मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जिथे जाहला तुझा जीवनान्त!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“जिथे जाहला तुझा जीवनान्त! ☆ श्री संभाजी बबन गायके 

…. शत्रूच्या मातीत चिरनिद्रा घेत असलेला वायूवीर!

पाकिस्तानातल्या पिंडी भटीया तहसीलमधल्या कोट नाका नावाच्या कोणत्या एका गावातल्या कोण्या एका शेतात आपला एक वीर वायुवीर चिरनिद्रा घेत पहुडला आहे… त्याचा देह मातीच्या स्वाधीन झाला ती जागाही आता विस्मृतीत गेली आहे.. पण त्याच्या स्मृती गेल्या काही वर्षांत पुन्हा स्मरणाच्या पटलावर आल्या! हा वीर मातीच्या कुशीत विसावला त्या घटनेला आज सुमारे साडे एकोणसाठ वर्षे होत आहेत. पण भारताला त्याचे बलिदान समजायला दुर्दैवाने खूप कालावधी लागला… ७ सप्टेंबर, १९६५ रोजी वायूवीर अज्जामदा बोपय्या देवय्या (Squadron Leader A B ‘Tubby’ Devayya) हे जग सोडून गेले.. हे आपल्याला कळायला १९८५ वर्ष उजाडले.. म्हणजे सुमारे वीस वर्षे! तोवर युद्धात बेपत्ता झालेले पायलट एवढीच त्यांची ओळख होती!

१९६५ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध लढले गेले. इथपर्यंत विमानांचा युद्धातला सहभाग तसा कमी होता, असे म्हणता येईल. पण पुढे पाकिस्तानला अमेरिकची अत्याधुनिक लढाऊ विमाने लाभली आणि त्यांची उड्डाणे वाढली… इतकी की त्यांनी ६ सप्टेंबर, १९६५ रोजी भारतीय वायूसेना तळांवर बेफाम हल्ला चढवला. आधी हल्ला न करण्याचे भारताचे धोरण त्यांनी त्यांच्या लाभासाठी अशाप्रकारे वापरून घेतले. याचा करारा जबाब देणे भारतीय वायूसेनेसाठी अनिवार्य होते. भारताकडे फ्रांसमध्ये बनलेली Dassault Mystere नावाची अमेरिकेच्या विमानांच्या अर्थात supersonic F-104 Star-Fightersच्या तुलनेत कमी ताकदीची लढाऊ विमाने होती. आपल्या विमानांच्या कमाल वेगात आणि त्यांच्या विमानांच्या कमाल वेगात १००० कि. मी. प्रतितास इतके मोठे अंतर होते. पण शस्त्रापेक्षा ते शस्त्र धारण करणारे मनगट बलशाली असावे लागते… आणि भारतीय सैन्य यासाठी तर जगभरात प्रसिद्ध आहे! ठरले… दुस-याच दिवशी पाकिस्तानी विमानतळावर मोठा हल्ला करण्याची योजना आखली गेली. Group Captain Om Prakash Taneja (Veer Chakra) यांच्या नेतृत्वात आपली 12 विमाने पहाटेच्या काळोखात पाकिस्तानात अगदी त्या देशाच्या मध्यभागी (आणि त्यामुळे भारतीय सीमेपासून खूपच दूर) असलेल्या सरगोधा विमानतळाकडे झेपावली. इथपर्यंत पोहोचायचे, हल्ला करायचा आणि सुरक्षित परत यायचे यात खूप इंधन खर्च होणार होते. Dassault Mystere विमानांची इंधनसाठवण क्षमता तशी जेमतेमच होती. थोडा वेळ जरी अधिक पाकिस्तानी सीमेत राहिले तर भारतात परतणे अशक्य होणार होते… कारण पाकिस्तानी वायुसेना तोपर्यंत जागी होणार होती… पण धोका पत्करणे आवश्यक होते… कारण त्याशिवाय युद्धात काही हाती लागत नाही!

ठरल्यानुसार बारा विमाने सज्ज झाली.. पहाटेच्या अंधारात ५. २८ मिनिटांनी विमाने झेपावणार होती…. सुमारे पावणेपाचशे किलोमीटर्सचे अंतर कापायचे होते. ठरवलेल्या लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी एकच संधी मिळणार होती. योजनेचा एक भाग म्हणून या 12 विमानांच्या जोडीला दोन आणखी विमाने राखीव म्हणून ठेवण्यात आली होती…. आणि नेमक्या या दोन पैकी एकाचे वैमानिक होते…. युद्धाची प्रचंड जिगीषा असलेले आपले देवय्या साहेब! त्यांना हे राखीवपण चांगलेच डाचत असावे. हे मूळचे वैमानिक विद्या शिकवणारे शिक्षक. पण ऐन युद्धाच्या धामधुमीत एक कुशल वैमानिक हाताशी असावा म्हणून त्यांना ऐनवेळी बोलावून घेतले गेले होते.

अंधार होताच. त्यात धुके पसरले. आधीच्या दिवशी झालेल्या हवाई हल्ल्याने धावपट्टी तशी चांगल्या स्थितीत नव्हती. आपली विमाने दिवसाउजेडी उडण्याच्या क्षमतेची होती… रात्री अंधारात त्यांना उड्डाण करणे म्हणजे अंधा-या विहिरीत उडी घेण्यासारखे होते. चार चारच्या गटांनी उड्डाणे करण्याची योजना होती. मोहिमेच्या गुप्ततेसाठी काही वेळ एकमेकांशी रेडीओ संपर्क न ठेवण्याचे ठरले होते… पहिला गट व्यवस्थित हवाई मार्गस्थ झाला. दुसरा गटही बहुधा त्याच मार्गावर असावा. पण काहीतरी गडबड झाली म्हणा किंवा अन्य काही.. पण देवय्या साहेबांनी आपले विमान चक्क या दुस-या तुकडीच्या पुढे काढले… आणि जवळजवळ दुस-या विमानाला धडकले असते अशा अंतरावरून ते आभाळात झेपावले…. शत्रूला नेस्तनाबूत करायला! तोपर्यंत पहिली तुकडी लक्ष्यावर पोहोचली होती. त्यांनी अचूक हल्ला केला आणि पाकिस्तानची धांदल उडाली. इतक्या लांब भारतीय विमाने पोहोचणार नाही, या त्यांच्या समजुतीला हा मोठा धक्का होता. दुस-या तुकडीला तनेजा साहेबांनी लक्ष्य सांगितले… पण अंधारच इतका होता की त्यांना ते लक्ष्य दिसलेच नाही…. पाकिस्तानची बरीच अमेरिकन विमाने यामुळे बचावली. पण आपल्या या दुस-या तुकडीने मग लक्ष्य बदलले आणि तुफान हल्ला चढवला… आणि त्यांचे भरपूर नुकसान करीत आपली विमाने भारतीय हद्दीकडे माघारी वळाली… पण या तुकडीच्या मागे असलेले देवय्या साहेब आता येताना सर्वांत मागे राहिले… तोवर पाकिस्तानचे एक supersonic F-104 Star-Fighter आपल्या विमानांच्या पाठलागावर निघाले होते. देवय्या साहेबांकडे जेमतेम परत येण्याएवढे इंधन शिल्लक होते. त्यांना माघारी येणे शक्य असतानाही ते या पाकिस्तानी विमानाला सामोरे गेले… अन्यथा पाकिस्तानी विमानाने आपल्या माघारी फिरणा-या विमानांचा जीवघेणा पाठलाग केला असता आणि आपले भरपूर नुकसान झाले असते… कारण पाकिस्तानी विमान आपल्यापेक्षा अधिक वेगवान आणि आधुनिक हत्यारांनी सज्ज होते…. त्याचा वैमानिक होता.. फ्लाईट लेफ्टनंट अहमद हुसैन… त्यांचा उत्तम पायलट…. त्याने पाहिले की एक साधारण विमान आपल्या रोखाने येते आहे… त्याने देवय्या यांच्या विमानावर त्याचे अग्निअस्त्र डागले…. उष्णतेचा मागोवा घेत विमानाचा पाठलाग करीत त्याला उध्वस्त करणारे ते अस्त्र… ते कधीच अपयशी ठरले नव्हते तो पर्यंत… त्यामुळे हुसेन निश्चिंत होता… त्याला वाटले की हे विमान पाडले की भारतीय हद्दीकडे जाणा-या विमानांचा फडशा पाडू! पण देवय्या साहेबांचे इरादे हिमालयाएवढे उंच. त्यांनी अशी काही शक्कल लढवली की ते अग्निअस्त्र ब भरकटले…. भारतीय वैमानिकाच्या कौशल्यापुढे अमेरिकन तंत्रज्ञान उघडे पडले होते….. पुढे वेगाने येत हुसेन ने देवय्या साहेबांच्या विमानावर जोरदार गोळीबार केला… विमान जोरात हादरले… पण तरीही देवय्या साहेबांनी विमानावर ताबा मिळवला… त्यांचे उड्डाण कौशल्य अतिशय उच्च दर्जाचे होते… जो अभ्यासक्रम हुसेन शिकला असेल त्या अभ्यासक्रमाचे देवय्या साहेब म्हणजे जणू हेडमास्तरच होते! ते अजिबात डगमगले नाहीत… पाकिस्तानच्या आकाशात आता एक प्रचंड उत्कंठावर्धक हवाई युद्ध आरंभले गेले होते… खरं तर पाकिस्तानी विमान क्षणार्धात जिंकायला हवे होते… पण देवय्या साहेब त्याला भारी पडले. हुसेनने सात हजार फुटांची उंची गाठली… देवय्या साहेबांनी तोही धोका पत्करला आणि ते सुद्धा तेवढ्याच उंचीवर जाण्याच्या प्रयत्नात राहिले… हुसेन वेगाने त्यांच्या रोखाने आला… साहेबांनी अलगद हुलकावणी दिली… एखादे रानडुक्कर कसे थांबता न आल्याने पुढे धावत राहते… तशी हुसेनची गत झाली…. त्यांनी हुसेन याला आभाळभर फिरव फिरव फिरवले… एका बेसावध क्षणी हुसेनला गाठून त्याच्या विमानावर होत्या तेवढ्या शस्त्रांनी हल्ला चढवला… आता देवय्या माघारी जाण्याच्या स्थितीत अजिबात नव्हते… आणि त्यांना माघारी जायचेही नव्हते! पण एका क्षणी या दोन्हे विमानांची आभाळातच धडक झाली…. दोघेही वेगाने जमिनीकडे कोसळू लागले…. हुसेनच्या विमानात उत्तम दर्जाची बाहेर पडण्याची यंत्रणा होती… तो यशस्वीरीत्या विमानातून eject झाला… आणि जमिनीवर सुखारूप उतरला…. देवय्या साहेब मात्र याबाबत कमनशीबी ठरले… त्यांनीही विमानातून बाहेर उडी ठोकली होती… पण.. त्यांचा देह विमानापासून काही अंतरावर सापडला…. पण ते फारसे जखमी झालेले नव्हते! पण त्यांचे प्राण भारतमातेच्या संरक्षणार्थ खर्ची पडले होते.. आणि त्याचा त्यांना अभिमान होता. आपली पत्नी आणि दोन मुली यांना ते कायमचे पोरके करून त्यांच्या आत्म्याने परलोकी उड्डाण केले होते.

वायुसेनेच्या भाषेत दोन लढाऊ विमानांच्या अशा प्रकारच्या संघर्षाला Dog Fight अशी संज्ञा आहे… पाकिस्तानी पायलटचे माहीत नाही… मात्र लढणारा आपला वैमानिक वाघ होता… वाघासारखा लढला आणि धारातीर्थी पडला!

सरगोधा मोहिमेवर गेलेली सर्व विमाने सुखरूप भारतीय हद्दीत परतली… पण देवय्या साहेबांविषयी तनेजा साहेबांना ते त्यांच्या विमानातून खाली उतरल्यावरच समजले! देवय्या साहेबांची काहीच खबर मिळाली नाही… कालांतराने त्यांना युद्धात बेपत्ता झालेले सैनिक असा दर्जा दिला गेला. साहेबांच्या पत्नी श्रीमती सुंदरी देवय्या आणि कन्या स्मिता आणि प्रीता यांचा पुढे प्रचंड मोठा झालेला प्रतीक्षा कालावधी सुरु झाला… त्यांना सुमारे तेरा वर्षांनी देवय्या साहेबांची खबर समजणार होती…. ते हयात नाहीत ही ती खबर!

भारत पाक युद्ध थांबले. पाकिस्तानचा पराभव झाला होता… पण ते उताणे पडले तर नाक वरच आहे असे म्हणत राहतात नेहमी. त्यांनी त्यांच्या वायुदलाच्या तथाकथित पराक्रमाबाबत लेखन करण्यासाठी एक इंग्रजी माणूस नेमला…. John Fricker त्याचे नाव. त्याने Battle for Pakistan: The Air War of 1965 ही एक प्रकारची बखरच लिहिली… त्यात अर्थात पाकिस्तानची स्तुती पानोपानी होती. पण कसे कोणास ठाऊक त्याने देवय्य्या साहेब आणि हुसेनच्या लढाईचा उल्लेख केला… देवय्या साहेबांचे नाव तोपर्यंत त्यालाही ठाऊक नव्हते… जिथे देवय्या साहेब धारातीर्थी पडले होते.. त्याच शेतात त्यांना तिथल्या लोकांनी दफन केले होते. ही बाब पाकिस्तान सैन्याने खरे तर भारताला कळवायला हवी होती! असो.

तर हे पाकिस्तान धार्जिणे पुस्तक कालांतराने म्हणजे ते प्रकाशित झाल्यानंतर तब्बल सात आठ वर्षांनी भारतात पोहोचले… आणि त्यातील मजकूर तनेजा साहेबांच्या नजरेस पडला…. आणि सुरु झाला एक शोध…. एका हुतात्मा वायूवीराचा शोध. त्याला न्याय देण्यासाठीचा संघर्ष… कारण सरगोधा मोहिमेत भाग घेतलेल्या सर्व वैमानिकांना पदके मिळाली होती… पण आपला कथानायक पाकिस्तानातल्या मातीत हरवून गेला होता… आपण जणू त्यांना विसरलो होतो! पण दैवयोगाने तपासाची चक्रे फिरत राहिली… तेवीस वर्षे… आणि १९८८ मध्ये Squadron Leader Ajjamada Boppayya Devayya No. 1 Squadron IAF यांना मरणोत्तर महावीर चक्र देण्याची घोषणा करण्यात आली. भारतीय वायूसेनेतल्या लढाऊ वैमानिकास प्रदान केले गेलेले हे आजपर्यंतचे एकमेव महावीर चक्र ठरले आहे. देवय्या साहेबांच्या पत्नी यांनी मोठ्या कष्टाने आपल्या दोन्ही मुलींना वाढवले… साहेब कधी न कधी तरी परत येईल या आशेवर त्यांनी दिवस काढले… त्यांच्या पराक्रमाची योग्य कदर केली गेल्यानंतरच त्यांच्या कष्टी काळजाला थोडा दिलासा लाभला. त्या आता नव्वद वर्षांच्या आहेत. देवय्या साहेबांना दफन केलेली जागा स्वत: हुसेन यांनीच शोधून काढली असे बोलले जाते. परंतु आता ती नेमकी जागा विस्मरणात गेली आहे… खरे तर देवय्या साहेबांचे अवशेष भारतात परत आणण्याचे प्रयत्न व्हायला हवे होती… पण अनाम वीरांच्या नशिबी …

‘स्तंभ तिथे न कुणी बांधला… पेटली न वात! ‘ अशी स्थिती असते.

धगधगता समराच्या ज्वाला.. या देशाकाशी…

जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी…

– – हे शब्द किती खरे ठरतात ना?

देवय्या साहेब देशासाठी हुतात्मा झाले हे आता सिद्ध झाले आहे. पण त्यांच्याविषयी बरीच माहिती तशी सर्वसामान्य जनतेपासून लांबच राहिली, असे दिसते. जानेवारी, २०२५ मध्ये अक्षय कुमार यांची भूमिका असलेला स्काय फोर्स नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. या मध्ये ही कथा सांगण्याचा प्रयत्न केला गेला… पण नावे, कथा, तपशील यात कमालीचा बदल करण्यात आला आहे…. हे मात्र अत्यंत दुर्दैवाचे आहे! एका ख-या वीराची कथा आपण त्याच्या ख-या नावासह सांगू शकत नाही… याला काय म्हणावे.. कारणे काहीही असोत. पण ही कथा पडद्यावर आणल्याबद्दल संबंधित निर्माता, दिग्दर्शक, लेखक, कलाकार यांचे आभारही मानावेत तेवढे कमी आहेत.. कारण हल्ली वाचन नाही केले जात. सैन्यविषयक पुस्तके बरीचशी इंग्रजीमध्ये असतात… आणि जनता हल्ली चित्रपटात इतिहास शोधते आहे.. त्यामुळे चित्रपट त्यांच्या दोषांसह स्वीकारावे लागतात, हेही खरे आहे. खरे आभार मानले पाहिजेत ते ग्रुप कॅप्टन ओम प्रकाश तनेजा या वीर चक्र विजेत्या जिगरबाज वायुसेना अधिकारी वीराचे. देवय्या साहेबांचे शौर्य प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट खूप कौतुकास्पद आहेत.

मी आज संध्याकाळी स्काय फोर्स हा चित्रपट पाहिला. दर रविवारी एक सैन्य कथा प्रकाशित करण्यचा प्रयत्न करीत असतो. निवृत्त वायूसैनिक श्री. मेघश्याम सोनावणे साहेब माझ्या या प्रयत्नांना प्रोत्साहन देत असतात. यानिमित्ताने आपल्याच वीरांच्या आपल्या विस्मृतीत गेलेल्या कथा पुन्हा सांगितल्या जातील.. जय हिंद.

  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हे श्रीरामा… हे सीते… ☆ डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी ☆

डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ हे श्रीरामा… हे सीते… ☆ डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी ☆

हे श्रीरामा, वयाच्या चौदाव्या वर्षांपर्यंत तुला लाभलेले आयुष्य हे पूर्णपणे संस्कारांनी भरलेले होते. लहानपणी तू चंद्र खेळायला मागीतलास. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी राजा, तिन्ही राण्या, दास दासी झटत होते. कोणतीही वस्तू तुला खेळायला मिळाली. वात्सल्यामध्ये, प्रेमामध्ये तू न्हाऊन निघालास. पुढे वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात जाऊन तत्त्वांनी भारलेले प्रशिक्षण, जीवन तू जगलास. गुरूकडून मनाचा परखडपणा शिकलास. भावनांना आवर घालून स्पष्टवक्तेपणा कसा अंगी बाणवायचा हे त्यांनी तुला शिकविले. समाजहितासाठी दुसर्याच्या वैगुण्याबद्दल संतोष न बाळगता लोकांसाठी वंद्य गोष्टी करण्याची वृत्ती तू तेथे आत्मसात केलीस म्हणून तुला वालीवध आत्मविश्वासाने करता आला. मारूतीरायासारख्या भक्ताचा आदर्श तू समाजापुढे ठेवलास म्हणूनच समर्थ रामदासांनी उत्स्फूर्तपणे मंदिरे स्थापन करून समाजातील युवामन घडविले.

जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे|जनी वंद्य ते सर्व भावे करावे||

हे सर्वांच्या मनात रूजविले. मनातील सर्व शंकांचे निरसन वसिष्ठ मुनींच्या कडून करून घेऊनच तू घरी आलास. आल्यावरही लग्न होईपर्यंत राजकुमाराचे कोडकौतुकात वाढलास. शिक्षणामुळे, गुरू सेवेमुळे कौशल्य आणि अध्यात्मिक वृत्तीमुळे तू आदर्श व्यक्ती बनलास. सीतेसारखी पत्नी तुला मिळाली. तिने आयुष्यभर तुझी साथ सोडली नाही. बालपणीच्या कालखंडात तुला निरीक्षणातून विचार करता आला.. तुला निवांतपणे सर्व शिकता आले. आदर्शवत अशा बर्याच व्यक्ती तुझ्या आसपास होत्या. म्हणून तू मर्यादा पुरुषोत्तम, एकवचनी, एकपत्नी, एकबाणी झालास. तू होतासच शूर, करारी आणि चारित्र्यसंपन्न. तुला राज्याभिषेक होण्यापूर्वी वनवासाला जावे लागले. तिथूनपुढे तू पुन्हा राजा होऊन रामराज्य येईपर्यंत तुझे आयुष्य कसोटीचे ठरले. वयाच्या चौदाव्या वर्षांपासून ते अठ्ठावीस वयापर्यंत वनवासात राहून, रावणवध करून तू परत आलास. तुझ्या आयुष्यातील सर्व यशाचे गमक तुझ्या लहानपणात आहे. हे सांगण्याचा उद्देश एवढाच की, सध्या चंद्रच काय सूर्य, मंगळ हाताशी आहेत मुलांना अनुभवायला.. विज्ञानाची आकाशझेप एवढी आहे की, धनुष्यबाण कालातीत झालं आहे. रॉकेट, पिस्तूल, बॉम्ब इ. चा वापर सर्रास सुरू आहे. तुला मिळालेले लहानपण सर्व मुलांना मिळते. भरमसाठ शिक्षण फी भरायला राजाराणी एका पायावर तयार असतात. असलेच पाहिजे. गुरूकुलाचा चांगलेपणा इमारती व भौतिक सुविधांवरच तर ठरतो. पण “वसिष्ठ” शोधावे लागतात. सत्य-असत्य, धर्म- अधर्म यांतील फरक समजावणारा वसिष्ठ मिळणे दुरापास्त. असलाच तर इथं इतका विचार कोण करणार जसा राजा दशरथाने केला. भविष्यकाळ उज्ज्वल होणं न होणं हे आर्थिक सुबत्तेवरच अवलंबून असतं. इथं वनवासात कोण जाणार? लाड करूनही योग्य शिकवण तुला दिली गेली. आता फक्त लाड करायला वेळ काढला जातो. ते महार लाड झाले तरी आवडून घ्यावं लागतं. कारण आर्थिक व नोकरीच्या कसरतीत वर्तमानातील वेळ हा विनात्रासात निघून गेला ना, चला आता उद्याचे उद्या यां सुटकेवर आधारित असतो. वर्तमानच जर असा भीषण तर भविष्य काळ पैशाच्या डोंगरावर बसून वाट्याला आलेला एकाकीपणा भोगण्यात जाईल. तू आणि सीता वेगवेगळ्या ठिकाणी रहात असलात तरी एकाकी नव्हतात हे कधी कळेल समाजाला.?

हे रामराया, रामराज्य आल्यावरही न्याय निवाडा करताना तू स्वतः च्या आयुष्यातील ऐशो आरामाचा विचार न करता लोकराज्याचा विचार करून सितेला वनवासात पाठविलेस. होय पाठविलेसच त्याशिवाय का तिने कष्टाने मुलांना योग्य ठिकाणी, योग्य माणसांच्यात वाढविल्यानंतर, लोकापवाद दूर झाल्यावर त्यांना तुझ्या हातात देऊन ती धरणी मातेच्या पोटात गडप झाली. तिचा अनुभवातून आलेला कणखर स्वभाव तेंव्हाच दिसला. तिच्याएवढा घराचा विचार करणारी स्त्री आता नाही निर्माण होणार. आश्रमात अत्यंत साधेपणाने राहून तिने मुलांना जन्माला घालणे आणि वाढविणे याला महत्त्व दिले. त्यामुळे रामराज्य येऊनही सिंहासनापेक्षा वरचढ असे स्थान मुलांनी समाजात निर्माण केले. रामासाठी मुले संपत्तीपेक्षा श्रेष्ठ ठरली. सध्या वनवासात जायला कोणती मुलगी तयार होईल? काही कारणाने गेलीच तर कोण मुलांना जन्म देईल? सध्या सीता एकट्या रामाला वनवासात जा म्हणते. महाल सोडवत नाही. घरातील कष्टाला भिते. नोकरीच्या ठिकाणी मात्र राबराब राबते. बॉसला गोड बोलून लांगूलचालन करणे हा नोकरी टिकण्याच्या पाया आहे. याव्यतरिक्त आणखी शक्ती जगात असतील यावर युवापिढीचा विश्वास नाही. समर्थांनी सांगितलेले अधिष्ठान पूर्णपणे विसरून गेलेल्या रामसीतांना “सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे | परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे|| हे कोण शिकवणार? हे श्रीरामा, तू ये आता.

त्यावेळचे सुनयना राणीचे संस्कार मोठ्यांच्या आशिर्वादात, पतीच्या विचारात संसार करण्याचे होते. सध्या सुनयनाचे लक्ष पतीला बाजूला ठेवून भौतिक आस शमविण्यासाठी बाह्य जगात कसे वावरावे या संस्कारांकडे जास्त आहे. त्यामुळे भविष्यात सीतांना कुठेही रामराया सापडणार नाही.

म्हणून हे रामराया, तू लोकोद्धारासाठी पुन्हा जन्म घेच पण हे सीते, हे सुनयना तुम्ही मुलींना संसारात आदर्श दाखविण्यासाठी पुन्हा जन्माला या. पुन्हा समाजाचं भलं करा.

हे सीते, तू वनवासात गेलीस तरी किती सुखी होतीस, समाधानी होतीस हे सांगण्याची वेळ कलीयुगात आली आहेस. तू काटक्या गोळा करून संसार केला असशील पण रामाचे तुला मिळालेले प्रेम, त्या प्रेमाच्या जोरावर ताठ मानेने उभी राहिलेली तू, त्यामुळे वाल्मिकी ॠषींच्या आश्रमात ही आनंदी असणारी तू कुणाला कशी कळणार? सर्वांची आई होऊन सीतामाता झालीस. हे सर्व आता कोण सांगणार कुणाला? सर्व जगाचा वाईट अनुभव घेऊन नंतरच रामासमोर निस्तेज पणाने उभी रहाणारी सीता तुला तरी बघवेल का गं? म्हणून तुझी आज गरज आहे. खरंच तुझी गरज आहे.

हे रामा…… हे सीते…… तुम्हां दोघांची आज खरंच गरज आहे.

भले शर्ट, पॅन्ट, हॅट, गॉगल घालून या. हातात लॅपटॉप चे शस्त्र असू द्या. चारचाकीतून या. पण तुमची मने रामसीतेची घेऊन या. युवापिढी वाट पहात आहे… 🙏🙏

© डाॅ. मधुवंती दिलीप कुलकर्णी

जि.सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ३८ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… वासंती  – भाग – ३८ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

जात

आयुष्याच्या प्रवासामध्ये घडणाऱ्या धक्कादायक घटनांचा परिणाम हा कायमस्वरूपी असतो का? हा प्रश्न जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हा मला मिळणारं उत्तर हे अस्पष्ट असतं. त्याचं कारण असं की आठवणी जरी मागे उरलेल्या असल्या तरी काळानुसार त्या घटनेच्या वेळचा तीव्रपणा, कडवटपणा, त्यावेळी प्रत्यक्षपणे उसळलेली बंडखोरी अथवा वादळ शमलेलं असतं. सरकणाऱ्या काळाबरोबर खूप काही बदललेलंही असतं आणि या जाणिवेपर्यंत आपण पोहोचतो की आता मागचं कशाला उगाळायचं? जे झालं ते झालं किंवा झालं गेलं विसरून जाऊन पुन्हा एकदा नव्याने धागे विणणे जर आनंदाचे असेल तर ते का स्वीकारू नये?

काही दिवसापूर्वीच माझी एक बालमैत्रीण मला एका समारंभात भेटली. बोलता बोलता ती म्हणाली, ” त्या दोघींना बघितलेस का? कशा एकमेकींना प्रेमाने मिठी मारत आहेत! एकेकाळी तलवारी घेऊन भांडत होत्या. माणसं कसं काय विसरू शकतात गं भूतकाळातले खोलवर झालेले घाव? ”

तिच्या त्या प्रश्नाने माझ्या अंतर्मनातले संपूर्ण बुजलेले व्यथित खड्डे पुन्हा एकदा ठिसूळ झाल्यासारखे भासले.

१७/१८ वर्षांचीच असेन मी तेव्हा. दोन वर्षांपूर्वीच ताईचे तिने स्वतः पसंत केलेल्या मुलाशी थाटामाटात लग्न झाले होते. मुल्हेरकरांचा अरुण हा आम्हाला केवळ बालपणापासून परिचितच नव्हता तर अतिशय आवडता आणि लाडका होता तो आम्हा सर्वांचा आणि अरुणचे काका- काकी म्हणजे बाबा- वहिनी मुल्हेरकर आमचे धोबी गल्लीतले गाढ आमने सामनेवाले. आमचे त्यांचे संबंध प्रेमाचे, घरोब्याचे आणि त्यांच्या घरी नेहमी येणारा त्यांचा गोरागोमटा, उंच, तरतरीत, मिस्कील, हसरा, तरुण पुतण्या अरुणच्या प्रेमात आमची ही सुंदर हुशार, अत्यंत उत्साही, बडबडी ताई हरवली तर त्यात नवल वाटण्यासारखे काहीच नव्हते. खरं म्हणजे दोघेही एकमेकांना वैवाहिक फूटपट्टी लावली असता अत्यंत अनुरूप होते. बाबा आणि वहिनी खुशच होते पण अरुणच्या परिवारात म्हणजे त्याचे आई-वडील (भाऊबहिणीं विषयी मला नक्की माहीत नाही पण आई-वडिलांच्या मतांना पाठिंबा देणारे ते असावेत) त्यांचा या लग्नाला प्रचंड विरोध होता आणि त्याला कारण होते.. आमची जात. मुल्हेरकर म्हणजे चंद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे सीकेपी, उच्च जातीतले. ब्राह्मण जातीनंतरची दुसरी समाजमान्य उच्च जात म्हणजे सीकेपी असावी आणि आम्ही शिंपी. जरी धागे जोडणारे, फाटकं शिवणारे, विरलेलं काही लक्षात येऊ नये म्हणून सफाईदारपणे रफू करणारे वा ठिगळं लावणारे असलो तरी शिंपी म्हणजे खालच्या जातीचे. जात म्हणजे जातच असते मग तुमच्या घरातले अत्यंत उच्च पातळीवरचे संस्कार, बुद्धीवैभव, संस्कृती, जीवनपद्धती, आचार विचार यांना या पातळीवर महत्व नसते त्यामुळे हा धक्का जरा मोठाच होता आम्हा सर्वांसाठी. त्यातून पप्पांनी आमच्यावर एक मौलिक संस्कार आमच्या ओल्या मातीतच केला होता. “जाती या मानवनिर्मित आहेत. मनुष्य कोणत्या जातीत जन्माला यावा हे केवळ ईश्वराधीन असते त्यामुळे जन्माला येणार्‍याची खरी जात एकच. “माणूस” आणि जगताना तो माणूस म्हणून कसा जगतो हेच फक्त महत्त्वाचं. ” अशा पार्श्वभूमीवर ताई आणि अरुणचं लग्न या जातीभेदात अडकावं ही आमच्यासाठी फार व्यथित करणारी घटना होती पण “मिया बिबी राजी तो क्या करेगा काजी? ”

कदाचित अरुण म्हणालाही असेल ताईला, ” आपण पळून जाऊन लग्न करूया” आणि ताईने त्याला ठामपणे सांगितले असेल, ” असा पळपुटेपणा मी करणार नाही कारण मी ज. ना. ढगे यांची मुलगी आहे. ”

अखेर प्रीतीचा विजय झाला. अरुणने घरातल्या लोकांची समजूत कशी काढली याबाबतीत अज्ञान असले तरी परिणामी अरुणा -अरुण चे लग्न थाटामाटात संपन्न झाले. त्या रोषणाईत त्या झगमगाटात जातीची धुसफूस, निराशा, भिन्न रितीभातीचे पलिते काहीसे लोपल्यासारखे भासले, वाटले. आम्ही सारेच लग्न किती छान झाले, सगळे मतभेद विरले, आता सारे छान होईल या नशेतच होतो पण नाही हो!

विवाहा नंतरच्या काळातही त्याची झळ जाणवतच राहिली. ती आग अजिबात विझलेली नव्हती. आपली लाडकी बाबी संसारात मानसिक कलेश सोसत आहे या जाणिवेने पप्पा फार व्यथित असायचे. वास्तविक भाईसाहेब मुल्हेरकर (अरुणचे वडील) जे रेल्वेत अधिकारी पदावर होते त्यांच्याविषयी पप्पांना आदर होता पण क्षुल्लक विचारांच्या किड्यांनी ते पोखरले जावेत याचा खेद होता. त्यात आणखी एक विषय पपांना सतावणारा होता आणि तो म्हणजे “बुवाबाजी”. प्रचंड विरोध होता पप्पांचा या वृत्तीवर आणि धोबी गल्लीच्या कोपऱ्यावर राहणाऱ्या एका बाईकडे बसणार्‍या, लोकांना भंपक ईश्वरी कल्पनात अडकवून त्याच्या नादी लावणाऱ्या “पट्टेकर” नावाच्या, स्वतःला महाराज समजणाऱ्या या बुवाच्या नादी हे सारं कुटुंब लागलेलं पाहून ते संताप करायचे. त्यातून ताई आणि अरुणही केवळ घरातले सूर बिघडू नयेत म्हणूनही असेल कदाचित पट्टेकरांकडे अधून मधून जात हे जेव्हा पप्पांना कळले तेव्हा आमच्यासाठीचा हा महामेरू पायथ्यापासून हादरला आणि माझ्यात उपजतच असलेली बंडखोरीही तेव्हाच उसळली.

या सगळ्या निराशाजनक, संतापजनक दुःख देणाऱ्या पार्श्वभूमीवरही काही आनंदाचे क्षण अनुभवायला मिळाले हे विशेष.

आमच्या घरात कित्येक वर्षांनी तुषारच्या जन्माच्या निमित्ताने “पुत्ररत्न” प्राप्त झाले आणि त्याचा आनंद काय वर्णावा! ताई -अरुणला पहिला पुत्र झाल्याचा आनंद समस्त धोबी गल्लीने अनुभवला. जणू काही “राम जन्मला गं सखी राम जन्मला गं” हाच जल्लोष होता. बाबा वहिनींना तर खूपच आनंद झाला. काय असेल ते असो जातीभेदाच्या या युद्धात ते मात्र सदैव तटस्थ होते. त्यांचा आमचा घरोबा, प्रेम, स्नेह कधीही ढळला नाही. त्यांनी लहानपणापासून त्यांच्या प्रेमळ सान्निध्यात वाढलेल्या ताईचा सून म्हणूनही नेहमी सन्मान राखला. तिच्यातल्या गुणांचं कौतुक केलं.

आमच्या घरात तुषारचे बारसे आनंदाने साजरे झाले. अरुणचा समस्त परिवार बारशाला आला होता. त्यांनी व्यवस्थित बाळंतविडा, तुषारसाठी सुवर्ण चांदीची बालभूषणेही आणली पण इतक्या आनंदी समारंभात त्यांनी आमच्या घरी पाण्याचा थेंबही मुखी घेतला नाही. आईने मेहनतीने बनवलेल्या खाद्यपदार्थांना हातही लावला नाही. कुणाशी संवाद केला नाही. ।अतिथी देवो भव । या तत्त्वानुसार आई, जीजी, पप्पा यांनी कुठलीही अपमानास्पद वागणूक अथवा तसेच शब्दही मुखातून प्रयासाने येऊ दिले नाहीत मात्र आमच्या याही आनंदावर पार विरजण पडलं होतं.

पाळण्यात बाळ तुषार रडत होता. त्याला मी अलगद उचललं. त्याचे पापे घेतले. त्या मऊ, नरम बालस्पर्शाने माझ्या हृदयातली खदखद, माझ्यासाठी जीवनात अत्यंत महत्त्वाच्या तीन व्यक्तींचा झालेला हा अपमान, मनोभंग आणि त्यातून निर्माण झालेला असंतोष शांत झाला होता का? पण मनात आले या कडवट, प्रखर आणि माणसामाणसात अंतरे निर्माण करणारे हे जातीयवादाचे बाळकडू या बाळाच्या मुखी न जावो!

पुढे अनेक क्लेशकारक घटना घडणार होत्या. एका सामाजिक अंधत्वाच्या भयाण सावलीत आमचं पुरोगामी विचारांचं कुटुंब ठेचकाळत होतं हे वास्तव होतं. त्याबद्दल मी पुढच्या भागात लिहीन आणि या वैयक्तिक कौटुंबिक बाबीं आपल्यापुढे व्यक्त करण्याची माझी एकच भूमिका आहे की माणसाच्या मनातले हलके विचार किंवा श्रेष्ठत्वाच्या दांभिक भावना जगातल्या प्रेमभावनेचा अथवा कोणत्याही सुंदर आत्मतत्त्वाचा किती हिणकस पद्धतीने कडेलोट करतात याविषयी भाष्य करणे. हे असं कुणाच्याही बाबतीत कधीही होऊ नये. कुठलाही इतिहास उगाळून मला आजचा सुंदर वर्तमान मुळीच बिघडवायचा नाही पण घडणाऱ्या घटनेचे त्या त्या वेळी जे पडसाद उमटतात त्याचा व्यक्तीच्या जडणघडणीवर नक्कीच परिणाम झालेला असतो..

– क्रमश: भाग ३८

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “बड्डे… बिड्डे…. अन् रिटर्न गिफ्ट…!” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “बड्डे… बिड्डे…. अन् रिटर्न गिफ्ट…!” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

आज 17 एप्रिल माझा जन्मदिवस!

ज्यांना माहित होते, त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या, या सर्वांचा मी ऋणी आहे!

आजही मी नेहमी सारखाच भिक्षेकऱ्यांच्या सेवेसाठी ठरलेल्या स्पॉटवर गेलो, तिथे एक वेगळा सुखद धक्का बसला.

श्री अमोल शेरेकर, स्वतः दिव्यांग असून आपल्या सोहम ट्रस्टमध्ये अन्नदान प्रकल्प पहात आहेत.

यांच्या निमित्ताने अनेक दिव्यांग कुटुंबांनी मला त्यांच्यात सामावून घेतले आहे.

माझ्या स्पॉटवर मी पोचलो, मोटरसायकल स्टँडवर लावताना अचानक माझे पाच-पन्नास दिव्यांग बंधू-भगिनीं समोर दिसले… कुणी कुबडी घेऊन आले होते, कोणी काठी, तर कोणी व्हीलचेअरवर.

नेमकं झालंय काय मला कळेना…

त्यांच्याजवळ जाऊन मी भांबावून विचारले, ‘अरे काय झालं? तुम्ही इथे सर्व कसे? ‘ 

सगळे एका सुरात म्हणाले, हॅपी बड्डे सsssर…!

‘अच्छा असं आहे होय? घाबरलो की रे मी…’ असं म्हणत हसत सर्वांचे हात हातात घेतले.

ज्यांना हातच नाहीत त्यांच्या पायांना स्पर्श केला…!

कोणाला पाय नाहीत, कोणाला हात नाहीत… याही परिस्थितीत कुबड्या काठ्या व्हीलचेअरवर हि मंडळी कुठून कुठून कसरत करत, बस / रिक्षा / चालत आली होती…

हे प्रेम, ही माया कुठून आणि कशी उत्पन्न होत असेल?

मतिमंद म्हणून ज्यांच्यावर शिक्का बसला आहे अशी तीन मुलं माझ्या कमरेला विळखा घालून, हॅपी बड्डे… हॅपी बड्डे… म्हणत नाचत होती… नव्हे मला नाचवत होती…!

कसं म्हणायचं यांना दिव्यांग?

कसं म्हणू यांना मतिमंद?

समुद्रात / नदीमध्ये विसर्जित केलेली मूर्ती…

कालांतराने या मूर्तीचे हात, पाय, मुकुट आणि चेहऱ्यावरचा रंग अशा अनेक बाबी निसर्गामध्ये विलीन होतात. पण अशी हात नसलेली, पाय नसलेली, मुकुट नसलेली मूर्ती दिसूनही श्रद्धा असलेल्या माणसाचे हात नमस्कारासाठी आपोआप जुळतात…! वेगवेगळ्या समुद्रातून, नदी मधून, तलावामधून अशा सर्व भंगलेल्या मूर्ती आज माझ्यासमोर प्रत्यक्ष येऊन, मूर्त स्वरूपात मला आशीर्वाद द्यायला माझ्यासमोर उभ्या होत्या… कुणी दिव्यांग म्हणो… कोणी मतिमंद म्हणो…. माझ्यासाठी या भंगलेल्या, परंतु पवित्र मूर्तीच आहेत…. भंगलेल्या या पवित्र मूर्तींसमोर मग मी नतमस्तक झालो…!

मी कुठल्याही मंदिर मशीद गुरुद्वारा चर्चमध्ये गेलो नाही… तरी मला भेटायला, आज देवच माझ्या दारात आला, माऊली….! ! !

माझ्या या सर्व देवांनी केक आणला होता, माझे स्नेही डीडी (फेसबुकचा आणि मनाने अत्यंत श्रीमंत असलेला राजा, श्री धनंजय देशपांडे) हे कानीकपाळी ओरडून सांगतात, केक नका कापू, कलिंगड कापून वाढदिवस साजरा करा…!

माझा तोच विचार होता, परंतु या सर्वांनी येतानाच खूप महागाचा केक आणला होता, आता केक नको, कलिंगड कापू असं म्हणून त्यांचा हिरमोड करण्याचं माझं धाडस झालं नाही…. Next time नक्की DD.

तर या सर्व गोष्टी आमच्या भिक्षेकरी आजी-आजोबा, मावश्या, बंधू भगिनी यांच्यासमोरच सुरू होत्या.

.. डाक्टरचा आज वाडदिवस हाय, हे समजल्यानंतर आम्हाला का नाही सांगितलं म्हणून त्यांनी आधी माझी खरडपट्टी काढली.

‘ आगं हो, आरे हो… सांगणारच होतो ‘.. म्हणत वेळ मारून नेली.

मी आमच्या लोकांना मग वैद्यकीय सेवा द्यायला सुरुवात केली. बाजूला सहज लक्ष गेलं, अनेक आज्या मावश्या आणि माझे भाऊ एकत्र येऊन, गंभीर चेहऱ्याने काहीतरी खलबतं करत होते.

– – भारताची अर्थव्यवस्था, अमेरिकेने भारतावर लादलेले कर, कोसळलेला शेअर बाजार, महागाई अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते गहन चर्चा करत असावेत; असं समजून हसत मी माझं काम चालू ठेवलं.

माझं काम संपलं… मी उठलो, पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो, इतक्यात एक मावशी आली आणि दरडावणीच्या सुरात म्हणाली, ‘वाडदिस हूता तर आदी आमाला का नाय सांगटलं, पयलं ह्याचं उत्तर दे… ‘ 

‘आगं… ‘

‘आगं आनं फगं करू नगो, हुबा ऱ्हा… ‘ 

रोबोट प्रमाणे तिने जिथे सांगितले तिथे मी उभा राहिलो. यानंतर एक भला मोठा हार माझ्या गळ्यात घालण्यात आला, पेढ्यांचे चार पाच बॉक्स समोर आले. काहीतरी गोड द्यायचं म्हणून कोणी उसाचा रस आणला, कोणी लस्सी, कुणी गुलाबजाम ज्याने त्याने आपापल्या परीने काही ना काहीतरी आणलं होतं.

कुणी पारले बिस्कीट, कुणी गुड डे बिस्किट, कुणी वडापाव, कुणी केळी, तर कोणी प्रसादात मिळालेला शिरा… प्रत्येकाला वाटत होतं त्यांनी आणलेली प्रत्येक गोष्ट मी संपूर्णपणे खाऊन इथेच चट्टामट्टा करावी…

मी लटक्या रागाने म्हणालो….

‘म्हातारे तु सहा केळी आणली, बाबांनं चार वडापाव आणले, मावशीनं पारलेचे सहा पुडे आणले… पाच पेढ्याचे बॉक्स आणलेत…. एकदाच खाऊ घालून काय मारता का काय मला वाढदिवसाला…? ‘ 

ती म्हणाली ‘खा रं ल्येकरा, आमी भिकारी हाव, भिकारी म्हणून, आमाला कुनी बी कायबाय देतंया, पण नौकरी, कामधंदा सोडून तू आमच्यासाठी एवड्या खस्ता खातो… तू काय कुटं कामाला जात न्हायी…. मंग तुला तरी कोन देइल…?’

‘खा रं माज्या सोन्या.. तुला माज्या हातानं सोन्याचा न्हाय… पन येवडा तरी योक घास भरवू दे… खा रं… माज्या बाळा… आ कर.. आ कर… हांग आशी… ‘ 

‘आम्हाला कुनी बी देईल, तुला कोण देणार?‘

– – या वाक्याने अंगावर काटा आला… ती मला स्वतःच्या तराजूत तोलते… स्वतः ज्या पायरीवर उभी आहे त्याच पायरीवर ती मला पाहते… ती मला सुद्धा भिक्षेकरी समजते…

स्वतःला जी दुःख आहेत तीच दुसऱ्याला असतील हे ती समजते…

दुसऱ्याशी ती एकरूप होऊन जाते…

…… अद्वैत म्हणजे आणखी काय असतं???

– क्रमशः भाग पहिला   

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ग्रीक तत्त्ववेत्ता एपिक्युरस यांचे विचार…” लेखक : शरद बावीसकर (यांच्या लेखाचा संकलित अंश) ☆ माहिती संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “ग्रीक तत्त्ववेत्ता एपिक्युरस यांचे विचार” लेखक : शरद बावीसकर (यांच्या लेखाचा संकलित अंश) ☆ माहिती संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆

भौतिकवादाची कोनशिला समजला जाणारा प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता एपिक्युरस म्हणतो की प्राप्त क्षणात अनंताचं सुख असतं. वर्तमानकाळ सत्-तत्त्व आहे. पण अनावश्यक इच्छांचा पाठलाग आणि मृत्यूचं भय माणसाला वर्तमानाच्या या सत्-वास्तवाचं (reality) आकलन होऊ देत नाही. अतृप्त आणि भयभीत मनोवस्थेमुळे माणूस प्राप्त क्षणात राहण्यास असमर्थ ठरतो. भयमुक्त होऊन प्राप्त क्षणाचा आनंद कसा घ्यावा हा मूलभूत विचार एपिक्युरसच्या सुखवादी तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. त्याचं सुखवादी नीतिशास्त्र आजच्या भांडवलवादी भोगवादाचं द्याोतक नसून त्याला छेद देणारं आहे. आजचा बाजारू भोगवाद प्राप्त क्षणापासून पळ काढायला मदत करतो- तर एपिक्युरसचा सुखवाद प्राप्त क्षणात (carpe diem) अनंताचं सुख शोधायला सहाय्यभूत ठरतो. एपिक्युरसच्या सुखवादाचा आंतरिक संबंध त्याच्या भौतिकवादाशी, अनुभववादाशी, निसर्गवादाशी आणि ईहवादाशी आहे. मात्र विरोधी छावणीकडून एपिक्युरसच्या तत्त्वज्ञानाचा विपर्यास फक्त ‘खा, प्या, मजा करा’ अशा उथळ भोगवादात केला गेला.

एपिक्युरसच्या सुखवादी नीतिशास्त्राविषयी सांगायचं झालं तर त्याचा सुखवाद त्याच्या भौतिकवादी आणि अनुभववादी तर्कशास्त्राचं नैसर्गिक अपत्य आहे. भौतिक जग इतर सगळ्या गोष्टींचं आधारभूत तत्त्व असल्यानं भौतिक जगाचा आणि त्यातील स्थित शरीराचा द्वेष एपिक्युरसच्या दृष्टीनं आत्मवंचना ठरते. त्यामुळे शरीर एकाचवेळी साधन आणि साध्य ठरतं. मन, बुद्धी, चित, वेदना, सुख इत्यादी गोष्टींना शरीरेतर स्वतंत्र अस्तित्व नसून त्या शरीराच्या कृती आहेत. शरीरासोबत या शरीराधारित कृतींचासुद्धा शेवट होत असतो.

एपिक्युरसनुसार वेदना टाळणं आणि सुखाचा शोध घेणं हा मानवी स्वभाव आहे. त्यादृष्टीनं तो जेरेमी बेंथम या आधुनिक सुखवादी विचारवंताचा पूर्वसुरी ठरतो. मात्र एपिक्युरसचा सुखवाद हा भांडवलवादी भोगवादाशी संबंधित नसून त्याला छेद देणारा आहे. एपिक्युरसचा सुखवाद समजून घेण्यासाठी त्यानं केलेलं मानवी इच्छांचं वर्गीकरण लक्षात घेतलं पाहिजे. एपिक्युरसनुसार इच्छा तीन प्रकारच्या असतात. (अ) नैसर्गिक आणि आवश्यक, (ब) नैसर्गिक आणि अनावश्यक, (क) अनैसर्गिक आणि अनावश्यक.

नैसर्गिक आणि आवश्यक इच्छांच्या पूर्तीतच खरं सुख आहे असं एपिक्युरस मानतो. तहान लागलेल्या माणसाला पाणी अमृततुल्य वाटतं. श्रमानंतर केलेला आराम सुखदायी ठरतो. थोडक्यात, काम्यू म्हणतो तसं खरं सुख सगळ्यांना परवडणारं असतं. मात्र बेगडी, दिखाऊ आणि तुलनात्मक सुख महाग क्रयवस्तू बनते. एपिक्युरस म्हणतो की अतिरेकी संपत्तीसंचय, सत्ता, बेगडी नावलौकिक सारख्या अनैसर्गिक आणि अनावश्यक इच्छांचा पाठलाग सुखदायी नसून खऱ्या सुखाचा शत्रूच ठरतो. तत्कालीन नागरी जीवन आणि आजचा भांडवलवादी सुखवाद तिसऱ्या वर्गातील इच्छांवर आधारित आहे! एपिक्युरस निरर्थक गरजांनी ग्रस्त नागरी जीवनाचा त्याग करून निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गाशी एकरूप होऊन जगायला सांगतो. त्यामुळे निसर्गवादाच्या बाबतीत तो रूसोचा पूर्वसुरी ठरतो. एपिक्युरसचा भौतिकवाद जीवनद्वेष्टा आणि शरीराचं दमन करणारा नसून ऐहिक जीवनावरील प्रेमाचा पुरस्कार करतो. त्यामुळे इरास्मुस, राब्ले, नित्शे, फुको सारख्या ‘लाफिंग फिलॉसफर्स’चा तो पूर्वज समजला जातो.

एपिक्युरसनं मृत्यूविषयी विस्तृत विवेचन केलं आहे. त्याच्या तर्कशास्त्रानुसार मृत्यू निरुपद्रवी आहे. मृत्यू म्हणजे शरीरासोबतच मन, बुद्धी, आत्मा, चेतना, जाणीव, भावना इत्यादी कृतींचा शेवट. चिद्वादी परंपरा मृत्यूनंतर शिल्लक राहणाऱ्या आत्म्याला शरीराचे गुणधर्म चिकटवते. शरीर तर भौतिकतेच्या ‘शून्या’त विलीन होतं. त्यासोबतच शरीराच्या वेदना, संवेदना, सुख दु:खं नष्ट होतात. मग शरीराचे गुण आत्म्याला जोडून परत शरीरसंबंधित भीतीच्या/प्रलोभनाच्या राजकारणाची आवश्यकता नाही, असं एपिक्युरस मानतो. अशा प्रकारे मृत्यूच्या भीतीला अनाठायी ठरवून त्याभोवती निर्माण झालेल्या अंधश्रद्धांसाठी तो कर्दनकाळ ठरतो. एकूणच एपिक्युरसचा विचार पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात एकाच वेळी निषिद्ध मानलं गेलेलं पण तीव्र आकर्षण निर्माण करणारं फळ आहे.

लेखक : श्री शरद बावीसकर 

 (यांच्या लेखाचा संकलित अंश) 

संकलन व प्रस्तुती : श्री जगदीश काबरे 

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पराभव…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “पराभव…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

गौशालक हा महावीरांचा शिष्य होता, पण, त्याच्या मनात त्यांचा सुप्त द्वेष होता. वर वर तो त्यांचा अनुयायी होता, आतून त्यांना खोटं पाडायला तत्पर असायचा.

त्या दिवशीही वाटेत एक छोटं, कोवळं रोप दिसल्यावर तो महावीरांना म्हणाला, गुरुदेव, तुम्ही परमज्ञानी आहात, तर या रोपाचं भवितव्य जाणत असालच. या रोपाची मजल फुलं येण्यापर्यंत जाईल का?

महावीरांनी डोळे मिटले.

गौशालकाला आश्चर्य वाटलं. एवढ्या छोट्याशा प्रश्नासाठी डोळे मिटायची काय गरज?

महावीरांनी डोळे उघडले आणि ते म्हणाले, हो, हे रोप फुलं येण्यापर्यंत मजल मारेल.

तत्क्षणी गौशालकाने ते रोप जमिनीतून उखडून टाकलं आणि तो विकट हसून म्हणाला, आता?

महावीर सुहास्यमुद्रेने मौन राहिले.

पुढे सात दिवस खूप पाऊस पडला. महावीरांचं त्या रस्त्याने जाणं झालं नाही. सात दिवसांनी गुरुशिष्य पुन्हा त्याच रस्त्याने गेले. त्या रोपाच्या जागी पोहोचल्यावर गौशालक आश्चर्यचकित झाला. त्याने उपटून फेकलेलं रोपटं, फेकल्याजागी मुळं धरून पुन्हा उभं राहिलं होतं.

त्याने महावीरांना विचारलं, हे कसं झालं?

महावीर म्हणाले, गेले काही दिवस पाऊस झाला, जमीन मऊ होती, रोपट्याच्या मुळांनी माती पकडली, जीवन पकडलं, ते पुन्हा उभं राहिलं. हे रोपटं मुळापासून उपटल्यानंतरही जगण्याची तीव्र इच्छा ठेवणार की नाही, हेच मला त्या दिवशी जाणून घ्यायचं होतं. ते समजलं आणि मला कळलं की हे रोप फुलांपर्यंत जाऊ शकेल.

पण, ते रोपटं उपटलं जाणार आहे, हे तुम्हाला कसं कळलं, गौशालकाने भयभीत होऊन विचारलं.

महावीर म्हणाले, मी डोळे मिटले तेव्हा मला अंतर्मनात ते रोपही दिसलं आणि तूही दिसलास.

मान खाली घालून गौशालक पुढे निघाला. काही पावलं गेल्यावर महावीर म्हणाले, एका छोट्याशा रोपट्याकडून पराभव का करून घेतलास?

गौशालक उसळून म्हणाला, पराभव? कसला पराभव? माझा कसला पराभव?

महावीर म्हणाले, दुसऱ्यांदा ते रोपटं उखडून फेकण्याची, त्याचे तुकडे तुकडे करण्याची तुझी हिंमत नाही झाली ना.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – सुश्री ज्योत्स्ना तानवडे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

💐 अ भि नं द न 💐

आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. ज्योत्स्ना तावडे यांचा *आनंदाच्या वाटेवर* हा ललित लेख संग्रह पुणे येथे नुकताच प्रकाशित झाला आहे. या नव्या पुस्तक प्रकाशनाबद्दल ई अभिव्यक्ती परिवारातर्फे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !

आज त्यांचा लेख “विसाव्याचा थांबा” प्रकाशित करीत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? विविधा ?

☆ “विसाव्याचा थांबा” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

” कुहू ऽऽ कुहू ऽऽ ” कोकीळेची साद ऐकू आली. जणू वसंताच्या आगमनाची वर्दीच दिली गेली. आता वातावरणात फरक पडत जातो‌. हळूहळू थंडीचा कडाका कमी होत जाऊन दिवसाची उब वाढायला सुरुवात होते. उन्हाळी कामांची लगबग सुरु होते.

दरवर्षी शाळेच्या परीक्षेचा शेवटचा पेपर होतो आणि उन्हाळ्याच्या मोठ्या सुट्टीला आरंभ होतो. तसे तर सुट्टीचे वेध परीक्षेच्या आधीपासूनच लागलेले असतात. सुट्टीतल्या धमाल मस्तीचे बेतही तयार असतात. एक काळ असा होता की, ‘ सुट्टी आणि मामाचा गाव’ यांचं अतूट समीकरणच होतं. मामाकडे मामे – मावस भावंडांचा मेळावा जमायचा तर स्वतःच्या घरात चुलत – आत्ये भावंड जमा व्हायची. सुट्टीतलं जणू शिबिर सुरू व्हायचं. एकत्र गप्पा, गोष्टी, गाणी यांची धमाल व्हायची. वस्तूंची देवाणघेवाण, गोष्टी वाटून घेणे, एकमेकाला समजून घेणे, न भांडता रागावर ताबा मिळवणे अशा कितीतरी गोष्टी आपोआप शिकल्या जायच्या. नव्या गोष्टी बनवायला शिकायचो. भातुकलीची तर मजा औरच असायची. शेवटी कला सादरीकरणाला घरचेच व्यासपीठ मिळायचे‌. सभाधीटपणा यायचा. आता या सर्व गोष्टींच्या आठवणी सुद्धा खूप आनंद देतात. किती छान होते ते दिवस. या एकत्रित रहाण्याने मजा तर यायचीच पण नाती आणखी घट्ट व्हायची.

पण आता काळ बदलला. सामाजिक परिस्थिती बदलली. कुटुंब दुरावली. तशी सुट्टीतली ती मजा सुध्दा संपली. आता सुट्टीचे वेगळेच बेत सुरु होतात. लहान मोठ्या मुलांसाठी सुट्टीत वेगवेगळी शिबिरं भरवली जातात. वेगवेगळ्या कार्यशाळांचे आयोजन केले जाते. आज-काल बरेच जण पर्यटनाला प्राधान्य देत आहेत. कारण आजचे जीवनमान खूप धावपळीचं झालेले आहे. एकत्र येत पुन्हा जवळीक साधणे अनेक दृष्टीने अवघड आणि गैरसोयीचे झालेले आहे. अशावेळी या पर्यटनाचा मात्र छान उपयोग होतो आहे. पुन्हा सर्वांनी एकत्र येणं या गोष्टीची जाणीव कोव्हिडच्या काळामध्ये जास्त तीव्रतेने झाली. ट्रिपच्या निमित्ताने एकत्र येण्याचा आम्ही कुटुंबीयांनी खूप छान अनुभव घेतलेला आहे.

जागतिक महामारीने वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शाळा, लॉक डाऊन, आयसोलेशन, खा- प्या- खेळा पण सगळं काही घरातूनच या गोष्टीचा अतिशय भयावह अनुभव अकल्पितपणे घ्यावा लागला. लहान-मोठे सगळेजणच यामुळे त्रासले, वैतागले होते. या मनस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी मिळून कुठेतरी चार दिवस ट्रीपला बाहेर जावे असा विचार सुरू झाला.

कारण निर्बंध कमी झाले, बाहेरचे वातावरण सुधारले. पण मुलांच्या शाळा, अभ्यास, परीक्षा यांच्या ताणाने ते अगदी कंटाळले होते. तर मोठे लोक रोजची धावपळ, सकाळ, संध्याकाळ गर्दीतून प्रवास, कामाचा ताणतणाव, ताणलेले नातेसंबंध, कामाच्या ठिकाणचे दडपण अशा एकूण व्यस्त आणि तणावपूर्ण वातावरणाने अगदी थकून गेले होते. यापासून चार दिवस तरी सुटका मिळावी, थोडे स्वास्थ्य, निवांतपण अनुभवावं म्हणून पुणे ते हरिहरेश्वरचे नियोजन केले होते.

आम्ही घरचेच बारा जण गेलो होतो. हरिहरेश्वरला ‘भोसले वाडा’ हा बंगलाच बुक केला होता. चार बेडरूम्स, किचन, हॉल, गच्ची, अंगण असा प्रशस्त बंगला होता. गच्ची आणि हॉल मध्ये झोपाळे बांधलेले होते. त्यामुळे लहान-मोठे सर्वजण खुश होते. किचनही सुसज्ज होते. त्यामुळे चहा कॉफी मनाप्रमाणे घेण्याची मजा घेता आली.

बंगल्याजवळच्या आतल्या रस्त्याने सरळ समुद्रावर जाता येत होते. मुख्य गर्दीच्या किनाऱ्यापासून थोडेसे दूर स्वच्छ, निवांत, कसलीही वर्दळ नसलेला हा किनारा. सर्वांनी चार दिवस समुद्रात डुंबणे, पाण्यात खेळणे, ओल्या मातीत खेळणे, ओल्या वाळूतून पाण्यातून दूरवर चालणे याचा मनसोक्त आनंद घेतला. सूर्यास्ताचा आनंद तर अवर्णनीय होता.

एक दिवस ‘दिवे आगर’च्या गणेशाचे दर्शन घेतले. एक दिवस ‘बाणकोट’ हा किनाऱ्यावर टेहळणीसाठी बांधलेला छोटा गड बघीतला. बाणकोट म्हणजे सावित्री नदीच्या काठावर असलेल्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्याची प्रमुख जागा होती. सावित्री नदीतील फेरी सेवा घेत आपल्या गाड्यांसह बोटीतून नदीच्या पलीकडे जाण्याचा अनुभव वेगळाच होता. एक दिवस ‘हरिहरेश्वर’ दर्शन आणि मंदिर प्रदक्षिणा केली. इथे स्थलदर्शन करताना काळजी घ्यावी लागली. उन्हाळा तीव्र असल्याने सकाळी आणि दुपारनंतर बाहेर जाणे आणि मधल्या वेळात बंगल्यावर खेळणे, विश्रांती असे नियोजन केले होते.

या जोडीला हापूस आंबे, उकडीचे मोदक, घावन, बिरड्याची उसळ अशा खास कोकणी पदार्थांबरोबर स्वादिष्ट नाष्टा, जेवण यांची मेजवानी होती. त्यामुळे चार दिवस स्वयंपाका पासून सुट्टी मिळाली. हॉल मध्ये फक्त एकच टी. व्ही होता. त्यामुळे सिरियल्स, बातम्या यांच्या भडीमारापासून चार-पाच दिवस अगदी शांततेत गेले. त्या ऐवजी सर्वांच्या गप्पा, जुन्या आठवणी यांना वेळ मिळाला. जोडीने कॅरम, पत्ते, बुद्धिबळ खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला. नातवंडेही त्यात आनंदाने सहभागी झाली होती.

या सगळ्यामध्ये एक अतिशय चांगली गोष्ट जर कोणती झाली असेल तर ती म्हणजे इथे असलेली इंटरनेटची ‘अवकृपा’. या गोष्टीचा मला मात्र खूप आनंद झाला.

एरवी पुण्यामध्ये सर्वांची उजाडल्यापासून फोनच्या तालावर धावपळ सुरू होते. नाचकामच म्हणा ना. ‘वर्क फ्रॉम होम ‘म्हणजे काय तर अखंड कानाला फोन चिकटलेला. कान दुखायला लागतो. डोकं कलकलायला लागतं. चिडचिड होते. त्यावरुन घरात वादावादी, गैरसमज, ताणतणाव वाढतात. घरादाराची शांतताच जाते. इथे मात्र वेगळाच अनुभव येत होता. एक दोघांचे फोन रेंज असल्याने चालू होते ते संपर्कासाठी, निरोपासाठी, बुकिंगसाठी उपयोगी पडत होते. पण इतर बहुतेकांचे फोन रेंज अभावी बंद होते. त्यामुळे हात आणि कानही रजेवर होते. मनही रजेचे निवांतपण मनसोक्त अनुभवत होते. आम्हालाही एरवी कामात बुडालेल्या मुलांचा विनाव्यत्यय पूर्णवेळ सहवास मिळत होता. आम्हा दोघा जेष्ठांसाठी ही ट्रिपची खास कमाई होती.

आयटी क्षेत्राने सर्वच क्षेत्रात आज-काल अक्षरशः क्रांती केली आहे. सगळे जग इतके जवळ आले आहे की, शब्दशः घरात सामावले आहे. आयटी क्षेत्रातील नोकरीला तर काळ-वेळाचे नियम लावताच येत नाहीत. प्रत्येक देशाच्या वेळेनुसार रात्रंदिवस संपर्क, चर्चा, मीटिंग्ज सुरू असतात. त्यामुळे या नोकरीत शरीरावर, मनावर अक्षरशः अत्याचार होत असतात. शरीराचे नैसर्गिक चक्रच विस्कटले जाते. त्यामुळे शारीरिक व्याधी, मानसिक ताण-तणावांचे प्रमाण वाढलेले आहे. तो ताण कमी करण्यासाठी मधून मधून अशी पूर्ण विश्रांती घेणे अत्यावश्यक झाले आहे.

आपल्या रोजच्या सवयींपेक्षा वेगळ्या वातावरणात गेल्याने ही सवयींची साखळी लवकर तुटते. वेगळे ठिकाण, वेगळे वातावरण, वेगळी माणसे, वेगळ्या सोयीसुविधा यामुळे वेगवेगळे अनुभव येत असतात. काही घटक छान सुखद अनुभूती देतात. एखाद्या अनोख्या अनुभवाने ‘अरे व्वा, असे पण होऊ शकते !’ ही नव्याने जाणीव होते. तर निसर्गातल्या विविधतेने मन अचंबित होते. अशा भटकंतीने त्या त्या ठिकाणची नैसर्गिक वैशिष्ट्ये, खाद्यसंस्कृती, लोकपरंपरा यांची ओळख होते. मन आपोआप शांत होत गेलेले आपल्याला जाणवतही नाही. पण आपण मात्र हासत खिदळत, गाणी म्हणत, गप्पा मारत निवांत फिरत असतो एवढे मात्र खरे.

यासाठी मधून मधून असे छोटे छोटे ब्रेक किंवा ‘विसाव्याचे थांबे’ घेणे अतिशय गरजेचे असते. त्यासाठी फार प्रसिद्ध ठिकाणे मात्र नसावीत. कारण पुन्हा तिथेही गर्दी, रांगा लावणे, वेळेच बंधन यामुळे धावाधाव, ताणतणाव येतोच. तुलनेने थोडीशी छोटी अशी ही ठिकाणे मात्र यादृष्टीने खूपच सोईची असतात.

इथे मुख्य म्हणजे मनाला विश्रांती मिळते. जिवलगांशी सुसंवाद होतो. सगळे ताण, गैरसमज विसरून नाती जवळ येतात. निसर्गाचे सान्निध्य अनुभवायला मिळते. खूप काही शिकायला मिळते. काही गोष्टी नव्याने समजतात. आत्मपरिक्षण केले तर चुका लक्षात येतात. मग त्या सुधारायची संधीही मिळते. शेवटी रोजचा जीवन संघर्ष करायचा तो काय फक्त पैसे मिळवण्यासाठी ? नाही! तर कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी, सगळ्यांच्याच आनंदासाठी. तेव्हा रोज धावणाऱ्या प्रवाशांना विश्रांती हवीच ना! त्यामुळे थकलेली गाडी पुन्हा नव्या दमाने रुळावर येते. नवीन ऊर्जा, नवा उत्साह, नवी उमेद, नवे विचार, नव्या योजना घेऊन येते. त्यासाठी मनाला ताजेतवाने बनवणारे असे थांबे घ्यायलाच हवेत.

निसर्गाचे अद्भुत विश्व डोळे भरून पहायला, अनुभवायला हवे. मग मन आपोआप गायला लागते,

या जन्मावर या जगण्यावर

शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे !

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दात काढणे…” – लेखक : श्री अनिल बापट ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

??

☆ “दात काढणे…” – लेखक : श्री अनिल बापट ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

अहं..ss..अहं मी क्रियेबद्दल बोलत नाहीये,तर शब्दशः दात काढण्याच्या प्रक्रियेविषयी बोलत आहे.

रोज दात घासत असूनही वयोमानानुसार एक एक दात माझ्याशी दगाबाजी करत होता.

राहिलेल्या दातांवर, खार न खाता, वेळोवेळी आवश्यकतेनुसार दाताच्या डाॅक्टरकडे जाऊन दातांची सफाई व इतर सोपस्कार करण्याचाही आता कंटाळा येऊ लागला होता.

आपल्याला सोसवेल या दृष्टिकोनातून आताच राहिलेले दात काढून घ्यावेत हा माझा विचार माझे डाॅक्टर जवळपास 3/4 वर्षे मोडीत काढत होते.

2025 साली मात्र ,आता परत दातांची तक्रार आली की दात काढायला सुरवात करायचीच ह्या निर्णयाला ठाम राहून डाॅक्टरांनाही तसे कळवून आलो होतो.

साधारण मार्च महिन्यात दात काढण्याची प्रोसेस चालू झाली.

4/5 भेटीत सर्व दातांना फारसा त्रास न होता निरोप देऊन झाला.जखमा भरून आल्या .आता थोडे थोडे पदार्थ मऊ करून खाता (गिळता )येऊ लागले.

कोणतीही गोष्ट चावून खाता येत नाही हे लक्षात आल्यावर खरी परिक्षा चालू झाली.

आयुष्यभर  कोणत्या ना कोणत्या विषयावर ,आपण दुसर्‍याला आवडीने का चावत असतो त्यामागची मेख लक्षात आली.

” मुकाटपणे गिळा ” असे म्हणायचीही सौ.ना मुभा नव्हती, कारण शब्दशः गिळणेच चालू होते.

ती बिचारी मला काय काय खायला देतात येईल,याच्या कायम विचारात व तयारीत असायची.

दात काढलेले असल्याने  मोकळे झालेल बोळके घेऊन बाहेरही फारसे जाता येत  नव्हते. 

शाळा काॅलेजच्या मित्र मौत्रिणींना,आत्ताच ट्रिपचे बेत ठरवण्याचा दांडगा उत्साह आला होता. सोशल लाईफ  जवळपास बंद पडलेले होते.

हिरड्या मजबूत झाल्याशिवाय कवळीचे माप देणे योग्य ठरणार नसल्याने वाट पहाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. परिस्थितीला मी [दाती त्रूण धरून असेही म्हणण्याची सोय नव्हती म्हणून ] निमूटपणे शरण गेलो होतो.

एक मात्र खरे, तोंडातून शब्द बाहेर पडताच, त्याची पूर्तता व्हावी, या माझ्या अपेक्षांना परिस्थितीने काहीसे योग्य वळण दिले होते.आता उरलेल्या आयुष्यात ते वळण तसेच राहो व वाट सरळ न होवो हीच अपेक्षा आहे.

काही काही वेळेस वळणा वळणाचा घाटही सुखावतो त्याचीच प्रचीती आली.

आईच्या दुधावर पोसलेल्या दातांपासून सुरू झालेला हा प्रवास, कृत्रिम कवळीपर्यंत फारसे धक्के बुक्के न बसता सुखावहपणे पार पडला याचेच समाधान आहे.

मला दुधाचा पहिला दात आल्यावर त्याचे आई वडिलांनी केलेले कोड कौतुक आठवता,कवळीचे कौतुक करायला आता ते हयात नाहीत हीच सल आहे.

– – – समाज काय करतो ते पहायचे. 

लेखक : श्री अनिल बापट

बाणेर,पुणे.

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ || याजसाठी आम्ही करितो अट्टाहास || ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? इंद्रधनुष्य ?

☆ || याजसाठी आम्ही करितो अट्टाहास || ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

साधारण दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका वर्षी आम्हीं श्री क्षेत्र महाबळेश्वर ते प्रतापगड असा दोन दिवसांचा ट्रेल अनुभूती मध्ये आखला होता. आता प्रतापगडावर अगदी दरवाजापर्यंत पक्का रस्ता झाला आहे. त्यामुळं, प्रतापगड हे किती दुर्गम आणि परीक्षा बघणारं ठिकाण आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. पण हे जावळी प्रकरण आजही तसं भीतीदायकच आहे. आपण जावळीत घुसलो की, कुठं ना कुठं तरी प्रसाद मिळतोच. अंग ठेचकाळतं, करवंदाच्या जाळ्या ओरबाडून काढतात, पायात बोट-बोटभर काटे घुसतात. एकूण काय तर, जावळी आहेच दुर्गम..

महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण असलं तरी ते कुणासाठी? पर्यटकांसाठी.. पायी भ्रमंती करणाऱ्या ट्रेकर्सना घामाच्या धारा लागणं स्वाभाविक आहे. आम्ही असे चढून वाट काढत काढत गडावर गेलो. देवळाच्या बाहेरच्या पायऱ्यांवर टेकलो आणि क्षणांत झोपेच्या आधीन झालो. सहसा प्रतापगडावर येणारे पर्यटक इतके थकले-भागलेले पाहण्याची गडकऱ्यांना सुद्धा सवय राहिलेली नाही. त्यामुळं, आमच्यापैकी एकाला जाग आली तेव्हा समोरुन एक पोरगं पळत पळत आलं अन् आमची जुजबी माहिती घेऊन पळून गेलं. आमच्यापैकी कुणाच्याच अंगात त्राण नव्हतं, हे कुणालाही अगदी सहज समजत होतं. काहीजण अजून झोपले होते, काहीजण उठून बसले होते. पाच मिनिटांत दोन मुलं पाण्याची कळशी घेऊन आली. सोबत पाण्याचे दोन चार पेले होते.

“घ्या पानी. च्या आनू का?” दोघांपैकी एक पोरगं बोललं.

“आरं, भज्याचं इचार की. पंधरा वीस लोकं हायेत. पाचशे रुपयाची भजी तर अशीच हानतील गपागप.. ” दुसरं पोरगं त्याच्या कानात सांगत होतं. मी त्यांच्या मागंच पडलो होतो. त्यामुळं मला सगळं ऐकू येत होतं. “आण चहा सगळ्यांसाठी. पण साखर कमी टाक. फार गोड करु नको. ” असं त्याला सांगितलं. दोघांनी भराभर माणसं मोजली अन् पळाले. थोड्या वेळानं चहा आला.

“भजी आनू का?” 

“नको रे. आधी जरा गड फिरुन येतो. मग खाऊ भजी. ” मी म्हटलं.

“पन नक्की खानार नव्हं?” त्यानं खुंटा बळकट करण्यासाठी पुन्हा चाचपणी केली.

“हो रे बाबा. खाणार भजी. ” असं म्हणून आम्ही वर निघालो.

आमच्या गटात एक पाचवीत शिकणारा मुलगा होता. वयानं तो सगळ्यात लहान. पण चांगला काटक होता. दहाच्या दहा दिवस तो मला चिकटलेला असे. आम्ही बालेकिल्ला चढत होतो, दरवाजातून आत गेलो. प्रतापगडावर आता मोठं शॉपिंग मार्केट उभं आहे. भरपूर दुकानं आहेत. महाराजांच्या पुतळ्याकडे जाण्याच्या वाटेवर ती दुकानं लागतात. त्यापैकी एका दुकानात एक मुलगा आणि मुलगी थांबले होते. बहुधा खरेदी करत असावेत.

ऐन मे महिन्याचे दिवस. मुलीने फारच कमी कपडे घातले होते. (बहुधा जितके आखूड कपडे तितकं ऊन कमी लागत असावं) मी त्या जोडीकडं पाहिलं होतं आणि मी त्यांना पाहिलंय, ते ह्यानं पाहिलं होतं.

“ओ दादा, ह्यांना जरा गड दाखवा की. ” दुकानदारानं हाक मारुन सांगितलं. मी हातानंच खूण करुन ‘चला’ असं म्हटलं. ते दोघे आमच्यासोबत आले. मुलगा मुलीची पर्स सांभाळत चालत होता. मुलगी हातात कोल्ड्रिंक चा कॅन घेऊन आमच्यासोबत फिरत होती. आम्हीं तटावरून फिरत होतो. दूरवरून दिसणाऱ्या वेगवेगळ्या घाटवाटा दाखवत होतो.

हा सगळा मुलूख मुळातच माझ्या आवडीचा आहे. अन् विशेषतः कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री मशाली अन् पलोत्यांच्या पिवळ्या तेजाळ प्रकाशात प्रतापगड जो विलक्षण देखणा दिसतो, त्याला तोड नाही.

आम्ही गड पाहिला आणि अन् पुन्हा बालेकिल्ल्याच्या दरवाजापाशी आलो. तोवर विविध ठिकाणी जोडीचे भरपूर फोटो काढून झाले होते. सोशल मीडियावर पोष्टूनही झाले होते. आमची मुलं हे सगळं बघत होती, पण मीच काही बोललो नाही म्हणून कुणीच काही बोललं नाही. त्यांचा निरोप घेताना मात्र या छोट्या मुलानं वार काढलाच.

“आपको अब तक पता चल गया होगा की, यह किला किसने बनाया और यहां क्या क्या हुआ है?” त्यानं थेट विचारलं.

“हां हां.. सब मालूम हो गया. आपके सर ने सब कुछ अच्छे से बताया. ” तो मुलगा म्हणाला.

“तो आपको यह भी समझ आया होगा की, यह किला हमारे लिए बहुत पवित्र जगह है. ” 

“हां. मालूम हो गया. “

“आप मंदिर जाते हो, तब ऐसेही कपडे पहन कर जाते हो?”

“नहीं तो. ऐसे मंदिर कैसे जा सकते हैं?”

“तो यहां पर कैसे आये?”

“हम तो महाबळेश्वर आये थे, तब कॅब वाले ने बोला की यहां पर किला है, तो हम आ गये. ” 

ज्या पद्धतीनं हा मुलगा त्या दोघांना तासत होता, ते बघून सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं. दोन्हीं हातात पट्टे चढवलेला पट्टेकरी जसा पट्टे फिरवत असतो, तसा हा छोटा मावळा त्या दोघांची पिसं काढत होता. गडावरच्या आजूबाजूच्या आयाबाया आवाज ऐकून तिथं जमल्या होत्या.

हा बहाद्दर त्या दुकानदाराला ही म्हणाला, “तुम्ही गडावर येणाऱ्या लोकांना असे कपडे घालून अशा ठिकाणी यायचं नाही असं का सांगत नाही?” दुकानदार गप्प उभा.

“लेकिन यह मंदिर नहीं है, सिर्फ एक किला ही तो हैं” ती मुलगी म्हणाली.

“आपके लिए किला होगा, हमारे लिये मंदिर ही है. आगे से किसी भी किले पर जाओगे तो पुरे कपडे पहन कर जाईये” त्यानं जोरदार ठणकावलं.

सॉरी म्हणून दोघेही तिथून भराभर खाली उतरुन चालायला लागले. अन् इकडं आमच्या ह्या मावळ्याचं गडभर कौतुक. एका आजीबाईंनी सगळ्यांना ताक दिलं. दुकानदारानं त्याला महाराजांचं चित्र असलेला एक टीशर्ट अन् एक छोटीशी मूर्ती भेट म्हणून देऊ केली. ह्यानं माझ्याकडं पाहिलं. मी मान डोलावली. त्यानं मूर्ती घेतली पण शर्ट घेतला नाही.

“महाराजांचं चित्र असं शर्टवर छापणं योग्य आहे का? लोकं हेच शर्ट घालून तंबाखू खातात, इकडं तिकडं थुंकतात, गडावर कचरा करतात. असे शर्ट विकू नका. ” एखाद्या मोठ्या माणसासारखा तो बोलला. सणकन कानफटात बसावी तसे सगळे एक क्षणभर गप्प झाले.

“एवढा माल संपल्यावर पुन्हा नाही विकणार” दुकानदार म्हणाला. पोरांनी टाळ्या वाजवल्या.

संध्याकाळचे चार वाजून गेले होते. आम्हाला पुढं शिवथरघळीत मुक्कामाला पोचायचं होतं. मी सगळ्यांना चला चला म्हणत होतो.

पुन्हा खाली मंदिरापाशी आलो. वरची धुमश्चक्रीची बातमी खाली कळली होती. ती दोन लहान मुलं खाली आमची वाटच पाहत होती.

“दादा, भजी आनू ना?” 

“आण आण” मी सांगितलं. दोघं टणाटण उड्या मारत पळाले.

जरा वेळात झकास कांद्याची अन् बटाट्याची गरमागरम भजी आली. सगळ्यांच्या पोटात भूक पेटलेली.. पाच मिनिटांत भज्यांचा फन्ना उडाला. मग पुन्हा एकदा भजी आली. नंतर चहा आला. खाऊन झाल्यावर मी पैसे विचारले. पोरं काही बोलेनात. वरुन त्यांच्या आजीनं ओरडून सांगितलं, “पैशे नाही घेनार. तुमच्या पोरांनी आज गड लई गाजवला. म्हनून आमची खुशी समजा. ” 

मी नको नको म्हणत वर गेलो. आजींना पैसे घ्यायचा आग्रह केला. तेव्हां त्या म्हणाल्या, “माजी जिंदगी गेली ओ गडावर. आता लोकं कशे बी येत्यात. कशेबी कपडे घालत्यात. लाजच नसती. कोन कुनाला बोलनार ओ? आज तुमचं ते पोरगं बोललं. मला बरं वाटलं. माज्या नातवाचीच उमर असंल त्येची. म्हनून माज्यातर्फे भेट समजा. पन पैशे घेनार नाय. ” 

असली माणसं भेटली की, अंगावर काटा फुलतो. त्यांची वाक्यं काळजावर कोरली जातात. ज्या व्यक्तीला शंभर माणसं सुद्धा ओळखत नाहीत, त्या अतिशय सामान्य माणसाच्या भावना कशा असतात, हे अशा प्रसंगांमधून दिसतं. त्यांच्या माणूस म्हणून जगण्याच्या कल्पना आजघडीला मूक असल्या तरी तितक्याच ठाम आहेत. त्या भावना जपण्यासारखं वातावरण आता या जुन्या गडकऱ्यांना दिसतच नाही. आता खिशात पैशांचा खुर्दा खुळखुळणारी माणसंच जास्त दिसतात. त्यांना खुणावणारी जीवनशैलीच निराळी असते. म्हणून, असा एखादा अपवाद दिसला की, या जुन्या माणसांच्या बुजलेल्या झऱ्यांना पुन्हा पाझर फुटतात.

“अनुभूती” मधून मुलांना नेमकं काय मिळतं, याचं उत्तर हे असं आहे. प्यायला पाणी घेताना सुद्धा मागून घेतील, ते पाणी जितकं हवं आहे तितकंच घेतील, पानात एक घाससुद्धा अन्न वाया घालवणार नाहीत, विनाकारण वीज वाया घालवणार नाहीत. कारण त्यांना या गोष्टींची खरी किंमत कळलेली असते. जेव्हा आपल्या पूर्वजांनी अभिमानानं जपलेल्या गोष्टींची टिंगल उडवण्याचा उद्योग उडाणटप्पू लोकं करतात, तेव्हा त्यांचे कान उपटण्याचं कामसुद्धा ही मुलं अगदी व्यवस्थित करतात. कारण एकच आहे – योग्य काय आणि अयोग्य काय, याची नेमकी जाणीव होणं.

यश, सत्ता, संपत्ती या फार वेगळ्या गोष्टी आहेत. पण सगळ्यात आधी महत्त्वाची आहे ती आपल्या मुलांची योग्य जडणघडण. त्यातला खारीचा वाटा निभावण्याचा प्रयत्न आम्ही अनुभूती च्या माध्यमातून करतो. मशागत व्यवस्थित केली की, त्याची फळं उत्तमच मिळतात. तसंच अनुभूतीचं आहे. स्वामी विवेकानंदांनी समाजाकडे मागितलेले शंभर युवक तयार करण्यासाठी जे जे शक्य होईल ते ते आम्हीं करतो आहोत..

यंदा ७ मे, २०२५ रोजी “अनुभूती” चा शुभेच्छा समारंभ आहे, आणि ८ मे, २०२५ रोजी रात्री ब्राह्म मुहूर्तावर यंदाच्या मोहिमेचा नारळ वाढणार आहे… ! तुम्हां सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हवेतच.. ! 

|| भारत माता की जय ||

(अनुभूती २०२५ – ८ मे, २०२५ ते १९ मे, २०२५ – (संपर्क – 9135329675)

(यंदा अनुभूतीला वीस-बावीस मुलं-मुली घेऊन जातोय. गडोगडीच्या डोंगरदऱ्या, वाड्या, वस्त्या, मेटी सगळं दाखवायला.. माणसांचा परिचय करून द्यायला आणि खरंखुरं आयुष्य जगायला शिकवायला..

 पुढच्या पिढीत माणूसपण रूजलं पाहिजे, आस्था-आपुलकी अंकुरली पाहिजे, त्यांची संवेदनशील मनं बहरली पाहिजेत, यासाठी गेली १९ वर्षं हा खटाटोप मांडतो आहे. आम्ही केवळ निमित्तमात्र, पण सह्याद्रीसारखा इतिहासपुरूष या सगळ्यांना नक्की बाळकडू पाजेल, याची आम्हाला खात्री आहे. – – –मयुरेश डंके.)

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ तहान ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ क्षण सृजनाचे : तहान ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

मी डी.एड. कॉलेजला होते, तेव्हाची गोष्ट. मला बर्‍याचदा ‘समाजसेवा’ हा विषय शिकवायला असे. या विषयांतर्गत एक उपक्रम होता, समाजसेवी संस्थांना भेटी. यात अनाथाश्रम, वृद्धाश्रम, रिमांड होम, मूक-बधीर मुलांची शाळा, गतिमंद मुलांची शाळा आशा अनेक संस्था असत. एका वर्षी मला कळलं, कॉलेजपासून पायी वीस मिनिटांच्या अंतरावर एक चर्च आहे. त्या चर्चने एक क्रेश चालवलं आहे. क्रेश म्हणजे संगोपन गृह. या क्रेशची माहिती घेण्यासाठी मी माझ्या विद्यार्थिनींना घेऊन तिथे गेले.

तिथे असलेल्या मदतनीस बाई आम्हाला क्रेशची माहिती सांगत होत्या. क्रेशला आर्थिक मदत जर्मन मिशनची होती. इथे आस-पासच्या वस्तीतली आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍यांची मुले तिथे येत. त्या बोलत असतानाच तिथे एक दीड – पावणे दोन वर्षाची, नुकतीचा चालायला लागलेली मुलगी लडखडत आली आणि खाली बसून त्या मदतनीस बाईंच्या पायाला तिने मिठी मारली. त्यांनी तिला उचलून कडेवर घेतले. मग म्हणाल्या, ‘क्रेशने अ‍ॅडॉप्ट केलेली ही पहिली मुलगी. एका लेप्रसी झालेल्या भिकारी दांपत्याची ही मुलगी. नन मारियाच्या मनात ही मुलगी भरली. त्यांनी त्या भिकारी दांपत्याला संगितले, की आम्ही तुमच्या मुलीला सांभाळू. तिला खूप शिकवू. तिला चांगलं जीवन जगायला मिळेल. पण आमची एक अट आहे. तुम्ही तिला आपली ओळख आजिबात द्यायची नाही. बघा. तिचं कल्याण होईल. त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. थोडं एकमेकांशी बोलले. त्यांना वाटलं असणार, निदान मुलीला तरी आपल्यासारखी भीक मागत जगायला नको. त्यांनी नन मारियाची अट मान्य केली. आम्ही हिला खूप शिकवणार आहोत. डॉक्टर करणार आहोत आणि पुढे उच्च शिक्षणासाठी जर्मनीला पाठवणार आहोत.’ एव्हाना त्यांनी त्या मुलीला आपल्या दुसर्‍या मैत्रिणीकडे सोपवले होते आणि त्या पुढे माहिती सांगू लागल्या. पण माझं तिकडे लक्षच नव्हतं.

माझं मन त्यावेळी ती लहान मुलगी, तिचे लेप्रसी झालेले आई-वडील, त्या मुलीला डॉक्टर करून जर्मनीला पाठवायचे क्रेशच्या लोक बघत असलेले स्वप्न यातच गुंतून गेले होते.

त्यांची माहिती सांगून झाली होती. आम्ही कॉलेजमधे परत आलो. घटना घडली, ती एवढीच. पण माझ्या डोक्यातून ती मुलगी काही जाईना. बघता बघता डोक्यात एक कथा आकार घेऊ लागली. रात्री सगळं आवरलं, पण मला काही झोप लागली नाही. मग मे उठले. कागद पुढे ओढले आणि लिहायला बसले.

मी त्या मुलीचं नाव ठेवलं जस्मिन. आणि क्रेशचं नाव ठेवलं ‘करुणा निकेतन क्रेश’. हे क्रेश म्हणजे, शहरातील दरिद्री, मागास वस्ती असलेल्या भागातील ‘ग्रीन टेंपल चर्च’ची सिस्टर इंस्टिट्यूट. चर्चचे बिशप फादर फिलिप जर्मनीहून आले होते. त्यांच्या सोबत आल्या होत्या सिस्टर नॅन्सी, सिस्टर ज्युथिका, सिस्टर मारीया. हे सारेच जण ‘दीन-दुबळ्यांची सेवा ही प्रभू येशूची सेवा’, या श्रद्धेने काम करत होती. थोड्याच काळात क्रेशचा नावलौकिक वाढला. आता इथे ३५० च्या वर मुली आहेत. त्या वेगवेगळ्या वयाचा वेगवेगळ्या इयत्तेतल्या आहेत. कुणी तिथेच रहाणार्‍या आहेत. कुणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबून संध्याकाळी घरी जाणार्‍या आहेत.  स्थानिक लोकांनीही मदत केलीय, अशी पार्श्वभूमी मी तयार केली.

कथेची सुरुवात मी जस्मिन डॉक्टर झालीय आणि जर्मनीला उच्च शिक्षणासाठी निघालीय. क्रेशच्या रिक्रिएशन हॉलमध्ये तिचा निरोप समारंभ झालाय. सर्वांनी तिला तिच्या कार्यात यश लाभावे, म्हणून प्रभू येशूची प्रार्थना केलीय आणि तिला शुभेच्छा दिल्यात.

ती जर्मनीला लेप्रसीवर विशेष संशोधन करणार आहे आणि आल्यावर लेप्रसी झालेल्यांसाठी क्रेश सुरू करणार आहे. आता ती पायर्‍या उतरतेय. तिच्या मागे क्रेशचे लोक, मुली तिला निरोप देण्यासाठी गेटपर्यंत आल्या आहेत. गेटशी आल्यावर तिचे लक्ष नेहमीप्रमाणे महारोगी असलेल्या भिकार्‍यांकडे जाते आणि ती मनातल्या मनात म्हणते, ‘माझ्या अज्ञात माता-पित्यांनो, मला आशीर्वाद द्या. मला माझे स्वप्न पुरे करता येऊ दे. माझे ध्येय साध्य करता येऊ दे, अशी प्रभूपाशी प्रार्थना करा.’

मी पुढे लिहिलं, क्रेशमध्ये अगदी लहानपणी आलेली जस्मिन हळू हळू मोठी होऊ लागली. तशी इतरांच्या बोलण्यातून तिला आपली जीवन कहाणी तुकड्या तुकड्याने कळली. आपण लेप्रसी झालेल्या भिकार्‍याची मुलगी आहोत, हे तिला कळलं. मग त्यांच्याकडे बघायचा तिला नादच लागला. कोण बरं असतील यातले आपले आई-वडील. तिला कुणाचा नाक आपल्यासारखं वाटे, कुणाची हनुवटी, तर कुणाचे कपाळ. कोण असतील यातले आपले आई-वडील?  ती पुन्हा पुन्हा विचार करी. ती आपल्याकडे बघते आहे, हे पाहून भिकारी आपली थाळी, वाडगा वाजवत भीक मागत. म्हणत, ‘एक रुपया दे. देव तुला श्रीमंत करेल.’ तिला हसू येई, आपण त्यांना पैस दिल्यावर, जर देव तिला श्रीमंत करणार असेल, तर तो डायरेक्ट त्यांनाच का पैसे देणार नाही? अर्थात तिला कितीही द्यावेसे वाटले, तरी तिच्याकडे पैसे नसत. तिच्या सगळ्या गरजा क्रेश भागवत असल्यामुळे तिच्याकडे पैसे असण्याचा प्रश्नच नव्हता.

जस्मिन कथेची नायिका. तिचं व्यक्तिमत्व उठावदार, आकर्षक असायला हवं. मी दाखवलं, की ती प्रेमळ, मनमिळाऊ आहे. इतरांना मदत करायाला ती नेहमीच तत्पर असते. प्रभू येशूवर तिची अपार श्रद्धा आहे. त्याच्या उपदेशाप्रमाणे वागण्याचा ती नेहमीच प्रयत्न करते. नाताळ आणि इस्टरच्या वेळी चर्चच्या समोर बसलेल्या भिकार्‍यांना मिठाई, केक वगैरे वाटले जायचे. जस्मिन या कामात नेहमीच पुढाकार घेई.

अनेकदा जस्मिनच्या मनात विचार येई, आपण सिस्टर मारीयाच्या नजरेस पडलो नसतो आणि आपल्याला अ‍ॅडॉप्ट करण्याचा त्यांच्या मनात आलं नसतं किंवा आपल्या आई-वडलांनी त्यांची अट मान्य केली नसती, तर आपलं आयुष्य कसं घडलं असतं? या समोरच्या भिकार्‍यांमध्ये आणखी एकाची भर पडली असती. मग तिच्या अंगाचा थरकाप होई.

आज मात्र येशूच्या, चर्चच्या आणि क्रेशच्या कृपेमुळे ती डॉक्टर झालीय आणि उच्च शिक्षणासाठी आणि लेप्रसीवरील संशोधनासाठी जर्मनीला चाललीय. तिचा निरोप समारंभ झाला, तिथे तिच्या समोरच्या भिंतीवर एक भलं मोठा पोस्टर लावलेलं आहे. त्यात एक मध्यमवयीन स्त्री रेखाटली आहे. तिने हाताची ओंजळ केली आहे. आणि येशू त्यात वरून पाणी घालत आहे. खाली लिहिलं आहे, ‘त्याने दिलेल्या पाण्याने जो तहान भागावतो, त्याला पुन्हा तहान लागत नाही.’

हे पोस्टर मी मिरज मिशन हॉस्पिटलच्या दारातून आत गेल्याबरोबर दिसेल असं दर्शनी भिंतीवर लावलेलं पाहिलं होतं. ते तिथून आणून, मी या कथेत रिक्रिएशन हॉलच्या भिंतीवर लावलं. जस्मिनचं लक्ष वारंवार त्या पोस्टरकडे जातय. तिला फादर फिलीपचं सर्मन आठवतं. कुणा शरमोणी स्त्रीची कथा त्यांनी सांगितली होती. त्या पापी स्त्रीला प्रभू येशूंनी दर्शन दिलं. तिला क्षमा केली. तिला जीवंत पाणी प्यायला दिलं. आध्यात्मिक पाणी. त्या प्रसंगावर ते पोस्टर आहे. तिची तहान कायमची भागली, असं पुढे कथा सांगते.

स्मिनला वाटतं, आपण तर प्रभू येशूने दिलेल्या पाण्यातच आकंठ डुंबत असतो. फादरनी आपल्याला या पाण्याजवळ आणलं. पण तरीही आपल्याला तहान लागलीय. आपल्या न पाहिलेल्या आई- वडलांना पाहण्याची तहान. खूप तहान…. घसा कोरडा पडलाय. जीव घाबरलाय, एवढी तहान . ..

क्रेशच्या बाहेर पडताना जस्मिनच्या मनावर या सार्‍या विचारांची गडद छाया आहे. टॅक्सीजवळ उभी राहून सुनीता तिला लवकर येण्यासाठी खुणावते आहे. ती जस्मिनला विमानताळावर पोचवायला निघलीय. जस्मिन टॅक्सीत बसते. मग तिला पुन्हा काय वाटतं, कुणास ठाऊक? ती दरवाजा उघडून बाहेर येते. आज तिच्या पर्समध्ये पैसे आहेत. ती भिकार्‍यांच्या थाळ्यात, वाडग्यात पैसे टाकते. मनात म्हणते, ‘माझ्या अज्ञात माता-पित्यांनो, मला माझ्या कार्यात यशयावे, म्हणून तुम्ही प्रार्थना करा. मला आशीर्वाद द्या.’

जस्मिन टॅक्सीत बसते. टॅक्सी सुरू होते. चार विझू विझू झालेले क्षीण डोळे टॅक्सी गेलेल्या दिशेकडे असहाय्यपणे पहात रहातात.

इथे मी कथेचा शेवट केलाय.

कधी कधी मनात येतं, या दिवशी आम्ही त्या क्रेशला भेट दिली नसती, तर ही अशी कथा  माझ्याकडून लिहून झालीच नसती

© सौ उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares