फार घाई होते हल्ली… प्रत्येक क्षणावर कशाची तरी मोहर उमटलीच पाहिजे म्हणून घाई… क्षण फुकट वाया गेला म्हणून… लगेच गळे काढायची पण घाई…माझ्याजवळ काही आलंय की जे अजून मलाही नीट नाही उमगलंय…ते पटकन जगाला दाखवायची घाई….जगापर्यंत ते पोहचलंय की नाही हे आजमावायची घाई…पोहचलं असेल तर त्याचे निकष जाणून घ्यायची घाई….गर्भातल्या श्वासांना डोळे भरुन बघायची घाई….व्हेंटिलेटरवरच्या श्वासांना निरोप द्यायची घाई….मुखातून पडलेला शब्द अवकाशात विरायच्या आधी पकडायची घाई…विचारांना अविचाराने बाजूला सारायची घाई….
नजरेत दृश्य येताक्षणी कँमेऱ्यात बंद करायची घाई…विचाराचा कोंब फुटता क्षणी, कृतीत उतरायची घाई…
☆ फुगलेलं आणि रुसलेलं दार… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
एक होती “ही” आणि एक होती “ती”.
दोघी समवयस्क आणि अनेक वर्ष शेजारी-शेजारी…. म्हणजे तशी “ही” राहायची पहिल्या मजल्यावर आणि “ती” दुसऱ्या. पण शेजारधर्म मात्र कायमच होता. कधी काही लागलं की हक्कानी सांगायच्या एकमेकांना.
दोन्ही घरचा एक तरी डबा किंवा वाटी कायम दुसऱ्या घरी असायचीच.
एके दिवशी “ही” च्या ह्यांना पावसामुळे किराणा आणायला जमलं नव्हतं. मग काय ?? “ही” गेली वाटी घेऊन साखर आणायला “ती” च्या कडे. “ती”नी सुद्धा “ही” चं हसत स्वागत केलं आणि दिली लगेच साखर……
“ही” चपला घालत थोडी आडोशाला काय गेली तशी “ती” जोरात पुटपुटली. “ रोजचाच ताप झालाय हा .. कटकट नुसती !!” … असं म्हणत वैतागून “धाडकन” दार लावलं जोरात. “ही” ला ऐकू गेलंच .. बहुतेक ऐकू जाण्यासाठीच जोरात बोलली होती “ती”.
मग “ही” ची पण जरा सटकलीच. तणतणत वरती आपल्या घरी आली. “ एक वाटी साखर काय मागितली तर
इतकं ?? जसं काही इस्टेट मागितली “ती” ची !!”…. असे ताशेरे झोडत “ही” नी दुप्पट जोरात आपलं दार लावलं.
इतकंss की खाली “ती” ला मुद्दाम ऐकू जावं.
तेव्हापासून कानाला खडा…. “ही” आणि “ती” यांचं संभाषणच बंद.
“ती”ला कळलंच नाही नेमकं काय झालंय. म्हणून एक-दोनदा गेली बोलायला. पण “ही” ढुंकुन सुद्धा बघायची नाही “ती”च्याकडे…… ‘ दोस्ती मे दरार… ‘
काहीच दिवसात बिल्डिंगला पालिकेकडून धोकादायकची पाटी लागली. मग सगळेच वेगवेगळ्या दिशांना पांगले.
दोघींचा काहीच संबंध आणि संपर्क उरला नाही. काळ लोटला .. वयं वाढली.
जवळ एक आध्यात्मिक शिबिर होतं चार दिवसांचं. दोघींनीही तिथे नाव नोंदवलं होतं. योगायोगाने दोघींचीही राहायची व्यवस्था एकाच खोलीत. पण खूप गप्पा माराव्या असं वाटत असलं तरीही मनात दुरावा होताच अजून.
पण “जुनं सगळं सोडून नव्याने संवाद साधा” अशी शिबिरातली शिकवण. म्हणून शेवटच्या दिवशी बोलल्या एकदाच्या…..
“ही” ची तणतण मागील पानावरून पुढे..
“ काय गं ?? xxxxxxxx .. इस्टेट मागितली होती का ?”.. वगैरे वगैरे.
“ का गं ? असं का विचारतेस ??”
“ मग रोजची कटकट म्हणत इतक्या जोरात तोंडावर दार आपटलंस ते माझ्या ?
“ती” नी डोक्याला हात लावला.
“ बाप रे !! म्हणून बोलत नव्हतीस होय इतके वर्ष ??” अगंss ते मी तुला नाहीss त्या दाराला म्हणत होते आमच्या !! आठवतंय ना, पावसाळा होता तेव्हा ?? कसलं फुगलं होतं ते “दार”.. लावताना नाकी नऊ यायचे अगदी !! त्याला
रोजचा ताप म्हणाले होते ss !! ”
“ अय्याss हो का?? .. हो बरोबर .. आमचं पण दार खूप फुगलं होतं तेव्हा. “
……. दोघींचा “रुसवा” कारण दाराचा “फुगवा” … एवढंच कारण फक्त…
तेव्हा लक्षात ठेवा “ पावसाळ्यात दारं फुगतात ”. कुणी तुमच्या समोर असं धाडकन दार लावलं तर गैरसमज नसावा.
बिल्डिंगमध्ये दारांचा असा जोरात आवाज येऊ शकतो….. “ नवरा बायकोचं भांडण झालं असेल ” असे निष्कर्ष लगेच काढू नका.
आणि हो ss ……
आपण सगळ्यांनीच “ मनाची दारं ” मात्र फुगण्यापासून वाचवूया…. किलकिली तरी ठेवूया निदान…..
चांगले विचार आत यायला आणि वाईट बाहेर घालवायला.
सरतेशेवटी सगळ्यात महत्वाचं…
कधीही काही वाटलं तर आडपडदा न ठेवता लगेच बोलूया एकमेकांशी. बरेचदा कारण क्षुल्लक असतं पण आपण उगाच गंभीर समजतो.
— बघितलं ना ss “ही आणि ती”च्या चांगल्या मैत्रीची कितीतरी वर्ष वाया गेली.
— आणि कारण काय तर “ घराचं फुगलेलं ” आणि “ मनाचं रुसलेलं ” .. “दार”.
संग्राहिका: सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ फुटबॉल विश्वचषक 2022… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
किलियन एम्बापे यास,
मानाचा मुजरा.तो अंतिम सामना विश्वचषक जेते पदासाठी तु आणि तुझ्या संघाकडून खेळला गेला त्याला तोड नाही.. प्रतिपक्षाच्या संघाकडून दोन गोल करून जे नैतिक दडपण आणले गेले , आणि हे ही तितकेच खरे आहे कि जो संघ असे गोल करतो तोच या सामन्याचा जेता दावेदार ठरतो हा इतिहास आहे, आणि हे ही तितकेच खरे आहे कि आजवरचे झालेले अंतीम सामने हे उभय पक्षात एकांगी झाले होते.. खरी लढत, त्या खेळातला तो शेवटच्या क्षणापर्यंतचा थरार फार क्वचितच अनुभवायला मिळाला होता. त्यावेळी बडे बडे दिग्गज नामांकित खेळाडूंचा कस लागणारी खेळीचं उत्कंठेचे समाधानही म्हणावं तसं लाभलं नाही.. अटीतटीच्या लढती झाल्या असतील पण आजच्या या लढतीचा अविस्मरणीय थरारची नोंद इतिहासात प्रथमच होईल.. दडपण आणि स्पर्धेतला खेळ यांचाच मिलाप कायम मैदानावर असतो त्यात अंतीम सामना आणि तोही विश्वचषकाचा असेल तर खेळाडू, तिथे जमलेले खेळाचे चाहते, जगभरातले चाहते इ्. इ. चें काळजाचे ठोके क्षणा क्षणाला वाढवत नेणारा तो माहोल असतो. असं सारं काही या अनुभवाची शिदोरी तुमच्या जवळ होती ती कालच्या खेळात अटीतटीच्या लढतीत दाखवून दिलीत.. कुठल्याही प्रकारची त्या खेळाची गोलाची आकडेवारीत, जी सर्वांना विदीत आहे, त्या तपशिलात न जाता, त्याचा थरार आणि थरारक खेळाचं कौतुक तुझं आणि तुझ्या संघाचं करावं तितकचं थोडं आहे.. जिंकणं हाच ध्यास तिथं दोन्ही बाजूला दिसत होता…मानवी प्रयत्नाला दैव देखिल साथ देते याची प्रचिती सुद्धा पदोपदी जाणवत होती.. नव्हे नव्हे ते दैव सुद्धा काही काळ स्वताला हरवून त्या खेळाचा थरार बघण्यात मश्गुल झाले असावे असेच वाटत होते.. इतका सुंदर तोडीसतोड खेळ, त्यातील पदलालित्य, गती, आवेग, शह, काटशाह, ऐनवेळेस बदल केलेली चाल, प्रतिचाल, गोलाचं लक्ष्य, ॲटक डिफेन्स, अश्या अगणित गोष्टींवर त्या वेगवान हालचालीत भानं ठेवून शांत डोक्यानं खेळायचं हे येरागबाळयाचं काम नाही..म्हणून तर अख्ख जगं या खेळानं खुळावले आहे..महासागराला देखिल मागे टाकले जाईल त्याहून कितीतरी प्रचंड चाहत्यांची संख्या हि जगभरात आहे आणि तिला ओहोटी हा शब्दच ठाऊक नाही.. इतकंच नाही तर राष्ट्रप्रमुख सुद्धा या खेळाचे चाहते, प्रेमी असावेत, आपल्या देशातील खेळाडूंचा खेळ पाहण्यास आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्यक्ष हजर असतात, हरलो तरी पाठीवर हात फिरवतात,उमेद देतात,हे पाहून देशभिभानाने उर भरून येतो.. मी देशाचा आहे आणि मी देशा करता खेळतो तेव्हा केवळ नि केवळ खेळावरच ध्यानकेंदीत झालेलं असतं.. अर्थात खेळ आहे तिथं हार जीत हि असायचीच, वेळेची मर्यादेची चौकट आणि जेता ठरवण्याचा निकषाचे पालन करुन विजेता हा ठरविला जातो..म्हणून काही जो जीता वही सिकंदर असा पूर्वापार प्रघात असला तरी हारणारा हा काही लेचापेचा नसतो.. हेच तुझ्या खेळातून तू दाखवून दिलेस.. भले त्या क्षणी तुझ्या मनात सामना हरल्याचं शल्य मनात टोचत असेल पण म्हणून तू दिलेली अखेर पर्यंतची लढत कमी मोलाची ठरत नाही.. सरतेशेवटी हा खेळ आहे.. एखादी खेळातील चुकचं सगळा खेळाचं पारडंचं बदलून टाकण्यास कारणीभूत होते. तो क्षण आपला नसतो..आपल्या हातात काहीही उरलेलं नसतं आणि शल्य मनात टोचत राहतं.. समजूती चे कोरडे सोपस्काराने मन शांत होत नाही, निवळत नाही.. अगदी खेळ संपल्यावर चाहत्यांकडून नि राष्ट्राध्यक्षांकडून सुद्धा मैदानावर येऊन पाठीवरून हात फिरवून सांगितले तरीही.. तुझा शांत आणि निराश चेहरा हेच दाखवत होता..
किलियन, मला या खेळातलं ओ कि ठो काही कळत नाही पण का कुणास ठाऊक तो गोल झालेला जेव्हा दिसतो तेव्हा मी पण आनंदाने टाळया वाजवतो.. फक्त विश्वचषकाचे सामने कधी कधी पाहतो.. आणि या खरा खेळयातील थराराचा अनुभव घेतो.. जे त्याच्या खेळाचं कौतुक होतचं होतं पण तितक्याच तोलामोलाच्या प्रतिस्पर्धीचं कौतुक मला करावसं वाटतं.. मला प्रत्यक्षात तुझ्या पाठीवर थाप दयायला आनंद वाटला असता पण ते अशक्य असल्याने या पत्राद्वारे ती थाप तुला पोहचवतं आहे…
.. सातत्यपूर्ण सराव, खेळा प्रती देशाभिमान, उंचावलेला आत्मविश्वास, नि सांघिक डेडीकशन या सर्व गुणात्मक गोष्टीनी परिपूर्ण असलेला खेळाडूच अशी देदीप्यमान कामगिरी करू शकतो हेच दोन्ही बाजूच्या संघानी जगाला दाखवून दिले आहे… एका रात्रीत चमकते सितारे जन्माला येणाऱ्या माझ्या देशाला तूम्ही आदर्श घालून दिला आहे.. आम्हाला पचनी कधी पडेल तो सुदिन कधी उगवतोय याची वाट पाहत आहे..कारण मी जिथं राहतो तिथं क्रिकेट आणि राजकारण हाच देशाचा प्रमुख सर्वव्यापी खेळ आहे.. आणि बाकी सारे त्यापुढे तुच्छ आहे.. हाच तुझ्यात आणि माझ्यातला मोठा फरक आहे.. असो.
यदाकदाचित मी फ्रान्सला आलो तर मी निश्चित तुझी भेट घेईन पण ते जरा अवघडच आहे.. पुढचा फुटबॉल विश्व चषकावर तुझंच नाव कोरलेलं बघायला मिळेल हि सदिच्छा करुन हे पत्र पूर्ण करतो..
एक अद्भुत, मनभावन आविष्कार म्हणजे रामायण. अगदी वाचन शिकायच्या सुद्धा आधी हे अद्भुत रामायण कळलं ते दोन व्यक्तींमुळे एक म्हणजे “गीत रामायणा” चे रचयिता ग.दि. माडगूळकर आणि दुसरे म्हणजे ही गीत सुस्वर आवाजात गाऊन आम्हाला झोपाळ्यावर झुलवणारे माझे बाबा. माझ्या बाबांचा आवाज खूप गोड आहे आणि अगदी मोजकीच आवडीची गीतं ते गातात त्यातीलच एक “गीत रामायणा”मधील गाणी. अर्थात बाबांना ऐकलं फक्त आणि फक्त घरच्यांनीच आणि खास करुन आम्ही, त्यांच्या मुलांनी. ते बाहेर कुठेही,कधीच गात नाहीत. पण खर सांगायचं तर लहानपणी रामायण, ऐकलं,समजलं आणि आवडलं ते फक्त आणि फक्त गदिमांमुळे आणि बाबांमुळेच. ग.दि.माडगूळकर ह्यांना “गदिमा” ह्या संक्षिप्त नावाच्या रुपात लोक ओळखायचे.
स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’
माडगूळकर म्हणजे एका चांगल्या अर्थाने सर्वगुणसंपन्न व्यक्ती. ते कवी,गीतकार, लेखक असून त्यांनी विविध अंगी साहित्यिक क्षेत्रात अनमोल योगदान दिलयं.आज त्यांचा स्मृतीदिन.त्यांना विनम्र अभिवादन.
गदिमा भावकवीही होते. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. त्यांनी लिहिलेली बालगीते आणि भक्तीगीते आजही फार लोकप्रिय आहेत. शिर्डीच्या साई बाबांची काकड आरती ही माडगूळकरांनी लिहिलेली आहे, या आरतीला सी. रामचंद्र यांनी अतिशय उत्तम चाल लावली आहे. या काकडआरती साठी गदिमांनी ‘रामगुलाम’ हे टोपणनाव घेतलं होतं.पेशवाईवर त्यांनी गंगाकाठी नावाने काव्य कथा लिहिली आहे. गदिमांनी अथर्वशिर्षाच मराठीत भाषांतर केले.
ग दि माडगूळकर यांनी ‘भूमिकन्या सीता” या नाटकातील पदेसुद्धा लिहिली होती. ‘मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी’, ‘मानसी राजहंस पोहतो’,’सुखद या सौख्याहुनी वनवास ‘ ही त्यातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध गाणी.
कित्येक आपल्याला खूप आवडत असलेली गाणी आपण कायमं ऐकतो आणि गुणगुणतो पण बरेचदा आपल्याला मिहीती सुद्धा नसतं ह्या गीतांचे रचयिते कोण ?
गदिमांची आपण कायम आवडीने ऐकतं आलो ती बालगीतं पुढीलप्रमाणे,” नाचरे मोरा आंब्याच्या वनात,नाच रे मोरा नाच”, “झुक झुक झुक झुक अगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया,”बाळा जो जो रे,बाळा जो जो रे,”गोरी गोरीपान, फुलासारखी छान, दादा, मला एक वहिनी आण”,”चांदोबा चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का?”, तसेच त्यांची लोकप्रिय भक्तिगीते पुढीलप्रमाणे,
“कबिराचे विणतो शेले, कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम, भाबड्या या भक्तासाठी, देव करी काम ! “,”दैवजात दुःखे भरता.. दोष ना कुणाचा पराधीन आहे.. जगती पुत्र मानवाचा “, “इंद्रायणी काठी देवाची आळंदी “,”वेदांनाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा “,”विठ्ठला तू वेडा कुंभार “,. याबरोबरच त्यांची देशभक्तीपर गीतं ही मनाचा ठाव घेतात ती पुढीलप्रमाणे,”हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे”,
“माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू जिंकू किंवा मरू ,”वेदमंत्राहून आम्हां वंद्य वंदे मातरम्”
त्यांचे चित्रपटक्षेत्रात ही तेवढेच महत्त्वाचे योगदान आहे, त्यांची ह्या क्षेत्रातील काही लोकप्रिय गीतं पुढीलप्रमाणे,”बुगडी माझी सांडली ग… जाता साताऱ्याला,”सांगा या वेडीला, माझ्या गुलछडीला”,”एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे”,”उद्धवा, अजब तुझे सरकार”,”या चिमण्यांनो परत फिरा रे”,फड सांभाळ तुऱ्याला ग आला तुझ्या उसाला लागंल कोल्हा”,”अपराध माझा असा काय झाला का रे दुरावा ,का रे अबोला” आणि अशी कित्येक लोकप्रिय गीतं गदिमांनी त्यांच्या कारकिर्दीत १५७ पटकथा आणि २००० गाणी लिहिली. त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटांसाठी कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. लिखाणासोबत त्यांनी काही चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला.
गदिमा स्वातंत्राच्या चळवळीत देखील अग्रभागी होते. याच काळात त्यांची यशवंतराव चव्हाण यांच्याशी चांगली ओळख झाली. त्या वेळी त्यांनी जे काही काव्य रचलं ते “शाहीर बो-या भगवान”ह्या टोपणनावाने. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना १९६२ मध्ये गदिमांची राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर आमदार म्हणून करण्यात आली होती.
भारत सरकारने १९६९ मध्ये गदिमांना पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव केला.१९५७ मध्ये गदिमांना संगीत नाटक अकादमीचा उत्कृष्ट नाट्य लेखक पुरस्कार मिळाला. तसेच १९५७ मध्ये संगीत नाटक अकादमी चा उत्कृष्ट नाट्य लेखक पुरस्कार ,१९६९ मध्ये ग्वाल्हेर येथीलअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.१९७१ मध्ये विष्णुदास भावे सुवर्णपदकाचे मानकरी हे झालेत.१९७३ मध्ये यवतमाळला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ह्यांनी भुषविले.त्यांच्या बऱ्याच गाण्यांना व चित्रपटांना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले आहेत.
खरोखरच ह्यांच्या सारख्या अनेक साहित्यिक कलावंतानी आपल्यासाठी आनंद फुलविणारी किती अनमोल संपत्ती ठेवलेली आहे हे बघून नतमस्तक व्हायला होतं.
☆ अभ्यासक्रमातील बदल आणि माझं ‘बाल’ पण ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆
नातवाचा अभ्यास घेताना मला हे बदल फार जाणवले, विशेषतः ‘अक्षरबदल’ ! शेंडीवाला ‘श’ शेंडी कापून थेट मुंडक्याने रेषेला चिकटवला. लयदार ‘ल’च्या हाती काठी देऊन टाकली. नातू म्हणाला, ‘ शाळेत असंच शिकवलंय.’ आता नवीन प्रचलित पद्धती आपल्याला माहीत नसतात, त्यामुळे मी गप्प बसले. पण अशा वेळी मी त्याला आवर्जून आपल्या वेळी शाळेत काय शिकवलं, हे सांगत रहाते. पण मजा अशी आहे की, हे बदल कोण, केव्हा, कशासाठी करतं, हेच मुळी कळत नाही. जाग येते तीही कित्येक पिढ्या यात भरडल्या गेल्या की.
— माझ्या आठवणीत माझ्या शैक्षणिक कालात (१९५६ – १९६६) घनघोर बदल झाले. माझे अर्धेअधिक शिक्षण जुन्या पद्धतीने झालेले — म्हणजे —
इंग्लिश भाषेचा समावेश, जो आठवीपासून अभ्यासक्रमात असे, तो पाचवीपासून सुरू झाला. तोवर आम्ही सहावीत सरकलो होतो, मग आम्ही त्या एका वर्षात पाचवी, सहावी अशा दोन पुस्तकात दबलो.
शुद्धलेखन – तेव्हा आठवतंय, शुद्धलेखन घालताना शिक्षिका किती जाणीवपूर्वक उच्चार करायच्या, त्यामुळे कळायचं तरी. (कां, कांहीं, आंत, नाहीं, जेंव्हा, तेंव्हा, कीर्ति, मूर्ति इ.) ह्या अनुस्वारांचा उद्देश त्यावेळी बालबुद्धीला उमगला नाही आणि कळवण्यास अत्यंत खेद होतो की अजूनही कळला नाहीये.
नवीन पद्धतीत किती तरी अनुस्वार गायब झाले, (ते बाकी बरीक झाले.) -हस्व – दीर्घ बदलले.
पण आता संगणकावर काही जोडाक्षरे टंकित केली की चमत्कार होतो – उदा. अद् भुत – आता ‘भ’ द’च्या पायाला लोंबकळतो – अद्भुत / उद् घाटन – यातही तसेच – ‘द’च्या पायाशी ‘घ’ – उद्घाटन.
विचार करा – ‘अब्द’, जो उच्चारतांना ‘ब’चा उच्चार ‘द’च्या आधी आणि अर्धा होतो – अ+ब्+द या पद्धतीने बघायला गेल्यास अ+द्+भु+त अशी उकल करता येते. पण या नवीन टंकपद्धतीने मात्र हा अद्भुत – अ+भ्+दु+त असा वाचला जाईल. तेच ‘उद्घाटना’चे – उ+घ्+दा+ट+न. वा+ङ्+म+य – या नवीन पद्धतीत वाङ्मय – ‘म’चा उच्चार पूर्ण करायचा की ‘ङ्’चा? अशी आपल्या जोडाक्षरांची तोडफोड अपेक्षित आहे का?
‘र’ हे अक्षर अर्धं होऊन विविध प्रकारे जोडाक्षरांत येते. उदा. – अर्धा, रात्र, व्रण, तऱ्हा, कृपा इ. यातील आडवा होऊन जोडला जाणारा ‘रफार’ टंकलिपीत गायब झाला – आता असा ‘र’ जोडायचा तर गो+र्+हा असं टंकित केलं की तो ‘गो-हा’ न दिसता ‘गोर्हा’ असा दिसतो. मग चेहेरा होतो गोर्हामोर्हा!
दशमान पद्धती आणि नाणी – दशमान पद्धत सोपी होती, पण आपण या ‘बदला’च्या (transit period) तडाख्यात (की चरकात?) सापडलो होतो – डझन, औंस, पौंड, इंच, फूट, मैल यांची सांगड कि.मी., सें.मी., किलोग्रॅम वगैरेशी झगडून जमवली. (अजूनही इंच, फूट, डझन सोप्पं वाटतं.) माझी उंची मला फूट-इंचात सांगता येते. पण सें. मी. म्हटलं की झालीच गडबड. फळं डझनाच्या भावात असत, ती वजनावर मिळू लागली. चोवीस रूपयात डझनभर मिळणारे चिक्कू चोवीस रूपये किलो घेताना सहाच मिळू लागले. (एवढेच बसतात वजनात?) नाण्यांनी तर घोळसलंच. पैसे, आणे, रूपये हे आबदार वाटायचे, नाण्यांना वजनही चांगलं असे. कमी किंमतीचा पैसा तांब्याचा, आणि तरी चांगला ढब्बू असायचा, किंवा भोकाचा ! भोकाची नाणी गोफात बांधून ठेवता यायची. (भोकाचे पैसे वापरून लोकरीच्या बाळमोज्याचे छोटे गुंडे करता यायचे.) नाणी – आणा, चवली, पावली, अधेली (अशी गोंडस नावे असली तरी) वजनदार असत. रूपया तर ठणठणीत – त्याला ‘बंदा’ म्हणावा असाच ! सुरुवातीला रूपया चांदीचा होता – त्यातून ब्रिटिश राजवटीतील रूपये तर कलदार चांदीचे – राजा छाप, राणी छाप असे होते. हे चलनातून बाद केल्यावर ते दागिन्यांच्या पेटीत गेले. मग दिवाळीत ओवाळणीपुरते बाहेर येत, परत कडीकुलपात !
नवी नाणी चिल्लर दिसत – एक पैसा – गोल, तांब्याचा – आकार नखावर मावेल एवढा ! पुढे तर तो ॲल्युमिनिअमचा चौकोनी झाला. एक आणा म्हणजे सहा नवे पैसे. दोन आणे म्हणजे बारा नवे पैसे. तीन आण्यांचा भाव एका नव्या पैशाने वधारला – म्हणजे एकोणीस नवे पैसे झाला. का? तर दशमानात एक रूपया = शंभर नवे पैसे, तर त्याचे चार भाग पंचवीस नवे पैसे म्हणजे जुने चार आणे – आता पंचवीसला चाराचा भाग समान कसा बसणार? तीन आण्याच्या पदरात एक नवा पैसा टाकून केली जुळवाजुळव ! त्यातून दोन, तीन, पाच, दहा, वीस पैसे नक्षीदार, पण (जनभाषेत) ती आलमिनची नाणी, वजनाला हलकी – पुढे पुढे ती लमाण्यांच्या पोशाखावर जडवलेली दिसू लागली.
पावलीचं, अधेलीचं रूपांतर पंचवीस पैसे आणि पन्नास पैशात झालं आणि त्यांचे चेहरे पडेल दिसू लागले.
त्यातल्या त्यात रूपया जरा बरा म्हणायचा, तर अलिकडे तोही पन्नास पैशाच्या आकारात गेला आणि त्याचा रुबाबच संपला. पाच आणि दहा रूपयाची नाणी अजून तरी अंग धरून आहेत.
पण काय आहे, शिक्षणातील या बदलांनी बालमनात घातलेले उटपटांग गोंधळ, ‘ बाल ‘ पांढरे झाले तरी अजून ठिय्या मारून आहेत, त्याचं काय करावं बरं????….
१९४२ – महात्मा गांधींनी इंग्रजांना ‘ छोडो भारत ‘ चा इशारा दिला होता. वणव्यासारखा हा इशारा सा-या हिंदुस्थानभर पसरला. गणपत शिंदे तेव्हा एका प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता. तालुक्याच्या गावी एका राष्ट्रीय नेत्याची सभा ऐकून, त्याच क्षणी आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन, त्याने स्वतःला
स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले. घरदार सोडून रात्रंदिवस तो हेच काम करत राहिला. स्वातंत्र्य मिळाले तो दिवस तर त्याच्या दृष्टीने परमोच्च होता. तालुक्याच्या अनेक सरकारी कार्यालयांवरून इंग्रजी ध्वज उतरवून तिरंगा फडकावण्यात त्याला कोण आनंद झाला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचे सुराज्य करण्याच्या पंडित नेहरूंच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्याने खेडोपाड्यात जाऊन निरक्षर प्रौढांना विनामोबदला शिकवण्याचे काम हाती घेतले. त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्याच्याबरोबरीने स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेले बरेच लोक सत्तेत सहभागी झाले होते. गणपतने स्वातंत्र्यसैनिक म्हणून ताम्रपट आणि पेन्शनही स्वीकारली नाही. ” मी स्वातंत्र्य चळवळीत असं काही मिळवायला भाग घेतला नव्हता ” ही त्याची भूमिका होती. आयुष्याच्या अखेरीस तो खूप थकला होता. नोकरी त्याने पूर्वीच सोडली होती. स्वातंत्र्य चळवळीत आणि नंतरही त्याने घराकडे लक्ष दिले नव्हते. गावाकडची शेती त्याच्या धाकट्या भावाने स्वतःच्या नावावर करून घेतली होती. त्याच्या फकीरी वृत्तीला कंटाळून त्याची बायकोही माहेरी निघून गेली होती. “तत्व“ म्हणून असं निरलस जीवन जगलेला गणपत व्यवहारात मात्र नापास झाला होता.
☆ फक्त एक ‘इव्हेंट’…..अनामिक ☆ प्रस्तुति – सुश्री उषा आपटे ☆
अष्टमीचा अर्धचंद्र विलक्षण सौंदर्यानं लकाकत होता … समुद्राच्या लाटा त्याला भेटायला अधीर झालेल्या … आणि तशात पांढऱ्या शुभ्र वाळूवर प्रकाशाचा एक मोठा झोत पडला … तेज:पुंज पुष्पक विमान वाळूवर अलगद उतरलं … आणि दरवाजा उघडला. तसा इवलासा कान्हा धावत बाहेर आला … पाठोपाठ पेंद्या आणि बाकीचे बालगोपाल उतरले …
कान्हा वळला आणि उत्साहात म्हणाला … “ सखे हो … आज किमान दहा हंड्या फोडायच्या बरं .. दही .. दूध .. लोणी .. सगळी चंगळ करून टाकायची …” पेंद्या पुढे आला आणि कान्हाच्या डोईवरचं उत्साहानं थरथरणारं मोरपीस सरळ करत म्हणाला .. “आधी वाटणी ठरवायची कान्हा …” कान्हाला काही कळेना … तो म्हणाला ..
“ माझ्या हातचा दहीभाताचा घास मोत्यांच्या घासापेक्षा मौल्यवान मानणारी तुम्ही मंडळी .. अचानक ..”
पेंद्या म्हणाला …” काळ बदलला .. कान्हा … आता हंड्या दह्याच्या नाही .. रुपयांच्या लागतात. लाखांत बोली लागते .. मग आम्ही दहीभाताच्या घासावर समाधान कसं मानायचं ? “ कान्हा समजुतीच्या स्वरात म्हणाला .. “ मग काय हवं तुम्हाला .. ?” पेंद्यानं एकवार बाकीच्या बालगोपालांकडे पाहिलं … नि म्हणाला …” बक्षिसात सारखा वाटा … सेलिब्रिटी बरोबर फोटो .. स्टेजवर एन्ट्री … मिडियासमोर बाईटची संधी … आणि अपघाती विमा …” कान्हाला आता हसू आवरेना. तो थेट पुष्पक विमानाच्या दिशेनं चालायला लागला … पेंद्या गोंधळला … म्हणाला … “ इतकं टोकाचं का वागतोयस … ? काहीतरी सुवर्णमध्य काढू हवं तर … काही मागण्या कमी जास्त करून .. “
कान्हा वळला … हसला. पेंद्याजवळ आला .. खांद्यावर हात ठेवून ममत्वानं म्हणाला .. “ प्रयोजनच संपलंय रे सगळं … ! पेंद्या .. मला घरात दूध दही मिळत नव्हतं म्हणून हंड्या फोडायचो का रे मी .. ? एकत्र या … मनोरा बांधा आणि ध्येय साध्य करा … इतका साधा सरळ विचार … पण ते चार हात एकमेकांच्या खांद्यावर ठेवण्यामागे माणसं जोडण्याची प्रेरणा होती … मुठभर दहीभात घासाघासाने खाण्यात अर्धी भाकरी प्रेमानं वाटून घेण्याची दीक्षा होती .. तेव्हा कान्हा हाच सेलिब्रिटी होता … त्याचा सहवास ही मोक्षाची संधी होती आणि कान्हाची बासरी ऐकायला मिळणं ही बक्षिसाची सर्वोच्च कल्पना होती … अपघात होईल अशी साधी कल्पनाही कधी मनाला शिवायची नाही .. कारण साक्षात शिव सोबत असताना जीवाची भिती कसली … ? पण आता तुझ्या बोलण्यातून जाणवलं .. आता तो विश्वास संपलाय … एकत्र येण्याची उमेद संपलीय … थर वाढले … पण श्रद्धा संपलीय … माझा जन्म हा आता सोहळा न रहाता फक्त एक “ इव्हेंट “ बनलाय … आता इथे न आलेलंच उत्तम .. “ आणि त्यानं विमानात पहिलं पाऊल ठेवलं सुद्धा … पेंद्याला एव्हाना चूक कळली होती … तो घाईनं म्हणाला .. “ पण कान्हा …”
कान्हा शांत स्वरात म्हणाला .. “ अष्टमी येत राहील … पण त्यात कान्हा नसेल … आणि काळजी करू नकोस … कॉर्पोरेट विश्वात रमलेली माझी भक्त मंडळी कान्हाशिवाय हा सण असाच साजरा करत रहातील ..” असं म्हणून तो आत गेला सुद्धा … क्षणात आतून बासरीचे करुण स्वर ऐकू येऊ लागले आणि पेंद्यासह बालगोपाल मंडळी जड पावलांनी विमानाच्या दिशेने चालायला लागली..
लेखक : अनामिक
संग्राहिका : उषा आपटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सॉरी, सॉरी, मंडळी, माफ करा मला ! आपण म्हणाल यात माफी मागण्या सारखं तुम्ही काय केलंय, म्हणून माफी मागताय ? सांगतो, सांगतो मंडळी. त्याचं काय आहे, मला खरं तर “जादू तेरी नजर” या, मतकरींच्या एका नाटकाच्या नावाने आजच्या लेखाची सुरवात करायची होती. पण वरच्या गाण्याच्या ओळींची “जादू” आज इतक्यावर्षांनी देखील, माझ्यासकट तमाम रसिकांवर त्या गाण्यातील शब्दांचे असं काही गारुड करून बसली आहे, की त्याची पुढची ओळ माझ्या हातून आपोआपच लिहिली गेली हे मी मान्य करतो आणि त्यासाठी मी तुमची माफी मागितली मंडळी ! चला, म्हणजे एका अर्थाने लेखाच्या सुरवातीलाच, एखाद्या गाण्याची अनेक तपानंतर सुद्धा आपल्यावर कशी “जादू” शिल्लक असते, हा एक मुद्दा निकालात निघाला ! अर्थात ते गाणं त्यातील शब्दांमुळे, संगीतामुळे, का ते ज्या कलाकारांवर चित्रित झालं आहे त्यांच्यामुळे, कां अजून कोणत्या गोष्टींमुळे रसिकांच्या मनावर आज तागायत जादू करून आहे हा वादाचा विषय होऊ शकतो, यात वादच नाही मंडळी. असं जरी असलं, तरी त्या गाण्याच्या जादूची मोहिनी आजच्या घडीपर्यंत टिकून आहे, हे आपण या लेखाद्वारे मी तुमच्यावर कुठल्याही प्रकारची शब्दांची जादू न करता सुद्धा मान्य कराल ! असो !
मंडळी, आपली माफी मागितल्या मागितल्या, मला एका गोष्टीची मनांत मात्र नक्की खात्री वाटत्ये आणि ती म्हणजे, आपण सुद्धा वरील गाण्याची पाहिली ओळ वाचताच, लगेच दुसरी ओळ मनांत नक्कीच गुणगुणली असेल, हॊ का नाही ? खरं सांगा ! बघा, मी जादूगार नसलो तरी “माझ्या” वाचकांच्या मनांत नक्की काय चाललं असेल ते ओळखण्या इतका मनकवडा जादूगार नक्कीच झालोय, असं लगेच माझं मीच म्हणून घेतो. दुसरं असं, की माझ्या मनावर अजून जरी जुन्या अनेकानेक अजरामर हिंदी गाण्यांची कितीही जादू असली आणि हिंदी आपली राष्ट्रभाषा असली तरी, राष्ट्रभाषेत लेख लिहिण्याइतकी काही त्या भाषेची माझ्यावर जादू झालेली नाही, हे मी मान्य करतो ! त्यामुळे आता या वयात अंगात नसलेली एखादी कला, कोणा जादूगाराच्या जादूने अंगी बाणेल, मग मी आपल्या राष्ट्र भाषेत एखादा लेख लिहीन यावर माझा 101% विश्वास नाही ! पण हां, स्टेजवरचे जादूचे प्रयोग पहात असतांना, हे सगळं खोटं आहे हे मनांला ठामपणे माहित असतांना देखील, माझे डोळे (चष्मा लावून सुद्धा) मात्र त्यावर विश्वास ठेवतात हे मात्र तितकंच खरं. म्हणजे असं बघा, रिकाम्या नळकांड्यातून फुलांचा गुच्छ काढणे, तर कधी पांढरे धोप कबुतर ! तर कधी टेबलावर झोपलेल्या माणसाच्या शरीरारचे तीन तुकडे करणे, ते परत जोडणे, असे नाना खेळ करून तो जादूगार लोकांचे मनोरंजन करत असतो. मला असं वाटतं की “जादू” या शब्दातच एक प्रकारची अशी “जादू” आहे जी सानथोरांना तो खेळ बघताना, अक्षरशः देहभान विसरायला लावून खिळवून ठेवते. एवढच नाही, तर ज्या व्यक्तीला जादूगाराने एखाद्या खेळात आपल्या इंद्रजालाने वश केले आहे, त्या व्यक्तीला तर ती इतकी कह्यात ठेवते, की त्या जादूगाराने “आज्ञा” करताच, ती व्यक्ती सफरचंद समजून, कच्चा बटाटा पण साऱ्या प्रेक्षकांसमोर मिटक्या मारीत आनंदाने खाते, हे आपण सुद्धा कधीतरी बघितलं असेल !
या दुनियेत जादूचा उगम कधी झाला, जगात पाहिली जादू कोणी, कोणाला आणि कोठे दाखवली असे साधे सोपे प्रश्न घेवून, त्या प्रश्नांची मी उत्तर देईन अशी अपेक्षा हा लेख वाचतांना कोणा वाचकाने कृपया ठेवू नये. कारण त्याची उत्तर द्यायला सध्याच्या विज्ञानयुगातला जागतिक कीर्तीचा “गुगल” नामक विश्व विख्यात जादूगार आपल्या खिशातच तर आहे मंडळी ! पण हां, माझ्या आयुष्यात मी पाहिलेल्या पाहिल्या दोन जादू कोणत्या या प्रश्नाचं उत्तर मात्र मी तुम्हांला नक्कीच सांगू शकतो. किंबहुना मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेल्या दोन जादू, आपल्या पैकी माझ्या पिढीतील लोकांनी पाहिलेल्या त्यांच्या आयुष्यातल्या सुद्धा त्यांनी पाहिलेल्या पहिल्या दोन जादू असू शकतात, (आधीच वाक्य वाचून तुम्हांला थोडं गोंधळायला झालं असेल, तर बहुतेक तो माझ्या लिखाणावर झालेला आजच्या विषयाचा परिणाम असू शकतो) यावर माझा ठाम विश्वास आहे !
मंडळी, त्यातील पाहिली जादू म्हणजे, आपल्या दादाने किंवा ताईने मुठीत राहणारी लहान वस्तू उजव्या हाताने दूर फेकल्याचा अभिनय करून, ती वस्तू आपण सांगताच आपल्याला लगेच दाखवणे आणि दुसरी जादू म्हणजे डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने कापणे ! काय, बरोबर नां मंडळी ?
लहानपणी डेव्हिड कॉपरफिल्ड नामक एका विदेशी जादूगाराचे एका पेक्षा एक विलक्षण जादूच्या प्रयोगाचे विडिओ बघून डोळे आणि डोकं अक्षरशः गरगरायला लागायचं ! त्याच पाण्यावर चालणं काय, हवेत उडणं काय किंवा नायगाऱ्याच्या प्रचंड धबधब्यात पिंपात बसून उडी मारून परत काठावर प्रकट होणं काय ! बापरे, ते त्याचे सारे जादूचे खेळ आज नुसते आठवले तरी अंगावर काटा येतो मंडळी !
आपल्या देशातसुद्धा तसे अनेक छोटे मोठे जादूगार होऊन गेले, पण डेव्हिडशी तुलना करायची झाल्यास, पी सी सरकार, सिनियर आणि पी सी सरकार, ज्युनियर ही कलकत्याच्या पिता पुत्रांची नांव या संदर्भात प्रकर्षाने लगेच आठवतात.
माझे जन्मापासूनचे आजतागायतचे आयुष्य शहरात गेल्यामुळे, “काळी जादू” किंवा “चेटुक” या विषयात एखाद्या “गाववाल्याचे” जेवढे “ज्ञान” (का अज्ञान ?) आहे, त्याच्या ते 0.001% सुद्धा नाही. त्यामुळे या विषयावर मी काही बोलणे अथवा लिहिणे, हा या विषयात स्वतःला तज्ञ समजणाऱ्या एखाद्या “गाववाल्याचा” अपमान होऊ शकतो. म्हणून उगाच त्या तथाकथीत जादूच्या उप शाखेला कोणत्याही तऱ्हेनं स्पर्श नं केलेलाच बरा. शिवाय माझा हा लेख अशा एखाद्या तज्ञ गाववाल्याने “चुकून” वाचलाच, तर त्याला आलेल्या रागापोटी तो माझ्यावर एखादं “लिंबू” फिरवायचा ! उगाच नको ती रिस्क आता या वयात कशाला घ्या ?
मंडळी, शेवटी एकच सांगतो, माझा सुद्धा जादूवर विश्वास आहे. पण ती जादू करणारा सर्वशक्तिमान जादूगार हा वर बसलेला आहे, असं माझं मत आहे ! आपल्या आयुष्यात वेळोवेळी निरनिराळे खेळ करून “तो” आपल्याला दाखवत असतो ! त्यातील त्याच्या कुठल्या खेळाला आपण टाळी वाजवायची, कुठला खेळ दाखवल्या बद्दल त्याचे मनापासून आभार मानायचे किंवा कुठल्या खेळातून काय बोध घेवून पुढे जायचं, हे ज्याचं त्यानं ठरवायचे !
तर अशा त्या सर्व शक्तिमान जादूगाराने आपल्याला दाखवलेल्या नानाविध खेळांचे वेळोवेळी अन्वयार्थ लावायची शक्ती, तो जादूगारच आपल्या सगळ्यांना देवो हीच सदिच्छा!
☆ चकवा… लेखक अज्ञात☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆
माझे वडील नोकरीच्या सुरुवातीच्या काळात उमरेडला राहत असत. त्याकाळी एवढ्या सोयी सुविधा नव्हत्या. त्यामुळे ऑफिसची कॅश कुठे देण्यासाठी ते स्वतःच जात असत. रात्रीची वेळ. त्यांना ज्या भागात जायचे होते तिकडे जाण्यासाठी त्यांना थोडा जंगलाचा भाग पार करायचा होता. वाटेत काय झाले हे त्यांना आठवत नाही,पण ते त्यांच्या रोजच्या वाटेवर जवळपास ३-४ तास फिरत होते. तिथल्या तिथेच गोल गोल चकरा मारत होते. थोड्या वेळाने एक बैलगाडीवाला जवळून गेला आणि त्याने ‘हटकले’ तेव्हा त्यांना जाणवलं, की काहीतरी विपरित घडतंय. त्या बैलगाडीवाल्याच्या आधाराने ते रस्ता नीट पार करू शकले. तो ‘चकवा’ आम्हाला आजही आठवतो आणि असं वाटतं की आम्हीच तो अनुभव घेतला म्हणून.
आता हा चकवा काय प्रकार आहे हे सांगण्यापलीकडचे. कोणाचा त्यावर विश्वास बसेल, कोणाचा नाही. मी तरी माझ्या आयुष्यात ह्याचा अनुभव घेतला नाही. त्यामुळे त्याबद्दल बोलण्याचा मला अधिकार नाही. पण आज घरासाठी महिन्याचे वाणसामान खरेदी करायला गेले होते आणि एका चकव्यात मी पण अडकले…
खरेदीचा चकवा :आकर्षक पद्धतीने मांडलेल्या गोष्टी, त्यामुळे मन नकळत आकर्षित होतं. माझी ट्रॉली कधी भरली आणि कधी ओसंडून वाहू लागली हे कळलंच नाही.आधी वाणसामान आणि मग कपडे दिसले. मग काय महिन्याच्या खरेदीत ते पण सहज ट्रॉलीत जाऊन बसले. सरकार ओरडतेय प्लास्टिक नका वापरू म्हणून… पण तरीही त्यांची आकर्षक मांडणी भुरळ पाडून गेली. मग तेही थोडी जागा करून माझ्या ट्रॉलीत सहज विसावले. काच विभागाच्या वाटेत ट्रॉलीला एक धक्का लागला, थोडं सामान बाहेर आलं आणि मी भानावर आले. माझा बैलगाडीवाला मला सापडला. बिलिंग काउंटरवर जाण्याआधी शांतपणे बसले आणि अक्षरशः दहा मिनिटांत मला नको असलेले सामान बाहेर काढले आणि मी चकव्यातून बाहेर आले.
मोबाईल हा दुसरा चकवा : एकच मेसेज वाचून बाजूला ठेवला जाणारा फोन आपसूक तीन-तीन, चार-चार तास हाताला चिटकून बसतो. फेसबुक आणि व्हाट्सअपचा चकवा तर सगळ्यात वाईट. ह्यात त्याहून वाईट म्हणजे आपले बैलगाडीवाले आपल्या आसपास असतात, जसे की आपली आई, वडील, बायको, नवरा, भावंडं, मित्र… ते हटकतात आपल्याला… पण तरीही आपण ह्याठिकाणी त्या बैलगाडीवाल्याचाच राग-राग करतो आणि परत चकव्यात स्वखुशीने अडकतो.
झोप हा तिसरा चकवा :पाच मिनिटं म्हणून झोपतो, ते तासभर कधी उलटतो हे कळतच नाही. इथेही बैलगाडी आहे हो, ‘गजर’ ! पण आपण त्याला सहज दुर्लक्षित करतो आणि देतो ताणून. दुपारची झोप पण अशीच वैरी. चुकून जरी अंथरुणाला टेकलात, की गेलाच चकव्यात म्हणून समजा.
टीव्ही… चा चकवा : इथे तर काय मेजवानीच असते. १५०-२०० च्या वर चॅनेल्सचा चकवा. इथे नाही का आवडत, तर बदल चॅनेल. इथे मन नाही का रमत, मग दाब बटण आणि मार उडी दुसऱ्या चॅनेलवर. एकेक सिनेमा कमीत कमी ४-५ दा तर अगदी सहज पाहतो आपण… आणि मग काय गेले ३-४ तास ! …. चकवाय स्वाहा!
Sale: हा तर सगळ्यात फसवा चकवा. अश्या अश्या गोष्टी आपण विकत घेतो, ज्याची काडीचीही गरज नसते. ५०० रुपयांच्या बचतीसाठी आपण सहज ४-५ हजार खर्चून बसतो आणि अश्या गोष्टी घेऊन येतो ज्याशिवाय आपलं पुढच्या ४-५ वर्षे तरी किमान अडलं नसतं. घे कपडे, घे चपला, घे पर्सेस, भरा ब्यागा आणि उडव पैसे.
क्रेडिट कार्ड : हा तर आत्ताच्या जगातला ‘चकव्याचा’ सगळ्यांत वाह्यात प्रकार. केवळ आणि केवळ आपल्या खिश्यातून आत्ता पैसे खर्च होणार नाहीत ह्या पायी आपण इतकं सहज हे वापरतो आणि पुढच्या महिन्याच्या पहिल्या तारखेला त्याचे बिल भरतो. म्हणजे पगार आल्याच्या दुसऱ्याच दिवशी एक तारखेची वाट बघतो. महिना घालवतो आणि परत आत्ता कॅश नाही म्हणून क्रेडिट कार्ड वापरतो.
हॉटेलिंगचा चकवा : हा चकवा नसून मला तर चक्रव्यूह वाटतो हल्ली. घरी करायचा कंटाळा आला म्हणून बाहेर खायचं, की घरचं खायचा कंटाळा आला की बाहेरचं खायचं ? स्टार्टर्स आवडतात म्हणून बाहेर खायचं, का भाज्यांची व्हरायटी म्हणून बाहेर खायचं ? उगाच च्याऊ-माऊ म्हणून बाहेर खायचं, का कॉफी प्यायला बाहेर जायचं ? …. आणि असं बरंच काही. हल्ली दुसऱ्याला जेवायला बोलावलं की पण बाहेर जातो आपण… म्हणजे तो त्याचा जाऊ शकत नाही का काय ? पण चढाओढ …. ज्याला त्याला दुसऱ्याला दाखवण्यासाठी काहीतरी हवं आहे.
हा चकवा तर आपल्या संस्कृतीला, मानव जातीला घातक ठरतो आहे. किती ती जीवघेणी स्पर्धा? अगदी शब्दशः अर्थ आहे, जीवच घेते आहे ही स्पर्धा… कधी पालकांचा, कधी मुलांचा, कधी आईवडिलांचा, कधी भावा-बहिणींचा आणि ही न संपणारी यादी.
विचार केल्यावर जाणवतंय, माझे बाबा त्या चकव्यातून अगदी ३-४ तासांतच बाहेर आले, पण आपलं काय ?
ह्या सगळ्या चकव्यांतून आपण कधी बाहेर येणार?
फक्त एकच फरक आहे, इथे बाहेरचा बैलगाडीवाला चालतच नाही…
इथे चकव्यात अडकणारे पण आपण, आणि हटकणारे पण आपणच. किती जखमा होऊ द्यायच्या आणि मग बाहेर पडायचे, किंवा किती गोष्टी गमवायच्या, हे आपल्यालाच ठरवावे लागेल.
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सुश्री कालिंदी नवाथे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ Sonam Wangchuk & his solar tent… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆
‘थ्री इंडियट्स’ या सिनेमात दाखवलेले, आणि प्रत्यक्षातही तशाच प्रकारचे काम करण्यात सतत मग्न असलेले – खरेखुरे व्यक्तिमत्व – म्हणजे श्री.सोनम वांगचूक !!
गोठवणाऱ्या प्रचंड थंडीतही सतत कार्यदक्ष असणाऱ्या आपल्या सैनिकांना ऊब मिळावी या हेतूने, वरील फोटोमध्ये दिसणारे हे सोलर टेन्ट श्री. वांगचूक यांनी बनवले आहेत..
— थंडी -14° असली तरी या टेन्टमधील तापमान +15° पर्यंत असणार आहे.
— आणि या टेन्टचे वजन फक्त 30 किलो असून, एकावेळी एकूण १० जवान यामध्ये आराम करू शकणार आहेत…
सलाम या कलाकृतीला आणि तिची निर्मिती करणाऱ्या श्री. सोनम् वांगचूक यांना !!!! .
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈