मराठी साहित्य – विविधा ☆ मनाला दार असते तर….!! ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?विविधा ?

☆ मनाला दार असते तर….!!☆ सौ राधिका भांडारकर ☆

—मनाला दार असते तर….!!

किती सुंदर कल्पना!!

मनाला दार असते तर…

खरं म्हणजे आपण जाणीवेत नेणीवेत सतत मनाबरोबरच असतो की ..क्षणोक्षणी आपण काही ना काही मनात कोंबतच असतो.आणि आयुष्याच्या इतक्या वर्षात कितीतरी मनाच्या आत साठलेलं असणार..ते डोकावून बघायचं ठरवलं तर मनाला दार हवच. जे हवं तेव्हां उघडता येईल आणि हवे तेव्हां कुलुप लावुन बंदही करता येईल….

मनाचे दार उघडेन अन् पाहीन त्यातला पसारा..

इतक्या वर्षाची अडगळ साठली असणार तिथे..

दार उघडुन जेव्हां मी मनात शिरेन ना तेव्हां मनाचे सगळे कप्पे उघडतील.. त्या कप्याकप्प्यात साठलं गेलेलं कितीतरी पाहता येईल…

काहीमधे असतील फुलपांखरं..नाचणारी बागडणारी फुलाफुलातला मध गोळा करणारी .ती ठेवेन जपुन..

पण काही कप्प्यांत खूपच कचरा असेल..वेदना दु:खं वियोग नकार फसवणुक अपमान विश्वासघात पराभव अपयश… निंदा भांडणं ..नको .नकोच ते बघायला.सगळं उपसायला हवं. कशाला बाळगायचं..?मनाचा हा खण साफ करेन.

सगळं फेकुन देईन. कल्पनेतही किती मोकळं स्वच्छ वाटायला लागल,..!!

काही मनाचे खण मात्र हुरहुर लावणारे असतील..

त्यात अनेक तुटलेली दुरावलेली रेंगाळत राहणारी किंवा नव्याने झालेली नाती असतील…

एकेक नातं उघडुन बघेन..काही अगदीच त्रास देणारी काढुनच टाकेन .ऊगीच मनावर ओझं नको.

पण काहीसांठी घेईन प्रेमाचा धागा,मैत्रीची सुई अन् घालीन टाके छान जोडण्यासाठी.. आणि ठेवेन नीटनेटकी रचून.. नव्या नात्यांना मुरायला थोडा वेळ हवा म्हणून ती राहू देईन.

तरिही मनाचं कपाट भरलेलच असणार. काही कप्पे विनोदाने हास्याने ओसंडत असतील. प्रेम वात्स्यल कौतुक असं छान छान दिसेल. मनाचं दार उघडलं ना की मी प्रथम हेच डोळेभरुन पाहुन घेईन. ताजतवानं शुद्ध वाटेल… पण तिथे रिकामे कोनाडेही असतील ना?

ईथून पुढे त्यांची मात्र काळजी घेईन. सदा स्वच्छ ठेवेन.

नसता कचरा होउच देणार नाही…

असा विचार करत असताना ,मनाला दार असते तर याची कल्पना करत असताना चटकन् ध्यानात आले, अरे! मनाला दार असतेच की..ते उघडण्याची किल्ली सुद्धा आहे आपल्याकडे.. पण आपणच कधी मनाचे दार ऊघडण्याची, त्यात डोकावण्याची तसदीच घेत नाही..

हवं तेव्हां दार उघडु शकतो .नको तेव्हां कुलुपही घालु शकतो..

इतकच काय आपण इतरांच्या मनाचीही दारं ऊघडु शकलो तर….?

तिथेही एखादा फेरफटका मारता आला तर….

कोणजाणे.. दोन प्याले ठेऊ जवळ..

एक सुखाचा,

एक दु:खाचा.

धन्यवाद!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दफन एका गाडीचे ☆ संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ दफन..एका गाडीचे ☆ संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

दफन..एका गाडीचे

                    ?

श्रीमंत माणूस, ज्याने आपल्या बेंटले गाडीचे दफन केले….

ब्राझील मधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, अतिशय सामर्थ्यशाली व्यक्ती “चिकुन्हो स्कारपा” यांनी एक दिवस एक अजब घोषणा केली की ते त्यांच्या लाखो डॉलर्सच्या बेंटले कारचे दफन करणार आहेत. स्कारपा यांनी मृत्यूनंतर पण ऐषोआरामाचा आनंद घेता यावा म्हणून बेंटले गाडीचं दफन करायला घेतलं याचं तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.

साहजिक त्यांच्या या घोषणेला चांगलंच  मीडिया कव्हरेज मिळालं. त्यांच्या या वेडेपणाबद्दल अनेकांनी त्यांना मूर्खांत काढलं, टीका केली. या माणसाला वेड लागलंय,अतिश्रीमंतांचे चोचले आहेत, एवढ्या महागड्या गोष्टीचा असा विनाश का करत आहेत?, त्यापेक्षा दान देऊन टाका, गरिबांना मदत करा, हा माणूस नक्की कोणत्या जमान्यात वावरतोय अशा अनेक सूचना, नकारात्मक प्रतिक्रिया ब्राझीलच्या जनतेकडून येत होत्या.

अखेरीस कारचं दफन करण्याचा  दिवस उजाडला. मोठा खड्डा खणण्यात आला. अनेक पत्रकार याचं live coverage करत होते.

कार दफन करण्याची वेळ आली तेव्हा स्कारपा म्हणाले की “मी एवढी मौल्यवान गोष्ट वाया घालवतो आहे म्हणून माझ्यावर केवढी टीका झाली. पण लोकांना हे लक्षात येत नाही की या मिलियन डॉलर कार पेक्षाही मौल्यवान गोष्टी लोक दफन करत आहेत. लोक त्यांचे डोळे, किडनी, हृदय, फुफ्फुसे असे कितीतरी सुदृढ अवयव मृत्यूनंतर दफन करतात.

हा शुद्ध मूर्खपणा आहे. हजारो लोक ट्रान्सप्लांट साठी अवयव मिळण्याची वाट बघत आहेत. अशा लोकांना नवीन जीवन देण्यासाठी अवयवदान करण्यापेक्षा आपण त्यांचे दफन करत आहोत.

मला कार दफन करायची नाही आहे, पण अवयव दानासंबंधी जागृती निर्माण व्हावी म्हणून मी हे नाटक रचलं.”

मित्रानो, डोळ्यात अंजन घालणारी ही गोष्ट आहे. कधी आपण याचा साधा विचार पण करत नाही. मात्र काही लोकांना जीवनदान देण्याची क्षमता असताना केवळ अज्ञान आणि दुर्लक्ष यामुळे आपण या पुण्यकर्माला मुकत आहोत.

धन्यवाद,

⚡⚡⚡

संग्राहक –  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “….आणि स्वर पोरके झाले.” ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆

डाॅ.व्यंकटेश जंबगी

?  विविधा ?

☆ ….आणि स्वर पोरके झाले.” ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆

“….आणि स्वर पोरके झाले.”

लतादीदी कधी परक्या वाटल्याच नाहीत… आपलीच लता मंगेशकर… खूप आदर, पण त्याहीपेक्षा आपुलकी जास्त, प्रेम उदंड…देवाला आपण “अहो” म्हणतो का ? हा गणपती, हा मारूती, ही महालक्ष्मी,ही सरस्वती….तशी ही आपली लता !..”मंगल प्रभात” पासून “आपली आवड” पर्यंत.”आपहीके गीत” पासून “बिनाका गीतमाला”, विविध भारतीच्या विविध कार्यक्रमात दिदींचं गाणं नाही असं झालंच नाही.

सर्व बारा स्वर (७+५), दिदीच्या कंठात येण्यास उत्सुक असायचे..ताल दिदीच्या स्वरांना साथ द्यायला आतुर असायचे….

शब्द कोणत्याही गीतकाराचे असो.. गदिमा,जगदीश खेबुडकर, आनंद बक्षी, साहिर लुधियानवी, संतोष आनंद, शकील बदायुनी इ.इ. असे अनेक गीतकार,त्यांच्या शब्दांना न्याय देण्याचं दिदींचं कसब अद्भुत होतं… गाण्यांचा पहिला आलाप जणू गाण्यातील स्वरांना आणि शब्दांना हळुवारपणे सतर्क करायचा..मग स्वरांनी मढविलेले सर्व शब्द एकामागून एक शिस्तीत यायचे… प्रत्येक क्षणाला कोणत्या ना कोणत्या रेडिओ स्टेशनवर दिदींचं गाणं चालू असायचं….

सैगल पासून शैलेंद्रसिंग पर्यंत आमच्या पिढीने दिदींबरोबर द्वंद गीत ऐकली आहेत…. नव्या गायकांना दिदींनी उत्तेजन दिले आहे… लक्ष्मीकांत प्यारेलाल या संगीतकाराची प्रतिभा ओळखून दिदींनी त्यांना उत्तेजन दिले.. आणि त्यांच्या रूपाने एक “मोस्ट मेलडियस” संगीतकार चित्रपट सृष्टीला मिळाला. दिदींची सर्वात जास्त चित्रपटगीते या जोडगोळी बरोबर आहेत.शंकर जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, नौशाद,कल्याणजीआनंदजी,रवि,दत्ताडावजेकर, सी.रामचंद्र, रोशन, एस्.डी., आर्.डी.बर्मन, राम कदम

अशा अनेक संगीतकारांची दिदींच्या आवाजातील गाणी आमच्या पिढीने ऐकली.दिदींचं गाणं ऐकलं की ते आवडतच व्हायचं….मी गाणी ऐकायला लागल्यापासून दिदींचा अनेकांप्रमाणे चाहता आहे.. एक छान आठवण.. आळंदीच्या आ.भा. साहित्य संमेलनला मी निमंत्रित कवी होतो.तेथे सुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके संमेलनाध्यक्ष होत्या त्यांची माझी तोंडओळख होती.शांताबाईसोबत दिदी आल्या होत्या.संधी मिळाल्याबरोबर मी शांताबाईना आणि दिदीना भेटलो.वाकून नमस्कार केला….एक शब्दप्रभू, एक स्वरलता…. तो आयुष्यातील अत्युच्च क्षण !

आक्टोबर १९८१ ला मला दिदींचे स्वतःच्या लेटरहेड वर स्वहस्ताक्षरात पत्र आले आहे.

उद्या त्याचा फोटो पोस्ट करीत आहे.आता मी नि:शब्द झालोय.

गीतकारांच्या लेखण्या अश्रू ढाळताहेत..स्वर पोरके झाले आहेत…वाद्ये मूक झाली आहेत.

“लता”हा शब्द उलटा वाचला तरी “ताल” होतो, ते ताल “बेताल” होऊ लागलेत.. किशोरदांनी एकदा दिदींना विचारले ,”मेरा कौनसा गाना आपको सबसे अच्छा लगा ? “दिदींनी विचारले, “बोलके सुनाऊं या गा कर ?” किशोरदा बोलले “गा कर”दिदींनी आपल्या वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट म्हणून किशोदांना एक कैसेट दिली.त्यात दादींचं किशोरदांनी गायलेलं आवडतं गीत होतं..”ये जीवन है,इस जीवनका” एल्.पींचं..”पिया का घर”मधलं.. एकांतात किशोरदां हे गाणं अनेकदा ऐकत होते.

शेवटी मला वाटतं देवलोकात गंधर्वांना आणखी संगीत शिकायचय्, भगवान विष्णूंना आपला आवडता राग “हिंडोल”

दिदींकडूनच ऐकायचा आहे, श्री महादेवांना मालकंस ऐकायचाय आणि ब्रम्हदेव-सरस्वतीना वीणेची साथ करायची म्हणून त्यांनी दिदींना वर बोलावून घेतलय्.

दिदी, तुम्ही आम्हाला वचन दिलंय “रहे ना रहे हम महका करेंगे,बनके कली बनके समा बावजे वफामें..”दिदी, तुम्हाला आमच्यापासून कोणी दूर घेऊन जाऊ शकत नाही.

तुमच्या स्मृतिला वंदन !

 

© डॉ. व्यंकटेश जंबगी

एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४
मो ९९७५६००८८७

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गान कोकिळा मूक झाली.. ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?विविधा ?

☆ गान कोकिळा मूक झाली.. ☆ सौ राधिका भांडारकर ☆

वसंत ऋतु कोकीळेचा सूर घेउन दिमाखात येतो..

पण हा वसंत कसा फुलेल सूराविना…

लताच्या निधनाने मन नि:शब्द ..स्तब्ध झाले…

सत्यं शिवं सुंदरम् !!

मृत्यु हेही एक सत्यच…आणि लताच्या असंख्य चाहत्यांनी ते कसे पचवावे…?

मनावर गारुड घालणारा, मंत्रमुग्ध करणारा तो दैवी सूर हरपला असे तरी कसे म्हणणार..

तो अमर आहे..तो रसिकांच्या मनात सतत रुंजी घालत राहणार…

एक युग संपलं..

एकच सूर्य ,एकच चंद्र एकच लता हेच सत्य…

भारत रत्न लता..

गानसम्राज्ञी लता..

संगीतसृष्टीतला मुकुट लता..

शान भारताची..

आवाज भारताचा..

सदा बहार ..सदा तरुण..

ॐ नैनं छिन्दन्ती शस्त्राणि।

नैनं दहति पावक:।

न चैनं क्लेदयन्त्यापो।

न शोषयति मारुत:।।

लतादीदींचा सूर असाच अमर आहे…

शतकातून असा एखादाच कलाकार जन्माला येतो..

माणूस म्हणून त्यांचं व्यक्तीमत्व भारावून टाकणारं होतं..

१९२९ ते २०२२ हा त्यांचा जीवनकाल..

जवळजवळ सहा दशके त्यांनी त्यांच्या सूरांनी

राज्य केले..अनेक पिढ्यांना आनंद दिला..

त्या सूराला कुठला मजहब नव्हता.धर्म नव्हता.

वंश वर्ण जात नव्हती …तो फक्त इश्वराचा सूर होता…

त्यांनी चित्रपट विश्वातील स्थित्यंतरे पाहिली.

पण चित्रपटाच्या पल्याड ,भारताच्या विकासासाठी त्या सदोदित आग्रही असत. विकसित आणि सक्षम भारत हे त्यांचं स्वप्नं होतं…

२८ सप्टेंबर १९२९ हा त्यांचा जन्मदिन.

मास्टर दीनानाथ मंगेशकर या महान नाट्य गीत गायकाची ज्येष्ठ कन्या..

कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेलात…

हा कल्पवृक्ष खरोखरच लतादीदींच्या गाण्याने बहरला ..फुलला..विस्तारला…

३६ हून अधिक भाषांमधून त्या गायल्या..

अनेक रस रंग अभिनयाची गाणी त्यांच्या कंठातून रुणझुणली… त्यांच्या गायनातून शब्द भाव अक्षरश: ऊर्जीत होत…

अनिल विश्वास, शंकर जयकिशन, एस डी बर्मन सलील चौधरी, सी रामचंद्र ए आर रहेमान, सुधीर फडके..

अशा अनेक संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले… तीस हजाराहून अधिक गाणी त्यांनी गायली..

आनंदघन या माध्यमातून त्यांनी संगीत दिग्दर्शनही केले.साधी माणसं या मराठी चित्रपटातली त्यांची गाणी अत्यंत गाजली.आजही अगदी आजची संगीतप्रेमी मुलं त्यांची गाणी

अभ्यासून गातात..

पार्श्वगायिका ही त्यांची जागतिक ओळख असली तरी त्यांनी १९४२ साली एका चित्रपटात लहानशी भूमिकाही केली होती..

लता मंगेशकर म्हणजे सात लखलखती अक्षरे.

या सप्त सूरांची जादू किती खोलवर रुजलेली आहे..

प्रेमस्वरुप आई.. हे माधव ज्युलीअनचं गीत लताने भावभावनांसहित मूर्तीमंत ऊभे केले आहे..त्यातील शेवटच्या ओळी ,घे जन्म तू फिरोनी येईन मी पोटी..या शब्दातली हताशता व्याकुळता त्यांच्या गाण्यातून तितक्याच तीव्रतेने जाणवते..शब्दोच्चार, त्यातला लगाव यातलं विलक्षण मिश्रण त्यांच्या गाण्यात जाणवतं.

त्यामुळेच त्यांच्या गाण्याशी, आवाजाशी कुणाची तुलनाच होऊ शकत नाही…

जरासी आहट होती है

तो दिल सोचता है

कही ये वो तो नही

कही ये वो तो नही…

कारुण्याने आणि भावनाने ओथंबलेले हे लतादीदींचे सूर जेव्हांजेव्हां कानावर पडतात तेव्हा तेव्हा देहावर कंपने जाणवतात…

लता एक महासागर आहे…असंख्य स्वर मोत्यांचा..वेचता किती वेचावा..

आताही ऐकू येते..

आता विसाव्याचे क्षण

माझे सोनियाचे मणी

सुखे ओवीत ओवीत

त्याची ओढतो स्मरणी

मणी ओढता ओढता

होती त्याचीच आसवे

दूर असाल तिथे हो

नांदतो मी तुम्हासवे….

सर्वांची दीदी..संगीतक्षेत्राची वात्सल्यसिंधु आई..

गानसम्राज्ञी..क्वीन आॅफ मेलडी .आणि एक समाजाभिमुख व्यक्तीमत्व..अनंतात विलीन झाली..एका स्वरयुगाची समाप्ती झाली..

शब्दातीत कालातीत आहे सारंच…

प्र के अत्रे यांच्याच शब्दात  “लताच्या कंठातील कोमलतेला साजेसं अभिवादन करायचं तर,त्यासाठी प्रभात काळची कोवळी सूर्यकिरणे,दवबिंदुत भिजवून केलेल्या शाईनं,कमलतंतूंच्या लेखणीने आणि वायुलहरीच्या हलक्या हाताने,फुलपाखराच्या पंखावर लिहिलेलं मानपत्र,गुलाबकळीच्या करंड्यातून तिलाअर्पण करायला हवं…”

या पंचमाला भावपूर्ण अल्वीदा….

लतादीदी तुमच्याच स्वर गंगेच्या किनार्‍यावरुन तुम्हाला ही मानवंदना….!!

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनाला दाह देणारे दृश्य… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

?विविधा ?

☆ मनाला दाह देणारे दृश्य ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

मी आज सकाळी सायकलींगला बाहेर पडले होते. काही अंतर गेल्यावर मी जे दृश्य पाहिल त्यांनी माझ्या मनाला असंख्य वेदना झाल्या, डोळ्यातून नकळत पाणी वाहू लागले. शब्दांच्या पलीकडले असंख्य यातना देणारे दृश्य होते ते.

एक आई आपल्या काही महिन्यांच्या तान्हुल्याला कडेवर घेऊन तर काही वर्षांच्या आपल्या दोन लेकरां सह कचराकुंडीत काही अन्न मिळतंय का ते पहात होती. पदराच्या झोळीत आपल्या पिल्लाला ठेऊन जे भुकेच्या आकांताने रडत होतं, ती माता खूप आशेने सगळा कचरा, सगळ्या पिशव्या फाडून काही मिळतय का डोकावत होती. अनेक माश्या भिरभिरत होत्या, दुर्गंधी सुटली होती पण मुलांच्या पोटात भुकेने पडलेल्या आगी मुळे तीला हे काही दिसत नव्हते, जाणवत नव्हते. तीला हवं होतं फक्त काही अन्न.

हे कमी की काय म्हणून काही कुत्री तिला अडथळा निर्माण करत होती. मूलं भेदरलेल्या नजरेने एकदा आई कडे आणि एकदा कुत्र्या कडे बघत होती. एकच पिशवी दोघांना हवी होती. त्यांना हकलत, ती जिवापाड शोधत होती काही अन्नाचे घास जे आपल्या मुलांचे पोट भरू शकतील.

खूप प्रयत्न केल्या नंतर तिला एक भाकरी चा तुकडा आणि भात मिळाला. भाकरी कसली ती पूर्ण वाळून गेली होती. पण त्या माऊलीच्या चेहर्‍यावर ही भाकरी पाहून सुद्धा असं काही समाधान दिसले जणू पुरणपोळीच सापडली आहे.

ती ते घेऊन जरा बाजूला बसली दोन मोठ्या मुलांना भाकरीचे दोन भाग करून दिले, तर सगळ्यात छोट्या मुलाला भात भरवू लागली. ती भाकरी काही केल्या त्या मुलांना तोडता येईना. कुत्र्यांनी तोंडात हाड धरून चघळत रहावं तसं काहीसं त्यांच झालं होतं. गरिबी काय काय शिकवते सांगू, त्या मुलांनी तिथे जवळच असलेल्या पाण्याच्या नळावर जाऊन ती भाकरी चक्क ओली केली आणि खाल्ली. उरलेले पोट पाण्यानी भरले आणि हसतं हसतं आई कडे निघून गेली.

हे दृश्य पाहून मी जागेवरच थिजले होते. मनाला असंख्य यातना होत होत्या, अनेक प्रश्न मनाला भेडसावत होते. डोळ्यातून पाणी वाहतं होते आणि त्या ही पेक्षा जास्त राग येत होता अश्या अनेक बडय़ा लोकांचा जे अन्न फक्त स्वतः ची श्रीमंती दाखविण्या साठी वाया घालवतात. पर्वाची माझ्या मैत्रिणींनी दिलेली बर्थडे पार्टी चटकन माझ्या डोळ्यासमोरून गेली. काय तो सोहळा होता. अनेक खाद्यपदार्थ होते. सगळ्याची चव घेऊन बघणंही शक्य नव्हतं. बर्थडे पार्टी च्या नावाखाली केक शरीराला फासत होते. मनात आले हाच केक ह्या बाईला मिळाला असता तर… माझी आणखीन एक मैत्रिण आहे तिला मी अर्धा कप चहा दिला तर ती त्यातला पण अर्धा वगळते. अस का हे मला आज पर्यंत समजलं नाही.

काही घरांमधे तर खूप अन्न शिजवले जाते आणि दुसरे दिवशी ते फेकले जाते. काही घरात शिळे अन्न खायचेच नाही असा जणू नियम असतो, त्यामुळे ते सर्रास कोणताही विचार न करता कचरा कुंडीत फेकले जाते. हे बरोबर आहे की शिळे अन्न खाऊ नये पण मग करतानाच मोजके करावे आणि उरलेच तर गरम करून खावे. आणि अगदीच जमत नसेल तर कोणत्या तरी गरजूच्या मुखात पडेल असे तरी पहावे. काही घरांत माणसं चार आणि ब्रेकफास्ट ला जिन्नस सहा असतात. प्रत्येक व्यक्तींची आवड निवड जपण्यासाठी अनेक पदार्थ बनवले जातात आणि शेवटी ते फुकट जातात.

आज हे दृश्य पाहिल्यानंतर मी सगळ्यांना कळकळीची हात जोडून विनंती करते की कृपा करून अन्न टाकू नका, वाया घालवू नका. गरजे पुरतेच शिजवा. असे किती तरी लोकं आहेत ज्यांना अन्न मिळत नाही काही कारणाने अन्न शिल्लक राहिले तर ते कचरा कुंडीत न टाकता गरजू व्यक्तींना द्या. जरा डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघा असे अनेक जण आहेत ज्यांना ह्याची गरज आहे.

अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, अन्न दान हे सर्व श्रेष्ठ दान आहे. लोकं आपला बडेजाव दाखविण्या साठी जंगी पार्ट्या देतात ज्यात सत्राशे साठ जिन्नस बनवले जातात. आणि त्यातले निम्मे अधिक वाया जातात. हा स्टेटस सिम्बॉल दाखविण्याचा अट्टाहास कश्यासाठी ?? त्या पेक्षा रोज नेमाने काही गरजूंना अन्न दान करा. त्यांच्या पोटातल्या धगधगत्या अग्नीला शांत करा. नकळत तृप्त झालेलं मन आणि भरलेले पोट तुम्हाला लाख आशीर्वाद देऊन जातील. आणि हाच असेल तुमचा खरा स्टेटस सिम्बॉल .

आज मी तुम्हाला हातं जोडून विनंती करते शक्य असेल तेवढे अन्न दान करा. अन्न वाया घालवू नका.

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक सोंगटी गेली तरी…. ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ एक सोंगटी गेली तरी…. ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे 

अलीकडे एक पोस्ट वाचली. एकट्या राहणाऱ्या चिनी आजी बाईंनी नर्सिंग होम मध्ये कायम राहायला जाण्यापूर्वी लिहिलेली. तिने आता आपल्या आयुष्याच्या कटू सत्याचा स्वीकार केला आहे. आपली मुले त्यांच्या आयुष्यात गर्क आहेत आणि त्यांच्यावर त्यांची मुलं मोठी करण्याची जबाबदारी असल्यामुळे आपल्या आईची काळजी घ्यायला ते असमर्थ आहेत हे पटल्यावर तिने आपले उरलेले आयुष्य जगण्यासाठी सर्व सोयींनी युक्त अशा नर्सिंग होम मध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. तिथं जाऊन राहणं महाग आहे म्हणून तिला स्वतःचे राहते घर विकावे लागणार आहे आणि ते तिच्या मुलांना मान्य आहे.

नर्सिंग होम मध्ये तिच्यासाठी एक छोटी खोली असणार आहे त्यात पलंग, एक छोटे कपाट टेबल फ्रिज मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन वस्तू असणार आहेत.

तिच्या आयुष्यभराचा संसार कपडे, हौसेने घेतलेले फर्निचर, स्वयंपाकाची भांडी, आवडीच्या वस्तू, घेतलेली पुस्तके यामधून फक्त कपाटात मावेल एवढेच ती बरोबर नेऊ शकणार आहे उरलेल्या सामानाचे काय करायचे हा तिच्यापुढे प्रश्न आहे.

तिच्याकडे या सर्व वस्तू विकून टाकण्यासाठी वेळ आहे ना शक्ती आहे… महागड्या वस्तू द्यायचा तर कोणाला देणार? तिच्या मुलांना, नातेवाईकांना कोणाला त्यातले काहीच नको आहे.

नर्सिंग होम मध्ये जाताना फक्त जरूरीपुरते कपडे भांडी स्वत:च्या महत्वाच्या वस्तू म्हणजे ओळख पत्र, हेल्थ इन्शुरन्स कार्ड, बँकेचे कार्ड, जेष्ठ नागरिक कार्ड एवढेच नेणे गरजेचे आहे. आता तिला जाणवते की आयुष्यभर खूप प्रसिद्धी, मानपान, यश, बंगले, बक्षिसे मिळवली पण आयुष्याच्या शेवटच्या दिवसासाठी तुम्हाला राहायला एक खोली आणि झोपायला बिछाना एवढेच लागते.आणि  जगातून जाताना अक्षरश: रिकाम्या हाताने जावे लागणार आहे. ही पोस्ट वाचली आणि क्षणभर काहीच सुचेना, घशाशी आवंढा दाटून आला. सगळ्या गोष्टी बद्दल अनासक्ती वाटू लागली. सगळं फोल वाटू लागले. पन्नास वर्षे गोळा केलेला संसार डोळ्या पुढे आला. गेल्या पन्नास वर्षात खूप सामान गोळा झाले आहे. मुली लग्न होऊन गेल्या, त्या त्यांच्या वस्तू, कपडे घेऊन गेल्या तरी घरातली कपाटे भरलेली होती.

आता मी एकटी उरले आहे मागे. ना दुकानात जाण्याची इच्छा ना नवीन खरेदीची आवड तरीपण कपाट रिकामी पडलेली नाहीत.

ही पोस्ट वाचली तेव्हा घरातला पसारा डोळ्यापुढे आला. माझ्या मुली आपल्या देशात असत्या तर प्रश्न नव्हता. दहा फेऱ्या मारून त्यांनी घर आवरले असतं पण दोघी परदेशात. मी गेल्यावर एकदा येतील, नंतर त्या येणार कोणासाठी? आल्या एखाद्या खेपेस तर  काय काय करतील? सगळं भंगारवाल्याला देऊन टाकतील कदाचित. पणआईची आठवण म्हणून काय घेऊन जातील,.? मला एकदम सासुबाई गेल्या तेव्हाची आठवण झाली. खूपवर्ष झाली त्यांना जाऊन. त्या गेल्या तेव्हा मी त्यांचा चष्मा आठवण म्हणून घेतला होता व तो आता कुठे गेला आठवत नाही. अगदी आई अण्णांच्या कितीतरी वस्तू मी जपल्या आहेत..? अण्णांचीएक वही ठेवली होती जपून. पण ती सुद्धा हवी तेव्हा सापडणार नाही बहुतेक.

मग माझ्या मुली काय नाही तर आईची आठवण म्हणून फारतर एखादी साडी घेऊन जातील बरोबर आणि ती कपड्यांच्या ढिगात तळाशी जपून ठेवतील. आठवण होईल तेव्हा बाहेर काढतील, तीच्या वरून हात फिरवतील आणि बघता बघता आपल्या संसारात गुंतून जातील.आई वडिलांची आठवण येणार नाही असं नाही पण आठवण मनातल्या मनात असेल. हळू हळू साडी घडीतच जीर्ण होऊन जाईल.

पाणी नेहमी पुढे पुढेच वहात जाते ना..? वाहताना खूप गोष्टी, आयुष्याच्या वळणावळणाच्या प्रवाहात कुठल्यातरी तीरावर मागे सुटून जातात आणि शेवटी काही आंबटगोड चवी शिल्लक राहतात.

आपल्याला कदाचित आपले शेवटचे दिवस वृद्धाश्रमात किंवा नर्सिंग होम मध्ये नाही घालवावे लागणार पण आपल्याला शेवटच्या प्रवासाला जाताना सर्व धनदौलत, घरदार, जपलेल्या वस्तू, नातीगोती, राग रुसवा, माया ,मोह सर्व इथेच सोडून जायचं आहे. आपली मुलं नातवंड प्रियजन त्यांच्यात अडकलेला जीव हे शरीर सोडून बाहेर पडेल तेव्हा आपण सर्वापासून दूर वेगळ्या जगात जाणार आहोत आणि थोड्या काळानंतर सर्व जण आपल्याला विसरून जीवनात नव्याने रमुन जाणार आहेत. “जन पळभर म्हणतील हाय हाय”हा जगाचा नियमच आहे.

या खेळातले खेळाडू बाद झाले की कायमसाठी आपल्या आयुष्यातून, आठवणीतून नाहीसे होतात हे त्रिकालाबाधित सत्य प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे. एक गोष्ट स्वतःला बजावत राहायच आहे

ठाउक आहे मला

न काही मज वाचुनि अडणार

एक सोंगटी बाजूस सारून

खेळ पुन्हा सरणार…!!!

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अनिल गेला… अच्युत गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

अनिल गेला… ✒️ अच्युत गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

अनिल गेला ! तशी त्याची प्रकृती काही दिवसांपासून बिघडतच चालली होती. आता तर हॉस्पिटलमधूनही त्याला घरी आणल्यापासून आंनंद नाडकर्णीकडून त्याच्या प्रकृतीविषयीची बातमीपत्रं रोज मिळत असत. पण आनंदनं परवाच एक काळीज कापत जाणारी कविता लिहिली. त्यात लिहिलं होतं –

‘डोळे मिटत जातात

त्यापेक्षाही कठीण ..

त्यांना कोरडे निर्विकार

होताना पहाणे

.

.

वाटते आपणच हळूवार

मिटून टाकावे त्यांना

आणि मोकळे करावं

त्यातल्या प्रकाशाला

अथांग यात्रेसाठी’

अनिल अर्धवट शुद्धीवर असताना त्याच्या शेजारी रात्रंदिवस बसून त्याची काळजी घेणाऱ्या आनंदनं या ओळी लिहिल्या होत्या. त्या वाचून मनात चर्र झालं. आता काय घडणार आहे याची चाहूल सगळ्यांना लागलीच होती. मी न राहून आनंदला फोन लावला. ‘अनिल क्वचित माणसं ओळखतोय, पण काहीच चेतना नाही; क्वचित तोंडानं अन्न घेतोय, एकदम काहीतरी बोलतोय, पण ऑक्सिजन लेव्हल खाली जातेय; तो फारसं रिस्पॉन्ड करत नाहीये ….’ आनंद बोलत होता आणि मी ऐकतच राहिलो. त्यावेळी आमच्या मैत्रीचा बोलपट माझ्या डोळ्यासमोर उलगडायला लागला.

१९७० च्या आसपासचं कुठलंतरी वर्ष असावं. त्यावेळी मी ‘मागोवा’ नावाच्या एका गटात सामील झालो होतो. एका बाजूला विवेकवाद, विज्ञानवाद आणि मानवतावाद याचबरोबर समाजवाद आणि मार्क्सवाद या सगळ्याच विचारांनी मी भारावून गेलो होतो. अनिल त्यावेळी ‘युक्रांद’ नावाच्या संस्थेत कार्यरत होता. कुमार सप्तर्षी आणि अनिल अवचट हे युक्रांदचे खंदे वीर होते. आनंद करंदीकर आणि इतरही आमचे लढवय्ये मित्र त्यात सामील झाले होते. आमच्यात वैचारिक मतभेद असूनही आमच्यामध्ये मैत्री मात्र होती. एकदा परळला कामगारवस्तीत मी अनिलचं भाषण ऐकायला गेलो होतो. त्यावेळी तो आवेषात बोलत होता हे चांगलंच आठवतंय. अगदी काल परवा घडल्यासारखं. 

पण मग मध्ये बरीच वर्षं गेली. मी कॉम्प्युटरच्या जगात रमलो आणि सक्रीय चळवळीतून बाहेर पडलो. अनिलही कालांतरानं सक्रीय चळवळीतून बाहेर पडला होता. आनंदकडून अनिलविषयी बातम्या कळत होत्या. १५-१६ वर्षांपासून पुन्हा आमचं येणं जाणं वाढलं. त्यानं अनेक पुस्तकं लिहिली होती आणि मीही लिखाणात रमायला लागलो होतो.

अनिलनं आनंदबरोबर ‘मुक्तांगण’ हे व्यसनमुक्तीकेंद्र चालू केलं होतं. त्याचं बांधकाम चालू असताना मला एकदा तो तिथे घेऊन गेला होता. पु. लं.ना स्कूटरवर मागे बसवून त्यानं त्यांना ते कसं दाखवलं होतं, पु.लं.नी मग त्याला मदत कशी केली होती याविषयी तो मला सांगायचा.

मुक्तांगणमुळे अनिलनं आणि आनंदनं शेकडो घरांना आधार मिळवून दिला होता. एक उत्कृष्ट लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्याचं नाव गाजत होतं.

एकदा आमची मैत्रीण अभिनेत्री रीमानं अनिलकडे घेऊन जाण्याबद्दल माझ्याकडे आग्रह धरला. मी तिला अनिलकडे घेऊन गेलो होतो. मग बऱ्याच गप्पा झाल्या.

मला आठवतंय एकदा ईटीव्हीवर आनंद अवधानीनं अनिल अवचट, मी आणि इतरही काही लोकांच्या मुलाखती ठेवल्या होत्या. त्यावेळी आम्ही एकत्रच गप्पा मारत परतलो होतो. एकदा त्याला मौजेच्या श्री. पु. भागवतांना भेटायचं होतं. श्री. पु. हे माझे मामेसासरे. मग मौजेचा आणि श्री. पुंचा विषय निघाला आणि बऱ्याच गप्पा झाल्या. 

यानंतर गेल्या दहा वर्षांत आमच्या वारंवार गाठीभेटी होत राहिल्या. दर काही महिन्यांनी माझी पत्रकार नगरात चक्कर व्हायचीच. तिथे दुसऱ्या मजल्यावर तो अत्यंत साधेपणानं राही. त्यावेळी त्याची आई त्याच्याबरोबर रहायची. ‘माझ्या आईला तुझी पुस्तकं आणि लेख आवडतात आणि ती तुझ्या टीव्हीवरच्या मुलाखती ऐकते’ असं तो सांगायचा. काही वर्षांपूर्वी त्या वारल्या तेव्हा मात्र अनिल एकाकी पडला होता. पण मी त्याच्याकडे गेलो की गप्पांचा फड रंगायचा.

गंमत म्हणजे अनिलचे हात कागदांच्या वस्तू बनवण्यात सतत गुंग असायचे. त्याला ओरेगॅमीचं एव्हढं वेड होतं, की कुठल्याही कार्यक्रमात स्टेजवर असतानाही तो काहीतरी पक्षी, प्राणी, बोटी, घरं करतच बसायचा. तो ज्या खोलीत बसे, तिथे मागे बरीच पुस्तकं आणि पुढे त्यानंच तयार केलेली शिल्पं, लाकडावर केलेली कार्विन्ग्ज, चित्रं, बासऱ्या असं सगळं पडलेलं असायचं. मग मधूनच तो बासरी काढायचा आणि काहीसं वाजवायचा. मग कित्येकदा वेगवेगळ्या रागातल्या बंदिशी गायचा. मग मीही माझा गळा साफ करायचो. तो मलाही गायचा आग्रह करायचा. एखादी बंदिश आठवली नाही की तो माझ्या सुलभाताईला फोन करायचा. मग ताई फोनवरच त्याला कित्येक बंदिशी गाऊन दाखवत असे. सोलापूरला गेल्यावर तो नेहमी सुलभाताईला भेटायचा आणि काही वेळा तिथे उतरायचाही.

गंमत ही की तांत्रिकदृष्ट्या संगीत न शिकलेला हा माणूस बेसूर मात्र कधीच होत नसे. त्याची सुरांची जाण खूपच चांगली होती आणि माझ्याप्रमाणेच संगीतातल्या व्याकरणापेक्षा त्याच्या भावविश्वावरच प्रेम करणं हे त्याला खूप महत्त्वाचं वाटायचं. त्यालाही गाण्यातलं उच्च-नीच मान्य नव्हतं. कित्येकदा तो गुलाम अलींच्या गझलाही ऐकत आणि गुणगुणत असे.

पण गाणं हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग असला तरी तो एकच भाग होता. एका माणसाच्या अंगात किती कला असाव्यात ! चित्रकला, शिल्पकला, फोटोग्राफी, ओरेगॅमी, कविता, लिखाण हे सगळं एकच माणूस तितक्याच लीलया आणि उत्कृष्टपणे कसं करू शकतो हे मला न उलगडणारं कोडंच होतं.

मला त्याचं लिखाण खूप आवडायचं. आमच्या लिखाणाची स्टाईल आणि विषय वेगळे असायचे. माझे जास्त ज्ञानशाखांविषयी आणि तात्विक होते. मग त्यात अर्थशास्त्र, मानसशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, गणित असे अनेक विषय होते; आणि त्याचं लिखाण मात्र माणुसकीनं आणि विवेकवादानं बहरलेलं होतं. त्याचं ‘माणसं’, ‘प्रश्न आणि प्रश्न’ आणि इतर काही पुस्तकं वाचली आणि मी आतून बाहेरून हादरून गेलो. हमाल, वेश्या, सफाईकामगार, मच्छीमार यांच्यापासून तळागाळातल्या अनेक थरातल्या अनेकांना भेटून त्यांची आयुष्यं बघून ती चितारण्याची एक विलक्षण कसब त्याच्याकडे होती. एका अर्थानं रिपोर्टाजमधलं त्यानं एक वेगळाच मापदंड निर्माण केला होता. एव्हढं रसरशीत पण तरीही त्यांच्याविषयी आत्मीयतेनं असलेलं, समानतेचा आग्रह धरणारं, अन्यायविरुद्ध आणि अंधश्रद्धेविरुद्ध, अविवेकवादाविरुद्ध शांतपणे आरडाओरड करणारं लिखाण मी तरी अजून वाचलेलं नाहीये.

यात कुठेही कटुता नव्हती; कुठेही आग पाखडणं नव्हतं आणि तो स्वत: जात, धर्म यांच्या कुठलीच बंधनं न पाळणारा असला तरी त्याचे सगळ्या जातीत, धर्मात मित्र होते. याचं कारणच मुळी त्याचं लिखाण हे सर्वसमावेशक, समतोल राखणारं तरीही ठाम असणारं होतं.

त्याला माझं आत्मचरित्र ‘मुसाफिर’ खूपच आवडलं होतं. त्यानं त्या पुस्तकासाठी लिहिलेला ब्लर्बही लोकांना खूप आवडला होता. आमच्या ‘कॅनव्हास’ पुस्तकासाठीही त्यानं झकास ब्लर्ब दिला होता; आणि ‘झपूर्झा’चं पुस्तक प्रकाशन त्याच्याच हस्ते झालं होतं.

अनिलच्या डोक्यात सुंदर जगाचं एक स्वप्न होतं. या जगात स्पर्धेपेक्षा सहकार्य होतं; जात, धर्म, रंग, लिंग असे कुठलेच उच्चनीच भेदाभेद त्याच्या जगात नव्हते. सगळे एकमेकांशी प्रेमानं वागताहेत; एकमेकांना मदत करताहेत, या जगात द्वेष नाहीये, युद्धं नाहीयेत; मारामाऱ्या आणि गुन्हेगारी नाहीये असं जग त्याच्या स्वप्नात असावं. त्याच्या भाषणातून मला नेहमी हेच जाणवे. या क्रूर, युद्धखोर, असमान जगानं त्याचं स्वप्न केव्हाच पायदळी तुडवलं असलं, तरी तो स्वप्न बघतच राहिला असावा असं मला नेहमी वाटे. आता त्याच्याबरोबर ते स्वप्नही विरून गेलंय !

आज तो प्रेमाचा, वात्सल्याचा, आपुलकीचा, माणुसकीचा, विवेकवादाचा आणि विज्ञानवादाचा झरा कायमचा आटलाय. मला शब्दच सुचत नाहीयेत. श्रद्धांजली इतकंच !     

 

 – श्री अच्युत गोडबोले

प्रस्तुती  श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आज किती दिवसांनी … ☆ श्री शरद दिवेकर

श्री शरद दिवेकर

?  विविधा ?

☆ आज किती दिवसांनी… ☆ श्री शरद दिवेकर ☆

आज किती दिवसांनी आलास तू घरी ! सकाळी तुझी चाहुल लागली मला. खरं तर रोज तुझी चाहुल लागली की मी लगेचच दार उघडतो. पण आज अंमळ उशीराच उघडलं दार.

दार उघडून तुला घरात घेतलं, थोडंसं न्याहाळल्यासारखं केलं आणि लगेच दुसर्‍या कामाला निघून गेलो. तुला वाईट वाटलं असेल थोडं. कारण मी रोज असं करत नाही. तुला घरात घेतलं की तुझा चेहरा तरी नीट बघतोच, तुझ्या अंतरंगात देखील डोकावतो बहुधा.

जवळ जवळ रोजच येतोस तू. क्वचित कधीतरी येत नाहीस. त्या दिवशी देखील असं वाटतं की तू आला असशील. पण दार उघडावं तर तू नसतोसच बाहेर. मग हिरमोड होतो मनाचा. मग मनाला समजवावं लागतं.

गेले काही दिवस तुझी आठवणही फारशी येत नव्हती. कारण सवय झाली होती तू नसण्याची. विचार करतच होतो की तुला घरात घ्यायचं की नाही याचा, की घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद करायचे ! पण नक्की काही ठरत नव्हतं. अन आज अचानक उगवलास धूमकेतूसारखा.

द्विधा मनःस्थिती होण्याचं कारणही तसंच आहे. पन्नास पंचावन्न वर्षांचा ऋणानुबंध आहे आपला. तुझं व्यक्तीमत्वही याला कारणीभूत आहेच. तुझी माझी सर्वच मतं काही पटत नाहीत. खरं तर एकांगी किंवा एकपक्षी मतं असतात तुझी. तरीही तुझ्याऐवजी दुस-या कोणाचा विचार मनात नाही आला एवढ्या वर्षांत.

आता आज पुन्हा आला आहेस घरी. तर येत जा रोज.

रोज माझ्या घरी येणारा महाराष्ट्र टाइम्स

©  श्री शरद दिवेकर

कल्याण

मो 70457 30570, ईमेल – [email protected]

 

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आदरणीय बाबा…. चित्रकार श्री राहुल पगारे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

??

आदरणीय बाबा…. चित्रकार श्री राहुल पगारे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

चांगली माणसं गेली की फार दुःख होतं. ही माणसं आपल्या नात्याची ना गोत्याची असतात मग तरीही आपण एवढे दुःखी का होतो?ह्या वेदना काळजाच्या एवढ्या खोलवर का जातात? कारण एकच बाबांनी  आजन्म श्रमिक, शोषित, वंचित, लहान मुलांसाठी खूप मोठे काम उभे केले. व्यसनमुक्ती साठी मुक्तांगण सारखे व्यसनमुक्ती केंद्र उभे केले. बाबा यांच्या साधनेच्या कुमार मासिकात येणाऱ्या छान छान गोष्टी. या गोष्टींचे मी मुलांना वर्गात वाचन करून दाखवायचो. दोन वेळेस बाबांना व्याख्यान देणेसाठी सिन्नर ला निमंत्रित केले होते. मी बाबांना विचारले मानधन किती देऊ? तेव्हा ते म्हणाले, मी तुझ्या आग्रहापोटी येतोय. मी मानधनासाठी कधीही व्याख्याने देत नाहीत.” बाबांनी आम्ही भेटायचे ठरवले. मी, मित्र राम ढोली, सुखदेव वाघ, विश्वनाथ शिरोळे असे आम्ही चौघे पुण्याला बाबांना भेटायला गेलो. मनात विचार केला त्यांचा खूप अलिशान बंगला वगैरे असेल पण प्रत्यक्ष स्थळी पोचल्यावर भ्रमनिरास झाला. साधा जुन्या इमारतीत वन बी एच के फ्लॅट. मी बांबांचे व्यक्तिचित्रण भेट देण्यासाठी नेले होते. त्यांना खूप आवडले. मग त्यांच्या छोट्याशा १० बाय१० च्या रूम मध्ये पुस्तकांची प्रचंड गर्दी, कागदकाम , वुड कार्विंग, एका गोल भांड्यात भरपूर बासरी यांचे लहान मोठे नमुने पाहायला मिळाले. एक दीड तास त्यांच्या घरातला सहावास आम्हा सर्व मित्रांसाठी खूप रोमांचकारी होता. बाबा हे स्वतःसाठी कधीच जगले नाही. घरात ९० वर्षांची आई होती. आई च्या हातात पुस्तक होतं. तिच्या बाजुला पुस्तके रचून ठेवलेली. पाहून आम्ही अचंबित झालो. राम ढोली सरांनी विचारले,” बाबा आई एवढ्या वयाच्या असूनही त्या पुस्तके वाचतात.” बाबा म्हणाले, अरे तिचा मला एकच त्रास आहे. तिला सारखी पुस्तके घ्यावी लागतात. पुस्तक दिलं वाचून लगेचच दुसरे पुस्तक तिला द्यावं लागतं. तिची वाचनाची भूक मोठी आहे.”

निघताना त्यांनी कागदापासून छोटासा पक्षी तयार करून दाखविला. सुरेल बासरी वाजवून दाखविली. खूप खूप आनंद वाटला. बाबांनी आजवर कधीही साबण अंगाला लावला नाही. साबण वापरण्याचे काही तोटे आहेत ते ऐकल्यावर धक्काच बसला. बाबा हे खूप साधे व्यक्तिमत्त्व होते. त्यांना त्यांच्या मोठेपणाचा कधीही गर्व नव्हता. मी नंतर बऱ्याचवेळा त्यांच्याशी फोनवर बोलायचो. त्यांच्याशी बोलल्यावर खूप समाधान मिळायचे. सिन्नरला शारदीय व्याख्यान मालेत बाबांचे व्याख्यान खूपच वेधक झाले होते. ऐकण्यासाठी जमलेले सर्व  रसिक मंत्रमुग्ध झाले होते.

एकदा मी त्यांना व्याख्यानासाठी फोन केला. तो फोन माझा शेवटचा. हॅलो!!!

“बाबा, आपण माझ्या मुलांना संस्कार शिबीरात मार्गदर्शन करणेसाठी याल का?”

बाबा म्हणाले,” थकलो रे राहुल आता!”

” तब्येत साथ देत नाही”.

ऐकून अस्वस्थ झालो.

मी म्हणालो, “ठीक आहे, काळजी घ्या आपली.”

यानंतर पुन्हा कधीच बोलणे झाले नाही. मात्र पुस्तकातून आमची भेट अधूनमधून व्हायची. पण आता ही भेट पुस्तकातूनच होईल. या आठवणी माझ्या काळ जात नेहमीच चिरकाल राहतील. म्हणूनच समाजाठी काम करणारी खरीखुरी माणसं गेली की त्रास हा होतो च. डोळे ओले होतात त्यांच्यासाठी. यासाठी रक्ताचं नातं असावंच असं नाही. ही नाती रक्ताच्या पलिकडची असतात.

बाबा हे इतर बाबांसारखे भोंदू नव्हते. हे त्रिकाल सत्य!

आदरणीय बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली….???

चित्रकार श्री राहुल पगारे

ठाणगाव

प्रस्तुती  श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खुली कवाडं..! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ खुली कवाडं..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

स्री-शिक्षण आणि स्त्री-स्वातंत्र्य याबाबतीत पराकोटीचं प्रतिकूल, उदासिन वातावरण असणारा दिडशे वर्षांपूर्वीचा काळ.वयाच्या नवव्या वर्षी तत्कालीन प्रथेनुसार बालविवाह झालेली एक मुलगी जाण येईपर्यंत असलेल्या माहेरच्या वास्तव्यात आवडीने अभ्यास करू लागते. तिची अभ्यासाची ओढ आणि गोडी लक्षात घेऊन पुरोगामी विचारांचे तिचे सावत्र वडील तिच्या शिक्षणाला प्रोत्साहनही देतात. पुढे ती जाणत्या वयाची होताच रितीनुसार तिची सासरी पाठवणी होते.तिथलं जुनाट वातावरण, कांहीही कामधंदा न करता बसून खाणारा नवरा हे सगळं शिक्षणामुळे प्रगल्भ होऊ लागलेल्या तिच्या मनाला पटणं शक्यच नसतं.ती पहिल्या माहेरपणाला येते ते सासरी कधीच परत जायचं नाही हे मनोमन ठरवूनच.सासरहून नांदायला यायचे तगादे सुरु होतात तेव्हा ‘ न कळत्या वयात झालेलं हे लग्न मला मान्य नाहीs’ असं ती ठणकावून सांगते.

हा वाद तत्कालीन इंग्रज राजवटीच्या कोर्टात जातो.सासरी नांदायला जाणे किंवा सहा महिन्यांचा तुरुंगवास या दोन पर्यायांपैकी एक पर्याय स्विकारायची वेळ येते तेव्हा ‘नको असलेल्या सासरच्या बंदिवासापेक्षा मी तुरुंगवास पत्करेन पण सासरी जाणार नाही ‘असं ती ठामपणे सांगते.

या घटनेनंतरच्या तिच्या संपूर्ण आयुष्याला मिळालेली सकारात्मक कलाटणी आणि पुढे तिने गाजवलेलं अफाट कर्तृत्त्व हा आवर्जून जाणून घ्यावा असा एक प्रदीर्घ अध्याय आहे!

ही गोष्ट आहे दिडशे वर्षांपूर्वी जगभर गाजलेल्या ‘रखमाबाई केस’ म्हणून ओळखल्या गेलेल्या खटल्याची ! रखमाबाई राऊत या खंबीर स्त्रीची ! भारतातली प्रॅक्टिस करणारी पहिली स्त्री डाॅक्टर- रखमाबाई राऊत यांची..!

रखमाबाईंचे सावत्र वडील बुरसटलेल्या विचारांचे आणि म्हणून स्त्री-शिक्षणाच्या बाबतीत अनुदार असते,तर शिक्षणाच्या गोडीची चवही चाखायला न मिळता रखमाबाईंचं उभं आयुष्य तत्कालीन अन्यायग्रस्त स्त्रियांसारखं जळून राख झालं असतं. पण सावत्रमुलीच्या आयुष्यात पसरु पहाणारा मिट्ट काळोख आपल्या चैतन्यदायी विचारांच्या उत्साहवर्धक स्पर्शाने नाहीसा करुन तिच्या आत्मसन्मानाची ज्योत तेवत ठेवणारे तिचे सावत्र वडील , श्री.सखाराम राऊत  रखमाबाईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि तिच्या कर्तृत्वाला आपल्या चैतन्य स्पर्शाने सतत झळाळीही देत राहिले हे महत्त्वाचं आहेच.आणि रखमाबाईंनी  सकारात्मक विचार आणि चैतन्यदायी प्रकाशकिरण आत येण्यासाठी स्वतःच्या मनाची कवाडंही खुली ठेवलेली होती हेही तितकंच लक्षणीय आहे.

 

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print