डाॅ.व्यंकटेश जंबगी

?  विविधा ?

☆ ….आणि स्वर पोरके झाले.” ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆

“….आणि स्वर पोरके झाले.”

लतादीदी कधी परक्या वाटल्याच नाहीत… आपलीच लता मंगेशकर… खूप आदर, पण त्याहीपेक्षा आपुलकी जास्त, प्रेम उदंड…देवाला आपण “अहो” म्हणतो का ? हा गणपती, हा मारूती, ही महालक्ष्मी,ही सरस्वती….तशी ही आपली लता !..”मंगल प्रभात” पासून “आपली आवड” पर्यंत.”आपहीके गीत” पासून “बिनाका गीतमाला”, विविध भारतीच्या विविध कार्यक्रमात दिदींचं गाणं नाही असं झालंच नाही.

सर्व बारा स्वर (७+५), दिदीच्या कंठात येण्यास उत्सुक असायचे..ताल दिदीच्या स्वरांना साथ द्यायला आतुर असायचे….

शब्द कोणत्याही गीतकाराचे असो.. गदिमा,जगदीश खेबुडकर, आनंद बक्षी, साहिर लुधियानवी, संतोष आनंद, शकील बदायुनी इ.इ. असे अनेक गीतकार,त्यांच्या शब्दांना न्याय देण्याचं दिदींचं कसब अद्भुत होतं… गाण्यांचा पहिला आलाप जणू गाण्यातील स्वरांना आणि शब्दांना हळुवारपणे सतर्क करायचा..मग स्वरांनी मढविलेले सर्व शब्द एकामागून एक शिस्तीत यायचे… प्रत्येक क्षणाला कोणत्या ना कोणत्या रेडिओ स्टेशनवर दिदींचं गाणं चालू असायचं….

सैगल पासून शैलेंद्रसिंग पर्यंत आमच्या पिढीने दिदींबरोबर द्वंद गीत ऐकली आहेत…. नव्या गायकांना दिदींनी उत्तेजन दिले आहे… लक्ष्मीकांत प्यारेलाल या संगीतकाराची प्रतिभा ओळखून दिदींनी त्यांना उत्तेजन दिले.. आणि त्यांच्या रूपाने एक “मोस्ट मेलडियस” संगीतकार चित्रपट सृष्टीला मिळाला. दिदींची सर्वात जास्त चित्रपटगीते या जोडगोळी बरोबर आहेत.शंकर जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, नौशाद,कल्याणजीआनंदजी,रवि,दत्ताडावजेकर, सी.रामचंद्र, रोशन, एस्.डी., आर्.डी.बर्मन, राम कदम

अशा अनेक संगीतकारांची दिदींच्या आवाजातील गाणी आमच्या पिढीने ऐकली.दिदींचं गाणं ऐकलं की ते आवडतच व्हायचं….मी गाणी ऐकायला लागल्यापासून दिदींचा अनेकांप्रमाणे चाहता आहे.. एक छान आठवण.. आळंदीच्या आ.भा. साहित्य संमेलनला मी निमंत्रित कवी होतो.तेथे सुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके संमेलनाध्यक्ष होत्या त्यांची माझी तोंडओळख होती.शांताबाईसोबत दिदी आल्या होत्या.संधी मिळाल्याबरोबर मी शांताबाईना आणि दिदीना भेटलो.वाकून नमस्कार केला….एक शब्दप्रभू, एक स्वरलता…. तो आयुष्यातील अत्युच्च क्षण !

आक्टोबर १९८१ ला मला दिदींचे स्वतःच्या लेटरहेड वर स्वहस्ताक्षरात पत्र आले आहे.

उद्या त्याचा फोटो पोस्ट करीत आहे.आता मी नि:शब्द झालोय.

गीतकारांच्या लेखण्या अश्रू ढाळताहेत..स्वर पोरके झाले आहेत…वाद्ये मूक झाली आहेत.

“लता”हा शब्द उलटा वाचला तरी “ताल” होतो, ते ताल “बेताल” होऊ लागलेत.. किशोरदांनी एकदा दिदींना विचारले ,”मेरा कौनसा गाना आपको सबसे अच्छा लगा ? “दिदींनी विचारले, “बोलके सुनाऊं या गा कर ?” किशोरदा बोलले “गा कर”दिदींनी आपल्या वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट म्हणून किशोदांना एक कैसेट दिली.त्यात दादींचं किशोरदांनी गायलेलं आवडतं गीत होतं..”ये जीवन है,इस जीवनका” एल्.पींचं..”पिया का घर”मधलं.. एकांतात किशोरदां हे गाणं अनेकदा ऐकत होते.

शेवटी मला वाटतं देवलोकात गंधर्वांना आणखी संगीत शिकायचय्, भगवान विष्णूंना आपला आवडता राग “हिंडोल”

दिदींकडूनच ऐकायचा आहे, श्री महादेवांना मालकंस ऐकायचाय आणि ब्रम्हदेव-सरस्वतीना वीणेची साथ करायची म्हणून त्यांनी दिदींना वर बोलावून घेतलय्.

दिदी, तुम्ही आम्हाला वचन दिलंय “रहे ना रहे हम महका करेंगे,बनके कली बनके समा बावजे वफामें..”दिदी, तुम्हाला आमच्यापासून कोणी दूर घेऊन जाऊ शकत नाही.

तुमच्या स्मृतिला वंदन !

 

© डॉ. व्यंकटेश जंबगी

एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४
मो ९९७५६००८८७

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments