मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ दूर राहूनी पाहू नको रे… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ दूर राहूनी पाहू नको रे… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

.. दूर राहूनी पाहू नको रे, प्रीतीची शपथ तुला जाऊ नको रे ,प्रिया जाऊ नको रे!..आकाशीच्या चांदण्या वसुंधेरवर उतरल्या आणि आपल्या प्रियतमाला साद देऊ लागल्या. आकाशी चंद्र आता एकाकी पडला.चांदण्याच्या विरहाची काळी चंद्रकला उदासीचे अस्तर लेवून आभाळभर पसरली.चंद्र अचंबित झाला. त्याला कळेना आज अशा अचानक मला सोडून वसुंधेरवर कुणाच्या मोहात या चांदण्या पडल्या!माझ्याहून सुंदर प्रेमाचा कारक असा वसुंधेरवर कोण भेटला?कालपर्यंत तर माझ्या अवतीभवती राहून आपल्या प्रेमाने रुंजी घालत असणाऱ्यांना, प्रत्येकीला मनातून आपला स्व:ताचाच चंद्र मालकीचा हवा असा वाटत होते.. मी त्यांचे मन केव्हाच ओळखले होते. प्रेमाच्या चंदेरी रूपेरी प्रकाशी त्या सगळयांना मी सामावून घेतलेही होते. कुठेही राग रुसवा, तक्रारीला जागा नव्हती. अगदी दृष्ट लागण्यासारखीच आमची अशी अक्षर प्रीती होती कालपर्यंत. पण आज पाहतो त्या प्रेमाचा माझ्या नकळत त्यांनी ब्रेक अप करावा.. ना भांडण, ना धुसफूस ना शिकवा ना गिलवा. हम से क्या भुल हुई जो हम को ये सजा मिली…एक, दोन गेल्या असत्या तर समजून गेलो असतो.. पण इथं तर एकजात सगळ्याच मला सोडून गेल्या .आपापल्या मालकीचा स्वतंत्र चंद्राबरोबर बसून मलाही त्या दूर राहूनी पाहू नको रे, प्रीतीची शपथ तुला जाऊ नको रे प्रिया जाऊ नको रे.. करून साद देत सांगू लागल्या ये रे ये रे तू देखिल इथं खाली वसुंधेरवर ये आणि तुला आवडणारी एखादी चांदणीशी सुत जुळव . आणि आता आपण सगळेच या वसुंधेरवर प्रीतीचं नंदंनवन करुया… म्हणजे पुन्हा गोकुळात रासलिला.. छे छे किती अनर्थ माजेल… नको नकोच ते. 

.. मी त्यांना म्हटलं हा काय वेडेपणा मांडलाय तुम्ही.. त्या वसुंधेरवरची लबाड प्रेमी जन मंडळी आप आपल्या प्रियतमेला हवा तर तुला आकाशीचा चंद्र, चांदण्या आणून देतो असं आभासमय ,फसवं आश्वासन देऊन आपल्या प्रीतीची याचना करतात.. ते आपण इथून दररोज वरून पाहात आलोय कि.. कुणाचं सच्च प्रेम आहे आणि कोण भुलवतयं हे आपल्याला इथं बसून बघताना आपलं किती मनोरंजन व्हायचं.. आणि आणि ते सगळं पाहता पाहता आपण सगळे मात्र नकळत मिठीत बांधले जात असताना, त्या प्रेमाचे टिपूर चांदणे वसुंधेरवर सांडले जात असे… मग असं असताना आज अचानक तुमची मिठी रेशमाची सैल होऊन गळून का जावी.. अगं वेड्या बायांनो दूरून डोंगर.. आपलं वसुंधरा.. साजरे दिसतात हे काय वेगळं सांगायला हवं का मी तुम्हांला… आज तुम्ही ज्याला भुलालय तो जरी तुम्हाला मालकीचा स्वतःचा चंद्र गवसला असलाना तर तो तुमचा भ्रम आहे बरं.. अगं ते चंद्र नाहीत तर चमचमणारा काचेचा चंद्र आहेत.. तुमच्या सौंदर्यावर भाळलेला..भ्रमरालाही लाज वाटेल अशी चंचल वृत्तीची प्रिती असते त्यांची.. मग तुम्हाला ही आकाशीचा तो चंद्र आणून देतो हया फसव्या थापा मारतील.. आणि आणि त्यानंतर हळूहळू जसं जसं तुमचं सौंदर्य अस्तंगत होत जाईल ना तसा तसा तुमच्यातला त्याचा इंटरेस्ट कमी कमी होत जाऊन तो नव्या सौंदर्यवतीच्या शोधात राहिल.. मग तुमची काय गत होईल?..इथं निदान कालगती ने तुम्हाला उल्का होउन खाली तरी जाता येत होतं पण तिथं वसुंधेरवर तुम्हाला उल्का सुद्धा होता येणार नाही… 

तेव्हा सख्यांनो हा वेडेपणा सोडा या बरं परत आपल्या ठिकाणी . दिल पुकारे आरे आरे… सुलगते साइनेसे धुवाॅं सा उठता है लो अब चले आओ के दम घुटता है…. 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पसारा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “पसारा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

मध्यंतरी काँलनीत शेजारी एक नवीन बि-हाड आलं.अतिशय आटोपशीर, मोजकं सामान आलं.नेहमीच्या उत्सुकतेने आपल्या नेहमीच्या कुवतीनुसार मनात आलं अजून मागून बाकीचे सामान येणार असेल.पण नंतर कळलं त्या कुटुंबात मोजकं आणि आटोपशीर सामान आहे. कळल्यावर ,बघितल्यावर खूप जास्त कौतुक वाटलं,आणि थोडी स्वतःच्या हव्यास म्हणा सोस म्हणा त्याची लाजचं वाटली.

मग कुठे जरा डोळे उघडून माझी स्वतःची स्वारी आवरासावरीकडे वळली. भसाभसा कपाट उपसली. आधी नंबर लावला कपड्यांच्या कपाटाचा. ते साड्यांचं,ड्रेसेस चं कलेक्शन बघितल्यावर क्षणभरासाठी का होईना स्वतःची स्वतःलाच लाज वाटली. किती हव्यासासारखे जमवितो आपण. मनात आल जवळपास थ्रीफोर्थ आयुष्य निघून गेलं.उर्वरित आता जे काही दिवस असतील ते नोकरीतील निवृत्तीनंतर घरीच राहण्याचे. त्यामुळे आपण ह्या सगळ्याचा विनीयोग कसा करणार ?

त्याक्षणी प्रकर्षांने जाणवून गेलं प्रत्येक व्यक्तीने पसारा हा घालावा पण त्याचा त्याला आवरता येईल इतपतच घालावा. मनात आल हा पसारा मला आवडतोय म्हणून मी मांडून ठेवला हे खरयं पण हा पसारा आपल्यापश्चात घरच्यांना आवरतांना नाकी नऊ आणेल हे पण नक्की. म्हणजेच आपण दुस-याचा त्रास कमी करण्याऐवजी वाढवतोयच की.

खरंच  ज्या माणसाला कुठेतरी थांबायचं, आवरत घ्यायचं,आटोपत़ घ्यायचं हे नीट वेळेवर उमगलं तो शहाणा,सुज्ञ माणूस समजावा. पूर्वी जी वानप्रस्थाश्रम नावाची संकल्पना होती ती किती यथार्थ होती नाही कां ?

जी गोष्ट कपड्यांची तीच वस्तु वा भांडी ह्यांचीपण. थोडक्यात काय तर प्रश्न हा किती संग्रह, साठवणूक करतो आणि तो संग्रह वा साठवणूक खरंच आपल्या पुढील पिढीसाठी फायद्याची वा आवश्यक असणार आहे ह्याचा पण आपल्याला  गांभीर्याने विचार करावाच लागणार आहे.दिवसेंदिवस हा काळ धावपळीचा दगदगीचा येतोय तेव्हा जातांना तरी पुढील पिढीच्या समस्या वाढवून जाऊ नये ही मला प्रकर्षाने जाणीव झाली.

आता आपला हा पसारा आवरता घेऊन नवीन पिढीला त्यांच्या मनाने पसारा घालायला वाव द्यावा हा नवीन विचार ह्या वर्षात सुचला हा प्लसपाँईंटच म्हणावा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अवघे ८५ वयमान… ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

??

☆ अवघे ८५ वयमान… ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी

मला अजूनही आठवतोय आईंचा त्या दिवशीचा चेहेरा ! चेहऱ्यावरील प्रसन्नता आणि मनात न मावणारा आनंद !!

आई, म्हणजे माझ्या  सासूबाई, “विद्यावती गजानन जोशी.”आणि सासरे म्हणजेच आप्पा,मला पहायला (वधुपरिक्षा) आमच्या घरी आले होते .जेवढी भीती कुणाही मुलीला वाटेल, त्यापेक्षा कितीतरी अधिक मला वाटत होती. कारण लग्न करण्याचं आमच्या दोघांचं पक्क ठरलं होत. पण जर सासू सासऱ्यांनी नकार दिला तर…? हा विचारच भयंकर होता. पण आईंच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यातली पसंती यामुळं मन थोडं सुखावलं होतं. भीतीचा भार कमी झाला होता.

सासऱ्यांची मात्र नखशिखांत भीती वाटत होती. ते खूप कसून आणि कठोर परीक्षा घेण्याचा नजरेने बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील रेषही हलत नव्हती. उसासा कधी टाकावा,असा जीव टांगणीला लागला होता.

तशात आई सहजपणे बोलून गेल्या, ” पहिली लक्ष्मी पाहिली, तिला नाट नाही लावायचा “. 

त्या माझ्याबद्दलच बोलत होत्या हे कळलं. कारण ह्यांनी माझ्या आधी कुठलीच मुलगी पाहिली नव्हती. सासऱ्यांचं मन कळत नसलं तरी एक मार्ग तर खुला झाला होता. त्यामुळे दुसरा मार्ग खुला होण्याची आशा होती….. तर अशा आई !

साध्या, सरळ, सहज पण ठामपणे आपलं म्हणणं मांडणाऱ्या. नजरेने, शब्दाने, आपली पसंती आणि नापसंतीही दर्शविणाऱ्या.

लग्न ठरल्यानंतर ते होईपर्यंत सहा महिन्यांचा अवधी होता. त्या दरम्यान आईंनी मला पत्रही लिहिलं होतं. अगदी प्रेमानं ओथंबलेलं. लाडू वगैरे खाऊ पण पाठवायच्या माझ्यासाठी. अजून काय हवं?

मी दोन अडीच वर्षांची असताना माझी आई गेली. ती उणीव भरून निघाली आईंच्या रूपाने.

जुन्या काळाप्रमाणे आईंचं आयुष्यही कष्टाचंच होत. रोज सोवळ्यात स्वयंपाक, देवदर्शन, रूढी परंपरा, कर्मकांड सारं नेकीनं करणाऱ्या. माहेरी आमच्या घरी सुधारकी वळण. आईंनी त्यांच्या परीने सासरच्या रीतीभाती मला समजावून सांगितल्या. पण कधी जाच जबरदस्ती नाही केली कशाची.

साऱ्या आयुष्यभर घरादारासाठी, शेजाऱ्या पाजाऱ्यांसाठी, नातेवाईकांसाठी अपार कष्ट केले. पण कधी तक्रार म्हणून नाही. ‘ स्वत:साठी काही हवं ‘ हे तर अगदी जाणीवेपलीकडेच असायचं त्यांच्या. पण सतत करत रहाणं हे मात्र कर्तव्य बुध्दीत घट्ट रोवलेले.

तशा मितभाषी असल्या तरी, प्रसंगी “सौ सुनारकी,एक लोहारकी. ” असं असायचं त्यांचं कधीकधी. बोलता बोलता काही म्हणी सडेतोड वापरायच्या. उदा. पोळी केलेली असताना कोणी भाकरी मागितली तर “.असेल ते नासवा नसेल ते भेटवा “. किंवा खूप कपडे असून कोणी वाईट कपडे घातले तर “ सतरा लुगडे,भागुबाई तुझे ….. उघडे.”

बाहेरच्या कोणासमोर खायला दिलेलं त्यांना अजिबात आवडत नसे. म्हणत, *पदरच खावं, नजरचं नाही.* 

“ दिवस सरला की मागचं मागं टाकून आल्या दिवसाला सामोरे जायचं. ” असं जगण्याचं त्यांचं रोकडं तत्वज्ञान होत. जे बोलायच्या तसंच वागायच्या.

अत्यंत संयमी, कर्तव्यतत्पर निर्धारित जीवन त्या जगल्या. अनेक दुःख झेलली, पचवली, पण मोडून पडल्या नाहीत. कोणाच्याच दुःखावरची खपली न काढता आयुष्यात सामावून जाणं हाच त्यांचा वसा होता.

आप्पांच्या निधनाचं दुःखही त्यांनी खंबीरपणे पचवलं. आपलं दुःख उगाळून इतरांच्या आनंदावर कधी विरजण घातलं नाही. वयाची ८५ वर्ष झाली तरी सहासहा, सातसात तास वाचन करायच्या. रोज गीतेचे अठरा अध्याय वाचायच्या.

८५ वर्षांचं अवघं जीवन असं कष्टातून वेचलं. वयोमानपरत्वे डोळ्यासमोर नसणाऱ्या मुलांच्या, नातवंडांच्या आठवणीने सैरभैर होतं. कातर होतं. तरी पुन्हा स्वत:च स्वत:चं बोट धरून समजावल्यासारखं  गीता वाचनात स्वत:ला मग्न ठेवत.

त्यांचं जीवन म्हणजे आदर्श स्त्री-जीवनाचा  वस्तुपाठच होता.

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रणरागिणी संजुक्ता पराशर ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ ☆

? इंद्रधनुष्य ?

रणरागिणी संजुक्ता पराशर ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ 

हातात एके 47 घेऊन घनदाट जंगलात शिरल्यावर तब्बल १६ अतिरेक्यांना यम सदनाला पाठवून आणखी ६४ अतिरेक्यांना अटक करणाऱ्या संजुक्ता पराशरची कहाणी स्वतःला अबला समजणाऱ्या देशातील प्रत्येक स्त्रीला माहिती व्हायला पाहिजे।

दिसायला गोरीपान आणि सुंदर अशी संजुक्ता जर कधी आपल्या समोरून गेली, तर तिच्या अफाट कर्तृत्वाची आपण कल्पनाही करू शकणार नाही। एक सामान्य स्त्री लाखो सामान्य पुरुषांनाही जमणार नाही असं काम करते, तेव्हा तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे सोशल मीडियावर गायले जायला हवेत, पण आम्हाला राजकारण आणि जात, धर्मापलीकडेही आणखी दुनिया आहे हेच मान्य नसतं। त्यामुळे संजुक्ता पराशरच्या फेसबुक पेजला लाखभरही लाईक मिळत नाहीत आणि राजकारणी, सिनेनट मात्र करोडोंनी लाईक मिळवतात। असो. 

आसामसारख्या मागासलेल्या राज्यात शाळेत शिकून, नंतर दिल्लीच्या जे एन यु मधून डिग्री घेणारी संजुक्ता २००६ मध्ये आयपीएस परीक्षा देशात ८५ वा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाली। यु. एस. फॉरेन पॉलिसी विषयात तिने पीएचडी केल्यामुळे ती ‘ डॉक्टर संजुक्ता पराशर ‘ म्हणूनओळखली जाते। तिचं लग्न झालं तेही आयएएस अधिकारी पुरू गुप्तांशी। त्यांना ६ वर्षाचा मुलगा आहे। संजुक्ता आई त्याला सांभाळते।

संजुक्ताची पोस्टिंग २०१४ मध्ये आसाममधील सोनीतपुर जिल्ह्यात सुप्रिंटेंडंट ऑफ  पोलीस म्हणून झाली आणि अग्निदिव्य म्हणजे काय ह्याची प्रचिती तिला रोजच घ्यावी लागली। बोडो अतिरेक्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता। शेकडो लोकांचे बळी गेले होते। आसामच्या घनदाट जंगलात शिरून त्यांच्याशी मुकाबला करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण। हातात एके 47 घेऊन संजुक्ता सीआर पी एफ च्या जवानांना घेऊन जेव्हा घनदाट जंगलात शिरायची, तेव्हा जवानांनाही दहा हत्तीचं बळ मिळायचं। अनेक मोहिमा यशस्वी झाल्यामुळे अतिरेकीही संजुक्ताच्या नावाने कापू लागले होते। तिला पत्राद्वारे आणि फोनद्वारे धमक्या येऊ लागल्या होत्या। परंतु शीर तळहातावर घेऊन फिरणाऱ्या संजुक्तावर कसलाच परिणाम झाला नाही। तब्बल १६ अतिरेकी मारले गेले आणि ६४ अटक झाले, तेही तिच्या अवघ्या १८ महिन्यांच्या कारकीर्दीमध्ये। 

आज संजुक्ता पराशर दिल्लीमध्ये कार्यरत आहे। देशातील दहशतवाद पूर्णपणे निपटून काढणं हेच तिचं ध्येय आहे। अशा ह्या खऱ्या खुऱ्या रणरागिणीच्या अफाट कर्तुत्वाला आपण सर्वांनीच मानाचा मुजरा करायला हवा। सलाम करायला हवा !

माहिती संग्रहिका : सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ असेही… तसेही… ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ असेही… तसेही… ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

पास होण्या पुरते ३५% मिळवूनही खूश होऊन पार्ट्या  देणारे आणि ९५% मिळवूनही २% कमीच पडले म्हणून रडत बसणारेही बघितले.

जॉब अचानक गेल्यामुळे आता तसंही दुसरा जॉब मिळेपर्यंत अनायसे सुट्टीच आहे तर मस्त फिरुन येऊ म्हणणारे आणि अपेक्षित Increment मिळालं नाही म्हणून करुन ठेवलेले Flight Bookings कॅन्सल करुन घरात उदास बसून राहणारेही बघितले आहेत.

जिभेच्या कॅन्सरमुळे नाकात नळी असतांनाही उत्साहाने गर्दीत जाऊन पहिल्या रांगेत बसून नाटक एन्जॉय करणारा आणि नको त्या गर्दीत नाटक बिटक..  उगीच कशाला आजाराला निमंत्रण म्हणून घरात बसून राहणाराही बघितला आहे.

बाल्कनीतून किती छान दिसतोय इंद्रधनुष्य म्हणून दोन्ही काखेत crutches लावून तरातरा बाल्कनीत बघायला जाणारा आणि कितीदा बघितलाय यार फोटोत, त्यात काय बघायचं..  म्हणत लोळत पडून राहणारा त्याचा रुम पार्टनरही बघितला आहे

फर्निश्ड थ्री बीएचके फ्लॅटमधे,  तेव्हाच थोडे पैसे अजून टाकून फोर बीएचके घेऊन टाकायला हवा होता म्हणून हळहळत बसणारे नवरा बायको..  आणि एकाच खोलीत काहीच पुरेसं नसूनही हसतखेळत आनंदात राहणारं पाच जणांचं एक कुटुंबही बघितलं आहे.

हे नको खायला ..  असं होईल, ते नको प्यायला .. तसं होईल..  ह्या टेंशनमधे ठराविक मोजकं मिळमिळीत खाऊन पिऊनही अटॅकची चिंता डोक्यात ठेवणारे,  आणि जातील त्या ठिकाणी मिळेल ते झणझणीत चटपटीत  बिनधास्त खाऊनही ‘ काही नाही होत यार ‘ म्हणत मजेत असणारे खवय्येही बघितले आहेत.

आयुष्य सगळ्यांना सारखंच मिळालेलं असतं ..  पण काही ते फुलवत जगतात , काही सुकवत जगतात

आता त्याला कोण काय करणार —-  जगा की बिनधास्त…….. 

संग्राहक : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “देहाची कॅपिटल व्हॅल्यू” ☆ श्री राजेंद्र  वैशंपायन ☆

??

☆ “देहाची कॅपिटल व्हॅल्यू” ☆ श्री राजेंद्र  वैशंपायन 

नुकतीच एक गमतीशीर बातमी वाचली. अमेरिकेमध्ये दर वर्षी एक कोटी पन्नास लाख (१,५०,००,०००) इतक्या दातांच्या रूट कॅनालच्या केसेस होतात. प्रत्येक रूट कॅनाल चा सरासरी खर्च ८०० डॉलर्स इतका असतो. म्हणजे दरवर्षी अमेरिकेमध्ये १२ अब्ज डॉलर्स  (१२,००,००,००,०००) इतका खर्च केवळ दातांच्या रूट कॅनाल वर होतो. या सरासरी अंदाजित संख्या जरी धरल्या तरी १० अब्ज डॉलर तरी केवळ दातांच्या इलाजासाठी खर्च होतात असं नक्कीच म्हणता येईल. मी चक्रावलोच. रूट कॅनाल सारख्या साधारणतः सोप्या समजल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेचा जर हा खर्च असेल तर बाकीच्या अवयवांच्या त्या मानाने अधिक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचा खर्च तर माझ्या विचार करण्यापलीकडे गेला. म्हणजे अगदी पायांच्या नखापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत प्रत्येक अवयवाची किंमत काढायचं ठरवलं तर एक मनुष्यदेह किती किमतीचा असेल? माझं कुतूहल अधिक चाळवलं गेलं आणि जरा अधिक माहितीसाठी गुगल महाराजांना विचारलं की केसाचं ट्रान्सप्लांट होतं त्यावेळा एक केस ट्रान्सप्लांट करण्याचा काय खर्च आहे? उत्तर आलं एका केसाला ३ डॉलर ते ९ डॉलर. त्याची सरासरी धरली तर उत्तर ६ डॉलर.  सामान्यपणे माणसाच्या डोक्यावर सरासरी दीड लाख(१,५०,०००) इतके केस असतात. म्हणजे याचाच अर्थ माणसाच्या डोक्यावरच्या केसांचीच किंमत साधारणपणे ९ लाख डॉलर इतकी आहे. मी अधिकच चक्रावलो. या संख्या डोळ्यासमोर आल्या आणि एकंदर मनुष्यदेहाची किंमत किती येईल हे गणितही माझ्याच्याने पूर्ण होईना.  

विचार करताना शरीराची सगळी आकृती समोर उभी राहिली.  हात, पाय, त्यांची बोटं, डोळे, कान, नाक, श्वासनलिका, अन्ननलिका, फुफुस, हाडांचा सापळा, हृदय, यकृत, प्लिहा, लहान आतडं मोठं आतडं, जननेंद्रिय, रक्त, इतर एन्झाइम्स आणि सर्वात महत्वाचा मेंदू… काय चमत्कार आहे शरीर म्हणजे. मी एका ठिकाणी वाचलं होतं की माणसाच्या शरीरात चालणाऱ्या ज्या सगळ्या व्यवस्था आहेत, यांची शरीरात चालणाऱ्या अचूकतेने प्रतिकृती करायची म्हटली तर कमीत कमी पाच एकर इतका मोठा आणि अतिशय क्लिष्ट यंत्रांनी बनलेला कारखाना निर्माण करावा लागेल. आणि हेच काम निसर्गाने म्हणा, ईश्वराने म्हणा सहा फूट लांब दीड फूट रुंद अशा मानवी देहात करून दाखवलं आहे. एका तज्ज्ञाने सांगितलेलं मी ऐकलं आहे की शरीरातील अवयव हे साधारणपणे 150 ते 200 वर्ष पर्यंतसुद्धा सक्षमपणे काम करू शकतात आणि म्हणूनच एका शरीरातून दान केलेले अवयव दुसऱ्या शरीरात पुन्हा व्यवस्थित आयुष्यभर काम करतात. माणसाच्या देहाची ही शक्ती आहे,  हा चमत्कारच नाही का? चमत्कार म्हणजे वेगळा अजून काय असू शकतो? 

मनात आलं, फुकट मिळाला म्हणून कसा देह वापरतो आपण. देहाचा प्रत्येक अवयव संपूर्ण आयुष्यभर माणसाने केलेल्या अत्याचाराचा भडीमार सहन करत करत शक्य होईल तितकी साथ देण्याचा प्रयत्न करतो आणि माणूस देहाला पायपोस असल्यासारखं का वागवतो? काहीही खातो, कधीही खातो, काहीही पितो कधीही पितो, कधीही झोपतो, कधीही उठतो. व्यसनं करतो आणि काय काय. का असं? ज्या परमेश्वराने हा चमत्कार प्रयेक मनुष्याला बहाल केला आहे त्याची किंमत आहे का आपल्याला? आपण ३००० रुपयाचा साधा चस्मा, त्याची किती काळजी घेतो त्याला नीट केसमध्ये ठेवतो पण तशी डोळ्यांची काळजी घेतो का? कॉन्टॅक्ट लेन्सेस अगदी काळजीपूर्वक दररोज रात्री सोलुशनमध्ये बुडवून ठेवतो पण डोळ्यांसाठी दिवसातून एकदातरी नेत्रस्नान करतो का? जसं डोळ्याचं तसंच इतर अवयवांचं. आपल्या संस्कृतीत अष्टांगयोग आणि आयुर्वेद हे दोन अमृतकुंभ या देह नावाच्या चमत्काराचा सांभाळ करण्यासाठीच दिले आहेत. शरीरात बिघाड होऊच नये म्हणून अष्टांगयोग आणि काही कारणांनी झालाच तर पुन्हा पूर्ववत शरीर करण्यासाठी आयुर्वेद. या दोघांचा किती सुंदर मेळ आपल्या संस्कृतीत घालून दिलेला आहे. किती भाग्यवान आहोत आपण की आयुष्यातील प्रत्येक गोष्ट अनुभवण्यासाठी शरीर नावाची सुंदर भेट आपल्याला ईश्वराने दिलेली आहे. त्याचा निदान योग्य तो सांभाळ करण्याची जबाबदारी आपली नाही का? 

मी लहानपणी एक प्रार्थना शिकलो की जी मी दररोज रात्री निजण्याअगोदर म्हणतो. ती प्रार्थना अशी; 

डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो कानी, पदी चालतो ।

जिव्हेने रस चाखतो, मधुरसे वाचे आम्ही बोलतो।

हाताने बहुसाळ काम करितो, विश्रांतीही घ्यावया ।

घेतो झोप सुखे, फिरोन उठतो, ही ईश्वराची दया ।।

मी ही प्रार्थना हात जोडून म्हणतो. पण मला वाटतं या प्रार्थनेचं अधिक महत्व पटण्यासाठी आणि मनावर याचा गांभीर्याने परिणाम होण्यासाठी मी ही प्रार्थना खिशात हात घालून म्हटली पाहिजे. कारण तरच दररोज आठवण राहील की या देहाची एकूण कॅपिटल व्हॅल्यू किती! किती अमूल्य आहे हा देह. आणि खिशात हात घालून प्रार्थना केल्यामुळे याचीही आठवण राहील की माझ्या शरीराची मीच जर काळजी नाही घेतली तर त्याच खिशातून एकेक केस परत मिळवण्यासाठी सहा डॉलर बाहेर काढायला लागतील कधीतरी… 

© श्री राजेंद्र वैशंपायन 

मो. +91 93232 27277

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “असं का होत ? …” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ “असं का होत ? …” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

असं का होतं?

(Subconscious Mind)

– असं का होतं की ज्या गोष्टीची भीती वाटत असते, नेमकी तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणून हजर होते.”

– एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्याच विषयात का बरं नापास होतो?

– पैसे नाहीत, पैसे नाहीत, असे घोकणारा दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल का बरं होतो?

– आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्‍याला कसला तरी आर्थिक  फटका बसतोच बसतो,

– कष्ट नकोत, कष्ट नकोत, असं घोकणार्‍याच्या नशिबातच श्रम आणि राबणं असतं. असं का बरं असतं?

– का बरं एखादीला नको असलेलं गावचं ‘सासर’ म्हणून पदरात पडतं?

– का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिकाधिक गरीब होतात? 

— तर ह्या सगळ्यांसाठी एकच कारण आहे, आणि ते कारण आहे. —- 

आकर्षणाचा सिद्धांत.— लॉ ऑफ अट्रॅक्शन

तुम्हाला माहिती आहे का ?… जगातील फक्त चार टक्के लोकांकडे एकूण संपत्तीच्या शहाण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे. हा केवळ योगायोग नाही मित्रांनो, हा आकर्षणाचा सिध्दांत नियम आहे. काय सांगतो हा नियम?—- 

तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट, घटना ही कळत नकळत तुमच्या विचारांनीच  आकर्षित केलेली  असते. जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, तुमचा जोडीदार, तुमची मुलं, तुमचे मित्र, तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची सांपत्तिक स्थिती, तुमचं गाव, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे नातेसंबंध, अगदी सगळं…सगळं….. जसं की समजा एखाद्याला निळा रंग आवडतो, आणि त्याच्याकडे निळ्या रंगाचे खूप कपडे आहेत, तर तो बाहेर जाताना निळाच शर्ट घालून जाईल ना?

…. अगदी तसंच, आपल्या मनाच्या कपाटात ज्या रंगाचे विचार असतात, तीच परिस्थिती वास्तव बनून तुमच्या जीवनात समोर येते.

उदा. — माझं कर्ज कसं फिटेल याची सतत चिंता असेल तर मनाचा फोकस केवळ आणि केवळ कर्जावर जातो आणि त्यामुळे  तुमचं कर्ज वाढतं. 

— माझं वजन वाढतंय, वजन वाढतंय म्हटलं की वजन अजूनच वाढतं.

— माझे केस गळतायत म्हटलं की अजूनच जास्त केस गळतात.

— माझं लग्न जमत नाही म्हटलं की लग्न जमायला अजूनच उशीर होतो.

— कर्ज माझा जीव घेणार म्हटलं की अजून आर्थिक अडचणी निर्माण होतात….. वगैरे वगैरे…

ज्या गोष्टीवर मन अधिक लक्ष केंद्रित करतं, ती गोष्ट आपल्या Subconscious Mind म्हणजेच सुप्त मनाद्वारे अंमलात आणली जाते.

— म्हणजे जर आपण आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला मिळालंय अशी त्याच्या रंग, चव, आकार, गंध याच्यासह कल्पना करुन, मनाला उत्तेजित अवस्थेत नेलं आणि त्यावर दृढ विश्वास ठेवला, की हवं ते आपल्याला मिळतंच मिळतं.—- फक्त आपल्याला ते मिळालयं, हे मनाला पटवून देता यायला हवं– म्हणजेच त्याप्रकारच्या संवेदना तयार करुन त्यात रंग भरून कल्पना करावी.  यालाच Creative Visualization अशी संज्ञा आहे.

— अगदी मरणाच्या दारात पोहोचलेली, डॉक्टरांनी आशा सोडून दिलेली, पण हे रहस्य जाणणारी, अनेक माणसं फक्त ह्या शक्तीचा वापर करुन, सकारात्मक कल्पना करुन आणि त्यावर दृढ विश्वास ठेवून पुन्हा ठणठणीत बरी झाली आहेत.

विश्वातील सर्वच थोर माणसांनी हा आकर्षणाचा सिद्धांत जाणला होता. आणि त्याची अंमलबजावणी केली, म्हणून तर ते इतरांपेक्षा वेगळे ठरले.

तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान हवं असल्यास, दररोज ठराविक वेळी, ठराविक स्थळी शांतचित्ताने प्राणायाम करुन चेहर्‍यावर समाधानाचे भाव ठेवून मनात ही वाक्ये पूर्ण संवेदना आणि भावनेसह म्हणा:…. 

१ )  स्वस्थ आणि आरोग्यपूर्ण जीवन मी जगत आहे.

–  ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे.

२ )  मी सुंदर आहे, तेजस्वी आहे, मी चिरतरूण आहे.

 – ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे.

३ ) मी धैर्यवान, बलवान, सुज्ञ आणि विवेकी आहे.

– ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे.

४ ) मी समृद्ध, समाधानी आणि आनंदी जीवन जगत आहे.

 – ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे.

५ ) माझ्या मनात प्रेम आणि परोपकार उत्पन्न होत आहे.

– ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे.

६ )  मला सर्वत्र अनुकूल परिस्थिती प्राप्त होत आहे.

– ईश्वरा मी तुझा खूप आभारी आहे.

७ ) तुझी माझ्यावर अखंड कृपा आहे. तुझ्या प्रेमाचा माझ्यावर अखंड वर्षांव होतो आहे.

– ईश्वरा मी तुझा खूप खूप आभारी आहे.

याला पॉझीटीव्ह अफर्मेशन्स म्हणजेच सकारात्मक स्वयंसूचना– Auto  Suggestions असे म्हणतात. यामुळे तुमच्या मानसिकतेत बदल होऊन दिवसभर एक आगळीवेगळी ऊर्जा तुमच्यामध्ये संचार करेल.

तुम्ही हे जर मनापासून, आणि तशाच संवेदना निर्माण करुन वारंवार  बोललात, आणि ते तुमच्या सुप्त मनापर्यंत म्हणजेच Subconscious Mind पर्यंत पोहोचलं, तर मित्रांनो तुमच्या नकळत ते तुमच्या सार्‍या आज्ञा पाळेल आणि खर्‍याही करुन दाखवेल.

यात अट एकच असेल ती म्हणजे तुम्ही घेत असलेल्या स्वयंसूचना या तुमच्या किंवा जगाच्या कल्याणासाठी असाव्यात. इतरांना नुकसान पोहोचविणारी स्वयंसूचना बुमरॅंगसारखी तुमचेच अपरिमित नुकसान करणारी ठरते.

— म्हणूनच आपल्या मनात उत्पन्न होणा-या प्रत्येक विचाराविषयी सजग रहा. कधीकधी वरवर सकारात्मक वाटणारा विचार नकारात्मक अर्थ निघणारा असतो. त्यामुळे विचारांची काळजी घेणं फार महत्त्वाचे असते.

— उदाहरणार्थ “मी कधीच आजारी पडणार नाही.” हे वाक्य वरकरणी सकारात्मक वाटत असले तरी त्या वाक्यात आजार हा नकारात्मक शब्द आहे. त्याच्या वारंवार उच्चाराने तशीच भावना मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याऐवजी “मी आरोग्यपूर्ण जीवन जगत आहे” हे वाक्य अधिक सकारात्मक आहे.

इतक्या सूक्ष्म स्तरावर आपण आपल्या मनात निर्माण होणा-या विचारांची छाननी करणे आवश्यक आहे.

अशा प्रकारे आपण आपल्या विचारांची छाननी केली की आपल्या मनात निर्माण होणारा प्रत्येक नकारात्मक शब्द आणि विचार हळूहळू कमी होतील आणि नव्यानेच आयुष्याचा अर्थ उमजेल, अनुभव येईल.

आपणही आपल्या आयुष्यात ही शुभ सुरुवात करावी आणि आपलं आयुष्य समृद्ध करावं ही शुभेच्छा !

— आणि हीच एका दृष्टीने “लॉ ऑफ अट्रॅक्शन” ची खरीखुरी सुरुवात असेल !

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देवाशी संवाद … ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ देवाशी संवाद  ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆ 

माणूस :  देवा रागावणार नसशील तर एक प्रश्न विचारु का ?

देव :  विचार ना .

माणूस :  देवा , माझा आजचा दिवस तू एकदम खराब केलास . असं का केलंस तू देवा ?

देव :  अरे काय झालं पण ?

माणूस :  सकाळी अलार्म वाजलाच नाही . मला उठायला खूप उशीर झाला .

देव :  बरं मग ?

माणूस :  मग माझी स्कूटर पण चालू होत नव्हती . कशीबशी रिक्षा  मिळाली .

देव :  मग ?

माणूस  :  आज कँटीन पण बंद . बाहेर सँडविच खाल्लं . ते पण  बेकार होतं .

देव :  (नुसताच हसला )

माणूस :  मला एक महत्त्वाचा फोन आला होता . त्या माणसाशी बोलताना माझा फोनच बंद पडला .

देव :  बरं मग

माणूस  :  संध्याकाळी घरी गेलो तर लाईट गेली होती . मी इतका थकलो होतो की ए . सी . लावून       झोपणार होतो . का तू असं केलंस देवा माझ्या बरोबर ?

 देव :  आता नीट ऐक —- आज तुझा मृत्यूयोग होता . मी माझ्या देवदूतांना पाठवून तो थांबवला . त्या गडबडीत अलार्म पण थांबला .तुझी स्कूटर मी सुरू होऊ दिली नाही कारण स्कूटरला अपघात होणार होता .कँटीनच्या जेवणातून तुला विषबाधा होणार होती . ते  सँडविच वर निभावलं .तुझा फोन मी बंद पाडला कारण समोरचा माणूस तुला एका कारस्थानात अडकवणार होता .संध्याकाळी तुझ्या घरी शॉर्टसर्किट होऊन आग लागणार होती म्हणून मी लाईट घालवली .

माणूस :  देवा मला क्षमा कर .

देव :  क्षमा मागू नकोस . फक्त विश्वास ठेव . माझ्या योजनांविषयी कधीच शंका घेऊ नकोस . आपल्या आयुष्यात जे बरं वाईट घडतं त्याचा अर्थ फार उशीरा लागतो आपल्याला 

— आपण खरंच देवावर श्रद्धा आहे असं म्हणतो . मग श्रवणाच्या वेळी डुलक्या का येतात ? – तीन तासाच्या पिक्चरमध्ये जराही झोप येत नाही . …

— आपल्या आयुष्याला सुंदर बनवणारे विचार आपण दुर्लक्षित करतो आणि  नको ते मेसेज फॉरवर्ड करतो …..

—  देवाशीच संगत केली तर आपल्याला एकटं का वाटावं

माणूस हा सवडीनुसार वागत असतो …! चहात माशी पडली तर चहा फेकून देतो , पण साजूक तूपात माशी पडली तर तो माशी फेकून देतो ..  तूप नाही .. अगदी तसच …आवडत्या माणसाने चूक केली तर काहीही न बोलता ती पोटात घालतो, पण जर नावडत्याने केली तर आकांडतांडव करून बोभाटा करतो.  

—  ‘ माझं ‘ म्हणून नाही ” आपलं ” म्हणून जगता आलं पाहिजे …

—  जग खूप ‘ चांगलं ‘ आहे, फक्त चांगलं ” वागता ” आलं पाहिजे …

– सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही।

— समुद्र आणि वाळवंट कितीही आथांग असले, तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही 

… देह सर्वांचा सारखाच।

           …… फरक फक्त विचारांचा।

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “संगीतातील शुक्रतारा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “संगीतातील शुक्रतारा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

संगीत, गाणी आणि आपण त्याचे दर्दी यामध्ये एक अनामिक बंध जुळल्या गेलेले असतात. कुठेही,कधीही,कुठल्याही भाषेतील संगीत, गाणी ऐकू आलं की ठेका हा धरलाच जातो. मला आठवतं आम्ही तेव्हा टिव्ही वर प्रादेशिक चित्रपट, प्रादेशिक गाणी,संगीत काही भाषा कळतं नसूनही आवडायची.पण खरं प्रेम ,लायकींग हे आपल्या मातृभाषेतील गाण्यांवर असतं हे ही खरेच.

प्रत्येकाच्या जीवनात आनंद मिळवून  देणाऱ्या गोष्टींपैकी सुमधुर संगीत,गाणी,कविता ह्यांच स्थान पहिल्या काही क्रमांकावरच असतं. सुमधुर संगीत, मनाला जाऊन भिडणारी अर्थपूर्ण गाणी,आशयघन कविता, काव्य हे आपल्या आयुष्यातील अविभाज्य अंगच बनले आहे.

मनाला आनंद मिळवून देणाऱ्या संगीताचे, काव्याचे अनेक प्रकार आहेत. भक्तिगीतं, कविता, भावगीतं, सुगमसंगीत ह्यांच्यामुळे  माणसाच्या जीवनात आलेलं एकटेपणं काही प्रमाणात दूर करण्याची किमया ह्या संगीतात आहे.

काही वेळी काही माणसं अश्या अजरामर कलाकृती घडवून जातात की ह्या कलाकृतीच जणू त्यांच्या नावासारखीच त्यांची ओळख बनवितात. असेच एक अवलिया म्हणजे “शुक्रतारा मंदवारा”वाले अरुणजी दाते. आतुन उत्स्फूर्त निघालेली अवीट गोडीची अर्थपूर्ण प्रेमगीत व भावगीतं ऐकावीत ती अरुणजींच्याच आवाजातील. 2010 पर्यंत “शुक्रतारा मंदवारा” ह्या कार्यक्रमाचे थोडेथोडके नव्हे तर तब्बल 2500 कार्यक्रम झालेत.    

मे महिन्यातील चार,पाच,सहा ह्या तारखा जणू कलाक्षेत्राशी संबंधित तारखा. 4 मे ही तारीख सुप्रसिद्ध गायक अरुणजी दाते ह्यांचा जन्मदिवस, 6 मे हा अरुणजींचा स्मृतीदिन व 5 मे ही तारीख बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे  ह्यांचा स्मृतीदिन.

अरुणजी दाते ह्यांना ओळखत नसलेली व्यक्ती विरळीच. अरुणजी हे सुप्रसिद्ध मराठी भावगीतं गायक. इंदूरचे सुप्रसिद्ध गायक रामुभैय्या दाते हे त्यांचे वडील. ह्यांचा जन्म 4 मे 1934 रोजी इंदूर येथे झाला. सुरवातीला इंदूर जवळील धार येथे कुमार गंधर्वांकडे ह्यांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. संगीताचे पुढील शिक्षण त्यांनी के.महावीर ह्यांच्याकडे घेतले. खरतरं दाते हे मुंबईत टेक्स्टाईल इंजिनिअर म्हणून नोकरी करीत  पण त्यांना त्यांचा आतला आवाज स्वस्थ बसू देत नव्हता.1955 मध्ये त्यांनी आकाशवाणी ला कार्यक्रम केला.1962 ला त्यांची पहिली ध्वनीमुद्रिका “शुक्रतारा मंदवारा”ह्या नावाने प्रकाशित झाली.खळेकाका ह्यांच्या आग्रहाखातर त्यांनी जाहीर कार्यक्रम घ्यायला सुरवात केली. मंगेश पाडगावकर, यशवंत देव,अरुण दाते ह्या त्रिकुटाने अनुक्रमे कवी, संगीत दिग्दर्शक, गायक असे मराठी भावगीतांचे लोकप्रिय कार्यक्रम सादर केलेत.  दातेंनी लता मंगेशकर, आशा भोसले,सुमन कल्याणपूर,कविता कृष्णमुर्ती ,सुधा मल्होत्रा, अनुराधा पौडवाल ह्यांच्या बरोबर अनेक लोकप्रिय द्वंद्वगिते गायलीत. त्यांना 2010 साली गजानन वाटवे पुरस्कार व 2016 साली राम कदम कलागौरव पुरस्कार मिळाला. त्यांची दीर्घकाळ स्मरणात राहणाऱ्या गाण्यांपैकी “भातुकलीच्या खेळमधली”,””जपून चाल पोरी जपून चाल”,”स्वरगंगेच्या काठावरती”,”या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे”,”दिवस तुझे हे फुलायचे”,आणि “शुक्रतारा मंदवारा”ही काही सुप्रसिद्ध गाणी.

बीबीसी लंडनमधील स्टुडीयोत अगदी बोटावर मोजता येतील इतकीच  मराठी गाणी गायली गेली आहेत. त्यापैकीच ही दोन गीतं म्हणजे “शुक्रतारा मंदवारा”आणि” भातुकलीच्या खेळामधली”.

अरुणजी ब्रिटनमध्ये शुक्रताराचे कार्यक्रम करत होते. त्याकाळी विमानप्रवास आजच्या इतका सोपा आणि परवडणारा नव्हता. त्यामुळे तबल्यावर अरुणजीचे काका शामुभैया दाते, सूत्रसंचालक सुप्रसिद्ध लेखक व.पु. काळे आणि अरुणजी स्वतः असा ह्या  तिघांनीच कार्यक्रम केला. हार्मोनिअमवाल्याचा खर्च वाचावा म्हणून वपु स्वतः हार्मोनियम शिकले होते, त्यांनी साथ केली. केवळ या दोघांच्या जोडीने ब्रिटनमधील मैफिलीत अरुणजी हजारों श्रोत्यांना कसे मंत्रमुग्ध करतात हे बीबीसीच्या वार्ताहरांनी पाहिल्यावर अरुणजींना बीबीसी स्टुडीयोत आमंत्रित करून त्यांचे ध्वनीमुद्रण झाले.

अरुणजींची सगळीच भावगीतं म्हणजे अक्षरशः मंत्रमुग्ध करुन टाकणारी जणू मास्टरपीसच आहेत.” या जन्मावर या जगण्यावर”, “शुक्रतारा”, “जेव्हा तिची नी माझी” “भातुकलीच्या खेळामधली”, “स्वरगंगेच्या काठावरती”, “दिवस तुझे हे फुलायचे”, “मान वेळावुनी धुंद”, “जपून चाल पोरी जपून चाल”, “डोळे कशासाठी”, “काही बोलायाचे आहे”, “डोळ्यात सांजवेळी”, “सखी शेजारणी,”” धुके दाटलेले उदास उदास”,” भेट तुझी माझी स्मरते”, “सूर मागू तुला मी कसा”, लतादिदिंबरोबरचं संधीकाली ही आणि अशी कितीतरी उल्लेखनीय गीतं अरुणजी दाते ह्यांच नाव घेतल्याबरोबर डोळ्यासमोर येतात,आठवतात, धुंद करतात, तल्लीन करतात.

असं म्हणतात की “या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे” ह्या त्यांच्या गीताने कित्येक नैराश्याने ग्रासलेल्या वैफल्यग्रस्त लोकांना आशेचा नवीन किरण सापडून त्यांचे भविष्य अगदी जणू तिमीराकडून तेजाकडे गेले.

परत एकदा ही मंत्रमुग्ध करणारी सगळी गाणी मनात घोळवत,ह्रदयात साठवत अरुणजींना अभिवादन करते.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “वाचन माणसाला समृद्ध करते का?” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “वाचन माणसाला समृद्ध करते का?…” ☆ सौ राधिका भांडारकर

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.  एक वाचलेली पुस्तके आणि दोन, भेटलेली माणसे.

वाचन हे चांगलं व्यसन आहे.  ज्यामुळे माणसाचे मानसिक आरोग्य निरामय होऊ शकतं.  ज्या व्यक्तीला वाचनाची आवड असते त्या व्यक्तीचे  आयुष्य कधीही कंटाळवाणे  होऊ शकत नाही.  वेळ कसा घालवावा हा प्रश्न पडत नाही.  एकटेपणा जाणवत नाही.  कारण पुस्तक हा असा मित्र आहे की जो आपली संगत कधीही सोडत नाही.  आपल्या सुखदुःखात तो, त्याच आनंदी, मार्गदर्शक चेहऱ्याने,  कळत नकळत सतत आपल्या सोबत असतो. 

एका इंग्रजी लेखकाने म्हटले आहे की,

“BOOKS ARE OUR COMPANIONS… THEY ELEVATE OUR SOULS…  ENLIGHTEN OUR IDEAS… AND ENABLE US TO THE GATES OF HEAVEN”

— कल्पनाशक्ती, ज्ञान आणि शब्दसंग्रह उन्नत करण्याचं एकमेव माध्यम म्हणजे वाचन.  कारण पुस्तके ही माहिती आणि ज्ञानाचा समृद्ध स्त्रोत आहेत. 

वयानुसार आपल्या वाचनाच्या आवडीनिवडी बदलत जातात. लहानपण चांदोबा, गोट्या,फास्टर फेणे, जातक कथा, बिरबलाच्या कथा वाचण्यात रमलं. कुमार वयात, तारुण्यात, नाथ माधव, खांडेकर, फडके यांच्या स्वप्नाळू साहसी, शृंगारिक, वातावरणात आकंठ बुडालो. शांताबाई, तांबे, बालकवी, इंदिरा संत, विंदा, पाडगावकर, यांनी तर कवितेच्या प्रांगणात मनाभोवती विचारांचे, संस्कारांचे  एक सुंदर रिंगणच आखलं.  धारप, मतकरी यांच्या गूढकथांनी तर जीवनापलीकडच्या अफाट, अकल्पित वातावरणात नेऊन सोडलं. ह. ना आपटे यांच्या “पण लक्षात कोण घेतो..” या कादंबरीने तर वैचारिक दृष्टिकोनच रुंदावला. त्यांची यमी आजही डोक्यातून जात नाही. श्रीमान योगी, ययाती, छावा, शिकस्त, पानीपत या कादंबऱ्यांनी इतिहासातला विचार  शिकवला.  आणि पु.लं. बद्दल तर काय बोलावं?  त्या कोट्याधीशाने तर आमच्या मरगळलेल्या जीवनात हास्याची अनंत कारंजी उसळवली.  जीवन कसं जगावं  हे शिकवलं. विसंगतीतून विनोदाची जाण दिली.  व्यक्ती आणि वल्लीच्या माध्यमातून त्यांनी माणसं वाचायला शिकवलं.  लक्ष्मीबाई टिळकांची स्मृती चित्रे …कितीही वेळा वाचा प्रत्येक वेळी निराळा संस्कार घडवतात…..   ही यादी अफाट आहे, न संपणारी आहे. यात अनेक आवडते परदेशी लेखकही आहेत.  साॅमरसेट माॅम,अँटन चेकाव, हँन्स अँडरसन, बर्नाड शाॅ, पर्ल बक,डॅफ्ने डी माॉरीअर,जेफ्री आर्चर,रॉबीन कुक.. असे कितीतरी.  ही सारी मंडळी मनाच्या गाभाऱ्यात चीरतरुण आहेत कारण त्यांच्या लेखनाने आपली वाचन संस्कृती, अभिरुची, अभिव्यक्ती तर विस्तारलीच,  पण जगण्याला एक सकारात्मक दिशा मिळाली. त्यांनी  आशावादही दिला, एक प्रेरणा दिली.  

वाचनाने  आमचे जीवन समृद्ध केले, निरोगी केले, आनंदी केले., कसे?  हे बघा असे.

विंदा म्हणतात,

“वेड्या पिशा ढगाकडून 

वेडे पिसे आकार घ्यावे

रक्तामधल्या प्रश्नांसाठी

पृथ्वीकडून होकार घ्यावे…”

कुसुमाग्रज म्हणतात,

” मोडून पडला संसार 

तरी मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेवून 

फक्त लढ म्हणा…”

शेक्सपियर म्हणतात,

“प्रेम सर्वांवर करा, विश्वास थोड्यांवर ठेवा, पण द्वेष मात्र कोणाचाच करू नका.”

 किंवा,

“सुंदर फुले हळुवारपणे उमलत असतात, तर गवत झपाट्याने उगवते.” 

साने गुरुजींनी सांगितले,

“खरा तो एकची धर्म… जगाला प्रेम अर्पावे..”

हे सारंच विचारांचं  धन आहे.  अनमोल आहे ! अनंत, अफाट आहे आणि हे असं धन आहे की, जगण्याच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही स्वतःसाठी वापरा, दुसऱ्यांना द्या..  ते कमी होत नाही. वैचारिक धनासाठी डेबिट हे प्रमाणच नाही. ते सदैव तुमच्या क्रेडिट बॅलन्समध्येच राहतं. आणि फक्त आणि फक्त ते वाचनातूनच उपलब्ध असतं . म्हणूनच म्हणतात “वाचाल तर वाचाल”

वाचनाचे अनेक प्रकार असू शकतात. अध्यात्मिक ग्रंथ वाचन, चरित्रात्मक वाचन, कविता, ललित, कथा, कादंबरी,  रहस्यमय ,गूढ,  भयकारी, साहसी,  अद्भुत,  शृंगारिक, विनोदी,  नाट्य,  लोकवाङमय, प्रवास, संगीत, अगदी पाकशास्त्र सुद्धा.  अशा अनेक साहित्याच्या शाखा आहेत. आता तर डिजिटल वाङमयही  भरपूर आहे.  ज्याने त्याने आपल्या बुद्धीच्या कुवतीनुसार, आवडीनुसार स्वभावानुसार, वाचावे. पण वाचावे.नित्य वाचावे. 

वाचन हे माणसाला नक्कीच घडवतं.  प्रेरणा देतं. कल्पक, सावध ,जागरुक बनवतं. केसरी आणि मराठा वाचून अनेक क्रांतीकारी  निर्माण झाले. सावरकरांच्या कविता वाचताना आजही राष्ट्रभावना धारदार बनते.  

वाचन आणि कुठलीही आवड अथवा छंद याचं एक अदृश्य नातं आहे.  जसं आपण एखादं झाड वाढावं म्हणून खत घालतो आणि मग ते झाड बहरतं. तसेच वाचनाच्या खाद्याने आवडही बहरते. ती अधिक फुलते.  चारी अंगानी ती समृद्ध होत जाते. आवडीला आणि पर्यायाने व्यक्तीमत्वाला आकार येतो. 

मात्र जशा नाण्याला दोन बाजू असतात तशाच वाचनालाही आहेत. संगत  माणसाला घडवते नाही तर बिघडवते. वाचनातून अशी काही धोक्याची वळणं जीवनाला विळखा घालू शकतात.  पण हे व्यक्तीसापेक्ष  आहे.  ज्याचे त्याने  ठरवावे काय वाचावे. या नीरक्षीरतेची रेषा जर वाचकाला ओलांडता आली तर मात्र तो स्वतःची आणि इतरांची जीवनसमृद्धी घडवू शकतो.

कित्येक वेळा जाहिराती, रस्त्यावरच्या पाट्या, भिंतीवर लिहिलेले सुविचार, पानटपरीवरचे लेखन, ट्रकवर लिहिलेली वाक्येही तुम्हाला काहीबाही शिकवतातच. आणि वाचनाची आवड असणारा हे सारं सहजपणे वाचत असतो.आणि या विखुरलेल्या ज्ञानाची फुलेही परडीत गोळा करतो.

मला वयाची पंचाहत्तरी ओलांडली तरी बालवाङमय वाचायला आवडते.  मी आजही  परीकथेत रमते. रापुन्झेल, सिंड्रेला, हिमगौरी मला मैत्रिणी वाटतात. हळूच विचार डोकावतो, माझ्यासारख्या त्या मात्र वृद्ध होणार नाहीत. त्यापेक्षा त्या आहेत म्हणून माझेही शैशव अबाधित आहे. आजही मी बोधकथेत  गुंतते.

भाकरी का करपली?

घोडा का अडला?

चाक का गंजले?— या प्रश्नांना  बिरबलाने एकच उत्तर दिले  ” न फिरविल्याने “. 

हे वैचारिक चातुर्य बालसाहित्य वाचनातून मला आजही मिळतं. 

“तुपात पडली माशी चांदोबा राहिला उपाशी ” ..  या ओळीतला गोडवा माझ्या कष्टी मनाला आजही हसवतो.

बालवयात वाचलेल्या अनेक कविता नवे आशय घेऊन आता उतरतात. आणि पुन्हा पुन्हा मनाला घडवतात.

वाचनाचा हा  प्रवास न संपणारा आहे.  शेवटचा श्वास हेच त्याचे अंतिम स्थानक असणार आहे. बाकी सगळं तुम्ही ठेवून जाणार आहात इथेच.  कारण ते भौतिक आहे. पण वाचन हे आधिभौतिक आहे. पारलौकिक आहे.  हे धन, ही समृद्धी, हे विचारांचे माणिक–मोती,  तुमच्या बरोबर येणार, कारण ते तुमच्या आत्म्याचा भाग आहेत …

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares