राजा कसा असावा? हा प्रश्न जगात कुणालाही विचारला तर त्याचे उत्तर एकच,” राजा असावा तर शिवाजी सारखा”.
महाराज ! नुसत्या आपल्या नामोच्चाराने आम्ही रोमांचित होतो! शिवरायासारखा एक जाणता राजा या देशात, महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला, आणि त्याने कधीही विसर न पडणाऱ्या पराक्रमाचा, संस्काराचा, नैतिकतेचा, महान इतिहास घडवला, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहेच.
व्हिएतनाम आणि अमेरिकेत वीस वर्षे युद्ध चालले. अमेरिकेला वाटत होते की या देशाला नष्ट करण्यासाठी अगदीच थोडा वेळ लागेल. पण युद्ध लांबले. अमेरिकेस माघार घ्यावी लागली. व्हिएतनामचा विजय झाला. त्यानंतर पत्रकारांनी त्यांच्या राष्ट्रपतींना त्यांच्या विजयाचे रहस्य विचारले असता, ते उत्तरले,
“युद्धकाळात हिंदुस्थानातील एका शूर राजाचे चरित्र माझ्या हाती आले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच आम्ही युद्धनीती ठरवली. आणि ती ठामपणे राबवली. आणि आम्ही विजयी झालो.”
पत्रकारांनी विचारले,” तो हिंदुस्थानी राजा कोण?”
राष्ट्रपती उत्तरले, “ छत्रपती शिवाजी महाराज. हा महापुरुष आमच्या देशात जन्माला आला असता तर आज आम्ही जगावर राज्य केले असते.”
याच राष्ट्रपतींनी स्वतःच्या मृत्यूपूर्वी आपली अंतिम इच्छा लिहून ठेवली होती की,
“माझ्या समाधीवर खालील वाक्य लिहिले जावे”
“छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा समाधीस्थ झाला!”
आणि आजही त्यांच्या कबरीवर हे वाक्य वाचायला मिळते.
महाराज असे तुम्ही! जगाचे आदर्श राजे. आपल्याबद्दल म्या पामराने काय आणि किती बोलावे?
शिव म्हणजे पावित्र्य, मांगल्य, सौंदर्य आणि शक्तीही. आपल्या नावानेच आमचे हृदय उचंबळते.
पण महाराज आज या पत्राच्या निमित्ताने, एक खेदही व्यक्त करावसा वाटतोय् . आज कुठेतरी आपल्या ऐतिहासिक नावाचा, आदर्शाचा, पराक्रमाचा केवळ दुरुपयोग केला जातोय. स्वार्थी माणसे निमित्त साधून भांडणे, दंगली माजवतात. झुरळ मारायचीही शक्ती नसलेली ही माणसे, केवळ मतांसाठी छाती फुगवून, “आम्ही शिवरायांचे वंशज आहोत!” अशा आरोळ्या ठोकतात. याचे प्रचंड दुःख होते. मान खाली जाते. लाज वाटते.
महाराज ! या अशा रणछोडदासांसाठी मी आपली नम्रपणे क्षमा मागते. आणि यांना सद्बुद्धी दे अशी प्रार्थनाही करते. शिवाजीचे वंशज म्हणून त्यांना खरोखरच अभिमान असेल तर त्यांनी शिवचरित्राचा सखोल अभ्यास करावा. लोकनेता कसा असावा याचे ज्ञान मिळवावे.
प्रतिकुलतेच्या सुईने तिच्या हाताच्या बोटांनां कितीतरी वेळा टोचलं, जखमातून रक्ताची थेंबा थेंबाने ठिपक्यांची रांगोळी निघाली, टोचले बोटांना पण कळ निघाली हृदयातून, स्स स्स चा आवाजाची कंपनं उमटली, तरीही तिनं शिवण सोडलं नाही. मायेचा दोरा वापरून हाती घेतलेलं शिवणाचं काम ती पूर्णत्त्वाला नेल्याशिवाय तिला फुरसत ती नसायची. शिलाई तर किती मिळायची म्हणता चार आणे. ती देखिल लोक त्यावेळी रोखीने फारच कमी देत असत. अन पहिला कपडा उधारीवर शिवून घेऊन दुसऱ्यावेळेला शिलाईचे निम्मेच पैसे हातावर ठेवले जायचे..ती पहिली उधारी कधीच वसुल न होणारी असे… कधी मधी मागुन बघितले तर असू दे या वेळेला ,पुढच्या वेळेला सगळी उधारी चुकती करु बरं.. जरा अधिक ताणून धरलं तर, आम्ही काय कुठं पळून जाणार आहे का तुझी शिलाई बुडवून?.. विश्वास नसेल तर राहू दे आम्ही दुसऱ्या शिंप्याकडं कापडं टाकतो.. तुझी भीडभिकंची भन नकोच ती… असा कांगावा आणि वर असायचा. जरा खर्जातला आवाजाने सगळी गल्ली गोळा व्हायची नि ते बघून आणखी चार गिर्हाईकं न बोलताच पसार होत असं… बुडलेली पहिली उधारी भुतालाच जमा होत असे… सकाळ पासून मशीनला मारलेलं पायडलं एकदा दुपारच्या नि रातच्या जेवणाला जरासं ईस्वाटा घ्यायचं.. ते रात्रीचं साडे अकराच्या दरम्यान चिमणीतलं तेलं संपल गेल्यानं घरात मिटृ अंधार पडल्यावरच त्या दिवसाला थांबायचं… मग भूईला पाट टेकली जाईची. सणावारचं तर उसंत ती कसली मिळायची नाही.. कधी कधी वादीच कंटाळून तुटायची तर कधी दोऱ्याची बाॅबीन सारखी निखळून पडायची.. घरात दारिद्र्याचा जाजम कायम अंथरलेला असायचा… कमावता हात एक दादल्याचा असे पण तुटपुंजी मिळकत खर्चाच्या फाटक्या खिशातून घरी येई पर्यंत गळून गेलेली असे…देणेकऱ्यांचं तोरण तर दाराच्या आड्याला कायमच लावून ठेवलं असायचं…ते कधीच उतरलं नाही…चार कच्चीबच्ची आणि मोठी दोन पोटाची खळगी पाठीलाच चिकटलेली…वितभरच्या पोटाला क्षुधाशांतीचा शापच होता जणू..अंगभर लेयाला कपडाच लाजायचा. जर्मनच्या पातेल्यात भात नसलेली पेजेचं पाणी खवळलेल्या भुकेला नुसत्या वासानंचं पोट भरल्याचा आभास वाटायचा… एका हाताची मिळकत पुरत नसायची महणून तिनं आपलं किडूक मिडूक चवलीच्या दामाला आणि सावकाराकडं गहाणवटं ठेवलं आयुष्याच्या काबाडकष्टाला नि शिलाई मशीन आणलंच एकदा चंद्रमौळीत झोपडीला.. जिद्दीचा दिवा आशेचा प्रकाश तिला दाखवत गेला.. हळूहळू शिलाईत जम बसू लागला..बऱ्यापैकी चार पैसे हाती आले नि सुखाच्या झुळूकेने घर हरकले..सावकाराचा जाच संपला. एकाला दोन तर दोनाची चार शिलाई मशीनची संख्या वाढत चालली..कपडे शिवून देण्याचं कंत्राट वर कंत्राट मिळत गेली… पसारा वाढला जागा अपूरी पडू लागली .तिने आता स्व:ताची फॅक्टरी उभा केली..अख्ख घरच मदतीला धावून आलं… गावात नगरात तिचं नाव रुपाला आलं.. चार गरजू बायांना रोजगार मिळाला.. मेहनतीला एक दिवस यशस्वी महिला उद्योगक्षेत्रातला पुरस्कार लाभला… तिने तो मानसन्मान आणि पुरस्कार त्या तिच्या पहिल्या वहिल्या शिलाई मशीनलाच अर्पण केला… आता ते मशीन काचेच्या कपाटात चकचकीत करुन ठेवलेलं असतयं.. फॅक्टरीच्या दर्शनी भागात दिमाखात मंदस्मित करत उभं असतयं..त्याला रोजचं पहिलं वंदन करूनच ती फॅक्टरीत प्रवेश करत असते…
सरासरी बघता माणूस आपापल्या क्षेत्रात दिवसभर काबाडकष्ट करीत असतो, मग कधी तो आपल्या दैनंदिन गरजा भागेल इतपत कमावतो तर कधी थोडंफार पुरुन उरेल इतकं. अगदी बोटावर मोजण्याइतक्या व्यक्ती ह्या भरघोस कमावतात अगदी पोटभर पुरुन त्याहूनही कितीतरी पट जास्त उरेल इतकं.
वेगवेगळ्या व्यक्तींच्या कमाईत फरक असला तरी एक गोष्ट मात्र काँमन असते,ती म्हणजे हे कमवायला माणसाला भरपूर कष्ट मात्र घ्यावेच लागतात. कष्ट, मेहनत ह्या गोष्टी म्हणजे जसं अन्नामध्ये मिठाचं महत्त्व असतं तसं जीवनात ह्याचं महत्त्व. आणि ह्याच अपार कष्टानंतर खायला कोंडा आणि उशाला धोंडा असेल तरी निद्रादेवी मात्र कायम प्रसन्न असते.
प्रत्येक व्यक्ती ही भरपूर कामं करीत असली तरी प्रत्येक व्यक्तीच्या कामाकामांत फरक हा असतोच.त्याच्या काम करण्याच्या पद्धती, काम करण्याचा कालावधी, कामाचा दर्जा ह्यामध्ये विवीधता ही आढळतेच. काही व्यक्ती प्रचंड कष्ट, कामे करतात पण त्यांच्या कामात निगुती नसते तर काहींच कामं हे अतिशय मोजकं असतं पण त्यांनी केलं की दुसऱ्या ला परत त्या कामाकडे वळून बघावं लागतं नाही इतकं ते परिपूर्ण असतं. काही व्यक्ती ह्या घरातील कामांमध्ये तरबेज तर काही घराबाहेरील कक्षेत असलेल्या कामांमध्ये पटाईत.
ह्या कामाबद्दलची एक छोटीशी पण मस्त पोस्ट वाचनात आली. कालनिर्णय ह्या दिनदर्शिकेच्या मागील पानावर छापलेली आहे. “छोट्या कामांच मोठ महत्त्व” असं शिर्षक असलेली . एक मस्त वाचनीय पोस्ट.
काम हे सुद्धा आपण बघूनबघून अनुभवातून शिकतो.चांगल,उत्कृष्ट कामाची नोंद आपला प्रत्येकाचा मेंदू ताबडतोब घेत असतोच,प्रश्न असतो तो आपल्या स्वतः च्या आळसामुळे त्यावर अंमलबजावणी न करण्याचा. असो
कामाचा उरकं, शाळेत एकही लेटमार्क न होऊ देता सातत्याने कितीतरी वर्षे चारीठाव स्वयंपाक माझी आई सकाळी चारला उठून रांधायची.हे.सगळं आठवून खरंच आता समज आल्यावर आईच खूप कौतुक वाटतं. आमच्या अहो आईंकडुन कुठलही काम कस शेवटापर्यंत व्यवस्थित करता येतं हे बघतं आलेयं. बहीणी कडून ,नणंदे कडून कामाचा झपाटा बघत आलेयं.माझी बहीण तर आताची कमलाबाई ओगलेच जणू.कुठलाही पदार्थ चवीला तसेच दिसायला आणि आरोग्यासाठी सर्वोत्तम ह्यात तिचा हातखंडा. बरेचदा आपण आपल्या कामाच्या ठिकाणी वा आजुबाजुला वावरणाऱ्या व्यवस्थित काम करणाऱ्या लोकांना आपोआप आपल्या निरीक्षणशक्तीने नजरेत टिपतो आणि मनोमन त्यांचं कौतुक ही वाटतं.
त्या कालनिर्णय मधील एक गोष्ट खूप भावली आणि पटली सुद्धा. त्यात सांगितलयं आपण सकाळी प्रथम उठल्याबरोबर जे पहिलं काम करतो,ते म्हणजे बिछान्यातून उठून तो आवरणे ,हे काम जर सर्वोत्तम निगुतीने जमलं तर दिवसभरातील सगळी कामं आपल्याकडून सकारात्मक भावाने सर्वोत्कृष्टच केल्या जातात. त्यामुळे उठल्याबरोबर प्रत्येकाने आपला बिछाना खूप छान,निटनेटका आवरून हा ठेवलाच पाहिजे. अर्थातच हा नियम काही व्यक्ती ह्या पाळतच असतील म्हणा. पण जे पाळत नसतील त्यांनी हा नियम तयार करुन त्याची काटेकोर अंमलबजावणी केल्यास खूप चांगला सकारात्मक फरक आपल्या आयुष्यात पडेल.
मोबाईलचा बॅलन्स संपायच्या आधीच त्याची किती काळजी घेतो आपणं. बॅटरी लो झाली की चार्जर शोधतो. पण तेवढीच काळजी नात्यांच्या बॅलन्सला जपण्यासाठी, नात्यांची बॅटरी लो होण्याआधी जर आपण घेतली तर किती सुखद होईल हे जीवन…
आपल्यातलं बोलणं संपलं असेल तर
पुन्हा एकदा टॉक टाईम भरु…
चला ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…
मनामध्ये काही अडलं असेल तर
त्या वाईट गोष्टींना फॉरमॅट मारु…
चला ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…
नवा घेवुन पुन्हा कॅनव्हास
नव्या चित्रात नवे रंग भरु…
चला ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…
प्रेमाचा नेट पॅक, समजुतीचा बॅलन्स
हृदयाच्या व्हाउचरवर पुन्हा स्क्रॅच करु…
चला ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…
उतार-चढाव ते विसरुन सारे
उद्यासाठी नात्यांवर पुन्हा टॉर्च मारु…
चला ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…
माणूस म्हंटलं तर चुकणारच ना
चुका तेव्हढ्या बाजूला सारु…
चला ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…
आयुष्याची बॅटरी रोज लो होते ग
जवळचे नाते तेवढे आवळून धरु…
चला ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…
व्यक्ती तितक्या प्रकृतीचा नियम
पटलं तेवढे ठेवुन बाकी इग्नोर मारु…
चला ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…
कांद्याचे कापसुद्धा डोळे भिजवतात
नात्यांचेही खाचे तसेच स्विकारु…
चला ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…
नव्या ताकदीने नव्या उमेदीने
निसटणारे हात पुन्हा घट्ट धरु…
चला ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…
सुसंवादाची सेल्फी आठवत
रिलेशनमध्ये अंडरस्टँडिंग भरु…
चला ना, पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु…
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
‘बुद्धिमताम् वरिष्ठम्’ अशा देवता म्हणविल्या जाणाऱ्या शनिवार पेठेतल्या वीर मारुतीचा गेली दोनशे वर्षे अखंड उत्सव सुरू आहे. पंचवीस वर्षांपूर्वी मूर्तीचे शेंदूराचे कवच निसटले आणि मारुतीरायाची विलोभनीय मूर्ती समोर आली. विशेष म्हणजे, चैत्र पौर्णिमा म्हणजेच, हनुमान जयंती ते अक्षयतृतीया असा इथे चालणारा उत्सव पानिपतच्या युद्धात बळी पडलेल्या वीरांच्या स्मृतिनिमित्त होतो, याची आजही अनेकांना कल्पना नाही.
अशी होती परंपरा…
परंपरेनुसार, जी घराणी पानिपतच्या युद्धात लढली त्या घराण्यातला ज्येष्ठ पुत्र वीराची वेशभूषा करून मारुतीरायाच्या भेटीला येतो. ही भेट होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच, धूलिवंदनाला होते. देवाला भेटण्यासाठीची जय्यत तयारी करून पूजेचे तबक हाती घेऊन तो मारुतीच्या भेटीला येतो. इथे येऊन देवाला मिठी मारली, की त्या घराण्यातला वीर देवापर्यंत पोहोचतो, अशी त्यामागची श्रद्धा आहे. पूर्वी या ठिकाणी बारा गाडे असत आणि ते गाडे ओढण्याचा मानही वीराला मिळत असे. ही परंपरा होती तेव्हा जोरदार यात्राही व्हायची. काळानुरूप यातल्या अनेक गोष्टी आता बदलल्या आहेत. ‘हे स्थान पुरातन असल्याचा उल्लेख पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये आढळतो. या ठिकाणी युद्धापूर्वी नवस बोलला जायचा. युद्धातून माणूस परतल्यास त्याला तुझ्या दर्शनाला आणू. जो युद्धावरून येतो तो वीर. दास, प्रताप आणि वीर अशी मारुती दैवताची तीन रूपे आहेत. धूलिवंदनाला अजूनही अनेक घराण्यांतले लोक इथे येतात. मारुतीरायाच्या भेटीला येताना घरातले टाक घेऊन येण्याची परंपरा आहे. काहीजण शस्त्रही आणतात. जुना मारुती आहे, एवढाच उल्लेख आढळतो. त्यामुळे पुण्यातल्या जुन्या देवस्थानांपैकी तो एक आहे. हा मारुती पिंपळाच्या वृक्षाखाली आहे.’
पूर्वी गांगल कुटुंबीय अनेक वर्षे उत्सव पाहायचे. आता त्या घराण्यातले कुणी नसल्याने उत्सवाची परंपरा पुढे राम दहाड, सचिन दाते, महेश पानसे, मयुरेश जोशी, प्रवीण जोशी ही कार्यकर्ते मंडळी चालवत आहेत. ही परंपरा अखंड सुरू ठेवण्याची परंपरा कार्यकर्ते सांभाळत असून, लोकवर्गणीतूनच हा उत्सव चालतो. आपापल्या इच्छेनुसार त्यासाठी मंडळी योगदान देतात.
वीर मारुतीच्या भेटीसाठी वाजतगाजत येण्याची परंपरा आजही सुरू आहे. त्या निमित्ताने वीरांचे हार घालून; तसेच प्रसाद देऊन स्वागत केले जाते. वर्षानुवर्षे हनुमान जयंती ते अक्षयतृतीया असा १८ दिवसांचा कीर्तन महोत्सव इथे होतो. अनेक कीर्तनकार आपली सेवा रुजू करतात.
वीर मारुतीबाबत पेशवे दफ्तरात अनेक कागदपत्रे धुंडाळली; मात्र मारुतीची स्थापना कशी आणि केव्हा झाली, याचा उल्लेख मिळत नाही. मारुतीरायाच्या या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला मिशा आहेत. आवेशपूर्ण अशी ही मूर्ती वीर मारुती या प्रकारातली आहे.
लेखक : श्री मंदार लवाटे
इतिहास संशोधक
संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
केळीचे लोंगर बागेत दिसायला लागल्यावर वानरांनी बागेत येऊन धुडगूस घालायला सुरुवात केली. केळी, पपई ….. एकही फळ हाताशी लागेना. आमच्या जमिनीत वडाच्या झाडाखाली अक्कलकोट स्वामींचे मंदिर बांधलेय. देवळात वीज आल्यावर एक दिवस जपयंत्र आणलं. सूर्यास्ताला जपयंत्रावर गायत्री मंत्राचा जप सुरू करायचा, तो चांगलं उजाडल्यावर बंद करायचा. आठ पंधरा दिवसातच एक गोष्ट अनुभवाला आली. जपयंत्र जरी रात्री सुरू असलं तरी दिवसभर बागेत होणारा वानरांचा धुडगूस आपोआप बंद झाला. वानर बागेच्या कुंपणापर्यंत यायचे. पण बागेत यायचे नाहीत. नुकसान करायचे नाहीत. रात्रीच्या वेळी मात्र तोच कळप तळ्याकाठच्या त्याच झाडावर वस्तीला असायचा. आज घराभोवती पाच फळबागा उभ्या राहिल्या असून वानरांमुळे होणारं नुकसान पूर्णपणे थांबलं. गायत्री मंत्र आणि वानर यांचा नेमका काय संबंध – हे मात्र अनाकलनीय आहे. आज अनेक शेतकरी हा अनुभव प्रत्यक्ष घेत आहेत.
‘रानगोष्टी’ या डॉ. राजा दांडेकर यांच्या पुस्तकातील हा उतारा. गायत्री मंत्राचा महिमा सांगणारा. आजच त्याची आठवण होण्याचे कारण काय ? कारण कोकणातील एक फेसबुक मित्र श्री.अविनाश काळे यांची पोस्ट. ‘कोकणचे दुःख कोणी दूर करेल ?’ ह्या मथळ्याच्या पोस्टचा मथितार्थ असा की कोकणातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान माकडे आणि वानरे यांच्यामुळे होत आहे. त्यांचा बंदोबस्त न झाल्यास कोकणातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ ओढवणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये वानर आणि माकड यांना उपद्रवी पशू जाहीर करून मारायला सुरुवात केली. महाराष्ट्रातसुद्धा असे करण्याची गरज आहे.
हे वाचताना गायत्री मंत्राचा प्रभाव आठवला. वानरे, माकडे यांना जीवनिशी मारण्यापेक्षा शेतकरी मित्रांनी हा साधा, निरुपद्रवी उपाय करून पहायला काय हरकत आहे ?
‘एखाद्या मंत्राचा प्रभाव मान्य करणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा?’ चा वाद जुनाच आहे. अशीही शक्यता आहे की एखादी विज्ञानाधिष्ठीत गोष्ट देवाधर्माच्या नावे सांगितली की लोकांना पटते, ते ऐकतात हे लक्षात आल्याने आपल्या पूर्वजांनी काही गोष्टी हुशारीने लोकांच्या गळी उतरवल्या असतील. आपल्याला त्यामागचे विज्ञान माहित नसल्याने आपण त्याला अंधश्रद्धेचे लेबल लावून मोकळे होतो !
भारतीय मानसिकतेला मंत्राचा प्रभाव, त्यामुळे होणारे चमत्कार हा मुद्दा नवीन नाही. मूल अक्षरओळख शिकण्याच्या आधीपासून घरच्यांकडून रामायण, महाभारतातील गोष्टी ऐकू लागते. अक्षरे ओळखता येऊ लागली की पौराणिक कथा वाचू लागते. (आताच्या नवीन पिढीत बहुधा हे होत नसावे.) बालवयातच ‘कुमारी माता’ कुंतीची कथा सामोरी येते. कुंतीने मनापासून दुर्वास ऋषींची सेवा केल्याने त्यांनी संतुष्ट होऊन अपत्यप्राप्तीसाठी देवांना वश करण्याचा मंत्र तिला दिला. तिने कुतूहलापोटी मंत्रजप करून सूर्याला आवाहन केले. सूर्य प्रगट होताच भयभीत होऊन त्याला परत जाण्यास सांगितले. मात्र ‘मंत्र व्यर्थ होऊ शकत नाही,’ असे सूर्य म्हणाला आणि सूर्यपुत्र कर्णाचा जन्म झाला.
भयकथा, गूढकथा यातही अघोरी विद्यांमध्ये विशिष्ट मंत्रांचे सामर्थ्य किती अचाट आहे हे वाचायला मिळते. ‘वशीकरण मंत्र साक्षात मनुष्यरुपात प्रगट झाला,’ वगैरे वाचताना मला भयंकर कुतूहल वाटत असे. जर खरेच असे काही प्रत्यक्षात घडत असेल तर ते आपल्याला निदान एकदा तरी बघायला मिळावे, असेही वाटून जाई.
विशिष्ट शब्द विशिष्ट पद्धतीने उच्चारणे म्हणजे मंत्र. या मंत्रोच्चारणाचा विधायक वापर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात करू शकलो तर आपले कितीतरी प्रॉब्लेम्स सुटतील! खरंच मंत्रात शक्ती असते का ? अलीकडेच व्हाॅट्स अप वर एक पोस्ट वाचायला मिळाली. त्यात या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. पोस्टचा मथितार्थ असा की एखाद्या माणसाने आपल्याला उद्देशून अपशब्द उच्चारले, शिव्या दिल्या तर आपल्याला संताप येतो. म्हणजेच त्या शब्दांमध्ये ताकद आहे. त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी तयार होते. ह्याउलट कुणी आपले कौतुक केले, प्रेमाने बोलले तर आपल्याला प्रसन्न, आनंदी वाटतं. म्हणजेच पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते अगदी ह्याच प्रकारे मंत्रातील शब्दांतदेखील ऊर्जा, सामर्थ्य असते. हे मंत्र आपल्या ऋषीमुनींनी, जे वैज्ञानिक होते, संशोधनातून सिद्ध केले आहेत.
सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड,विश्वविख्यात नेमबाज अंजली भागवत यांच्यासारखे अनेक खेळाडू ज्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी जात होते ते क्रीडामानसशास्त्रज्ञ व माजी इंटेलिजन्स ऑफिसर भीष्मराज बाम यांनी हा मुद्दा अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे. ते म्हणतात,’ मंत्र म्हणजे काही शब्दांच्या किंवा वाक्यांच्या आधारे प्रगट होणारा एखादा प्रभावी विचार असतो. काही वेळा एखादा शब्द किंवा ओंकारासारखे अक्षर मंत्रजपासाठी वापरले जाते. तर कधी कधी काही ओळींचाही मंत्र असू शकतो. मंत्रजप हा एकाग्रतेसाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे. आपल्या विचारांवर आपला ताबा नसेल तर विचार भरकटतातच. पण त्यासोबत आपलीसुद्धा अत्यंत त्रासदायक अशी फरफट होते. विचारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी मंत्र उपयुक्त ! मंत्रातले शब्द ज्या अर्थाने वापरले असतील त्यावर तुमची पक्की श्रद्धा असायला हवी. म्हणून तर मंत्र हा तुमची ज्या गुरुवर श्रद्धा असेल, त्याच्याकडून मिळवायचा असतो. किंवा तो मंत्र तुमच्या स्वतःच्या अनुभवातून सिद्ध झालेला हवा. मग आपोआप तुमची त्याच्यावर श्रद्धा बसते.’
प्रभावी स्वसंवाद ( स्वतःसाठी सूचना) लिहून काढून त्याचा मंत्रासारखा वापर करण्याबाबतही बाम सरांनी लिहिले आहे. Winning Habits या त्यांच्या मूळ इंग्लिश पुस्तकाचा ‘विजयाचे मानसशास्त्र’ या नावाने वंदना अत्रे यांच्या सहाय्याने मराठी अनुवाद केला आहे.
दैनंदिन जीवनात मारुती स्तोत्र, रामरक्षा (किंवा आपले आवडते स्तोत्र / मंत्र) म्हटले की प्रसन्न वाटतं, नकारात्मक विचार पळून जातात हा अनुभव तर सर्वांनीच घेतला असेल. ‘अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य’ अशीच रामरक्षेची सुरुवात आहे. बुधकौशिक ऋषींना स्वप्नात रामरक्षा स्फुरली. कुरवपूर (कर्नाटक) येथे श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांना ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या अठरा अक्षरी प्रभावी मंत्राचा साक्षात्कार झाला.
अखंड नामस्मरण, मंत्रजप यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मकता येत असेल, फायदा होत असेल तर ‘श्रद्धा – अंधश्रद्धा’ चा काथ्याकूट कशाला ? नियमितपणे, श्रद्धेने मंत्र जपावा हे उत्तम.
संग्राहिका: सौ. शशी नाडकर्णी-नाईक
फोन नं. 8425933533
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
भेटवस्तू… किती गोड आणि आनंददायक शब्द आहे. कुणालाही भेटवस्तू हा शब्द नक्कीच आवडणार. मानवी मनांत चांगल्या कामाकरता शाबासकी म्हणून आणि प्रोत्साहन म्हणून भेटवस्तू देण्याची स्तुत्य परंपरा आहे. लहान मुलामुलीना जितका आनंद या भेटवस्तूने होतो तितकाच आनंद तरुणाला आणि वृध्दांना देखील होतो हे सत्य आहे. भेटवस्तू या शब्दाचा अर्थच मुळी एक विशिष्ट जाणीव मनामध्ये पेरत असतो.
भेटवस्तू…,आनंदाचा ठेवा आहे, समाधानी तृप्ती आहे, प्रोत्साहनाची शाबासकी आहे. भेटवस्तू घेताना फारशी नियमावली नसतेच मुळी. कारण भेटवस्तू नाकारण्याची अपवादात्मक उदाहरणे वगळता सर्वत्र भेटवस्तू स्विकारण्याचा पायंडा असतो. याचकरीता मग भेटवस्तू म्हणून काय दिले पाहिजे याची योग्य जाणीव झाली पाहिजे.बरेचदा अनेक स्पर्धात भेटवस्तू म्हणून लहान मुलांना विशिष्ट खेळणी, स्त्रीयांना गृहोपयोगी वस्तू, तरुणाईला फॕशनेबल वस्तू आणि वृध्दांना उपयोगी पडणारी वस्तू निवडतात. एका अर्थाने यामध्ये गैर काहीच नाही. या प्रत्येक वस्तुमागे आनंद हा नक्कीच मिळतो. परंतु या भेटवस्तू मनुष्याला कितपत प्रोत्साहन देतात याविषयी वाजवी शंका उपस्थित केली पाहिजे. शाबासकी याचा अर्थ केवळ पाठीवर थाप अशी नसावी तर मेंदूला चालना अशी असली पाहिजे. मतभेदाला वाव ठेवून इथे एक विचार प्रसूत करतोय. तो असा की, कोणत्याही वयोगटाला त्याच्या पुढील आयुष्यात आनंद, गृहोपयोगी, फॕशनेबल आणि उपयोगी अशा भेटवस्तू देताना…एक चांगले पुस्तक हाच पर्याय उपलब्ध असावा. पुस्तक मनुष्याचे मस्तक घडवते. अनेकजण आजकाल हा पायंडा जपताय हे स्तुत्य आहे.लहानांसाठी बालकथेची आणि थोरामोठ्यांची चरित्रे, स्त्रीकरता गृहोपयोगी आणि स्त्रीवादी साहित्य, तरुणाईकरता वैचारिक व ललित साहित्य, वृध्दाःकरता करमणूक करणारे व इतर साहित्य दिले तर आनंद व प्रोत्साहन याचबरोबर मेंदूचा योग्य व्यायाम घडू शकतो. पुस्तके ही भेटवस्तू कोणत्याही कार्यक्रमाचा पहिला योग्य पर्याय असतो याची जाणीव व्हावी.
आजकाल कोण वाचतय ? हे नकारात्मक पालूपद आळवण्यात अर्थ नाही. पुस्तकासारखी भेटवस्तू केवळ त्याच व्यक्तीला नव्हे तर त्याच्या सानिध्यातील अनेकांच्या हिताची कृती घडवण्यात एक योग्य भुमिका बजावत असते. याचा अर्थ पुस्तकाची भेटवस्तू केवळ वैयक्तिक आनंदाचा, समाधानाचा, तृप्तीचा व प्रोत्साहनाचा भाग होणार नसून तो काही सार्वत्रिक पातळीवर आनंद, समाधान, तृप्ती व प्रोत्साहन पेरत असतो. मानवी जीवनात सामुदायिक हिताची ही कल्पना कृतीत येणे हीच… मनुष्याने मनुष्याला द्यावयाची खरी भेटवस्तू आहे.
☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -4 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पहिले,- आता आजीही नाहीत आणि त्यांचा वसा चालवणार्या जाऊबाईही नाहीत. मात्र त्यांनी आणि मी आजींचा वसा पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न आमच्या परीने केला आहे.- आता इथून पुढे)
आजींच्या व्यक्तिमत्वाच्या आणखी एका पैलूबद्दल लिहायला हवं. भावनिक जीवनात त्या अतिशय श्रद्धाळू होत्या. अंध:श्रद्ध म्हणता येईल इतक्या. करणी, भुतं- खेतं या सगळ्या गोष्टींवर पराकोटीचा विश्वास होता. कुणाला ताप आला, दोन –तीन दिवसात नाही उतरला, तर निघाल्याच त्या त्यांच्या क्षेत्रातील डॉक्टरकडे, म्हणजे कुणी चिप्रिकर आजी होत्या, किंवा ताई कोल्हटकर यांच्याकडे. काय झालं, कुणी करणी केली का? काही बाहेरची बाधा आहे का? वगैरे विचारून त्यांनी सांगितलेले उपचार सुरू होत. मात्र ते सारे उपचार त्या स्वत: करत. इतरांना त्याची तोशीस नसे. त्याचप्रमाणे त्यांचेच उपचार करायचे, डॉक्टरकडे जायला नको, असाही आग्रह नसे. तुम्ही डॉक्टरकडे जा. मला हवे ते उपचार मी करीन, हे धोरण. त्यामुळे त्यांच्या श्रद्धेमुळे नि अंध:श्रद्धेमुळे घरात वादावादी, भांडण असे काही झाले नाही. त्यांच्या श्रद्धा आणि अंध:श्रद्धा त्यांच्यापुरत्या होत्या. त्यासाठी जे काही करायचं, ते त्या स्वत:च करत. त्यासाठी त्यांनी कधी इतरांना वेठीला धरले नाही. तू मंगळवारचे उपास कर, किंवा शंकराला प्रदक्षिणा घाल, असे काही त्यांनी कुणाला संगितले नाही. आपल्याला मात्र जे वाटते ते त्यांनी बदलत्या काळातही केले आणि आपले व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राखले.
त्यांच्या विचारातला आधुनिकपणा घरात घडलेल्या एका घटनेमुळे सगळ्यांच्या पुढे आला. आमचे एक जवळचे नातेवाईक होते. त्यांच्या मुलीचे लग्न झाले आणि वर्षभराच्या आत तिचे यजमान पोटात अॅपेंडिक्स बर्स्ट होऊन गेले. बावीस-तेवीस वय असेल तिचं. पुढे वर्षभराने कुणी तरी तिच्यासाठी एक स्थळ सुचवले. तेही विधुर होते. पसंती, बोलणी सगळं झालं, पण तिचे वडील मोठे कर्मठ. ते काही या गोष्टीला तयार होईनात. ते म्हणायचे, ‘मी समर्थ आहे तिच्याकडे पहायला .’ शेवटी आजींनी जाऊन त्यांची समजूत घातली. त्या म्हणाल्या, ‘काळाप्रमाणे आपण बदलायला हवं. तुम्ही तिला आयुष्यभर पुरणार आहात का? ‘असं खूप काही बोलल्यानंतर, नकाराची त्यांची भूमिका, ‘काय हवं ते करा!’ यावर येऊन ठेपली. त्यांचं हे वाक्य म्हणजेच त्यांचा होकार असं गृहीत धरून बाकीच्यांनी पुढाकार घेऊन तिचे लग्न लावून दिले. आज ती मुले-नातवंडे अशा परिवारात सुखाने नांदते आहे. या सगळ्या घडामोडीत मला सगळ्यात विशेष वाटतं, ते सोवळ्या असलेल्या आजींनी, त्या आपल्या कर्मठ, जुन्या विचारसरणीच्या नातेवाईकाची समजूत घातली होती.
आजी सोवळ्या होत्या. त्यांचं सोवळं- ओवळंदेखील होतं. पण त्याचं अवडंबर त्यांनी कधी माजवलं नाही. त्यांचं सोवळं त्यांच्यापुरतं असे. त्याचा व्याप-ताप कधी दुसर्याला झाला नाही.
१९६५ मध्ये माझं लग्नं झालं. तेव्हा घरात इतकी माणसं होती की सगळी नाती लक्षात यायला मला महिनाभर लागला. लग्नानंतर १५-२० दिवसात एक नणंद बाळंत झाली. त्यानंतर दोन महिन्यांनी दुसरी. घरात डोहाळजेवण, बाळंतपण, बारशी, पुढे माझे सणवार असे कार्यक्रमावर कार्यक्रम. त्या काळात आजींच्या दोन चुलत, मावस जावा इंदिराकाकू आणि ताई सोमण जवळ जवळ वर्षभर आमच्याकडे रहात होत्या. एकदा सहज बोलता बोलता त्या मला म्हणाल्या,’ तुझे दीर आणि सासू नंबर एकची माणसे आहेत. शंभर नंबरी सोनं. ‘ आज मागे वळून बघताना माझ्या लक्षात येते, त्या बोलल्या, त्याची मला प्रचिती आलीच, पण अनेकदा असंही वाटतं की , कुणाला ठेवून घेण्याचे, मदत करण्याचे, त्यांची गरज भागवण्याचे निर्णय माझ्या दिरांचे आणि सासुबाईंचे असले, तरी त्यांना तेवढीच समर्थ साथ वहिंनींची ( माझ्या जाऊबाईंची) होती. म्हणून सगळ्या गोष्टी सहजतेने होऊ शकल्या. कुणीही राहिले, तरी प्रत्यक्ष परिश्रम, कष्ट वहिनींनाच करावे लागायचे. एका दृष्टीने आजी, दादा, वाहिनी हा त्रिवेणी संगम होता. आमचं घर म्हणजे, ‘तीर्थ’ हा शब्द वापरत नाही मी, पण अनेकांच्या आधाराचं, आणि विसाव्याचं ठिकाण होतं. कुणी तिथे क्षणभर पहुडलं, कुणी दीर्घकाळ स्थिरावलं.
एकदा बोलता बोलता, मोठ्या वन्संची नात मेधा म्हणाली, ‘कॉलेजमध्ये गेल्यावर मदर टेरेसांचा फोटो मी प्रथम पाहिला आणि मनात आलं ’अरे, ही ‘मदर’ तर आपल्या घरी आहेच. माधवनगरची आजी. (म्हणजे प्रत्यक्षात तिची पणजी.) तशीच पांढरी साडी, डोक्यावरून पदर, चेहर्या-मोहर्यातही खूप साम्य आणि दुसर्याला मदत करायची, दुसर्याचं दु:ख दूर करण्यासाठी तन-मन-धनाने झटण्याची तीव्र इच्छा, आंतरिक ऊर्मीही दोघींची सारखीच. मदर टेरेसांच्या कामाचा परीघ मोठा असेल, माझ्या आजीचे, नव्हे पणजीचे , कामाचे क्षेत्र, नातेवाईक, गाववाले, परिचित लोक एवढ्यापुरतंच मर्यादित असेल, पण कामना, ‘दुरितांचे तिमीर जावो, हीच!’
आजींनी जे जे दुसर्यांसाठी केलं, कधी सहानुभूती, कधी मदत, कधी योग्य सल्ला, त्यात त्यांचा इवलाही स्वार्थ नसे. त्या अर्थाने त्या खरोखरच संसारात राहूनही संत झाल्या होत्या. त्यांच्या मोठेपणाच्या किती किती गोष्टी आठवताहेत. सगळं सांगायला गेलं, तर पुस्तकच होईल. आता त्या प्रत्यक्षात नाहीत, पण माझ्या मनात मात्र त्या रुजून राहिल्या आहेत.
त्या नसतात, तरीही स्मृतीमध्ये त्या टकटक करत रहातात.
श्वानांच्या गुणांच्या बाबतीत महाभारतातली एक गोष्ट सांगितली जाते. पांडव स्वर्गात जाताना ,’ सरमा ‘ ही कुत्री त्यांच्याबरोबर होती. जो खोटे बोलला नाही ,खोटे वागला नाही, निस्वार्थ सेवा, आज्ञाधारकता, आणि निष्ठावंत सेवक असा राहिला, त्याला स्वर्गात प्रवेश मिळणार होता .या अटींमध्ये ‘सरमा ‘ पास झाली . तिच्या गुणवैशिष्ट्यांमुळे तिला स्वर्गाचे दार सहजगत्या खुले झाले.
आपण इतिहासात वाचतो की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर , त्यांचा लाडका कुत्रा ‘ वाघ्या ‘ महाराजांच्या चितेवर धन्यासाठी झेपावला होता. या निष्ठेचे वर्णन करायला शब्दही तोकडे आहेत खरोखर.
गुजरातमधील पालमपुर तालुक्यात काही कुत्रे इतके श्रीमंत आहेत की, ते पाच कोटींचे मालक आहेत. काही वर्षांपूर्वी नवाबाने गावकऱ्यांच्या नावावर केलेली जमीन, त्यांनी आपल्या कुत्र्यांच्या नावाने केली. त्या कुत्र्यांची जमीन वीस बिघा, म्हणजे त्याची किंमत जवळजवळ पाच-सहा कोटीहून जास्त आहे. पहा ही कुत्र्याची श्रीमंती !
एखाद्याचं नशीब पहा कसं असतं ते. अंतराळयानातून सजीव म्हणून ‘ लायका ‘ या कुत्रीलाच पाठवले होते. अंतराळात जाणाऱ्या पहिल्या सजीवाचा मान या कुत्रीला मिळाला. काय म्हणावं तिचं नशीब !
आत्तापर्यंत श्वानांवर सर्वात जास्त पुस्तके लिहिली गेली आहेत. श्वानांचा एक विश्वकोशही आहे .जी व्यक्ती प्राण्यांना प्रेमाने सांभाळते, तिच्यापेक्षा पाळीव प्राणी त्या व्यक्तीवर अधिक प्रेम करतात. त्या प्रेमाला माणूसच कमी पडतो, असं म्हणायला हरकत नाही .काही श्वान आपलं सुंदर रूप आणि आज्ञाधारकपणा या गुणांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही गाजतात. थायलंडमधील बँकॉक येथे डॉग शो मध्ये आशिष लिमये यांची ‘ माया ” ‘ (दोन वर्षे वयाची, बेल्जियम मेनोलीज जातीची ) हिने “सेव्हन बेस्ट ऑफ ब्रीड “, आणि ” सेव्हर चॅलेंज सर्टिफिकेट” अशी दोन मानाची पदके मिळविली. कॅनल क्लब ऑफ इंडियाच्या स्पर्धेतही ती चॅम्पियन ठरलेली आहे. खरंच किती कौतुक करावे?
ऑलिंपिक सारख्या सामन्याच्या वेळी ,काही मोजकेच श्वान, प्रेक्षकांमध्ये दंगा होऊ न देण्याचे काम
करतात . लोक पोलिसांपेक्षा कुत्र्याला जास्त घाबरतात. व्यवस्थापनात पोलिसांपेक्षा कुत्र्यांची संख्या कमी चालते.
श्री. गिरीश कुबेर यांनी ” पंचकन्या स्मरे नित्यम “, या लेखामध्ये, घरातल्या पंचकन्यांचे (कुत्र्यांचे ) व्यक्तिमत्व इतके छान अधोरेखित केले आहे की, ते पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते. ते लिहितात की या पंचकन्यांनी हेच शिकवलेलं की — “चांगला माणूस होण्याचा मार्ग प्राण्यांच्या अंगणातून जातो”. पहा बरं काय वाटतं त्यांना ते.
” मी आणि माझी ३१ बाळं “, हा ममता रिसबूड यांनी लिहिलेला लेख वाचताना त्यांनी त्या बाळांसाठी (प्राण्यांसाठी ) घेतलेले कष्ट आणि त्याग खरोखरच वाखाणण्याजोगा आहे असे वाटते.
चित्रपटांबद्दल तर काय सांगावे? ” हम आपके है कौन” मधला ‘टफी ‘, “सच्चा झूठा” मधला ‘ मोती’,
“माँ “मधील ‘डॉगी’, “बेताब “मधला ‘बोझो’, ” वॉटर” मधला ‘ काळू’ — किती नाव सांगावीत तितकी
कमीच ! या श्वानांचा अभिनय आपण हौसेने आणि आवडीने पाहतो ना!
पूर्वीचे मुंबई येथील श्वान शिक्षक श्री. शां ना दाते यांचा २५ वर्षे, चार श्वानांबरोबर सहवास होता. त्यांनी मुंबई दूरदर्शनवर त्यांच्या ‘ प्रिन्स ‘ या कुत्र्यासह, मुलाखती आणि मार्गदर्शन केले होते. ‘ प्रिन्स ‘ चे अत्युत्तम काम असलेल्या ” फुल और कलियाँ”” ( १९६० साली) या बोलपटाला पंतप्रधान पुरस्कार मिळाला. ते अभिमानाने सांगत असत की, “मी मोठा झालो नाही. ‘प्रिन्सने ‘, मला मोठं केलं.” तो स्वर्गवासी झाल्यानंतर त्याचा स्मरणविधीही ते करत असत.
पोलीस खात्यातील श्वान निवृत्तीनंतर कोणीही दत्तक घेऊ शकतात .गुन्हेशोधक ,बॉम्बशोधक ,नारकोटिक्स शोधक ,रेस्क्यू टीम, फॉरेस्ट, असे वेगवेगळ्या प्रकारचे काम करणारे श्वान पूर्ण प्रशिक्षित आणि लसीकरण केलेले असतात .रात्री गस्त घालणे, गुन्हेगारांना पकडणे, विमानतळ, गोद्या या ठिकाणी पहारा आणि तपासणी ,लपवून आणलेले मादक पदार्थ शोधणे, अशी कामे पोलीस दलातील श्वानांना करावी लागतात. काही वेळा पोलीस शोध घेऊ शकत नाहीत, अशावेळी श्वान ते काम बिनचूक करतो. परदेशात काही ठिकाणी प्रेमापोटी कुत्र्याची स्मारकंही उभी केली गेली आहेत.
आमच्याच घरातल्या कुत्र्यांच्या इमानदारीचे किती कौतुक आणि अनुभव सांगावे तितके कमीच ! ओसाड रानात केवळ कुत्र्यांच्या जीवावर आम्ही निर्धास्तपणे राहत होतो. वेगवेगळ्या टोनमध्ये आवाज काढून कितीतरी साप, विंचू, अगदी चोरही त्यांनी पकडून दिले आहेत. न फिटणारे आणि अनंत उपकार आहेत त्यांचे आमच्यावर ! कर्मयोग , ज्ञानयोग आणि भक्ती योगाच्या मार्गातून मी त्यांच्यातल्या ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते.
ही श्वानांची गौरव गाथा वाचताना काही जणांचे आक्षेपही असणार. निरपराध्यांना भटकी कुत्री चावतात, त्याचे काय? पण एक कुत्रा चावला तर उरलेल्या पंचवीस कुत्र्यांना मारून टाकायचे का? मारून टाकणे, हा त्यावरचा उपाय नव्हे. पोटाची भूक भागत नसेल तर ते आक्रमक होतात. कित्येक ग्रुप सध्या वेगवेगळ्या ठिकाणी भटक्या जनावरांना खाद्य देण्याचे पवित्र कार्य करत आहेत. केवळ त्यांची संख्या वाढू नये म्हणून, आकडा न सांगता प्रामाणिकपणे त्यांचे निर्बिजीकरण व्हायला हवे .कुत्रा पाळायचा असेल तर भटक्यातला पाळला ,तर एक जीव जगेल. आणि तुमच्यावर अनंत उपकार करेल. श्वानांची ही गाथा कितीही लिहिली तरी न संपणारी आहे. ती अशीच कौतुकाची गाथा चालतच राहणार.