☆ वीर भाई कोतवाल… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
कोतवाल म्हटलं की सर्वसामान्यपणे आपल्याला आठवते दादरची प्लाझासमोरील मोक्याची कोतवाल गार्डन – गावकी – भावकी किंवा गावाकडील मंडळींचे हमखास भेटीचे ठिकाण ! पण हा टुमदार बगीचा ज्यांचे नांवे आहे हे कोतवाल कोण याबाबत फारशी माहिती कोणालाच नसते आणि ती जाणून घेण्याचे कुतुहलही नसते !
विठ्ठल लक्ष्मण कोतवाल– जन्म ०१ डिसेंबर १९१२ – माथेरान
नाभिक समाजात जन्मलेल्या या होतकरू तल्लख तरुणाने आपले एल एल बी शिक्षण पूर्ण करत वकिली क्षेत्रात प्रवेश केला ! नंतर ते स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय झाले. सशस्र क्रांतीसाठी त्यांनी बंडखोर तरुणांची फौज उभी केली ! ब्रिटीशांचे संदेशवहन उध्वस्त करण्यासाठी डोंगरांवरील वीजवाहक मनोरे पाडून टाकले ! आदिवासी शेतकरी बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला ! ब्रिटीशांना सळो की पळो करुन सोडले ! मुरबाडमधील सिध्दगड परिसरातील जंगलखोर्यात लपून स्वातंत्र्यलढा देणारे हे भाई कोतवाल, ०२ जानेवारी १९४३ रोजी ब्रिटीशांशी लढताना देशासाठी शहीद झाले , हुतात्मा झाले !
वीर कोतवाल यांचा यावर्षीचा ८० वा बलिदान दिवस आहे !
काही वर्षापूर्वी शहीद भाई कोतवाल या नांवाने चित्रपटही आला होता ॥
सुख म्हणजे नक्की काय असतं ! संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆
सोलापूर इथल्या एका संस्थेने माझं दोन दिवसांचं मोटीवेशनल शिबिर आयोजीत केलं होतं.
विविध वयोगटांतले आणि विविध व्यवसायातले शिबिरार्थी उत्साहाने सामील झाले होते.
शिबिराच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा विषय होता आनंदाने कसं जगावं?
मी साऱ्या शिबिरार्थींना एक कॉमन प्रश्न विचारला आणि नोटपॅडमधल्या कागदावर आपापलं उत्तर लिहून द्यायला सांगितलं. प्रश्न अगदी साधा होता,
सुख म्हणजे काय?—–
उत्तरं अगदी भन्नाट होती.
कोणी लिहिले,
निरोगी दीर्घायुष्य म्हणजे सुख.
एकाने लिहिलं, घरात पत्नीने तोंड बंद ठेवणं म्हणजे सुख.
एक उत्तर होतं, सकाळी उठल्यावर पोट साफ होणं म्हणजे सुख.
एकाचं उत्तर होतं, म्हातारपणी मुलं आधाराला जवळपास असणं म्हणजे सुख.
कुणाचं उत्तर होतं, भरपूर पैसा गाठीशी असणं म्हणजे सुख.
तर कुणी लिहीलं होतं की शरीर धडधाकट असणं म्हणजे सुख.
सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या होत्या.
साऱ्या शंभर शिबिरार्थींच्या सुखाच्या कल्पना जेव्हा मी एकत्र केल्या तेव्हा लक्षात आलं, प्रत्येकजण कोणत्या तरी एका बाबतीत दु:खी आहे—- म्हणजे कुणाची बायको भांडखोर आहे,
कुणाला बद्धकोष्ठाचा त्रास आहे,
कुणाची मुलं त्यांच्यापासून दूर आहेत….
आणि ती उणीव त्या प्रत्येकाला टोचते आहे.
— म्हणजे उरलेल्या नव्व्याणव टक्के बाबतीत तो सुखी आहे. म्हणजेच काय तर प्रत्येकजण नव्व्याणव टक्के सुखी आहे आणि फक्त एक टक्का दु:खी आहे.
हे केवळ एक टक्का दु:ख आपण चघळत बसतोय आणि उरलेल्या ९९% सुखाकडे दुर्लक्ष करतोय. आहे की नाही गंमत.
— मी जेव्हा त्या साऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली तेव्हा सारेच चकीत झाले.
हीच तर सुखाची गंमत आहे. आपण सुखात असतो. पण आपण सुखात आहोत हेच आपल्याला माहित नसतं.
जेव्हा काही कारणामुळे त्या गोष्टीची आपल्या आयुष्यात उणीव निर्माण होते तेव्हा आपल्याला कळतं, अरे… एवढा वेळ आपण सुखात होतो.
लहान असताना वाटतं, लहानपण म्हणजे परावलंबित्व. केव्हा एकदा मोठे होतोय आणि स्वत:च्या पायावर उभे रहातोय. मोठं झाल्यावर वाटतं, किती टेन्शन रे बाबा.
— प्रत्येक गोष्टीत टेन्शन.
— जागा शोधायचं टेन्शन.
— कर्जाचे हप्ते भरायचं टेन्शन.
— ऑफीसमध्ये साहेबांना तोंड द्यायचं टेन्शन.
त्यापेक्षा बालपण किती सुखाचं होतं.
गृह्स्थाश्रमात प्रवेश केल्यावर वाटतं, संसारसंगे बहु कष्टलो मी ! केव्हा एकदा मुलं मोठी होतायत आणि या जबाबदाऱ्यांतून मोकळा होतोय.
मुलं मोठी होतात तेव्हा आपण वृद्ध झालेलॊ असतो. आणि गात्रं कुरकुर करू लागतात. तेव्हा वाटतं, अरे तो बहराचा काळ किती सुखाचा होता.
माझे एक ज्येष्ठ मित्र रवीन्द्र परळकर अलीकडे बऱ्याच दिवसांनी मला भेटले. शिळोप्याच्या गप्पा झाल्या. म्हटलं,
“थोडे वाळलेले दिसताय. बरं नव्हतं की काय?”
तर ते म्हणाले, “ प्रोस्टेट्च्या त्रासाने आजारी होतो. काय झालं, एक दिवस रात्री लघवी कोंडली. प्रोस्टेट ग्लॅंड वाढल्यामुळे त्याचा भार ब्लॅडरवर आला होता आणि लघवीलाच होईना. ओटीपोटावर भार असह्य झाला. मी वेदनांनी गडाबडा लोळू लागलो. अख्खी रात्र पेनकीलर घेऊन काढली. दुसऱ्या दिवशी फॅमिली डॉक्टरना घरी बोलवलं तर ते म्हणाले युरॉलॉजिस्टकडे घेऊन जा. युरॉलॉजिस्टकडे जाऊन ॲडमिट व्हायला दुपारचे अकरा वाजत आलेले. म्हणजे गेले पंधरा सोळा तास मला लघवीला झालं नव्हतं. वेदना असह्य होत होत्या. ब्लॅडर फुगून पोटातच फुटायची भीती निर्माण झाली होती. शेवटी एकदाचं मला ॲडमिट करुन घेण्यात आलं. आणि ब्लॅडर पंक्चर करुन सर्व युरीन बाहेर काढण्यात आली. त्या क्षणी माझ्या मनात विचार आला — आपल्याला दिवसातून वेळेवर लघवीला होणं ही सुद्धा किती सुखाची गोष्ट आहे.”
परळकरांचं उदाहरण हे सुखाच्या शोधात दु:खी असलेल्या प्रत्येकाचं प्रातिनिधिक उदाहरण आहे.
— हातपाय धडधाकट आहेत. दोन घास पोटात जातायत हे सुख नव्हे काय?
— परमात्मा मेहेरबान होऊन पावसा पाण्यापासून रक्षण करतोय हे सुख नव्हे काय?
— घराबाहेर पडल्यावर मागे एक वाट पहाणारं दार आहे हे सुख नव्हे काय?
’एका लग्नाची गोष्ट’ या प्रशांत दामलेंच्या नाटकातलं गाणं मला आठ्वतय,,
मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं
काय पुण्य असतं की ते, घरबसल्या मिळतं
मित्र हो, जाणिवांच्या खिडक्या सताड उघड्या ठेऊन विचार कराल तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही खूप सुखी आहात.
चला तर मग, सगळ्या तक्रारी उडवून लावा, सारी निराशा झटकून टाका, आणि आनंदाने जगू लागा.
संग्राहिका – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे.३८.
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
बरेचदा मनात विचार येतो, माणसाला नेमकं काय हवं असतं ? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधायला जाणं म्हणजे ते समुद्रातील पाणबुडे वा गोताखोर लोकं समुद्राचा तळ ढुंढाळायचा प्रयत्न करतात, तसं काहीसं वाटलं. सुख, आनंद ह्या संकल्पना व्यक्तीसापेक्ष बदलत जातात. तरीही ढोबळमानाने सुखी होण्यासाठी काही बेसिक गोष्टींना अग्रक्रमाने स्थान मिळतं.
ह्या बेसिक गोष्टींपैकी पहिलं स्थान आपलं आणि कुटूंबियांच आरोग्य.”सर सलामत तो पगडी पचास” ह्या म्हणीनुसार आपलं निरामय आरोग्य आपल्याला खूपसारं मनस्वास्थ्य देतं. आपल्या वा आजुबाजुच्या अनुभवाने आपल्या लक्षात येतं आपला प्रत्येक अवयव हा तितकाच महत्त्वाचा असतो. आपल्याला जेव्हा एखाद्या अवयवाला ईजा होते तेव्हा नेमकं आपल्या मनात हटकून येतं,दुसरा कुठलाही अवयव एकवेळ परवडला पण ह्या अवयवाचं दुखणं नको रे बाबा.
दुसरं स्थान आपलं मानसिक आरोग्याचं. काही कारणाने आपली मनस्थिती जर ताळ्यावर नसेल तर त्याक्षणी प्रकर्षाने जाणवतं. एकवेळ शारिरीक आजारपण असलं तर दिसतं तरी पण काळजी,विवंचना ह्याने हरवलेलं मनस्वास्थ्य मात्र दाखवताही येत नाही अन लपवताही येत नाही.
तिसरी अवघडलेली अवस्था म्हणजे आर्थिक विवंचना. ह्या स्थितीतील व्यक्तींना वाटतं आरोग्यावर पैशाने इलाज तरी करता येतो. फक्त पैसा,सुबत्ता हवी मग काळजी आसपास ही फिरकतही नाही.
वस्तुस्थिती अशी असते की आपल्याला ह्या कुठल्याही प्रकारची चिंता नसली वा व्यक्ती जवळ जबरीची सहनशीलता असली तरी हा भवसागर तारुन जायला मदतच होते.
म्हणूनच संतांनी म्हंटलच आहे “सदा सर्व सुखी असा कोण आहे ?” . त्यामुळे सुखी होण्याची किल्ली ही आपलीच आपल्याजवळ असते हे खरं
समस्त युवा पिढीस प्रातिनिधिक स्वरूपात, म्हणून प्रिय तरुणाई. या व्यासपीठावरून तुमच्याशी काही संवाद साधण्यापूर्वी मी तुमचे चेहरे न्याहाळत आहे. खूप त्रासलेले, कंटाळलेले, आणि आता काय डोस प्यायला मिळणार या विचाराने वैतागलेलेच दिसत आहेत मला. रीती-परंपरा, संस्कृती, आदर्श, इतिहास, हे शब्द ऐकून तुमचे कान किटलेले आहेत हे मला कळतंय. तेही साहजिकच आहे. माझ्यासारखे बुजुर्ग तुम्हाला सांगून सांगून काय सांगणार? असेच ना?
पण होल्ड ऑन —
मी मात्र अशी एक बुजुर्ग आहे की, ” काय हे, आमच्या वेळी नव्हतं बाई असं! ” हे न म्हणता तुमच्याशी संवाद साधू इच्छिणारी आहे. ” तुमच्यात मलाही घ्या की ” अशी विनंती करणार आहे.
एखादा ढग धरतीवर बसून जातो आणि संपतो. मात्र मागे हिरवळ ठेवून जातो. मी ना तो संपलेला ढग आहे आणि तुम्ही वर्तमानातील हिरवळ आहात. मी भूतकाळ आणि तुम्ही वर्तमान काळ आहात. गतकाळातच रमण्यापेक्षा मला वर्तमानकाळाबरोबर जोडायला आवडेल. एक साकव बांधायला आवडेल.
साक्षी भावाने जेव्हा मी तुमच्या जीवनाकडे पाहते, तेव्हा मला तुम्ही काळाच्या खूप पुढे गेलेले दिसत आहात. खूप प्रगत आणि विकसित भासता. आज याक्षणी मी शिक्षित असूनही तुमच्या तांत्रिक, यांत्रिक जीवनाकडे पाहताना मला फार निरक्षर असल्यासारखं वाटतं आहे. त्या क्षणी तुम्ही माझे गुरु बनता आणि मी शिष्य होते. हे बदललेलं नातं मला मनापासून आवडतं. आणि जेव्हा मी हे नातं स्वीकारते तेव्हा माझ्या वार्धक्यात तारुण्याचे दवबिंदू झिरपतात आणि मला जगण्याचा आनंद देतात.
बी पॉझिटिव्ह… से येस टू लाइफ… हा नवा मंत्र मला मिळतो.
हो युवकांनो ! भाषेचा खूप अभिमान आहे मला. पण तरीही तुमची टपोरी, व्हाट्सअप भाषा मला आवडूनच जाते. कूल. चिल, ड्युड, ब्रो, सिस.. चुकारपणे मीही हे शब्द हळूच उच्चारूनही बघते बरं का !
परवा संतापलेल्या माझ्या नवऱ्याला मी सहज म्हटलं, ” अरे! चील! ” त्या क्षणी त्याचा राग बटन बंद केल्यावर दिवे बंद व्हावेत तसा विझूनच गेला की !
तुमची धावपळ, पळापळ, स्पर्धा, इर्षा, ‘आय अॅम द बेस्ट’ व्हायची महत्त्वाकांक्षा, इतकंच नव्हे, तर तुमचे नैराश्य जीवनाविषयीचा पलायनवाद,आत्महत्या, स्वमग्नता हेही मी धडधडत्या काळजांनी बघतेच रे ! मनात येतेही..
” थांबवा रे यांना, वाचवा रे यांना !” .. एक झपकीच मारावीशी वाटते मला त्यावेळी तुम्हाला. पण मग थांबते क्षणभर. हा लोंढा आहे. उसळेल, आपटेल, फुटेल, पण येईल किनाऱ्यावर. आमच्या वेळचं, तुमच्या वेळचं ही तुलना येथे कामाची नाही. त्यामुळे दरी निर्माण होईल. अंतर वाढेल. त्यापेक्षा मला तुमचा फक्त हात धरायचाय् किंवा तुमच्या पाठीमागून यायचंय.
” जा ! पुढे पुढे जा ! आमच्यापेक्षा चार पावलं पुढेच राहा ! कारण तुम्ही पुढच्या पिढीचे प्रतिनिधी आहात. पण वाटलंच कधी तर पहा की मागे वळून. तुमच्यासाठी माझ्या हातातही एक मिणमिणती पणती आहे. दिलाच तर प्रकाशच देईल ती, हा विश्वास ठेवा. एवढेच. बाकी मस्त जगा. मस्त रहा. जीवनाचा चौफेर अनुभव घ्या.”
आपल्या घरात कुणीतरी पुण्यवान व्यक्ती असते. ती असेपर्यंत आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. जोपर्यंत बिभीषण लंकेमध्ये राहत होते तोपर्यंत रावणाने पाप केले तरी बिभीषणाच्या पुण्याईने रावण सुखी होता. परंतु जेव्हा बिभीषणासारख्या भक्ताला लाथ मारली व लंकेमधून निघून जाण्यास सांगितले, तेव्हापासून रावणाचा विनाश होण्यास सुरूवात झाली आणि शेवटी रावणाची लंका जळून दहन झाली व रावण मेल्यावर मागे रडायला कुणीही वाचले नाही !
अशाच प्रकारे हस्तिनापूरमध्ये जो पर्यंत विदूरासारखे भक्त रहात होते तोपर्यंत कौरवांना सुखच सुख मिळाले. पण जेव्हा कौरवांनी विदूरांचा अपमान करून त्यांना राजसभेतून जाण्यास सांगितले तेव्हा श्रीकृष्णाने विदुराला सांगितले की ‘ काका! आपण तीर्थयात्रेला जावे ‘. जसे विदुराने हस्तिनापूर सोडले, तसे कौरवांचे पतन व्हायला सुरुवात झाली व शेवटी राज्य पण गेले, आणि कौरवांच्यामागे कोणीही वारस राहिले नाही !!
याचप्रकारे आपल्या कुटुंबात अथवा मित्र परिवारात जोपर्यंत कोणी भक्त किंवा पुण्यवान आत्मा राहतो, तोपर्यंत आपण व आपल्या घरात आनंदी आनंद असतो. विचार करा ! एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पीडा निघून जाते आणि आपणास चांगले दिवस येऊ लागतात, पण अशी व्यक्ति जेव्हा आपला त्याग करते तेव्हापासून आपली ओहोटी सुरु होते. म्हणून भगवंतांच्या भक्तांचा अपमान कधीही करू नका. लक्षात ठेवा, आपण जे कमावून खातो ते कुणाच्या तरी पुण्याईने मिळत असते. यासाठी नेहमी आनंदी रहा व आपल्या परिवारात कोणी भक्त भक्ती करत असेल तर त्याचा अपमान करू नका, तर सन्मान करा. व त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. माहित नाही संसाराची गाडी कुणाच्या पुण्याईने चालते. आई-वडिल, वयोवृद्ध, मित्र व अतिथींचा नेहमी सन्मान करा व सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे देवाची भक्ती करत जीवन जगत रहा !! सोबत काही घेऊन आलो नाही व जातांना या संसारातून काही घेऊन जायचे नाही हे कायम लक्षात ठेवा..!!
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ कुटुंब, सेवा आणि नोकरी, वगैरे… ☆ श्री राहूल लाळे ☆
नववर्ष आलं आणि मागच्या वर्षाचा आढावा घेऊन पुढच्या वर्षात काय करायचं याचं प्लॅनिंग सुरू झालं. वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात वडील आजारी पडले. तसं मागचं वर्ष संपतानाच थोड्या तक्रारी चालू होत्याच, पण आता तीव्रता वाढली होती. अचानक ऑफिसमध्ये फोन आला की चक्कर येऊन पडले आणि लगेच निघालो. रस्त्यातूनच अँब्युलन्स घरी बोलवली आणि वडिलांना घेऊन दीनानाथ हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सीत आणलं . परिस्थिती अवघड आहे आणि क्रिटिकल आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आणि आयसीयूमध्ये ऍडमिट केलं.
कोणतंही आजारपण, हे ते भोगणाऱ्याला जाणवतं आणि जवळच्या नातेवाईकांना, त्यांच्याशी संबंधितांना, हॉस्पिटलमध्ये काम करत असणारे डॉक्टर्स, नर्सेस, तिथले मामा-मामी आणि इतर सर्व सपोर्ट स्टाफना ही त्याची जाणीव होते…पण प्रत्येकाची त्याकडे पहायची दृष्टी वेगळी. डॉक्टर्स-नर्सेस-मदतीचा स्टाफ यांच्यासाठी जरी रुग्णांची सेवा करणं ही ड्युटी -कामाचा भाग असला तरी ती मनापासूनच करायला लागते – रुग्णाचा आजार त्याचं निदान करून दूर करायचा असला तरी भावनिक गुंतवणूक न करता हे करणं महा कौशल्याचं काम. व्यक्ती तशा प्रकृती तसंच जेवढे रुग्ण तेवढे वेगवेगळे आजार व त्यांचे स्वरूप. यावर इलाज करताना अनेक नाजूक – अवघड आणि अनेकदा कसोटीचे प्रसंग येतात- त्यातून यशस्वी होऊन बाहेर पडणं सोपं काम नाही ! गेले काही आठवडे हॉस्पिटलमध्ये राहून अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या. सुरवातीला वडलांना इमर्जन्सीत आणल्यावर तिथल्या स्टाफने केलेली धावपळ – नंतर रात्रभर ICU मध्ये तिथे चाललेली लगबग – सकाळी बाबांना शुद्ध आल्यावर त्या अर्धवट स्थितीत त्यांच्या ” माझ्याकडे कोणाचं लक्ष नाही” अशा काही तक्रारीही स्मितमुद्रा धारण करून डॉक्टर व इतर स्टाफचं त्यांचं काम करत राहणं म्हणजे त्यांना अशा किरकिऱ्या तर कधी अनेक सोशिक रुग्णांना एकाच वेळी अटेंड करणं यासाठी वैद्यकीय ज्ञान आणि प्रॅक्टिस याबरोबरच किती कौशल्याचं आणि धीराचं काम आहे हे नंतरही दोन-तीन आठवडे जवळून पाहायला मिळालं.
जीवनदानाचं आणि रुग्णसेवेचं काम करणाऱ्या या सर्वांना अनेकदा दुवा मिळतात पण काही विपरित प्रसंगी रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरं जावं लागण्याच्या प्रोफेशनल हॅझार्डना समोर जायला लागतं. हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्सेस , मामा-मामी आणि सिक्युरिटी स्टाफ यांची ( यात अनेक स्त्रियाच ) परिस्थिती काही वेगळी नाही – कधी रेग्युलर शिफ्ट म्हणून तर कधी ओव्हरटाईम म्हणून बारा बारा तास वेगवेगळ्या वेळेची ड्युटी करणं – अनेक रुग्ण – त्यांना भेटायला येणारे नातेवाईक- मित्रपरिवार यांना सांभाळून घेत सतत बारा महिने चोवीस तास हॉस्पिटलमध्ये रुग्ण – त्यांच्या आणि नातेवाईकांच्या तक्रारी आणि दडपणग्रस्त मनस्थितीत राहणं सोपं नाहीच.
सलग तीन आठवड्यांहून अधिक काळ लहानपणानंतर वडिलांना आधी कधी दिला होता हे आठवायलाच लागेल. सुरुवातीचा पूर्ण आठवडाभर पूर्ण वेळ हॉस्पिलमध्येच होतो – ऑफिसला जाऊ शकलो नाही . नंतर इथं अनेक दिवस जाणार आहे हे कळाल्यावर आई – बायको – बहीण यांनी दिवसाचा वेळ वाटून घेतला आणि ऑफिसला जाणं सुरु केलं. संध्याकाळी ऑफिसमधून परस्पर हॉस्पिटलमध्ये जायचं आवरून वडलांना जेवण भरवायचं – थोडावेळ बोलायचं – अनेक तक्रारी ऐकायच्या – समजावणूक काढायची सकाळचा चहा नाश्ता त्यांचा आणि माझा करून घरी जाऊन आवरून ऑफिसला जायचं असं टाईट शेड्युल सुरु झालं. ऑफिसला जायला थोडा उशीर होतोय पण सहकारी सांभाळून घेतायत. गेले तीन चार आठवडे हॉस्पिटलमध्ये अनेक चांगले वाईट अनुभव आले – चांगले प्रसंग डॉक्टर- हॉस्पिटल स्टाफ व इतर रुग्णांच्या नातेवाईकांकडून तर वाईट म्हणजे एवढ्या कालावधीत ओळखीचे झालेले काही रुग्ण डोळ्यासमोर दगावताना पाहणं आणि उगाचंच मनात गिल्टी कॉन्शस व्हायला होणं (ऍक्च्युअली त्यांचे नातेवाईक जास्त ओळखीचे झालेले – एकमेकांची दुःखं शेअर करून ती हलकी होतात – ते अनुभवलं -). या ४ आठवड्यात काही समदुःखी मित्रमंडळी भेटली, जी आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या उपचारासाठी आली होती. त्यातली काही नेहमी भेटणारी तर काही अगदी वीस पंचवीस वर्षांनी भेटली. वडिलांवर उपचार करणारी डॉक्टर तर लहानपणीची मैत्रीण.. उपचाराबरोबरच तिचे आधाराचे बोल होतेच.. इतरही डॉक्टर मित्र मंडळी भेटली.
आणखी एक गोष्ट म्हणजे कुटुंब एकत्र आलं – नातेवाईक -मित्रमंडळींचे फोन किंवा येऊन भेटणं झालं.
– हे भेटणं- बोलणं एरवीही वेळोवेळी व्हायला हवं असं वाटू लागलं आणि भेटायला येणारे किंवा आधाराचे शब्द देणारे आपले कोण आणि फक्त आपले म्हणणारे कोण हेही स्पष्ट झालं. असो प्रत्येकाला आपापले व्याप असतात. बापूंशी (वडील) बरंच जवळचं बोलणं – त्यांचं ऐकून घेणं अनेक दिवसांनी झालं – बाहेरचे सगळे कार्यक्रम – काही लग्नं – बाहेरगावच्या व्हिझिट्स – रोटरीचे कार्यक्रम सगळं बंद – मात्र वाचन – मोबाईलवर काही क्लिप्स बघणं – थोडंफार लिहिणं चालू ठेवलं.
हे आजारपण, दुखणं-खुपणं आपल्या प्लॅनिंगमध्ये कधीच नसतं , नाही का? आजारी माणूस वृध्द असेल तर तो आजारी पडू शकतो याची मनाची तयारी असते, तरुण किंवा कोणत्याही वयातला धडधाकट माणूस आजारी पडला तर मात्र ते काळजीचं कारण होऊन बसतं. आजार, आजारपण आणि त्याबरोबरच येणारे वैद्यकीय उपचार व खर्च याचं आपण कसं नियोजन करतो याचा खरोखरंच विचार करायला हवा, हे अनेकदा आपल्याला किंवा जवळच्या व्यक्तीच्या आजारपणात आपल्याला जाणवतं. तब्बेतीची आणि जीवाची काळजी असली तरी सांपत्तिक स्थिती चांगली असेल तर एकवेळ निभावून येता येतं हे आता अनुभवायला मिळालं.
पण ज्यांची परिस्थिती नसेल त्यांनी काय करायचं ? तेही विदारक दृश्य सामोरं यायचं – ती पाहतानाच दवाखान्यातच एक पुस्तक वाचताना ” लता भगवान करे ” या सत्य घटनेवर आधारित सिनेमाबद्दल वाचलं – लता करे या पासष्टीच्या महिला आणि त्यांचे पती बुलढाण्याचे रहिवासी – जमीनदाराच्या शेतात काम राबून आयुष्य काढलेले – आयुष्यभराची कमाई तीन मुलींच्या लग्नात खर्च होऊनही एकमेकांवरचं प्रेम आणि विश्वास सांभाळून सुखानं जगणारं जोडपं. सुख हे बाह्य संपन्नतेवर अवलंबून नसून मनीच्या समाधानावर आहे हे दाखवणारं जोडपं. अचानक बाईंच्या पतीला गंभीर आजार होतो व तपासण्या करायला शहरात मोठ्या दवाखान्यात जायचा प्रसंग ओढवतो. आसपासच्या लोकांकडून पैसे गोळा करून लताबाई नवऱ्याला घेऊन शहरात मोठ्या दवाखान्यात जातात पण तिथल्या तपासण्या, डॉक्टरांच्या फिया , राहण्या खाण्याचा खर्च कळल्यावर त्या हबकून जातात. हॉटेल मध्ये खायला पैसे नाहीत म्हणल्यावर बाहेर दोन सामोसे घेऊन खाताना सामोसाच्या पुडक्यावर बाई ” बारामती मॅरेथॉन मध्ये बक्षिसाची भव्य रक्कम” ही जाहिरात पाहतात आणि दुसऱ्या दिवशी बारामतीला जाऊन संयोजकांच्या हातापाया पडून नववारी साडीत – अनवाणी पायानी शर्यतीत सामील होतात – आणि आश्चर्य म्हणजे फक्त नवऱ्याचे प्राण वाचवायचे या एकमेव उद्देशाने – जिवाच्या आकांताने पळून महागाचे शूज घातलेल्या स्पर्धकांना हरवून मॅरेथॉन जिंकतात व पायांना झालेल्या जखमा विसरून बक्षिसाच्या पैशाने नवऱ्यावरचे उपचार चालू करतात. प्रेम सर्वात श्रेष्ठ हे प्रूव्ह करून दाखवणं यापेक्षा वेगळं काय असतं ? – ही स्पर्धा लताबाईंनी पुढची दोन वर्षही जिंकली एवढं मात्र कळलं की हा नि:स्वार्थीपणा आपल्या माणसाच्या – कुटुंबाच्या प्रेमातून येतो – आपल्या माणसासाठी छोटा मोठा त्याग करायची भावना याच प्रेमातून -निस्वार्थीपणातून निर्माण होते – नाते संबंध पुन्हा जुळण्यासाठी ते पक्के होण्यासाठीही याचा हातभार लागतो – लताबाईंसारखं मॅरेथॉन पळणं सर्वांना शक्य नाही – त्याची गरजही नाही – पण भौतिक सुखाच्या सर्व गोष्टी जवळ असताना – त्या सर्व गोष्टीतून – रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून आपल्या माणसासाठी फक्त आजारपणातच नाही इतरवेळी ही भावना का जोपासू नये ? आणि या पलीकडे जाऊन आपलं क्षितिज थोडंसं वाढवून – प्रेम- आत्मीयता- ममत्व बाळगून कुटुंबाबाहेरही इतरांना जेवढी जमेल तेवढी मदत करायला काय हरकत आहे ? त्यात किती सुख समाधान मिळेल याची कल्पना ही गोष्ट वाचून आणि ४ आठवडे दवाखान्यात राहून मिळाली – योगायोगानं हेच ” जीवन समजून घेताना ” या गौर गोपाल दास यांच्या पुस्तकात या दिवसांत वाचायला मिळालं . आपलं कुटुंब आपण निवडू शकत नसतो पण आपल्या रूपातून आपल्या कुटुंबाला आणि कुटुंबही आपल्याला मिळालेली एक सुंदर भेटच नसते का ?
गेले तीन चार आठवडे असे गेले तरी या सक्तीच्या पण आता काहीश्या भावून गेलेल्या सेवेमुळे एक आंतरिक समाधान मिळाले हे नक्की पाहूया – आमच्या सर्वांच्या प्रयत्नांनी – डॉक्टर व नर्सेसच्या उपचारांनी – बापूंना लवकर बरं वाटू दे – आणि आमचं सहजीवन असंच आंतरिक बहरू दे – आणि इतर सर्व रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाइकांसाठीही हीच भावना व्यक्त करण्यापलीकडे माझ्या हातात आज काय आहे ?
☆ माधुकरी… — लेखक – श्री विकास वाळुंजकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
मौजीबंधनात अडकलेला गोडबोल्यांचा सुनील “ॐ भवती भिक्षांदेही” असे म्हणत समोर उभा राहिला. जेमतेम सात आठ वर्षाचा हा बटू. गोरापान. काळेभोर पाणीदार डोळे. छानपैकी चकोट केलेला. हातात दंड. दुस-या हातात झोळी. नेसणीला लंगोटी. गळ्यात जानवे. त्याचे हे रुपडे पाहून भिक्षांदेहीचा खराखुरा अनुभव दृष्टीसमोरून तरळून गेला.
असाच सातआठ वर्षांचा असेन. पित्याचे छत्र हरवलेले. काबाडकष्ट करून घाम गाळणाऱ्या आईपासूनही दुरावलेला. खूप खूप दूर गेलेला मी. व्यास गुरूकुल नावाच्या एका आश्रमात होतो.
ही गोष्ट असावी. १९५७ ते १९६१ या दरम्यानची. कोवळं वय. जग काय ? कशाचीच माहिती नव्हती. ॥ॐ भवती भिक्षांदेही॥ म्हणत दररोज दहा घरून प्रत्येकाने माधुकरी आणायची. अशी शिस्त होती आश्रमात. दुपारी बारा वाजता निघायचो. झोळीत ॲल्युमिनियमची ताटली, वाडगा असायचा. पंचा नेसलेला. दुसरा उपरण्यासारखा अंगावर घेतलेला. अनवाणीच जायचं. पहिलं घर होतं घाणेकरांचं. आजीआजोबा आणि मनावर परिणाम झालेला तरूण मुलगा. असं त्रिकोणी कुटुंब होतं ते. ॐ भवती म्हणताच घाणेकर आजी भाजीपोळी, आमटी, भात झोळीत घालायच्या.
तिथेच पुढे राहाणाऱ्या चित्तरंजन कोल्हटकरांच्या दारात उभा राहायचो. तिथेही अतिशय प्रेमाने भिक्षा मिळायची. पुढे महाजनांच्या घरात जिना चढून जायचो. दार उघडंच असायचं. त्यांच्या गृहिणीला ऐकू कमी यायचं. ताटकळत वाट पहात उभं राहावं लागायचं. त्या घरात भिंतीवर इंग्रजी कॅलेंडर व सुविचार लावलेले असायचे. भिक्षा मिळेपर्यंत त्यावरील स्पेलिंग पाठ करीत असे.
शेगडीवाले जोशी, गो.भा .लिमये, डाळवाले जोशी, आपटे रिक्षावाले, माई परांजपे आणि शेवट डाॅ. मोनॅकाका भिडे. अशी घरं मला नेमून दिलेली होती. या सर्व कुटुंबांतून मिळालेले ताजे सकस पदार्थ आश्रमात घेऊन यायचे. मोठ्या पातेल्यातून ते ठेवायचे. नंतर मोठी मुलं वाढप्याचे काम करायची. वदनी कवळ म्हणत आम्ही त्या संमिश्र पदार्थांचा आस्वाद घ्यायचो.
दोन्ही वेळेस तेच पदार्थ. भिक्षांदेहीला प्रतिसाद देणारी ही सगळी घरं. सदाशिव पेठेत भिकारदास मारूतीच्या पिछाडीला होती. आज माहित नाही त्या घरांचं स्टेट्स काय आहे ते. पण या प्रत्येक घरातील प्रेमळ माणसं मनांत कायमची घर करून बसली आहेत माझ्या.
डाॅ. भिड्यांच्या घरात पाचपन्नास मांजरं होती. माझ्या मागोमाग तीही दारात यायची. शंभरीतल्या भिडे आजी मला आणि मांजरांना एकाचवेळी अन्नदान करायच्या. खूप गंमत वाटायची त्या घरात. गोभांच्या लिमये वहिनी तर सणावाराला थेट स्वयंपाकघरात बोलवायच्या. कधी पुरणपोळी, कधी जिलेबी, कधी शिरा खाऊ घालायच्या. म्हणायच्या, “बाळा. ताटात वाढलं तर हे गोडधोड तुला कसं मिळेल? ते तर वाटण्यावारी जाईल. बस खाऊन जा. ” वहिनींच्या त्या रूपात मला आईच भेटायची.
माई परांजपे तर वाट पहात बसायच्या. माधुकरी वाढल्याशिवाय जेवायचं नाही, असं व्रतच केलं होतं त्यांनी. ते घर मी कधीच चुकवीत नसे. आपटे रिक्षावाले म्हणजे त्या गल्लीतले समाजसेवकच होते. मुलं शाळेत पोचविता पोचविता त्यांची उडणारी धांदल. त्यांचं ते अंधारं दोन खोल्यांचं घर. नऊवारी साडीतल्या आपटे काकू. धुण धुताधुता लगबगीनं भिक्षा वाढण्यासाठी चालणारी त्यांची धडपड, माझ्या बाल मनावर कायमची कोरली गेली आहे.
भिक्षेच्या रुपाने मी समाजपुरुषच पाहात होतो. नियतीच्या रुपाने तो मला जगवत होता. संघर्ष शिकविणा-या या समाजपुरुषाचे दर्शन फारच अफलातून होते. असं माधुकरी मागणं आताशा दिसत नाही. त्यात गैर काहीच नव्हते. चित्तरंजन कोल्हटकर हे नाट्यचित्रपट क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व होते. हे पुढे खूप उशीराने कळले. पोटाचीच लढाई होती. त्यामुळे नाटक सिनेमा वगैरै असतं, हे कळण्यासारखी परिस्थितीच नव्हती. कोल्हटकरांची तारका पुढे एसपी काॅलेजला बरोबर होती. तेव्हा आपण किती थोर व्यक्तीच्या कुटुंबाशी जोडले गेलो होतो हे लक्षात आले.
भोजनाचे आश्रमातील प्रसंग नजरेसमोरून तरळत असतांनाच गोडबोल्यांचा सुनील “आजोबा. ॥ॐ भवती भिक्षांदेही ॥ वाढतां ना ? ” असं म्हणाला. मी ताळ्यावर आलो.
चुरमु-याचा लाडू त्याच्या झोळीत घातला. साठ वर्षापूर्वी हरवलेलं बालपण शोधत बाहेर पडलो. मंगल कार्यालयातून थेट घरी आलो.
(मित्रांनो हे सगळं शब्दश: खरं आहे बरं)
लेखक : श्री विकास वाळुंजकर
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस !
चौदा विद्या चौसष्ठ कलां’चा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव आज होत आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी ‘श्रीगणेशजयंती’ म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो.
भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. तर माघी गणेशोत्सवात गणपतीला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती ही तिलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते.
भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी अर्थात गणेशोत्सव जेवढ्या मोठय़ा सार्वजनिक आणि घरगुती स्वरूपात साजरा केला जातो, त्या तुलनेत माघी गणेशोत्सवाचे महत्त्व कमी आहे. काही जण घरीच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात. तसेच काही ठिकाणी तो सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो.
गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला, असे म्हटले जाते.
पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्याला पुष्टिपती विनायक जयंती म्हणतात. या दिवशी पिठाचा गणपती करून त्याचे पूजन केले जाते.
दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेशचतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते. हे पूजन म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. त्याप्रति कृतज्ञता म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते.
तिसरा दिवस (वेळ) म्हणजे माघ शुक्ल जयंती. या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे.
– त्याबाबत, स्कंद पुराणात एक कथा आहे. या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारले. त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला. म्हणून, ही माघी गणेश जयंती (माघी गणेशोत्सव) म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तीळ व साखरेचे मोदक करून अर्पण करायचे असतात. एक वेळ उपाशी राहून या दिवशी जागरण करायचे असते.
!! ॐ गं गणपतये नम: !!
संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈