप्रेमी माणसांना पुस्तक मागायला लाज वाटता कामा नये, असा एक समज आहे. स्वतः विकत घेतलेल्या पुस्तकांना स्वतःची वैयक्तिक लायब्ररी म्हटले जाते.. मग ती पुस्तके कुणी वाचो किंवा न वाचो. पण चांगल्यातली चांगली आणि महागातली महाग पुस्तके स्वतः विकत घेणे हीच खरं म्हणजे सुशिक्षित आणि बुद्धिजीवी माणसाची ओळख ठरते.
एखाद्याने पुस्तक स्वतः खरेदी केलेलं आहे की दुसऱ्या कुणाकडून मागून आणलंय हे ते पुस्तक स्वतः कधीच कुणाला सांगत नाही. त्याच्या मालकाने त्याला कधी हात तरी लावलाय का हेही रहस्य ते बिचारे पुस्तक कधीच कुणाला सांगत नाही. काही बिचारी दुर्दैवी पुस्तके तर कुणी आजवर हातातही घेतलेली नाहीत हे त्यांच्या चिकटलेल्या पानांवरुन समजते. पण असे ‘ कुमारी ’.. ‘ अछूत ’ पुस्तक जेव्हा एखादा सच्चा पुस्तकप्रेमी हातात घेतो तेव्हा ती चिकटलेली पानं फडफडायला लागतात… जणू त्यांचं भाग्य उजळलेलं असतं.
कुठलंही पुस्तक आकाशातून पडावं इतक्या सहजपणे जन्माला येत नाही. प्रत्येक पुस्तकाच्या जन्माची स्वतःची अशी एक वेगळीच… विशेष अशी कथा असते. प्रत्येक पुस्तक ही कुणाची तरी कलाकृती असते … त्याचाही कुणीतरी रचनाकार असतो … निर्माता असतो. त्या रचनेला कुणी लेखक शब्दरूप देतो आणि त्यालाही ‘ सृजनाची प्रक्रिया ‘ असंच म्हटलं जातं. जेव्हा त्याची ती रचना पुस्तकरूपात प्रकाशित होऊन वाचकांपर्यंत पोहोचते तेव्हा लेखकाच्या अनेक वर्षांच्या तपस्येचं ते फळ असतं.
तो लेखकच त्याच्या रचनेला एक नाव देतो. ‘ हा मुलगा कुणाचा आहे ‘ ही ओळख जशी सांगितली जाते, तशीच ओळख त्या पुस्तकाची असते … ‘ ज्याने लिहिले त्याचे पुस्तक ‘. ‘ छान आहे हे पुस्तक – लेखक कोण आहे ?’ असेच विचारले जाते. ते पुस्तक प्रकाशकाचं नसतं … विकत घेणाऱ्याचं नसतं … आणि वाचकालाही ते वारसाहक्काने मिळालेलं नसतं. ते एका लेखकाचं …त्याच्या मेहनतीचं फळ असतं … त्याने कितीतरी वर्षं पाहिलेलं स्वप्न असतं ते.
प्रत्येक पुस्तक एका सूज्ञ वाचकापर्यंत पोहोचावं हाच त्या पुस्तकाचा अंतिम उद्देश असतो. धनवान लोकांच्या अति महागड्या वस्तूंनी गच्च भरलेल्या शेल्फातल्या त्या वस्तूंप्रमाणे, ती पुस्तकेही पुस्तकांच्या दुकानांची.. ग्रंथालयांची किंवा एखादाच्या घरातल्या पुस्तकाच्या कपाटाची केवळ शोभा वाढवण्यासाठी साठवलेली असू नयेत….. लक्ष्मीला कुठे जखडून ठेवलेले असते ते सगळेच जाणतात.
सरस्वतीचं वाहन आहे ‘हंस‘… आणि नीर क्षीर विवेकाचं प्रतीक अशी त्याची ओळख आहे. पुस्तकं म्हणजे ज्ञानाचं भांडार तर आहेच, पण असंख्य गोष्टी स्वतः आपणहून शिकण्यासाठीचा तो सर्वश्रेष्ठ पर्याय आहे हे ध्यानात ठेवायलाच हवे. … सरस्वतीला कधीच कैदेत जखडून ठेऊन चालणार नाही …. त्यामुळे पुस्तकांचा प्रवास अविरत सुरू रहायला हवा.
एक प्रगल्भ वाचकच कुठल्याही चांगल्या पुस्तकाचे ‘ वाहन ‘ होऊ शकतो …. सरस्वतीच्या हंसासारखा ….
हे वीणावादिनी … असा वर दे … वर दे.. !!
मूळ हिंदी लेखक : श्री. प्रदीप शर्मा
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ कसाटा आईस्क्रीम आणि आजी – लेखक : अज्ञात☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆
☆
१९७० ते ७५ च्या दरम्यान लग्नासाठी दिवसभर हॉल बुक करायचे. खास आमंत्रित दुपारी जेवायला आणि आम जनता, बिल्डिंग मधले, ऑफिसवाले संध्याकाळी स्वागत समारंभाला. कसाटा किंवा पांढऱ्या आणि गुलाबी रंगाचं, चौकोनी आकाराच्या स्लाईसचं आईस्क्रीम संध्याकाळी. काही वेळा आमच्या घरी स्वागत समारंभाचे आमंत्रण असायचे. हॉल दादर किंवा गिरगावातला असला तर वडील ऑफिसातून येताना जाऊन यायचे. आम्ही विचारलं की काय होतं पाहुण्यांसाठी तर म्हणायचे कसाटा. पार्ले, सायन, माटुंगा असेल, रविवारी असेल आमंत्रण तर आम्हा भावंडांपैकी एखाद्याला सोबत न्यायचे. घरी आल्यावर तोच संवाद.
तेव्हा आमच्याकडे आमच्या वडिलांची आई, निव्याची आजी होती. ७५ची. ती हे कसाटा नेहमी ऐकायची.
एकदा संध्याकाळी ती आईला म्हणाली… ‘उषा, हे कसाटा म्हणजे काय असतं ग? एकदा आण हं माझ्यासाठी! खाऊन तरी बघू. लग्नाला जाऊन आलात की, आईस्क्रीमच्या थरात सुका मेवा घातलेला तो केशरी, फोडीच्या आकाराचा तुकडा मुलुंड स्टेशनहून चालत चालत घरी कसा आणायचा. फ्रीज तर नव्हताच.. म्हणून आई म्हणाली ‘ हो. पण तुम्ही आणि सुवर्णा हॉटेलात जाऊनच खा तो. ‘
काहीच दिवसांत आईने मोजकेच पैसे देऊन मला आणि आजीला मुलुंड पूर्वच्या स्टेशनसमोर असलेल्या हाॅटेल अजित पंजाब मध्ये पाठवलं. दुपारी ४ वाजता. माझा हात घट्ट धरून आजी आणि मी चालत चालत २० मिनिटांनी पोचलो. तिथले वेटर, आजी आणि मला पाहून समजूतदारपणे पुढे आले. मी रूबाबात दोन कसाटा आईस्क्रीमची ऑर्डर दिली. आजी त्या उंच पाठीच्या, गुबगुबीत कोचमध्ये बुडून गेली होती. ए. सी. चा थंडावा, मंद दिवे, चकचकीत सन्मायकाची टेबलं, तुरळक वेटरचा वावर, उन्हातून आल्यावर पुढे आलेले थंडगार पाण्याचे उंच, काचेचे ग्लास, आपला जाड काचांचा चष्मा सारखा करत आजी मिटीमिटी पहात होती. सराईतासारखा आव आणत मी म्हटलं ‘ आजी, पाणी पी ना’ आणि मी स्टाईलमध्ये पाणी प्यायला लागले. आजी थोडीशी पुढे झाली, दोन्ही हातांनी काचेचा ग्लास सरकवत टेबलाच्या कडेवर आणून थंडाव्याचा अंदाज घेत चार घोट पाणी प्यायली.
तेवढ्यात एका ट्रेमध्ये ठेवलेल्या कसाटाच्या दोन डिशेस घेऊन वेटर आला आणि दोघींसमोर ठेवून गेला.
चमचे सावरत आजीने आधी कसाटा नीट पाहिलं आणि कडेने हळुवारपणे थोडंस्सं आईस्क्रीम चमच्यावर घेऊन जिभेवर ठेवलं आणि माझ्याकडे पहात मान डोलावली.
पुढची दहा मिनिटं बाकीचं सगळं विसरून आम्ही चवीचवीने कसाटाला न्याय दिला.
आलेलं बील पाहून, तेवढेच पैसे ठेवून, आजीचा हात धरून मी बाहेर पडले. चालत चालत घरी आलो.
कपातील ५५ पैशाला मिळणारं जॉय आईस्क्रीम कधीतरी घरी आणून खायचो आम्ही, पण असं फक्त आईस्क्रीम खायला दुपारी चार वाजता आजीला आईने पाठवणं यातला स्नेह कळायला बरीच वर्षं उलटावी लागली.
ते लक्षात ठेवून मी एखाद्या आजी आजोबांना भेटायला जाताना आपल्याला सहज उपलब्ध असणाऱ्या, पण त्यांच्या साठी अपूर्वाई वाटेल असा उसाचा रस, बर्फाचा गुलाबी गोळा, बडीशेपेच्या रंगीबेरंगी गोळ्या, ओली भेळ आवर्जून नेते.
आज आजीही नाही, आईही नाही…
पण आजही कधीतरी हॉटेलात जाऊन कसाटा खाताना आधी आई, मग आजीच आठवते.
आईस्क्रीम जरा जास्तच मलईदार लागतं आणि कडेचा तो पावाचा तुकडा अगदी नरम होऊन जातो.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ व्रतोपासना – ४. घराची निंदा करू नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
जरा वेगळे वाटते ना? पण आपण स्वतःशी थोडा विचार केला तर किंवा काही लोकांचे बोलणे ऐकले तर आपल्याला लक्षात येते, की घराला सहज नावे ठेवली जातात. किंवा काही मंडळी इतरांच्या घराशी आपल्या घराची तुलना करतात आणि घरी बोलावण्याचे टाळतात.
आज आपण हा विचार करु या. आपण जेथे राहतो त्या घरात आपल्याला कसे वाटते. या घराने आपल्याला काय काय दिले? आपली किती सुख दुःखे आपल्या बरोबर अनुभवली आहेत? आपल्याला किती संरक्षण, आधार दिला आहे. लहान मुलांना तर स्वतःचे घर खूप प्रिय असते. लहान मुले वैश्विक शक्तीशी जोडलेली असतात. घरातील चांगली ऊर्जा त्यांना समजते. आपल्याला घर निर्जीव वाटत असेल तरी त्यालाही भावना असतात. ते आपल्याशी बोलते. जसे आपण नवी खरेदी केली की आपल्याला आनंद होतो तसेच घरही प्रसन्न होते. घराची स्वच्छता केली, रंग दिला किंवा घरातील वस्तूंच्या जागा बदलल्या तरी आपण म्हणतो घराची ऊर्जा बदलली आहे. घरात छान प्रसन्न वाटत आहे. असे बरेच प्रसंग आपल्याला आठवतील. घराची विविध रुपे आपण अनुभवतो. पण लक्षात घेत नाही. आणि कधी कधी घराची निंदा करतो. अगदी सहज या घराने मला काय दिले? असे वैतागाने म्हणून जातो. त्यावेळी घर नाराज होते. आपले पूर्वज कायम म्हणतात, वास्तू नेहेमी तथास्तू म्हणत असते. म्हणून चांगले बोला आपले पूर्वज फार महत्वाचे सांगत होते. त्यांचे सगळे सांगणे शास्त्रावर आधारित होते. त्यामुळे घराची निंदा करु नये. हे खूप महत्वाचे वाटते. या. साठी पुढील काही संकल्प महत्वाचे वाटतात.
घरासाठी संकल्प
घरात सगळेजण देवाचे करतात. पोथी वाचन अनेक वर्षे सुरु आहे. घरात सुबत्ता आहे. सर्व भौतिक सुविधा आहेत. हे सगळे असले तरी एखादा छोटासा किंतू असतो. आणि सर्व सुखांच्या आड येणारे हेच असते. थोडक्यात म्हणजे सगळे उत्तम आहे, पण….. असे ऐकू येते. आणि हा पण म्हणजे पाणी साठ्यातून जसे पाणी झिरपते तसे असते.
तर या झिरपणाऱ्या पाण्याला/पणला /किंतूला दूर करु या.
या साठी काही गोष्टी करु या.
आपण देवपूजा, पोथी वाचन आरती किंवा अजून काही करत असू तर ते उत्तमच आहे. पण एक असे असते या सगळ्याची ठराविक वेळ असते. त्या वेळी आपले विचार अत्यंत उत्तम, सकारात्मक असतात. पण हे सगळे झाल्यावर नंतर पुन्हा असे विचार कधी करतो? याचा विचार प्रत्येकाने करावा. या गोष्टी आपण दिवसातून एकदा किंवा दोनदा करतो. पण आपण पाणी पिणे, चहा घेणे, जेवणे, झोप घेणे अशा आणि काही आवश्यक गोष्टी वारंवार करतो. मग आपल्या कुटुंबा विषयी असे सकारात्मक विचार (संकल्प) सुद्धा सतत करायला हवेत.
घरातील व्यक्ती एकमेकांशी मैत्रीपूर्ण वागणे. आनंदाने संवाद करणे, एकमेकांमचा सर्वांनी स्वीकार करणे या साठी काही संकल्प पुढील पद्धतीने करु या. कोणतीही पद्धत किंवा जमेल त्या पद्धती वापराव्यात.
घरात दर्शनी भागात सर्व सदस्य असतील असा फोटो लावणे. म्हणजे आनंदी फॅमिली फोटो घरात लावावा.
काही सकारात्मक वाक्ये नेहेमी उच्चारावीत. ही वाक्ये पुढील प्रमाणे.
▪️ आमचे घर हे एक पवित्र मंदिर आहे.
▪️ मी व घरातील प्रत्येक व्यक्ती पवित्र व शक्तिशाली वैश्विक शक्तीचा अंश आहेत.
▪️ सगळे सुखी व आनंदी आहेत.
▪️ सगळे एकमेकांना समजून घेत आहेत.
▪️ सगळ्या सदस्यांचे एकमेकांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
▪️ घरातील प्रत्येकाला त्यांच्या मनाप्रमाणे सुख व समाधान मिळालेले आहे.
▪️ आम्ही सगळे कायम एकमेकांच्या सोबत आहोत.
▪️ अशा घरात व घरातील सदस्यांच्या सोबत मी रहात आहे. त्या साठी देव/निसर्ग शक्ती / वैश्विक शक्ती यांचे मनापासून आभार!
ज्या ज्या व्यक्ती माझ्या बालपणी माझ्या अत्यंत आवडत्या होत्या आणि कळत नकळत ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा माझ्या मनावर प्रभाव होता त्यातलीच एक व्यक्ती म्हणजे कुमुदआत्या. कुमुद शंकरराव पोरे. पप्पांची म्हणजेच माझ्या वडिलांची मावस बहीण. पप्पांना सख्खी भावंड नव्हतीच. ते एकुलते होते पण गुलाब मावशी, आप्पा आणि त्यांची मुलं यांच्याशी त्यांची अत्यंत प्रेमाची आणि सख्यापेक्षाही जास्त जिव्हाळ्याची नाती होती.
कुमुदआत्या ही त्यांची अतिशय लाडकी बहीण. या बहीण भावांचे एकमेकांवर विलक्षण प्रेम. त्यांचं घर स्टेशन रोडला होतं. घरासमोर एक उसाचं गुर्हाळ होतं आणि तिथे पप्पा सकाळी ठाणे स्टेशनवर ऑफिसला जाण्यासाठी, दहा पाचची लोकल गाडी पकडण्यापूर्वी आपली सायकल ठेवत. संध्याकाळी परतताना ती घेऊन जात पण तत्पूर्वी त्यांचा गुलाब मावशीकडे एक हाॅल्ट असायचाच. रोजच. गुलाब मावशीचा परिवार आणि कुमुदआत्यचा परिवार एकाच घरात वर खाली राहत असे. पप्पा आल्याची चाहूल लागताच कुमुदत्या वरूनच, जिन्यात डोकावून विचारायची, ” जना आला का ग? त्याला म्हणाव “थांब जरासा” त्याच्यासाठी कोथिंबीरच्या वड्या राखून ठेवल्यात. आणते बरं का! येतेच खाली. “
पप्पा येताना भायखळा मार्केट मधून खूप सार्या भाज्या घेऊन यायचे. त्यातल्या काही भाज्या, फळे गुलाबमावशीला देत, कधी कुमुदात्यालाही देत. म्हणत, ” हे बघ! कशी हिरवीगार पानेदार कोथिंबीर आणली आहे! मस्त वड्या कर. ”
कुमुदआत्या पण लडिवाळपणे मान वळवायची आणि अगदी सहजपणे पप्पांच्या मागणीला दुजोरा द्यायची.
तसं पाहिलं तर एक अत्यंत साधा संवाद पण त्या संवादात झिरपायचं ते बहीण भावाचं प्रेम. प्रेमातला हक्क आणि तितकाच विश्वास.
घरी आल्यावर पप्पांकडून आम्हाला या कोथिंबीर वड्यांचं अगदी चविष्ट कौतुक ऐकायला मिळायचं. मी तेव्हा खट्याळपणे पप्पांना विचारायचे, ” एकटेच खाऊन येता? आमच्यासाठी नाही का दिल्या आत्याने वड्या?”
पण कुमुदआत्या आमच्या घरी यायची तेव्हा कधीही रिकाम्या हाताने यायचीच नाही. कधी रव्याचा लाडू, कधी कोबीच्या वड्या, सोड्याची खिचडी, कोलंबीचं कालवण असं काहीबाही घेऊनच यायची. ती आली की आमच्या घरात एक चैतन्य असायचं. तिचं बोलणं गोड, दिसणं गोड, तिच्या गोरापान रंग, उंच कपाळ, काळेभोर केस, कपाळावरचे ठसठशीत कुंकू आणि चेहऱ्यावरून ओसंडणारा मायेचा दाट प्रवाह, कौतुकभरला झरा.. ती आली की तिने जाऊच नये असंच वाटायचं आम्हाला. आमचं घर हे तिचं माहेर होतं आणि या माहेरघरची ती लाडकी लेक होती.
माझ्या आईचं आणि तिचं एकमेकींवर अतिशय प्रेम होतं. नणंद भावजयीच्या पारंपरिक नात्याच्या कुठल्याही कायदेशीर मानापमानाच्या भोचक कल्पना आणि अटींपलीकडे गेलेलं हे अतिशय सुंदर भावस्पर्शी नातं होतं. सख्या बहिणी म्हणा, जिवाभावाच्या मैत्रिणी म्हणा पण या नात्यात प्रचंड माधुर्य आणि आपुलकी होती. खूप वेळा मी त्यांना सुखदुःखाच्या गोष्टी करताना पाहिलं आहे. एकमेकींच्या पापण्यांवर हळुवार हात फिरवताना पाहिलं आहे. खरं म्हणजे त्या वयात भावनांचे प्रभाव समजत नव्हते. त्यात डोकावताही येत नव्हतं पण कृतीतल्या या क्षणांची कुठेतरी साठवण व्हायची.
आज जेव्हा मी कुमुदआत्यांसारख्या स्त्रियांचा विचार करते तेव्हा मनात येतं “एका काळाची आठवण देणाऱ्या, त्याच प्रवाहात जगणाऱ्या या साध्या स्त्रिया होत्या. लेकुरवाळ्या, नवरा मुलं— बाळं घर या पलिकडे त्यांना जग नव्हतं. स्वतःच्या अनेकविध गुणांकडे दुर्लक्ष करूनही त्या संसारासाठी आजुबाजूची अनेकविध नाती मनापासून जपत, नात्यांचा मान राखत, तुटू न देता सतत धडपडत जगत राहिल्या. विना तक्रार, चेहऱ्यावरचे समाधान ढळू न देता. पदरात निखारे घेऊन चटके सोसत आनंदाने जगल्या. त्यांना अबला का म्हणायचे? स्वतःसाठी कधीही न जगणाऱ्या या स्त्रियांना केवळ अट्टाहासाने प्रवाहाच्या विरोधात जायला लावून “अगं! कधीतरी स्वतःसाठी जग. स्वतःची ओळख, अस्तित्व याचं महत्त्व नाहीच का तुला?” असं का म्हणायचं? पाण्यात साखर मिसळावी तस त्यांचं जीवन होतं आणि त्यातच त्यांचा आनंद असावा.
मी आजच्या काळातल्या प्रगत स्त्रियांचा आदर, सन्मान, महानता, कौतुक बाळगूनही म्हणेन, ” पण त्या काळाच्या प्रवाहाबरोबर आनंदाने वाहत जाणाऱ्या स्त्रियांमुळेच आपली कुटुंब संस्था टिकली. नात्यांची जपणूक झाली. माणूस माणसाला बऱ्या वाईट परिस्थितीतही जोडलेला राहिला आणि हेच संचित त्यांनी मागे ठेवलं. ” असं वाटणं गैर आहे का? मागासलेपणाचं आहे का? जीवनाला शंभर पावले मागे घेऊन जाणार आहे का? माहित नाही. कालची स्त्री आणि आजची स्त्री यांचा तौलनिक विचार करताना माझ्या मनात प्रचंड गोंधळ या क्षणीही आहे. कुणाला झुकतं माप द्यावं हे मला माहीत नाही. संसाराचं भक्कम सारथ्य करणार्या या स्त्रियांमध्ये मी युगंधराला पाहते.
एकेकाळी खेळीमेळीत, आनंदाने, सौख्याने, आहे त्या परिस्थितीत समाधानाने राहणाऱ्या या कुटुंबात अनपेक्षितपणे गृहकलह सुरू झाले होते. भाऊ, पपी (कुमुदआत्याचे धाकटे भाऊ) यांचे विवाह झाले. कुटुंब विस्तारलं. नव्या लक्ष्म्यांचं यथायोग्य स्वागतही झालं. पण त्याचबरोबर घरात नवे प्रवाह वाहू लागले. अपेक्षा वाढल्या, तुझं माझं होऊ लागलं. नाती दुभंगू लागली. घराचे वासेच फिरले. एकेकाळी जिथे प्रेमाचे संवाद घडत तिथे शब्दांची खडाजंगी होऊ लागली. जीवाला जीव देणारे भाऊ मनाने पांगले. पाठीला पाठ लावून वावरू लागले. घरात राग धुमसायचा पण चूल मात्र कधी कधी थंड असायची. अशावेळी कुमुदआत्याच्या मनाची खूप होरपळ व्हायची. कित्येक वेळा तीच पुढाकार घेऊन भांडण मिटवायचा प्रयत्न करायची. जेवणाचा डबा पाठवायची. म्हातार्या आईवडिलांची, भावांची, कुणाचीच उपासमार होऊ नये म्हणून तिचा जीव तुटायचा. पण त्या बदल्यात तिचा उद्धारच व्हायचा. अनेक वेळा तिला जणू काही आई-वडिलांच्या घरातली आश्रित असल्यासारखीच वागणूक मिळू लागली होती. नव्याने कुटुंबात आलेल्यांना कुटुंबाचा पूर्वेतिहास काय माहित? हे घर वाचवण्यासाठी या पोरे दांपत्याने आपलं जीवन पणाला लावलं होतं याचा जणू काही आता साऱ्यांना विसरच पडला होता पण इतकं असूनही कुमुदआत्याने मनात कसलाही आकस कधीही बाळगला नाही. भाऊच्या किरणवर आणि पप्पी च्या सलील वर तर तिने अपरंपार माया केली. घरातल्या भांडणांचा या मुलांवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून त्यांना सतत मायेचं कवच दिलं. कुमुदआत्या अशीच होती. कुठल्याही वैरभावानेच्या पलीकडे गेलेली होती. तिने फक्त सगळ्यांना मायाच दिली.
जेव्हा जेव्हा प्रातिनिधिक स्वरूपात मला कुमुदआत्याची आठवण येते तेव्हा सहज वाटतं, ” जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकच धर्म हे निराळेपणाने तिला कधी शिकवावेच लागले नाही. प्रेम हा तिचा स्थायीभाव होता. मी कुमुदआत्याला कधीच रागावलेलं, क्रोधित झालेलं, वैतागलेलं पाहिलंच नाही. नैराश्याच्या क्षणी सुद्धा ती शांत असायची. कुणावरही तिने दोषारोप केला नाही. खाली उतरून झोपाळ्यावर एक पाय उचलून शांतपणे झोके घेत बसायची.
तशी ती खूप धार्मिक वृत्तीची होती. मी तिच्याबरोबर खूपवेळा कोपीनेश्वरच्या मंदिरात जाई. तिथल्या प्रत्येक देवाला, प्रत्येकवेळी पायातली चप्पल काढून मनोभावे नमस्कार करायची. साखरेची पुडी ठेवायची. मला म्हणायची हळूच, ” अग! सार्या देवांना खूश नको का ठेवायला?” तिच्या या बोलण्याची मला खूप मजा वाटायची. उपास तर सगळेच करायची. आज काय चतुर्थी आहे. आज काय एकादशी आहे. नाहीतर गुरुवार, शनिवार…जेवायची तरी कधी कोण जाणे! पपा तिला खूप चिडवायचे, कधीकधी रागवायचेही पण ती नुसतीच लडिवाळपणे मान वळवायची. अशी होती ती देवभोळी पण प्रामाणिक होती ती!
लाडकी लेक होती, प्रेमळ बहीण होती, प्रेमस्वरुप, वात्सल्यसिंधू आई होती, आदर्श पत्नी होती. तिच्या झोळीत आनंदाचं धान्य होतं त्यातला कणनिकण तिने आपल्या गणगोतात निष्कामपणे वाटला होता.
आजही माझ्या मनात ती आठवण आहे. प्रचंड दुःखाची सावली आमच्या कुटुंबावर पांघरलेली होती. आमच्या लाडक्या कुमुदआत्याला कॅन्सर सारख्या व्याधीने विळख्यात घेतलं होतं. मृत्यू दारात होता. काय होणार ते समजत होतं. जीवापाड प्रेम करणारा नवरा, अर्धवट वयातली मुलं, म्हातारे आई-वडील आणि तिच्यावर मनापासून प्रेम करणारी सारीच हतबल होती. त्याचवेळी आमच्या ताईचा जोडीदारही तितकाच आजारी होता. रोगाचे निदान होत नव्हतं. डॉक्टरही हवालदील झाले होते. पदरी दहा महिन्याचं मूल, संसाराची मांडलेली मनातली स्वप्नं, सारंच अंधारात होतं. कुठलं दुःख कमी कुठलं जास्त काही काही समजत नव्हतं.
इतक्या वेदना सहन करत असतानाही कुमुद आत्या म्हणत होती, ”मला अरुला भेटायचंय. बोलवा तिला. मला तिला काहीतरी सांगायचंय. ”
कुमुदआत्या इतकी लाडकी होती आमची की ताई त्या चिंतातुर मन:स्थितीतही तिला भेटायला स्वतःच्या छातीवरचा दुःखाचा दगड घेऊनच आली. तिला पाहून कुमुदआत्याचे डोळे पाणावले. तिच्या हातांच्या अक्षरश: पिशव्या झाल्या होत्या पण तिने ताईच्या चेहऱ्यावर मायेने हात फिरवला.
“अरु! बिलकुल काळजी करू नकोस, विश्वास ठेव, हिम्मत राख, अरुण (ताईचे पती) बरा होईल. मी माझ्या देवाला सांगितलंय “माझं सारं आयुष्य अरुणला दे.. त्याला नको नेऊस मला ने! बघ देव माझं ऐकेल आणि अगं! माझं जीवन मी छान भोगलं आहे. नवऱ्याचं प्रेम, हुशार समंजस मुलं आणि तुम्ही सगळे काय हवं आणखी? अरु बाळा! तुझं सगळं व्हायचंय. जाता जाता माझ्या आयुष्याचं दान मी तुझ्या पदरात टाकते. ”
त्यानंतर दोन दिवसांनीच कुमुदआत्या गेली. ती गेली तेव्हाचे बाळासाहेबांचे (कुमुदआत्याचे पती) शब्द माझ्या मनावर कोरले गेलेत.
“कुमुद तुझ्याविना मी भिकारी आहे.”
मृणाल शांतपणे कोसळलेल्या आपल्या वडिलांच्या पाठीवर हात फिरवत होती.
आपलं माणूस गेल्याचं दुःख काय असतं याची जाणीव प्रथमच तेव्हा मला झाली होती.
कुमुदआत्या गेली आणि अरुणच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा दिसू लागली. तो औषधांना, उपचारपद्धतींना साथ देऊ लागला होता. कालांतराने अरुण मृत्यूला टक्कर देऊन पुन्हा जीवनात नव्याने माघारी आला. ईश्वरी संकेत, भविष्यवाणी, योगायोग या साऱ्यांवर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण आलेल्या अनुभवांना तार्किक किंवा बुद्धिवादी अर्थ लावत बसण्यापेक्षा त्यांना जीवनाच्या एका मौल्यवान कप्प्यात जसेच्या तसेच बंदिस्त करून ठेवाववे हेच योग्य.
आज ६०/६२ वर्षे उलटली असतील पण मनातल्या कुमुदआत्याची ती हसरी, प्रेमळ, मधुरभाषी, मृदुस्पर्शी छबी जशीच्या तशीच आहे.
…… जेव्हा जेव्हा तिचा विचार मनात येतो तेव्हा एकच वाटते,