मराठी साहित्य – विविधा ☆ वळीव ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ वळीव ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

खिडकीतून बाहेर आकाशाकडे पाहताना दुपारच्या उन्हाच्या झळा अंगाला जाणवत होत्या. मार्च, एप्रिल महिना म्हणजे उन्हाळ्याची तीव्रता जास्त! आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर ढगांचे पांढरे शुभ्र पुंजके विखुरलेले दिसत होते आणि माझं मनही  असंच विचारांच्या आवर्तात भरकटत  होते!

लहानपण डोळ्यासमोर आले! परीक्षा संपण्याच्या आनंदा बरोबरच मोठ्या उन्हाळी सुट्टीची चाहूल लागलेली असे. ही सुट्टी कशी घालवायची याची स्वप्नं रंगवत दिवस जायचे. आता सारखे टीव्ही, मोबाईल, मोबाईल गेम, सिनेमा हे विश्व आमच्या समोर नव्हतं! फार तर परीक्षा झाल्यावर एखादा सिनेमा बघायला मिळायचा! कोकणात तर सुट्टीत दुपारी पत्ते खेळणे, संध्याकाळी समुद्रावर फिरायला जाणे, डबा ऐसपैस सारखे खेळ खेळणे,घरी आले की परवचा म्हणणे, गाण्याच्या भेंड्या लावणे   हीच करमणूक होती. सकाळी आठवण भाताचा नाश्ता झाला की दुपारच्या जेवणापर्यंत आम्ही घरात फिरकत नसू. आंबे बाजारात सुरू झाले की रोज आमरसावर ताव मारणे, फणस, काजूचा आस्वाद घेणे यात दुपार कधी सरायची कळत नसे. घामाच्या धारा वाहत असायच्या पण संध्याकाळी ऊन उतरले की समुद्रावरचा वारा ‘शीतल विंझण वाऱ्यासारखा वाटायचा!

बालपण कोकणचा मेवा खात कधी संपलं कळलं नाही आणि कॉलेज साठी देशावर आले. देशावरचे उन्हाळी वातावरण खूपच वेगळे! ऊन खूप असे पण घामाच्या धारा कमी! संध्याकाळी चार-पाच नंतर हवा एकदम बदलत असे या दिवसात! अभ्यासाच्या वाऱ्याबरोबरच बाहेरची हवा ही बदलती असे! दुपारचे कडक ऊन संध्याकाळी वाऱ्या वावटळीत कमी तीव्र वाटायचे. हॉस्टेलवर राहत असताना जानेवारीनंतर हवेतला गारवा कमी होऊन वातावरण तापत असे. आमच्या कॉलेजच्या परिसरातील झाडांची पाने पिवळी, करड्या रंगाची  दिसू लागत. अधून मधून वावटळ सुटे आणि दूरवर फुफाटा उधळत असे. वसंत ऋतुच्या चाहुलीने निसर्गात सूजनाची निर्मिती दिसायला सुरुवात होई. झाडावर पालवी फुटलेली दिसे. कोकिळेचे कूजन ऐकायला येई तर कुठेतरी निष्पर्ण  पांढऱ्या, गुलाबी रंगाचे वस्त्र पांघरून दिसे तर कुठे पिवळ्या जांभळ्या फुलांची शाल पांघरलेला कॅशिया असे! आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर गुलमोहराचे केशरी तुरे खुलून दिसत! मोगरा, मदनबाणाची छोटी छोटी झुडपे पांढऱ्या कळ्यांनी भरून गेलेली दिसत. संध्याकाळी त्यांचा सुगंध सगळा परिसर गंधमयी करत असे!

अशा या वातावरणात आकाशात ढगांची बदलाबदली कधी सुरू होई कळत नसे. पांढरे शुभ्र ढग हळूहळू 9करडे बनत, बघता बघता आकाश काळ्या ढगांनी भरून जाई. ढगांचा कडकडाट आणि विजेच्या गडगडाटासह हवा आपलं रुपच पालटून टाकत असे. जोराचा वारा सुटला की पाखरे लगबगीने आपल्या घराकडे परतू लागत. आणि मग जी वळवाची सर येई ती मृदगंध उधळीत जीवाला शांत करत येई! तो पाऊस अंगावर झेलू की टप टप पडलेल्या गारा वेचू असे होऊन जाई! छपरावर, रस्त्यावर सगळीकडे गारांचा सडा पसरलेला दिसे! डोळ्यासमोर तो वळीव असा उभा राहिला की मनमोराचा पिसारा किती फुलून जाई ते वर्णनच करता येत नाही!

  पावसाची पहिली सर अंगावर घेतली की तो वळीव प्राशन करून घ्यावासा वाटतो! पावसाची सर थांबता थांबता आकाशात इंद्रधनुष्याची कमान बघायचं सुख अनुभवायला मिळते! पांढऱ्या शुभ्र ढगातून बदलत जाणारा तो काळा ढग असा ओथंबून येतो की त्याची होणारी बरसात मनाचे शांतवन करते! कधी कधी मनाला प्रश्न पडतो की ते पांढरे ढग पांढरे ढग काळयामध्ये परावर्तित झाले तरी कधी? विजेच्या संगतीने कडकडाट करीत हे भाव व्याकुळ ढग पृथ्वीवर रिते कसे बरं होत असतील? पांढरे ढग श्रेष्ठ की काळे ढग? अशा आशयाचा वि.स. खांडेकरांचा धडा आठवून गेला! दोन्हीही ढग तितकेच महत्त्वाचे! करड्या ढगांचे अस्तित्वच मुळे पांढऱ्या ढगांवर अवलंबून असते.विचारांच्या आवर्तात ही ढगाळलेली अवस्था येते. कधीकधी विचारांचे पांढरे ढग जेव्हा परिपक्व होतात तेव्हा ते हळूहळू करडे बनतात.  पुढे मनाचे आभाळ दाटून येते आणि योग्य वेळ आली की डोळ्यातून सरीवर सरी बरसत राहतात. मनावरचे अभ्राचे पटल नष्ट करून स्वच्छ मनाने पुन्हा नाविन्याचा  आस्वाद घेतात! अशा नवनिर्मिती करणाऱ्या त्या बरसणाऱ्या ढगांची माझे मन आतुरतेने वाट पाहत राहते!

  अशावेळी आठवते माझीच कविता….

  ढगाळलेली हवा,

  हातात कप हवा,

 वाफाळलेल्या चहाचा,

 प्रत्येक घोट नवा !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “शब्दांचे जीवनचक्र…” लेखक – डाॅ. श्रीकांत तारे  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “शब्दांचे जीवनचक्र…” लेखक – डाॅ. श्रीकांत तारे  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

माणसांप्रमाणे शब्दांचेही जीवनचक्र असते. शब्द जन्माला येतात,जगतात व शेवटी मरुन जातात. काही शब्द शतायुषी माणसाप्रमाणे पिढ्‌यान पिढ्‌या सन्मानाने जगतात. काही शब्द अल्पायुषी ठरतात, तर काही शब्द उगाचच श्वास चालला आहे म्हणून जिवंत म्हणवले जातात, एरवी त्या शब्दांकडे सहसा कुणी लक्षही देत नाही.

‘वरवंटा’ हा शब्द असाच काही दिवसांपूर्वी वारला. त्यापूर्वी तो बरेच वर्ष मरणपंथाला लागला होता सुरुवातीला लोक त्याची विचारपूस करायचे. वीज नसल्यामुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे मिक्सर आजारी पडलं की लोक वरवंट्‌याकडे वळायचे. तोही बिचारा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यासारखा जबर दुखण्यातून उठून लोकांना मदत करायचा. ‘वरवंटा’ हा शब्द लोकांना अधून मधून का होईना, आठवायचा. 

महिन्यापूर्वीच, मराठीत एम फिल केलेल्या माझ्या भाचीला मी वरवंटा शब्दाबद्दल विचारल्यावर तिने  ‘पांडोबा भिकाजी धावडे’ अश्या तद्दन अनोळखी नावाच्या माणसाच्या गडचिरोली येथे निधनाची बातमी ऐकून आपण जसा चेहरा करु तसा चेहरा केला तेव्हाच या शब्दाचं आयुष्य संपल्याची जाणीव मला झाली.  

असं कितीतरी शब्दांच्या बाबतीत झालं. ‘आपला खल दिसत नाही आजकाल कुठे?’ असं मी बायकोला विचारलं तर तिनं ‘खल गेला आटाळ्यात आणि खलनायक माझ्यासमोर उभा आहे’ असं शेलक्या शब्दांत उत्तर दिलं. काहीही कमेंट्‌स न करता मी मनातल्या मनांत खल या शब्दाला श्रध्दांजली देऊन टाकली.

कोट हा मराठी शब्द कुठल्यातरी शेवटल्या राजाबरोबर सती गेला असावा. क्ल्ल्यिांभोवतीचे कोट जाऊन तिथे भिंती उभ्या राहिल्या आणि त्या किल्ल्यांचे म्यूझियम झाले. तसेच ‘बाराबंदी’ तुकोबांसह सदेह स्वर्गात गेली, ती पुन्हा परतलीच नाही. बुवांच्या जाण्याबद्दल वादविवाद झडताहेत पण बाराबंदी निश्चितच कायमची स्वर्गवासी झाली याबद्दल मार्क्सवाद्यांपासून ते संघवाल्यांपर्यंत सर्वांचंच एकमत झालेलं दिसून येतं.

‘उमाळा’ या शब्दाची कालपरवाच हत्या झाली असं कळलं. एका, प्रथमच सासरी जाणाऱ्या मुलीनं, टीपं गाळणाऱ्या आपल्या आईला, ‘रडतेस काय असं गांवढळासारखं?’ असं कडक शब्दांत विचारलं, तेव्हाच उमाळयाचं ब्रेन हॅमरेज झालं. टीव्हीवरच्या उसनं रडं आणणाऱ्या मराठी हिंदी मालिका बघून भावनांची धार गेलेल्या माणसांनी हळू हळू उमाळयाचा ऑक्सिजन पुरवठा तोडला आणि त्याला सपशेल मारून टाकलं. खरं तर प्रेमाचा उमाळा जाऊन प्रेमाचं प्रदर्शन आलं तेव्हाच त्याने प्राण सोडायला हवा होता, पण तोही बेटा एका पिढीला साथ  देण्याचे वचन  निभावत असावा. आता राजे, ती पिढीही गेली आणि तो उमाळाही न जाणे कुठल्या अनंतात विलीन झाला. 

माझ्या आजोबांकडे एक जुनी चंची होती. त्यात ते पान, सुपारी वगैरे ठेवायचे. आजोबा जाऊनही आता तीस बत्तीस वर्षे झाली असावीत. माझा आतेभाऊ आठवड्‌यापूर्वी कुठल्याश्या लग्नांत भेटला, तेव्हा मी त्याला, ‘नानांची एक नक्षीदार चंची होती, आठवतंय?’ असं विचारल्यावर त्याने माझ्याकडे, जणू मी त्याला न्यूक्लीयर बॉम्बबद्दल विचारतो आहे अश्या नजरेनं बघितलं. चंची हा शब्दच त्याच्या मेंदूतून पार धुवून निघालेला दिसत होता. कहर म्हणजे लगेचच माझ्या बायकोनं माझा दंड धरला आणि मला बाजूला घेत ‘नानांच्या लफड्‌यांबद्दल असं चार लोकांसमोर काय बोलता?’ म्हणत मला झापलं. मी मनातल्या मनांत लागलीच ‘चंचीच्या दुखःद देहावसनाबद्दल शोक बैठक दिनांक…’ वगैरे शब्दांची जुळवणी करु लागलो. 

असाच एक शब्द काही दिवसांपूर्वी नैसर्गिक मृत्यू पावला. ‘फुलपात्र’  हा तो शब्द. ही वस्तू अजून शिल्लक आहे, पण हा शब्द मेला. हे म्हणजे एखाद्या मेलेल्या प्राण्याला पेंढा भरून दिवाणखान्यात सजवून ठेवल्यासारखं वाटतं. मग तो नुसता ‘प्राणी’ न राहता, ‘पेंढा भरलेला प्राणी ‘ होतो. फुलपात्र या शब्दाचं असंच झालं. याला सुटसुटीत नाव ‘पेला’ किंवा सर्वनाम ‘भांडं’ असं मिळालं. फुलपात्र या नावाच्या अंत्ययात्रेला या दोन्ही शब्दांनी त्याला उत्तराधिकारी म्हणून खांदा दिला असावा. तसंच आपल्या आवडीचा पदार्थ त्याच्या नावासकट नेस्तनाबूत होताना पहाणे हाही एक शोकानुभव असतो.

 मी लहानपणी कल्याणला शिकत असताना छाया थियेटर जवळच्या एका म्हाताऱ्या वाण्याकडून जरदाळू घेऊन खायचा. जरदाळू खाल्ल्यावर त्यातली बी फोडून त्याच्याही आतला गर खाण्यात गंमत वाटायची. नेमानं मी सात आठ वर्ष त्याच्याकडून घेऊन जरदाळू खात होतो. कल्याण सोडल्यानंतर मी तीसेक वर्षाने सहज म्हणून आमची जुनी चाळ बघायला गेलो, तेव्हा सगळंच बदललं होतं. वाण्याचं दुकानही बऱ्यापैकी पॉश  झालेलं होतं, गल्ल्यावर चिरंजीव वाणी बसले असावे. मी त्याच्याकडे जरदाळू मागितला, आणि वाणीपुत्राला घाम फुटला. ‘ऐसा माल हम नही बेचते’ असं जेव्हा तो बोलला, तेव्हा हा शब्दच त्याने ऐकलेला नसल्याचं मला जाणवलं. मी जरा जोर दिल्यावर तो घाबरलाच, तो मला सीबीआय चा माणूस समजला असावा. त्याने मला आंत बसवून मागवलेलं कोल्ड्रींक पीत मी जरदाळू या शब्दाच्या आणि या सर्वांगसुंदर सुकामेव्याच्या आठवणी दोन अश्रू ढाळले. 

ग्रूपमध्ये असंच गप्पा मारीत असता कुणीतरी ‘भारतीय हॉकीचं विंधाणं झालं’ असं म्हटलं आणि मला जुना मित्र भेटल्याचा आनंद झाला. ‘विंधाणं’ हा शब्द गेले कित्येक वर्ष गहाळ झाला होता. उलट सुलट चर्चा चालू असतां अचानक तो मला गवसला. या नकारात्मक शब्दाच्या शोधात मी पणती घेवून फिरत होतो अश्यातला भाग नाही, पण नकारात्मक असला तरी तो एक शब्द होता, टिपिकल मराठी शब्द. वर्षानुवर्षे आपल्याला साथ देणारा, आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचवणारा चपखल शब्द. आणि एखादा शब्द मेल्याचं दुखः त्याच अर्थाच्या दुसऱ्या शब्दाच्या जन्माने भरुन नाही निघत. 

एक शब्द नाहीसा झाल्याने मात्र मी खरंच बेचैन झालो. तो शब्द माझ्या फारश्या जवळचा नव्हता, किंबहुना त्याची माझी भेट माझ्या प्राथमिक शिक्षणानंतर पडलेली मला आठवत नाही, पण तो शब्द वारल्याचं कळलं,आणि आपली संस्कृती बदलत चालली आहे हे मला प्रकर्षाने जाणवलं. तो शब्द म्हणजे ‘औत’. लहानपणापासून तो माझा आवडता शब्द होता. आजकाल त्याचा भाऊ नांगर त्याचे काम पहातो, पण औत म्हटल्यावर जो सुखी समाधानी शेतकरी डोळयासमोर यायचा, तोच शेतकरी नांगर धरल्यावर न जाणे का, केविलवाणा दिसू लागतो. काही काळापासून, द्रॅक्टर नांवचा नवीन शब्द आलाय, पण तो ‘कर्ज’ या शब्दाला आपल्याबरोबर घेऊन आलाय.

कितीतरी शब्द माझ्या डोळ्यादेखत नाहीसे झाले. काही कायमचे गेले तर काही, आयुष्य संपण्याची वाट पहात पडलेले आहेत. फळा आणि खडू या दोघांनी तर बरोबरच जीव दिला. त्यांच्या प्रॉपटीवर बोर्ड आणि चॉक यांनी हक्क मांडल्यावर त्यांना दुसरा इलाजच राहिला नाही. तुळई गेली, रोळी गेली, किरमिजी नावाचा रंग गेला, लिंगोरचा गेला, पाचे गेले, दांडपट्टा गेला, गेलेल्या शब्दांची यादी एखाद्या गावांत वारलेल्या माणसांच्या नांवच्या यादीएवढी लांब असू शकते, याला अंत नाही. यांच्या जागेवर नवनवे शब्द येतातही, पण त्यांना म्हणावी तशी लोकमान्यता मिळत नाही. संगणक हा शब्द गेल्या काही दिवसांपासून स्थापित होण्याचा प्रयत्न करतोय, पण एखाद्या नवरीचे नाव लग्नानंतर बदलले गेले तरी तिला माहेरच्याच नावाने ओळखले जावे, तसं काहीसं संगणक या शब्दाच्या बाबतीत घडलंय.

इंग्रजी शब्द तणांसारखे माजू लागल्यावर आणि त्यांचा मराठीत मुक्त संचार सुरु झाल्यावर तर पुढे पुढे आपण मराठी व्याकरणांतून इंग्रजी बोलत आहोत असा देखावा निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘माझे फोर्टी फाईव्हचे अंकल मॉर्निंग वॉक घेत होते तर त्यांची  हार्टफेलने डेथ  झाली.’  हे वाक्य एका पुण्याच्या मराठी मुलीच्या तोंडून ऐकल्यावर मी जाम गोंधळलो होतो. या वाक्याची नेमकी भाषा कुठली हेच मला कळेना. ‘सांगणाऱ्याला सांगता येते आणि ऐकणाऱ्याला कळते ती खरी भाषा’ अशी भाषेची नवीन व्याख्या जरी मी निर्माण केली, तरी वरील वाक्य निश्चित कुठल्या वर्गात ठेवायचं, हा प्रश्न माझ्याकडून  आजतागायत सुटलेला नाही. 

शब्द माझे सखा आहेत, बंधू आहेत, आई आणि वडील देखील आहे. शब्दांवर मी प्रेम केलं आणि मोबदल्यांत शब्दांनी मला त्यांचे सर्वस्व दिलं. मी शब्दांनी घडलो, वाढलो. त्यांचे मरण उघड्‌या डोळयांनी पहाण्याचे दुखः मी आज सोशित आहे.

लेखक : -प्रा डॉ श्रीकांत तारे

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ळ…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “ळ…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

ळ…

अगोदर   ‘क’   बद्दल देखील मी काही लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. पण ‘ळ’ बद्दल लिहिण्यासारखे काही वाटले ते “जोगळेकर” या आडनावाच्या एका व्यक्तींमुळे.

यांनी एक ऑडीओ व्हिडिओ क्लिप केली आहे. आणि त्यात “जो ग ळे क र” असा उच्चार करतांना “ळ” वर खास जोर दिला आहे. कारण त्यांचे काही मित्र त्यांना “जोगलेकर” अशी हाक मारत असत. ल आणि ळ यातला फरक आणि ळ चे महत्व सांगण्यासाठी त्यांची क्लिप.

ही  क्लिप ऐकल्यावर मी पण या ळ च्या प्रेमळ विळख्यात अडकलो. विळखा घातल्यावर ळ समजतो.

ळ आणि ळ ची बाराखडी चा संबंध माझ्या जन्मापासून आहे, आणि शेवटपर्यंत तो राहणार आहे. अगदी जन्माला आल्यावर पहिला संबंध असतो तो नाळ शी. आणि मग सांगितले जाते ते असते बाळ.

माझ्या बालपणी छान, सुंदर, गुटगुटीत अशी विशेषणे मला नसली तरी मी काटकुळा देखील नव्हतो. घरच्यांना माझा लळा लागला होता.

बाळाच्या रंगावीषयी देखील बोलले जाते. मी गोरा नाही. त्यामुळे काळा, किंवा सावळा असाच आहे, किंवा उजळ नाही असेच म्हणतात. तिथेही ळ शी संबंध ठेवलाच.

नंतर टाळू भरणे, जाऊळ, पायात वाळा, खेळायला खुळखुळा, पांगुळ गाडा,   असा ळ शी संबंध वाढवला. गोंधळ घातला तो आंघोळीचा. मी एकदा मीचकावला तो डोळा. याचेही कौतुक झाले. (डोळा मीचकवण्याचे कौतुक लहानपणीच असते हे लक्षात घ्या.)

पुढे संबंध आला तो शाळा आणि फळा यांच्याशी. फळा सुध्दा काळा. शाळेत  मी अगदीच ढ गोळा नव्हतो हे नशीब. पण त्यामुळे एक (गो)ळा मात्र कमी झाला. शिकतांना सुध्दा कावळा, बगळा, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, चाफेकळी, करंगळी, तळ हात, मळ हात, न नळाचा, क कमळाचा, घ घड्याळाचा असेच शिकलो. यात ळ कशाचा हेच शिकायचे राहिले, पण ळ नकळत लक्षात आला. (तळहात, कमळ, घड्याळ यांचा आणि माझा संबंध किती काळापासून पासून आहे हे कळले.)

शाळा, महाविद्यालय असे करत धरली ती नोकरी. पण यातही कपाळावर कर्तृत्वाचा खास असा टिळा काही लागला नाही. पण कामात घोळ घातला नाही.

इतर कामात देखील मी नामानिराळा असतो. कामाचा कळवळा दाखवत नाही. किंवा काम करायला उतावळा देखील नसतो. म्हणूनच माझा उल्लेख कोणी(च) साधा भोळा असा करत नाही. पण मी आवळा देऊन कोहळा काढणारा नाही. किंवा खाण्यापिण्याच्या बाबतीत देखील मी सोवळा नाही. तसाच मी आगळा वेगळा देखील नाही.

मी देवळात जातो, तसेच सोहळ्यात देखील जातो. सकाळ आणि संध्याकाळ नजरेत साठवतो. काही काळ मित्रांसोबत घालवतो, तर काही वेळ घरासाठी.

येतांना नाळ तोडून आलो, आणि जातांना गोतावळा सोडून जाणार आहे. म्हणून वर म्हटले ळ माझ्या जन्मापासून आहे आणि शेवटपर्यंत राहील.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मी देव पाहिला….” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? मनमंजुषेतून ?

☆ “मी देव पाहिला….” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

एका भयाण रात्री मंदिराच्या पायरीवर लाईटच्या उजेडात एक  साधारण पंधरा वर्षाचा एक मुलगा अभ्यास करताना पाहिला. थंडीचे दिवस होते. कुडकुडत होता पण वाचनात मग्न होता. 

हप्त्यातून दोनदा त्या रस्त्याने मी जात असायचॊ. दिवसा कधी दिसत नसायचा. खूप जिज्ञासा होती त्या मुलाबद्दल जाणण्याची. 

एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो. मनात आलं तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्यासाठी काहीतरी पार्सल घेऊन जाऊ. रात्रीचे साडेबारा वाजले असतील. मी त्या मंदिराकडे आलो, तर तो मुलगा नेहमीप्रमाणे मंदिराच्या पायरीवर अभ्यास करतांना दिसला. 

मी गाडी थांबवली. त्याच्या जवळ गेलो. मला बघून तो गालातल्या गालात हसला. जणू माझी त्याची जुनी ओळख असावी. 

मी म्हणालो, “ बाळ तू रोज इथे बसून का अभ्यास करतोस? “ 

“ सर माझ्या घरात लाईट नाही. माझी आई आजारी असते. दिव्यात रॉकेल घालून अभ्यास  करायला माझी ऐपत नाही.” 

“ बाळ तू मला बघून का गोड हसलास ? “ 

“ सर तुम्ही देव आहात !” 

“ नाही रे! “ 

“ सर तुम्ही माझ्यासाठी देवच आहात. “ 

“ ते जाऊ दे. तू जेवलास का? मी तुझ्यासाठी खाऊचं पार्सल आणलं आहे. “ 

“ सर म्हणूनच मी हसलो. मला माहित होतं. तो  देव कोणत्याही रूपात येईल, पण मला भुकेलेला नाही ठेवणार. मी जेव्हा जेव्हा भुकेलेला असतो, तो काहीना काही मला देतोच. कधी नवसाचे पेढे तर कधी फळ तो मला देऊन जातो. आज मी भुकेलेला होतो पण निश्चिंत होतो. मला माहित होतं….तो काहीतरी कारण करून मला भेटायला येणार आणि तुम्ही आलात. तुम्ही देव आहात ना !” 

मी निःशब्द झालो, नकळत माझ्याकडून पुण्याचं काम घडलं होतं. रोज कर्जाच्या ओझ्याखाली दबताना देवाला कोसत होतो. त्याने आज मला देवाची उपाधी देऊन लाजवलं होतं.

 त्याने तो अर्धवट खाऊ खाल्ला आणि म्हणाला, “ सर तुम्ही इथेच थांबा. मी अर्धं माझ्या आईला देऊन येतो.” 

…. माझे डोळे तरळले. त्याला काही विचारण्याअगोदरच त्याने सारं काही कृतीतून सांगितलं होतं. 

तो पाच मिनिटांनी परत आला. त्याच्या ओंजळीत पारिजातकाची फुलं होती. 

“ सर, माझी आई सांगते, ज्या परमेश्वराने आपल्या पोटाची खळगी भरली त्याच्या चरणी ओंजळभर फुलं तरी वहावीत.” 

…. क्षणभर डोळे बंद केले आणि त्या बंद दारातल्या पाषाणाकडे पाहिलं, तर तेही मला त्या मुलाच्या गोड हसण्यासारखं वाटलं. 

नंतर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन झालं. शाळा, कॉलेज, मंदिर बंद झाले. देवळं ओस पडली. देवळांना कुलूप ठोकली आणि रस्त्यावर  शुकशुकाट झाला.

अशीच एके दिवशी त्या मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या देवळाकडे डोकावलं. रात्रीची वेळ होती.

देवळाच्या पायरीवरील लाईट बंद होती आणि तो मुलगा कुठेच दिसला नाही. वाईट वाटलं मला.  

‘ या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा ? काय खात असेल ? कसा जगत असेल ?’ असे नाना प्रश्न आ वासून उभे राहिले. 

कोरोनाच्या महामारीत असंख्य लोकांनी प्राण गमावले. असाच आमचा एक मित्र पॉझिटिव्ह होऊन दगावला. मी त्याच्या अंत्यसंस्काराला स्मशानात गेलो होतो. अंत्यसत्कार झाले. सर्व आपल्या घरी निघाले. 

निघताना हात पाय धुवावे म्हणून शंकराच्या मंदिराशेजारील नळावर गेलो. पाहतो तर तो मुलगा नळावर स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे  धुऊन त्या स्मशानाच्या भिंतीवर वाळत टाकत होता. 

मला बघून त्याने आवाज दिला, 

“ सर …. “

“अरे तू इथे काय करतोस ? “

“ सर आता मी इथेच राहतो. आम्ही घर बदललं. भाडं भरायला पैसे नव्हते. त्यातच लॉकडाऊनमध्ये शिव मंदिर बंद झालं आणि पायरीवरची लाईटही बंद झाली. मग मला घेऊन आई इथे आली. काही झालं तरी शिक्षण थांबता कामा नये असं तिनं सांगितलं आहे. त्या शिवमंदिराचे दरवाजे बंद झाले, पण ह्या शिव – मंदिराचे दरवाजे कधी बंद होत नाहीत. तिथे जिवंत माणसं यायची आणि इथे मेलेली….. ह्या लाईट खाली माझा अभ्यास चालू असतो….. सर मी हार नाही मानली. आई सांगायची……..‘ ज्याने जन्म दिला तोच भुकेची खळगी भरणार.’ 

“ बरं….. तुझी आई कुठे आहे ? “

“ सर ती कोरोनाच्या आजारात गेली. तीन दिवस ताप खोकला होता. नंतर दम अडकला. मी कुठे गेलो नाही. इथे पडलेल्या तुटक्या, अर्ध जळलेल्या लाकडांनी तिला अग्नी दिला. १४ दिवस इथंच ह्या खोपीत होम क्वाँरनटाईन राहिलो … ‘ सरकारी कायदा मोडू नकोस, तो आपल्या भल्यासाठी असतो,’  असं ती सांगायची. आईच्या अस्थी समोरच्या नदीत विसर्जित केल्या आणि काल इथल्या स्मशानातल्या अग्नी देणाऱ्यांना जेऊ घातलं आणि आईच क्रियाकर्म आटपलं……. सर तरी मी हरलेलो नाही. पण दुःख एव्हढच आहे की मी पास झालेलो पहायला आई ह्या जगात नाही. ती जिथे ज्या जगात असेल तिथे खूप खुश असेल हे माझं यश बघून…   कालच माझा रिजल्ट लागला आणि मी शाळेत पहिला आलोय. आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे शिक्षक करणार आहेत…  पण आता तर खरी अडचण उभी राहिलीय. ऑनलाईन अभ्यास करायला माझ्याजवळ मोबाईल सुद्धा नाही….. असो . सर, तुम्ही का वाईट वाटून घेता ? तुम्हाला मी पास झाल्याचा आनंद नाही झाला ? सर, तुम्ही कुठे जाऊ नका, इथेच थांबा. “ 

.. त्याने छोट्याशा डब्यातून साखर आणली होती. चिमूटभर  माझ्या हातावर ठेवली. 

“ सर तोंड गोड करा. “ 

तो डबा ठेवायला त्या खोपीत गेला तोवर मी माझ्या तोंडावर त्या नळाचं पाणी मारून भानावर आलो.

भरलेले डोळे लपवण्यासाठी तोंड धुतले.

“ सर, मला माहीत होते, देव या जगात आहे आणि तो माझ्या आनंदात माझी पाठ थोपटायला नक्की येणार.”  

… त्याने पुढे काही बोलण्याअगोदरच मी नुकताच घेतलेला माझ्या खिशातला माझा नवा मोबाईल त्या मुलाच्या हातावर टेकवला आणि त्याची पाठ थोपटून निमूटपणे बाय करून स्मशानाबाहेर चालू लागलो. 

आता दर महिन्याला मी त्याचा मोबाईल रिचार्ज करतो……न सांगता. 

खरा देव तर कधीच नाही दिसला पण …. मी त्या मुलाच्या डोळ्यात देव पाहिला. ….

देव पाहिला….

लेखक – अज्ञात 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तिसरी पोळी… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ तिसरी पोळी… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

पत्नीच्या मृत्यूनंतर, रामेश्वरचे सकाळी आणि संध्याकाळी आपल्या मित्रांसह गप्पाटप्पा करून उद्यानात फिरणे नेहमीचे ठरले होते.

तसा घरात त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता. प्रत्येकजण त्याची खूप काळजी घेत असे.

आज सर्व मित्र शांत बसले होते.

एका मित्राला वृद्धाश्रमात पाठवल्याबद्दल दुःखी होते.

“तुम्ही सर्वजण मला नेहमी विचारत असता मी देवाला तिसरी पोळी कशासाठी मागतो? आज मी सांगेन.” रामेश्वर बोलला!

“सून तुला फक्त दोनच पोळ्या देते का?” एका मित्राने मोठ्या उत्सुकतेने विचारले!

“नाही यार! असं काही नाही, सून खूप छान आहे.

वास्तविक “पोळी” चार प्रकारची असते.

पहिल्या “मजेदार” पोळीमध्ये “आईची” ममता “आणि” वात्सल्य “भरलेले असते. जिच्या सेवनाने पोट तर भरते, पण मन कधीच भरत नाही.

एक मित्र म्हणाला, “शंभर टक्के खरं आहे, पण लग्नानंतर आईची भाकरी क्वचितच उपलब्ध असते”,

“दुसरी पोळी ही पत्नीची आहे, ज्यामध्ये आपुलकी आणि समर्पणाची भावना आहे, जी “पोट” आणि “मन” दोन्ही भरते.” तो पुढे म्हणाला..

“आम्ही असा विचार केलाच नाही, मग तिसरी पोळी कोणाची आहे?” मित्राने विचारले.

“तिसरी पोळी ही सूनेची आहे, ज्यात फक्त “कर्तव्या ची” भावना आहे, जी थोडी चव देते आणि पोट देखील भरते, सोबतच चौथ्या पोळीपासून आणि वृद्धाश्रमांच्या त्रासांपासून वाचवते,”

तिथे थोडा वेळ शांतता पसरली!

“मग ही चौथी पोळी कसली आहे?” शांतता मोडून एका मित्राने विचारले!

“चौथी पोळी ही कामवाल्या बाईची आहे, जिच्याने आपले पोटही भरत नाही किंवा मनही भरत नाही! चवीचीही हमी नसते.”

मग माणसाने काय करावे?

“आईची उपासना करा, बायकोला आपला चांगला मित्र बनवून आयुष्य जगा, सूनेला आपली मुलगी समजून तिच्या लहान-सहान चुकांकडे दुर्लक्ष करा. जर सून आनंदी असेल तर मुलगा देखील तुमची काळजी घेईल.

“जर परिस्थिती आम्हाला चौथ्या पोळीपर्यंत आणते, तर देवाचे आभार माना की त्याने आपल्याला जिवंत ठेवले आहे, आता चविकडे लक्ष देऊ नका, फक्त जगण्यासाठी फारच थोडे खावे जेणेकरुन आपलं म्हातारपण आरामात आणि आनंदात व्यतीत होईल.”

सर्व मित्र शांतपणे विचार करीत होते की, खरोखरच आपण किती भाग्यवान आहोत!!

 

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ नाचून गेल्या चिमण्या…! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ नाचून गेल्या चिमण्या…! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

सकाळी अंगणातल्या चिवचिवाटानं जाग आली.चिमण्यांचा थवा अंगणात गलका करत होता.चटचट चटचट किड्या मुंग्या वेचण्यात सगळ्या गुंग होत्या.आईनं शेणानं सारवलेल्या अंगणाला नुकताच लखलखीतपणा आला होता.त्या शेणातल्या किडया अळ्या आणि धान्य वेचण्यात रममाण झालेल्या चिमण्या माझी चाहूल लागताच भुरकन उडून लिंबांच्या झाडावर बसल्या आणि अंदाज घेऊन काही क्षणात पुन्हा सारवलेल्या अंगणभर पसरल्या.चिमणा चिमणीचे ते चिवचिव करत,चटचट अन्न वेचत आणि टूणटूण उड्या मारत अंगणभर हुंदडणं डोळ्यात साठवत मी बाजूला बसून पहात होतो.काही अगदी माझ्या जवळ येऊन मला निरखून पहात होत्या.मीही कुतुहलानं त्यांच्या डोळ्यात एकटक पहात त्यांचं निरागसपण टिपून घेत होतो.आपल्याच तालात नाचणाऱ्या चिमण्यांनी अंगण सजून गेलं होतं.मध्येच शेळ्यामेंढ्यांचं ओरडणं,गाईगुरांचं हंबरणं आणि कावळ्यांचं कारकारनं ऐकत..एकटक त्या अंगणाचं जीवंतपण अनुभवत होतो.बाजूला आईनं पाणी भरून ठेवलेली दगडी काटवटीत चिमण्यांची अंघोळीसाठीची धडपड आणि उडणारं पाणी कोवळया उन्हात अंगणाला सोनेरी झालर लावून जात होतं. तिथंच टपून बसलेली मनी आणि चिमण्यांचं हुंदडणं  पहात दोन्ही पायावर तोंड ठेवून शांतपणे पहुडलेला काल्या होता. मध्येच अंड्याला आलेल्या करडया कोंबडीचं देवळीत उडी मारण्यासाठी चाललेली धडपड आणि फांदीवर लक्ष ठेवून टपलेले कावळे सारे काही माझ्या बनपुरीच्या घराच्या अंगणाची शोभा वाढवत होते.नुकत्याच चार पाच दिवसापूर्वी जन्मलेल्या शेळ्यांच्या करड्यांनी अंगणभर उड्या मारत चालवलेला धिंगाणा आणि सारवलेल्या अंगणात बारीक बारीक पडलेल्या लेंड्याचा अंगणभर सडा पसरलेला होता.अंगणातल्या चूलीवर काळ्याकुट्ट अंगानं डिचकीत पाणी तापत होतं.दुसऱ्या बाजूला काट्याकुट्यात भक्ष शोधणारी पंडी मांजरीन तिच्याच तालात होती.पाणी तापवत डोळं चोळत,फुकणीनं फुकत शेकत गप्पा हाणित बसलेली पोरं.असं गावाकडचं घरदार भरलं की अंगणात नाचणाऱ्या चिमण्यांनी रोजच्या सकाळचं अंगण असं उजळून  निघतं…..

आज चिमण्यांचं चिवचिवनं क्वचितच ऐकायला मिळतं.लहानपणी माळवदी घराच्या किलचानात चिमण्या घरटं करायच्या.घरटं बनवताना त्यांची चाललेली धांदल सारं घर उघडया डोळ्यानं बघायचं.कधी कधी घरात पसरलेला कचरा, त्यातच पडलेलं एखादं फुटलेलं अंडं आणि कधीतरी उघडया अंगाचं पडलेलं चिमणीचं पिल्लू पाहून मन हळहळायचं. चिमण्यांचं सुख आणि दुःख अनुभवत बालपण कधी सरलं समजलच नाही.चिमण्यांनी मात्र घरात आणि मनात केलेलं घरपण हटता हटलं नाही.

आज मात्र अंगणात नाचणाऱ्या चिमण्यांनी मनाचं अंगण पुन्हा हरखून गेलं…..अशा अंगणभर पसरलेल्या चिमण्या पुन्हा पुन्हा मनात नाचत रहाव्यात..आणि घराचं अंगण पुन्हा सजीव होत रहावं..!

(आज अंगण हरवलेली घरं आणि चिमण्यांचं ओसाडपण मनाची घालमेल वाढवत राहते अगदी माझ्या आणि तुमच्याही.)

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर

मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

९४२११२५३५७…

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – पुस्तक चर्चा ☆ बाल कहानी संग्रह ‘जादुई बगीचा ‘ – सुश्री उषा सोमानी ☆ समीक्षा – श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’’ ☆

श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश”

(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” जी का  हिन्दी बाल -साहित्य  एवं  हिन्दी साहित्य  की अन्य विधाओं में विशिष्ट योगदान हैं।आज प्रस्तुत है सुश्री उषा सोमानी जी  के बाल कहानी संग्रह जादुई बगीचा” की पुस्तक समीक्षा।)

☆ पुस्तक चर्चा ☆ बाल कहानी संग्रह ‘जादुई बगीचा’ – सुश्री उषा सोमानी ☆ समीक्षा – श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’’ ☆

पुस्तक- जादुई बगीचा (बालकहानी-संग्रह)

कहानीकार-  सुश्री उषा सोमानी

प्रकाशक- साहित्यकार, धामणी मार्केट की गली, चौड़ा रास्ता, जयपुर 

मोबाइल नंबर 93142 02010

पृष्ठ संख्या- 120

मूल्य- ₹200

समीक्षक ओमप्रकाश क्षत्रिय प्रकाश

☆ समीक्षा- जादुई बगीचे में फूलों से सजी कहानियां☆

आपको कहानी सुनाना आना चाहिए। लिखना अपने आप आ जाता है। कहानी, कहानी सुनाने में छुपी रहती है। कहानी कब मस्तिष्क में चढ़कर बोलने लगती है, कहा नहीं जा सकता हैं। जी हां। आपने ठीक समझा। एक ऐसी ही कहानीकारा है उषा सोमानी जी।

इन्होंने कहानी सुनाते-सुनाते कहानी लिखना शुरू किया। फिर लिखती ही चली गई। जिसकी परिणीति ‘जादुई बगीचा’- बालकहानी संग्रह के रूप में हुई। इस बालकहानी संग्रह में 23 कहानियों का गुलदस्ता सजाकर उन्होंने हमारे समक्ष प्रस्तुत किया है।

बहुत ही सुंदर आकर्षक कवर से सजे इस कहानी संग्रह की बढ़िया कहानी हैं- गुम हुए जुगनूओं की चमक। यह पर्यावरण का संदेश देती हुई बेहतरीन कहानी है। इसमें वर्णित दृश्यांकन का चित्रण बहुत ही बढ़िया किया गया है।

इस संग्रह की दूसरी बढिया कहानी है- फड़फड़ भूत। सरल, सहज और रोचक शब्दों में कही गई यह एक अच्छी कहानी है। इसमें जिज्ञासा है। प्रवाह है। सरलता है और कहानी कहने का बहुत ही रोचक ढंग है।

गिरगिट रेस जीत गया- कहानी में बच्चों की गप को आधार बनाकर एक बहुत ही बढ़िया कहानी लिखी है। इसमें रोचकता और प्रवाह अंत तक बना रहता है।

ओल्ड इज गोल्ड- इस कथानक पर डाइनिंग टेबल के बहाने आपने बहुतसी भावनात्मक यादों को बच्चों के समक्ष रखने में सफलता प्राप्त की है।

नारियल की गवाही-शीर्षक कहानी हमारे मन में पढ़ने के लिए उत्सुकता जगाती है। इस उत्सुकता में पाठक कहानी को अंत तक पढ़ जाता है। तब उसे मालूम होता है नारियल ने गवाही कैसे दी?

जहां चाह, वहां राह- एक आदिवासी बच्चे की मदद को प्रेरित करती हुई बढ़िया कहानी। बदलाव- कहानी में शरारती प्रवृत्ति को प्रमुखता से उठाया गया है। बच्चे अक्सर स्कूल में शरारत करते हैं। मगर शरारत का आप का प्रयोग अभिनव व नया है।

कुदरत का करिश्मा- में बच्चों की एक अनोखी प्रवृत्ति का उल्लेख किया गया है। आजकल बच्चे मुहावरे भूलते जा रहे हैं। उन्हें मुहावरे का अर्थ और मुहावरें याद नहीं रहते हैं। आपने -कुदरत का करिश्मा, कहानी में मुहावरा का अच्छा प्रयोग किया है।

सूझबूझ ने बचाई जान- कहानी में एक यादगार जानकारी अनोखे रूप से दी गई है। इस कारण वह जानकारी स्थाई रुप से दिमाग में बैठ जाती है। आपने इसी का उपयोग करके 108 एंबुलेंस की जानकारी को कहानी में पिरोया है। आपका यह प्रयास अति उत्तम है।

खिल गए रंग- किसी दूसरे के चेहरे पर खुशियों की मुस्कान लाने की शानदार कौशिश है। आज की भागमभाग युग में यह अब नहीं हो पा रहा है। इसी को सीख देती बेहतरीन कहानी के लिए हार्दिक बधाई।

जादुई बगीचा- बच्चे जादू को बहुत पसंद करते हैं। उन्हें खेलना, कूदना और रेस लगाना अच्छा लगता है। इसी भाव को पिरोते हुए आपने अच्छी कहानी कही है।

देख कर जी ललचाए- गिन्नी बिल्ली की यह शुद्ध मनोरंजन कहानी बहुत ही अच्छी बनी है। इससे बच्चों का अच्छा मनोरंजन होता है।

लौट के घर आई राजकुमारी- बच्चों को कल्पना की उड़ान कराती बहुत ही अच्छी कहानी कही है। इसमें परंपरागत रूप से जादू का बहुत ही अच्छा उपयोग किया है।

जलपरी से मुलाकात- इस कहानी में बच्चों में जलपरी से मुलाकात की जिज्ञासा को जागृत किया है। यह होती भी है या नहीं? बहुत कुछ जानने को उत्सुक जगाती कहानी है।

दोहरी फसल- धान की रोपाई के साथ दोस्ती की फसल। एक अनोखा संगम। बहुत बढ़िया कहानी हैं।

महंगी पड़ी शरारत- शरारत को दर्शाती यह कहानी जानदार और जानकारी पूर्ण है। कैटरपिलर और उसके काँटे के बारे में आपने बहुत खूब लिखा है।

हौसले की उड़ान- चिंकी के हौसले की उड़ान को आपने क्रिकेट की कहानी में बहुत ही खूबसूरती से पिरोया है।

पेड़ों का रसोईघर- प्रकाश संश्लेषण की प्रक्रिया को बहुत ही सीधे, सरल सहज व सीधे ढंग में समझाया गया है। यह कहानी की एक बहुत ही बड़ी विशेषता है।

फूल फिर मुस्कराने लगे- परी के द्वारा बगीचे और फूलों को लेकर एक बहुत ही बढ़िया कथानक बुना गया है। इसमें फूलों की चिंता और उनके मनोरंजन को बहुत खूबसूरती से उल्लेख किया गया है।

मिस मुर्गी की दुकान- यह बहुत ही मनोरंजक और दिलचस्प कहानी है। ऐसी कहानियां बच्चे बहुत पसंद करते हैं। मित्र की पहचान- मुसीबत में ही सच्चे मित्र की पहचान होती है। इसी कथानक को लेकर बुनी गई आपकी यह कहानी बिल्कुल सरल, सहज व अच्छी है।

गधे का सपना- अपनी उपयोगिता सिद्ध करने को लेकर लिखी गई बहुत ही अच्छी कहानी। हरेक की अपनी उपयोगिता और सर्व श्रेष्ठता होती है। यही कहानी दर्शाती है। डॉ राधाकृष्णन- डॉक्टर राधाकृष्णन पर शिक्षक दिवस पर लिखी गई सार-संक्षिप्त और बढ़िया कहानी है।

उत्तम आवरण से सजे इस कहानी संग्रह में बीच-बीच में रेखा चित्र दिए गए हैं। उत्तम साजसज्जा एवं त्रुटिरहित छपाई ने कहानी संग्रह की पठनीयता में वृद्धि की है। इस संग्रह के लिए आपको हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।

© ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश”

26-03-2023

मित्तल मोबाइल के पास, रतनगढ़,  जिला- नीमच (मध्य प्रदेश), पिनकोड-458226 

मोबाइल नंबर 7024047675, 8827985775

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कविवर्य ग्रेस ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆

?विविधा ?

☆ कविवर्य ग्रेस ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆

(26 मार्च :स्मृतीदिनानिमित्त)

ग्रेस(फुल)कवी

मला आठवते, स्व आई मॉरिस कॉलेज नागपूरला मराठीत एम ए करीत होती. रोज आई घरी आली की, वैचारिक मेजवानी बाबांसह आम्हाला मिळत असे. ती बाबांचे संस्कृत श्लोक प्रसंगोचीत असत. त्यामुळे आई बाबांचे संवाद हे सुसंस्कारित उच्च दर्जाचे असत. कधी कधी बाबांचे वैदर्भीयन उच्चार, शब्द आईचे पुणेरी उच्चार अन् शब्द यांची जुगलबंदी होत असे. तो अनुभव देखील आम्हा भावंडांसाठी एक संस्कारच होता. बाबांचे लिखाण मी फारसे कधी वाचले नाही. अर्थात गणित, विज्ञान या चौकटीत त्यांच्या साहित्य विषयक जाणिवा किंचित बोथट झाल्या असाव्यात. पण आणीबाणीच्या तुरूंगवासात, गजाआड गणित विज्ञानाच्या चौकटी शिथील झाल्या.

आईला मॉरिस कॉलेज नागपुर येथे द. भि. कुलकर्णी, माणिक गोडघाटे  शिकवित असत. कामठी येथून बस प्रवास करून नागपूरला येऊन शिक्षण घेणाऱ्या एका विवाहितेला विद्यार्थिनी म्हणून आपण शिकवतो, याचे ह्या दोघांना खूप अप्रूप होते. अर्थातच आईचे साहित्य विषयक आकलन, उत्तम होते तेंव्हापासून ग्रेस  आणि दभि या नावांचे गारूड माझ्या मनावर आरूढ झाले. ग्रेस आईला म्हणत की,  तुमचे माझे नाव एकसारखेच आहे.. हो! माझ्या आईचे नाव माणिकच होते. लग्नापूर्वीचे आईचे नाव हिरा होते, बाबांनी ते प्रथेपणे बदलून माणिक केले.. ( परंतु अमूल्य रत्न, हा अर्थ कायम राखूनच)

प्राध्यापक ग्रेस आणि दभी यांची आई आवडती विद्यार्थिनी होती.

तसे माझे शालेय वयच होते ते!

ट ला ट, री ला री जोडून, ओढून ताणून कविता (?) मी करत असे.. एकदा कां कविता लिहिण्याचा निर्णय झाला मी डाव्या बाजूला एकसारखे शब्द (शेखर, ढेकर, येणे, जाणे, गाणे, नाणे, बुध्द वृध्द, सिध्द, बद्ध इत्यादी ) लिहून ते कवितेचे धृपद म्हणून एक लांबलचक कविता (?) लिहित असे.

आईने त्याला बडबड गीता पेक्षा अधिक मानण्यास नकार दिला. कविता तर नाहीच नाही. “अरे, ही काय कविता आहे? ” तेंव्हापासून, काव्य प्रकार हा माझा प्रांत नाही, या निष्कर्षाप्रत मी आलो. माझे शब्द भांडार हे किती अपुरे आहे, हे मला जाणवले. कल्पनेची देखील मर्यादा मला जाणवली. एकदा असाच सॉनेट (सूनित) लिहिण्याचा मी घाट घातला. पण आशय ना विषय, ते आरंभ शौर्य मनातल्या मनातच विरले.  प्राध्यापक कविवर्य माणिक गोडघाटे यांचे विषयी, आई  भरभरून बोलत असे. तेंव्हा एक अगम्य, गूढ, दुर्बोध, शब्द बंबाळ, अनाकलनीय लिहिणारे ( आईच्या शब्दात,  ग्रेसफुल लिहिणारे ग्रेस ) कवी ग्रेस !. ही प्रतिमा माझ्या मनात रुजली. त्यांच्या प्रतिमांची उकल माझ्या क्षमतेच्या परीघा बाहेरची आहे. अनेक समीक्षकांनी त्यांच्या त्यांच्या प्रतिभेने ग्रेस यांच्या प्रतिमांची उकल केली..  ती देखील माझ्या आकलनाच्या पल्याड आहे.

पण त्यामुळे मी अधिकच या कवीच्या, व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडलो. आज ग्रेस यांचा स्मृतिदिन, शब्दांची उणीव रेषांनी भरून श्रध्दांजली अर्पण करण्याचा हा प्रयत्न !

© श्री मिलिंद रथकंठीवार

पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆☆ रामनवमी दिना निमित्त – कर्तव्यदक्ष, आदर्श, पुरुषोत्तम श्रीराम ☆☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

सौ. विद्या वसंत पराडकर

?विविधा ?

☆ रामनवमी दिना निमित्त – कर्तव्यदक्ष, आदर्श, पुरुषोत्तम श्रीराम ☆☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

भारतीय संस्कृतीचे श्रीराम एक व्यवच्छेदक वैशिष्ट्य आहे.परब्रम्हाचा तो सातवा अवतार आहे.पृथ्वीवर ज्यावेळी अत्याचार माजतो,मानवी जीवन विस्कळीत होते,दैत्याचे तांडव अमर्याद सुरु असते त्यावेळी पृथ्वीला हे  सर्व सहन न होऊन ती गाय रुपाने वैकुंठात जगाच्या पालन कर्त्या कडे जाते.वत्याला विनवणी करते.या संकटातून मला वाचव.तेव्हा दुष्टांचा संहार व सृष्टांचे पालन करण्याकरता प्रभू पृथ्वीतलावर अवतार घेतात. श्रीरामांनी त्रेतायुगात भगवान विष्णूच्या दशावतारात सातव्या क्रमांकावर अवतार घेतला.तो दिवस होता चैत्र शुद्ध नवमीचा.पुष्य नक्षत्र,कर्क रास हा दिवस श्रीरामाच्या जन्माचा होय.भारतीय संस्कृतीच्या एका दैदिप्यमान हिर्याच्या तेजाने सर्व    पृथ्वी चमकून गेली.एका आज्ञाधारक कर्तव्य दक्ष,आदर्श व्यक्तिमत्वाचा जन्म झाला..

त्रेतायुगानंतर व्दापार व नंतर आजचे कलियुग आहे.श्रीराम हे युगपुरूष आहे.रामायणाचा नायक श्रीराम आहे. आजही श्रीराम नवमी ठिकठिकाणी मोठ्या आनंदाने साजरी करतात.

रामायणाच्या कथेचा मध्यवर्ती बिंदू श्रीराम.गुरू वशिष्ठ यांचेकडून विद्या घेऊन पुढे ते विश्र्वास इतरांच्या मग रक्षणासाठी गेले.तेथे त्यांनी असुरांना आपल्या विद्येची चांगलीच चुणूक दाखवली.व आपल्या गुरुचे रक्षण केले.

आज्ञा शिरसावंद्य या न्यायाने आई व वडील यांच्या आज्ञेचे पालन केले.चौदा वर्षाचा वनवास पत्करला व राज्याचा त्याग केला.केवढी ही नि:स्वार्थी वृत्ती.

अंजनीसुत वीर हनुमान हा रामाचा प्रिय भक्त  होता.श्रीरामाच्या संकट काळी तो वेळोवेळी कामास आला. लंकाधिपतीने जेव्हा सीतेचे हरण केले तेव्हा सीतेचा शोध लावण्यात हनुमानाला यश मिळाले.पुढे आपल्या विराट रुपाने लंकादहन केले. असा हा चिरंजीव हनुमान चारी युगात कार्यरत होता. व  आहे.

रावण हे अंहकाराचे प्रतीक असलेला दुष्ट असूर.राम रावण युध्दात आपल्या युध्द नीतीने रावणाला पराभूत केले. ते श्रीरामानेच.

श्रीरामाचे अनेक गुण हे  वाखाणण्यासारखे आहेत.तो एक  अत्यंत प्रजादक्ष राजा, उत्कृष्ठ शासक, कर्तव्य निष्ठ राजा होता. आईवडिलांची आज्ञा पाळणारा आज्ञाधारक पूत्र ,एक पत्नीत्वाचा पुरस्कर्ता होता.एक बाणी,एक वचनी  होता.

शुद्ध व निर्मळ मनाचे श्रीराम होते याचे उदाहरण म्हणजे वनवासातुन परत आल्यावर त्यांनी कैकयीच्या चरणावर प्रथम माथा ठेवला.

आज आपण कलियुगाच्या मध्यावर उभे आहोत.आजचा समाज बदलत आहे.संस्कृतीपासून लांब चालला आहे.संस्कृतीची मुल्ये लोप पावत आहे.

अशा परिस्थितीत भारतीय तत्वज्ञान व मुल्यांची जोपासना करण्यासाठी  युगपुरुषांची गरज आहे.या भवसागरातून तरुन जाण्यासाठी श्रीराम व्यक्तीमत्व ही एक नौका आहे

आजच्या दिनी युगपुरूषाचे स्मरण  कृती युक्त अंत:कर्णाने केल्यास देशासमोर असणार्या बर्याचशा समस्यांचे निराकरण होऊ शकते.

 

© सौ. विद्या वसंत पराडकर

वारजे, पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सुंदरता… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ सुंदरता… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

स्त्रियांना नेहमी असं वाटतं की, 

आपण हे नेसल्यावर सुंदर दिसू, ते घातल्यावर सुंदर दिसू. 

एक जाहिरात आहे, त्यात विनोदकन्या भारती म्हणते, “ मुझे कभी ब्यूटिफुल बनना ही नहीं था, क्यों कि मैं हमेशा से जानती थी की मैं ब्यूटिफुल हूँ. सिर्फ अपनी सुंदरता को मेन्टेन करती हूँ। “ 

फार छान ओळी आहेत या कि, मला नेहमीच माहीत होतं, मी सुंदर आहे.

आपल्यापैकी किती जणींना हे माहीत असतं?

आपल्यातलं सौंदर्य कशात आहे, हेच आपल्याला माहीत नसतं. कारण सौंदर्य म्हणजे काय, हेच आपल्याला कळत नाही. 

आपले सौंदर्याचे आणि प्रेमाचे मापदंड आपण लहान किंवा मोठ्या पडद्यावरच्या तारकांकडे पाहून ठरवत असतो.

जाहिरातीतल्या बाईचा मेकअपने झाकलेला हजार वॅटमध्ये चमकणारा चेहरा म्हणजे आपण सौंदर्य समजतो. पाठ उघडी टाकणारं प्रचंड मोठ्या गळ्याचं ब्लाउज म्हणजे सौंदर्य समजतो.

पण तुम्ही कधी आपल्या बाळाला पाजताना स्वत:चा चेहरा पाहिलाय का? वात्सल्यानं चमकणाऱ्या त्या चेहऱ्याचं सौंदर्य उजळण्यासाठी कधीच हजार वॅटच्या फोकसची गरज लागत नाही. 

दिवसभर घरकाम करून थकल्यावर संध्याकाळी तोंडावर पाणी मारून साध्या टॉवेलने पुसलेला चेहरा पाहिलाय का? त्यावरचे स्वत:च्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्यामुळे येणारे कर्तव्यपूर्तीचे भाव किती सुंदर दिसतात, ते कधी न्याहाळलेत का? 

सकाळी उठून सडा-रांगोळी झाल्यावर स्वत:च काढलेली रेशीमरेषांची रांगोळी पाहिली तर तुम्हाला तुमच्या बोटातली सुंदरता दिसेल. 

स्वच्छ-सुंदर आवरलेलं स्वयंपाकघर तुम्हाला तुमच्या गृहिणीपणाचं सौंदर्य सांगेल.

तुम्ही शिक्षिका असाल तर तुमचं सौंदर्य फळ्यावर नीटपणे लिहिलेल्या अक्षरात आहे. विषयाचं आकलन झाल्यावर दिसणारे मुलांचे आनंदी चेहरे ही तुमची सुंदरता आहे. 

तुम्ही इंटिरिअर डेकोरेटर असाल तर तुम्ही सजावट केलेल्या जागेतून तुमचं सौंदर्य डोकावेल. 

तुम्ही संपादक असाल तर तुम्ही निवडलेले लेख आणि त्यांची सुबक मांडणी तुमचं सौंदर्य आहे. 

तुम्ही विणलेल्या भरघोस गजऱ्यात तुमचं सौंदर्य आहे. तुम्ही काढलेल्या अक्षरात तुमचं सौंदर्य आहे.

सौंदर्य कपड्यात नाही, कामात आहे.

सौंदर्य नटण्यात नाही, विचारात आहे. 

सौंदर्य भपक्यात नाही, साधेपणात आहे.

सौंदर्य बाहेर कशात नाही, मनात आहे.

आपण करत असलेलं प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचं सादरीकरण असतं. आपल्या कृतीतून सौंदर्याची निर्मिती करता आली पाहिजे.

प्रेमाने बोलणं म्हणजे सुंदरता, 

आपलं मत योग्य रीतीनं व्यक्त करता येणं म्हणजे सुंदरता.

नको असलेल्या गोष्टीला ठाम नकार देण्याची हिंमत म्हणजे सुंदरता. 

दुसऱ्याला समजावून घेणं म्हणजे सुंदरता.

आपल्या हाती आलेला प्रत्येक क्षण रसरशीतपणे जगण्यात खरी सुंदरता आहे. 

आपल्या वर्तनातून, विचारातून आपलं सौंदर्य बाहेर येऊ द्या.

मेरी कोमचं सौंदर्य तिच्या ठोशात आहे. इंदिरा गांधींचं सौंदर्य कणखर निर्णयक्षमतेत राहिलं आहे. 

आपण करत असलेल्या कामात कौशल्य प्राप्त झालं की, आत्मविश्वास मिळतो. आत्मविश्वास आला की, आत्मसन्मानाची जाणीव येते. अशी आत्मविश्वासाने जगणारी बाई आपोआप सुंदर दिसते. 

गौरवर्ण, सडपातळ बांधा, काळे-दाट केस या वर्णनातून आता बाहेर पडलं पाहिजे. त्याऐवजी असेल तो वर्ण, दणकट बांधा, सुदृढ मन आणि संतुलित विचार या मापदंडाचा विचार करून पाहूया. 

तुम्ही जशा जन्माला आल्या आहात तशाच सुंदर आहात, 

ही खूणगाठ मनाशी बांधून टाका. 

जशा आहात तशाच अगदी सुंदर आहात, याची खात्री बाळगा. 

आपल्यातील सुंदरता ओळखून स्वत:वर विश्वास ठेवायला शिका. 

म्हणजे आपलं सौंदर्य अजूनच खुलेल. 

लेखक – अज्ञात

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares