सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “माझ्या आठवणीतले गदिमा” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

एक अद्भुत, मनभावन आविष्कार म्हणजे रामायण. अगदी वाचन शिकायच्या सुद्धा आधी हे अद्भुत रामायण कळलं ते दोन व्यक्तींमुळे एक म्हणजे “गीत रामायणा” चे रचयिता ग.दि. माडगूळकर आणि दुसरे म्हणजे ही गीत सुस्वर आवाजात गाऊन आम्हाला झोपाळ्यावर झुलवणारे माझे बाबा. माझ्या बाबांचा आवाज खूप गोड आहे आणि अगदी मोजकीच आवडीची गीतं ते गातात त्यातीलच एक “गीत रामायणा”मधील गाणी. अर्थात बाबांना ऐकलं फक्त आणि फक्त घरच्यांनीच आणि खास करुन आम्ही, त्यांच्या मुलांनी. ते बाहेर कुठेही,कधीच गात नाहीत. पण खर सांगायचं तर लहानपणी रामायण, ऐकलं,समजलं आणि आवडलं ते फक्त आणि फक्त गदिमांमुळे आणि बाबांमुळेच. ग.दि.माडगूळकर ह्यांना  “गदिमा” ह्या संक्षिप्त नावाच्या रुपात लोक ओळखायचे.

Best Bhojpuri Video Song - Residence w

स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’

माडगूळकर म्हणजे एका चांगल्या अर्थाने सर्वगुणसंपन्न व्यक्ती. ते कवी,गीतकार, लेखक असून त्यांनी विविध अंगी  साहित्यिक क्षेत्रात अनमोल योगदान दिलयं.आज त्यांचा स्मृतीदिन.त्यांना विनम्र अभिवादन.

गदिमा भावकवीही होते. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. त्यांनी लिहिलेली बालगीते आणि भक्तीगीते आजही फार लोकप्रिय आहेत. शिर्डीच्या साई बाबांची काकड आरती ही माडगूळकरांनी लिहिलेली आहे, या आरतीला सी. रामचंद्र यांनी अतिशय उत्तम चाल लावली आहे. या काकडआरती साठी गदिमांनी ‘रामगुलाम’ हे टोपणनाव घेतलं होतं.पेशवाईवर त्यांनी गंगाकाठी नावाने काव्य कथा लिहिली आहे. गदिमांनी अथर्वशिर्षाच मराठीत भाषांतर केले.

ग दि माडगूळकर यांनी ‘भूमिकन्या सीता”  या नाटकातील पदेसुद्धा लिहिली होती. ‘मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी’, ‘मानसी राजहंस पोहतो’,’सुखद या सौख्याहुनी वनवास ‘ ही त्यातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध गाणी.

कित्येक आपल्याला खूप आवडत असलेली गाणी आपण कायमं ऐकतो आणि गुणगुणतो पण बरेचदा आपल्याला मिहीती सुद्धा नसतं ह्या गीतांचे रचयिते कोण ?

गदिमांची आपण कायम आवडीने ऐकतं आलो ती बालगीतं पुढीलप्रमाणे,” नाचरे मोरा आंब्याच्या वनात,नाच रे मोरा नाच”, “झुक झुक झुक झुक अगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया,”बाळा जो जो रे,बाळा जो जो रे,”गोरी गोरीपान, फुलासारखी छान, दादा, मला एक वहिनी आण”,”चांदोबा चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का?”, तसेच त्यांची लोकप्रिय भक्तिगीते पुढीलप्रमाणे,

“कबिराचे विणतो शेले, कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम, भाबड्या या भक्तासाठी, देव करी काम ! “,”दैवजात दुःखे भरता.. दोष ना कुणाचा पराधीन आहे.. जगती पुत्र मानवाचा “, “इंद्रायणी काठी देवाची आळंदी “,”वेदांनाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा “,”विठ्ठला तू वेडा कुंभार “,. याबरोबरच त्यांची देशभक्तीपर गीतं ही मनाचा ठाव घेतात ती पुढीलप्रमाणे,”हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे”,

“माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू जिंकू किंवा मरू ,”वेदमंत्राहून आम्हां वंद्य वंदे मातरम्”

त्यांचे चित्रपटक्षेत्रात ही तेवढेच महत्त्वाचे योगदान आहे, त्यांची ह्या क्षेत्रातील काही लोकप्रिय गीतं पुढीलप्रमाणे,”बुगडी माझी सांडली ग… जाता साताऱ्याला,”सांगा या वेडीला, माझ्या गुलछडीला”,”एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे”,”उद्धवा, अजब तुझे सरकार”,”या चिमण्यांनो परत फिरा रे”,फड सांभाळ तुऱ्याला ग आला तुझ्या उसाला लागंल कोल्हा”,”अपराध माझा असा काय झाला का रे दुरावा ,का रे अबोला” आणि अशी कित्येक लोकप्रिय गीतं गदिमांनी त्यांच्या कारकिर्दीत १५७ पटकथा आणि २००० गाणी लिहिली. त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटांसाठी कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. लिखाणासोबत त्यांनी काही चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला.

गदिमा स्वातंत्राच्या चळवळीत देखील अग्रभागी होते. याच काळात त्यांची यशवंतराव चव्हाण यांच्याशी चांगली ओळख झाली. त्या वेळी त्यांनी जे काही काव्य रचलं ते “शाहीर बो-या भगवान”ह्या टोपणनावाने. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना १९६२ मध्ये गदिमांची राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर आमदार म्हणून करण्यात आली होती.

भारत सरकारने १९६९ मध्ये गदिमांना पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव केला.१९५७ मध्ये गदिमांना संगीत नाटक अकादमीचा उत्कृष्ट नाट्य लेखक पुरस्कार मिळाला. तसेच १९५७ मध्ये संगीत नाटक अकादमी चा उत्कृष्ट नाट्य लेखक पुरस्कार ,१९६९ मध्ये ग्वाल्हेर येथीलअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.१९७१ मध्ये विष्णुदास भावे सुवर्णपदकाचे मानकरी हे झालेत.१९७३ मध्ये यवतमाळला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ह्यांनी भुषविले.त्यांच्या बऱ्याच गाण्यांना व चित्रपटांना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले आहेत.

खरोखरच ह्यांच्या सारख्या अनेक साहित्यिक  कलावंतानी आपल्यासाठी आनंद फुलविणारी किती अनमोल संपत्ती ठेवलेली आहे हे बघून नतमस्तक व्हायला होतं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments