??

☆ चकवा… लेखक अज्ञात☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

माझे वडील नोकरीच्या सुरुवातीच्या काळात उमरेडला राहत असत. त्याकाळी एवढ्या सोयी सुविधा नव्हत्या. त्यामुळे ऑफिसची कॅश कुठे देण्यासाठी ते स्वतःच जात असत. रात्रीची वेळ. त्यांना ज्या भागात जायचे होते तिकडे जाण्यासाठी त्यांना थोडा जंगलाचा भाग पार करायचा होता. वाटेत काय झाले हे त्यांना आठवत नाही,पण ते त्यांच्या रोजच्या वाटेवर जवळपास ३-४ तास फिरत होते. तिथल्या तिथेच गोल गोल चकरा मारत होते. थोड्या वेळाने एक बैलगाडीवाला जवळून गेला आणि त्याने ‘हटकले’ तेव्हा त्यांना जाणवलं, की काहीतरी विपरित घडतंय. त्या बैलगाडीवाल्याच्या आधाराने ते रस्ता नीट पार करू शकले. तो  ‘चकवा’ आम्हाला आजही आठवतो आणि असं वाटतं की आम्हीच तो अनुभव घेतला म्हणून. 

आता हा चकवा काय प्रकार आहे हे सांगण्यापलीकडचे. कोणाचा त्यावर विश्वास बसेल, कोणाचा नाही. मी तरी माझ्या आयुष्यात ह्याचा अनुभव घेतला नाही. त्यामुळे त्याबद्दल बोलण्याचा मला अधिकार नाही. पण आज घरासाठी महिन्याचे वाणसामान खरेदी करायला गेले होते आणि एका चकव्यात मी पण अडकले…

खरेदीचा चकवा :आकर्षक पद्धतीने मांडलेल्या गोष्टी, त्यामुळे मन नकळत आकर्षित होतं. माझी ट्रॉली कधी भरली आणि कधी ओसंडून वाहू लागली हे कळलंच नाही.आधी वाणसामान आणि मग कपडे दिसले. मग काय महिन्याच्या खरेदीत ते पण सहज ट्रॉलीत जाऊन बसले. सरकार ओरडतेय प्लास्टिक नका वापरू म्हणून… पण तरीही त्यांची आकर्षक मांडणी भुरळ पाडून गेली. मग तेही थोडी जागा करून माझ्या ट्रॉलीत सहज विसावले. काच विभागाच्या वाटेत ट्रॉलीला एक धक्का लागला, थोडं सामान  बाहेर आलं आणि मी भानावर आले. माझा बैलगाडीवाला मला सापडला. बिलिंग काउंटरवर जाण्याआधी शांतपणे बसले आणि अक्षरशः दहा मिनिटांत मला नको असलेले सामान बाहेर काढले आणि मी चकव्यातून बाहेर आले.

मोबाईल हा दुसरा चकवा :  एकच मेसेज वाचून बाजूला ठेवला जाणारा फोन आपसूक तीन-तीन, चार-चार तास हाताला चिटकून बसतो. फेसबुक आणि व्हाट्सअपचा चकवा तर सगळ्यात वाईट. ह्यात त्याहून वाईट म्हणजे आपले बैलगाडीवाले आपल्या आसपास असतात, जसे की आपली आई, वडील, बायको, नवरा, भावंडं, मित्र… ते हटकतात आपल्याला… पण तरीही आपण ह्याठिकाणी त्या बैलगाडीवाल्याचाच राग-राग करतो आणि परत चकव्यात स्वखुशीने अडकतो.

 झोप हा तिसरा चकवा : पाच मिनिटं म्हणून झोपतो, ते तासभर कधी उलटतो हे कळतच नाही. इथेही बैलगाडी आहे हो, ‘गजर’ ! पण आपण त्याला सहज दुर्लक्षित करतो आणि देतो ताणून. दुपारची झोप पण अशीच वैरी. चुकून जरी अंथरुणाला टेकलात, की गेलाच चकव्यात म्हणून समजा.

टीव्ही… चा चकवा :  इथे तर काय मेजवानीच असते. १५०-२०० च्या वर चॅनेल्सचा चकवा. इथे नाही का आवडत, तर बदल चॅनेल.  इथे मन नाही का रमत, मग दाब बटण आणि मार उडी दुसऱ्या चॅनेलवर. एकेक सिनेमा कमीत कमी ४-५ दा तर अगदी सहज पाहतो आपण… आणि मग काय गेले ३-४ तास ! …. चकवाय स्वाहा!

Sale: हा तर सगळ्यात फसवा चकवा. अश्या अश्या गोष्टी आपण विकत घेतो, ज्याची काडीचीही गरज नसते. ५०० रुपयांच्या बचतीसाठी आपण सहज ४-५ हजार खर्चून बसतो आणि अश्या गोष्टी घेऊन येतो ज्याशिवाय आपलं पुढच्या ४-५ वर्षे तरी किमान अडलं नसतं. घे कपडे, घे चपला, घे पर्सेस, भरा ब्यागा आणि उडव पैसे. 

क्रेडिट कार्ड :  हा तर आत्ताच्या जगातला ‘चकव्याचा’ सगळ्यांत वाह्यात प्रकार. केवळ आणि केवळ आपल्या खिश्यातून आत्ता पैसे खर्च होणार नाहीत ह्या पायी आपण इतकं सहज हे वापरतो आणि पुढच्या महिन्याच्या पहिल्या तारखेला त्याचे बिल भरतो. म्हणजे पगार आल्याच्या दुसऱ्याच दिवशी एक तारखेची वाट बघतो. महिना घालवतो आणि परत आत्ता कॅश नाही म्हणून क्रेडिट कार्ड वापरतो.

हॉटेलिंगचा चकवा : हा चकवा नसून मला तर चक्रव्यूह वाटतो हल्ली. घरी करायचा कंटाळा आला म्हणून बाहेर खायचं, की घरचं खायचा कंटाळा आला की बाहेरचं खायचं ?  स्टार्टर्स आवडतात म्हणून बाहेर खायचं, का भाज्यांची व्हरायटी म्हणून बाहेर खायचं ? उगाच च्याऊ-माऊ म्हणून बाहेर खायचं, का कॉफी प्यायला बाहेर जायचं ? ….  आणि असं बरंच काही. हल्ली दुसऱ्याला जेवायला बोलावलं की पण बाहेर जातो आपण… म्हणजे तो त्याचा जाऊ शकत नाही का काय ? पण चढाओढ ….  ज्याला त्याला दुसऱ्याला दाखवण्यासाठी काहीतरी हवं आहे. 

हा चकवा तर आपल्या संस्कृतीला, मानव जातीला घातक ठरतो आहे. किती ती जीवघेणी स्पर्धा? अगदी शब्दशः अर्थ आहे, जीवच घेते आहे ही स्पर्धा…  कधी पालकांचा, कधी मुलांचा, कधी आईवडिलांचा, कधी भावा-बहिणींचा आणि ही न संपणारी यादी.

विचार केल्यावर जाणवतंय, माझे बाबा त्या चकव्यातून अगदी ३-४ तासांतच बाहेर आले, पण आपलं काय ? 

ह्या सगळ्या चकव्यांतून आपण कधी बाहेर येणार?

फक्त एकच फरक आहे, इथे बाहेरचा बैलगाडीवाला चालतच नाही…

इथे चकव्यात अडकणारे पण आपण, आणि हटकणारे पण आपणच. किती जखमा होऊ द्यायच्या आणि मग बाहेर पडायचे, किंवा किती गोष्टी गमवायच्या, हे आपल्यालाच ठरवावे लागेल.

लेखक :  अज्ञात 

संग्राहिका : सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments